अजूनकाही
फिरत्या चाकावर मातीच्या गोळ्यातून मडकं घडत असताना चाकावरून ते मडकं काढून घ्यायचा, तो नेमका क्षण कुंभाराला कळतो. मडकं बनवायला माती कोणती घ्यावी, कशी चाळावी, माती आणि पाण्याचे प्रमाण किती हवं, किती घट्ट आणि मऊ हवं, मडकं बनल्यावर नेमकं किती भाजावं, या सगळ्याचा विचार डोक्यात पक्का असल्याशिवाय मडकं बनत नाही. आणि आपण एक सुबक मडकं हातात घेतल्यावर मडक्याच्या निर्मात्याचा विचार आपल्याला जाणवतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
‘घे रे हे सर्क्युलर. त्यात कथेतला विचार मांडलाय’, असं परिपत्रक कोणी काढत नसतं. आणि समजा एखाद्याला असं वाटलं की, आपण एक उभा पोकळ आकार तयार करू. त्याची एक बाजू बंद करू. तो झाला तळ. म्हणजे खालची बाजू. आणि वरची उघडी बाजू. त्याला तोंड म्हणू. आता या भांड्याची उंची बऱ्यापैकी वाढवू. त्याचं तोंडही खूप रूंद करू. त्याप्रमाणात तळ मोठा होईलच. त्या आकाराला रंगीत बनवू. उंच झाल्यानं त्याला मस्त कडी लावू. याला म्हणतात बादली. बादली बनवणाऱ्या त्या एखाद्याला वाटेल की, मडक्याचे सगळे घटक आलेत की यात. तोंड उघडं आहे. तळ बंद आहे. सगळ्या बाजूंनी बंदिस्त आहे. आणि दोघांचाही आतला अवकाश वाटल्यास बंदिस्त करता येतो. आणि तो म्हणेल बादली मडक्यावरच आधारीत आहे.
जयंत पवारांची एक कथा आहे- ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’. भलं मोठं मालवणी भाषेतलं शीर्षक असलेली ही कथा वाचकांना आतपर्यंत चिरत जाते. दारू अड्ड्याच्या बाहेर उकडलेली अंडी विकणारी म्हातारी बय आणि तिचा शाळेत जाण्याच्या वयातला नातू डिगंबर यांच्यापासून कथा सुरू होते. डिगंबर म्हणजे दिग्याला सांभाळताना बयच्या अडचणी, तडजोडी आणि तिचे हाल कथेत पसरत जातात, तसतसे एकेक पात्र कथेत येऊ लागतं.
गिरणीसंपातून उरलेला आसपासचा सगळा गिरणगाव हताश आणि हतबल आहे. जेमतेम रोजचा दिवस ढकलला जातोय. अख्ख्या जगण्याचा विचार शे-पाचशेत करणाऱ्या, एकमेकाला धरून जगणाऱ्या किडूकमिडूक माणसांच्या जगण्यात प्रचंड उलथापालथ होते. चाळींचा पुनर्विकास होणार असतो. एकेक खुराड्याच्या आकाराच्या खोलीची किंमत कोटीत जाते. स्थानिक गुंडांपासून नातेवाईकांपर्यंत सगळे जण चुसायला सुरुवात करतात. म्हाताऱ्या बयच्या अडचणी वाढत जातात. दिग्या पतंग आणि भुतांच्या विश्वात रमलाय, बाहेरच्या ताणतणावांपासून कोसो दूर आहे. सगळं जग विस्कटतं. नातेसंबध बदलतात. जगण्याच्या पार चिंध्या होतात. कथा फक्त बय आणि दिग्याची राहत नाही.
या कथेवर आधारीत ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’. हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर. या सिनेमात दीड तासात दहा खून आणि एक अपघाती मृत्यु आहे (मराठी चित्रपटातील हा एक रेकॉर्ड असू शकेल). यापैकी सात खून दोन मुले करतात. यापैकी एक मुलगा आणि प्रौढ स्त्री यांच्या लैंगिक संबंधावर बऱ्यापैकी वेळ खर्च केला आहे. या सगळ्या घटकांच्या मंथनातून मायनर मुलांचा क्राईम, सेक्स आणि ‘बाप के खून का बदला’ या फॉरम्युल्यातील प्रेक्षकखेचक खिचडी बनवण्याचा हा उपक्रम आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
समजा हेच सगळे घटक घेऊन जयंत पवारांची कथा न वापरता प्रेक्षकखेचक सिनेमा बनवला असता, तर कदाचित एक चांगली ‘ज्युवेनाईल सेक्स क्राईम’ पटकथा तयार झाली असती. सेक्स क्राईम सिनेमा प्रकाराला एक वेगळे परिमाण लाभले असते. कदाचित फेस्टिवलमध्ये बक्षीसही मिळाले असते.
जयंत पवारांच्या कथेत एकही खून नाही की, सेक्सचा सुळसुळाट नाही. कथेत कारुण्याचा रंग गडद होत जातो. कथा संपायच्या आत दिग्याला लवकरच वस्तुस्थिती कळावी, तो बालजगातून बाहेर यावा, असं वाचकाला वाटू लागतं. आज गिरणगाव जात्यात आहे, तुम्ही सुपात आहात, ही जाणीव वाचकांपर्यंत पोचवण्यात जयंत पवार यशस्वी झाले आहेत. सिनेमात नेमकी हीच गोची होते. सिनेमात कथानक पुढे सरकवण्यासाठी कथेतील प्रसंग वापरले जातात. गरिबी, गिरणीसंप हे तोंडी लावण्यापुरते असतात, तर प्रसंगातून निर्माण होणारं कारुण्य चवीपुरतं येतं.
इथे गोंधळ सुरू होतो. गोष्ट गिरणगावाची न बनता गोष्टीचा केंद्रबिंदू डिगंबरचे लैंगिक आणि गुन्हेगारी जीवन हा होतो. त्यात पुन्हा ‘जो विषय महत्त्वाचा तो अधिक भडकपणे मांडावा’ ही दिग्दर्शकांची भूमिका आहे. कथेतल्या आणि सिनेमातल्या पात्रांची नावे तीच आहेत. कथेत मालवणी भाषा आहे. सिनेमातही मालवणी भाषा आणि तिच्या शिवराळ अंगाचा समयोचित वापर केला आहे. कथेमधील बहुतेक सगळे प्रसंग सिनेमात आहेत. मात्र बादली बनवताना घेतलेले स्वातंत्र्य म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी किंवा माध्यमांतर नव्हे.
जयंत पवारांना आपण कथा का लिहितोय आणि आपल्याला काय सांगायचं आहे, हे नेमके माहीत होते, हे कथा वाचल्यावर कळते. मांजरेकरांना बनवायची होती, ज्युवेनाईल सेक्स क्राईम फिल्म... आणि त्यांनी आधार घेतला जयंत पवारांच्या कथेचा. त्यामुळे कथेपेक्षा इतर प्रसंग वाढवण्यावाचून गत्यंतर नव्हते. पात्रांची नावं आणि परिस्थिती सेम ठेवून व्यक्तिमत्त्वे बदलायला लागली. तरीही प्रसंगातून गिरणगावाची वेदना पाझरत राहिली.
मग मांजरेकरांनी ज्युवेनाईल सेक्स क्राईम स्टोरीची गिरणगावच्या वेदनेशी गाठ मारायचा प्रयत्न केला आणि सिनेमाचा फोकस बाराच्या भावात गेला. सेक्स क्राईम सिनेमामध्ये ज्युवेनाईल सेक्स क्राईम सिनेमाचे नवीन दालन उघडण्याचा मांजरेकरांचा मान हुकला.
म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की, बादलीचा विचार डोक्यात ठेवून सुबक मडकं हाती घेऊ नये!
..................................................................................................................................................................
लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.
vtambe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment