अजूनकाही
मराठी विज्ञानकथेत अलीकडे अनेक नावीन्यपूर्ण विषय येत आहेत. ‘डायनोसारचे वंशज’ या समकालीन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला दिनानाथ मनोहर यांच्या नव्या विज्ञानकथासंग्रहात हेच वैशिष्ट्य पहिल्यांदा मनावर ठसतं. ‘अखेर’ या कथेतला पशुपालनासारखा विषय असो, की ‘आवाज की दुनिया से दूर’मधलं ध्वनीशास्त्र, लेखक निरनिराळ्या संकल्पना सफाईनं हाताळताना दिसतात.
मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे या कथांचं मर्म विज्ञान असलं तरी त्या माणसांभोवती फिरतात. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ अगदी बारकाईनं पाहिलं तर त्यातूनही हेच ठळकपणे अधोरेखित होतं. त्यांनी संग्रहाची कळ अचूक पकडली आहे आणि तितक्याच ताकदीनं मांडली आहे. मानवी भावभावना आणि रंगांचा मूलभूत संबंध या ज्येष्ठ कलाकारांच्या रंगांच्या निवडीवरून प्रभावीपणे जाणवतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
रोजच्या आयुष्यातले छोटे, साधे अनुभव पाहता पाहता अनपेक्षित दिशेने घेऊन जातात, अशी मनोहरांची शैली असल्यामं कथा अत्यंत वाचनीय होतात. ‘तिळा उघड’ ही या संग्रहातली कथा सुरू होते, एका रहस्यमय अपघाती जागेवरून. पुढे गूढ उकलता उकलता ती अनेक रोमांचक वळणं घेत जाते. विज्ञान आणि लेखनातलं लालित्य यांचा इथे सुरेख मेळ जमला आहे.
हवामान बदल हा आपल्या आयुष्यावर खूप खोल आणि दीर्घकालीन परिणाम करणारा विषय. त्यामुळे साहित्यात पर्यावरणाशी संबंधित क्लायमेट फिक्शन दिसायला लागलं तर नवल नाही. सोबत विज्ञानकथा म्हटली की, आजची परिस्थिती भविष्यात प्रक्षेपण करून मांडलेली दिसते. हे भविष्य आशादायक आहे की, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं, हे शेवटी आपल्या आजच्या वागण्यावरच अवलंबून असतं. ‘हिरव्याकंच वृक्षराजीच्या साम्राज्यात’ ही विज्ञानकथा मात्र या विषयाला उत्तम कलाटणी देते. विज्ञान-तंत्रज्ञान एका हातानं देत असताना दुसर्या हातानं काढून घेतं का, असा विचार करायला प्रवृत्त करते.
‘अखेर’ या कथेतली मध्यवर्ती व्यक्तिरेखा समर्थपणे उभी राहिलेली आहे. तिचे मनोव्यापार, त्याच वेळी फार्मवरच्या तिच्या संशोधनातले टप्पे, आणि दुसरं समांतर कथानक असे अनोखे धागे कथेत सुरेखपणे गुंफलेले आहेत. शीर्षकाप्रमाणे कथेची अखेर हाच तिचा झपाटणारा उत्कर्षबिंदू आहे.
जुन्या मित्राला भेटण्यावरून सुरुवात झालेली ‘डायनोसारचे वंशज’ ही कथा शीर्षकाप्रमाणे डायनोसारच्या वंशजांपर्यंत घेऊन जाते. त्यात वेगवेगळ्या बाजूंनी केलेली वैज्ञानिक चर्चा आणि अखेरचा धक्का नक्कीच अंतर्मुख करणारा आहे. आपल्या आयुष्यात विज्ञानाचं आणि विज्ञानात आपल्या आयुष्याचं नक्की काय स्थान आहे, हे पुन्हा एकदा पारखून पाहायला लावणारा आहे.
‘संस्कार’ ही या संग्रहातली कथा रूढार्थानं विज्ञानकथा म्हणता येणार नाही. पण तिच्यात मांडलेलं संशोधकांचं जग अवास्तव न वाटता अतिशय खरंखुरं वाटणारं आहे. कथेचा शेवट एका जळजळीत झटक्यावर येतो, तेव्हा कथा वेगळ्या उंचीवर जाते, असं निश्चितच म्हणता येईल.
दिवसाला अकरा तासांपर्यंतचा काळ आपण स्क्रीनसोबत घालवतो, अशी आकडेवारी आहे. आपल्या आयुष्यात आज स्क्रीनचं महत्त्व इतकं असताना, या माध्यमाचा वापर कोणत्या तर्हेनं होऊ शकतो, याची एक अनवट कल्पना ‘स्क्रीन कॉनटॅक्ट’मध्ये आहे. एका एका प्रसंगातून कथानक अलगदपणे उलगडत जाते, तेव्हा आपणही नकळत त्या शोधयात्रेत सामील होतो. इतिहासात गडप झालेल्या संस्कृतीचे संदर्भ उत्तम प्रकारे आल्यानं कथा रंजक झाली आहे.
‘अवघे धरू सुपंथ’ ही कथा विविध पातळ्यांवर आपल्याला विचार करायला लावते. मेंदूची क्षमता वाढवत गेल्यावर पुढे काय, हा प्रश्न मनोहर यांनी कित्येक पैलूंनी तपासून पाहिलाय. यातलं पात्ररेखाटन उत्कृष्ट असल्यानं ही कथा सर्वार्थां मनात घर करून राहते.
‘आवाज की दुनिया से दूर’ ही थोडीशी हलकीफुलकी कथा आहे. सत्तरीतल्या नायकाला अचानक नवीन काही गवसलेलं, तेही त्याचा नजरेतून अनुभवताना आपण नक्कीच रंगून जातो. तर एका अचंबित करणार्या लँडस्लाइडची कहाणी ‘अस्तंभ्याची ढाल’ या दीर्घकथेत आहे. सहसा न दिसणार्या अस्सल आदिवासी पार्श्वभूमीमुळे कथा खूप छान फुलते. त्यातली पात्रंही बरीच वेगळ्या प्रकारची आहेत. वरवर विचित्र वाटणार्या घटनांची तर्काधारित संगती लावण्यात लेखक यशस्वी झाले आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आजच्या आणि येत्या काळातल्या अनेक शक्यता खुलवून दाखवताना ‘डायनोसारचे वंशज’ या विज्ञानकथा संग्रहात मनोहरांच्या प्रतिभेची झेप उत्तम प्रकारे प्रतिबिंबित झाली आहे.
‘डायनोसारचे वंशज’ - दिनानाथ मनोहर
समकालीन प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ - चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठसंख्या - १८४
मूल्य – २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment