तळागाळातील लोकांच्या हिताची तळमळ, पारदर्शी जीवन, कमालीची निर्भीडता, शासनव्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत, लढण्याची उर्मी, ही एनडीसरांची गुण वैशिष्ट्ये होती...
संकीर्ण - श्रद्धांजली
मेघा पानसरे
  • एन. डी. पाटील आणि काही चळवळी-आंदोलनातील त्यांची छायाचित्रं
  • Sat , 22 January 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली एन. डी. पाटील N. D. Patil कॉ. गोविंद पानसरे कॉ. गोविंद पानसरे Govind Pansare नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar एम.एम. कलबुर्गी M. M. Kalburgi गौरी लंकेश Gauri Lankesh

भाई एन. डी पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना २०व्या शतकातील भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपासून ते नंतरच्या अनेक सामाजिक आंदोलने, राजकीय परिवर्तन, आधुनिकतेकडे वाटचाल हा कालखंड आणि आजच्या २१व्या शतकातील जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण व त्यातून उद्भवलेला आर्थिक-सामाजिक संक्रमणाचा काळ, असा विशाल पट नजरेसमोर येतो. हा असा एक दीर्घ कालखंड आहे, ज्यात अनेक नवे प्रश्न, नवी आव्हानं भारतापुढे उभी राहिली. त्या सगळ्या परिस्थितीचं आकलन आणि परिवर्तनाची दिशा यातून त्यांची वैचारीक पायाभरणी झालेली आहे.

भारतात जातीव्यवस्था व वर्गव्यवस्था या दोन्ही संदर्भात ज्या गरीब जनतेला केवळ जन्मानं कनिष्ठत्व मिळालं, ज्यांना सामाजिक श्रेणीरचनेमध्ये नेहमी तळाशीच ठेवलं गेलं, वर येण्याची संधीच नाकारली, माणूस म्हणून जगण्याचा हक्कदेखील हिरावून घेतला, असे कष्टकरी श्रमिक, दीन-दुबळे, दलित, शेतकरी या सगळयांचे प्रश्न हेच एनडींच्या चिंतनाचा, प्रबोधनाचा आणि लढण्याचा केंद्रबिंदू राहिले आहेत.

त्यांचा नव्वद वर्षांचा प्रवास जर आपण बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की, जिथं एनडींचा जन्म झाला, तो परिसर क्रांतिकारकांचं आगर होता. क्रांतीसिंह नाना पाटील, जी.डी. बापू लाड, नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांच्या संघर्षाने भारलेलं वातावरण, कर्मवीर भाऊराव पाटलांचं शिक्षण क्षेत्रामधील योगदान, बहुजनांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी असलेली त्यांची धडपड, तळमळ आणि त्यातून उभारलेल्या शिक्षण संस्थांचा आधारवड, या सगळ्या पार्श्वभूमीबरोबरच महाराष्ट्रामध्ये विकसित झालेली सत्यशोधकी विचारांची जोतीबा फुले, राजर्षी शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा यामुळे परिवर्तनवादी विचारसरणीचा, जीवनशैलीचा वस्तुपाठच त्यांना मिळालेला होता.

तसेच केवळ प्रादेशिक पातळीवरच नाही, तर एका जागतिक पातळीवर मार्क्स आणि लेनिनवादी विचारधारेचा अभ्यास त्यांनी केला असल्याने आपल्या मातीतल्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांकडे बघण्यासाठी मार्क्सवादी दृष्टीकोन घेऊन त्याची सत्यशोधकी विचारांशी गुंफण करून इथल्या सामाजिक प्रश्नांना भिडण्याचं एक आव्हान त्यांनी पेलल्याचं दिसून येतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एनडीसरांचं उच्चशिक्षण घेणं असेल किंवा त्यानंतर सामाजिक कार्यासाठी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करणं असेल, या सगळ्यामध्ये त्यांच्यातली सामाजिक तळमळ, उत्तरदायित्वाची भावना, निस्पृहता, धडाडी आणि निर्भिडता, हे सगळे गुण आपल्याला दिसतात.

दुसऱ्या पातळीवर त्यांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये जी महत्त्वाची आंदोलनं उभी केली, त्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेल्या सहकाऱ्यांचा एक मोठा सांस्कृतिक आणि राजकीय वारसा, या ७०वर्षांच्या त्यांच्या कार्यप्रवासातून आपल्याला लाभलेला आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनांची नुसती यादी केली, तरी त्यांच्या संघर्षाचा पट किती व्यापक आहे, ते आपल्या लक्षात येतं.

यामध्ये गिरणी कामगारांचा लढा, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भूमीहिनांसाठी भूमी आंदोलन, शेतमालाला किफायतशीर भाव देण्यासाठीचे लढे, कापूस एकाधिकार योजनेबद्दलचे लढे, महागाई आणि उपासमार विरोधी आंदोलन, बहुजनांच्या शिक्षणविरोधी श्वेतपत्रिकेचा लढा, अंधश्रद्धा  निर्मूलन, धरणग्रस्त आणि विस्थापितांचे आंदोलन, एन्रॉनविरोधी चळवळ, पिकाच्या हमी भावासाठी शेगाव ते नागपूर विधानसभेवर ७०० किलोमीटर पायी चालत जाण्याची दिंडी, महाराष्ट्र वीज संघर्ष समितीचं आंदोलन, भूविकास अधिकाऱ्यांकडून कामगारांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधातील आंदोलन, सीमावासीयांच्या प्रश्नासाठी केलेले आंदोलन, साखर कारखानदारांच्या मनमानी कारभार विरोधातलं आंदोलन, जागतिकीकरण विरोधी आंदोलन, खाजगीकरण विरोधातील लढे, सेझ विरोधी चळवळ इ.

या सर्व आंदोलनांच्या आधारे प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी प्रबोधनाची अनेक पुस्तके लिहिली, व्याख्याने दिली, धरणे, मोर्चे, निदर्शनं, उपोषणं, लाठीमार, तुरुंगवास, गोळीबार अशा जीवावर बेतणाऱ्या सगळ्या खाच-खळग्यातून यशस्वी मार्गक्रमण केलं आणि सामाजिक आंदोलनाचे वेगवेगळे मानदंड तयार केले.

एनडीसरांनी ज्या सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलनं उभारली, ज्या आंदोलनांचे नेतृत्व केलं, सहभाग घेतला त्यातले काही प्रश्न आणि आंदोलन आजतागायत संपलेली नाहीत. आमच्या पिढीपर्यंत ती चालू आहेत आणि आमच्या नंतर येणाऱ्या पिढीलादेखील त्या प्रश्नांशी भिडावं लागणार आहे. आणि यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. गेल्या वर्षी शनिशिंगणापूरमध्ये महिलांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु त्याच्या कित्येक वर्ष आधी समतेची मूल्ये जपणाऱ्या, दूरदृष्टी असलेल्या एनडीसरांनी आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी या प्रश्नाला हात घातला होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या आधारे सामाजिक समतेचा आग्रह धरला. स्त्री-पुरुष समतेचा आग्रह धरला.

यानंतर येतो तो बहुजनांच्या शिक्षणाचा प्रश्न. १९६८मध्ये मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना सरकारने शिक्षणविषयक श्वेतपत्रिका काढली. शैक्षणिक पुनर्रचनेसाठी या श्वेतपत्रिकेची अंमलबजावणी होणार होती. त्या वेळी एका गृहस्थाने असं मत व्यक्त केलं की, ‘‘नव्या तथाकथित समतेची अब्रू राखून जुन्या कालोच्छीत चार्तुवर्णियांचे पुनरुज्जीवन करण्याचा हा प्रयत्न आहे, असे आम्हास वाटते. आणि ते निर्भीडपणे करण्याचे शासनाने ठरवले आहे, याचा आम्हास संतोष वाटतो.’’

ही भूमिका तेव्हाच्या सनातनी आणि प्रतिगामी लोकांनी घेतली होती. परंतु भाई एन. डी. पाटील यांनी ही नवी श्वेतपत्रिका समाजासमोर ठेवा, असा आग्रह धरला आणि बॅरिस्टर पी. जी. पाटीलसरांच्या सोबत या प्रश्नावर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ ४०० सभा घेतल्या. ज्या महाराष्ट्रामध्ये जोतीबा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील ही नावं सातत्यानं घेतली जातात, तिथे या श्वेतपत्रिकेचा धोका काय आहे, हे पहिल्यांदा एनडीसरांनी उघडपणे समाजासमोर आणलं.

या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे, सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाचं स्पष्ट बहुमत असूनसुद्धा आणि श्वेतपत्रिका मंजूर होण्यामध्ये कुठलीही अडचण नसताना देखील एनडीसरांनी बाळासाहेब पाटील यांना हे पटवून दिलं की, भावी आयुष्यात बहुजनांच्या शिक्षणामध्ये कोणता धोका आहे. मग बाळासाहेब पाटील यांनी सभागृहातील सर्व आमदारांना एकत्र केलं. त्यांच्या समोर एनडीसरांनी घणाघाती भाषण केलं आणि श्वेतपत्रिकेचं खरं कृष्ण स्वरूप उघड केलं. त्याचा परिणाम असा झाला की, जेव्हा श्वेतपत्रिकेचा ठराव सभागृहात आला, तेव्हा बहुमत असूनसुद्धा काँग्रेसच्या आमदारांनी ही श्वेतपत्रिका फेटाळून लावली.

बहुजनांच्या शिक्षणाचा जो मुद्दा एनडीसरांनी त्या वेळी लावून धरला होता, तो मुद्दा इतक्या वर्षानंतर आजसुद्धा तसाच शिल्लक आहे. मधल्या काळामध्ये संघर्ष करून ज्या काही सुविधा बहुजनांच्या पर्यंत पोहोचल्या, त्या सुविधा आता पुन्हा सरकारने जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचे धोरण राबवण्याच्या नावाखाली काढून घेतलेल्या दिसतात. काही दिवसांपूर्वी सरकारी शाळा बंद करण्याचा आणि गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण थांबवण्याचा जो मुद्दा ऐरणीवर आलेला होता, त्यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोल्हापुरात एक विधान केलं होतं की, सरकारच्या निर्णयाला कोणत्याही आधाराविना विरोध होत आहेत. तेव्हा एनडीसरांनी त्यांच्याशी चर्चा केली, प्रश्नाचं गांभीर्य सांगितलं आणि सडेतोड उत्तर दिलं की, तुमची धोरणं कशीही असली तरी न्याय्य प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच लढत आणि भिडत राहणार आहोत.

वर्षानुवर्षे कर्मविपाक सिद्धान्त, पाप-पुण्य आणि पुनर्जन्माच्या कल्पना, हे धर्म संस्कार सर्वसामान्य लोकांच्या मनात रुजलेले आहेत. दैनंदिन जीवनातील संकटं आणि भेडसावणाऱ्या समस्या या ईश्वरनिर्मित आहेत, नशिबाचं कर्मफळ आहे, या मांडणीला विरोध करून जनसामान्यांवरची सामाजिक संकटं ही मानवनिर्मित आहेत स्वार्थी आणि आपमतलबी राजकारणाचा भाग आहेत, हे लोकांना पटवून देऊन त्यांना संघर्षासाठी तयार करण्याचं काम एनडीसरांनी आयुष्यभर केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली एन्रॉनचा लढा असेल किंवा सेझविरोधी आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनांमधून सर्वसामान्य लोकांना संघर्षाचं बळ मिळालं, त्यांना निद्रिस्त अवस्थेतून जागं करण्याचा प्रयत्न या आंदोलनांनी केला.

शंकराचार्यांनी चार्तुवर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केला, त्याविरोधात एक मोठं आंदोलन कोल्हापूरमध्ये झालं. तसेच मला आठवतं की, एकदा कोल्हापूरमध्ये विश्वशांती यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सर्वसामान्यांचा जगण्याचा स्त्रोत असलेलं धान्य जाळणं, गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून घेणं आणि लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन आर्थिक लाभ मिळवणं, हा जो घाट घातला होता, तो कॉम्रेड गोविंद पानसरे आणि भाई एन. डी. पाटील या दोघांनी उधळून लावला. त्या वेळी कोल्हापुरात आम्ही विविध संघटनांचे कार्यकर्ते ८ ते १० दिवस रोज धरणे धरून बसत होतो. विश्वशांती यज्ञ संपला आणि जेव्हा तो तोट्यात गेला, तेव्हा तिथले अनेक साधू त्या मैदानावर वैफल्यग्रस्त अवस्थेत फिरताना दिसत होते. तिथं आम्ही त्यांचं अपयश पाहिलेलं आहे. त्याचं आर्थिक गणित कोलमडलेलं पाहिलं आहे.

त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये टोलविरोधी आंदोलनसुद्धा कॉम्रेड गोविंद पानसरे आणि भाई एन. डी. पाटील यांच्या विधायक अन् राजकीय हस्तक्षेपामुळे यशस्वी झालं. कितीही प्रलोभनं आली, धमक्या आल्या, दडपणुकीचे प्रकार झाले, तरी या सगळ्या गोष्टींना मूठमाती देत त्यांनी सरकारचा खाजगीकरणाचा डाव उधळून लावला. टोलविरोधी आंदोलनात आम्ही सर्व कुटुंबीय, अगदी माझी लहान मुलंही, सहभागी होत असू. सर्वसामान्यांच्या लढ्याचं यश चाखण्याचा जो आनंद आम्हाला मिळाला, तो केवळ कॉम्रेड पानसरे आणि एन. डी. सरांच्या नेतृत्वामुळेच शक्य झाला.

राजकीय क्षेत्रात काम करणारी माणसं केवळ सामाजिक-सार्वजनिक आयुष्य जगत नसतात. त्यांच्याही आयुष्यात असे क्षण येतात, जे त्यांची खोल आतली भावुकता  दृश्य बनवतात. एनडीसर आणि कॉम्रेड पानसरे यांचे परस्पर-संबंध हे असंच एक दुर्मीळ नातं होतं. खरं तर एनडीसर कॉम्रेड पानसरे यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ. दोघांनीही आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक-राजकीय लढे लढले. काही स्वतंत्रपणे, आपापल्या राजकीय पक्षाच्या बॅनरखाली लढले, तर काही एकत्र लढले. परंतु संघर्षमय जीवनात एका टप्प्यावर ते या सीमारेषांच्याही वर आले. विचारप्रणालीशी आत्यंतिक निष्ठा, तळागाळातील लोकांच्या हिताची तळमळ, पारदर्शी जीवन, कमालीची निर्भीडता, शासनव्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत, लढण्याची उर्मी, ही त्यांची गुण वैशिष्ट्ये सर्वांना ज्ञात आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

व्यक्तिगत जीवनातील काही प्रसंग माणसाची कसोटी पाहणारे असतात. एनडीसर आणि कॉम्रेड पानसरे यांच्यासारखी समाजाचे राजकीय नेतृत्व करणारी खंबीर माणसेही याला अपवाद नसतात. मुलगा, कॉम्रेड अविनाशचा अकाली दु:खद मृत्यू हा कॉम्रेड पानसरे यांच्या जीवनातील असाच एक क्षण होता. कॉम्रेड पानसरे यांनी अविनाशच्या अंत्ययात्रेत अशाच एका निर्णायक क्षणी ‘कॉम्रेड अविनाश का अधुरा काम कौन पुरा करेगा?’ अशी घोषणा दिली होती. परंतु त्यांचे दु:ख भळभळत्या जखमेसारखे होते. अशा काळात एनडीसर महिनाभर दररोज घरी येत राहिले. मूकपणे सोबत राहून कॉम्रेड पानसरेंचे सांत्वन करत राहिले. तेव्हा प्रथमच वरवर कठोर भासणाऱ्या एनडीसरांच्या हृदयातील ओलावा, कॉम्रेड पानसरेप्रती प्रेम-जिव्हाळा आम्हां कुटुंबियांना जाणवला. त्यानंतर कॉम्रेड पानसरेंनी स्वत:ला पूर्ण वेळ कामात झोकून दिले. असंख्य योजना आखल्या. त्या प्रत्यक्षात आणल्या. पण एनडीसरांची त्या दु:खद काळातील साथ ते कधीच विसरले नाहीत.

कॉम्रेड पानसरेंवर झालेल्या खुनी हल्ल्यानंतर एनडीसरांना कमालीचे दु:ख झाले. त्या वेदना बाजूला ठेवून त्यांनी खंबीरपणे तेव्हाचा कठीण प्रसंग सावरला. लोकांना धीर दिला. आम्हा कुटुंबियांना सावरले. हल्ल्यानंतर कॉम्रेड पानसरे हॉस्पिटलमध्ये असताना लोकांनी उत्स्फुर्तपणे मोर्चा पुकारला. मोर्चाला प्रशासनाची परवानगी घेतलेली नव्हती. लोकांच्या भावना तीव्र होत्या. अशा काळात तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी एनडीसरांची भेट घेतली. सरांनी त्यांना लोकांच्या भावना समजून घेण्याची विनंती केली. स्वत: मोर्चाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. कोणताही अनुचित प्रकार न घडता मोर्चा झाला. कॉम्रेड पानसरेंच्या मृत्युनंतर मात्र ते अतिशय हळवे  झाले. तेव्हापासून आजतागायत कॉम्रेड पानसरे, तसेच डॉ. दाभोलकर आणि त्यानंतर प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुन्यांना पकडावे यासाठी झालेल्या अनेक आंदोलनांत ते पुढे राहिले. दर महिन्याच्या २० तारखेला होणाऱ्या ‘निर्भय मॉर्निंग वॉक’मध्ये सहभागी होत राहिले. शासनाचा निषेध करत राहिले. सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीसारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करत राहिले. कॉम्रेड पानसरेंच्या खुनाबाबतीत न्यायालयीन व इतर स्तरावर येणाऱ्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवून ते आपल्या भावना व्यक्त करत राहिले. शासनाकडे विविध मागण्या करत राहिले. शासनाला प्रश्न विचारणारे खंबीर आवाज आता महाराष्ट्रात खूप कमी झाले आहेत. त्यासाठी एनडीसर आणि कॉम्रेड पानसरेंसारखी नैतिकता आणि पारदर्शीपणा लागतो.

कॉम्रेड पानसरेंच्या अनुपस्थितीत एनडीसर हेच आमच्यासाठी आधार बनले. अनेक कठीण प्रसंगात ते आमच्या पाठीशी उभे राहिले. एका निराशेच्या  क्षणी त्यांच्याजवळ गेले असता “मला मुलगी असती तर तिला मी जसा आधार दिला असता, तसाच आधार मी असेपर्यंत तुला देईन. कॉम्रेड पानसरेंनंतर आपल्याला कोणी नाही, असे समजू नकोस”, असे त्यांनी मला सांगितले. एकदा ते आजारी असताना त्यांना भेटायला गेले असता, मी त्यांना म्हणाले की, “लवकर बरे व्हा. मला ‘गार्डियन’ची गरज आहे.” तेव्हा ते हसत म्हणाले, “If you need a guardian, he is always there. Don’t worry.” माझी मुले मल्हार आणि कबीर त्यांना कॉम्रेड पानसरेंच्या जागी पाहू लागली. अनेकदा आम्ही त्यांना, सरोजताईंना भेटायला जातो, त्यांच्याशी बोलतो. माझ्या सामाजिक जीवनातील सहभागाची, कामाची ते माहिती घेत. मार्गदर्शन करत. काही वेळा भावविवश होत. त्यांच्या हृदयातील मायेचा पाझर आम्हाला जाणवे.

एनडीसरांसारखी माणसे ‘जिवंत इतिहास’ असतात. महाराष्ट्राचा एक प्रदीर्घ इतिहास त्यांच्या रूपात जिवंत होता. हे फार दुर्मीळ आणि मौल्यवान असतं. त्यांनी विवेकानं संघर्ष करण्याची जी बीजं इथल्या मातीत रोवली आहेत, ती रुजून पुढच्या पिढ्या त्यांच्या मार्गाने वाटचाल करतील, असा मला विश्वास आहे.

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

संन्यस्त वृत्तीने संसार करणाऱ्या आणि सामाजिक कामांत स्वत:ला झोकून देणाऱ्या ‘तेजवीराची सावली’ होता आलं...

कॉ. एन. डी. पाटील सर राज्यातील डाव्या-लोकशाही आघाडीचे आणि सर्व जनचळवळींचे ‘केंद्र’ राहिले. त्यांचे नेतृत्व नेहमीच ‘सर्वमान्य’ राहिले!

प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील जी.एम. मक्याच्या चाचणीविरोधात छेडलेल्या आंदोलनाची यशस्वी कथा

एन. डी. पाटील सम एन. डी. पाटीलच!

प्रश्न गंभीर होत आहेत आणि चळवळींचे पाठीराखे मात्र निघून जात आहेत, ही वेदना एन. डी. पाटील यांच्या जाण्याने अधिक गहिरी झाली...

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. मेघा पानसरे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख व रशियन भाषेच्या सहायक प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

megha.pnsr@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......