शिरोजीची बखर : प्रकरण आठवे - शिरोजीने एक फार मोठा मुद्दा मांडला आहे. त्याने ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ कशी होते, हे दाखवून दिले आहे!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
  • Thu , 27 January 2022
  • संकीर्ण व्यंगनामा नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP शेतकरी आंदोलन Farmers Protest योगी आदित्यनाथ Yogi Adityanath

जानेवारी २०२२मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि चर्चांची एकच राळ उडाली. भाजप धोक्यात आहे, हा संदेश स्वतः पंतप्रधानांनी कृषी-कायदे मागे घेऊन सगळ्या देशाला काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्यांच्यावर देशाची माफी मागायची पाळीसुद्धा आली होती. त्यातच महागाईने कळस गाठला होता. २०१२च्या सुमारास काँग्रेस राजवटीमध्ये महागाई झाली, तेव्हा भाजपने आंदोलनांचा धडाका उडवून दिला होता. या वेळी भाजपच्याच राजवटीमध्ये महागाईचा आगडोंब उसळला होता. उत्तर प्रदेशातील नेत्यांच्या भाषेत बोलायचे तर – ‘महंगाई की वजह से जनता त्राहिमाम हो गई थी’.

शिरोजीने या सगळ्याचा थोडक्यात परामर्श या बखरीमध्ये घेतला आहे. पण, या बखरीमध्ये शिरोजीने एक फार मोठा मुद्दा मांडला आहे. त्याने इतिहासाची पुनरावृत्ती कशी होते, हे दाखवून दिले आहे. १९७९ साली तत्कालीन जनता पक्षाच्या सरकारने जनतेतील मागासवर्गीय जातींचा अभ्यास करण्यासाठी मंडल आयोग नेमला होता. बी. पी. मंडल नावाचे खासदार या आयोगाचे मुख्य होते आणि म्हणूनच या आयोगाचे नाव ‘मंडल आयोग’ असे प्रचलित झाले होते. अनेक सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निकष लावून मंडल आयोगाने बहुजन समाजातील अनेक जातींनाही आरक्षणाची गरज असल्याचे सांगितले. भारतातील ओबीसी म्हणजे ‘अदर बॅकवर्ड क्लासेस’मधील लोक लोकसंख्येच्या ५२ टक्के आहेत. त्यातील अनेक जातींची परिस्थिती लक्षात घेता त्यांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये २७ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस केली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

भारतात आधीच २२ टक्के आरक्षण होते. हे भारतातील २५ टक्के दलित समाजातील विविध जातींना दिले गेले होते. त्यात आता २७ टक्के ओबीसींना दिले जावे, असे मंडल आयोग सांगत होता. या स्फोटक शिफारसी जनता सरकारने गुलदस्त्यात ठेवल्या. मंडल आयोगाचा अहवाल जनता सरकारने बासनात गुंडाळून ठेवला. नंतर आलेल्या काँग्रेसच्या इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सरकारांनीसुद्धा हा अहवाल बासनाच्या बाहेर काढला नाही. पुढे व्ही. पी. सिंग नामक एक व्यक्ती राजीव गांधी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून निवडून आली. हे स्वतः समाजवादी तत्त्वज्ञानाचे पाईक होते. सत्तेवर येण्यासाठी यांनी ‘नॅशनल फ्रंट’ नावाची विरोधी पक्षांची आघाडी स्थापन केली. भाजप अर्थातच या ‘नॅशनल फ्रंट’मध्ये सहभागी होता.

आपले राजकीय स्थान पक्के करण्यासाठी व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. तत्कालीन भारतात मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध प्रचंड आंदोलने झाली. भाजपचा समर्थक वर्ग मुख्यतः उच्चवर्णीय होता. हा वर्ग अर्थातच मंडल आयोगाच्या विरोधात होता. पण, सामाजिक न्यायाचा मुद्दा म्हणून भाजपला मंडल आयोगाला जाहीर विरोध करता आला नाही. कारण, भाजपलासुद्धा बहुजन समाजाची मते हवी होती.

या रणधुमाळीमध्ये भाजपने बाबरी मस्जिद प्रकरण काढले. बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर व्हावे, म्हणून भाजपने रामरथयात्रा काढायला सुरुवात केली. व्ही. पी. सिंग यांनी रथयात्रेला विरोध केला, म्हणून भाजपने व्ही. पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. व्ही. पी. सिंग सरकार पडले. व्ही. पी. सिंग यांनी राजकीय स्वार्थासाठी जातीच्या निकषावर देश विभागला, असे काही उच्चवर्णीय त्या काळी कुजबुजू लागले. खरे-खोटे रामरायाला माहीत!

भाजपने मंडल आयोगाचे राजकारण फिके पाडण्यासाठी बाबरी मस्जिद प्रकरण पुढे केले, असे मागासवर्गीय कुजबुजू लागले. खरे-खोटे रामरायाला माहीत! व्ही. पी. सिंग यांनी ‘मंडल’चे राजकारण केले म्हणून भाजपने ‘कमंडल’चे राजकारण केले असे म्हटले जाऊ लागले. खरे तर व्ही. पी. सिंग खूप आधीपासून समाजवादी विचारसरणीचे होते, हे आपल्याला विसरता येत नाही. आपली स्वतःची जमीन गोरगरिबांत वाटून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले यांनी त्यांना यात फार यश प्राप्त होऊ दिले नाही, ही वेगळी गोष्ट!

खरे तर, भाजपसुद्धा १९९० सालाच्या खूप आधीपासून रामजन्मभूमी संदर्भात आपली भूमिका मांडत होता, हे सुद्धा आपल्याला विसरता येत नाही. म्हणजे ‘मंडल विरुद्ध कमंडल’ ही लढाई, म्हणायचे झाले तर राजकारणामधली अपरिहार्यता म्हणून सुरू झाली असे म्हणता येईल; आणि म्हटले तर ही लढाई दोन जेन्युइन राजकीय तत्त्वज्ञानांमधली आहे, असेही म्हणता येईल.

यात काँग्रेसची भूमिका कुंपणावर बसण्याची होती. त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू होण्याला विरोध केला नाही आणि बाबरी मस्जिद काँग्रेसचे नरसिंव्ह राव पंतप्रधान असतानाच पाडली गेली, हे आपण विसरू शकत नाही. काँग्रेसच्या या वर्तनाला राजकीय लबाडी म्हणता येईल किंवा भारतातील सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा एक जेन्युइन प्रयत्न असेही म्हणता येईल.

शिरोजीने हा सगळा इतिहास पाहिला होता. त्यामुळेच त्याला २०२२ साली याच लढाईचा दुसरा भाग सुरू झाला आहे, हे पटकन कळले. त्यावरच त्याने आपल्या बखरीचे हे प्रकरण लिहिले आहे. ‘रिअल पॉलिटक’(Real Politik)च्या भाषेत विचार करायचा तर या वेळी कमंडलूच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी मंडल राजकारण केले जात होते. रिअल पॉलिटिक म्हणजे फक्त अपरिहार्यतेवर उभी असलेली राज्य व्यवस्था. या मध्ये आदर्शांना आणि विचारसरणीला स्थान नसते, हे बहुतांश वाचकांना माहीत आहेच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धर्माधिष्ठित राजकारणाला जातीय राजकारणाचाही आधार होता. भारतातील पक्ष सेक्युलॅरिझमच्या किंवा धर्माधिष्ठित राजकारणाच्या कितीही लंब्याचौड्या भाषा करू देत. जातीपातींचे राजकारण सगळ्याच पक्षांना करावे लागते. श्रीमान मोदीजींच्या धार्मिक राजकारणाचा जातीय आधार काढून घेण्याचा प्रयत्न २०२२च्या उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत केला गेला.

कित्येक मोदी भक्तांना चाललेल्या हालचालींचा नेहमीप्रमाणे काहीच पत्ता नव्हता. मोदी हे ‘राम’ आहेत, अमित शहा हे ‘लक्ष्मण’ आहेत आणि उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ‘हनुमान’ आहेत, अशा कथांमध्ये हे भक्त रममाण झाले होते. चूक त्यांचीही नव्हती. त्यांचा जन्मच कुठल्या ना कुठल्या फोल आदर्शांमध्ये रममाण होण्यासाठीच होता. असे लोक निसर्गाकडून म्हणा, या जगाच्या निर्मात्याकडून म्हणा का निर्माण केले जातात, याविषयी खूप चर्चा होऊ शकते.

२१२२मधील वाचकाला शिरोजीची बखर नीट समजावी म्हणून आम्ही एवढी प्रस्तावना केली आहे. पार्श्वभूमी नीट समजली म्हणजे त्या पार्श्वभूमीवर घडणारे नाट्य व्यवस्थित लक्षात येते, म्हणून आम्ही एवढे बोलण्याचे धारिष्टय केले आहे. अन्यथा शिरोजीसारख्या मोठ्या लेखकाच्या लिखाणाच्या आधी इतकी बडबड करणे योग्य नाही, हे आम्हीही जाणतो. असो. वाचक आणि शिरोजी या दोघांचीही माफी मागून आम्ही हे प्रकरण वाचकाच्या पुढे प्रस्तुत करतो आहोत.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

शिरोजीची बखर - प्रकरण आठवे

चहाची टपरी नानांना आवडली होती. या टपरीवर बसून चहा पीत चर्चा केली की, आपला साधेपणा लोकांवर ठसतो, हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांच्या अविवाहित मुलीची केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियाच्या कॉन्शुलेटमध्ये सांस्कृतिक सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. जास्त काही नाही पण वर्षाकाठी ४० लाख पगार येत होता. आज सहा वर्षं झाली, ती त्या पदावर होती. या साऱ्या प्रकारात मिळून मिळून किती पैसा मिळणार? देशहितासाठी आयुष्य समर्पण केलेल्या नानांसारख्या माणसाच्या अविवाहित मुलीला एवढेसुद्धा मिळू नये का? पण लोक कुजबुजत होते. सत्तेची मलई नाना खात आहेत, अशी चर्चा करत होते. दुष्टपणा सगळा! अर्थात नाना तिकडे लक्ष देणार नव्हते. त्यातल्या त्यात अविनाश आणि अच्युतला ही गोष्ट माहीत नव्हती, याचे त्यांना हायसे वाटत होते. काहीही असले तरी या सगळ्यामुळे ती चहाची टपरी नानांना आवडू लागली होती. नानांचा साधेपणा त्यामुळे सगळ्या जगाला दिसून येत होता.

नाना, अविनाश आणि अच्युत आज खुश होते. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचे ‘ओपिनियन पोल्स’ आले होते. सगळ्या चॅनेल्सनी भाजप निवडून येणार असे भाकित केले होते. गेल्या वेळेपेक्षा भाजपच्या १०० एक जागा कमी होणार होत्या. पण निदान सत्ता प्राप्त होणार होती. शिवाय अजून मोदीजी आणि चाणक्य शहा यांनी सूत्रे हाती घेतलेली नव्हती. त्यांनी सूत्रे हाती घेतली की, कमी होऊ घातलेल्या शंभर जागासुद्धा भरून येणार होत्या. सगळी आलबेल होती.

(अमित शहा नावाचे मोदीजींचे एक साहाय्यक होते. निवडणूक मॅनेजमेंट ही या अमित शहा यांची खासीयत होती. त्यामुळे त्यांना ‘चाणक्य’ असे नाव पडले होते. पुढे त्यांच्या मॅनेजमेंट खाली झालेल्या अनेक निवडणुका भाजपने गमावल्या. तरीही श्री मोदी यांचे भक्त श्री अमित शहा यांना पुढे अनेक वर्षे ‘चाणक्य’ असे म्हणत राहिले. पुढे पुढे तर भाजपच्या अनेक कार्यक्रमात मूळ चाणक्य यांची ओळख प्राचीन काळातील अमित शहा अशी करून देण्यात येत होती -  संपादक)

अच्युत - आपल्या शंभर जागा कमी होणार म्हणतायत ‘ओपिनियन पोल’वाले.

अविनाश - पैसे खाल्ले असणार या ओपिनियन पोल्सवाल्यांनी विरोधी पक्षांकडून.

अच्युत - कृषी कायदे मागे घेताना मोदीजींनी माफी मागायला नको होती. त्यामुळेच कमी झाल्या असणार या जागा.

(या पोराचे काय करावे हे नानांना खूप दिवस कळत नव्हते. होता जेन्युइन, पण तत्त्वांना फार चिकटून बसत होता. इतकं तत्त्वं तत्त्वं करून चालत नाही. एकदा कायमसाठी आपले सरकार आले की, पाळायचीच आहेत सगळी तत्त्वं. तत्त्वं कुठं पळून जात नाहीत. सत्ता मात्र हातातून कुठल्याही क्षणी जाऊ शकते.)

अविनाश - योगीजींनी उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य आणले. रात्री अपरात्री सोन्याचे भरगच्च दागिने घालून फिरणे आयाबायांना शक्य झाले. आणि, हे ओपिनियन पोलवाले १०० जागा कमी होणार, असे म्हणतायत! नॉनसेन्स!

अच्युत - मोदीजींनी देशाची माफी मागायला नको होती. काँग्रेसच्या कुठल्याच पंतप्रधानाने माफी मागितली नाही कधी!

अविनाश - (चिडून) तू गप रे. सारखं माफी माफी करू नकोस.

अच्युत - तुम्ही एकीकडं ५६ इंचाची तुमची छाती आहे असं म्हणता आणि दुसरीकडे माफी मागत फिरता. जागा कमी नाही होणार तर काय होणार? जनतेने तुम्हाला काय माफी मागायला पंतप्रधान केलं आहे काय?

अविनाश - (डेस्परेट होत) नाना, हा बघा मोदीजींना कसं बोलतोय.

नाना - अरे अच्युत, राजकारणात थोडं संयमानं घ्यावं लागतं. कधी डोळे वटारून तर कधी माफी मागून पुढे जावं लागतं.

अच्युत - जा ना तुम्ही पुढं. तुम्हाला पाहिजे तसं जा. पण मग निदान माझी छाती ५६ इंचाची आहे, असं तरी सांगू नका. तुम्ही सगळ्या जगाला सांगा की, माझी छाती चारचौघांसारखी ३६ इंचाचीच आहे. आणि मला चारचौघांसारखीच सत्ता आवडते. त्यामुळे मी कधी दादागिरी करून, तर कधी माफी मागून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतो.

(इतक्यात भास्कर आणि समर आले. त्यांना बघून अविनाश चिडला. एक म्हणजे अच्युत पेटला होता, त्यात या मोदी-विरोधकांचा त्रास.)

भास्कर - (येत) काय म्हणतेय उत्तर प्रदेशची इलेक्शन?

अविनाश - १०० टक्के जिंकणार आम्ही.

समर - कशावरून?

अविनाश - योगीजींवर उत्तर प्रदेशातील जनता खुश आहे.

भास्कर - कशावरून?

अविनाश - तसे मेसेज आलेत मला.

समर - तुझ्याकडे फक्त भाजपच्या आयटी सेलचे मेसेज येतात.

भास्कर - सगळीकडे महागाई वाढली आहे. कोव्हिडच्या वेव्हमध्ये गंगेत प्रेतं वाहिली आहेत. शेतकरी रागावले आहेत. बेरोजगारी वाढली आहे, गोवंश हत्या बंदीमुळे उत्तर प्रदेशभर मोकाट गुरांची संख्या वाढली आहे. गुरे शेतात घुसून सत्यानाश करत आहेत. सगळे हैराण आहेत.

अविनाश - गेल्या तीन निवडणुकीमध्ये आमचे अंदाज बरोबर आले आहेत, म्हणून या वेळीसुद्धा आमचाच अंदाज बरोबर येणार.

भास्कर - (हसत) काय फिजिक्सचा लॉ आहे का तसा?

अविनाश – मोदी’ज लॉ आहे.

अच्युत - हे मात्र बरोबर आहे. मोदींनी माफी मागितली असली तरी शेवटी ‘मोदी इज मोदी!’

भास्कर - आपण एक काम करू. पांडेजींना बोलवू. ते परवाच आले आहेत उत्तर प्रदेशवरून. त्यांना विचारू काय माहौल आहे.

नाना - कोण पांडेजी?

समर - या ठेल्याचे मालक.

भास्कर – अरे, पांडेजी जरा इधर आईए प्लीज. कुछ पूछना हैं आपसे.

(पांडेजी पन्नाशीचे होते. ३० वर्षांपूर्वी ते जगायला म्हणून जौनपुरवरून निघून पुण्याला आले होते. छोटी-मोठी कामे करत त्यांनी २० वर्षांपूर्वी हा ठेला काढला होता. आता एक त्यांचा एक फ्लॅट झाला होता, मुलगा एम.डी. झाला होता आणि मुलगी एम.टेक करून आयटीमध्ये काम करत होती. येतानाच पांडेजी भज्यांच्या दोन प्लेट घेऊन आले. त्या समोर ठेवून म्हणाले -)

पांडेजी - आदरणीय नानाजी, गरीब के तरफ से छोटीसी हौसला अफजाई स्वीकार करिए.

(नानांनी त्यांना उठून नमस्कार केला.)

नाना - (भास्कर कडे बघत) इनकी पूरी ओळख क्या हैं?

(भास्करने पांडेजींची जीवन कहाणी थोडक्यात सांगितली. त्यावर नानांनी प्रसन्नपणे त्यांचे अभिनंदन केले.)

नाना - बहुत बहुत बधाई. आपका संपूर्ण नाव क्या हैं?

पांडेजी - दुर्गाप्रशाद पांडे.

नाना - (भिवया उंचावत) दुर्गाप्रशाद पांडे! बहुतही प्रसन्न नाव है.

भास्कर - पांडेजी आप हालही में जौनपुर होकर आये हो. कौन जीत रहा हैं यूपी में?

अविनाश - योगीजी ना?

पांडेजी - सही बात.

अविनाश - (एक्साइट होत) बघ मी सांगितले नव्हते?

पांडेजी - योगीजी तो जीत जाएंगे शायद. लेकिन सरकार किसकी आयेगी ये कहना मुश्किल हैं. अखिलेशजी बडी फॉर्म में हैं.

अविनाश - शक्यच नाही.

पांडेजी - आपने हमसे पूछा इसलिये जो हमने देखा हैं, वो हम बता रहे हैं.

अविनाश - योगीजीने कितना अच्छा काम किया हैं. माँ-बहने दागिने पहनकर रात को बाहर पड सकती हैं.

पांडेजी - ये दागिने क्या होते हैं?

भास्कर - जेवर.

पांडेजी - (हसत) रात को कौनसी अच्छी स्त्री जेवर पहनकर बाहर घूमेगी? लोग क्या समझेंगे उसे?

समर - (हसत) च्यायला हा पॉइंट सुचलाच नाही आपल्याला कधी.

अविनाश - तू गप रे. (पांडेजीना) पांडेजी, सच सच बाताइये, यूपी सेफ लग रहा हैं के नहीं योगीजी के आने के बाद.

पांडेजी - हमें तो हमेशा सेफही महसूस हुआ उत्तर प्रदेश में. आपका और आपके इलाके के बाहुबली का अच्छा हो, तो सेफ तो लगताही आदमी को!

अविनाश - लेकिन गुंडे और बाहुबली तो बचे ही नहीं हैं यूपी में. मुझे ऐसे कितने मेसेज आये हैं.

पांडेजी - गुंडा नहीं बचा उत्तर प्रदेश में, तो राजनीती कैसे होगी?

भास्कर - (भयंकर हसतो)

अविनाश - असं काय म्हणता पांडेजी? योगीजी आल्यावर पोलिसांनी कितीतरी गुंडांच्या पायात गोळ्या घालून लंगड करून टाकलं. कोण करणार गुंडागर्दी आता?

पांडेजी - गोली वगैरा सब उन गुंडों के साथ होता हैं, जिनकी कोई पोलटिकल वॅल्यू नहीं होती. बड़े गुंडों को एलेक्सन का टिकट दिया जाता हैं.

अविनाश - काहीतरी काय पांडेजी?

पांडेजी - (आपला मोबाइल काढून दाखवतात) ये देखिए ‘इकोनोमिक टाईम्स’ में आया हैं. १४ फरवरी २० के एडिसन में. ‘भाजपा के ३७ % विधायक दागी’.

नाना - काही गुंडांना तिकीट द्यावं लागतं. विरोधी पक्षाच्या गुंडांना हरवण्यासाठी. पण, आमच्या पक्षात एकदा गुंड आला की, त्याच्यावर चांगले संस्कार करण्यात येतात. हेच गुंड विरोधी पक्षात गेले की, तेच त्या पक्षाच्या नेत्यांवर वाईट संस्कार करतात.

भास्कर - (जोरात हसतो) हे खरे आहे नाना.

पांडेजी - नानाजी जो कह रहे हैं उसमें भी तथ्य हो सकता हैं. हमारा कहना इतनाही हैं की, अगर गुंडे नहीं बचते हैं, तो यूपी में राजनीती हो ही नहीं सकती हैं.

समर - गुंड घ्यायचे आणि ते निवडून आले की, त्यांना स्वच्छ करून घ्यायचे. त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस बासनात गुंडाळून ठेवायच्या.

भास्कर - (हसत) गुंडावर एकदा चांगले संस्कार झाले की, कशाला केस करायच्या त्याच्यावर?

अविनाश - (थम्स अपची खूण करत) चला, नानांनी सांगितलेली एक तरी गोष्ट पटली समर आणि भास्करला.

(भास्कर आणि समर एकमेकांना टाळी देतात.)

पांडेजी - अपने उपर के सारे केस समेटनेके हिसाबसे अगर सब गुंडे बीजेपी में जाते रहें, तो एक भी गुंडा बचेगा नहीं यूपी में. सिर्फ गुंडागर्दी बचेगी. गुंडे नहीं बचेंगे.

समर - गुंडामुक्त बीजेपी, गुंडामुक्त उत्तर प्रदेश!

भास्कर - गुंडामुक्त गुंडागर्दी!

(समर भयानक हसतो.)

भास्कर - नाना, पण काही गुंड चांगले संस्कार विसरत असतील नाही?

नाना - विसरतात नं. चक्क विरोधी पक्षात जातात. मग परत त्यांच्यावरच्या केसेस उघडायच्या.

अच्युत - गुंडगिरी संपवायची असेल तर सतत मोदीजी निवडून आले पाहिजेत.

नाना - पण तुम्हाला काय वाटतंय दुर्गाजी भाजपा जीतेगी ना? सब का पाठिंबा योगीजीकोच हैं ना?

पांडेजी - हम दुर्गाजी नहीं हैं नानाजी. आपको हम मादा लगते हैं क्या? हम दुर्गाप्रशाद हैं. हमें एक तो दुर्गाप्रशाद कहिए या तो पांडेजी कहिए.

नाना - आपको क्या लगता हैं पांडेजी, सबका पाठिंबा योगीजी को हैं ना?

पांडेजी - बीजेपी के लिए मुश्किलें बढ़ गई हैं. पहले क्या था, बात हिंदू-मुस्लीम की हो गई थी. अब बात अगड़े और पिछड़े की, हो गई हैं.

नाना - म्हणजे?

पांडेजी - भाजपाने पहले कहा था की, मुसलमानों से बचना हैं, तो बीजेपी को वोट दीजिए. अब विरोधी दल कह रहे हैं की, अगड़ी जातियोंसे बचना हैं, तो हमें वोट दीजिए.

नाना - दुष्टपणा आहे हा. मतांसाठी तुम्ही फुट पाडताय भारतीय लोकांमध्ये.

भास्कर - बरोबर आहे. मतांसाठी हिंदू-मुस्लीम फुट पाडणं योग्य आहे. पण वरच्या जाती आणि खालच्या जाती अशी फुट पाडणं बरोबर नाही.

नाना - आपण इतिहास कधीही विसरता कामा नये. इतिहास मार्गदर्शक असतो आपला!

अविनाश - मुसलमान लोकांशी वागताना आपण इतिहास विसरता कामा नये. या इस्लामी संस्कृतीने खूप अन्याय केला आहे आपल्यावर. त्याची दखल घेऊन वागणं म्हणजे फुट पाडणं नव्हे.

भास्कर - बरोबर आहे. उच्चवर्णीय लोकांनी इतिहासात दलितांना खूप चांगलं वागवलं आहे.

नाना - हे बघा, जे झालं ते झालं. इतिहास या गोष्टीला आपण किती महत्त्व देणार आहोत? कधीतरी विसरून जायला पाहिजे, आपण या सगळ्या गोष्टी. एक व्हायला पाहिजे आपण.

समर - आपल्यावर इतिहासामध्ये जो अन्याय मुसलमानांनी केला आहे, तो आपण विसरायचा नाहिये. पण इतिहासामध्ये जो अन्याय आपण दलितांवर केला आहे, तो त्यांनी विसरायचा आहे. योग्य भूमिका आहे तुमची!

नाना - आपण सगळे हिंदू आहोत. आपण एक झालंच पाहिजे.

पांडेजी - बराबर हैं. हिंदू एकता के लिये पिछड़ों को थोड़ा बहुत आरक्षण बढ़ाकर देना पड़ा, तो किसी अच्छे हिंदू को दिक्कत नहीं होनी चाहिए. 

अच्युत - नाही. अजिबात नाही. दलितांना जे आरक्षण दिलं आहे, ते बास. मेरिट नावाची काही गोष्ट आहे की नाही?

पांडेजी - यहीं दिक्कत हैं बस!

अच्युत - मेरिट, मेरिट, मेरिट!

पांडेजी - किसी एक उच्चवर्णीय जातिविशेष को आप मेरिट का नाम तो नहीं दे रहें हैं?

भास्कर - (जोरात हसतो)

अच्युत - मी अजिबात जातीयवादी नाही. जो मार्क जास्त पाडेल, त्याला शिक्षण आणि नोकरी मग तो कुठल्याही जातींचा असो.

समर - कारण श्रीमंत उच्चवर्णीय मुलामुलींना चांगलं वातावरण मिळाल्यामुळे नेहमीच जास्त मार्क मिळत राहणार आहेत.

अच्युत - तू काहीही म्हण मेरिट इज मेरिट. मोदीजी मेरिटच्या बाजूचे आहेत म्हणून मी मोदीजींच्या बाजूचा आहे.

भास्कर – उत्तर प्रदेशमध्ये विरोधी पक्ष जातीय जनगणना करा म्हणत आहेत.

समर - म्हणजे, ज्या जातींची जेवढी संख्या आहे, तेवढे आरक्षण त्यांना देता येईल.

अविनाश - शुद्ध दुष्टपणा आहे. तुम्हाला देशात एकी ठेवायची नाहिये का?

पांडेजी - आपने कमंडल निकाला, उन्होंने मंडल निकाला.

अच्युत - मोदीजी मेरिटच्या बाजूचे आहेत.

समर - विरोधी पक्ष आता हे प्रकरण लावून धरणार.

भास्कर - ओबीसी जाती भाजपपासून फुटून निघत आहेत.

पांडेजी - मला वाटते की, आता मोदीजींना आरक्षण का टका बढ़ाना होगा. नहीं तो मोदीजी नहीं जीत पाएंगे २४ साल का चुनाव.

अविनाश - शक्य नाही, शक्य नाही, शक्य नाही. उलट मोदीजी आहे, ते आरक्षण रद्द करणार आहेत. मेरिट इज मेरिट!

अच्युत - मलाही तसंच वाटायचं पहिल्यांदा, पण आपली छाती ५६ इंचांची आहे असं सांगून मोदीजींनी माफी मागितली, तेव्हापासून मला काही गॅरंटीच वाटेनाशी झाली आहे मोदीजींची.

पांडेजी - मुझे मालूम हैं आपके प्राण हैं मोदीजी! लेकिन बीजेपी के हालात बहुत बुरे हैं यूपी में. मोदीजी को आरक्षण बढ़ाना पड़ेगा २४ के इलेक्सन के पहले.

अविनाश - नहीं, नहीं, नहीं! सब आलबेल हैं यूपी में. मला मेसेज आलेत तसे.

पांडेजी - आपका सही होगा. लेकिन करोना काल की लापरवाहियाँ, किसान आंदोलन को बदनाम करने की साजिश करना, लॉकडाउन काल में मजदूरोंका हजारों किलोमीटर पैदल चलना, लगातार झूठ बोलना - इन सब चीजों की, एक पोलिटिकल कॉस्ट होती हैं.

भास्कर - उच्चवर्णीय लोकांनी, उच्चवर्णीय लोकांचा, उच्चवर्णीयांचे वर्चस्व पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी तयार केलेला पक्ष - अशी भाजपची प्रतिमा विरोधी पक्ष करू लागले आहेत.

अविनाश - (भडकून) खोटं आहे हे. अपप्रचार आहे.

पांडेजी - आप लोगभी तो प्रचार करते हो की, सब विरोधी दल हिंदू-विरोधी हैं.

अविनाश - पण ती खरी टीका आहे. मनापासून केलेली.

पांडेजी - आप को जो कुछ कहना हैं जरूर कहिए. लेकिन बीजेपी खिलाफ पिछड़े जाती की गोलबंदी करने का प्रयास किया गया हैं, और वो बीजेपी को भारी पड़ सकता हैं.

अविनाश - दुष्टपणा आहे हा. हिंदू विरोधी आहे हे सगळे!

अच्युत - मेरिटच्या विरोधी आहे!

पांडेजी - ओबीसी जाती की, जो गोलबंदी मोदीजी और अमित शाह साब ने पिछले तीन इलेक्शन में की, थी उसमें विरोधी दलों ने सेंध लगाई हैं.

नाना - (भजे खात) ये सेंध क्या होता हैं? पदार्थ हैं क्या कोई?

पांडेजी - नहीं. सेंध लगाने का मतलब हैं छेद करना.

भास्कर - भोसकांडे पाडणे.

अविनाश - आमचे चाणक्य अमित शहा बघून घेतील सगळे.

पांडेजी - बीजेपी के विधायकों को लोग गांव में घुसने नहीं दे रहे हैं पश्चिम यूपी में. दौड़ा रहें हैं बहुत सारे विधायकों को. बहुत गुस्सा हैं बीजेपी के खिलाफ.

अविनाश - भाजपचे आमदार आणि खासदार हे फक्त आमदार-खासदारच नाहीत, तर ते सैनिकही आहेत मोदीजींचे आणि प्रखर हिंदुत्वाचे हे कळत नाहिये का लोकांना?

पांडेजी - महंगाई का आलम हैं. बेरोजगारी का आलम हैं.

अविनाश - अजिबात नाही! खूप रोजगार तयार केला आहे योगीजींनी! तशी पोस्टरसुद्धा लावली आहेत उत्तर प्रदेशभर.

पांडेजी - जहां आदमी झूठ बोल सकता हैं, वहां वो जरूर झूठ बोलेगा. पोस्टर लगाएगा. जहां झूठ बोलना मुमकिनही नहीं हैं, वहाँ कैसे पोस्टर लगाए कोई? सरसों का तेल २०० पार हुआ हैं, तो हमने सस्ताई लाई हैं, ऐसे थोडे ही पोस्टर लगा सकते हैं योगीजी?

भास्कर - (जोरात हसतो.)

पांडेजी - ऐसी अवस्था में आपके खिलाफ गोलबंदी तो होगी.

अविनाश - दुष्ट लोग.

पांडेजी - आपने भी काँग्रेस के खिलाफ ऐसेही गोलबंदी केली होती.

भास्कर - खरे आहे पांडेजी!

अविनाश - अरे करा करा. आमचे चाणक्य बघून घेतील.

पांडेजी - एक ब्राह्मण चाणक्य स्वयं कुछ नहीं कर सकता हैं. हर चाणक्य के पीछे पिछड़ी जाती का एक चंद्रगुप्त मौर्या होना जरूरी होता हैं. आज आलम ये हैं की, मौर्या, कुशवाहा, सैनी और नोनी जैसी सब ओबीसी जाती आपको छोडकर आपसे दूर जा रहीं हैं. मुझे नहीं लगता की, इसबार आपके चाणक्य कुछ कर पाएंगे.

अविनाश - देखेंगे देखेंगे. दस मार्च को चुनाव परिणाम आने हैं. करोना, लॉकडाऊन, किसान आंदोलन लोग सब भूल चुके हैं. लोग योगी और मोदीजी को ही चुनेंगे.

पांडेजी - (शांतपणे हसतात) पब्लिक मेमरी इज सॉफ्ट ये कहावत हैं. और ये अकेली कहावतही सहारा बन गई हैं आप लोगों का. ये आपकी खुशफ़हमी हैं, या हैं ये वास्तविकता हैं, इस के बारे में तो दस मार्च को ही, पता चलनेवाला हैं.

अविनाश - चलेगा चलेगा!

पांडेजी - हम इलेक्सन का रिझल्ट प्रेडिक्ट नहीं कर रहें हैं. लेकिन, हम एक चीज पूरे विश्वास के साथ कह रहे हैं - आज के यूपी में धरम पर जाती भारी पड़ रही हैं. और ये धरम पर जाती का भारी पड़ना, २४ साल के इलेक्सन में जिंदगीभर की मुसीबतें पैदा कर देगा बीजेपी के लिए. .

(पांडेजींच्या या वाक्यावर नानांना ठसका लागला. त्यांच्या केशरहित मस्तकावर घाम आला. भजी खाताना नानांना अचानक मिरची लागली होती. नानांचा जीव कासावीस झाला. कानशिले लाल झाली. सगळे त्यांच्या मदतीला धावले. थोड्या वेळाने नानांना बरे वाटले. अविनाश आणि अच्युत नानांना सोडायला त्यांच्या घरी गेले. समर, भास्कर आणि पांडेजी तिघे भजी खात खात राजकारणावर गप्पा मारत बसले.)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तर शिरोजीने अशा रितीने २०२२ मधील ‘रिअल पॉलिटिक’चे चित्र अशा बहारदार पद्धतीने रंगवले आहे. दुर्गाप्रशाद पांडे हे मोठे बहारीचे पात्रदेखील शिरोजीने या प्रकरणात पहिल्यांदाच आणले. पुढच्या अनेक प्रकरणांत या दुर्गाप्रशाद पांडेजींनी मोठी धमाल उडवून दिलेली आहे. राजकारणाचा व्यासंग केलेली ही व्यक्ती आहे. स्वतः ते एक छोटासा ठेलावाला जरी असले तरी त्यांची राजकारणाची जाण कुठल्याही राज्यशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षा प्रगल्भ आहे. उत्तर प्रदेशच्या सकस मातीतून रुजून आलेले, हे व्यावहारिक आणि राजकीय शहाणपण आहे. पांडेजींच्या शहाणपणाला उत्तर प्रदेशच्या अस्सल मातीचा वास आहे. त्यामुळेच दुर्गाप्रशाद पांडे हे शिरोजीच्या लेखणीमधून सिद्ध झालेले एक पात्र आहे असे म्हणवत नाही. शिरोजीने हे पात्र तत्कालीन पुण्यामध्ये नक्की पाहिले असणार!

भारतीय राजकारणाने २०२२च्या उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत आपली ‘करवट’ बदलली. मोदी यांच्या २०१४ला झालेल्या उदयानंतर भारतीय राजकारण २०२२मध्ये पहिल्यांदाच परत एकदा दुतर्फा झाले. भाजपसाठी एकतर्फा यशाचा मार्ग बंद झाला. धर्माधर्मात भेद होणे वाईट, तसे जातीजातीतही भेद होणे वाईटच. पण रिअल पॉलिटिक असेच असते. अविनाशसारखे लोक बेगडी आदर्शवादाची फोले पाखडत बसतात. दुर्गाप्रशादजींसारखे लोक निखळ सत्व निवडून घेऊ शकतात.

शिरोजीचे लिखाण आपल्याला तत्कालीन राजकारण कसे होते, याची माहिती देतेच, पण राजकारणातील सनातन तत्त्वेसुद्धा आपल्या मनात रुजवते हे त्रिवार सत्य आहे.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......