‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ : आपण कोणत्या काळात जगत आहोत, याचा अंदाज न बांधता यावा, इतका माणूस भ्रमिष्ट झाला आहे. त्या शोकगीताचं निरूपण म्हणजे हा कवितासंग्रह!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अजय कांडर
  • ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Wed , 26 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो Mee Deshacha Saatbara Lihin Mhanto रमेश सावंत Ramesh Sawant

कवी रमेश सावंत यांच्या ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ या काव्यसंग्रहातील एकूण कवितेचा आविष्कार हा वर्तमानाचा कोलाहल आहे. आजच्या असत्य युगावर परखड भाष्य करताना ही कविता एक सुंदर स्वप्नवत जग निर्माण करण्याची अभिलाषा बाळगते. मूल्यांचा ऱ्हास, विवेकशून्य वर्तमानस्थिती, मन विषण्ण करत जाणारे नातेसंबंध, जाती-धर्मांचं दुभंगलेपण, मनाचा निर्घृण कोरडेपणा, बंधुत्वाची भावना संपवून समतेला प्राप्त झालेलं विटाळपण, या सगळ्या विदीर्ण अवस्थेतेचं तुकड्या-तुकड्यांचं आजचं एक काळोखं जग हे या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. या कवितांची ही आशयसूत्रं समजून घेताना आपण आतून हबकून जातो, हे या कवितेचं मोठं बलस्थान आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आज आपण कोणत्या काळात जगत आहोत, याचा अंदाज न बांधता यावा, इतका माणूस भ्रमिष्ट झाला आहे. या भ्रमिष्टाच्या शोकगीताचं निरूपण म्हणून ही कविता वाचकासमोर येते. म्हणूनच या कवितेतून ‘बंधुत्वाच्या पुलाखालून खूप रक्त वाहून तर जाणार नाही ना?’ असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. या कवितांला आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भावनिक, कौटुंबिक लसलसत्या  वेदनेचा स्पष्ट चेहरा आहे. तो चेहरा एवढा विद्रूप आहे की, या सर्व चेहऱ्यांमध्ये आपलाही चेहरा मिळून, तो आपणच कधी विद्रूप करून टाकला आहे, याचीही जाणीव होत नाही. हे असं होत जाणं म्हणजे समाजातील लोकशाही मूल्यं नष्ट होऊन समाजाची अराजकतेकडे वाटचाल होण्याचा प्रारंभ असतो. कवी सावंत हे याचीच भयसूचकता या कवितांतून करत असल्यामुळे, आजच्या अरिष्ट काळाची नोंद आपल्या कवितांच्या समर्थ शब्दांतून ते घेत आहेत, असं आपण खात्रीनं म्हणू शकतो.

राष्ट्रवाद आणि खोटी अस्मिता, जातीयवाद आणि धर्मवादीपणा, खोटी भूमिनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचा बागुलबुवा या सगळ्याला अलीकडल्या काही वर्षांत इथला विचारशील माणूस, तसेच जो निवळ माणूस म्हणून जगू पाहतोय तो तो विटला आहे. या सगळ्याच्या अतिरेकी मानसिकतेतून कधी नव्हे, एवढी इथल्या माणुसकीची पडझड होताना रोज अनुभवास येत आहे. या पडझडीचा आतला आवाज या कवितेच्या ठायीठायी घुमतानाचे स्वर ऐकू येत राहतात. या कवितांतील आजच्या स्थितीच्या या अनुभवातून ‘छिन्न-भिन्न होणं’ फार अस्वस्थ करणारं आहे. म्हणूनच कवी सावंत एके ठिकाणी म्हणतात,

त्या नतद्रष्टांचं काय करू?

जे इतिहासाची

मढी उकरून काढताना

विनाकारणच दडपून टाकत आहेत

माझ्या प्रेयस मायभूमीत उमठणारा

समता, बंधुता आणि एकतेचा आवाज

माणसाला अंधश्रद्धेला कवटाळू दिलं की, अराजकतेचा काळ जवळ येऊ लागतो. हा अराजकतेचाच काळ चालू आहे, असं कवीला वाटतं. त्याची प्रचिती आपल्यालाही वारंवार येत आहे. या अर्थानं कवी  सद्यस्थितीतील घटनांचा मागोवा आपल्या कवितांमधून घेताना दिसतो. याच तीव्र प्रत्यंतर या कवितांमधून येते. एकमेकांविरोधातील विषाची पेरणी समाजात इथं-तिथं करण्याचे प्रयत्न जोरदार चालू आहेत. या सगळ्यामागे विशिष्ट मानसिकता कार्यरत आहे. मात्र सर्व समाज यात भरडला जावा, असं एक षडयंत्र राबवले जात आहे. या षडयंत्रातून माणसाची सकारात्मक क्रियाशीलता नष्ट होऊन आपण सांगू तसाच समाज घडावा, अशी प्रक्रिया अलीकडल्या काळात जोर धरू लागली आहे. या प्रक्रियेचं प्रतिबिंब म्हणून या कवितेकडेही आपण पाहू शकतो. या संदर्भात कवी म्हणतो,

माझ्या रापलेल्या हातात

ठोकून पहिल्या त्यांनी

अंधश्रद्धेच्या कणखर बेड्या

आणि पेरत राहिले द्वेषाची बीजे

माझ्या नसानसात वाहणाऱ्या

मानवधर्मी रक्तात

आता मानवी जिभेला रक्ताची चटक लागलेली आहे. अशा घटना वारंवार घडताना दिसतात. पशुपक्षी सहज मरून जावा आणि त्याचं सोयरसुतक कोणाला नसावं, असा माणूस मारला जात आहे किंवा तो अनपेक्षित घटनेनं मरतो आहे. एखाद्याचा मृत्यू ही माणसाच्या मनाला चटका लावणारी घटना कोणी काळी होती. पण हा काळ, या काळातील मृत्यूबद्दलची संवेदनशीलता हरवून ती एक घटना म्हणूनच आता लोकांसमोर येते. आणि क्षणार्धात या घटनेचं महत्त्व कमी होऊन माणूस कोरडेपणानं निर्ढावलेल्या मनानं रोजचं जगणं जगू लागतो. या सगळ्यामुळे कवी प्रचंड अस्वस्थ होताना दिसतो आहे. यात माणसं व्यवस्थेची बळी गेलेली जास्त दिसतात. मृत्यू आणि जनावरांसारखं जगणं त्यांच्या वाट्याला येतं. जीवन मरणाच्या या संघर्षात ज्यांच्या हातात सत्ता आहे, जे समाज वाचू शकतात, असे लोक मात्र हे शांतपणे सगळे पाहत आहेत. त्यांची गिधाड वृत्ती लोकांच्या मरणाला कवटाळते आहे. म्हणूनच कवी म्हणतो,

मरण स्वस्त झालं

तेव्हापासून दिसू लागलीय

मस्तवाल गिधाडांची फौज

जिवंत माणसांच्या रूपात

अधाशीपणे वर्दळताना

गाव पाणवठ्याचा विकास करता करता गावातील माणसाच्या हातात भिकेची झोळी कधी आली, हेच माहीत नाही. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हणजे ‘खाऊजा’ धोरणात सर्वाधिक भरडला कुठला माणूस गेला असेल तर तो गावातला. या धोरणात गाव ना गाव राहिला, ना गाव शहर होऊ शकलं. गाव आणि शहराच्या मधोमध आता उभा आहे गावचा माणूस. याला कारणीभूत आहेत चुकीची विकासाची धोरणे. गावच्या माणसाची वृत्ती बदलू लागली आहे. त्याला वेगवेगळ्या आमिषानं पछाडलं आहे. तो स्वतंत्र विचारानं जगण्याऐवजी स्वातंत्र्याच्या भ्रामक कल्पनेत तो भ्रमिष्ट झाला आहे. गावच्या माणसाला आपल्याला नेमकं आता काय करायचं आहे, आपण कुणाच्या पाठीमागे उभ रहायचं आहे, याचाच निर्णय घेता येत नाही. त्यामुळे त्याची सुख-शांती रसातळाला गेली आहे. यामुळे तो अधिकच मानसिक कोंडीत सापडला आहे. या सगळ्याच विदारक चित्रही या कवितांतून आपल्याला वाचायला मिळतं.

गावात विकास आणू पाहणारे कोण असतात? गावच्या विकासाची घाई कोणाला झालेली असते? या प्रश्‍नांच्या मुळाशी गेल्यावर गावच्या आजच्या दुःखाचं नेमकं कारण आपल्याला सापडू शकतं. गाव विकासाचं तारण करतं, हे व्यवस्थेतून लाभाचा मलिदा खाणारे व्यवस्थापक असतात. बौद्धिक वाढीने ते सुमार असतात, मात्र गावच्या विकासाचं मॉडेल बनवण्याचे अधिकार सत्ताधारी व्यवस्थेशी लागेबांधे राखत आपल्या हाती ठेवतात. आणि गाव भकास करून विकास करण्याची स्वप्नं लोकांच्या नजरेत उतरवण्यात यशस्वी होतात. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे सहज करता येतं. परंतु असं विकासाचं मॉडेल दीर्घकाळ माणसाला सुखी करू शकत नाही, याची जाणीव गावच्या माणसाला नसते. ज्या अपवादात्मक माणसाला ती असते, तो इतरांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र त्यालाच वेड्यात काढलं जातं. खरं तर कुठल्याही गावचा विकास करण्यासाठी तिथली भूमीच एक ‘रोल मॉडेल’ असतं. मात्र यासाठी गावचा शाश्वत विकास करण्याची उर्मी असणारी माणसं त्या भूमीत असावी लागतात. ती माणसं नसतील तर किंवा त्या भूमीतील माणसं आपली भूमीनिष्ठा, आपला स्वाभिमान कवडीमोलाने विकून गावावर आक्रमण करणाऱ्या बाहेरच्या बाजार व्यवस्थेला शरण जात असतील तर गावाचं गावपण हरवायला आणि त्यातून माणूस सततचा अस्वस्थ राहायला वेळ लागत नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कारण असं झालं की, गावातील घर-शेती-शिवार देशोधडीला लागायला वेळ लागत नाही. पर्यायानं गावातील माणूसच देशोधडीला लागतो. आजच्या सत्ताधारी व्यवस्थेला गावातील माणसाला स्वयंपूर्ण करायचं नाही. त्याला आपल्या अधिपत्याखाली कायमच ठेवायचं आहे. यासाठी धनदांडग्यांच्या घशात तिथल्या जमिनी घातल्या जात आहेत. खरं तर सत्ताधारी व्यवस्था भूमिहीनांना भूमी देण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र ज्यांची भूमी आहे, त्यांनाच भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे. यातून रमेश सावंत सारखा कवी प्रचंड अस्वस्थ होतो आणि त्या अनुभूतीतूनच हा कवी निराशेच्या आवेगातून म्हणतो,

वणवा होऊन जाळा म्हणतो

त्यांच्या मुजोर ठोकशाहीला

ज्यांनी बेचिराख केलीत

तुमची घर, शेतशिवार अन माणसांनाही!

माणसांना, त्यांच्या तोंडातील घासाला बेचिराख करता करता माणसाचं एकोप्यानं राहण्याचं सांस्कृतिक संचितही नष्ट करण्याची जी प्रक्रिया जोरात चालू आहे, या सगळ्याचा सशक्त उद्गगार म्हणजे कवी सावंत यांची ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’मधील कविता होय!

‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ - रमेश सावंत

अष्टगंध प्रकाशन, मुंबई

मूल्य – १५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक अजय कांडर हे कवी व पत्रकार आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......