अजूनकाही
१. नवीन रिक्षा परवान्यांसाठी मराठीची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. रिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना मराठी भाषा यायला हवी, अशी सक्ती प्रादेशिक वाहतूक विभागाने (आरटीओ) केली होती. मात्र अशी सक्ती करणे योग्य नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मिरा भाईंदर चालक संघटनेने राज्य सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ‘रिक्षाचालकांना बॅच देताना मराठीचा आग्रह धरल्यास ते समजून घेतले जाऊ शकते. मात्र परवाने देताना मराठीची सक्ती करणे चुकीचे आहे. कारण अनेकदा रिक्षा परवाना घेणारी व्यक्ती त्याची रिक्षा दुसऱ्या व्यक्तीला भाड्याने चालवण्यास देत असतात,’ असे मिरा भाईंदर चालक संघटनेने म्हटले होते.
मुंबईच्या परिसरातल्या याच भागातल्या नव्हे, तर कोणत्याही भागातल्या रिक्षाचालकांना, मालकांना, त्या धुणाऱ्यांना, त्यांची दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजमालकांना, सीएनजी पुरवठादारांना, स्पेअरपार्टवाल्यांना… सगळ्या सगळ्यांना मराठी यायलाच पाहिजे, अशी सक्ती करता येईल. पण, तिचा उपयोग काय? या सगळ्यांना एकमेकांशीच मराठीत बोलायला लागेल. मुंबईत कोणाही परप्रांतीयाला मराठीत बोलण्याची कधीच कुठेच गरज भासत नाही, सगळी कामं हिंदीतून आरामात होतात. कारण, मराठी माणूस घराच्या दाराबाहेर पडला की, आपल्याच बायकोपोरांशीही हिंदीत बोलायला लागतो. त्याने मराठीत बोलावं याचीही सक्ती करायची का?
………………………………………………………………………
२. तामिळनाडूतील जलीकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधि आणि न्याय विभागाकडून बैलगाडी शर्यतीसाठी विधेयक आणले जाणार आहे.
असं इतक्या सहजगत्या कसं काय करताय राव? थोडं आंदोलन होऊद्यात, ध्रुवीकरण होऊद्यात. लाखोंचे मोर्चे निघूद्यात. राज्याच्या जीवनमरणाची ही अस्मिता आहे, अशा भावनेनं सगळ्या शहरांचं कामकाज बंद पाडलं जाऊद्यात. पाचदहा माणसांचे आंदोलनात बळी जाऊद्यात. त्यानंतर हा प्रश्न सोडवला तर नेतृत्व कसं झळाळून उठेल तुमचं.
………………………………………………………………………
३. भारतीय रेल्वेतून प्रवास करताना आता रेल्वे स्थानकांवर शीतपेये मिळणार नाहीत. पश्चिम मध्य रेल्वेच्या स्थानकांवर पेप्सी आणि कोकाकोलाची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर शीतपेये विकण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र असे कोणतेही प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पश्चिम मध्य रेल्वेच्या ३०० स्थानकांवर आता शीतपेयांची विक्री केली जाणार नाही. केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी लोकसभेत शीतपेयांमध्ये कॅडमियम आणि क्रोमियम असल्याचे सांगितले होते. यानंतर आरोग्य विभागाच्या प्रमाणपत्राशिवाय रेल्वे स्थानकांवर शीतपेये विकण्यावर बंदी घालण्यात आली होती.
तर मग आता धडधडत्या चित्ताने रेल्वे स्टेशनांवर ट्रेनबरोबरच वाट पाहा कॅडमियम-क्रोमियममुक्त आणि अत्यंत आरोग्यदायी अशा पतंजलीच्या शुद्ध स्वदेशी शीतपेयांची… काय म्हणताय? चव अगदी सेम टु सेम पेप्सी किंवा कोकाकोलाचीच लागतेय? असूद्याना, बाटली शुद्ध स्वदेशी पतंजलीची आहे ना? झालं तर मग.
………………………………………………………………………
४. सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे, असे मला वाटते. कारण सकाळी कुठलीही वाहिनी सुरू करा आपल्याला त्यावर एक भविष्य सांगणारा ज्योतिषी वाहिन्यांनीच नेमलेला दिसतो. मला वाटतं, अशा गोष्टींमध्ये वेळ घालविण्याऐवजी त्या वेळेत तरुणांना जोडू शकेल, असे काही वैज्ञानिक कार्यक्रम दाखवले तर ते अधिक चांगले ठरेल. दुर्दैवाने तसे कुठेही होताना दिसत नाही. विज्ञान-तंत्रज्ञानाचा विस्फोट होतोय हे खरं, पण कशासाठी त्याचा वापर व्हायला हवा, याचा विचार, त्याविषयीचे चिंतन मात्र होताना दिसत नाही. : डॉ. जयंत नारळीकर
नारळीकर साहेब, मुळात समाजाने आणि संस्कृतीने इतका कडेकोट बंदोबस्त ठेवलेला असताना तुमच्यासारख्या काही मोजक्या मंडळींच्या डोक्यात हे विज्ञानवादी विचार कुठून शिरले, याचा तपास करण्याची आवश्यकता आहे. खरं चिंतन त्याविषयी करायला हवं. आपल्या पुरातन ज्ञानाविषयी तुमचं घोर अज्ञानच तुम्ही दाखवून देत आहात. रोज आयुकामधून बाहेर पडल्यावर काळ्या शेपटीच्या गायीला दोन घास द्या, तिची शेपटी डोळ्यांना लावा आणि पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावून पाहा आठ गुरुवार. फरक पडेल काहीतरी तुमच्या विचारशक्तीत.
………………………………………………………………………
५. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पदभार सोडला असला, तरी त्यांच्या लोकप्रियतेत अजून तिळभरही कमी झाली नाही. त्यांच्या नेतृत्वाची भुरळ जगातील लोकांना पडली आहे. फ्रान्समधील जनतेला ते राष्ट्रपती हवे आहेत. सध्या फ्रान्समध्ये राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणुका सुरू आहेत. ‘ओबामा२०१७’ संकेतस्थळाने ओबामा यांना फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष होण्याची गळ घालणारी याचिका तयार केली आहे. या संकेतस्थळाला फ्रान्सवासीयांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २७ हजारांहून अधिक लोकांनी या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
फ्रेंच भाऊ, घाई करू नका. तुम्ही रांगेत आहात. ओबामा यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद दोन कार्यकाल उपभोगलं असलं तरी नियमांत बदल करून, घटनादुरुस्ती करून त्यांनाच तिसऱ्यांदा पाचारण करावं, अशी मागणी खुद्द अमेरिकेतून होते आहे. तिथे ट्रम्पतात्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता खरोखरच असं झालं तर आश्चर्य वाटायला नको. तुम्ही हवं तर तात्यांना घेऊन जा… फ्रेंच भाऊ, ओ फ्रेंच भाऊ… क्षणात कुठे गायब झालात?
………………………………………………………………………
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment