आपल्या आजुबाजूला असे अनेक ‘प्रेरणा’ आणि ‘सिद्धार्थ’ आढळतात. म्हणून ‘चेफेड’ हे आजचं नाटक आहे…
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘चेफेड’ या नाटकातील दोन प्रसंग
  • Wed , 19 January 2022
  • कला-संस्कृती नाटकबिटक चेफेड CHAFED सनी शर्मा Sunny Sharma ग्लेन हेडन Glenn Hayden लिव्ह‐इन Live-in

मार्च २०२०मध्ये करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि जगातल्या अनेक देशांप्रमाणे आपल्याही देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. अक्षरश: सर्व व्यवहार बंद झाले. यात नाटक‚ सिनेमा‚ क्रीडास्पर्धा वगैरे करमणुकीची क्षेत्रंसुद्धा बंद झाली. मागच्या वर्षाच्या शेवटी शेवटी करमणूक क्षेत्र थोडंथोडं करोनो नियमांचं पालन करत सुरू झालं. त्यामुळे मुंबईत महालक्ष्मीच्या ‘जी 5 ए’ या छोट्याश्या ब्लॅक बॉक्स थिएटरमध्ये ‘चेफड’ हे इंग्रजी नाटक बघण्याची संधी मिळाली. हे नाटक स्पीड‐प्ले या नुकत्याच स्थापन झालेल्या नाट्यसंस्थेद्वारे सादर करण्यात आलं.

सुमारे दीडतास चाललेल्या या नाटकात इनमीन चार पात्रं आहेत. दोन तरुण पुरुष आणि दोन तरुणी. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं दिग्दर्शन ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक ग्लेन हेडन यांनी केलं आहे. ते गेली चार दशकं जगातल्या अनेक देशांतील रंगभूमींवर वावरत आहेत. २०१४ साली मिळालेल्या एका शिष्यवृत्तीचा भाग म्हणून ते मुंबईला आले. तेव्हापासून मुंबई हे त्यांचं दुसरं घर झालं आहे. ते वर्षांतील अनेक आठवडे मुंबईत असतात, आणि इथल्या इंग्रजी रंगभूमीवर काम करतात. त्याचाच एक भाग म्हणजे या नाटकाचं त्यांनी केलेलं दिग्दर्शन.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हे नाटक सनी शर्मा या तरुण नाटककारानं लिहिलं आहे आणि यात त्याची प्रमुख भूमिकाही आहे. हे अनेक अर्थानं ‘आजचं’ नाटक आहे. पहिली बाब म्हणजे यातून हिंदी चित्रपटसृष्टीत करिअर करणाऱ्या होतकरू नट-नटींचं जग रंगभूमीवर आलं आहे. दुसरं म्हणजे यात ‘लिव्ह‐इन’ नात्यामध्ये गेली काही वर्षं असलेलं तरुण दाम्पत्य आहे. त्यामुळे हे नाटक बघताना अमिताभ‐जया यांचा ‘अभिमान’ आणि आमीर खान‐मनिषा कोईराला यांचा ‘अकेले हम अकेले तुम’ हे हिंदी चित्रपट आठवतात. त्याचप्रमाणे डस्टीन हॉफमन आणि मेरील स्ट्रीप यांचा ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर’ (१९७९) हा हॉलिवुडपटही आठवतो.

प्रेरणा (गरिमा याज्ञिक) आणि सिद्धार्थ (सनी शर्मा) गेल्या सात-आठ वर्षांपासून ‘लिव्ह‐इन’मध्ये राहत आहेत. प्रेरणाचं करिअर फारसं सुरू झालेलं नसतं. त्यामानानं सिद्धार्थचं बरं चाललेलं असतं. सिद्धार्थच्या नकळत प्रेरणा शैशा (अनुषा शेट्टी) या मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेत असते. शैशा प्रेरणाच्या लक्षात आणू देते की, तुझा मित्र सिद्धार्थ हाच तुझा खरा शत्रू आहे. तो प्रत्येक वेळी ‘तू कशी बिनकामाची आहे… तुला कसं काहीही येत नाही… मी जर तुझ्या जीवनात नसतो तर तुझं कसं झालं असतं’ वगैरे जाणवून देत असतो. त्यामुळे प्रेरणा आत्मविश्वास गमावून बसलेली असते.

नाटकाची सुरुवात होते, तेव्हा प्रेरणा एका निर्मात्याकडे स्क्रीन टेस्टसाठी गेलेली असते. तिथं दिलेले संवाद तिला काही केल्या आठवत नाहीत. ती विनंती करून दोन-तीनदा स्क्रीन टेस्ट देते, पण एकदाही तिला दिलेले संवाद आठवत नाहीत. विमनस्क स्थितीत प्रेरणा मानसोपचारतज्ज्ञ‚ शैशाकडे जाते. शैशा तिला ‘तू सिद्धार्थला सोडून दे… तो तुला कधीही वर येऊ देणार नाही… त्याचा स्वभाव अतिशय आक्रमक आहे… त्याने इतक्या वर्षांत कळत‐नकळत तुझं मानसिक खच्चीकरण केलंहे… तुला जर आयुष्यात काही करायचं असेल तर तुला त्याला सोडलंच पाहिजे वगैरे सल्ला देते. एवढंच नव्हे तर लवकरात लवकर तू त्याला सोड, असाही आग्रह धरते.

यामुळे पहिल्या आठ-दहा मिनिटांतच प्रेक्षकांना नाटकाचा अंदाज येतो आणि सुरुवातीच्या दृश्यात प्रेरणा स्क्रीन टेस्ट का योग्य प्रकारे देऊ शकली नाही‚ हेही उमगतं. प्रेरणा एका निर्धारानेच घरी येते. पण सिद्धार्थ समोर आला की, तिचं सर्व अवसान गळून पडतं. नंतरच्या दृश्यात सिद्धार्थ चित्रपटसॄष्टीत यशस्वी होताना दाखवला आहे. लवकरच त्याला एक मोठी भूमिका मिळणार असते. काँटॅक्टस वाढवण्यासाठी त्याला एक-दोन पार्ट्यांना जावं लागणार असतं… यातून प्रेक्षकांना त्या दोघांच्या नात्याचं आजचं स्वरूप लक्षात येतं.

याचा अर्थ सिद्धार्थ खलनायक आहे‚ असं मात्र नाही. हे आशयातील नावीन्य आहे‚ हा ‘आजचा’ आशय आहे. पारंपरिक नाटकांत जसा खलनायक असतो आणि त्याचा नायनाट होणं‚ ही नाटकाची गरज ठरते; तसं ‘चेफड’मध्ये नाही. इथं असं दिसतं की, दोन वेगळ्या स्वभावाच्या‚ वेगळ्या मानसिक शक्तीच्या व्यक्ती एकत्र राहत आहेत, ज्यांच्या करिअरचं क्षेत्र एकच आहे. परिणामी आपोआपच एका व्यक्तीचं यश दुसऱ्या व्यक्तीचं अपयश‚ असं होत जातं. नाटककारानं फार खुबीनं सिद्धार्थ कसा प्रेरणाची काळजी घेतो, तिने वेळेत औषधं घेतली आहेत की नाही, याची व्यवस्था करतो वगैरे दाखवल्यामुळे प्रेक्षक नाटकांत गुंतत जातात.

सिद्धार्थ समोर आला की, प्रेरणा त्याला स्पष्ट सांगू शकणार नाही याचा अंदाज आल्यामुळे शैशा तिच्या घरी येते. रंगमंचावर तिन्ही पात्रं असलेला एक मोठा प्रसंग नाटककारानं लिहिल्यामुळे तिघांतील ताणतणाव प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचतात. शैशा सिद्धार्थला समजून सांगते की, ‘तुझ्यामुळे प्रेरणाचा आत्मविश्वास गेलेला आहे. तू एक नंबरचा स्वार्थी आहेस. तू फक्त स्वत:च्या करिअरचा विचार करतोस वगैरे वगैरे’. हे आरोप ऐकून तो सुरुवातीला थक्क होतो आणि नंतर चिडतो. जमेल तसं स्वत:च्या वागण्याचं समर्थन करतो‚ जे त्याच्या दृष्टीनं योग्यही असतं. मधल्यामध्ये कुचंबणा मात्र प्रेरणाची होते. तिच्या लक्षात येतं की, जर सिद्धार्थबरोबर राहिली तर ती आयुष्यात काहीही करू शकणार नाही. त्याला सोडलंच पाहिजे. मात्र ती सुरुवातीला तशी हिंमत करू शकत नाही.

यातलं दुसरं पुरुष पात्र म्हणजे सिद्धार्थचा भाचा आरव (समय सिंग). त्यालासुद्धा हिंदी चित्रपटसॄष्टीत करिअर करायचं असतं. या आरवमुळे रंगमंचावर थोडा ‘कॉमिक रिलीफ’ निर्माण होतो, एवढाच काय तो या पात्राचा उपयोग. खरं नाटक प्रेरणा आणि सिद्धार्थ या दोघांचंच आहे. मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत असलेली शैशा फक्त समुपदेशनाचं काम करते. शेवटी प्रत्येकाची लढाई प्रत्येकालाच लढावी लागते.

हे नाटक कमालीचं परिणामकारक आहे. याचं श्रेय जसं सनी शर्माच्या जबरदस्त संहितेला आहे, तसंच ग्लेन हेडन या अनुभवी दिग्दर्शकालाही. विशेष म्हणजे सन्नीचं हे पहिलंच नाटक. ते कोठेही मेलोट्रॅमॅटिक होणार नाही‚ याची पुरेपूर काळजी त्याने घेतली आहे. संवाद कमालीचे प्रभावी आहेत. डायना कामदुकने केलेलं नेपथ्य ‘जी 5 ए’सारख्या छोट्या नाटयगृहाला साजेसं आहे. रंगमंचाचा बराच भाग सिद्धार्थच्या घरातल्या हॉलने व्यापलेला आहे, तर डाव्या कोपऱ्यात त्यांची छोटीशी बेडरूम आहे. मध्ये लाकडी दार न वापरता डायनाने झिरझिरीत पडदा वापरला आहे. त्यामुळे बेडरूममध्ये होणाऱ्या हालचाली प्रेक्षकांना दिसतात. यामुळे सर्व नाटक प्रेक्षकांसमोर घडतं. यात प्रकाशयोजनेला फारसा वाव नाही. काही प्रसंगांत गरजेनुसार स्पॉट लाईट वापरला आहे. आहे ती मर्यादित जबाबदारी साजन कटारियानं सांभाळली आहे.

नाटकाची खरी ताकद आहे ती दिग्दर्शनात. ग्लेन हेडन यांनी दिग्दर्शन केलेलं नाटक बघण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. त्यांनी दिलेली गती आणि पात्रांच्या हालचालींमुळे नाटक सतत उत्कंढा वाढवतं. सनी शर्मा जितका चांगला नाटककार आहे, तितकाच चांगला नटसुद्धा. त्याचा सिद्धार्थ लक्षात राहतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आता प्रेरणाच्या भूमिकेतील गरिमा याज्ञिकबद्दल. ‘आत्मविश्वास गमावून बसलेली‚ सुशिक्षित‚ सुंदर तरुणी’ साकार करणं तशी अवघड जबाबदारी आहे. त्या मानानं ‘यशस्वी‚ करिअरिस्ट तरुणी’ सादर करणं सोपं आहे. गरीमानं ही जबाबदारी लिलया पेलली आहे. शैशाच्या भूमिकेतल्या अनुषा शेट्टी आणि आरवच्या भूमिकेतल्या समयसिंग यांच्या भूमिकाही पूरक आहेत.

आता एकविसाव्या शतकातलं दुसरं दशक संपलेलं आहे. आपल्या आजुबाजूला असे अनेक प्रेरणा आणि सिद्धार्थ आढळतात. तरुण पिढीला एका बाजूनं जागतिकीकरणानंतर उपलब्ध झालेल्या प्रचंड संधी आहेत, तर दुसरीकडे त्याच्या मागे येणारं वैफल्य… ही आजच्या महानगरातील तरुणांच्या जीवनाची शोकांतिका आहे. ती सनी शर्माने बरोबर पकडली आहे. म्हणून ‘चेफेड’ हे आजचं नाटक आहे.

..................................................................................................................................................................

लेखक अविनाश कोल्हे निवृत्त प्राध्यापक आणि कथाकार, कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख