अजूनकाही
दरवर्षी २७ फेब्रुवारीला साजरा होणारा ‘मराठी भाषा दिन’ हा दिवसेंदिवस ‘मराठी अजीर्ण दिन’ होत चाललाय.
मराठी मंत्रालयाच्या दारात लक्तरे नेसून उभी आहे असं म्हणणाऱ्या वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनीच मराठी भाषा दिन साजरा करून… छे छे लक्तरे कुठे ही तर भरजरी पैठणी नेसून उभी आहे, असं सांगण्याचा उरबडवा दिवस म्हणजे ‘मराठी भाषा दिन’!
भारतात अधिकृत भाषांसहित बोलीभाषा धरल्या तर काही हजारांत गणना होईल विविध भाषांची. त्या त्या प्रांताची एक राजभाषा (की राज्यभाषा?) धरली तरी ३०-३२ तरी नक्की. पण यापैकी कुठलीही भाषा, त्या भाषेचा दिन साजरा करत असल्याचं ऐकिवात नाही, की यापैकी कुठल्या भाषेचं अभिमान वा गौरव गीत आहे, असंही कानावर आलेलं नाही.
त्यामुळेच आपल्याच राज्यात, आपल्याच भाषेचं गौरव गीत आपल्याच लोकांसमोर दरवर्षी नेमानं गात, त्या दिवसभरात वा त्याच्या आसपासच्या दिवसांत भाषेची चिंता, अभिमान, आणखी काही करत राहणारे आपण मराठी जन भारतात एकमेव आहोत, असं म्हणता येईल.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
देशाच्या राजधानीत सर्व राज्यांची भवनं आहेत. ती राज्याचं, त्या भाषेचं प्रतिनिधित्व करतात. इतर सर्व प्रमुख राज्य व भाषा यांच्या संदर्भात पाहिलं तर अनेक वर्षं महाराष्ट्र सदन म्हणजे मराठी राजकारणी वा सनदी अधिकारी (ते अमराठी असले तरी राज्याचे म्हणून) यांना कसंबसं सामावून घेणारं सदन होतं. मागच्या आघाडी सरकारातील भव्यतेची आस असलेले बांधकाम मंत्री मा. छगन भुजबळ यांनी भूतो न भविष्यती असं पंचतारांकित महाराष्ट्र सदन बांधून काढलं, पण ते उदघाटनापासून चर्चेत राहिलं. अमराठी अधिकाऱ्यांच्या (आजही) मनमानीमुळे, पदोपदी मराठी जनांचा अपमान या भवनात होतो. तिथल्या सेवा, सुविधा याबद्दल खासदारांनी राडा करूनही फारसा बदल झालेला नाही. उलट या सदनाच्या निर्मितीत घोटाळा केला म्हणून भुजबळ तुरुंगात आहेत!
आपल्याच राज्यात आपण बहुसंख्य असूनही इतर प्रांतातील लोक येऊन इथं सर्वच क्षेत्रांत (मुख्यत:) रोजगार घुसखोरी करतात. त्यांना दम दिला पाहिजे, धाकात ठेवलं पाहिजे किंवा हाकललं पाहिजे, असा अस्मितेचा मुद्दा करून ५० वर्षांत या राज्यात दोन राजकीय पक्ष स्थिरस्थावर झाले, हाही एक विक्रम आपल्या नावावर आहे.
गंमत म्हणजे या दोनपैकी एकाही पक्षाला कधी निर्विवाद बहुमत गाठता आलं नाही, जसं ते जयललिता, करुणानिधी किंवा तेलंगणच्या रेड्डींना गाठता आलं.
म्हणजे भाषेच्या सरकारी औदासीन्याबद्दल खंत व्यक्त केलेल्या साहित्यिकाचा जन्मदिवस भाषा दिन\गौरव दिन वगैरे म्हणून सणासारखा साजरा करायचा, भाषिक गंमतजमत करायची, आपले आपणच पोवाडे गायचे आणि कधीतरी सहजपणे अथवा कसल्या निमित्ताने सुरेश भट नावाच्या अवलिया कवीने लिहिलेलं गाणं, एकदम मराठी अभिमान गीत म्हणून आठवत बसायचं!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या अभिमान गीताचीही एक कूळकथा आहे. मूळच्या नांदेडच्या एका कृष्णा नामक धडपड्या संगीतकाराने हे गीत अभिमान गीत होण्याच्या खूप वर्षं आधी चालीसकट ध्वनिमुद्रित केलं आहे. स्वत: सुरेश भटांनी हे गीत चाल लावायला कुष्णाला दिलं आणि स्वत: विनंती करून आशा भासलेंना गायला लावलं! आजही हे गीत आशा भोसलेंच्या आवाजात कुष्णाकडे अंधेरीला त्याच्या घरी आहे. फरक इतकाच आहे, तेव्हा ते अभिमानबिभिमान गीत नव्हतं आणि त्याला मराठी अभिमान गीत चैन्नईत ध्वनिमुद्रित केलं असा (ए.आर.रहमान जिथे ध्वनिमुद्रण करतो) वेगळा युएसपीही नव्हता. म्हणजे अभिमान गीतातच प्रसिद्ध-अप्रसिद्ध अशी कथा आहे. कृष्णा यांनी सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात ते गीत व्हायरल करून टाकावं आणि समूह गानापेक्षा आशा भासलेंच्या जादुई आवाजातलं गाणं रसिकांना खुलं करावं.
तर मुद्दा असा, मराठी राजभाषा झाली तरी ती वेगानं जनभाषेचा दर्जा गमावून बसलेय. तिला अभिजात भाषेचा दर्जा देऊन ५०० कोटी मिळवण्याचा खटाटोपही कित्येक वर्षं सुरू आहे. पण अभिजात दर्जा देऊन ती भाषा दैनंदिन व्यवहारातून नष्ट होणार असेल, मराठी भाषिक प्राथमिक शाळा ते महाविद्यालय व मराठी विभाग विद्यार्थीसंख्येअभावी बंद पडणार असतील... मराठी साहित्य, नाटक, चित्रपट यांना आजही आतबट्ट्यातच व्यवहार पाहावा लागत असेल तर ती भाषा अभिजात झाली काय किंवा दरवर्षी गौरव, अभिमान दिवस म्हणून तिचं श्राद्ध घातलं काय… काय फरक पडणार?
कुसुमाग्रजांना काही असा भाषा दिवस धुमधडाक्यात साजरा व्हावा असं वाटत नव्हतं. त्यांना राज्यात आणि विशेषत: राज्याच्या राजधानीत राज्यकारभारात, प्रशासनात मराठीचं अस्तित्व जोरकसपणे टिकून राहावं असं वाटत होतं. ज्या बेळगावसाठी आपण ६० वर्षं लढतोय, त्या बेळगावात थेट विधानभवन कर्नाटक सरकारनं बांधलं. रस्ते, दुकाने, बसेस यावरील पाट्या कन्नडमध्ये. एवढंच काय, प्रशासनात, अगदी ग्रामपंचायतीत एखादा फॉर्म भरायचा असेल तर तो कन्नडमध्येच भरावा लागतो. आमच्याकडे आधी इंग्रजी मग हिंदी, मग मराठी व हल्ली तर काही ठिकाणी गुजरातीत फॉर्म भरता येतो!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कुसुमाग्रजांना शासकीय मराठी सुलभ आणि अग्रक्रमानं अशा पद्धतीनं अभिप्रेत होती. त्या त्या राज्यात त्या त्या भाषेला हे स्थान घटनेचा अधिक्षेप किंवा कॉस्मोपॉलिटन म्हणून नाकारता येत नाही. पण आपण पहिल्यापासूनच बोटचेपे. स्वत:चीच भाषा न येणाऱ्या भारतातील सर्व भाषिक नागरिकांत महाराष्ट्राचा नंबर अव्वल आहे. त्यामुळे आपणच मरू घातलेल्या भाषेला वाचवण्याचे प्रकार म्हणजे फाशी आधी कैद्याला तुझी शेवटची इच्छा काय, हे विचारण्यासारखं आहे!
मुंबई वगळता महाराष्ट्रात मराठीच बोलली जाते. फक्त त्या त्या विभागाचा लहजा घेऊन! मालवणी, वऱ्हाडी, कोकणी, पुणेरी, खानदेशी अशी तिची वळणं आहेत. दक्षिण कोकणातली मालवणी गोव्याकडे सरकते तशी कोकणीची झाक दिसते. विदर्भाच्या भाषेला मध्यप्रांताचा खडी हिंदीचा दमदार स्पर्श, तर मराठवाड्याच्या मराठीला दखनी सल्तनतीचा दरबारी आणि रस्त्यावरचा रंग लागतो. खान्देशी एका टप्प्यावर गुजरातीला खेटून बसते, तर पुणेरी मराठी स्वत:च्या अहंगंडाचा न्यूनंगड इतर बोलींवर लादते. पण हे बोलीभाषा वैभव विशिष्ट समाजाच्या सांस्कृतिक मक्तेदारीमुळे सरळ सरळ अशुद्ध मराठी म्हणून साहित्य व कला व्यवहारातून बाद केलं होतं. साठच्या दशकानंतर हा पीळ कमी होत गेला, तरी सुंभ जळूनही साहित्य संमेलन वगैरेमध्ये तथाकथित शुद्ध मराठीचाच अत्यंत कृत्रिम वाटणारा वापर होत राहतो. तिथंही सरस्वती वंदना आणि पसायदान याच्या पलीकडे सृजनात्मकता जात नाही.
या कृत्रिम मराठीचा पगडा इतका आहे की, भाषा शुद्धीच्या दबावाला बळी पडून आपल्या नैसर्गिक भाषेला घाबरून शुद्ध बोलण्याच्या नादात नवशिक्षित व बोलीभाषांनी संपृक्त वर्ग बेंगरूळ होऊन जातो. आमचे मित्र जयदेव डोळे यांनी संघाच्या मराठीत, विशेषत: राजकारण्यांच्या बोलण्यात अनाठायी पद्धतीने ‘या ठिकाणी, त्या ठिकाणी’ हे शब्द कसे येतात हे एका लेखात छान मांडलेय. आणि हा प्रकार अजित पवार असोत की, देवेंद्र फडणवीस ‘या ठिकाणी, त्या ठिकाणी’ दोघे सारखेच! आपण गावरान बोलत नाही ना, असं मनात ठेवत प्रमाण भाषा बोलण्याचा केलेला खटाटोप असा विनोदी होतो. हा भाषिक दाब जायला हवा. परवा मुख्यमंत्रीच म्हणाले, ‘आमच्या नागपुरात ‘औकात’ हा शब्द सहज वापरातला शब्द आहे!’
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
बाकी या अजीर्ण दिवसात हिरीरीनं उतरणारी मराठी वर्तमानपत्रं, मराठी वाहिन्या, वृत्तवाहिन्या यावरील मराठी हे ‘दिव्य’च असतं. मराठी मानबिंदू मिरवणाऱ्या एका दैनिकानं तर आता मराठीत इंग्रजीचा वापर अनिवार्य कसा, हे ठसवत भाषिक संकराचं काम मोठ्या टेचात केलं आणि तेच पुन्हा २७ फेब्रुवारीला अग्रभागी कुर्ता-पायजमा नि उपरणं घालून, फेटे घालून तयार!
हे सगळं लिहिण्याचा उद्देश इंग्रजीला विरोध, नव्या भाषिक संकराला नाक मुरडणं, फालतू अभिमानाने छाती फुगवणं अथवा गीत गाणं हा नसून ‘चित्रकला बरी नाही म्हणून व्यंगचित्रकार नाही होता येत!’ हे सांगण्याचा आहे. व्यंगचित्रकाराला आधी चित्रकलेचं, व्यक्ती रेखाटनाचं व्याकरण नीट यावं लागतं. तसंच आपली मातृभाषा नीट आत्मसात करून त्यावर प्रुभत्व मिळवून इतर भाषांशी तिचा संग करणं किंवा सांस्कृतिकदृष्ट्या बहुभाषिक होणं याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आपली मातृभाषा विशेषत: मराठीच्या संदर्भात जगण्याच्या उपयोगीची नाही, सार्वजनिक संवादात अडगळीची किंवा आपल्याच घरात, दारात, न वापरल्याने मुख्यत: शिकल्याने अथवा ती अजिबात न येण्याने खूप नुकसान नाही, उलटं भलंच होईल या विचारानं आपण आपली भाषा बेदखल केलीय. मग तिची दखल घ्या असं आवाहन आपण नेमकं कुणाला वा का करतो?
साने गुरुजींचा ‘आंतरभारती’ प्रकल्प हा खरं तर राष्ट्रीय धोरण ठरायला हवा. त्यात विविध प्रांतिक आदान-प्रदानाला महत्त्व होतं. आज एखाद्याला इंग्रजी, जपानी, फ्रेंच, रशियन भाषा येते, पण बंगाली, आसामी, कन्नड अथवा मल्याळी येत नाही, यावी असंही वाटत नाही. त्यामुळे भारतातल्या भारतात आम्ही परदेशस्थ होतो. आणि हल्ली तर परदेशस्थ भारतीयत्वाला सगळ्यात जास्त प्रतिष्ठा!
थोडक्यात म्हणजे इनशॉर्ट हा वर्षश्राद्धाचा उमाळा ‘उमाळा’ न राहता तो प्रत्यक्ष आचरणात यावा, त्याचं प्रत्यंतर समाजात पडलेलं दिसावं. अजूनही आपल्याला मराठी कळफलक चालवता येत नाही, आपण रोमन मराठीत लिहितो.
तर तिथून सुरुवात करूया. अन्यथा मातृभाषा दिन साजरा करण्यापेक्षा नवरात्राआधी थेट पितृपंधरवडा साजरा करू या. तेवढेच पंधरा दिवस कुर्ते, पायजमे, उपरण्यांचे आणि शारीरिक अवयव म्हणून डोक्यावरच्या फेट्यांचे! बारा आण्याच्या अभिमानाचे, चवलीपावलीच्या नाण्याचे!!
.................................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Tue , 28 February 2017
my article on similar subject http://www.aksharnama.com/client/trending_detail/519
chinmay patankar
Tue , 28 February 2017
नेहमीप्रमाणे लेख छान आहेच. मात्र, एक गोष्ट नजरेस आणून द्यावीशी वाटते. <<< भारतात अधिकृत भाषांसहित बोलीभाषा धरल्या तर काही हजारांत गणना होईल विविध भाषांची. त्या त्या प्रांताची एक राजभाषा (की राज्यभाषा?) धरली तरी ३०-३२ तरी नक्की. पण यापैकी कुठलीही भाषा, त्या भाषेचा दिन साजरा करत असल्याचं ऐकिवात नाही, की यापैकी कुठल्या भाषेचं अभिमान वा गौरव गीत आहे, असंही कानावर आलेलं नाही >>>> तमिळ अभिमान गीत किंवा तमिळ भाषा गीत आहे. साक्षात ए. आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत माजी मुख्यमंत्री आणि साहित्यिक एम. करुणानिधी यांनी लिहिलेलं आहे. त्याचा हा दुवा... https://www.youtube.com/watch?v=J8Rpp0eEAjY