अजूनकाही
एकदा एन. डी. पाटील सर आमच्या गावात आले. लेखनामुळे मला ओळखत होते. गप्पा मारल्या. त्यांनी थेट विचारले, ‘तू कुठे नोकरी करतोस?’ मी शाळेचे, संस्थेचे नाव सांगितले. तेव्हा ‘तू माझ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये ये. तिथे मी तुला प्रकल्प प्रमुख करतो. वेगवेगळे उपक्रम संपूर्ण संस्थेसाठी राबव’ असे ते म्हणाले. मी थोडी टाळाटाळ केली. सर काहीच बोलले नाहीत. त्या वेळी मोबाईल नव्हते. आठ दिवसानंतर एका रात्री त्यांनी माझ्या वडिलांना फोन केला व ‘तुम्ही मुलाला का सोडत नाही? त्याला सोडा.’ अशी विनंती केली. मी नोकरीला नगरला होतो. वडिलांनी मला हे नंतर सांगितल्यानंतर मी थक्कच झालो. ज्या शिक्षण संस्थेत हजारो शिक्षक, प्राध्यापक होते, तिथे एक शिक्षक आपल्या संस्थेला मिळावा म्हणून इतका पाठपुरावा करत होते. ही या माणसाची शिक्षणाविषयाची तळमळ होती.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत जाणे व तिथेही केवळ शिक्षक म्हणून न राहता वेगळी जबाबदारी घेणे, यामध्ये अनेक कायदेशीर, तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे तो विषय पुढे गेला नाही, पण सरांचे प्रेम कायम राहिले. वर्तमानपत्रांत येणाऱ्या माझ्या राजकीय कविता त्यांना आवडायच्या. त्यांनी त्याला ‘वात्रटिका’ न म्हणता ‘चिन्तनिका’ असे नाव ठेवले. ‘त्यात तुझी राजकीय समज व चिंतन दिसते’ असे ते म्हणायचे.
कोल्हापूरला गेल्यावर भेट व्हायची. खूप वेळ द्यायचे. ग्रामीण रूपक वापरून ते जी उदाहरणे द्यायचे, ती मोठी सुंदर असायची. वेतन आयोगाचे एकीकडे प्रचंड पगार व दुसरीकडे किमान वेतनाचे अतिशय कमी दिले जाणारे दर, याबाबत एकदा त्यांच्याशी बोललो. कष्टकऱ्यांच्या बाबतीत सरकार इतके कठोर का? असे विचारताच ते हसून म्हणाले, ‘कामाला जुंपलेल्या जनावराला मर्यादित चारा टाकला जातो. तो मेलाही नाही पाहिजे आणि कामपण केले पाहिजे. इतकीच कोणत्याही सरकारची कष्टकऱ्यांकडे बघण्याची भूमिका असते… उद्या कामावर आला पाहिजे इतकी मजुरी दिली की बस!’ सरांच्या बोलण्याला वेदनेची किनार असायची.
समाजाचे क्रीम कोणते? याविषयी बोलताना ते म्हणायचे की, ‘मूठभर लोक शिकले; त्यांच्यातून समाजाचे वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व तयार झाले. त्याला बुद्धिवादी वर्ग समाजाचे क्रीम म्हणतो. हे आम्हाला मान्य नाही.’ असे सांगताना ते पुढे म्हणायचे, ‘मोठ्या कढईत दूध उकळत ठेवल्यावर पातेलेभर दूध त्यातून बाजूला काढायचं, ते गॅसवर ठेवायचं आणि त्याची साय येईल त्याला क्रीम म्हणायचं, असला खोटेपणा आम्हाला मान्य नाही. तुम्ही संपूर्ण कढईभर दूध उकळा आणि त्याची साय येईल त्याला आम्ही क्रिम म्हणू. तेव्हा समाजातील सर्व स्तरातील माणसे शिकल्यानंतर जे समाजाचे नेते बनतील. ते खऱ्या अर्थानं समाजाचे क्रीम असेल.’ इतकी मूलभूत दृष्टी सरांची असायची.
‘शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण’ या सरकारी शब्दाचीही ते खूप टिंगल करायचे. एकदा एका भाषणात म्हणाले, ‘सरकारची सार्वत्रिकीकरण व्याख्या काय? तर प्रत्येक गावात शाळा पोहोचली की, झाले सार्वत्रिकीकरण! म्हणजे विजेचे खांब प्रत्येक गावात टाकायचे आणि पाटलाच्या घरी लाईट लागली की, खेड्यापाड्यात वीज पोहोचली असं म्हणायचे... असा हा प्रकार’. झोपडीत जेव्हा दिवा लागेल, ते विजेचे सार्वत्रिकीकरण आणि प्रत्येक घरातला पोरगा पदवीधर होईल, तेव्हा ते शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, अशा सुंदर भाषेत सर बोलायचे.
एका भेटीत ते म्हणाले, “समाज नेहमी सोप्या उत्तरांना भुलतो आणि प्रत्यक्ष व्यवस्थेशी टक्कर घेणे त्याला नको असते. हे सांगताना त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ‘एकदा एक वेडा पोलीस आयुक्तांकडे गेला आणि म्हणाला मला तातडीने संरक्षण द्या. कारण रेल्वे कंपन्यांचे मालक माझा खून करणार आहेत. आयुक्त म्हणाले, ‘का?’ तो म्हणाला, ‘मी असा शोध लावला आहे की, कदाचित रेल्वेची दुकानदारी मोडीत निघेल.’ आयुक्त म्हणाले, ‘कसे काय?’ तो म्हणाला, ‘मी वीज आणि कोळसा न वापरता रेल्वे कशी चालवता येईल? याचा शोध लावला आहे.’ त्यांची उत्सुकता वाढली. त्यांनी विचारले, ‘कसे काय?’ तो म्हणाला, ‘एक मोठा चुंबक रुळावर रेल्वेपासून समोर एक किलोमीटरवर ठेवायचा आणि चुंबकाच्या अलीकडे मोठा लाकडी ठोकळा ठेवायचा. लाकडी ठोकळा काढला की, रेल्वे जोराने लोहचुंबकाकडे ओढली जाईल. आयुक्त म्हणाले, ‘इथपर्यंत समजलं, पण तिथून पुढे रेल्वे कशी पुढे सरकेल?’ तो म्हणाला, ‘रेल्वे इतक्या जोरात येईल की, त्या धक्क्याने चुंबक परत पुढे एक किलोमीटर ढकलले जाईल आणि रेल्वे पुन्हा पुढे सरकेल!’ ”
ही गोष्ट सांगताना सर हसले आणि आम्हीही. नंतर त्यांचा खास पॉज घेऊन म्हणाले, ‘अशी सोपी उत्तरे देणारे जादूगार प्रत्येक समाजाला हवे असतात. त्यांचा राजकीय फायदा नक्कीच होतो, परंतु समाज बदलाची प्रक्रिया ही दीर्घकाळ असते. त्याची उत्तरे इतकी सोपी असत नाहीत... ’ गंभीर प्रश्नावर लढताना तुम्हीही खूप गंभीर असले पाहिजे, असा समज सरांकडे पाहून मोडीत निघायचा अतिशय मिस्कील शैलीत ते बोलत राहायचे. प्रत्येक वाक्य सूत्ररूप असायचे.
याच शेवटच्या भेटीत सरांशी बोलताना रयत शिक्षण संस्थेच्या एकूणच वाटचालीबाबत काहीसे मतभेद असावेत असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. ते इतकेच म्हणाले, ‘रयतने मेडिकल कॉलेज काढावे असे सल्ले मला दिले जातात, पण रयतचा जन्म त्यासाठी नाही. मेडिकल कॉलेज काढायला शिक्षणसम्राट गावोगावी पडले आहेत. आमचा जन्म खेड्यापाड्यातील लेकरांना शिक्षण देण्यासाठी झाला आहे आणि तेच त्याचे उत्तरदायित्व आहे... आणि तेच मी करत राहणार...’
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
कर्मवीर भाऊराव पाटलांना केलेल्या कृती मागचे तत्त्वज्ञान सरांच्या शब्दाशब्दांतून पाझरत असायचे. माझे ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ पुस्तक त्यांना पाठवले. तेव्हा ते आजारी होते. बोलणे फार समजत नव्हते. तरीही त्यांनी फोन केला आणि भरभरून बराच वेळ बोलत होते, पण ते बोलणे फारसे समजत नव्हते. मला जाणवले की, सरांशी हे बहुदा आपले शेवटचे बोलणे असणार आहे...
महाराष्ट्रातील सर्वच जनआंदोलनांचे वकीलपत्र त्यांनी घेतलेले असायचे. नर्मदा जनआंदोलनापासून, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यापासून, उल्का महाजन यांच्यासोबतच्या सेझच्या लढ्यापासून, आझाद मैदानातील आंदोललाची भूमिका ते सरकारला ऐकवायचे… किती आंदोलकांच्या मागण्या त्यांनी सरकारकडून मान्य करून घेतल्या याला गणती नाही.
आता मंत्रालयात गेल्यानंतर सगळे मंत्री उठून उभे राहतील असे कोण आहे? अशी नावे दिवसेंदिवस खूप खूप कमी होत आहेत. प्रश्न गंभीर होत आहेत आणि चळवळींचे पाठीराखे मात्र निघून जात आहेत, ही वेदना सरांच्या जाण्याने अधिक गहिरी झाली...
.................................................................................................................................................................
लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आहेत.
herambkulkarni1971@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment