साहित्यातील नवनव्या प्रयोगांचे दर्शन पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना घडवणाऱ्या एका ग्रंथप्रेमी व्यक्तीची वाटचाल
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
देवेंद्र शिरुरकर
  • ​​​​​​​‘माझी साहित्यिक जडणघडण’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 21 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस ​​​​​​​माझी साहित्यिक जडणघडण Majhi Sahityik Jadanghadan शंकर सारडा Shankar Sarda

बालपणापासून लागलेली वाचनाची आवड नंतर प्रयत्नपूर्वक जोपासलेली. पत्रकारितेत आल्यावर वाचनात चौफेरपणा आलेला. दै. ‘केसरी’तील उमेदवारीच्या दिवसांत साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी ‘महाराष्ट्र्र साहित्य परिषदे’च्या (मसाप) ग्रंथालयात जाऊन वाचत बसण्याची सवय लागलेली. अशाच एका दिवशी तिथं शंकर सारडा यांची भेट झाली. तशी पत्रकारितेमुळे सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांची भेट व्हायची. नाव, गाव, कुठे काम करतोस, अशी जुजबी ओळख झालेली होती. मराठी समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. मीसुद्धा प्रत्यक्ष भेटीपर्यंत हीच ओळख बाळगून होतो. मसापमध्ये उठबस असणाऱ्या अनेकांना जवळून बघणं, हाही हेतू साध्य व्हायचा. मी बाहेर पडताना शंकर सारडा प्रवेश करताना दिसले. हातात काही फाइल्स व पुस्तकांचा समावेश असलेली बॅग होती. मी वाचायला इथं येतो, हे कळल्यावर त्यांनी चौकशी सुरू केली. इतर भाषेतलं काय वाचलं आहेस? मग चार-पाच लेखकांची नावंही सुचवली. या पहिल्या संवादात सारडा यांनी पत्रकारांनी केवळ मराठीच नव्हे, तर इतर भाषेतले साहित्यप्रकार आवर्जून वाचायला हवेत, असं सांगितलेलं आठवतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

त्यानंतर अधूनमधून भेटी होत होत्या. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांनी प्रकाशित केलेलं ‘माझी साहित्यिक जडणघडण’ हे त्यांचं पुस्तक हाती घेतल्यावर त्या पहिल्या भेटीची आठवण ताजी झाली. या पुस्तकातून सारडा यांची साहित्यातील आणि पत्रकारितेतील वाटचाल समोर येते. बालपणापासून वाचन-लेखनाची आवड असलेले सारडा उद्यमी समूहातून आल्यानं त्यांच्या साहित्यिक वाटचालीबाबत एक कुतूहल असणं स्वाभाविकच आहे. या पुस्तकात त्याचे संदर्भ\उल्लेख आहेत.

साधारणत: किशोरवयातच ज्या वातावरणात ‘भावठाव, मालटाल की होई’चे संस्कार सुरू होत, त्या वयात सारडा यांनी बालसाहित्यिक म्हणून ओळख निर्माण केली. हस्तलिखित मासिक काढण्यापासून ते विविध मासिकांतून कथा छापून यायला लागल्याचं समाधान कशी स्फूर्ती देतं, हे त्यांनी या पुस्तकात नमूद केलं आहे. साहित्य निर्मिती अन ते साहित्य वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठीच्या प्रक्रिया उमगलेल्या सारडा यांनी काही पत्रमैत्रीतून ओळख झालेल्या लेखकमित्रांसोबत (दिनकर देशपांडे, चंद्रकांत शेट्ये) पुस्तकविक्रीचा सहकारी तत्त्वावरील प्रयोगही करून बघितला.

एकीकडे महाविद्यालयीन शिक्षण सुरू करतानाच सारडांनी ‘साधना’ साप्ताहिकात यदुनाथ थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता सुरू केली. अभिप्रायासाठी आलेली पुस्तकं, मासिकं वाचणं, त्यावर परीक्षण, अभिप्राय, छोटे लेख लिहिणं, असं लेखन करायला सुरुवात केली. एक किस्सा त्यांनी सांगितला आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळीच्या काळात रावसाहेब पटवर्धन गुजरात-महाराष्ट्र अशा द्विभाषिक राज्यनिर्मितीला अनुकूल होते. मात्र ‘साधना’च्या विश्वस्तांसह एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते या समाजवादी नेत्यांना रावसाहेबांची ही भूमिका मंजूर नव्हती. त्यामुळे पटवर्धन आणि जावडेकर यांनी ‘साधना’च्या संपादकपदाचा राजीनामा दिला. त्याविषयी सारडा म्हणतात, ‘संपादन करताना अनेकांची मर्जी सांभाळावी लागते. एखाद्याच व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे हवे तसे धोरण राबवता येत नाही. दैनिके, साप्ताहिके चालवणे एका व्यक्तीचे काम नाही, त्यासाठी समविचारी माणसे एकत्र यायला हवीत. आर्थिक जबाबदारीपासून दूर राहून त्यांनी एकूण संपादकीय धोरण राबवायला हवे. त्याचबरोबर वृत्तपत्रांनी आपला वाचक वर्ग कोण आहे, हे भान राखून त्या वाचकवर्गाला झेपतील, रुचतील अशीच धोरणे राबवणे सूज्ञपणाचे ठरते.’ बहुतांशी वृत्तपत्रे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षांचे अजेंडे राबवत असल्याच्या आजच्या काळात वृत्तपत्रांत संपादकीय जबाबदारी पार पाडणाऱ्यांसाठी त्यांचं हे निरीक्षण मार्गदर्शक आहे.

सारडा यांनी कालडी येथील सर्वोदय संमेलनाला दिलेल्या भेटीची एक आठवण सांगितली आहे. महात्मा गांधी यांच्या निधनानंतर भारतभर विखुरलेल्या गांधीवादी कार्यकर्त्यांना विधायक कार्यक्रम हवा म्हणून विनोबा भावे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली सर्वोदय चळवळ सुरू झाली. कालडीत भूदान आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी भूमिहीन मजुरांना आपल्या काही जमिनी दिल्या. या चळवळीबाबत सारडा यांनी केलेलं भाष्य लक्षणीय आहे. ते म्हणतात, ‘एकीकडे खेडोपाडी बांधावरच्या झाडांसाठी कोर्टकचेऱ्या करणाऱ्या अन एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या भावाभावांचे वास्तव अन दुसरीकडे हे दातृत्व यांचा मेळ घालणे अवघड होते. लोकांचा हा कणव किती काळ टिकून राहील, याबाबतची साशंकता तेव्हाही मोठ्या प्रमाणात होतीच. भूदानात देण्यात आलेल्या जमिनी खडकाळ व नापीक होत्या.’

याबाबतची आपली मतं सारडा यांनी थत्ते यांच्यासमोर बोलून दाखवली. त्यावर त्यांनी त्यांना अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या प्रेरणेने सुरू असलेले ओरिसातील कोरापुट येथील आदिवासी भागातले काम पाहण्याचा सल्ला दिला. सारडा यांनी कार्यकर्त्यांसोबत त्या गावांना भेटी दिल्या. स्थानिक आदिवासींची जीवनशैली अभ्यासली. त्याबाबतच्या अभ्यासपूर्ण पुस्तकांचाही धांडोळा घेतला.

त्या ग्रामस्थांचे जे प्रश्न आहेत, ते आपल्या सर्वच ग्रामीण भागाचे प्रश्न आहेत. लोकांना पुरेशी शेतीवाडी नाही, अवर्षण आणि अतिवृष्टी यामुळे पिकांची शाश्वती नाही, नियमित रोजगार नाही, उत्पन्न नाही, शिक्षणाची सोय नाही, महुआची दारू करून ती पित बसणं, हा या पुरुषांचा उद्योग अन महिला जंगलात हिंडून लाकूडफाटा, सरपण गोळा करतात. त्यातून मिळेल ते खाद्यपदार्थ खाऊन कुटुंब चालवतात. सर्वोदय योजनेतर्फे अन्नधान्याचा मोफत व मुबलक पुरवठा सुरू झाला अन हे लोक आणखीच आळशी बनले, असं सारडा यांनी म्हटलं आहे.

मराठीतील प्रथितयश साहित्यिकांच्या साहित्यप्रकारांसोबतच अन्य भाषेतील साहित्याचा तौलनिक अभ्यास करताना साहित्यातील बदलते प्रवाह आणि हे प्रवाह येत असताना त्याबद्दलच्या प्रस्थापित वर्गाच्या प्रतिक्रियाही सारडा यांनी नेमकेपणाने समोर ठेवल्या आहेत. हे जे नवसाहित्यामध्ये प्रयोग चालू होते, त्याची दखल त्या वेळी विद्यापीठ पातळीवर घेतली जात नव्हती. कथा म्हणजे गाठ-निरगाठ, कमी पात्रे व प्रसंग असणारी रचना वगैरे ढोबळ व्याख्या, या नवीन साहित्याच्या आकलनाला पर्याप्त नाहीत, असं जाणवत होतं. कादंबरी असो, कथा असो वा वैचारिक लेखन, त्याचं आकलन करण्यासाठी सारांश, प्रतिपादन, उद्दिष्ट आणि त्यावर भाष्य, अशा चार मुद्द्यांच्या पलीकडे जायला तेव्हाचे साहित्यिक वा विद्ववतजन तयार नव्हते, असं सारडा यांनी लिहिलं आहे.

मुंबई विद्यापीठात इंग्लिश विषय घेऊन एम.ए.चा अभ्यास करताना टी. एस. एलियट, पाउंड यांची पुस्तकं अभ्यासल्यावर मर्ढेकर, गाडगीळ, सदानंद रेगे, विंदा करंदीकर, वा. ल. कुलकर्णी वगैरेंची मतं समजावून घेणं सोपं गेलं. हॉपकिन्स, इ. इ. कमिंग्ज वगैरे आधुनिक कवींच्या कविता जाणीवांच्या कक्षा आणि शाब्दिक प्रयोग, प्रतिमा आणि प्रतीकं यांच्या नव्या शक्यता प्रकट करणाऱ्या होत्या. इंग्लिश भाषेची वेगवेगळी रूपं आणि त्यांची अर्थवाहकता चकित करून सोडणारी होती. इलियट आणि पाउंड यांनी वेगवेगळ्या भाषांतील आणि संस्कृतीतील प्रतिमा आणि प्रतीकं घेऊन आशयाला विश्वात्मक पातळीवर नेता येतं, याकडे लक्ष गेल्याचं सारडा सांगतात.

दिल्लीत आयोजित टॉलस्टॉयच्या जीवनावर आधारित तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये सहभागी होण्याचा योग आपल्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन घडवणारा ठरल्याचं कबूल करताना सारडा यांनी साहित्यक्षेत्र हे खूप व्यापक आहे, त्याला देश आणि भाषेच्या मर्यादा असतातच; पण त्यांचाही अभ्यास असायला हवा, तरच आपलं साहित्याचं आकलन वस्तुनिष्ठ व सर्वस्पर्शी होऊ शकेल, हे मनावर बिंबल्याचं नमूद केलं आहे.

हा नवा दृष्टीकोन घेऊन पत्रकारितेसाठी दिल्लीत दाखल होण्याच्या प्रयत्नात सारडा ‘महाराष्ट्र टाईम्स’ या टाइम्स ग्रुपच्या मराठी दैनिकात रुजू झाले. संपादक द्वा. भ. कर्णिक यांनी सोपवलेली रविवार पुरवणीची जबाबदारी त्यांनी मोठ्या आत्मीयतेनं पार पाडली. या पुरवणीत सारडा यांनी वाचकांना अपेक्षित असे नवसाहित्याचं दर्शन घडवण्यासाठी जीव ओतला. त्यामुळे ही पुरवणी लोकप्रिय ठरायला लागली. मटातील कारकीर्द फुलत असतानाच सारडा यांची हॉवर्ड विद्यापीठात वृत्तपत्र व्यवसायासाठीच्या निमन फेलोशिपसाठी निवड झाली. त्यादरम्यानचे अनुभव कथन करतानाही सारडा यांनी व्यावसायिक पत्रकारितेतील नीतीमत्तेसह विविध ठिकाणच्या साहित्यविषयक घटनांचाही आढावा घेतला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अमेरिकेतून परतल्यावर सारडा यांनी पुन्हा कर्णिक यांच्याकडे ‘महाराष्ट्र्र टाइम्स’च्या पुरवणीत काम करण्याची मनीषा व्यक्त केली. अमेरिकेतील पुरवण्यांच्या तुलनात्मक अभ्यास केल्यावर काही नवे, कल्पक प्रयोग राबवण्याची तयारी घेऊन सारडा मटामध्ये रुजू होणार होते, मात्र त्यांना मटाचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी पार पडल्यानंतर सारडा यांचं वाचकांना साहित्यातील नव्या प्रयोगांचे दर्शन घडवणं, विविध भाषेतील पुस्तकं व लेखकांच्या दुनियेची सफर घडवून आणणं सुरूच होतं. दिल्लीतील विशेष प्रतिनिधीपदापर्यंतच्या वाटचालीपर्यंतचा प्रवास या पुस्तकात आहे.

थोडक्यात, ही साहित्यातील नवनव्या प्रयोगांचं दर्शन पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना घडवणाऱ्या एका ग्रंथप्रेमी व्यक्तीची वाटचाल आहे. त्यामुळे ती रोचक, वाचनीय आहे, अपूर्ण असली तरी.

‘माझी साहित्यिक जडणघडण’ – शंकर सारडा

प्रकाशक -आनंद शंकर सारडा, पुणे

पाने- ९५

मूल्य - दिलेले नाही

..................................................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......