कोन नाय नथुराम गोडश्या, हिकडं म्या अमोल, तिकडं त्यो पोंक्ष्या!
पडघम - सांस्कृतिक
जयदेव डोळे
  • म. गांधी, डॉ. अमोल कोल्हे, शरद पोंक्षे आणि नथुराम गोडसे
  • Sat , 22 January 2022
  • पडघम सांस्कृतिक व्हॉय आय किल्ड गांधी WHY I KILLED GANDHI राष्ट्रवादी काँग्रेस NCP शिवसेना Shivsena डॉ. अमोल कोल्हे Amol Kolhe म. गांधी Gandhi नथुराम गोडसे Nathuram Godse

झाले! महाराष्ट्राच्या बोडख्यावरून नथुराम गोडसे काही केल्या उतरत नाही. तो तसाच बसून आहे. म्हणून म्हणे महाराष्ट्राला पंतप्रधानांचे पद मिळत नाही. हो, फार फार पूर्वी काँग्रेसने अन त्याला मतदान करणाऱ्या मतदारांनी असे ठरवले म्हणे की, गांधीजींना ठार मारणारा माणूस एक मराठी होता. त्याची शिक्षा म्हणून या राज्याला देशाचा सर्वोच्च मान कधी द्यायचा नाही. राष्ट्रपती पद घ्या, सभापती पद घ्या की, लष्करप्रमुखाचे. या देशाचा कारभारी या नात्याने मराठी माणूस कधी येऊ द्यायचा नाही, त्या पंतप्रधानपदावर. झालेही तसेच. ना यशवंतराव, ना शंकरराव, ना चाकूरकर. शरद पवारही त्या पदाजवळ पोचले होते, पण पुन्हा गोडसे आडवा आला. मराठी माणूस म्हणून त्याच्यावरचा १९४८पासूनचा संशय काही जाता जात नाही. सरसंघचालक म्हणून मराठी माणूस आला की, हाच संशय आणखी दृढ होत जातो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

कोणताही मराठी माणूस या संशयामधून सुटू शकत नाही. गांधीजींना मारणारी मराठी माणसाची खुनशी वृत्ती सतत फणा काढून ठेवल्यासारखी राहिल्यावर दुसरे काय होणार? कधी नाटक, तर कधी चित्रपट; मराठी माणसाला सतत ‘नथुराम-नशा’ देत राहिल्यावर आणखी काय होणार?

सावरकर तर अक्षरक्ष: पाचवीला पुजलेले. मुद्दाम गांधीखुनाचा उल्लेख होत राहिल असे विषय निवडत राहायचे. त्यातून यांना (म्हणजे हिंदुत्ववाद्यांना) साधायचे असते काय, तर आम्ही गांधी मारला, तुमची काय बिशाद? देशभर सुरू झालेला ‘गोडसे-गौरव’ पुण्यातूनच जन्मला आणि पसरला, असे जुने लोक सांगतात.

आता पुन्हा गोडसे-गौरव जन्माला आला असून तो साक्षात बहुजन समाजाच्या पोटीच वाढवलेला आहे. संघाला ब्राह्मणी म्हणून हिणवणाऱ्यांना या गौरवाचा धनी व्हायला लावले आहे. ‘बामणं लई हिकमती’ असे म्हणता म्हणता त्यांच्या हिकमतीला शरण गेली की मंडळी! १९४८ साली गांधींच्या खुनानंतर गोडसे कोकणस्थ ब्राह्मण असल्याचे ठाऊक होताच, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ब्राह्मणांची घरे जाळली गेली. अनेक ब्राह्मण खेड्यांतून पळून शहरांत आले. अनेकांना मारझोड झाली. त्याचा बदला घेणे कधी थांबले नाही. ज्यांनी हल्ले केले त्यांनाच हिंदुत्ववादाचा गजर करायला लावायचे बेत आखले गेले. बाबासाहेब पुरंदऱ्यांना त्या कामी लावले गेले. सावरकर गांधीखुनामधून पुराव्याअभावी सुटले. पण त्यांना मानसन्मान द्यायला बहुजनांतलेच पुढे आणले गेले.

आता तर मराठ्यांच्या राजकीय पक्षाचा खासदार साक्षात नथुरामाच्या भूमिकेत आलाय. मग काय, केली की नाही हिकमत. झाली की नाही मात! लई गमजा चालल्या होत्या यांच्या. आता घ्या म्हणावे… अशा उकळ्या असंख्य घराघरांत फुटत असतील सध्या.

बिच्चारे डॉ. अमोल कोल्हे. ब्राह्मणीकरण झालेल्या एका व्यवसायाचे बळी झाले असे म्हणायला जावे, तर ते सुशिक्षित. शिवाय त्यांनी खास अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गाठ मारलेली. त्यांना नथुराम करायला लावायचा कावा, मुळीच समजला नसेल असे कसे समजावे? राष्ट्रवादीत येण्यापूर्वी म्हणजे शिवसेनेत असताना २०१७ साली त्यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी?’ या चित्रपटाचे काम पूर्ण केले असे ते म्हणतात. पाऊण तासाचा हा लघुपट असून त्यात म्हणजे नथुराम न्यायालयात गांधींच्या खुनाचे समर्थन करताना जे म्हणाला, त्यापुरताच विषय आहे. त्याचे कर्तेधर्ते कोणी अशोक त्यागी व कल्याणी सिंह आहेत. डॉ. कोल्हे म्हणाले त्याप्रमाणे नथुरामाची भूमिका त्यांनी ज्या हिंदुत्ववादी संघटनेत असताना स्वीकारली, तिच्या भूमिकेविरुद्ध नव्हती, म्हणून स्वीकारली, असा अर्थ आपल्याला काढता येतो.

शिवसेना आणि गोडसे यांचेही नाते हिंदुत्ववादी म्हणून फार घट्ट होते. आता हा पक्ष राज्यघटनेची शपथ घेऊन सत्ताधारी झाल्याने त्याला कदाचित गोडसे अडचणीचा वाटू शकतो. पण एकेकाळी शिवसेनेत असताना छगन भुजबळ औरंगाबादेत पत्रकार बैठकीत बिनधास्त म्हणाले होते की, ‘गोडसे याचे पुतळे आम्ही गावोगावी बसवू’. त्या बैठकीतले पत्रकार अजूनही त्याच व्यवसायात आहेत. भुजबळ त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन पोचले होते, ज्यात हे नथुरामोल कोल्हे सध्या आहेत!

आपल्या खुलाशावजा मुलाखतीत डॉ. कोल्हे अगदी त्या खुन्यासारखे निलाजरे युक्तिवाद करत होते. देशाचे विभाजन करणाऱ्या आणि लाखो (हिंदूंच्या) बळींना जबाबदार असणाऱ्याचा ‘वध केला’ असे नाकातल्या नथीवरून नाव दिल्या गेलेल्या या शूरवीराने न्यायालयात सांगितले. अगदी तसाच युक्तिवाद कसलीही शरम, दु:ख, चूक, पश्चात्ताप यांचे प्रदर्शन न करता अगदी हसून व सराईतपणे डॉ. कोल्हे ‘न्यूज १८ लोकमत’च्या वार्ताहराशी बोलताना मांडत होते.

एक कलावंत म्हणून त्यांनी कोणत्या भूमिका रंगवाव्यात, याचे त्यांचे स्वातंत्र्य मान्य. पण याचा अर्थ कलावंत अगदी भाबडा, अराजकीय आणि तत्त्वशून्य असतो काय? बारीकसारीक राजकारण त्याला माहीत नसते हेही मान्य. परंतु गांधी- गोडसे- रा.स्व.संघ- काँग्रेस- हिंदू राष्ट्रवाद- धर्मनिरपेक्षता- स्वातंत्र्य चळवळ आदी गोष्टी अज्ञात कशा असू शकतात?

अभिनयाचा कस लागेल असे भावनिक संघर्ष आणि व्यक्तिमत्त्वातले विरोधाभास नथुराम याच्याबाबतीत दिसले, असे अजून तरी कोणी सांगितलेले नाही. मग नथुरामाचे पात्र रंगवण्यात मर्दुमकी ती काय? ते पात्र रंगवून शरद पोंक्षे लोकप्रिय जरूर झाले, श्रेष्ठ अभिनेता नव्हे!

उत्पल दत्त (‘शक’), अशोक कुमार (‘ज्युवेल थिफ’), अमिताभ बच्चन (‘परवाना’), विनोद खन्ना (‘अचानक’), राजेश खन्ना (‘रेड रोज’) यांनी साकारलेली खुन्याची पात्रे दुहेरी व्यक्तिमत्त्व आणि भावनिक चढउतार यांबाबत होती. केवळ आव्हान म्हणून त्यांनी या भूमिका रंगवल्या. तसे गोडसेबद्दल काही महाराष्ट्र जाणत नाही. पण सदोदित गोडसे-गौरव केला गेल्याने उर्वरित भारत मात्र असे ठरवतो की, मराठी माणूस घातकी, क्रूर, दुटप्पी असून विश्वास ठेवण्यास लायक नाही.

महाराष्ट्र हा हुशार, धाडसी आहे. मात्र चुकीच्या मुद्द्यांचे समर्थन करत राहतो. पोंक्षे मूळचे हिंदुत्ववादी आहेत. ते आपल्या राजकीय विचारांचा प्रचारही करतात. त्यांना फार कोणी महत्त्वही देत नाही. पण डॉ. कोल्हे यांचा विद्यमान पक्ष गोडसे-गौरव करणारा नाही. त्यातले अनेक जण गोडसेवादी पक्षापाशी जाऊन आले. गेलेही आहेत आणि संपर्कही ठेवून आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवाद स्वातंत्र्य चळवळीतल्या राष्ट्रवादाशी नाते सांगणारा आहे; सांस्कृतिक राष्ट्रवाद, जहाल राष्ट्रवाद अथवा धार्मिक राष्ट्रवाद यांच्याशी नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक खासदार नथुराम गोडसे या मारेकऱ्याचे पात्र रंगवतो, याची चर्चा देशभर घडून त्या पक्षाची नाचक्की होणार. ती थांबवायची ताकद कितीही खुलासे केले तरी कशात नसेल.

समजा गोडसेचे पात्र एखाद्या दलित अभिनेत्याने रंगवले असते तर? पोंक्षे ब्राह्मण अन कोल्हे माळी आहेत. म्हणजेच सवर्ण आहेत. गांधींबद्दल प्रचंड चीड असूनही नुथराम गोडसे साकारण्याची इच्छा एखाद्या दलित नटाने दाखवलेली नाही. तसे झाले असते तर डॉ. आंबेडकर यांचा संबंध आणला गेला असता की नाही? त्या नटाने कितीही कळवळून सांगितले असते की, आंबेडकर व माझी पात्र निवड यांत काही संबंध नाही, तर ते मानले असते का महाराष्ट्राने?

दलित अभिनेत्याने अराजकीय व तत्त्वशून्य भूमिका घेणे जसे अशक्य असते, तसे सवर्ण अभिनेत्याचे का नसावे? त्यांची कला तेवढी निखळ कला, अभिजात, अस्पर्श, दैवी आणि असामान्य का असावी? अफझलखान केला काय, औरंगजेब केला काय, संभाजी रंगवला काय अन शिवाजी सादर केला काय, यांना सारे कसे समान! ना अंतर्मनाला बोचणी, ना कारकिर्दीला टोचणी!

कला राजकारणशून्य असते, ती विद्यमान राजकीय तत्त्वज्ञानाच्या चौकटीत असत नाही, कलावंत एक स्वतंत्र व सावभौम व्यक्तिमत्त्व असते, असे काही सिद्धान्त मराठी कलाविश्वात अजूनही तरंगत असतात. त्यामुळे चित्रपटांत येणारा भगवा ध्वज, मुसलमान खलनायक, स्त्रीदेहाचे उपभोगवादी चित्रण, गांधी टोपीवाले पुढारी, मोलकरीण व घरगडी, भजने, राष्ट्रवाद, हिंसाचार, बहुराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने, पोलिसांचा वापर इत्यादी गोष्टी सपशेल कलारूप असतात, असे वाटून आपण ते बावळटासारखे बघत राहायचे. त्यांना आर्थिक, राजकीय, वर्गीय, जातीय निकष लावू नयेत, अशी आपल्याला सक्त ताकीद असते. नव्हे, तशी शिकवण असते.

म्हणजे ‘अजूनि बरसात आहे’ ही मालिका स्वार्थी, भ्रष्ट, हिंसक आणि नीतीशून्य होत जाणाऱ्या शहरी मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबाचा एक दाखला आहे, असे न बघता ती कौंटुबिक नात्यागोत्यांतले ताणतणाव एवढ्यापुरतीच बघावी, असेच ना! समोर दाखवले जातेय तेवढेच पाहत, आगेमागे काय आहे वा असेल याचा विचार करू नका, असे संबंधितांचे म्हणणे असते.

डॉ. कोल्हे तेच म्हणत आहेत. फक्त पाहा अन विचार करू नका, असा त्यांचा एकंदरीत निकाल आहे. एक कलाकार या नात्याने ‘व्हाय आय किल्ड गांधी?’ या चित्रपटात कला, सौंदर्य, तत्त्व, मूल्य, नवेपण, सर्जन यांसारखे काय असेल, ते तो न पाहताच सांगता येईल. कारण तो एक शुद्ध प्रचारपट आहे. कला व सौंदर्य यांसोबत सत्य नेहमी उभे असते. ते या चित्रपटांमधून कधीचेच बहिष्कृत झालेले असणार. न्यायालयात जे सांगितले जाते, ते सत्यच असते असे भासवायची खटपट जर या चित्रपटाच्या कर्त्यांची असेल तर, त्यांनी रोज न्यायालयात जाऊन सुनावण्या ऐकत बसावे!

नथुराम आणि त्याचे हिंदूराष्ट्र, हिंदुत्ववादी संघटना व त्यांचे राजकारण यांचा सत्याशी काय संबंध आहे, हे तर रोजच या देशापुढे उलगडते आहे. गांधी, नेहरू, सुभाषबाबू, पटेल इत्यादी नेत्यांची रोज असत्याने विटंबना या संघटना करत राहतात, ते काय माहीत नाही देशाला?

गेली सात वर्षं या देशात जिथे भाजपची सत्ता असते, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक नथुराम गोडसे जयंती साजरी केली जाते. डॉ. कोल्हे यांच्यासह लोकसभेत बसणाऱ्या एक खासदारबाई गोडसेला देशभक्त अन काय काय म्हणाल्या होत्या! या गोडसेचा पुतळा झाला, जयजयकार झाला तरीही डॉ. कोल्हे का नाही काही बोलले? त्यांनी एकदा तरी या गोडसे-गौरवाचा धिक्कार केला? ‘मला तो जवळून माहीत आहे. तो काही गौरव करण्यासारखा नाही’ असे ते का नाही म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊन लोकसभा सदस्य झाल्यावरही डॉ. कोल्हे यांना गोडसे हा एक वादग्रस्त विषय आहे आणि तो हाताळल्यामुळे मोठा वाद होऊ शकतो, हे जर कळत नसेल तर या पक्षाचे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग तोकडे पडत आहेत, असे तरी म्हणावे लागेल किंवा या पक्षात संधिसाधू, तत्त्वशून्य लोक जमा झाले असे तरी.

अचानक या चित्रपटाचा प्रचारपट (व्वा! प्रचारपटाचा प्रचारपट) झळकला अन सगळी बोंबाबोब झाली, असा डॉ. कोल्हेंचा आविर्भाव निखळ कलावादी व्यक्तीचा आहे की बेदरकार, ‘हम करे सो कायदा’ या सवर्ण वृत्तीचा?

किरण माने या दुसऱ्या एका वादग्रस्त अभिनेत्याने आपण फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे असून एक बहुजनही आहोत, असे सांगितले. त्यांनी अप्रत्यक्षपणे ब्राह्मणी पक्षपाती हिंदुत्ववादी व्यक्तींवर रोख धरला. नथुराम साकारणारे पोंक्षे त्या भूमिकेबद्दल अजिबात दु:खी, शरमिंदे नाहीत. तो त्यांच्या विचाराचा एक भाग आहे. त्यांनी कला व राजकारण यांच्यात भेद केलेला नाही. त्यामुळे पोंक्षे आमच्या शत्रूपक्षात आहेत व ते त्याबद्दल स्पष्ट आहेत. तसे डॉ. कोल्हे यांच्याबाबतीत काय ठरवता येईल?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पण तसे काही ठरवले जाणार नाही. तटस्थ, नि:पक्ष कलेच्या नावाखाली बहुसंख्याकांचे राजकारण जोरात सुरू आहे. जसा ‘गोदी मीडिया’ गेल्या सात वर्षांत उगवला आहे, तसे ‘भाजपट’ खूप प्रदर्शित होऊ लागले आहेत. महेश मांजरेकरांच्या ‘नटसम्राट’ चित्रपटात नाना पाटेकरांच्या डोक्यावर संघाची काळी टोपी काही उगाच येत नसते! तशी मनमोहनसिंग, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राजीव गांधी आदींची टिंगल करणारी पात्रे चित्रपटांत (म्हणजे भाजपटांत) उगाच दाखवत नसतात.

खुशमस्करी, माणसाच्या अगदी क्वचित स्वभावात असते. बऱ्याचदा सत्ताधाऱ्यांची ती गरज असते. त्यामुळे कलावंत माणसे विदूषक बनतात. आम्ही असे समजू की, अनेक कलाकार ‘भाजपटां’तही काम करत असतात. कधी कधी ते चित्रपटांत काम करतात. निदान २०२४पर्यंत तरी हे असेच आम्हाला बघावे लागणार…

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

कोल्हेसाहेब, आपली राजकीय, सामाजिक भूमिका सांस्कृतिक (कलेपासून) वा खासगी आयुष्यापासून वेगळी असू शकत नाही!

महात्मा गांधी, हॉलिवुड, बॉलिवुड, मराठी सिनेमा आणि प्रोपगंडा…

गांधीवादी पुलंच्या नावाचा पुरस्कार ‘नथुराम’ पोंक्षे यांना?

गोडसेभक्ती आता मुख्य प्रवाहात

गोडसे @ गांधी डॉट कॉम : गांधी-गोडसे यांना समोरासमोर आणणारं नाटक

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......