माणसातील पशुत्वाचा शोध घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण पशुत्वाचे समर्थन करण्याचा अधिकार नाही. पशुत्वाचे समर्थन करून तुम्ही आपले स्वातंत्र्य निरर्थक करीत असता
संकीर्ण - पुनर्वाचन
नरहर कुरुंदकर
  • ‘अभयारण्य’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 26 January 2022
  • संकीर्ण पुनर्वाचन लोकशाही Democracy नरहर कुरुंदकर Narhar Kurundkar कलावंत विचारवंत स्वातंत्र्य Independence

विचारवंत हे विशेषण ज्यांना गांभीर्याने लावता येईल असे महाराष्ट्रातील एक अभ्यासक म्हणजे प्राचार्य नरहर कुरुंदकर. त्यांचे स्वातंत्र्य या संकल्पनेची चर्चा करणारे आणि स्वातंत्र्याच्या बहुविध पैलूंचा मागोवा घेणारे ‘अभयारण्य’ या नावाचे एक चिंतनीय, मननीय पुस्तक आहे. प्रस्तुत मजकूर या पुस्तकातील ‘पुन्हा एकदा स्वातंत्र्य’ या लेखाचा संपादित अंश आहे. यातून कलावंत आणि विचारवंत यांच्या संदर्भात स्वातंत्र्याची चर्चा केली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सिनेमाविश्वातील वादाच्या पार्श्वभूमीवर आवर्जून वाचावी अशी आहे...

..................................................................................................................................................................

स्वातंत्र्याविषयी आपण बोलतो पुष्कळ, पण ज्या स्वातंत्र्याविषयी आपण बोलतो, त्याबाबत आपण फारसा विचार केलेला असतोच, अशी खात्री देता येत नाही.

स्वातंत्र्य ही कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात अस्तित्वात आणण्यासाठी अतिशय अवघड अशी बाब आहे. ती जणू काही सोपी बाब आहे, असे समजूनच आपण तिचा विचार करतो. आणि ती अत्यंत सुखा-समाधानाची बाब आहे, हे तर आपण गृहीत धरीतच असतो.

विचारस्वातंत्र्याच्या क्षेत्रातील एका अतिशय गुंतागुंतीच्या आणि जटिल प्रश्नाला या ठिकाणाहून आरंभ होतो. पुराव्याच्या आधारे जे सत्य मला जाणवले, ते सांगण्याचे स्वातंत्र्य मला आहे की नाही? या प्रश्नामध्ये अतिशय नाजूक असा दुसरा एक प्रश्न गुंतलेला आहे. तो प्रश्न म्हणजे, ज्याला मी पुरावा मानतो, त्या आधारे जे मला जाणवते, ते माझे सत्य मला मांडण्याचा हक्क आहे की नाही? पुराव्याच्या आधारे सत्य आणि मला जो पुरावा वाटतो त्या आधारे मला जे जाणवते ते सत्य, या दोहोंत म्हटले तर फार मोठे अंतर आहे, म्हटले तर फारसे अंतर नाही. अतिशय बेजबाबदारपणे चारित्र्यहनन करण्याचा उद्योग करणारे लोक, तितक्याच बेजबाबदारपणे श्रद्धा दुखवणारे लोक, इतरांची विडंबना करणारे लोक सगळेच आपापल्या समजुतीनुसार ज्याला पुरावा मानतात, त्याचा आधार घेऊनच बोलत असतात. ज्या वेळी आपण असे म्हणतो की, प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क असला पाहिजे, हा विचार पटत नसेल तर विरोधी विचार मांडावा, पण विचार मांडण्याचा हक्क नाकारू नये. त्या वेळी सर्व बेजबाबदार मंडळींना अनिर्बंधपणे बेजबाबदार वागण्याचा व बोलण्याचा हक्क असला पाहिजे, असे आपल्याला म्हणायचे आहे का? हेच जर आपल्याला अभिप्रेत असेल तर मग त्या समाजव्यवस्थेत विचार, विवेक आणि सहिष्णुता वाढणार नाही. कारण बेजबाबदारपणाला संरक्षण व उत्तेजन मिळाल्यानंतर जे वाढते ते बलवंताचे सोयीस्कर आक्रमण असते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

समजा आपण जर अशी भूमिका घेतली की, अभ्यास, चिकित्सा आणि विचार यांना आम्ही स्वातंत्र्य देतो. पण बेजबाबदारपणा आणि निंदा याला मात्र आम्ही परवानगी देणार नाही. तर त्यामुळे प्रश्न सुलभ होत नाही, तो कठीणच राहतो. मला न आवडणाऱ्या मतांच्यापैकी कोणती मते हा विचार आहे आणि कोणती मते हा विचार नसून बेजबाबदारपणा आहे, हे ठरवणार कोण? ज्या मंडळींनी अंधश्रद्धेचे युग संपून वैज्ञानिक भूमिकेचा आरंभ केला, ते लोक समकालीन समाजाच्याकडून पापी व पाखंडीच मानले जात होते. न्यायासनेच अत्यंत गंभीरपणे सॉक्रेटिसला विष देतात. कारण बहुमताने सॉक्रेटिस वेगळा विचार मांडणारा विचारवंत ठरलेला नसतो. सॉक्रेटिसाच्या विषयी बहुमत हेच असते की, तो माणसे बिघडवीत आहे आणि समाज वाईट वळणाला नेत आहे. विचारवंत आणि अविचारी यांच्यामधील निवड करायची कुणी? विचारवंतांसाठी स्वातंत्र्य म्हणजे बेजबाबदारांच्यावर बंधने, ही भूमिका ठीक आहे. पण माणसाचा गट ठरविणारे कौल द्यायचे कुणी, हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे.

या जटिल प्रश्नाचे उत्तर काही प्रमाणात बंधने, काही प्रमाणात मोकळीक आणि हे सगळे सर्वसामान्यपणे लोकमत पाहून तारतम्याने वापरायचे, या अर्धवट भूमिकेने देता येत नसते. या प्रश्नाचे खरे उत्तर नवा विचारी माणूस हे आहे. विचारस्वातंत्र्याचा प्रश्न असो की, स्वतंत्र माणसाचा प्रश्न असो, हे सगळेच प्रश्न नवे मन घडविण्याचे, नवा माणूस घडविण्याचे प्रश्न आहेत. ते प्रश्न बहुमताचे नाहीत, हे आपण समजून घेतले पाहिजे. विचारस्वातंत्र्य ही गोष्ट विचारस्वातंत्र्यावर विश्वास असणाऱ्यांना समाजात प्रस्थापित करावी लागत असते. इतरांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी घेऊन आपलेही स्वातंत्र्य जतन करण्याची जिद्द धरायची असते. सर्वांच्या स्वातंत्र्याच्या रक्षणाचे दायित्व पत्करूनच आपले स्वातंत्र्य जतन करता येत असते, विकसित करता येत असते.

हा मुद्दा नुसत्या विचारवंतांना लागू नाही, तो कलावंतांनाही लागू आहे. कलावंतांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असले पाहिजे, या वाक्याचा अर्थ जे स्वतःला कलावंत मानतात, त्यांना ते ज्याला कला समजतात, ती समाजासमोर ठेवण्याचे अबाधित स्वातंत्र्य असले पाहिजे, असा आपण करणार काय? जर तो असाच आहे, असे आपण मानले तर कृत्रिमरित्या व्यक्तीच्या वासना उत्तेजित करण्याचा उद्योग घाऊकपणे जे करतील, त्यांनाही अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क मिळेल. आणि वासना उत्तेजित करणे हा जर काही जणांचा चरितार्थ चालण्याचा समर्थनीय उद्योग मानला, तर त्याचे परिणाम अत्यंत भयावह होतील. हे सगळे टाळायचे असेल तर आपण असे म्हणावे काय की, संपूर्ण स्वातंत्र्य कलावंताला मिळेल. पण जे बाजारू लोक कलावंत नाहीत, त्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही. वामन मल्हार जोशींनी एके ठिकाणी मोठ्या सुबकपणे हे मत नोंदविलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की, कलेला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, पण कलेनेही कलाच असावे, कळवांतीण होऊ नये. मुद्दा चांगला आहे. कलेला स्वातंत्र्य मिळेल, कळवांतीणीला मिळणार नाही.

स्वातंत्र्य मग कलावंतांचे असो, की विचारवंतांचे असो, अंतिमतः तो प्रश्न नवे घडविण्याशी निगडीत आहे. आणि आरंभतः हा प्रश्न कलावंतांनी समाजात स्वातंत्र्य हे मूल्य टिकावे, रुजावे यांचे दायित्व पत्करणारा आहे. स्वतःच्या स्वातंत्र्याचा आग्रह धरणारे सर्व क्षेत्रांतील कलावंत निदान स्वातंत्र्य या मूल्याशी असणारे स्वतःचे संपूर्ण दायित्व मानणार आहेत काय? कारण मूल्यांशी दायित्व मानल्याच्यानंतर कलेसाठी कला, यासाठी भूमिकेचा पुरस्कार करता येत नसतो.

आपण कलावंत आणि विचारवंत यांच्या स्वातंत्र्याचा विचार करतो आहोत. पण कलावंत आणि विचारवंत यांना काय म्हणून स्वातंत्र्य द्यावे, या प्रश्नाचे आपण कोणते उत्तर देणार आहोत? जर या प्रश्नाचे उत्तर आपण असे देणार असू की, प्रत्येकच माणसाला स्वातंत्र्य हे मूलभूत आहे, कलावंत आणि विचारवंतसुद्धा माणूस आहेत, म्हणून त्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. तर आपल्याला असे मानावे लागेल की, विचारवंत व कलावंत यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न हा एकूण मानवी स्वातंत्र्याच्या प्रश्नाचा एक भाग आहे. आणि मग सर्वांनाच मानवी स्वातंत्र्याच्या मूल्याशी बांधून घेऊन आपला स्वातंत्र्यावर अधिकार सांगावा लागेल.

जर आपण असे मानणार असू की, विचारवंत आणि कलावंत हे कुणीतरी वेगळे व विशेष आहेत, म्हणून त्यांना स्वातंत्र्य असले पाहिजे. आणि इतरांनी हे स्वातंत्र्य जतन केले पाहिजे, असे जर आपण म्हणणार असू, तर मग इतरांनी कलावंत आणि विचारवंत यांचे स्वातंत्र्य का जतन करावे, याचे उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. या प्रश्नाचे एकच उत्तर असू शकते. ते म्हणजे सर्वांची प्रगती आणि कल्याण कलावंत व विचारवंतांच्या स्वातंत्र्याचे जतन करण्यात असते. हे म्हटल्याबरोबर कलावंत व विचारवंतांना सर्वांच्या प्रगतीची जबाबदारी घ्यावी लागत असते. स्वातंत्र्य या मूल्याचा पुरस्कार आणि स्वीकार हा कुठे ना कुठेतरी नवा माणूस घडवण्याच्या आपल्या दायित्वाचा स्वीकार असतो, ही गोष्ट गृहीत धरूनच स्वातंत्र्याबाबतचा विचार आपण केला पाहिजे.

कलावंतांचे स्वातंत्र्य किंवा विचारवंतांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रश्न हा कालनिर्मितीचा अगर विचार करण्याच्या प्रक्रियेचा प्रश्न नाही. एखादा माणूस जर आपल्या मनात काही विचार करीत असेल तर कोणताही कायदा त्यावर बंधन आणीत नसतो. बंधनाचा प्रश्न विचार करताना निर्माण होत नाही. तो समाजासमोर ठेवताना निर्माण होतो. कलाकृती निर्माण करताना हा प्रश्न निर्माण होत नाही. तो समाजासमोर ठेवताना हा प्रश्न होतो. आणि विचार जर समाजासमोर ठेवायचे नसतील आणि कलाकृती जर रसिकांच्या समोर यायच्याच नसतील, तर मग त्या अस्तित्वात येणे अगर न येणे याला अर्थ नसतो. तत्त्वत: अशी एखादी जर कलाकृती आपण गृहीत धरली की, जी कधीच कोणत्याच रसिकासमोर आलेली नाही आणि तरीही कलाकृती आहे, तर आपल्याला एक अशी कलाकृती गृहीत धरावी लागेल, जी कोणत्याच रसिकाने कलाकृती म्हणून मान्य केलेली नाही. जी कधीच कुणी कलाकृती म्हणून मान्य केलेली नाही, अशी कलाकृती नसते, सगळे वाद असतात. ते काहींनी मान्य केले, पुष्कळांनी मान्य केले, मान्य केले नाहीत, अशा वेळी काहींना प्रमाण मानावे की, पुष्कळांना प्रमाण मानावे? म्हणून कला असो की विचार असो, समाजासमोर येणे हा त्याचा हक्क असतो. तिथेच त्याची परीक्षा होते, कस लागतो. आणि हे स्वातंत्र्य स्वयंभू नसते.

कलावंतांना स्वातंत्र्य समाजाने दिलेले असते. समाज आपल्या कल्याणासाठी हे स्वातंत्र्य देतो. म्हणून कलावंतांना स्वातंत्र्य मागताना समाजाच्या हिताचे दायित्व पत्करले पाहिजे, अशी मागणी असते. या मागणीला उत्तर म्हणून जर कलावंत आपले स्वातंत्र्य स्वयंभू समजू लागले, तर त्या प्रतिपादनाचा अर्थ असा होईल की, गुलामगिरी आणि हुकूमशाही हेही खरे नव्हे. कारण स्वातंत्र्य काढून घेता येत नाही. आणि लोकशाही व मुक्तता खरे नव्हे. कारण स्वातंत्र्य देता येत नाही. ज्या रूढ अर्थाने स्वातंत्र्य ही कल्पना आपण मानतो, ती माणसाच्या जातीला, कलावंताला व विचारवंताला स्वयंभू असणारी बाब नाही. स्वातंत्र्य हे माणसाच्या जातीने अस्तित्वात आणलेले एक सांस्कृतिक मूल्य आहे. असे सांस्कृतिक मूल्य म्हणूनच त्याचा विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य हा जीवसृष्टीचा माणसाकडे आपणहून चालत आलेला वारसा नव्हे.

आपण ज्या स्वातंत्र्याचा नेहमी विचार करतो, ती नैतिक कल्पना आहे. आणि ही नैतिक कल्पना हक्कांच्या कल्पनेवर आधारलेली आहे. व्यक्तींचे जे मान्य केलेले हक्क त्याच्याशी सुसंवादी असणारी स्वातंत्र्याची कल्पना आपण विचारात घेत असतो. जन्माला आलेल्या माणसाचा जिवंत राहणे हा हक्क आहे. जिवंत राहण्यासाठी त्याला अन्न लागेल. त्याला कपडाही लागेल. त्याला राहण्यासाठी घर लागेल. माणसाच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याच्या शिवाय त्याला जगता येणेच अशक्य आहे. म्हणून या गरजांच्या पूर्ततेची हमी लागते. यामुळेच आपण असे म्हणतो की, सर्वांनी काम आणि या कामाचा मोबदला म्हणून सभ्यपणे जीवन जगणे शक्य होईल, इतका पगार हा हक्क आहे. असे आपण माणसाचे वेगवेगळे हक्क नोंदवीत जातो. या हक्कावर आक्रमण करणे आपण कायद्यात गुन्हा मानतो आणि अनैतिक मानतो. या हक्काच्या कल्पनेशी सुसंगत अशी स्वातंत्र्याची कल्पना आपल्या डोळ्यांसमोर असते. हे प्रत्येक माणसाचे हक्क समाजाने मान्य केलेले असतात. म्हणून स्वातंत्र्य ही सामाजिक निर्मिती असते. मानवी निर्मिती असते आणि नैतिक कल्पना असते.

स्वातंत्र्याची ही सर्व चर्चा या ठिकाणी करण्याचे कारण माझ्या मनात कलावंताचे स्वातंत्र्य हा प्रश्न बोलतो आहे. कलावंताच्या स्वातंत्र्याची चर्चा एकूण स्वातंत्र्य या कल्पनेच्या संदर्भातच केली पाहिजे असे मला वाटते. स्वातंत्र्याची कल्पना करीत असताना निवडीचे स्वातंत्र्य आणि निर्मितीचा अधिकार, या बाबी तर माझ्यासमोर आहेतच, पण त्यासह स्वातंत्र्य ही नैतिक कल्पना आहे आणि ती उच्चतर व्यवस्थेच्या पुरस्कारातूनच विकसित होत आलेली मानवनिर्मित सांस्कृतिक कल्पना आहे, हेही मला जाणवत आलेले आहे. स्वातंत्र्य या संकल्पनेची काटेकोर व्याख्या अशी करता येईल, हा प्रश्न या क्षणी माझ्या डोळ्यासमोर नाही, तर कलावंतांना स्वातंत्र्य असले पाहिजे, असे जेव्हा आपण म्हणतो, त्या वेळी स्वातंत्र्याची पार्श्वभूमी कोणती आहे, हा माझ्या डोळ्यासमोर प्रश्न आहे. इथून पुढे दिवसेंदिवस आपल्या स्वातंत्र्याचा आग्रह, कलावंत अधिक जोराने धरण्याचा संभव आहे. आणि स्वातंत्र्य हे आजचे घोषवाक्य असल्यामुळे या मुद्द्यावर गुळमुळीतपणा निर्माण होण्याचा संभव आहे.

स्वातंत्र्यात सर्वांचे हक्क म्हणजेच सर्वांना न्याय गृहीत असतो. माणसातील पशुत्वाचा शोध घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण पशुत्वाचे समर्थन करण्याचा अधिकार नाही. पशुत्वाचे समर्थन करून तुम्ही आपले स्वातंत्र्य निरर्थक करीत असता.

स्वातंत्र्य हे कलामूल्य नव्हे. एखादी कलाकृती केवळ स्वातंत्र्याच्या पुरस्कारामुळे चांगली ठरणार नाही. किंवा एखाद्या लेखकाचा अनुभव इतर सर्वांच्यापेक्षा निराळा आहे, वेगळा आहे, स्वतंत्र आहे, इतक्यामुळेही ती कलाकृती ठरणार नाही. शब्दांच्यामधून व्यक्त होणारी एक आकृती कलाकृती ठरत असेल, तर त्याचे कारण त्या अनुभवामधील जिवंतपणा वाचकांना जाणवतो हे आहे. उद्या जर तुम्ही स्वातंत्र्य आहे, हा मुद्दा पक्का धरून अनुकरण करण्याचेही स्वातंत्र्य आहे, असे म्हणू लागला, तर तुम्हाला अनुकरण करू नका म्हणून कोणी सांगणार नाही. पण अनुकरण करण्याचे स्वातंत्र्य आम्ही दाखवले आहे, म्हणून आमचे महत्त्व माना, असे तुम्ही म्हणालात तर ते कुणी कबूल करणार नाही. कलावंतांना अनुभव घेण्याचेही पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. अनुभव व्यक्त करण्याचेही पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. पण स्वातंत्र्य असले म्हणजे चांगल्या कलाकृती निर्माण होतात आणि स्वातंत्र्य नसले म्हणजे चांगल्या कलाकृती निर्माण होत नाहीत, हा मुद्दा पुराव्याने सिद्ध करता येण्याजोगा नाही, याचे भान कलावंतांनी ठेवावे.

लेखकांचे सर्व हक्काचे जतन करणारे कायदे आवश्यक आहेत, असे म्हणणाऱ्यांना समाजहित जतन करणारे कायदे मात्र नकोत, असे म्हणण्याचा नैतिक हक्क नसतो. कलावंतांचे स्वातंत्र्य समाजाच्या विकासासाठी असते. आणि म्हणून समाजाच्या विकासाला विरोधी जाण्याचे स्वातंत्र्य कुणालाच नसते. कलावंतांनाही नसते, हे आपण स्वच्छपणे सांगितले पाहिजे. कायदे आडमूठे नसतात अगर त्यांचा वापर बेजबाबदारपणे होत नाही, असे कुणीच म्हणणार नाही. कायदा उचित असावा, त्याचा वापर जबाबदारीने व्हावा, हे म्हणणे निराळे. हा प्रश्न व्यावहारिक आहे, पण बंधने नसावीतच हे म्हणणे अगदीच निराळे. कलावंतांना कॉपीराईट हवेत, सेन्सॉर नको, याचा अर्थ सोय सांभाळणारे कायदे हवेत, गैरसोय करणारे कायदे नकोत, इतकाच होतो. वेळोवेळी शासनाने जो अरसिकपणा अगर धटिंगणपणा दाखवला त्याचा विरोध मीही करीन. पण त्यामुळे बंधने नसावीतच, हा तात्त्विक मुद्दा सिद्ध होणार नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ज्या दिवशी कलावंत अधिक उच्चतर व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी अगर तिच्या स्थापनेसाठी आग्रही होतो, त्या वेळी तो सर्व समाजाच्या विकासाच्या जाणिवेचा नेता असतो. तिथे स्वातंत्र्य ही लढून जतन करण्याची बाब असते. जिथे असा कोणता प्रश्न नसतो, तिथे सर्वांच्या बरोबर कलावंताचेही स्वातंत्र्य स्वाभाविकच असते. पण ज्या ठिकाणी माणसातील पशुत्व जागे करून आपल्या आर्थिक हितासाठी वापरण्याचा उद्योग सुरू होतो व हा उद्योग स्वातंत्र्याचे नाव सांगू लागतो, तिथे माणसाला वेगवेगळ्या पातळीवर गुलाम करणाऱ्या शक्ती स्वातंत्र्य हे नाव घेऊन वावरत आहेत, हे आपण ध्यानात ठेवावे लागते. स्वातंत्र्य हा नव्या समृद्ध आणि निरामय जीवनाकडे, नव्या संस्कृतीकडे जाण्याचा मार्ग असतो. स्वातंत्र्य ही संकल्पना एकूण मानवी समाजाला अधिक पशुत्वाच्या जवळ नेण्याच्या दिशेने प्रयत्न करणारांना वापरू देणे धोक्याचे असते.

कलावंतांच्या, विचारवंतांच्या आणि एकूण समाजाच्या संदर्भात स्वातंत्र्य या कल्पनेचा अधिक डोळसपणे व तपशिलाने विचार करण्याची वेळ आलेली आहे, असे मला वाटते. नाहीतर स्वातंत्र्य ही कल्पना व्यवस्था आणि सर्वांचे हित याविषयी बेफिकीर असणाऱ्या आततायी मंडळींच्या हातातील एक चूड होण्याचा संभव आहे.

‘अभयारण्य’  - नरहर कुरुंदकर

देशमुख आणि कंपनी, पुणे

मूल्य – २५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4068/Abhayaranya

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......