अजूनकाही
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाची कहाणी वेगळी होती, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे होते. ‘वर्किंग फ्रॉम होम’ करणारे असोत, कामासाठी वणवण भटकणारे असोत वा कामधंदा गमावलेले असोत. कोणताही वर्ग, कोणतीही इंडस्ट्री लॉकडाऊनने निर्माण केलेल्या प्रश्नांमधून सुटली नाही. ‘अॅमेझॉन प्राईम’वर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘अनपॉझड् – नया सफर’ ही वेबसिरीज अशाच कहाण्यांचा प्रेक्षणीय संग्रह आहे.
लॉकडाऊनमधल्या विपरीत परिस्थितीला प्रत्येक वर्गाने तोंड देऊन आपले प्रश्न कसे सोडवले, याचे प्रभावी चित्रण नुपूर अस्थाना, अय्यप्पा के. एम., रुचिर अरुण, शिखा मखन आणि नागराज मंजुळे, यांनी दिग्दर्शित केलेल्या पाच वेगवेगळ्या कथा करतात. प्रत्येक वर्गाचा प्रश्न वेगळा असल्यामुळे त्याची हाताळणी वेगवेगळ्या पद्धतीने होणे गरजेचे का होते, याचे प्रत्यंतर या कथा अनुभवताना येत राहते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
‘द कपल’ ही कथा ‘वर्किंग फ्रॉम होम’ करणाऱ्या पती-पत्नीची आहे. दोघेही वेगवेगळ्या रूममध्ये आपापल्या कामामध्ये व्यग्र असतानाच अनपेक्षितपणे असे काही घडते, ज्यामुळे दोघांमध्ये निर्माण झालेले ताणतणाव परिस्थिती आणखीनच बिकट करतात. अर्थात यामध्ये सिनेमॅटीक असे काही नाही. अनेक जोडप्यांनी हा अनुभव घेतला असेल. दिग्दर्शक दोघा नवरा-बायकोचे आपापल्या कामात व्यग्र असणे अनोख्या पद्धतीने दाखवतो. लॉकडाऊनमुळे एका फ्लॅटमध्ये बंदिस्त असणारे जोडपे कामे वाटून घेतात, एकमेकांची काळजी घेतात, परंतु त्यामध्ये काहीसा यांत्रिकपणा येतो. हे सर्व ज्या पद्धतीने दृश्यमाध्यमाचा वापर करून दिग्दर्शक नुपूर अस्थाना यांनी दाखवले आहे, ते कौतुकास्पद आहे. श्रेया धन्वंतरी आणि पियांषु पेंयुली यांचा अभिनय खासच. नुपूर अस्थाना आणि समीना मोटलेकर यांनी पटकथा लिहिताना ‘वर्किंग फ्रॉम होम’मधील बारकावे अप्रतिमरित्या टिपले आहेत.
‘वॉर रूम’ या कथेत करोना पेशंटना मदत करण्यासाठी तयार केलेल्या वॉर रूममधील ताणतणाव गीतांजली कुलकर्णी यांनी ज्या उत्कटपणे दाखवले आहेत, त्याला तोड नाही. अय्यप्पा यांनी दिग्दर्शन करताना वारंवार वाजणारे फोन, नायिकेची घुसमट, त्या इमारतीमधील कॉरिडॉर, तेथील कर्मचाऱ्यांची एकमेकांना साहाय्य करण्याची वृत्ती चपखलपणे दाखवली आहे.
वाहतूक लॉकडाऊन काळामध्ये अचानकपणे बंद झाल्यामुळे एका मालवाहतूक ट्रकमध्ये असलेल्या तीन कामगारांची काय अवस्था झाली, याचे चित्रण ‘तीन तीगाडा’ या कथेमध्ये आहे. एका गोडाऊनमध्येच वास्तव्य करावे लागल्यानंतर ओढवलेल्या परिस्थितीमध्ये तिघांना एकमेकांच्या स्वभावाशी जुळवून घेताना अनिश्चिततेचा सामना कसा करावा लागला, याचे चित्रण रुचिर अरुण यांनी सुरेखरित्या केले आहे. लॉकडाऊनमध्ये सुरू असलेली कुरियर / घरपोच व्यवस्था करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची शिखा मखन लिखित दिग्दर्शित कथा ‘गोंद का लड्डू’ भावते, ती नीना कुलकर्णी आणि लक्षवीर सिंग शरण यांच्या अभिनयामुळे.
सगळ्यात कमाल केली आहे, ती पाचव्या आणि शेवटच्या ‘वैकुंठ’ या कथेमध्ये लेखक – दिग्दर्शक – अभिनेता नागराज मंजुळे यांनी. करोनामुळे दुर्दैवाने व्यस्त असलेल्या स्मशानभूमीमध्ये एकामागोमाग एक येणाऱ्या ‘प्रेतां’मुळे व्यग्र असलेल्या कर्मचाऱ्याची व्यथा नागराज मंजुळे यांनी ज्या पद्धतीने दाखवली आहे, ते कॅमेऱ्याच्या भाषेतून समजून घेण्यासारखे आहे. स्मशानभूमीमध्ये सतत प्रेते येत असताना कधीकधी त्यासोबत नातेवाईक असतात, तर कधी नसतात. काही वेळा कोण कोणासाठी आले आहे, याचा पत्ताच नसतो. करोनाच्या भीतीमुळे काही वेळा नातेवाईक लांबूनच प्रेताची विल्हेवाट लावायला सांगतात. यासारखे अनेक प्रसंग नागराज मंजुळे यांनी संवादाविना दाखवले आहेत.
अभिनेता नागराज मंजुळे स्मशानभूमीमध्ये काम करत असताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना काय सांगायचे आहे, ते बघणे हेच या कथेचे बलस्थान आहे. चितेच्या ज्वाळामधून दिसणारे त्याचे विडी शिलगावणे, राख सावरताना दिसणारा सूर्यास्त, पार्श्वभूमीवर हलकेच ऐकू येणाऱ्या बातम्या, अविरतपणे काम करून रात्री उशिरा घरी परतताना अडवणारे पोलीस आणि घरी आल्यानंतर मुलाला काही खाऊ घालतानाची अगतिकता, या सगळ्यांतली दाहकता प्रेक्षक या नात्याने आपल्या जाणवते, ती हर्षवर्धन वाघधरे यांच्या सिनेमॅटोग्राफीमधून. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अनेक विरोधाभास दाखवून ज्या पद्धतीने शेवट केलाय, तो पाहण्यासारखा आहे. खरे तर यामधील नागराज मंजुळे-सुधीर कुलकर्णी लिखित कथा समजल्यानंतर कॅमेऱ्याचा वापर उमजण्यासाठी ही कथा पुन्हा बघितल्यास दृश्यमाध्यमाचे महत्त्व आपल्या लक्षात येते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अलीकडे रिलीज झालेल्या हिंदी वेबसिरीज निर्माता-दिग्दर्शकांनी, या दृश्यमाध्यमाचा धसका बसावा, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. सेक्स, हिंसाचार वगैरे दाखवायचे असे ठरवून त्याला अध्येमध्ये कथेची फोडणी देण्याचा उलटा प्रकार बघावयास मिळतो. अशा वातावरणामध्ये पाच भागांचा ‘अनपॉझड्’ हा नवा ‘कथापट’ आवर्जून अनुभवावा असा आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक कथेचा जीव अर्ध्या तासाचा असला तरी वेबसिरीज आहे, या कारणास्तव त्यामध्ये पाणी वाढवून त्याचे पाच-दहा भाग करण्याचा प्रकार इथे झालेला नाही. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून कथेची मांडणी इतक्या उत्कृष्टरित्या केली आहे की, एका कथेमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो. त्यामुळे दुसरी कथा बघण्याचा मोह झाला तरी थोडा ‘पॉझ’ घेऊन ‘अनपॉझड्’ केल्यास आपण नेमके काय अनुभवले, याचा आनंद घेता येतो.
..................................................................................................................................................................
लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.
suhass.kirloskar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment