‘क्षुधाशांती भुवन’ : एका छोट्याशा खेड्यातलं राजकारण आणि समाजकारण कुठल्या भीषण पातळीवर पोहोचलं आहे, याचं भेदक चित्रण
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
जयंत राळेरासकर
  • ‘क्षुधाशांती भुवन’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 21 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस क्षुधाशांती भुवन Kshudhashanti Bhuvan किरण गुरव Kiran Gurav

किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थान्तराची डायरी’बद्दल ऐकलं होतं. नुकताच त्याला अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. पण गुरव यांची ओळख झाली ती ‘क्षुधाशांती भुवन’मुळे. तीन कथांचा हा ऐवज आवर्जून वाचायला लावला तो नितीन वैद्य यांनी.

एका छोट्याशा खेड्यातलं राजकारण आणि समाजकारण कुठल्या भीषण पातळीवर पोहोचलं आहे, याचं हे भेदक चित्रण आहे. खेड्यातल्या दैनंदिन भाषेतला लहजा सवयीतला नसूनदेखील मनाचा तळ ढवळून काढणारा आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘क्षुधाशांती भुवन’ या कथेचा नायक सिद्दप्पा हा ‘बाहेरचा’ माणूस. वृत्तीनं सरळ. तो फाट्यावर ‘क्षुधाशांती भुवन’ इमानेइतबारे चालवत असतो. गावकरी आणि गावगाडा याबद्दल तो अनभिज्ञ नसतो, पण तो त्यात पडत नाही. आपलं हॉटेल आणि संसार यात तो समाधानी असतो. गावाच्या राजकारणात आणि त्यांच्या परस्परस्पर्धेशी त्याला काही देणंघेणं नसतं. पण तरीही त्या वावटळीत तो स्वत:चं अस्तित्व विरघळवून टाकत पोटाची खळगी भरतो! आपल्या चौकटीत जगण्याची धडपड करतानाही त्याची परवड होतेच. ‘विकास’ या शब्दाभोवती रचलेलं स्वार्थी राजकारण आणि त्यात भरडून निघालेल्या सिद्दप्पाचं सगळं अस्तित्व पणाला लागतं. पण तरीही त्याची शहाणीव कायम राहते. पण त्याचा परिपाक म्हणून पुन्हा एकदा विस्थापित होणं हेच त्याच्या नशिबी येतं. कथा इथं संपते, पण प्रश्न संपत नाहीत...

गावाचा विकास म्हणजे नक्की काय, याबद्दल अनभिज्ञ असणारे गावकरी, त्यांच्यातील परस्पर तणाव, वैर, मानभावी नेतृत्वाचं बोटचेपं पुढारलेपण, हे सगळे म्हणजे ‘क्षुधाशांती भुवन’. सिद्दप्पा कुणाचंच प्रतिनिधित्व करत नाही. हरणारी लढाई लढणाऱ्या वर्गाचा तो फक्त एक चेहरा आहे. जगण्याची धडपड आणि उर्मी हीच या सगळ्या संघर्षात श्रेष्ठ ठरते. त्याचसाठी तो एका भल्या पहाटे त्या विकास-फाट्यापासून स्वत:ची सुटका करून घेतो आणि स्थलांतर करतो.

एक प्रांजळपणे मानावं लागेल की, दुसऱ्या जागेत त्याचं अस्तित्व कसं असणार आहे, किती असणार आहे, असले प्रश्न त्याच्या मनात नाहीत. त्याच्या मनात फक्त वर्तमान आहे. एका अर्थानं हा अत्यंत सोज्वळ, शांतीपूर्ण निर्णय त्याच्यासाठी अनिवार्य असतो. विकासातील लोकशाही व्यवस्थेला अन्य काही पर्याय सापडू नये, याचं वाईट वाटतं आणि आश्चर्यसुद्धा.

ग्रामीण भागातील आजचा सभोवताल कसा भीषण होत चालला आहे, त्याची साठमारी आपण वाचतो, पाहतोदेखील. खरं तर, फारसे तरंग उठतात असंही नाही. तेच काम नेमकं किरण गुरव करतात. एक अस्वस्थ अनुभव देतात. सिद्दप्पा ही वास्तविक आपल्यापैकी कुणाच्याच आयुष्यात आलेली व्यक्ती नाही, आणि तरीही त्याच्याबद्दल कणव निर्माण होते. (अर्थात तो किरण गुरव यांचा हेतू नाही, नसणार.) रात्रभर सगळी आवरवावर करून सिद्दप्पा दिवस उजाडायच्या आत पुढच्या प्रवासाला निघतो. कुठलीही प्रस्थापित व्यवस्था आपल्याला न्याय देऊ शकणार नाही, हे त्याला कळून चुकतं. फाट्यावरचे त्याचं अस्तित्व संपतं. बीभत्स राजकारणात सगळेच मुखवटे आयुष्य विद्रूप करणारे ठरतात. कथेच्या अखेरीस मनात फक्त एक अनागोंद केओस राहतो. तसं पाहिलं तर सिद्दप्पाशी आपलं नातं नाही. पण असं असूनसुद्धा वाचक म्हणून आपण कानशिलाखाली चपराक बसल्यासारखे चिडीचूप होऊन जातो.

ही कथा तशी प्रदीर्घ आहे. अनेक ठिकाणी ती वातावरण जिवंत करणारी दृश्यं शब्दांतून सहज येतात. अगदी कविता वाटतील अशा जिवंत चित्रणामुळे त्यात नादमयता आली आहे! निसर्गाचं वरदान आहे, पण माणसांना त्याचं सोयर नाही आणि सुतकदेखील. पहाटे संवाद करू पाहणारा दयाळ पक्षी सोबत असताना सिद्दप्पा आणि अव्वा लेकराला घेऊन विकास फाटा सोडतात. ते दुसरं काहीच करू शकत नाहीत, ही बोच आपल्या मनात ठेवत कथा संपते.

‘शोध’ ही या संग्रहातील दुसरी कथा. ती सांगण्यात काहीच अर्थ नाही. मला ही कथा बाबू सुताराची की, हुजरे गुरुजींची असा प्रश्न पडला. काही मतभेद, भांडणं होऊन स्वत:च्या शोधार्थ बाहेर पडलेला (आणि आयुष्याची परवड झालेला) बाबू सुतार दिलीपआण्णांना आठवतो, तो येऊ घातलेल्या निवडणुकीमुळे. त्याच्या घराची दोन मतं त्यांना मोलाची असतात. रुसून, भांडण करून गाव सोडून गेलेल्या बाबूला हुडकण्यासाठी ते हुजरे गुरुजींची नेमणूक करतात. अनमानधपक्यानं हुडकत चाललेल्या या शोधाची ही कथा. बाबू हुजरे गुरुजींचा बालमित्र. बाबूचं आयुष्य म्हणजे दुर्दैवाचे दशावतार. शिवाय कायमची अधांतरी अवस्था. विशेष म्हणजे बाबू हा या कथेत प्रत्यक्ष कुठेच येत नाही. मात्र त्याचं अस्तित्व कथेचा एक समांतर प्रवाह होऊन जातो.

गावाचं पुढारपण इतकं बत्थड होत जातं की, ते बेछूटपणे निवडणुकीचा उत्सव करतात. एका पवित्र प्रक्रियेतला हा फोलपणा व्यथित करून टाकतो. शोध-कार्य संपल्यावर आता परतीच्या प्रवासाची घाई. अंधार पडायच्या आत गावात पोहोचलं पाहिजे. बाबूच्या बदल्यात कुणीतरी उभं राहील इतपत खातरजमा करून घेतलेले हुजरे गुरुजी हे विधिनिषेध नसलेलं वास्तव आपल्यापुढे ठेवतात. सर्व गावकऱ्यांना रात्री मटणाच्या जेवणाची पार्टी असते. बाबू आता येणार नसतो. जगाच्या पाठीवर तो लक्तरं पांघरून कुठेतरी हिंडत असेल किंवा नसेलही.

बाबूचं हे वर्तमान त्याच्या भावकीच्या कानावर घालायला पाहिजे, हे हुजरे गुरुजींना आठवतं. हा एक छोटा धागा मला चकित करून गेला. बाबूचं बस्तान नीट करण्यासाठीचे प्रयत्न एकीकडे आणि दुसरीकडे त्याच्या कुलुपबंद खोलीकडे नजर. हा एक तिढा माणसाच्या प्रवृत्तीचं अजब रसायन उलगडणारा  आहे.

किरण गुरव यांनी कसलंही भाष्य न करता एखाद्या चित्रपटासारखी ही कथा आपल्या समोर ठेवली आहे. बाबू समोर न येता हे सगळं घडतं. आपण तोल सांभाळत वाचायचा प्रयत्न करत पुढे जात राहतो.

ग्रामीण जीवनातील कथा आणि माणसं ही परिचयातली नव्हती असं नाही. मात्र त्या बेरकी, इरसाल पात्रातून एक खेळकर अस्तित्व होतं. दुनियादारी होती, पण ती लोभस होती. एक प्रकारचा धोरणी विक्षिप्तपणादेखील पाहिला-वाचला आहे. गावकीच्या प्रतिमेचं बदलत जाणारं वळण लक्षात आलं होतं, पण ते असं विद्रूप कधी आणि कसं झालं, हे कळलं नाही. हा बदल दाखवणारे किरण गुरव हे महत्त्वाचे समकालीन लेखक ठरतात.

या संग्रहातली तिसरी कथा आहे- ‘भिंत’. ही तशी लहान आहे. वाटण्या झालेल्या घरात मधोमध भिंत उभी करण्याच्या घटनेभोवती ही कथा आहे. गावातली तीच कथित पुढारपण करणारी मंडळी. मुळातली दोन विरोधी गटातली तीच तेढ. शामा मानगुंटी आणि त्याचा धाकटा भाऊ यांच्या घरातली नियोजित भिंत उभी करणं हाच जणू त्यांचा कामाचा भाग. संघर्ष टाळायचा म्हणून म्हणा, किंवा पैशाची सवड नाही म्हणून म्हणा, शामा बिचारा गावातल्या पडवीचं दार बंद ठेवून मुकाट्यानं माळावर लांब वस्ती करून गुमान जगत असतो. त्याला इरेला पाडून, ही भिंत उभी करण्याचा एका ग्रुपचा प्रयत्न चाललेला असतो.

संध्याकाळपर्यंत ही भिंत अनेकांच्या पाया पडत, मदत घेत शामा पूर्ण करतो. तो सुस्कारा सोडतो न सोडतो, तोच आणखी एक धुमारा या कथेला फुटतो. कुणीतरी बातमी देतं की, शामानं उभ्या केलेल्या भिंतीला धाकटा त्याच्या बाजूनं सिमेंटचा गिलावा करतोय. ही घटना आक्रीत म्हणून गाजवली जाते. शामा मानगुंटीला उधारीत अडकवणारा मनवरअण्णा म्हणतो, “तू बी कर की गिलावा तुझ्या बाजूनं... होऊन जाऊ दे भिंत दोन्ही बाजूनं पक्की...” बायकोशी बोलत बसलेल्या शामाला यातलं धोरण लक्षात येत नाही. ‘चीन, जरमानी का जपान कुठं तरी लई मोठी भिंत बांधलीय, तशी आपल्या गावात बी बांधाया पायजे…’ असं तो स्वत:शी बडबडतो. त्याच्या बायकोला त्यातलं काहीच समजत नाही. ती फक्त विचारते की, ‘आता आपण काय करायचं?’ इथं ही कथा संपते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नव्या कथेच्या संदर्भात किरण गुरव हे नाव आस्थेनं घेण्यासारखं नक्कीच आहे. समकालीन लेखकांत त्यांच्या नजरेला पडलेलं हे ग्रामीण वास्तव नागरी वाचक कसं घेतील, याबद्दल कुतूहल आहे. या दोन्हीतील सीमा पुसट होत असल्या तरीही! साहित्य निर्मितीचा अवकाश नेहमीच केवळ रंजनाच्या बाहेर असावा. किरण गुरव यांच्यासारखे लेखक ही जाणीव ठेवून लिहितात. लेखकपणाची जबाबदारी जीवनानं त्यांच्यावर टाकली आहे, असं त्यांनी सुचवलं आहेच. तूर्त या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा!

‘क्षुधाशांती भुवन’ - किरण गुरव

शब्द पब्लिकेशन, मुंबई

मूल्य – ३०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......