अजूनकाही
कॉ. एन. डी. पाटील सर म्हणजे महाराष्ट्रातील सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीची पुरोगामी परंपरा, मार्क्सवादी विचार आणि कष्टकरी व शेतकरी वर्गांचा राष्ट्रवाद यांचा एक अनोखा संगम.
एनडी ग्रामीण कष्टकरी कुटुंबात जन्मलेले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘रयत’ म्हणजे देशातील एका विशाल शिक्षण चळवळीत घडलेले व्यक्तिमत्त्व. त्यामुळे प्रथमपासून अखेरपर्यंत डाव्या, मध्यममार्गी वा अन्य अशा कोणत्याही राजकारणी नेत्यांपेक्षा अत्यंत हिरीरीने शिक्षणाचा प्रश्न त्यांनी आयुष्यभर लावून धरला. काही काळ प्राध्यापक-प्राचार्य आणि ‘रयत’पासून इस्लामपूर-बेळगाव अशा विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी या माध्यमातून ते या क्षेत्रात कार्यरत राहिले. त्यांना तीन विद्यापीठांनी डी.लिट देऊन सन्मानित केले.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
मुख्य म्हणजे एकंदर शिक्षणाचा व खास करून प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न अभ्यासपूर्ण रीतीने लावून धरणारे महाराष्ट्रातील ते एकमेव ज्येष्ठ नेते होते. गेल्या चार दशकातील आधी विनाअनुदान तत्त्वावरचे आणि मग व्यापारीकरण-खाजगीकरण यावर आधारलेले, अशा शिक्षण-व्यापाराला सर्व पातळ्यांवर विरोध करण्यात ते आघाडीवर होते. ‘बालककेंद्री शिक्षण’ आणि ‘प्राथमिक शिक्षण हक्क’ यासाठी महाराष्ट्रात उभ्या झालेल्या ‘शिक्षण हक्क अभियाना’चे ते अध्यक्षही होते. आपल्या समाजाचे लोकशाहीकरण करण्यात आणि परिवर्तनासाठी आवश्यक त्या प्रबोधनात शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अचूक ओळखले होते. हा मुद्दा राजकारणात केवळ ‘चटणी-कोशिंबीर’ न मानता त्याला गाभ्याचा राजकीय मुद्दा बनवला तो फक्त एनडींनीच.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळ तसेच ब्राह्मणेतर चळवळीतील डावा-पुरोगामी प्रवाह यांचे सामाजिक-राजकीय संस्कार एनडींवर झाले होते. हा प्रवाह गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सहभागी तर झाला, पण ऐन स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर (९ ऑगस्ट १९४७) काँग्रेसचे वर्गीय-जातीय स्वरूप लक्षात घेऊन हा प्रवाह बाहेर पडला आणि शेतकरी-कामगार पक्षाची स्थापना केली. वर्षभरात एनडींनी या पक्षाचे कार्य सुरू केले. पुढे दोन वर्षांत या पक्षाने ‘दाभाडी प्रबंध’ स्वीकारला. याचे वैशिष्ट्य हे की, यामध्ये राजकीय विचारसरणी म्हणून मार्क्स-लेनिन विचाराचा स्पष्ट स्वीकार केलेला होता. मात्र त्याच वेळी याचे वेगळेपण हे की, भारतीय आणि महाराष्ट्रीय सामाजिक वास्तवाचा यात स्वतंत्रपणे विचार व विश्लेषण केलेले होते. सत्यशोधकी तसेच ब्राह्मणेतर चळवळीतील डावा-पुरोगामी विचार त्यात अंतर्भूत केलेला होता. इथल्या ग्रामीण समाजवास्तवाचे नेमके भान त्यामध्ये होते. आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा जनवादी वारसा यात जिवंतपणे गुंफलेला होता.
एनडी हे असे व्यक्तिमत्त्व होते की, ज्यांनी दाभाडी प्रबंध आणि हा संपूर्ण वारसा खर्या अर्थी आत्मसात केला आणि आयुष्यभर अत्यंत तत्त्वनिष्ठपणे तो सांभाळून पुढे विकसित केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ-गोवामुक्तीसह अगदी अलीकडच्या शेतकरी आंदोलनांपर्यंत एनडींचा सहभाग हा याचेच द्योतक होता. शिवाय अंधश्रद्धा निर्मूलन, आंबेडकर अकादमी-विचारवेध, समाजवादी प्रबोधिनी आणि अशा अनेक संस्था-मंच यांच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राची ही प्रबोधन-परंपरा पुढे नेणारे कार्य होते.
स्वातंत्र्य चळवळीत भारतात आणि महाराष्ट्रात विविध स्वरूपाचे राष्ट्रवाद उभे झाले. त्यातील पुनरुज्जीवनवादी, उजवा-परंपरावादी-धर्मवादी, मध्यममार्गी धर्मनिरपेक्ष हे मुख्यत: अभिजनांचे म्हणजे उच्चजातीय-वर्गीय राष्ट्रवाद होते. पण शेकापचा आणि एनडींचा राष्ट्रवाद हा इथल्या कष्टकरी व शेतकरी वर्ग-जातींचा राष्ट्रवाद होता. त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीची ‘समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र’ ही घोषणा शेकापने व एनडींनी अखेरपर्यंत हृदयाशी बाळगली. त्यामुळेच शेका पक्षाला राज्यभर व्यापक जनाधार लाभला आणि बहुजन समाजातील व ग्रामीण-शेतकरी वर्गातील तत्त्वनिष्ठ, लढाऊ व रचनात्मक कार्य करणारे अनेक दिग्गज नेते आणि असंख्य कार्यकर्ते या पक्षाला लाभले. अर्थातच हे ‘आपोआप’ घडले नाही. एकीकडे शेका पक्षाची भूमिका आणि दुसरीकडे त्याचे संघटनात्मक काम करणारे एनडींसारखे अनेकानेक नेते यामुळे हे घडले. एनडींनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून दोन कालखंडात काम केले. पहिल्या कालखंडात शेका पक्ष हा राज्यातील सर्वांत मोठा डावा पक्ष होता. दुसर्या कालखंडात अन्य डाव्या पक्षांप्रमाणेच शेकापचा प्रभावदेखील ओसरत गेला. तथापि एनडी हे राज्यातील डाव्या-लोकशाही आघाडीचे आणि सर्व जनचळवळींचे ‘केंद्र’ राहिले. त्यांचे नेतृत्व हे नेहमीच ‘सर्वमान्य’ राहिले.
सत्यशोधक ते मार्क्सवाद ही वैचारिक परंपरा आणि समाजवाद व जनतेची लोकशाही हा राजकीय विचार हेच सूत्र त्यांच्या सर्व विचारात व चिंतनात, कार्यात आणि वैयक्तिक जीवनात आपल्याला संपूर्ण आयुष्यभर दिसून येते. सातहून अधिक दशके चाललेल्या विविध क्षेत्रातील त्यांच्या कार्याकडे नुसती नजर टाकली तरी कोणाचेही डोळे विस्फारतील. अफाट स्मरणशक्ती, प्रचंड अभ्यास, आम जनतेशी प्रेमाने पण आवश्यक तेव्हा परखडपणे जाहीर संवाद साधण्याची कला, एकटाकी लेखन करण्याची हातोटी, अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्याने, जनहितासाठी सत्ताधार्यांशी ‘वाटाघाटी’ करत असतानाच दोन हात करण्याची लढवय्या वृत्ती, व्यापक लोकसंग्रह, अथक प्रवास करण्याची व सर्व प्रश्नांना भिडण्याची कायम तयारी आणि अत्यंत साधी-पारदर्शी राहणी ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. हे सारे पैलू त्यांच्या अव्वल राजकीय कार्याशी जोडलेले होते. त्यामुळे आमदार म्हणजे खर्या अर्थी आणि निष्ठेने जनतेचे प्रतिनिधित्व करणे, मंत्रीपद वा कोणतेही पद हे सचोटीने जनकल्याणासाठी राबवणे, याचा वस्तुपाठ म्हणजे एनडींचे जीवन!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
त्यांचे विचार व कार्य हे अव्वल राजकीय होते. पण ते उथळ व संकुचित अर्थी, केवळ तात्कालिकाचे राजकारण नव्हते. तर एका अत्यंत मूलभूत अर्थी ते राजकीय कार्य होते. ते तत्त्वनिष्ठ ‘सामाजिक क्रांतीचे राजकारण’ होते. शिक्षणापासून शेतीपर्यंत प्रत्येक ठोस प्रश्न, एन्रॉनपासून सेझपर्यंत प्रत्येक स्थानिक आंदोलने, यामध्ये जितके जीव ओतून ते उभे राहात, तितकेच ते जागतिकीकरण आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अर्थ-राजकारण याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण दृष्टी व सखोल समज ठेवून असत. साहित्यापासून विविध सांस्कृतिक व प्रबोधन चळवळींपर्यंत चौफेर ते उपस्थित असत, मार्गदर्शन करत आणि संस्थात्मक उभारणीला आधार देत. तरुण स्त्री-पुरुष कार्यकर्ते आणि अभ्यासू कार्यकर्ते यांच्याविषयी एनडींना विशेष आस्था होती. त्यांच्या पाठीशी ते नेहमी उभे राहत. प्रत्यक्ष राजकीय-सामाजिक आंदोलनांमध्ये तसेच वैचारिक शिबिरे, परिषदा आणि संमेलनांमध्ये नवे विचार आणि नवी विश्लेषणे यांना ते आवर्जून स्थान देत, जे नवे असेल ते स्वत: लक्षपूर्वक ऐकून घेत. ते जितके शेतकरी-कामगार पक्षाचे होते, तितकेच ते महाराष्ट्रातील आणि देशातील डाव्या-लोकशाही प्रवाहाचे आणि जनचळवळींचे नेते होते.
महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व प्रगतीशील प्रवाहांनी आपापले दृष्टीकोन व्यापक व लढाऊ करत आमूलाग्र सामाजिक परिवर्तनाचे राजकारण पुढे नेणे, हेच त्यांना खरेखुरे क्रांतिकारी अभिवादन ठरेल.
..................................................................................................................................................................
लेखक दत्ता देसाई सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.
dattakdesai@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment