सावळी मित्रा रंगमंचावर वावरताना नितांत आनंदानं अवकाश भारून टाकणं म्हणजे काय असतं, हे जाणवायचं!
संकीर्ण - श्रद्धांजली
आशुतोष पोतदार
  • सावळी मित्रा (जन्म - १९४८, मृत्यू - १६ जानेवारी २०२२) ‘नाथवती अनाथवती’ या एकपात्री नाटकातील वेशभूषेत
  • Mon , 24 January 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली सावळी मित्रा Shaoli Mitra शंभू मित्रा Sombhu Mitra नाथवती अनाथवती Nathabati Anathabati कथा अमृतसमान Katha Amritasaman

शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेताना भारतभरातलं नाटक बघायला मिळालं ते दोघांमुळे- कोल्हापूर ‘सकाळ’चे संपादक अनंत दीक्षित आणि पुण्यातले श्रीकांत गद्रे. उडुपीला यक्षगान केंद्रात राहून यक्षगानाचे धडे घेऊन आणि मंगलोर-कुंदापूर रस्त्यावरच्या शाळीग्राम गावी राहणाऱ्या तपस्वी कलाकार आणि लेखक कोटा शिवराम कारंत यांच्या सहवासात राहून त्यांच्या यक्षगान परंपरेतल्या क्रांतिकारी बदलाचा अभ्यास करून मी आलो होतो. दीक्षितांना मी करत असलेल्या कामात खूप रुची होती. त्यांनी मला कारंत आणि यक्षगान-यक्षरंग प्रयोगाविषयी लिहायला प्रोत्साहन दिलं. ‘सकाळ’साठी माझ्याकडून लिहून घेतलं. कोल्हापुरात माझ्या घराजवळच्याच परिसरात ते राहत असत. सकाळी ते मला ‘सकाळ’च्या शिरोली ऑफिसला गाडीने घेऊन जात. त्यांच्या ऑफिसमध्ये चहा पिऊन, गप्पा मारून गावात येणाऱ्या एखाद्या गाडीतून मला बिंदू चौक किंवा इतर कुठे सोडत असत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

तर, शिवराम कारंत यांच्याविषयी मी लिहिलेला लेख महाराष्ट्रभरातल्या ‘सकाळ’च्या आवृत्तींतून प्रकाशित झाला. तो थिएटर अकॅडेमी या नाट्यसंस्थेचे कलाकार श्रीकांत गद्रे यांनी वाचून, फोन करून मला थिएटर अकॅडेमीच्या कामाची ओळख करून दिली. पुढे मला गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात तात्पुरती नोकरी लागली. ते गद्रेंना माहिती नव्हते. कोल्हापुरात घरी फोन केल्यावर त्यांना ते समजले. हिरे महाविद्यालयाच्या परुळेकर ग्रंथालयात मी दुपारी बसत असे. एके दिवशी, ग्रंथालयात बसलो असताना गद्रे समोर येऊन उभे राहिले. ते सुखद आश्चर्य होतं. थिएटर अकादमीच्या प्रेक्षक-प्रतिसाद योजनेतून कोल्हापुरात जेव्हा नाटकं होत असत, तेव्हा कलाकारांच्या भेटी, गप्पा होत. त्या काळात पुण्याला सहज जात येत नसे. शिवाय, पुण्यात कुणी इंटरटेनही फार वापरत नसत. गद्रेंनी पुण्यात मला पहिल्यांदा ओसरी दिली. 

१९९५मध्ये थिएटर अकॅडेमीने भारतातल्या स्त्री नाट्यदिग्दर्शकांच्या नाटकाचा राष्ट्रीय महोत्सव भरवला होता. दीक्षित म्हणाले, ‘तुम्ही जा त्या महोत्सवाला आणि ‘सकाळ’साठी लिहा’. फेस्टिवलमधली नाटकं पाहणं माझ्यासाठी नवखा आणि प्रभावित करणारा अनुभव होता. तिथं बी जयश्री, उषा गांगुली, सावळी मित्रा, मधुलिका वर्मा अशा भारतातल्या वेगवेगळ्या भागांत काम करणाऱ्या स्त्री-कलाकारांची नाटकं पाहायला मिळाली, त्यांचे विचार ऐकायला मिळाले.

सावळी मित्रा यांच्या बंगाली ‘नाथवती अनाथवती’ या नाटकानं रंगमंचावर फक्त एक कलाकार आपल्या अभिनयातून किती कमालीचं दृश्य-विश्व उभा करू शकतो, याचं थक्क करून टाकणारं प्रत्यंतर मला दिलं.

तर अशा या सावळी मित्रा यांचं काही दिवसांपूर्वी  (१६ जानेवारी २०२२) कोलकात्यात दुःखद निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. शंभू मित्रा आणि तृप्ती मित्रा या आधुनिक भारतीय रंगभूमीवर आपल्या प्रतिभेचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दाम्पत्याची ही मुलगी. नाटकात काम करणं ही त्यांच्यासाठी स्वाभाविक निवड होती. लहानपणी त्या आजारी असल्यानं अंथरुणाला खिळून असत. आजारपणातच त्यांना वाचनाची गोडी गोडी लागली. स्तानिस्लावस्कीचं ‘माय लाईफ इन आर्ट’ हे पुस्तक वाचून काढलं. मग, स्वतःला पुढे ढकलत त्या अभिनयही करायला लागल्या. ‘अभिनय करायला का म्हणून आलेय मी?’ या प्रश्नाचं उत्तर देताना त्या एके ठिकाणी लिहितात- “स्वतःलाच समजून घ्यायचा प्रयत्न करता करता वाटलं होतं की, कलेचे वेगवेगळे पैलू हे तर माणसाला स्वतःला व्यक्त करायची वेगवेगळी माध्यमं असतात. अभिनयाच्या माध्यमातून आपल्याला कदाचित स्वतःला जास्त व्यक्त करता येत असेल, म्हणून आपण अभिनय करत असू.” 

मित्रांना आपण नाटकात काम का करायचं हा प्रश्न नेहमी भेडसावत राहिला. घरा-दारात नाटक असूनही त्या अस्वस्थ राहिल्या, स्वतःला प्रश्न विचारत राहिल्या. ‘वल्लभपूरची दंतकथा’ आणि ‘पगला घोडा’, ‘गॅलिलिओ’ अशी नाटकं केल्यानंतरही ‘मी का अभिनय करायचा?’ या प्रश्नानं त्यांचा पिच्छा पुरवायचं सोडलं नाही. अस्वस्थतेपायी त्यांनी काही वर्षं नाटकात कामही केलं नाही. त्या काळात कवितांचं वाचन केलं, श्रुतिका केल्या, रेडिओ आणि दूरदर्शनवर काहीबाही कामं केली. अर्थात, या काळात त्यांचा रियाज चालूच होता. नाटक करायचं की नाही, याचा काही विचार न करता त्या स्वतःच्या आवाजावर आणि शरीरावर प्रयोग करत राहिल्या.

एकदा त्यांच्या वडलांनी त्यांना इरावती कर्वे यांचं ‘युगान्त’ हे पुस्तक वाचायला दिलं आणि त्यांना नवं जग गवसलं. ‘युगान्त’मधल्या महाभारतातल्या पात्रांनी त्यांना नवी दिशा दिली. अभिनयाच्या पलीकडे जाऊन मानवी जगणं आणि भवतालातले कंगोरे त्यांना त्या पुस्तकातून सापडले. त्याच आवेगातून, त्यांनी ‘नाथवती अनाथवती’ हे एकपात्री नाटक लिहून काढलं. ते दिग्दर्शित केलं आणि त्यात अभिनय केला.

थिएटर अकादमीने आयोजित केलेल्या महोत्सवात पाहिलेल्या त्या नाटकातील काही दृश्यं आजही मनामध्ये तरळतात. प्रयोगांनंतर त्यांच्या वडिलांच्या वयाचे असलेले डॉ. श्रीराम लागू रंगमंचावर त्यांना अभिवादन करताना आठवतात. महाभारतातील द्रौपदीभोवती फिरणारं हे नाटक तिला तर चित्रित करतंच, पण विविध प्रसंगातून तिचं मनही प्रेक्षकांसमोर उलगडत नेतं. युद्धानंतरच्या तिच्या अखेरच्या काळात भीमाशिवाय कुणीही तिच्या मदतीस येत नाही. त्या वेळची द्रौपदीची अस्वस्थ रंगमंचावर मित्रा उभी करायच्या तो नाटकातला उत्कर्षबिंदू आजही आठवतो. वठवत असलेल्या पात्राच्या मनातल्या भावना संहितेत शब्दबद्ध करणं आणि तो शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेपर्यंत त्या अवकाशातील मधली-रिक्त जागा आपल्या अभिनव कौशल्यानं भरण्याचं मित्रांचं कलात्म कौशल्य थक्क करणारं होतं.

अर्थातच, त्यांनी साकारलेली द्रौपदी फक्त महाभारतातील राहत नव्हती. बदलत्या समाजातील स्त्रीचं स्थान अधोरेखित करताना मानवी नातेसंबंधांतील गुंते आणि पदर उलगडत स्त्रीत्वाचा एक मोठा पट मित्रा मांडत. याशिवाय, आठवतं त्यांचं बंगाली उच्चारण. काहीतरी अलौकिक पाहत असल्याचा अनुभव प्रेक्षकांना त्या द्यायच्या. रंगमंच्यावरल्या त्यांच्या रडण्यात, हसण्यात, गमतीजमती करण्यात, आवेगात प्रेक्षक रममाण व्हायचे. त्याच महोत्सवात त्यांचं ‘कथा अमृतसमान’ हेही पाहिलं. नंतर एकदा कलकत्त्यात त्यांना भेटलोही, पण ‘नाथवती अनाथवती’मधली द्रौपदी मनात तशीच राहिली.

मित्रा रंगमंचावर वावरताना नितांत आनंदानं अवकाश भारून टाकणं म्हणजे काय असतं, हे जाणवायचं. ते त्यांच्या मनात जे जे काही त्या क्षणी असेल, ते रितं करायची त्यांची उर्मी त्यांना स्वस्थ बसून द्यायची नाही. त्यांच्या शरीराचा हरेक अवयव प्रेक्षकांशी संवाद साधायला उत्सुक असायचा. बोलता बोलता त्या गायला लागत. पावलांच्या ठेक्यात त्याचे हातातले टाळही द्रौपदीची कहाणी सांगत. त्यांची ती नाचाची चार पावलं, अचानक मागे पाहण्यासाठी वळणं, बोलता-गाता स्वर खर्जात आणून आणखी खाली आणणं, मोडकंतोडकं बोलत परत नेहमीचं बोलणं असे नाना खेळ, गमतीजमती, खट्याळपणा त्या रंगमंचावर करत असत. त्यांचं ‘नाथवती अनाथवती’ हे नाटक बंगालमध्ये तर गाजलंच, पण आधुनिक भारतीय रंगभूमीवरच्या एकपात्री अभिनय शैलीचाही एक मानदंड ठरलं आहे. 

मित्रांनी १९८३मध्ये ‘पंचम वैदिक’ ही नाट्यसंस्था स्थापन केली. त्याद्वारे आपली नाटकं सादर केली. त्यांनी एकमेव सिनेमात - प्रसिद्ध ऋत्विक घटक यांच्या ‘जुटकी टक्को र गप्पो’ - काम केलं आहे. डाव्या विचारांच्या मित्रा सिंगूर आणि नंदिग्रामाच्या लढ्यात सरकारच्या विरोधातही उतरल्या. ‘पश्चिमबंग बांगला अकादेमी’च्या अध्यक्षही बनल्या, पण ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारबरोबर न पटल्यानं नंतर त्यांनी राजीनामा दिला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भारतीय रंगभूमीला प्रभावित करणाऱ्या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या मित्राताईंनी आपली स्वतःची पाऊलवाट निर्माण केली. त्या नाटकातल्या गैरसोयी, आर्थिक अनिश्चितता, असुरक्षितता असे सगळे अनुभवत स्वतःचा आणि रंगभाषेचा नव्यानं शोध घेत राहिल्या.

बंगालमधल्या मित्रमैत्रिणींकडून त्यांच्या कामाबद्दल समजत असे. मरणाच्या दारात उभं असताना दवाखान्यातल्या ‘राक्षसी’ उपचारात ठेवू नका, घरात सुखानं मरू द्या, माझ्या मृतदेहावर फुलांचे ढीग ठेवू नका आणि अंत्यविधी झाल्यावरच लोकांना मृत्यूबद्दल कळवा, असं २०२०मधेच त्यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवलं होतं. त्याप्रमाणे निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच पश्चिम बंगालच्या मुखमंत्र्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत त्यांच्या निधनाची वार्ता पोहोचली. तोपर्यंत त्यांचे अंत्यविधी पार पडले होते.

मरणाचंही सेलिब्रेशन करणाऱ्या समाजात आणि स्वतःच्या मरणानंतर किती लोक आपल्या अंतयात्रेत येतील, याचा विचार करत जगणाऱ्या माणसांच्या गर्दीत सावळी मित्रा वेगळ्या जाणिवांचा शोध घेणाऱ्या कलाकार होत्या. म्हणूनच मृत्यूनंतरही त्यांनी आपल्या अभिनयातून निर्माण केलेला रंगमंचीय अवकाश आसमंत भारून टाकतो.

.................................................................................................................................................................

लेखक आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक आणि साहित्य–संस्कृतीचे अभ्यासक आहेत. ते फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे येथे साहित्य आणि नाटकाचे अध्यापन करतात.

potdar.ashutosh@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......