१.
पुणे-मुंबई ही शहरं अगदी सुरुवातीपासूनच मराठी ग्रंथप्रकाशनाची गंगोत्री राहत आली आहे. त्यातही गेल्या काही वर्षांत पुण्याने पहिल्या नंबरवर आपली मोहोर कायम ठेवली आहे. जवळपास ६० टक्क्यांहून अधिक मराठी प्रकाशन व्यवसाय पुण्यात एकवटलेला आहे. पण त्यात मूळचे पुणेकर प्रकाशक किती? म्हणजे ज्यांचा जन्म पुण्यात झाला आहे किंवा जे वाडवडिलांपासून पुण्यात राहत आले आहेत, असे मराठी प्रकाशक किती? त्यांची संख्या सुरुवातीपासूनच कमी आहे. पुण्यातले एकेकाळचे आणि आजचे आघाडीचे बहुतेक प्रकाशक हे मूळचे पुणेकर नाहीत. ते व्यवसायानिमित्तानं पुण्यात आले. धडपड करत, किडुकमिडूक व्यवसाय वा नोकरी-कामधंदा करत पुण्यात स्थिरावले आणि नंतरच्या काळात प्रकाशक म्हणून नावारूपाला आले. ‘पद्मगंधा प्रकाशना’चे अरुण जाखडे हे त्यापैकीच एक.
जाखडे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या पेडगाव या एका छोट्याशा खेडेगावातले. त्यांचे वडील शेतकरी. लहानपणी त्यांच्या घरी साधे वर्तमानपत्रही येत नसे. जाखडे शिकले. बी.एस्सी.नंतर नगरच्या कायनेटिक इंजिनीअरिंग लि.मध्ये नोकरीला लागले. थोड्या दिवसांनी ड्रिल्को मेटल कार्बाईडसमध्ये गेले. तिथल्या मॅनेजरने त्यांच्यातली चुणूक हेरून त्यांना धातूशास्त्राच्या पुढच्या परीक्षा द्यायल्या सांगितल्या. त्या नगरमध्ये राहून देणं शक्य नव्हतं, म्हणून ते ६ मे १९८२ रोजी पुण्यात आले. बजाज टेम्पोमध्ये नोकरीला लागले. भोसरीला एका चाळीत राहू लागले. वाचनाची-साहित्याची त्यांना आवड होती. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकारी कामगारांसाठी सांस्कृतिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. साहित्य परिषदेची शाखा काढली. साहित्यिक कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे या कामगारांच्या साहित्यप्रेमाला चालना मिळाली. पण त्यांचे साहित्य छापणार कोण, हा प्रश्न होता. त्यातून जाखडेंनी १९८८ साली ‘पद्मगंधा’ हा दिवाळी अंक काढला. तेव्हा खरं तर त्यांना संपादन, अंक मांडणी, मुद्रण, कागद यातली कसलीही माहिती नव्हती. साहित्यप्रेम आणि हौस मात्र दांडगी होती. शिवाय मशिनशी खेळणं हा त्यांच्या कामाचा भाग होता. त्यामुळे कंपनीतून बाहेर पडल्यावर ते मुद्रणालयात जात आणि मुद्रण कसं होतं, ते समजून घेत. १९८९मध्ये छत्रपती संभाजीमहाराजांची त्रिशताब्दी होती. जाखडे यांच्या गावीच संभाजी महाराज व औरंगजेबाची भेट झाली होती. त्यामुळे त्यांना संभाजी महाराजाचा इतिहास बराचसा ठाऊक होता. शिवाय वाचनही होतंच. त्या वर्षी त्यांनी बरीच भाषणं केली. त्या भाषणांचं ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ हे पुस्तक स्वत:च प्रकाशित केलं आणि जाखडे संपादकानंतर लेखकही झाले.
‘पद्मगंधा’मुळे त्यांचा साहित्यिकांशी संबंध येऊ लागला, ओळखी झाल्या. सुरुवातीला ते दिवाळी अंकांतल्याच मजकुराची पुस्तकं प्रकाशित करू लागले. त्यातून त्यांची रुची वाढत गेली आणि १९९६मध्ये त्यांनी डॉ. रा. चिं. ढेरे यांची एकाच वेळी तीन पुस्तकं प्रकाशित करून ‘पद्मगंधा प्रकाशना’ला सुरुवात केली. ढेरेंसारख्या व्रतस्थ संशोधकाची पुस्तकं काढल्यामुळे त्यांच्याकडे पुण्या-मुंबईतल्या साहित्य-जाणकारांचं लक्ष वेधलं गेलं. नोकरी सांभाळून ते पद्मगंधा प्रकाशन पाहू लागले. हळूहळू जम बसू लागला, तसा त्यांनी २०००मध्ये नोकरी सोडून पूर्ण वेळ प्रकाशक होण्याचा निर्णय घेतला.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
गावाकडे असताना, शेती करतानाही जाखडे यांचं संवेदनशील मन लोकजीवन, लोकसंस्कृती न्याहाळत, अनुभवत आणि अभ्यासत होतं. महाविद्यालयीन जीवनात केलेल्या वाचनातून त्यांची साहित्य अभिरुची घडत गेली होती. त्यामुळे लोकसाहित्य, देवताविज्ञान, मिथकं-रूढी-परंपरा जाणून घेण्याची आवड त्यांच्यात निर्माण झाली. या गावानं दिलेल्या संस्कारातून जाखडे यांची जडणघडण झाली होती. त्यांच्या ‘पद्मगंधा’ दिवाळी अंकाचं स्वरूप आणि प्रकाशनसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रकाशित केलेली, लोकसाहित्य, साहित्य-समीक्षा, संदर्भग्रंथ या वाङ्मय प्रकारातली पुस्तकं पाहिली की, त्याचा प्रत्यय येतो. किंबहुना हीच त्यांच्या प्रकाशनसंस्थेची मुख्य ओळख आहे.
रामचंद्र देखणे, निनाद बेडेकर, व्यंकटेश माडगूळकर, रा. चिं. ढेरे, द. दि. पुंडे, कल्याण इनामदार, द. भि. कुलकर्णी, व. दि. कुलकणी, गंगाधर महांबरे, स. रा. गाडगीळ, के. रं. शिरवाडकर, प्रा. रा. ग. जाधव, गणेश देवी, यांच्याशी त्यांचा कामानिमित्त संपर्क आला. या मान्यवर लेखकांनी जाखडेंची तळमळ, सच्चेपणा आणि कष्टाळू वृत्ती पाहून त्यांना खुशीनं आपली पुस्तकं दिली. रविमुकुल हे चित्रकारही सुरुवातीपासून त्यांच्याशी जोडले गेले. ह. वि. मोटे प्रकाशन आणि मौज प्रकाशन गृह ही जाखडे यांची प्रेरणास्थानं बनली. त्यांचा वारसा जाखड्यांनी आपल्या परीनं चालवण्याचा प्रयत्न केला.
२.
जाखड्यांनी सुरुवातीपासूनच गंभीर स्वरूपाचीच पुस्तकं प्रकाशित केली. त्यामुळे मराठी साहित्यातील धुरिणांचं त्यांचं लक्ष वळलं. त्याचाच परिणाम म्हणून अगदी गो. वि. करंदीकरांसारख्या तिरपागड्या स्वभावाच्या लेखकानंही आपलं समीक्षेचं पुस्तक त्यांना सहजपणे दिलं.
रा. चिं. ढेरे यांची संशोधनात्मक पुस्तकं, निवडक र. धों. कर्वे, भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण, श्री. व्यं. केतकरांच्या कादंबऱ्यांचं पुनर्प्रकाशन, अगास्था ख्रिस्ती या लेखिकेच्या अनुवादित पुस्तकांची मालिका, असे विविध प्रकल्प जाखड्यांनी राबवले. गणेश देवी, द. भि. कुलकर्णी, के. रं. शिरवाडकर, रा. ग. जाधव, जर्नादन वाघमारे, रामचंद्र देखणे, गणेश देवी यांची पुस्तकं प्रकाशित केली. रा. चिं. ढेरे यांची तर ‘श्रीनरसिंहोपासना – उदय आणि विकास’, ‘श्रीपर्वताच्या छायेत’, ‘लज्जागौरी’, ‘दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा’, ‘श्रीविठ्ठल – एक महासमन्वय’, ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’, ‘करविरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी’, ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’, ‘लोकदैवतांचे विश्व’, ‘तुळजाभवानी’, ‘लोकसाहित्य – शोध आणि समीक्षा’, ‘मुसलमान मराठी संतकवी’, ‘संत, लोक आणि अभिजन’, ‘श्रीआनंदनायकी’, ‘लोकसंस्कृतीचे उपासक’, अशी विविध पुस्तकं प्रकाशित केली. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, साहित्यसमीक्षा हाच जाखड्यांचा सर्वाधिक आवडीचा विषय होता. या वाङ्मय प्रकारातील नव्या-जुन्या लेखकांची कितीतरी पुस्तकं त्यांनी हौसेनं प्रकाशित केली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कविता, विनोद, कथा, कादंबऱ्या या वाङ्मयप्रकारातील पुस्तकंही प्रकाशित केली, पण ती तुलनेनं कमी म्हणावी अशीच. त्याचप्रमाणे चरित्र-आत्मचरित्र या वाङ्ममय प्रकारातली पुस्तकंही तशी कमीच काढली. उदाहरणार्थ, ज. श्री. टिळक यांचं ‘मी जयंत टिळक’, डॉ. कुमार सप्तर्षी यांचं ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’, राजू शेट्टी यांचं ‘शिवार ते संसद’ अशी मोजकी आत्मकथनपर पुस्तकं दिसतात.
‘प्रतिभा आणि सर्जनशीलता’, राष्ट्र आणि राष्ट्रवाद (सुधाकर देशमुख), ‘हाल सातवाहनाची गाथासप्तशती’ (संपा. स. आ. जोगळेकर), ‘उत्तम मध्यम’ (श्री. बा. जोशी), ‘कार्ल मार्क्स : व्यक्ती आणि विचार’, ‘फ्रेडरिख नित्शे : जीवन आणि तत्त्वज्ञान’ (विश्वास पाटील), ‘मागोवा मिथकांचा’ (सुकन्या आगाशे), ‘दोन फुल एक हाफ’ (तंबी दुराई), ‘मुंगी : अदभुत विश्व’ (प्रदीपकुमार माने) अशी कितीतरी मौलिक पुस्तकंही त्यांनी प्रकाशित केली. अरुण टिकेकर यांच्यावरील गौरवग्रंथ अतिशय देखण्या स्वरूपात प्रकाशित केला.
अनुवादित साहित्यातही जाखड्यांनी तशी फारशी खपावू नसलेलीच पुस्तकं प्रकाशित केली. उदा. सिमॉन द बोव्हुआर यांचं ‘द सेकंड सेक्स’, अल्बेर काम्युचं ‘आऊटसायडर’, गाओ झिंगजिआन यांचं ‘सोल माऊंटन’, जाँ पॉल सार्त्रचं ‘द वर्डस’, टोनी मॉरिसनची ‘बिलिव्हड’, अमिताव गोष यांची ‘सी ऑफ पॉपीज’, जोनाथन गिल हॅरिस यांचं ‘द फर्स्ट फिरंगीज’, एम. जी. लिमये यांचं ‘व्हल्चर्स’, ए. एम. टी. जॅक्सन यांचं ‘कोकणची लोकसंस्कृती’, अॅन फेल्डहाऊस यांचं ‘नदी आणि स्त्रीत्व’, मिनेका इवासाकी यांचं ‘गेशा ऑफ गिओन’, मार्गारेट मिचेल यांचं ‘गॉन विथ द विन्ड’, पॅट्रिक लेव्ही यांचं ‘लिव्हिंग विथ साधुज्’, जॉन गुंथर यांचं ‘डेथ बी नॉट प्राउड’ इ.
३.
२००३ साली म्हणजे अवघ्या सात वर्षांतच पद्मगंधा प्रकाशनाला मुंबई मराठी साहित्य संघातर्फे दिला जाणारा वि. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या प्रकाशनसंस्थेनं २०२०मध्ये रौप्यमहोत्सवी पर्दापण केलं, तेव्हा त्यांना राज्य सरकारतर्फे दिला जाणारा श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कारही मिळाला. त्यानिमित्ताने त्यांची साप्ताहिक साधनाच्या ४ एप्रिल २०२०च्या अंकात सविस्तर मुलाखत प्रकाशित झाली आहे. तिचे शीर्षक आहे – ‘पुरस्कार स्वीकारताना निर्भेळ असा आनंद होत नाही!’. त्यामागची तीन कारणं त्यांनी सांगितली आहेत – “एक- खरं सांगायचं तर आता या व्यवसायातली मजा संपलेली आहे. मी ज्या वेळी या व्यवसायात आलो तेव्हा कमीत कमी दोन वेळची भाकरी तरी मिळेल, याची शाश्वती असायची. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे नव्याने या व्यवसायात येणाऱ्यांची काळजी वाटते. दोन- या व्यवसायातले माझे सर्व सहकारी या ना त्या कारणाने अडचणीत आहेत. आपल्याच व्यवसायातील लोक जर कष्टी असतील, तर तो आनंद निर्भेळ राहत नाही. तीन- ज्याच्यातून काही भलं होईल, असं आता तरी समाजात काही दिसत नाही. अतिशय गांभीर्याने लेखन करणारे संशोधक दुर्मीळ होत चालले आहेत. समाज ग्रंथसन्मुखतेपासून दूर जात आहे. पुढं आशा जिवंत राहाव्यात असा समाजाकडूनही ग्रंथांना प्रतिसाद मिळत नाही.”
‘माझं गाव आणि शेत हीच माझ्या लेखनाची प्रयोगशाळा आहे’, असं जाखडे म्हणत. शेती-मातीशी संबंध नसलेल्या आणि लोकजीवन, लोकसंस्कृती यांच्याशी दुरान्वयानेही संबंध न राहिलेल्या मध्यमवर्गीयांना जाखडे यांच्या पद्मगंधा प्रकाशनाची पुस्तकं विशेष आकर्षित करणारी नव्हती. जाणकारांची दाद किंवा पुरस्कार यांच्यामुळे कुठलाही व्यवसाय किंवा संस्था चालत नाही. त्यासाठी तिला बाजारपेठेतही चांगलं स्थान असावं लागतं. जाखडे प्रकाशित करणारी पुस्तकं चार-दोन अपवाद वगळता काउंटर-सेलला विकली जाणारी नव्हती. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ते ‘जी पुस्तकं घरात असावीत आणि ज्यांचा संदर्भ उपयुक्त ठरावा, अशी पुस्तकं मी प्रकाशित करतो’ असं अभिमानानं सांगत. पण ज्यांचं पोट पुस्तकं शिकवणं-वाचणं यांवर अवलंबून आहे, असा शिक्षकवर्गही सहसा अशा पुस्तकांच्या वाट्याला जात नाही, अशी तऱ्हा आहे. मग सामान्य वाचक अशी संदर्भबहुल पुस्तकं विकत घेऊन घरात कसा ठेवणार आणि त्यांचा दैनंदिन जीवनात उपयोग तरी कसा करणार?
त्यामुळे जाखडे यांना त्यांचे काही समव्यवसायिक आणि ग्रंथव्यवहारातले धुरिण ‘अयशस्वी प्रकाशक’ असंही म्हणत. त्यात जाखडे भेटत तेव्हा पुस्तक विक्रीबाबत तक्रारीच्या सुरात बोलत. पुस्तकांचा खप, विक्रेत्यांकडून होणारी अडवणूक आणि समाजाची उदासीनता, यानेच त्यांच्या बोलण्याचा बहुतांश भाग व्यापलेला असे. त्यामुळे त्यांना ‘रडे प्रकाशक’ असंही म्हटलं जायचं. त्यात सत्यांश नव्हता असं नाही. अलीकडच्या काळात जाखडे यांची सर्वाधिक विकली गेलेली पुस्तकं कुठली, याचं उत्तर आहे अगास्था ख्रिस्ती या लेखिकेच्या रहस्य-गूढ कादंबऱ्यांचे अनुवाद. या प्रकल्पानं जाखड्यांना चांगलाच हात दिला. पण ही काही त्यांची आवड नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प त्यांनी अपरिहार्यतेतूनच राबवला होता, असंच म्हणावं लागेल.
मातीतली माणसं फार चिवट असतात… ते स्वत:ला मातीत गाडून घेतात, स्वत:च्या आयुष्याचीही परवड करतात… पण जे पिकवतात त्याचा लाभ कितीतरी जणांना होतो. जाखड्यांनी मातीतून धान्य पिकवलं आणि पद्मगंधाच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं कितीतरी पुस्तकांचीही निर्मिती केली. भलेही त्यांची प्रसारमाध्यमांनी दखल घेतली नसेल, त्यावर परीक्षणं छापली नसतील, त्यांची विक्रीही खूप झाली नसेल, पण त्यांचं मोल नाकारता येत नाही. ती आज, उद्या आणि परवाही संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरतील, अशीच आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘पद्मगंधा’ हा दिवाळी अंकही जाखडे कायम गंभीर वाङ्मयीन स्वरूपाचाच काढत. त्यांनी कधीच मुखपृष्ठावर मादक, अर्धनग्न वलयांकित ललना छापल्या नाहीत आणि वलयांकित कलावंतांच्या मुलाखती छापून अंकाचा खप वाढवण्याचा प्रयत्नही केला नाही. तरीही ‘पद्मगंधा’ने दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं होतं. त्यामानानं त्यांनी सुरू केलेल्या ‘आरोग्यदर्पण’ या आरोग्यविषयक दिवाळी अंकाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र ‘उत्तम अनुवाद’ या त्यांच्या दिवाळी अंकाला तसा बरा प्रतिसाद मिळाला. केवळ अनुवाद या विषयाला वाहिलेला हा अंक वैशिष्ट्यपूर्ण तर आहेच, पण तो बहुधा मराठीतला अशा स्वरूपाचा एकमेव अंकही आहे.
जाखडे संपादक, प्रकाशक होतेच, पण त्याचबरोबर लेखकही होते. ‘शोधवेडाच्या कथा’, ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’, ‘विश्वरूपी रबर’, ‘प्रयोगशाळेत काम कसे करावे’, ‘लोहमित्र धातू जिंदाबाद’, ‘पावसाचे विज्ञान’, ‘गावमोहर’, ‘एक-एक काडी गवताची’ अशी विविध उपयुक्त व विज्ञानविषयक पुस्तकं त्यांनी लिहिली. त्याचबरोबर उसप्रश्नावर ‘पाचरुट’ ही कादंबरीही लिहिली आहे.
४.
माती आणि नाती यांतच आपलं आतडं गुंतवून टाकलेला जाखडे हा माणूस होता. ज्या हातात रुमणं धरलं, त्याच हातात त्यांनी नंतरच्या काळात पुस्तकं धरली. अगदी शून्यापासून सुरुवात करत, प्रत्येक गोष्ट शिकत त्यांनी पद्मगंधा ही प्रकाशनसंस्था अवघ्या आठ-दहा वर्षांतच नावारूपाला आणली.
पण जाखडे यांना बदलत्या काळाची दिशा ओळखता आली नाही, ही गोष्टही तितकीच खरी. १९९१ साली भारतानं आर्थिक उदारीकरणाचं, म्हणजेच पर्यायानं जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं. त्यानंतर पाच वर्षांनी जाखडे यांनी प्रकाशनसंस्था सुरू केली. पण पुढच्या जवळपास १० वर्षांत जागतिकीकरणानं भारतीयांचं, महाराष्ट्रीयांचं आयुष्य उलटंपालटं करून टाकलं. अमूलाग्र, अभूतपूर्व असे बदल या काळात समाजावर, समाजकारण-राजकारण-साहित्य-संस्कृती-शिक्षण यांच्यावर झाले. माणसांच्या जगण्याचे प्राधान्यक्रम बदलले, नीतीमूल्यांची संकल्पना बदलल्या. बाजारपेठ आणि ग्राहक हाच जणू माणसांचा स्थायीभाव आणि दैनंदिन स्वभाव बनला. शिवाय हे बदल इतके झपाट्यानं होत गेले की, त्यांचा सुगावा लागेपर्यंत आपला भवताल उलटापालटा होत होता. अशा काळात जाखडे लोकसाहित्य, लोकसंस्कृती, साहित्य-समीक्षा, संदर्भग्रंथ अशा विषयांवरील पुस्तकांचाच खटाटोप करत राहिले. हा एक प्रकारे वेडेपणाच होता.
जागतिकीकरणानंतर मराठी ग्रंथव्यवहारात सेल्फ हेल्फ आणि तथाकथित बेस्टसेलर्स पुस्तकांना मोठं महत्त्व आलं. श्रीमंत कसं व्हावं, सीईओ कसं व्हावं, लोकांना कसं जिंकावं, यशस्वी कसं व्हावं, अशा कितीतरी प्रकारच्या पुस्तकांची मागणी वाढलीही आणि लादलीही गेली. आधी आपलं उत्पादन तयार करायचं आणि मग जाहिरात-प्रचार तंत्राचा प्रभावी वापर करून त्याची गरज निर्माण करायची आणि ते विकायचं, असं एक अघोरी तत्त्वज्ञान याच काळात जन्माला आलं. त्यात अनेक मराठी प्रकाशकांनी स्वत:चं चांगभलं करून घेतलं. पण जाखडे या पुस्तकांच्या नादाला लागले नाहीत.
‘समकालीन संस्कृतीचं सुईणपण करण्याचा आनंद मला मिळतो’, ‘मी स्वत:ला पुस्तक प्रकाशक न समजता ग्रंथप्रकाशक समजतो’, ‘शेती आणि प्रकाशन-लेखन यात नवसर्जनाचा आनंद दडलेला आहे’, या जाखडे यांच्या विधानांत बदलत्या वाऱ्याचा दिशा ओळखणारा धागा कुठे दिसतो? कुठेच नाही. दिसते ती फक्त त्यांची ‘एकला चलो रे’ वृत्ती!
याच काळात मराठी ग्रंथव्यवहारातही कितीतरी पडझड झाली. अगदी उदहारणंच सांगायची तर गेल्या काही वर्षांत पुण्यात, डेक्कनचं ‘इंटरनॅशनल बुक डेपो’ बंद झालं. फर्ग्युसन रस्त्यावरील ‘अभिनव बुक सेंटर’ आणि ‘पॉप्युलर बुक हाऊस’ ही पुस्तकांची दोन दुकानं बंद झाली. (इतकंच नव्हे तर ‘ऑक्सफर्ड बुक स्टोअर’ही बंद झालं.) उपेंद्र कुलकर्णी यांच्या निधनानंतर श्रीविद्या ही प्रकाशन संस्था केवळ म्हणायला चालू आहे. कॉन्टिनेन्टलही जेमतेम चालू आहे. देशमुख आणि कंपनी व वरदा प्रकाशन यांचीही तीच गत आहे. प्रेस्टिज प्रकाशन, प्रतिमा प्रकाशन, अस्मिता व रविराज प्रकाशन, व्हिनस प्रकाशन या प्रकाशनसंस्था बंद झाल्यात. संदेश बुक एजन्सी बंद झालीय. याशिवाय छोटी-मोठी किती मुद्रणालयं बंद झाली, याची तर कुणाला खबरबातही नाही.
हे सगळं जाखडे इतर अनेकांप्रमाणे हताशपणे पाहत होते. त्यातून त्यांचा मराठी प्रकाशन-व्यवसायाविषयी भ्रमनिरासच होत गेला. मौलिक पुस्तकांविषयी, अभ्यासपूर्ण संदर्भग्रंथांविषयी, संशोधनातून सिद्ध झालेल्या लेखनाविषयी आणि एकंदर गंभीरपणे लिहिलेल्या पुस्तकांविषयी मराठी माणसांची जी उदासीनता, गेल्या तिसेक वर्षांत सातत्यानं उजागर होत आली आहे, त्याचं त्यांना अतोनात दु:ख होत असे. ते भेटले की, या उदासीनतेविषयी खंतावून बोलत. खंत करणं वेगळं आणि निराश होणं वेगळं. जाखड्यांचा प्रवास अलीकडच्या काळात खंतावण्याकडून निराश होण्याकडे झाला होता.
पाचेक वर्षांपूर्वी म्हणजे २०१६मध्ये पुण्यात भेटले तेव्हा बरंच बोलत होते. अगदी भडभडून आल्यासारखं. मी आता पुण्यात फारसा नसतो, गावी राहून शेती करतो. त्यात मस्त वेळ जातो आणि आनंदही मिळतो, असं काय काय सांगत होते. साधारणपणे याच काळात त्यांना थोडंसं नैराश्यानंही ग्रासलं होतं. तेव्हा त्यांच्या मुलीनं त्यांना ब्लॉग लिहिण्याची कल्पना सुचवली. लेखनावर त्यांचं प्रेम होतंच. त्यामुळे या नव्या माध्यमात ते बऱ्यापैकी रमलेही. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, ते लिहीत राहिले. त्यातून त्यांच्या ‘हुसेनभाई बाताड्या’ या पुस्तकाची निर्मिती झाली. त्याआधी त्यांनी दै. ‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीत ‘इर्जिक’ हे साप्ताहिक सदर सलग दोन वर्षं लिहिलं. त्यातून त्यांच्या वेगळेपणाची, संवेदनशीलतेची, हळवेपणाची, रसिकतेची आणि अभ्यासूपणाचीही ओळख पुन्हा पुन्हा होत राहिली. हे त्यांचं एकमेव पुस्तक जे लोकवाङ्मय गृहानं प्रकाशित केलं. त्याला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारही मिळाला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अरुण जाखडे प्रकाशक म्हणून लोकप्रियता, प्रसिद्धी, स्टॉलवर्डनेस, सेलिब्रेटीनेस यांच्यापासून लांब राहिले. पण त्यांना भ्रमनिरासापासून लांब राहता किंवा स्वत:ला वाचवता आलं नाही. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रंथव्यवहारात प्रकाशनसंस्थांचा अक्षरक्ष: सुळसुळाट झालेला आहे. त्यातल्या किती प्रकाशनसंस्था येत्या २५-३० वर्षांनंतर टिकून राहतील, माहीत नाही. जाखडे यांच्या पद्मगंधा प्रकाशनानं २५ वर्षांत जे स्थान, ओळख मिळवली, ते या नव्या संस्थांना मिळवता येईल की नाही, माहीत नाही. मौज प्रकाशन गृहाच्या कितीतरी पुस्तकांच्या जुन्या माफक किमतीतल्या आवृत्त्या काल-परवापर्यंत पुस्तकांच्या दुकानांच्या कानाकोपऱ्यात धूळ खात पडलेल्या असत. २०-२५ वर्षांपूर्वीची ही पुस्तकं वाचकांना फारशी आकर्षित करत नसत. ह. वि. मोटे यांनीही मोजकीच पुस्तकं काढली. त्यांना त्यांच्या हयातीत फारसं यश मिळालं नाही, असं म्हणतात. पण गेल्या काही वर्षांत त्यांना जाणकारांच्या दृष्टीनं विशेष महत्त्व येत गेलं आहे. जाखडे यांच्यानंतर पद्मगंधा प्रकाशनाचं, दिवाळी अंकाचं काय होईल? ते चालू राहील का? राहिलं तर जाखडे यांनी केली तशी विचक्षण पुस्तकं प्रकाशित होतील का? माहीत नाही. पण जेव्हा केव्हा मराठी प्रकाशन-व्यवसायाचा, त्यातील विचक्षण प्रकाशकांचा आणि त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात जाखडे यांची नोंद ‘एक अवलिया, कल्पक, गंभीर आणि यशाचे धडे न गिरवणारा प्रकाशक’ अशीच करून द्यावी लागेल.
५.
जाखडे हा लिहित्या हाताचा, आपल्यासह आपल्या समव्यावसायिकांचाही विचार करणारा, मनस्वी, पुण्यात राहूनही पुणेरी न झालेला, आपलं गावपण – अगदी थेट सांगायचं तर ‘नगरी’पण शिल्लक ठेवलेला लोभस माणूस होता. त्यांचं बोलणं फटकळ होतं, पण स्वभाव प्रेमळ होता. देशावरच्या लोकांना फणसाची उपमा सहजपणे देता येत नाही, त्यांना उसाचीच उपमा शोभून दिसते. जाखडेही तसेच होते. उसाची दोन-चार कांडकी खाऊन त्याची गोडी नीट कळत नाही आणि रेडिमेड रस पिऊनही त्याची खुमारी कळत नाही. त्यासाठी थेट उसाच्या शेतात जावं. त्याची पाती अंग कापणार नाहीत, याची काळजी घेत चांगला उस निवडावा. तो आपल्या हातांनी तोडून काढावा. त्याचा हिरवागार शेंडा गाईगुरांसमोर टाकावा किंवा त्यांच्यासाठी राखावा. उस गुडघ्यावर दाबून मोडावा आणि मुळाकडचा भाग टाकून द्यावा. आणि मग बांधावर बसून निवांतपणे चिवट्या सोलत तो चावून चावून खावा.
लांबवर पसरलेली हिरवीगार शेतं, वाहणाऱ्या वाऱ्याचा नाद, आसपासच्या झाडांवरचा किलबिलाट, बांधावर पाय पसरून मारलेली बैठक आणि जीभेवर रेंगाळणारी उसाच्या रसाची चव… एखादी गोष्ट मन:पूत अनुभवल्याशिवाय तिचा खरा ‘स्वाद’ कळत नाही. अर्थात त्यासाठी आपल्याला मूळ प्रक्रियेचा भाग व्हावं लागतं, वेळेची गुंतवणूकही करावी लागते.
जाखडे हा माणूस, लेखक आणि प्रकाशकही असाच होता. त्याच्या फार जवळ गेल्याशिवाय किंवा त्याच्याशी नाळ जोडल्याशिवाय तो इतरांना कळत नसे. ज्यांना जाखडे कळले, ते या पुढच्या काळातही कधी त्यांना विसरणार नाहीत… आणि ज्यांना त्यांना प्रत्यक्षपणे जाणून घेता आलं नाही, त्यांना यापुढच्या काळात त्यांनी प्रकाशित केलेल्या कितीतरी मौलिक पुस्तकांतून त्यांची ओळख करून घेता येईल… होत राहील… जाखडे गेले, पण त्यांच्या पद्मगंधा प्रकाशनाचा मराठी ग्रंथव्यवहारावरचा ठसा आणि त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं आज-उद्या आणि परवाही राहतीलच…
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा - अरुण जाखडे : “प्रकाशन व्यवसाय क्रिकेटसारखा आहे. क्रिकेटमध्ये जसं शेवटच्या बॉलपर्यंत काहीही होऊ शकतं, तसंच. पण म्हणूनच त्यात थरारकता आहे, आनंद आहे...”
..................................................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment