लेखन कितीही चैतन्याने भारलेले असले किंवा आश्वासक असले, तरीही ते केवळ लढाया आणि वादविवादांबद्दल असू शकत नाही!
पडघम - साहित्यिक
अब्दुल रझाक गुरनाह
  • अब्दुल रझाक गुरनाह
  • Wed , 26 January 2022
  • पडघम साहित्यिक अब्दुल रझाक गुरनाह Abdulrazak Gurnah नोेबेल पारितोषिक Nobel Prize साहित्य Literature

७ डिसेंबर २०२२ रोजी द. आफ्रिकेतल्या झांझिबारचे अब्दुल रझाक गुरनाह यांना सहित्यासाठीचे २०२१चे नोबेल पारितोषिक देण्यात आले. ते स्वीकारताना त्यांनी केलेले भाषण, त्यांच्यातील लेखकाची पार्श्वभूमी व प्रेरणास्रोत सांगणारे आहे. या कार्यक्रमाचे यु-ट्युबवर थेट प्रसारण करण्यात आले. हा एक छोटेखानी समारंभ होता. त्यात कौटुंबिक सदस्य आणि जवळचे सहकारी उपस्थित होते. या दरम्यान, गुरनाह यांच्या भाषणाचा आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. या भाषणात एक लेखक म्हणून आपला प्रवास कसा झाला, त्याबद्दल ते सांगत आहेत. ज्या क्लेशकारक अनुभवांमुळे त्यांनी झांझिबार सोडले आणि ते इंग्लंडला गेले, त्याविषयी त्यांनी सांगितले आहे. त्यातूनच त्यांना लेखनात रस कसा निर्माण होत गेला आणि स्वत:च्या कामातून त्यांनी कोणकोणत्या विषयांचा शोध घेतला ते समजते. हे एक प्रेरणादायी भाषण आहे. त्याचा हा मराठी अनुवाद...

..................................................................................................................................................................

लिहिण्यात नेहमीच आनंद मिळतो. शाळेत असल्यापासून इतर कुठल्याही वर्गापेक्षा, आमच्या शिक्षकांनी आम्हांला आवडेल असे काहीतरी लिहिण्यासाठी नेमून दिलेल्या लेखनवर्गाची मी जास्त वाट पाहत असे. अशा वेळी सगळे जण अगदी गप्प बसायचे आणि आपापल्या डेस्कवर झुकून आपल्या आठवणीतले किंवा कल्पनेतले काहीतरी खास सांगण्यासारखे कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करत असत. त्या काहीशा बालिश प्रयत्नांमध्ये विशेष काही सांगण्याची, एखादा संस्मरणीय अनुभव आठवण्याची किंवा ठामपणे मत मांडण्याची किंवा एखादी तक्रार करण्याचीही असोशी नव्हती. तसंच आम्हांला लिहायला प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांशिवाय इतर कोणत्याही वाचकाची या प्रयत्नांमध्ये आवश्यकताही नव्हती. मला लिहायला सांगितले गेले म्हणून मी लिहीत असे आणि त्यातून मला आनंद मिळत गेला.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

नंतर काही वर्षांनी जेव्हा मी स्वतः शाळेत शिक्षक झालो, तेव्हा याचीच दुसरी बाजू मला अनुभवायला मिळाली. माझे विद्यार्थी त्यांच्या कामात मग्न झालेले असताना मी शांत वर्गात बसलेला असे, तेव्हा मला डी.एच. लॉरेन्सच्या एका कवितेची आठवण होत असे. ‘द बेस्ट ऑफ स्कूल’ या कवितेत ते म्हणतात, ‘‘मी वर्गाच्या किनाऱ्यावर एकटा बसलो असताना, उन्हाळी कपडे घातलेली मुले त्यांची डोकी टेकवून लिहिताना दिसतात. मध्येच एखादा विचारमग्न चेहरा माझ्याकडे वळतो आणि जणू त्याला काहीच दिसत नाही. मग हवे ते सापडल्याचा रोमांच त्याच्या चेहऱ्यावर झळकतो आणि तो पुन्हा आपल्या कामाकडे वळतो.’’

मी ज्या लेखनवर्गाबद्दल सांगतोय, तो नंतरच्या काळातल्या लेखनासारखा नव्हता. ते लिखाण तसे निरुद्देश होते, त्याला काही विशिष्ट दिशा नव्हती, त्यावर पुन:पुन्हा काम करून त्यात सुधारणा केली जात नसे. त्या अतिउत्साही प्रयत्नांच्या काळात, मी अगदीच एकरेषीय लिहीत असे. त्या लिखाणात ना कसला संकोच होता, ना कसली दुविधा होती. उलट एक प्रकारची निरागसताच होती. माझे वाचनदेखील तसेच कसलाही धरबंध नसलेले, दिशाहीन होते. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे, हेसुद्धा मला त्या वेळी माहीत नव्हते. कधी कधी शाळेसाठी लवकर उठायची गरज नसायची, तेव्हा मी रात्री उशिरापर्यंत वाचत बसायचो. माझ्या वडलांना निद्रानाशाचा विकार होता, ते मग माझ्या खोलीत येऊन मला लाइट बंद करायला सांगत असत. ‘तुम्ही अजून जागे कसे काय? मी का जागं राहायचं नाही?’ असे विचारायची माझी हिंमत होत नसे. कारण वडिलांशी असे बोलायचे नसते. काही झाले तरी, माझ्या आईला त्रास होऊ नये म्हणून ते स्वत:च्या निद्रानाशाचा वेळ अंधारात, लाइट बंद करूनच घालवत असत. त्यामुळे लाइट बंद करण्याची त्यांची सूचना काही बदलली नसती.

मी नंतर केलेले लेखन आणि वाचन तरुणाईतल्या स्वैर अनुभवाच्या तुलनेत बरेच व्यवस्थित होते. पण त्यातूनही तितकाच आनंद मिळत असे आणि लिहिण्यासाठी मला कधी झगडावे लागले नाही. हळूहळू त्यात एक निराळाच अद्भुत आनंद मिळत गेला. मी इंग्लंडमध्ये राहायला जाईपर्यंत हे माझ्या नीटसे लक्षात आले नव्हते. पण घराची ओढ लागलेली असताना आणि एका अनोळखी व्यक्तीच्या जीवनातील दु:खामुळे; मी ज्या गोष्टींवर आधी विचार केला नव्हता त्याविषयी चिंतन करू लागलो. दारिद्र्य आणि तुटलेपणाच्या अनुभवाच्या त्या प्रदीर्घ काळात वेगळ्या प्रकारचे लेखन करू लागलो. आणि मग मला काही तरी सांगायचे आहे, एक महत्त्वाचे काम करायचे आहे, वेगवेगळ्या बाबतींतला अन्याय आणि दु:ख माझ्या मनात साचून आहे आणि त्यावर मला विचार करायचा आहे याची मला जाणीव झाली.

सुरुवातीला, मी माझ्या घरातून कशाचीही पर्वा न करता बाहेर पडलो. त्या वेळी काय गमावले त्याचा मी विचार केला. १९६०च्या दशकाच्या मध्यात आमच्या जीवनात अराजकता आली, त्यातून जे काही बरेवाईट पडसाद उमटले ते १९६४मधल्या क्रांतीतील क्रूरतेमुळे धूसर झाले होते. अटक, फाशी, हकालपट्टी, अंतहीन लहानमोठे अपमान आणि अत्याचार... या सगळ्यांमध्ये जे घडत होते, त्याच्या ऐतिहासिक आणि भविष्यकालीन परिणामांबद्दल स्पष्टपणे विचार करणे माझ्या कुमारवयीन अबोध मनाला अशक्य होते.

मी इंग्लंडमध्ये राहायला लागलो, तेव्हा सुरुवातीच्या काळात मी अशा समस्यांवर चिंतन करू शकलो. आपल्या वागणुकीमुळे एकमेकांवर किती भीषण परिणाम होऊ शकतात, त्यावर विचार करता आला. आपल्या गैरसमजुती आणि आपले भ्रम यांचा पुनर्विचार करू शकलो.

आमचा इतिहास अर्धवट होता, अनेक क्रूरतांबद्दल त्यात मौन बाळगलेले होते. आमचे राजकारण वंशवादावर आधारलेले होते आणि त्याने क्रांतीनंतर थेट जुलुमाकडे नेले. मुलांसमोर त्यांच्या वडिलांची कत्तल केली जात होती आणि मुलींना त्यांच्या आईसमोर मारहाण केली जात होती. या घटनांपासून दूर इंग्लंडमध्ये राहूनदेखील माझ्या मनात खूप अस्वस्थता आहे. कदाचित असेही असेल की, ज्यांना प्रत्यक्ष परिणाम भोगावे लागले, अशा लोकांपेक्षा त्या आठवणींचा प्रतिकार करायला मी पुरेसा सक्षम नव्हतो. पण या घटनांशी संबंध नसलेल्या इतर आठवणींचाही मला त्रास झाला.

पालकांचे आपल्या मुलांशी निर्दयपणाने वागणे, सामाजिक कट्टरपणामुळे किंवा लिंगभेदामुळे लोकांना अभिव्यक्ती नाकारण्यात येणे, विषमतेमुळे येणारी गरिबी आणि असहायता - या काही अपवादात्मक बाबी नाहीत. त्या तर मानवी जीवनात सगळीकडेच दिसून येतात. परंतु जोपर्यंत परिस्थितीमुळे तुम्हांला त्यांची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी सतत तुमच्या मनात जाग्या नसतात. मला अशी शंका वाटते की, जे लोक एखाद्या आघातातून निसटले आहेत आणि मागे राहिलेल्या लोकांपासून दूर सुरक्षितपणे जगत असतात, त्यांच्या मनावर कायम हे ओझे असते.

अखेरीस, मी यांपैकी काही आठवणींबद्दल लिहायला सुरुवात केली. त्याला फार काही शिस्त नसली, तरीदेखील माझ्या मनातील संभ्रम आणि अनिश्चिततेला काहीशी स्पष्टता देण्यासाठी त्याचा उपयोग झाला. पण कालांतराने हे स्पष्ट झाले की, काही तरी अस्वस्थ करणारी गोष्ट घडत आहे. एक नवीन सोपा इतिहास रचला जात होता. जे वास्तवात घडले होते त्याऐवजी इतिहासाची एक नवीनच सोयीस्कर पुनर्रचना केली जात होती. हा नवा आणि सुलभ इतिहास म्हणजे केवळ विजेत्यांच्या आवडीचे कथानक तयार करण्याचे अपरिहार्य काम नव्हते, ते करायचे स्वातंत्र्य तर त्यांना नेहमीच होते. परंतु ज्यांना आमच्यामध्ये प्रत्यक्षात काहीच रस नव्हता, अशा विद्वान, भाष्यकार आणि अगदी लेखकांनादेखील हे सुलभीकरण सोयीचे होते. त्यांना जगाविषयीच्या त्यांच्या दृष्टिकोनाशी जुळणारे असे वांशिक मुक्ती आणि प्रगतीविषयीचे परिचित कथानक हवे होते आणि ते त्याच एका चौकटीतून आमच्याकडे पाहत होते. म्हणूनच पूर्वीच्या काळाची साक्ष देणाऱ्या इमारती, भौतिक वस्तू, कर्तृत्व आणि जीवनातल्या कोमलतेच्या इतिहासाला नकार देणे त्यांना आवश्यक झाले होते.

बऱ्याच वर्षांनंतर मी ज्या शहरामध्ये लहानाचा मोठा झालो, त्या शहराच्या रस्त्यांवरून फिरलो. तेव्हा मला भूतकाळाची स्मृती हरवण्याच्या भीतीने अनेक दातपडक्या आणि काळवंडलेल्या जागा, इमारती आणि लोक दिसले. लोकांचे जगणे, त्यांच्या कहाण्या आणि त्यांचे विचार यांबद्दल लिहिण्यासाठी त्यांच्या त्या स्मृती जपण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होऊन बसले. आमच्या राज्यकर्त्यांना आत्मगौरवासाठी ज्या छळाच्या आणि क्रौर्याच्या आठवणी निपटून काढायच्या होत्या, त्यांच्याविषयी लिहिणे गरजेचे होते.

मी इंग्लंडमध्ये जाऊन राहिल्यावर माझ्या लक्षात आले की, इतिहासाच्या एका निराळ्या आकलनालादेखील सामोरे जाणे आवश्यक आहे. झांझिबारमध्ये वसाहतवादाच्या प्रभावाखालचे शिक्षण घेत असताना ते माझ्या तितकेसे लक्षात आले नव्हते.      

आम्ही वसाहतवादाच्या प्रभावाखालच्या पिढीतली मुले आपल्या पालकांपेक्षा वेगळी होतो. आमच्या नंतरची पिढी आणखीनच निराळी होती. याचा अर्थ मला असे म्हणायचे नाही की, आमच्या पालकांनी ज्या गोष्टींना महत्त्व दिले, त्यापासून आम्ही अगदीच दुरावलेले होतो. किंवा जे आमच्या नंतर आले ते वसाहतवादी प्रभावापासून मुक्त होते, असेही नाही. मला असे म्हणायचे आहे की, निदान आपल्या जगापुरते तरी आम्ही एका उच्च शाही आत्मविश्वासाच्या काळात शिकलो. तेव्हा वर्चस्ववादावर गोड शब्दांचा मुलामा दिला जात असे आणि आम्हीदेखील त्या क्लृप्तीला बळी पडत गेलो.

मी त्या काळाबद्दल बोलतोय, जेव्हा वसाहतीकरणाच्या मोहिमेने संपूर्ण प्रदेशाला व्यापून टाकले नव्हते आणि वसाहतवादी राजवटीची अगदीच अवनती झाली नव्हती. आमच्या नंतरच्या पिढीत वसाहतकालानंतर तयार झालेले त्यांचे स्वत:चे भ्रम आणि भ्रमनिरास होते. आणि कदाचित वसाहतवादाशी आलेल्या संपर्कामुळे आमचे जीवन कसे बदलले, ते त्यांनी स्पष्टपणे किंवा पुरेसे सखोल समजून घेतले नाही.

आमच्या इथे असलेला भ्रष्टाचार आणि कुशासनदेखील काही प्रमाणात त्या वासाहतिक वारशाचाच एक भाग आहेत, हे त्यांना तितकेसे उमजले नाही. यापैकी काही बाबी मला इंग्लंडमध्ये स्पष्ट झाल्या. त्याचे कारण मला संभाषणातून किंवा वर्गातल्या शिकवण्यातून स्पष्टीकरण देणारे लोक भेटले म्हणून नव्हे, तर त्यांच्याकडील कथांमध्ये माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीचे कसे चित्रण केले आहे ते पाहून आणि तिथल्या अनौपचारिक संभाषणात किंवा टीव्हीवर आणि लिखाणात सुरू असलेल्या वर्णद्वेषी विनोदांमधून मला ही समज येत गेली. मला रोज दुकानात, ऑफिसमध्ये, बसमध्ये जे कडवट अनुभव येत होते, त्यांविषयी काहीही करणे माझ्या हाती नव्हते. पण जसजशी माझी समज वाढत गेली, तशी आम्हांला तुच्छ लेखणाऱ्या आत्ममग्न लोकांच्या संकल्पनांना खोडून काढणारे काही लिहिण्याची इच्छा वाढली.

परंतु लेखन हे कितीही चैतन्याने भारलेले असले किंवा आश्वासक असले, तरीही ते केवळ लढाया आणि वादविवादांबद्दल असू शकत नाही. लेखन हे एका ठरावीक मुद्द्याविषयी, एखाद-दुसऱ्या समस्येविषयी किंवा चिंतेविषयी नसते. लेखन हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानवी जीवनाविषयीच असते. त्यामुळे लवकरच प्रेम, क्रौर्य आणि दुर्बलता हे लिखाणाचे विषय बनतात.

माझा असा विश्वास आहे की, साध्या डोळ्यांनी जे दिसू शकत नाही, ते लेखनाने दाखवले पाहिजे. वरवर पाहता मामुली दिसणाऱ्या लोकांमध्ये इतरांच्या तिरस्काराची पर्वा न करण्याचा आत्मविश्वास कुठून येतो, याविषयीसुद्धा लिहिणे मला आवश्यक वाटले. माणसांना सुलभीकरण आणि साचेबंदपणातून बाहेर काढायचे असेल तर जीवनातली कुरूपता आणि सद्गुण दोन्ही प्रामाणिकपणे मांडणे गरजेचे आहे. जर ते करता आले तर त्यातून एक निराळ्या प्रकारचे सौंदर्य बाहेर येते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अशा प्रकारे आयुष्याकडे पाहण्यामुळे क्रूरतेच्या अनुभवांतूनदेखील कोमलता, दुर्बलता आणि दयेचे स्त्रोत सापडू शकतात. या कारणांमुळेच लेखन हा माझ्या जीवनाचा एक चित्तवेधक आणि मौल्यवान भाग आहे. अर्थातच माझ्या आयुष्यात इतर अनेक बाबी आहेत, पण त्याबद्दल आत्ता काही नको. मी सुरुवातीला म्हणालो तसे लिहिण्यातला तो अद्भुत आनंद आजही कित्येक दशकांनंतरही तसाच टिकून आहे.

मला आणि माझ्या कार्याला हा महान सन्मान बहाल केल्याबद्दल स्वीडिश अकादमीचे मनापासून आभार व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो. मी खूप कृतज्ञ आहे.

मराठी अनुवाद : वंदना खरे

‘साधना’ साप्ताहिकाच्या २२ जानेवारी २०२२च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

अब्दुल रझाक गुरनाह यांनी नोबेल पारितोषिक स्वीकारल्यानंतर केलेलं मूळ इंग्रजीतलं भाषण वाचण्यासाठी क्लिक करा-

https://www.nobelprize.org/prizes/literature/2021/gurnah/lecture/

.................................................................................................................................................................

अब्दुल रझाक गुरनाह यांनी नोबेल पारितोषिक स्वीकारल्यानंतर केलेलं मूळ इंग्रजीतलं भाषण पाहण्यासाठी क्लिक करा-

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

प्रा. मे. पुं.  रेगे यांचे तात्त्विक विचार जागतिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक असूनही ते विचार इंग्रजीत जावेत, असे त्यांचे चहेते असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला का वाटले नाही?

प्रा. रेगे मराठी तत्त्ववेत्ते होते. मराठीत लिहावे, मराठीत ज्ञान साहित्य निर्माण करावे, असा त्यांचा आग्रह असला, तरी खुद्द रेगे यांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या काही लिखाणाचे अवलोकन करता त्यांचे काही विचार केवळ कार्यकर्ते, विचारवंत आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अन्य तत्त्वज्ञान प्रेमिक यांच्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या समग्र मराठी लेखनावर इंग्रजीसह इतर भाषिक अभ्यासक, चिंतकांचाही हक्क आहे.......

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......