अजूनकाही
ओतूरच्या आमच्या व्हॉट्सॲप गटात अधूनमधून कोणी ना कोणी गावाविषयीचे लेख टाकत असतं. या गटात वैज्ञानिकांपासून शिक्षक, डॉक्टर, अभियंते, व्यावसायिक आणि सामान्य गृहिणींपर्यंत अनेक जण आहेत. या सर्वांनाच या लेखांचं मोठं कौतुक. ते असणारच म्हणा. शहरात आलो, सुस्थित स्थिरावलो की, कुणालाही वाटतेच आपल्या गावाची ओढ. तेव्हाचं ते अभावग्रस्त जगणं, ते दारिद्र्य, भौतिक मागासलेपण याचीही मौज वाटू लागते. आणि तसंही वयाच्या एका टप्प्यावर ‘गेले ते दिन गेले’चे सूर आवडू लागतातच. त्यातलाच हा भाग. पण या स्मरणरंजनी लेखांबरोबरच ओतूरशी संबंधित आणखीही काही लेख अधूनमधून या गटात वाचायला मिळतात. ते असतात डॉ. अनिल अवचट यांचे वा त्यांच्याविषयीचे.
सुसंस्कृत ओतूरकर, मग ते वैचारिकतेच्या कोणत्याही, डाव्या-उजव्या-मधल्या टोकावरचे असोत, त्यांना अनिल अवचट यांच्याविषयी प्रेम असतंच. याचं कारण म्हणजे अवचट हे मूळचे ओतूरकर आहेत आणि त्यांनाही ओतूरविषयी प्रचंड प्रेम आहे. किंबहुना आज मराठी वाचकांना या गावाची काही ओळख असेल, तर ती अवचटांमुळेच. त्यांच्या अनेक लेखांमध्ये कुठून ना कुठून ओतूर डोकावतंच. आता आपल्या गावाचं नाव असं गाजवणारी व्यक्ती कोणालाही आपली वाटणारच.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
तेव्हा ओतूरकरांसाठी ‘अवचट आपले कोण लागतात?’ हा प्रश्नच नसतो. ते आपलेच असतात. हीच बाब अवचट यांच्या सुहृदांची. उभ्या आयुष्यात असंख्य माणसे त्यांनी जोडून ठेवली. अनेकांशी त्यांचं मैत्र. ‘मुक्तांगण’ या संस्थेमुळे असंख्य व्यसनमुक्तांचे परिवार त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. ती संख्या कितीतरी आहे. या सगळ्यांनाही अवचट आपले कोण लागतात, हा प्रश्न मुळात पडणारच नाही. आणि तसाही हा प्रश्न या मंडळींसाठी नाहीच.
हा सवाल आहे असंख्य मराठी वाचकांसाठी. अनिल अवचट या कार्यकर्ता-लेखकाच्या वाचकांसाठी.
त्यांचं आणि अवचट यांचं नातं नेमकं काय आहे?
नातं कोणतंही असो, देवाणघेवाण हा त्याचा पाया असतोच. तिथं कोणीतरी देत असतं, कोणीतरी घेत असतं. लेखक आणि वाचक यांचं नातंही असंच व्यवहारी असतं, हे नीट समजून घेतलं पाहिजे. लेखक हा काही निर्वात पोकळीत लिहीत नसतो. तो वाचकांसाठीच लिहितो. पुस्तक असेल, तर ते वाचकांनी वाचावं. शक्यतो विकत घेऊन वाचावं. त्यातील लिखाण समजून घ्यावं. त्यास दाद द्यावी. वाचक हे सारं लेखकास देत असतो. त्याने लेखक नावारूपास येतो. अनेकदा त्यामुळे त्याच्या लेखनास बळ येतं. खोली, उंची येते. तर हे सारं असंख्य मराठी वाचकांनी अनिल अवचट यांना भरभरून दिलं आहे आणि एका रोकड्या वाचनव्यवहारातून हे झालेलं आहे. ही वाचकांनी केलेली परतफेड. आता प्रश्न असा येतो, की कशाची परतफेड? म्हणजे अवचटांनी वाचकांना नेमकं असं काय दिलं?
डॉ. अनिल अवचट यांचं व्यक्तित्व बहुआयामी आहे. समाज आणि व्यक्तींवरील प्रेम, सहानुभूती हा त्यांचा स्थायीभाव आहे. ते स्वतःला ‘आरामवादी’ समजत. हा त्यांचा विनय झाला आणि त्याचा अर्थ एवढाच की, सामाजिक चळवळीतील अन्य लढवय्या कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांचा पिंड नव्हता. संघटना बांधणे, ती चालवणे, लढे उभारणे, यासाठी एक वेगळ्याच प्रकारचा पुढारपणा लागतो. तो त्यांच्यात नव्हता. पण संघर्ष हा सामाजिक कामाचा केवळ एक भाग झाला. सामाजिक कामांमागे विचारांची भक्कम भिंत उभी असावी लागते. प्रश्नांची भक्कम मांडणी करावी लागते. त्या संघर्षाला समाजातून पाठिंबा, किमान सहानुभूती मिळवावी लागते. या कामात संघर्षाइतकी थरारकता नसते. पण ते तेवढंच महत्त्वाचं असतं. अवचट यांनी सातत्यानं ते काम केलं. पण ते करत असताना त्यांच्यातील सौंदर्याचा आस्वादक कडू झाला नाही. ही फार महत्त्वाची बाब आहे.
सामाजिक काम करणाऱ्या अनेकांचं हे असं होतं. त्यातील किती तरी लोक जीवन ही जगण्याची गोष्ट असते, हेच विसरून जातात. आनंदाची प्राप्ती ही काहींना पाप वाटू लागते. छानसं गाणं, सुंदरसं चित्र, आजुबाजूचा निसर्ग, त्यातील संगीत अशा अनेक आनंददायी गोष्टींतून सुख मिळवलं म्हणजे आपल्या कार्यनिष्ठेप्रती व्यभिचार केला, असा त्यांचा समज असतो. अवचट हे सौंदर्यासक्त होते. आनंदाभिमुख होते. आणि कदाचित त्यामुळेच असेल, सामाजिक कुरूपता त्यांच्या नजरेला सतत बोचत होती. खंत ही होती की, अनेकांना ती दिसतही नव्हती. अनेकांची दृष्टीच तिथपर्यंत पोचत नव्हती. अवचट तिथं जात होते. फिरून पाहत होते. समंजसपणे मांडत होते. वृत्तपत्रांतून, ‘मनोहर’-‘साधना’सारख्या साप्ताहिकांतून लिहीत होते.
त्यांच्या लिखाणाचा बाज होता वृत्तपत्रीय. दिसतं तसं लिहावं हा त्यांचा लेखनबाणा. त्याला रिपोर्ताज म्हणतात असं कोणी सांगितल्यावर, ‘अरेच्चा, हे असं आहे होय!’, ही त्यांची प्रतिक्रिया होती. शैलीदार लिहावं, त्यासाठी पुस्त्या गिरवाव्यात हे त्यांनी कधी केलंच नाही. त्याची त्यांना गरजच पडली नाही. त्यांच्या लेखनाची सुरुवात ही, पाहिलं त्याची गोष्ट सांगण्यातून झालेली आहे. आणि त्यांनी काय काय पाहिलं!
हमाल, कामगार, वेश्या, देवदासी, गर्दग्रस्त यांचं जीणं त्यांनी पाहिलं. त्यांनी दुष्काळ पाहिले, दंगली पाहिल्या. त्यांनी बलुतेदारी पाहिली, तशीच मग्रूर जमीनदारी अनुभवली. त्यांनी अंधश्रद्धांनी, रूढी-परंपरांनी पछाडलेली माणसं पाहिली, रजनिशांसारखे बाबाबुवा आणि माता पाहिल्या. आरोग्यासारख्या क्षेत्रातला आपल्याच व्यवसायबंधूंचा भ्रष्टाचार पाहिला. राजकारणातील - मग ते पक्षांचं असो, दलित पँथरसारख्या संघटनांतील असो की, कीर्तनकारांच्या मेळाव्यांतील - ताणेबाणे पाहिले. त्यांनी विविध सामाजिक कामात स्वतःला झोकून दिलेले कार्यकर्ते पाहिले. त्यांनी माणसं पाहिली. त्यांचे अनुभव, त्यांचे लढे, संघर्ष, समस्या, त्यांची कामं हे सारं सारं ते मांडत राहिले. यावर काहींचे आक्षेप की, हे सारं वृत्तपत्रीय रिपोर्ताज शैलीतलं. तर त्याला साहित्य म्हणायचं का? अनिल अवचटांना साहित्यिक म्हणायचं का?
.................................................................................................................................................................
डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -
.................................................................................................................................................................
आता साहित्यिक म्हणून साने गुरुजींनाही नाकारणारी समीक्षा आपल्या प्रांती आहे म्हटल्यावर, अवचटांबाबतचे हे असे प्रश्न मनावर घेण्यात अर्थच नसतो. त्या समीक्षकांचे ठोकताळे त्यांना लखलाभ असोत. शिवाय अवचटही त्याबाबतही कधी आग्रही नव्हते. आपला कप्पा कुठला हा त्यांच्यासमोरचा प्रश्न नव्हताच कधी. ते म्हणत - ‘याला साहित्य तरी कशाला म्हणता? पाहिलं ते सांगावं, या गरजेपोटी केलेलं हे लिखाण. कथा- कादंबर्यांना प्रत्यक्ष हेतू नसतो, तर ते लिखाण आपोआप स्फुरलेलं असतं. पण इथं मात्र लोकांना माहीत व्हावं, या उघड हेतूपोटी मी लिहीत होतो.’ पण काहींचा नेमका आक्षेप आहे तो यालाच. त्यांचं म्हणणं असं की, अवचटांनी तर फक्त प्रश्नच मांडले. फार मीडिऑकर आहेत ते. मध्यमवर्गीय वगैरे वाचकांच्या संवेदना गोंजारत लिहितात. वगैरे.
या आक्षेपकांनी बहुधा अनिल अवचट फारसे वाचलेले नसावेत. त्यांना ते एकतर ऐकून माहीत असावेत किंवा मग त्यांनी बहुधा अवचटांचे नंतरच्या काळातील ललित गद्य तेवढंच वाचलेलं असावं. अवचट समजून घेण्यासाठी त्यांच्या लेखन कारकिर्दीतील हे दोन टप्पे नीट समजून घ्यावे लागतात. या दोन्ही टप्प्यांवरची त्यांची जीवनदृष्टी सारखीच होती. कुतूहल तेच होतं. पण आता त्यांचे विषय बदलले होते. हा वयाचा परिणाम असेल, त्यांची सखी-सचिव अशी पत्नी डॉ. सुनंदा यांच्या जाण्याने आलेल्या हळवेपणाचा परिणाम असेल, पण अवचट बदलले होते. ते मुलांसाठी लिहू लागले होते. ते कधी कधी स्मरणरंजनाच्या बागेत फिरून येत होते. स्वतःच्या छंदांविषयी गप्पा मारू लागले होते. ते आता वडिलकीच्याच नव्हे, तर आजोबांच्या भूमिकेत होते. इथं त्यांच्या जाणीवा क्रांतिकारक वगैरे नव्हत्या. तसेही ते स्वतःला कधीही क्रांतिकारक लेखक समजत नव्हते. शब्दांचिच शस्त्रे असं ते मानतच नव्हते. त्यांची ती प्रवृत्ती नव्हती. ते व्यवसायाने (काही काळ) डॉक्टर होते. त्यांचे शब्द शल्यविशारदाच्या हत्यारांसारखे होते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
लोकांना माहीत व्हावं हीच आपली भूमिका असं ते म्हणत. पण नीट पाहिलं, तर याहून एक मोठं काम त्यांचं लेखन करत होतं असं दिसेल. ते म्हणजे प्रश्नांच्या मांडणीचे. समाजाचे व्यवहार हे सहसा झापडबंदपणे चाललेले असतात. एक परिपाठ ठरलेला असतो त्यांचा. त्यात होतं असं, की समाजात काही बिनसलेलं आहे, नासलेलं आहे, काही समस्या आहेत हेच त्याला दिसेनासं झालेलं असतं. कधी कधी जाता-येता दिसतातही ते प्रश्न. पण ते प्रश्नच आहेत हेही त्याच्या संवेदनांना झिंजाडून कोणीतरी सांगावं लागतं. अनिल अवचट यांच्या पुस्तकांनी हे काम केलेलं आहे. असे अनेक प्रश्न त्यांनी समोर आणलेले आहेत. एरवी थिएटरमधील बॅटरीवाल्यांची काही दुखणी असतील, हे कधी कोणाला समजलं असतं? कचरावेचक महिला, हमाल, विडी कामगार, वेश्या यांसारख्या अनेकांचं जगणं अवचटांनी त्यांच्या पुस्तकांतून मांडलेलं आहे. ते सारं सरळसोट आहे. त्याकडं तितक्याच सरळसोटपणे पाहण्याची दृष्टी अवचटांनी वाचकांना दिलेली आहे. त्याचा परिणाम वाचकांच्या जाणीवांवर झाला का? तर तो होतच असतो.
अवचट हे लोकप्रिय असतात. त्यांची ‘माणसं’, ‘वेध’, ‘धागे आडवे-उभे’, ‘धार्मिक’, ‘कार्यरत’ यांसारखी पुस्तकं आजही वाचक वाचतात. पुन्हा पुन्हा वाचतात. त्यातून आपल्याला दृष्टी लाभते. म्हणून अवचट आपले ‘आपले’ लागतात, असं त्यांना वाटत असतं. हे अवचटांनी वाचकांना दिलेले देणं आहे. ते त्यांचं नातं आहे.
.................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा
डॉ. अनिल अवचट - बहुतेकांचा ‘बाबा’!
बाबा ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे, पण तो फटकून राहणारा नाही, तर बरोबर घेऊन जाणारा आहे!
तुम्ही काही म्हणा, जोपर्यंत लिहावंसं वाटतंय, तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे!
.................................................................................................................................................................
लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘प्रोपगंडा’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
ravi.amale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment