संन्यस्त वृत्तीने संसार करणाऱ्या आणि सामाजिक कामांत स्वत:ला झोकून देणाऱ्या ‘तेजवीराची सावली’ होता आलं...
संकीर्ण - पुनर्वाचन
सरोज नारायण पाटील
  • प्रा. एन. डी. पाटील आणि त्यांच्या पत्नी सरोज पाटील
  • Tue , 18 January 2022
  • संकीर्ण पुनर्वाचन एन. डी. पाटील N. D. Patil सरोज पाटील Saroj Patil

शेकापचे नेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. एन. डी. पाटील यांचं काल वयाच्या ९३व्या वर्षी कोल्हापुरात निधन झालं. १५ जुलै २०१८ रोजी त्यांनी ९०व्या वर्षांत पर्दापण केलं, तेव्हा ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’चा जुलै २०१८ अंक ‘भाई एन. डी. पाटील कृतज्ञता विशेषांक’ म्हणून प्रकाशित करण्यात आला होता. या अंकात एन.डी. यांच्या पत्नी सरोज नारायण पाटील यांचा लेख प्रकाशित झाला आहे. त्या लेखाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

अतिशय चारित्र्यसंपन्न, गुणवान, सुसंस्कृत अशा आई-वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला. हिमालयापेक्षा उंचीचे व सागरापेक्षा विशाल मनाचे भाऊ मला लाभले; तसेच पैशापेक्षाही मौल्यवान असे जिव्हाळ्याचे मित्र आम्हाला लाभले आणि सर्वांत शेवटी, ज्यांच्याबरोबर मी हा धकाधकीचा संसार केला, ती व्यक्ती असामान्य होती. त्यांच्या मानाने मी अतिसामान्य, रूपानेही सुमारच; पण आपल्या मूल्यांशी, तत्त्वांशी प्रतारणा न करता त्यांनी माझे मन जपले. माझ्या स्वातंत्र्याला कधीही मर्यादा घातली नाही. जे आवडते, ते काम मला करू दिले. दोघांनीही एकमेकांना समजून घेतल्याने जीवन संघर्षमय असूनही त्याची इजा एकमेकांना झाली नाही.

माझे आई-वडील निर्व्यसनी होते. त्या उभयतांना एकच व्यसन होते आणि ते म्हणजे ‘जनसंपर्क’. आमच्या आबांचे कौतुक करायला पाहिजे. कारण बहुतेक सगळे पुरुष बाहेर एक बोलतात आणि आत एक वागतात. बाहेर समाजाला ज्ञान शिकवतात; परंतु आमच्या आबांचं असं अजिबात नव्हतं. त्या काळात आपल्या बायकोला अशा पद्धतीनं स्वातंत्र्य देणं, ही सोपी गोष्ट नव्हती. मुलींच्या बाबतीतही त्यांनी तेच केले. बाईबरोबरच त्यांनीही मुलींना शिक्षण देण्याचा आग्रह धरला होता. आम्ही त्या काळामध्ये कबड्डी खेळायचो. मुलांच्याबरोबर वावरायचो. कधीही आम्हाला आमच्या आई-वडिलांनी अडवलं नाही. माझी मोठी बहीण सरला जगताप; तिला आम्ही ताई म्हणतो. ताई आणि मी अशा आम्ही पवार बहिणी खेळाच्या मैदानावर अतिशय प्रसिद्ध होतो.

जातिभेद, धर्मभेद यांचे वारेही आमच्या घरात शिरले नव्हते. माझे वडील बंधू (कै.) वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षातील एक लोकप्रिय व धडाडीचे नेते होते. त्यामुळे डाव्या चळवळीतील अनेक नेते आमच्या घरी येत-जात. क्रांतिसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, दाजीबा देसाई, जी. डी. लाड यांच्या सहवासाने आमचे घर पुनित झाले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अनवाणी पावलांनीही आमची भूमी मंगलमय झाली होती. हे सर्व सांगावयाचा उद्देश असा की, आई-वडिलांच्या लोकसंग्रह वृत्तीतून माझे लग्न एन. डी. पाटील यांच्याबरोबर झाले व माझ्यामध्ये थोडीफार सामाजिक दृष्टीही येऊ शकली.

वडील म्हणायचे, ‘आपल्या मुलीने इथे जिथे फुले वेचली, तिथे तिला काटे का वेचायला लावायचे?’ यावर आई म्हणत, ‘चिमण्या-कावळ्याप्रमाणे अनेक जण संसार करतात. मात्र हा मुलगा असामान्य आहे. त्याच्या डोळ्यांत बुद्धीची चमक आहे. वागण्यात प्रामाणिकपणा आहे. यालाच मुलगी द्यायची.’ एन. डी. पाटील यांना ओळखणारे अनेक लोक आई-वडिलांना म्हणत, “अहो! याच्या पायाला भोवरा आहे, एखाद्या दरवेशाप्रमाणे हा भटकत असतो. कशाला मुलगी देता? तुम्हाला ती जड झाली आहे का?” असे वादविवाद चालू होते. या वादविवादात माझ्या पसंती-नापसंतीचा विचार कोणाच्याच डोक्यात नव्हता. आमच्या आईचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याने अशा वादाच्या वेळी आईचा नेहमीच विजय होत असे. अशा रीतीने माझे लग्न एकदाचे ठरले.

लग्नापूर्वीच एन. डी. पाटलांनी सांगितलं, “माझ्याकडे शेती नाही. असली तरी आम्हाला मिळणार नाही. मी घरात वेळ आणि पैसा दोन्ही देऊ शकणार नाही. कारण मी पूर्णवेळ पक्षाचं काम करायचा निर्णय घेतला आहे. अर्थात, माझी तुमच्याकडूनही कुठलीच अपेक्षा नाही. मला मुलगी आणि नारळ चालेल. तुम्ही करून द्याल, तसे लग्न मला मान्य आहे. हे सारे जर मुलीला चालत असेल, तर माझी काही हरकत नाही.”

या त्यांच्या अटींबद्दल विचार करण्याचं माझं वय नव्हतं आणि त्याबाबत मला कुणी मार्गदर्शनही केलं नाही. माझ्या आई-आबांनी त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या आणि आमचं लग्न ठरलं. माझे दुसरे भाऊ अनंतराव त्यानंतर एकदा त्यांना फिरायला घेऊन गेले. “आता लग्न होणार; मग तुम्ही पुढचा विचार काय केलाय?” असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर “कोणतीही वेळ आली तरी तुमच्या दारात येणार नाही,” असं त्यांनी सांगितलं. बस्स, लग्नापूर्वी झाली ती एवढीच चर्चा.

त्या वेळी मी पुणे येथील आबासाहेब गरवारे कॉलेजात बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत होते व होस्टेलमध्ये राहत होते. माझ्याबरोबर इतरही अनेक मैत्रिणींची लग्ने ठरली होती. शनिवार आला की, सर्व मैत्रिणींचे भावी यजमान होस्टेलवर येत व आपल्या भावी पत्नींना घेऊन चित्रपटाला वा फिरायला जात. याला अपवाद फक्त एन. डी. पाटील होते. ते शेवटपर्यंत या होस्टेलची पायरी चढले नाहीत. मी मनात म्हणायची, ‘हे कधीच कसे येत नाहीत? फोनही करत नाहीत, कसला नवरा?’ अशा रीतीने मनाला हळूहळू चटके बसण्यास सुरुवात झाली होती.

शेवटी १७ मे १९६०चा दिवस उजाडला. लग्नाची वेळ सकाळी १०ची होती. मांडवात लोक जमू लागले होते. अक्षता देण्याची वेळ येऊन ठेपली; पण नवरदेवाचा पत्ता कुठाय? माझ्या मनात पाल चुकचुकली, ‘या गृहस्थाने रामदासासारखे पलायन तर केले नाही ना?’ चार दिशेला चार भाऊ नवरदेवांना शोधायला गेले. त्या काळी बिचाऱ्यांकडे वाहनेही नव्हती. शरद एक डबडी मोटारसायकल घेऊन पळाला. उन्हात वणवण फिरून परत मांडवात परतला, तो अगदी दमलेल्या अवस्थेत! अक्षरश: तोंडाला फेस आला होता. ते १८ वर्षांचे पोर थकून गेले होते. शेवटी नवरदेवाचा शोध लागला. नवरदेव व वरात एका ओढ्यातील चिखलात अडकून पडले होते. शेवटी घाईघाईने नवरदेवाची गाडी ओढून काढली व त्यांना मांडवात बिनआंघोळीचेच उभे केले व एकदाचे अक्षता टाकून त्यांना चतुर्भुज केले.

लग्नानंतर एक डबड्या फियाटमधून आमची वरात माझ्या सासरी ढवळी गावास निघाली. फियाटमध्ये पाठीमागे आमच्या दोघांप्रमाणे आणखी दोघे घुसले व पुढे दोघे बसले. उन्हाळ्याचे दिवस. पाठीमागे चार जण कसे बसले असू, त्याची कल्पना केलेली बरी. एकूण सात माणसांना घेऊन आचके देत गाडी एकदाची ढवळीस पोचली. आताची ढवळी व १९६०च्या काळातील ढवळी यात जमीन-अस्मानचे अंतर आहे. मी तिथे पोचले व फारच घाबरून गेले. तीन खोल्यांचं छोटंसं घर, छोटी मोरी. घरात पाच-सात कच्ची-बच्ची, दीर-जावा, सासू-सासरे, घरातच जनावरं, घोंगड्यावरची झोप, स्वयंपाकाच्या वेगळ्या पद्धती, स्वच्छतागृहांचा अभाव, डास-पिसवांचं साम्राज्य. या साऱ्या वातावरणाची स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती; किंबहुना जगात असं पण काही असतं, हेही माहीत नव्हतं. धुळीची अॅलर्जी असल्यानं नाकातनं पाणी यायचं; पण कमरेला रुमाल लावणं ‘बापईपणाचं लक्षण’ होतं. माझे केस खूप दाट, लांबसडक होते; पण उभं राहून केस विंचरणं हेही ‘बापईपणाचं लक्षण’ होतं. मला बसून केस विंचरताच यायचे नाहीत. स्वच्छतागृह नाही. त्यामुळं माझं पोट साफ नसायचं. मी तर आजारीच पडले. एके दिवशी संधी साधून मी त्यांना सांगितलं, ‘मला बरं वाटत नाहीय’. त्यांनी दुसऱ्याचच दिवशी बॅग भरायला लावली आणि अलिबागच्या बहिणीकडे सोडलं. लग्नापासून पुढची २०-२५ वर्षं म्हणजे माझ्यापुरता कटू आठवणींचा काळ. त्या काळात इतका संघर्ष करावा लागला की, ती वर्षं आयुष्यातून खोलीच्या दरवाजासारखी बंद करावीत, असे वाटते. हा संघर्ष होता परिस्थितीशी आणि आई म्हणून स्वत:शीसुद्धा!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माझ्या सासरी त्या काळी सोयी नव्हत्या. गरिबी होती, शिक्षणाचा अभाव होता; पण अडाणी असली, तरी माणसं मनानं निर्मळ, चांगली होती. माझ्या छोट्या-छोट्या गोष्टीचंही कौतुक करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे होता. माझ्या ‘इंदू’ नावाच्या एक जाऊबाई अडाणी होत्या. माझ्या सासूबाईंनी एकदा शेजारणीला बोलता-बोलता सांगितलं, “अगं, मी जर इंदाच्या हातात लेखणी (पेन) दिली आणि सरोजच्या हातात नांगूर दिला, तर ते कसं दिसंल? तेचा काय उपेग हाय काय?” त्यांच्या या विचारांमुळे माझ्यावर टीका करणाऱ्यांची बोलती बंद व्हायची.

ही माणसे साधी असली, तरी ती पुरोगामी विचारांची आहेत, बंडखोर प्रवृत्तीची आहेत, हे जाणवू लागले. अजूनही मी जेव्हा ढवळीला जाते, तेव्हा सर्व मुले माझ्याभोवती ‘काकी-काकी’ करत जमतात. मी त्यांच्यातच रमते. त्यांच्याबरोबरच जेवते. मला स्वयंपाकगृहात कधीच जावे लागत नाही. हा तेथील स्त्रियांचा मोठेपणा आहे. माझ्या सासूबाई निरक्षर असल्या, तरी त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांचे मन पाण्यासारखे स्वच्छ व निर्मळ होते. त्यांना माझा नेहमीच अभिमान वाटे. यांचे संसारात लक्ष नाही, हे पाहून सासूबाईंना माझी दया येत असे. कधी-कधी चिडून म्हणत, ‘कशाला याने लग्न केले? याचे बायका-पोरांकडे लक्ष नाही!’ त्या गोरगरिबांना, अडलेल्यांना त्या नेहमी मदत करत. शिक्षण नसूनही जातिभेदाचा त्यांच्यात लवलेश नव्हता.

माझं लग्न मेमध्ये झाले आणि ऑगस्टमध्ये ते आमदार झाले. मधल्या तीन महिन्यांच्या काळात मला अलिबागच्या बहिणीकडे किंवा बारामतीत टाकून हे गायबच व्हायचे. केव्हा तरी महिन्याभरानं परत दर्शन व्हायचं. मधल्या काळात मला अगदी शरमल्यासारखं व्हायचं; पण हे त्यांच्या गावीही नसायचं. त्या काळी फोन वगैरे नव्हते. त्यामुळे फक्त वाट बघण्याशिवाय काहीच करता यायचं नाही. परत भेटल्यावर काही बोललं, तर ते स्पष्टपणे सांगायचे, “हे बघ, साऱ्या गोष्टींची मी आधीच स्पष्ट कल्पना दिली होती. आता त्यावर चर्चा नाही.” मग बोलणंच खुंटायचं. मनस्वी, सडेतोड, स्पष्ट विचारांच्या, कर्तव्यकठोर आमदाराशी गाठ होती ना!

आमदार झाल्यावर ते मुंबईला घेऊन गेले, तेव्हा मी खुशीत होते. आता मुंबई कशी असते, ते पाहता येईल, चित्रपट, गाण्यातून भेटलेल्या मुंबईची ओळख करून घेऊ शकू, असं वाटलं होतं. पण कसचं काय? आमदार निवासातल्या एका खोलीत माझी वळकटी टाकून त्यांनी थोडे पैसे दिले. ‘जवळच कॅन्टीन आहे. तिथे जेवण-नाष्ट्याची सोय आहे,’ असं यांनी सांगितलं आणि निघून गेले. मग काय, कॅन्टीनमधलं जेवायचं आणि यांची वाट पाहायची, हा माझा कार्यक्रम. रात्री केव्हातरी हे यायचे आणि सकाळी लवकर बाहेर पडायचे. त्यांचा पूर्ण वेळ पक्षासाठीच असायचा. मी गॅलरीतून दिसेल तेवढी मुंबई पाहत राहायची. ‘परत कधी येणार,’ असं विचारलेलं त्यांना आवडायचं नाही. सुरुवातीच्या काळात कधी विचारलंच तर ‘काम संपले की येईन’ हे ठरलेलं उत्तर असायचं. एक मात्र नक्की, ‘जेवायला घरी येणार की नाही, आणखी कुणी येणार आहे का,’ हे मात्र ते न चुकता सांगायचे.

मुंबईत इंदूलकर नावाचे त्यांचे एक मित्र होते. शिवाजी पार्कजवळ त्यांची इंदूलकर चाळ होती. कॉमन व्हरांडा आणि दोन लहानशा खोल्या असं चाळीचं स्वरूप होतं. एकदा इंदूलकरांनी आम्हा दोघांना जेवायला बोलावलं. जेवण झाल्यावर ते यांना म्हणाले, “एन. डी., आमची शिवाजी पार्कजवळ चाळ आहे. त्यातल्या दोन खोल्या तुम्हाला देतो. तुम्ही आमदार निवासापेक्षा तिथे राहा.” त्या काळात पागडी न घेता, भाड्याविषयी काही न बोलता त्यांनी खोल्यांच्या चाव्या दिल्या. असे मित्र ही यांची श्रीमंती आहे. त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी केलेल्या कष्टांची, समाजावर केलेल्या प्रेमाची त्यांच्याकडून आम्हाला अशा अनेक रूपांनी भरपाई मिळते. त्यांचे मोठेपण आमचा त्यांच्याबद्दलचा आदर वाढवते.

तर अशा रीतीने आम्ही दोन खोल्यांत राहायला आलो. आईनं येऊन संसार लावून दिला. जुजबी सामान आणलं, इथेही तीच तऱ्हा! सकाळी लवकर पक्षाच्या कामासाठी हे बाहेर जायचे. घरासाठी अगदी थोडा वेळ. तिथल्या शेजारणींना वाटायचं की, ‘मला नवऱ्यानं फसवून इथं आणून ठेवलंय.’ त्या म्हणायच्या, ‘तुझा नवरा घरी कधी दिसत नाही. त्यानं फसवलंय का? तसं असलं, तर सांग. आम्ही तुला मदत करू.’ मी हसून ते नाकारायचे. मग त्या विचारायच्या, “तो नेमकं काय करतो?” मी सांगायची, “ते सोशल वर्कर आहेत.” त्यावर त्यांना प्रश्न पडायचा, ‘नेमकं कोणतं सोशल वर्क करतो?’ अशा अनेक गमतीदार गोष्टी घडायच्या. याच काळात मोठ्या मुलाच्या-सुहासच्या-वेळेस मला दिवस राहिले. पुन्हा मी बारामतीला आले. या वेळी बरेच दिवस मुक्काम पडला. तोपर्यंत तिकडे इंदूलकरांनी चाळीच्या वरच्या मजल्यावर ३५० चौरस फुटाचे तीन फ्लॅटस् बांधले. एक त्यांच्या मुलाला, एक पुतण्याला आणि एक आम्हाला दिला. हेच आमचं घर. मी या घरात २५ वर्षे काढली.

कोल्हापूरमध्ये रुईकर कॉलनी येथे बांधलेल्या घराचेही असेच. बरीच वर्षे तो प्लॉट तेथे पडून होता, तोही दौंडकरांच्या नावे होता. शेवटी सोसायटीने जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यावर तेथील एका मेंबरने ती जागा परस्पर स्वत:च्या सासूबाईंच्या नावावर चढवली. ती जागा मोकळी करून घे, असे मला सांगितले गेले. खूप वर्षे को-ऑपरेटिव्ह कोर्टात हेलपाटे घातले. मन:स्ताप सहन करावा लागला. दहा वर्षांपूर्वीपासूनचा पत्रव्यवहार दाखवण्याचा आदेश कोर्टाने दिला. कोणीच नीट लक्ष न घातल्याने सगळी कागदपत्रे मिळवणे महामुश्किल होते. प्रशांतच हे सर्व करत होता. शेवटी २००१ला, वीस वर्षांनी केस जिंकली आणि जागा दौंडकरांच्या नावे झाली. त्यांनी ती आमच्या नावावर केली. घर बांधायचे ठरवले. प्लॅनही मंजूर झाला; पण लक्षात आले की, बरीच वर्षे जागा पडून असल्याने आजूबाजूच्या अनेकांनी अतिक्रमण करत आपले प्लॉट पुढे घेतले आहेत. मूळचा कॉलनीतील रस्ता बाजूला करून या प्लॉटमधून रस्ता दाखवला आहे. पुन्हा वर्षभर न्यायासाठी झगडत होते. एकटीच सगळीकडे जात होते. कॉलनीच्या नियमाप्रमाणे आणि प्लॅनप्रमाणे प्लॉट मिळण्यासाठीसुद्धा खूप हेलपाटे मारावे लागले.

स्त्री स्वत:साठी काही मागत नाही; पण मुलांसाठी तडजोड करताना मात्र तिला खूप झगडावं लागतं. हे मला मुलांच्या जन्मानंतर तीव्रतेने जाणवायला लागलं. इतके दिवस थोडे पैसे देऊन हे गेले तरी मी काही बोलत नसे. माहेरचा भक्कम आधार होता; पण तो यांच्या तत्त्वात बसत नाही, मलाही ते आवडत नव्हतं. शरमल्यासारखं वाटे. अनुभवातून तावून निघाल्यावर मी विचार करायला लागले. दोन मुलं आहेत. त्यांचा खर्च वाढतच जाणार. तो मेळ आपण कसा घालणार? एका अपरिहार्यतेतून मला बाहेर पडायचं होतं. रस्ता शोधायचा होता. कुढणं, रडणं संपवायचं होतं. मग विचार करून मी निर्णय घेतला. बी. ए. पर्यंतचं शिक्षण झालंच होतं. मी बी.एड. करायचं ठरवलं. त्या वेळी माझा मोठा मुलगा दुसरीत, तर धाकटा माँटेसरीत होता. मुलांना कोण सांभाळणार? शेवटी मी घराला ‘लॅच की’ करून घेतली. मुलांच्या गळ्यात ती किल्ली बांधून दिली, म्हणजे हरवण्याची भीती नाही. घरात टेबलावर अन्न मांडून झाकून मी जायची. त्या काळी फक्त केळी एवढं फळच परवडण्याजोगं होतं. मग केळ्याची फणी सुतळीला बांधून मुलांच्या हाताला येईल, अशी टांगून ठेवायची. मुलांना फूटपाथवरून सावकाश यायला शिकवलं. ती घरी येऊन खायची. दार बंद करून खेळायला जायची. या साऱ्याचा परिणाम म्हणजे मुलं जबाबदार, शहाणी, स्वतंत्र झाली. माझ्याऐवजी खरं तर त्यांनीच घर सांभाळलं. त्या वर्षी मी बी.एड. झाले.

याचदरम्यान अंधेरीतून आमदारकीसाठी इंदूलकरांचा मुलगा उभा होता. त्याचा प्रचार करण्यासाठी हेही फिरत होते. तेव्हा तिथल्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी शाळेची सोय नव्हती. नागरिकांतून शाळेची मागणी होती. शेवटी इंदूलकरांनी त्यांना शाळेचं आश्वासन दिलं. त्यांचा मुलगा निवडूनही आला. निवडणुकीतल्या आश्वासनानुसार शाळा सुरू करूया, असा एन.डीं.नी तगादा लावला. त्या भागातच इंदूलकरांचा छोटा प्लॉट होता. तिथं शेड मारून शाळा सुरू करण्यात आली. बी.एड. झाल्याबरोबर मला त्या शाळेत नोकरी लागली. तेव्हा दोनशे रुपये पगार होता.

यापूर्वी घरात स्टोव्हवर स्वयंपाक करावा लागे. एक मूल कडेवर, एक हाताशी असं माझं काम चालायचं. ते वडिलांना खटकलं. ते म्हणाले, “त्यापेक्षा मी पैसे देतो. तू तुझ्यासाठी गॅस घे.” गॅस नोंदवल्याचं समजल्यावर त्यांना राग आला. तीन महिने हे माझ्याशी बोललेच नाहीत. “त्यांनी दिला म्हणून काय झालं? आपल्याला काय परवडतं, ते कळायला नको? ते उद्या गाडी आणून दारात लावतील. आपल्याकडे पेट्रोलला पैसे आहेत का?” असले त्यांचे प्रश्न! त्या शाळेत दहा वर्षे मी शिक्षिकेची नोकरी केली. त्या काळात गरिबीची खूप जवळून ओळख झाली. तेव्हा शाळेत जे हेडमास्तर आणि क्लार्क होते, त्यांनी संगनमताने मुलांच्या फीचे पैसे खाल्ले. मग मॅनेजमेंटकडून चौकशी सुरू झाली, तर ते दोघे पळून गेले. उरलेल्यांमध्ये मी सर्वांत सीनियर होते. त्यामुळे हेडमास्तर झाले. तब्बल १९९७पर्यंत मी या शाळेत जीव ओतून काम केले. प्रशासनाचा अनुभव नव्हता. मग मी परिसरातल्या नामवंत शाळांत जाऊन सारं शिकून घेतलं. विद्यार्थ्यांना रोजची हजेरी अनिवार्य केली. दोन-तीन दिवस मुलगा शाळेत आला नाही, तर मी स्वत: स्कूटर काढून झोपडीत जायची. तेव्हा दारिद्रयाचं अगदी जवळून दर्शन झालं. एवढ्याशा झोपडीत दहा-१२ माणसं! त्यांच्या अडचणींचा विचार केला, तरी अंगावर काटा यायचा.

एकच उदाहरण सांगते. पावसाळ्यात शाळेत घोटाभर किंवा गुडघाभर पाणी साठायचं. मग शाळेला सुट्टी दिली, तरी मुलं शाळेतच. विचारल्यावर काहींनी सांगितलं, “शाळेत एवढंसंच पाणी आहे; मात्र घरात कमरेइतकं पाणी आहे. एकाच कॉटवर आम्ही किती जणं बसून राहणार? त्यापेक्षा शाळेतच बरं आहे.” मी कधीतरी काही कारणानं त्यांच्या घरी गेले, तर त्यांची धावपळ उडायची. घरची बाई मोलकरीण असायची. मग ती दोन रुपयांची चुरगाळलेली नोट कुठून तरी काढायची. मुलांना थंड पेय आणायला पिटाळायची. पाहुणचार करायची इच्छा असायची; पण परिस्थिती आड यायची. खरं सांगते, ते थंड पेय घशातून खाली उतरायचं नाही. या शाळेनं, मुलांनी, पालकांनी आणि समाजानंही मला भरभरून प्रेम दिलं. मी शाळेत रमले.

दहा वर्षे शिक्षिका म्हणून काम करताना या मुलांच्या क्षमता, त्यांचे सुप्त गुण, संधीचा अभाव हे सारं लक्षात येत होतं. शाळेचा निकाल शून्य ते दहा टक्केच असायचा. वाईट वाटलं, तरी मी काही करू शकत नव्हते; पण मी हेडमास्तर झाले. मुलांच्या मदतीनं शाळेत अनेक उपक्रम राबवले. वृक्षारोपण, मुली दत्तक देणं, लोकांकडून दान रूपात पुस्तकं मिळवणं, बोलका व्हरांडा, अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता. शाळेतले शिक्षक, मुलांनी, इतकंच काय; परिसरातल्या लोकांनीही उत्तम साथ दिली.

एक गंमत सांगते, या मुलांना खासगी शिकवणी परवडणं शक्य नव्हतं. त्यांचा अभ्यास व्हावा म्हणून मी शाळेत रात्र अभ्यासिका सुरू केली. मुली आठ-साडेआठपर्यंत असायच्या. मुले मात्र रात्री अकरापर्यंत थांबायची. त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणीतरी हवं होतं. मी परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांशी बोलले. त्यांना विनंती केली की, रात्रीचे दोन-तीन तास आमच्या मुलांसाठी द्या. मुलं आपापला अभ्यास करतील, तुम्ही फक्त तिथं खुर्चीत बसा. एखादी शंका कुणी विचारली, तर ती सांगा. त्या परिसरात सगळे क्लास वन, क्लास टू अधिकारी म्हणून निवृत्त झालेले लोक होते. हे सारे सहकार्यासाठी आनंदानं पुढं आले. उलट तेही या मुलांमध्ये रमले. शालेय अभ्यासाबरोबरच धार्मिक गोष्टी, विज्ञानाचे प्रयोग रंगू लागले. या सगळ्याचा परिणाम म्हणून पुढच्या काळात निकाल ९० ते १०० टक्क्यांपर्यंत गेला.

हे सारं इतक्या विस्तारानं सांगायचं कारण की, जसजशा माझ्या जाणिवा विकसित झाल्या, तसतसं माझं व्यक्तिगत दु:ख मला जाणवेनासं झालं. माझी मुलंही छान स्वावलंबी झाली. आमच्या दोघांमधलं मतभेदाचं किंवा दुराव्याचं मूळच माझ्या नोकरीमुळे नष्ट झालं. त्यामुळे पुढच्या काळात एकमेकांबद्दल तक्रारी उरल्या नाहीत.

माझ्या मोठ्या मुलाला-सुहासला-मेडिकलला प्रवेश घ्यायची इच्छा होती; पण त्यासाठी त्याला एक-दोन मार्क्स कमी पडत होते. त्या वेळी हे सहकारमंत्री होते आणि माझा भाऊ शरद पवार मुख्यमंत्री! तरीही त्यानं नागपूरला इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचं ठरवलं. (त्याच वेळी नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं.) पण तोही स्वाभिमानी! प्रवेशाच्या रांगेत उभा राहिला. वडिलांच्या व्यवसायाच्या कॉलममध्ये शिक्षक लिहिलं आणि स्वत:च्या हिमतीवर प्रवेश मिळवला. कोणाच्या तरी वशिल्यानं आपण प्रवेश मिळवला, असं कुणी बोट दाखवणं त्यालाही आवडत नव्हतं आणि आम्हालाही नको होतं. सरळपणे मिळालेला प्रवेश घेऊन तो इंजिनिअर झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, अफाट कष्टाची तयारी, प्रामाणिकपणा या गुणांच्या बळावर तो आज अमेरिकेत नामवंत उद्योजक झाला आहे. वडिलांचा साधेपणा दोघाही मुलांमध्ये आला आहे.

आमच्या घरी कार्यकर्त्यांचा सदैव राबता असतो. काही कामात गुंतल्यामुळे किंवा इतर कारणानं आलेल्यांना चहा-बिस्किटं द्यायला उशीर झाला, तरी ते अस्वस्थ होतात, आत-बाहेर करतात. एखाद्याला तुरीची डाळ चालत नाही, तर त्याच्यासाठी वेगळं काही केलंय का, याची खात्री केल्याशिवाय चैन पडत नाही.

मला एकदा टायफॉईड झाला होता. त्या वेळी माझा मोठा मुलगा चौथीत शिकत होता. दौरा टाळून ते घरात थांबले नाहीत. आम्हीही ‘थांबा’ असे म्हटले नाही. कार्यकर्त्यांच्या छोट्या-मोठ्या आजारपणातही धावून जाणारा हा माणूस घरच्यांच्या बाबत इतका कोरडा कसा काय राहू शकतो, हे मला कधी कळले नाही. हा कठोरपणा मला खटकला आहे. यांनी आमदारकीचे पैसे, प्राध्यापक म्हणून मिळणारी पेन्शन असा त्यांना म्हणून मिळणारा एकही पैसा कधी घरी दिला नाही. त्याबद्दल माझी कधीच तक्रार नव्हती आणि नाही. हा सर्व पैसा त्यांनी एस.टी. किंवा रेल्वेचा प्रवास, कार्यकर्त्यांच्या गरजा आणि समाजासाठीच वापरला, हे मला माहीतच आहे. या बदल्यात त्यांच्याबरोबर आम्हीही समाजाचे निरतिशय प्रेम, आदर अनुभवतो. आम्हीही त्यांची मूल्ये जपतो. त्यांच्या मूल्यांच्या चौकटीतील स्वातंत्र्य ते आम्हाला पूर्णपणे देतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेत आमची आजपर्यंतची वाटचाल झाली आहे.

नोकरीला लागल्यावर मात्र मी त्यांच्याशी युक्तिवाद करायला शिकले. त्यांच्या तत्त्वांबाबत ते तडजोड करत नाहीत. त्यापलीकडच्या गोष्टींना त्यांची हरकत नसते, हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. त्यामुळे एखादी वस्तू आणल्यानंतर ‘माझ्या पैशातून मी वस्तू आणली. कोणती गैर गोष्ट केली नाही ना? त्यासाठी तुमच्याकडून पैसे मागितले नाहीत ना?’ असं मी म्हणायची. यावर ते काही बोलायचे नाहीत. त्यामुळे नंतर भांडणाचा, संघर्षाचा प्रश्नच आला नाही. नोकरीच्या पैशातून हळूहळू संसारातील एक-एक वस्तू जमवत गेले. मला स्वच्छतेची, नीटनेटकेपणाची हौस आहे. ती हळूहळू पुरवत गेले.

मुलं लहान असताना मी ‘महात्मा’ नावाचा एक सिनेमा पाहिला होता. त्यामध्ये ‘मोठ्या व्यक्तींच्या उतारवयात त्यांना कुटुंबातील सदस्यांचा द्वेष स्वीकारावा लागतो,’ हे दाखवलं होतं. अगदी मोठ्या माणसांची मुलंही ‘यांनी समाजासाठी खूप केलं; पण आमच्यासाठी काय केलं? त्यांच्यामुळेच आमचे हाल झाले ना?,’ असं म्हणतात. मला मात्र माझ्या घरात ते होऊ द्यायचं नव्हतं. “तुमचे वडील म्हणजे कोरा चेक आहे. लोकांसाठी ते झटतात. त्यांनाच काय, उद्या तुम्हालाही कुठली अडचण आली, तर यांचे दहा कार्यकर्ते मदतीसाठी धावून येतील. हीच श्रीमंती खरी असते,” असं मी मुलांना सांगायची. त्यामुळे मुलांच्याही मनात त्यांच्याबद्दल कधी राग, द्वेषभावना आली नाही. आजही त्यांना पित्याबद्दल प्रचंड आदर वाटतो. त्यांच्याशी तात्त्विक वाद झाले, तरी त्यांचे मोठेपण वादातीत राहते.

आज आमच्या आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. दोन्ही मुले स्वकर्तृत्वावर उभी आहेत. वडिलांनी संसारात कधीच लक्ष दिले नाही, हे ओळखतात; पण तरीसुद्धा त्यांना वडिलांविषयी आदर आहे, अभिमान आहे. कधी तरी येणाऱ्या, आजोबांना नातवंडे ‘बाबा, बाबा’ करत चिकटतात; पण या भावनेच्या ओलाव्यात ते अडकून पडत नाहीत. मन घट्ट करून घराबाहेर पडतात.

सागरला (मोठ्या मुलाचा मुलगा) घेऊन मी अमेरिकेला गेले, तेव्हा तो अतिशय लहान होता. तरीही माझ्याबरोबर एकटा असतानाही तो कोठेच कमी पडला नाही. एअरपोर्ट-विमान-लंडनमध्ये उतरून दुसरे विमान पकडणे, कनेक्टिंग फ्लाईट, सगळीकडे तो मला मदत करत होता. त्याचा मित्रपरिवारही प्रचंड होता. मित्रांबरोबर खूप उत्साहाने वाढदिवस साजरा केला जायचा. तो अतिशय उत्तम भाषणे करायचा. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर किंवा अग्रगण्य मुकेश अंबानी यांची मुले त्याचे मित्र होते आणि कित्येक दिवस आम्हाला घरात येणारी मुले ही एवढ्या नावाजलेल्या प्रसिद्ध लोकांची आहेत, हे माहीतच नव्हते. ती अगदी सर्वसामान्य मुलांसारखी आमच्याकडे यायची. सागरच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्या लहान वयातही त्याने दाखवलेल्या कर्तृत्वाचा तो परिणाम होता.

खऱ्या अर्थाने त्याच्या आजोबांचे गुण त्याच्यात उतरले होते. त्याचे आजोबा नेहमीच त्याला सांगायचे की, ‘माणसाची जगण्यासाठीची गरज किती आहे? किती लागते पोट भरायला? ३५ रुपयांत आपण घरी पोटभर जेऊ शकतो. गरजा कमी असल्या की, जगणे फार अवघड नसते. कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी खर्च, दोन वेळचे जेवण आणि दोन कपडे-फार थोडी रक्कम लागते’ असे सरळ-साधे विचार समोर ठेवून एन. डी. पाटील आपले आयुष्य जगले आणि आजूबाजूलाही त्यांनी तेच विचार रुजवले.

ही त्यांची तत्त्वे ठीक आहेत. ‘पैसे मिळवण्याऐवजी लोकांसाठी काम करत राहिलो,’ याचा अभिमानही असावा; पण हे अतिशय व्यवहारशून्य आहे. बाहेरच्या जगामध्ये एखाद्या वस्तूची किंमत काय आहे? व्यावहारिक जगात काय चालले आहे, याची त्यांना जराही कल्पना नाही. मुंबईच्या घरामध्ये आम्ही खूप वर्षांनी थोडे फर्निचर करायला घातले होते. एक तर मी एकटी खूप वर्षे नोकरी करत होते. कसेबसे सगळे चालत थोडे पैसे बाजूला टाकले होते आणि फर्निचर करायचे ठरवले होते. एखादी वस्तू करायची तर त्याचा खर्च किती येणार? याची किंमत किती? याची गरज आहे का? असे आले की, सतत प्रश्न विचारात राहायचे. एखाद्या टेबलचा खर्च समजा ५ हजार रुपये येणार असेल आणि आम्ही ५०० रुपये येणार, असे सांगितले, तरी ते म्हणायचे, ‘अरे बापरे! एवढ्याशा टेबलसाठी ५०० रुपये खर्च? एवढा खर्च कशाला करता? जरा कमी करता आला, तर पाहा.’ घरामध्ये दागिने घ्यायचे असतात, साड्या-कपडे घ्यायचे असतात, लग्न-समारंभ असतात, इतर काही सांसारिक, प्राथमिक गोष्टी असतात, याची त्यांना काही माहितीही नाही आणि देणे-घेणेही नाही. मला तर असे म्हणावेसे वाटते की, आपली जुनी म्हण आहे ‘अज्ञानातच सुख असते’. या म्हणीचा मी त्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने अनुभव घेतला आणि घेत आहे.

ते आयुष्यभर मूल्यांना चिकटून राहिले. ढोंग, लबाडी, स्वार्थीपणा यांच्या पलीकडे राहिले. अफाट मेहनत, प्रचंड वाचन, ज्ञानाचा सागर असणारे असे ‘वडील’ मुलांना खूप आवडतात. कौतुक करणारे एन. डी. पाटील ‘आजोबा’ म्हणूनही नातवंडांना खूप प्रिय आहेत. नातवंडांना मिळालेल्या बक्षिसात आपला एक करकरीत रुपया टाकून त्यांना खूष करतात. मी मनात म्हणते, खऱ्या अर्थाने ते श्रीमंत आहेत. सर्व सुख-दु:खाच्या पलीकडे गेलेले, मोह नसणारे, अंथरुणावर पडताच घोरणारे असे हे व्यक्तिमत्त्व, श्रीमंत नाही तर काय? आज राजकीय पुढाऱ्यांची मुले बिघडताना दिसतात; पण आपल्या मुलांवर वडिलांचे चांगले संस्कार झालेत. वडिलांच्या लाल दिव्याच्या गाडीत ती कधी बसली नाहीत. मुले कधी कोणाशी अप्रामाणिकपणे वागली नाहीत. वरळीला आमदार कोट्यातून मिळणारा उत्कृष्ट फ्लॅट वडिलांनी नाकारला, याचेही मुलांना कधी दु:ख होत नाही.

थोडक्यात, म्हणजे आम्ही दोघेही सुखी आहोत, समाधानी आहोत. माणुसकी हा धर्म मानून दोघेही कार्यरत राहिलो. आज आमच्याकडे थोडे पैसे असतील; पण त्यापेक्षाही मौल्यवान माणसे, मित्र आम्हाला भेटले. नेर्ल्याचे रावसाहेब पाटील, वाळव्याचे शिवाजी माने, शिवाजी रणदिवे, कोल्हापूरचे संभाजीराव चव्हाण, हिंदूराव साळोखे, पंढरपूरचे मुरलीधर थोरात, अशोक भुतडा अशा अनेक मित्रांनी यांच्यावर जिवापाड प्रेम केले. मुंबईचे अशोक सरकार, सुरेश भाटवडेकर, कमलाकर म्हेत्रे, डॉ. जनक नाथन ही तर आमची मुलेच आहेत. आम्ही आजारी पडलो, तर आम्हाला कसलीच काळजी वाटत नाही.

आमच्या उभयतांच्या जीवनातील तीन दु:खद घटना म्हणजे इस्लामपूरचा गोळीबार, दुसरी घटना म्हणजे त्यांच्या पायाला आलेले अपंगत्व आणि तिसरी घटना म्हणजे आमचा नातू चि. सागर याचा अकाली मृत्यू. आपण पूर्वीप्रमाणे कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, त्यामुळे त्यांना फार दु:ख होईल. कार्यकर्त्यांनी दिलेल्या गाडीतही त्यांना बसायला आवडत नसे. त्याचे त्यांना दु:ख होई. मग मीच समजूत घालत असे, ‘तुम्हाला तुमचे कार्यकर्ते ओळखतात. नाईलाजाने तुम्हाला गाडीचा प्रवास करावा लागत आहे’, असे बोलल्यावर ते थोडे शांत होतात. अजूनही त्यांचा प्रवास अखंड चालू असतो. त्यांच्या प्रवासात नियोजन नसते. म्हणून मी कधी-कधी रागावते. ‘महिन्यातून किमान दोन दिवस विश्रांती घ्यायला हवी’, असे मी कळकळून सांगते; पण ते ऐकत नाहीत.

आजपर्यंतच्या आयुष्यात एकही रविवार त्यांनी घरी घालवलेला नाही. ४३ वर्षांच्या प्रवासात मोजून पाच चित्रपटही आम्ही एकत्र बसून पाहिलेले नाहीत. रयत शिक्षण संस्थेचे काम ते अहोरात्र करत असतात; पण गाडीला पेट्रोल स्वखर्चाने घालतात. संस्थेकडून ड्रायव्हरशिवाय काही घेत नाहीत; परंतु दिवसातून अनेक वेळा म्हणतात, ‘रयत शिक्षण संस्थेने मला फार मोठे केले. कर्मवीरांमुळे मी एवढ्या पायऱ्या चढलो. शेका पक्षाने मला कीर्ती दिली.’

उभयतांचे जीवन खडतर गेले; पण आमची एकमेकाविषयी मने कधीच कलुषित झाली नाहीत. कारण एकमेकांवरचा अढळ विश्वास होय. जितक्या ओढीने ते बाहेर जातात, तितक्याच ओढीने ते घरीही येतात. ते अतिशय गरिबीत वाढले. आपली साधी राहणी त्यांनी कधीच सोडली नाही. स्वत:चे कपडे स्वत: धुण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. एका स्लीपरवर राहण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. निरलस वृत्ती, कार्यकर्त्यांसाठी असलेली तळमळ, अभ्यासू वृत्ती, वाचन, चिकाटी, मनाचा सच्चेपणा, खुलेपणा, निर्भीडपणा, स्वत:ला प्रामाणिकपणे जे वाटते ते करताना कोणाला काय वाटेल, याची फिकीर न करण्याची वृत्ती, स्वत:च्या मूल्यांना असलेले प्रथम अधिष्ठान अशा गुणसमुच्चयांमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व उन्नत आणि भव्य बनते. संन्यस्त वृत्तीने संसार करणाऱ्या आणि सामाजिक कामांत स्वत:ला झोकून देणाऱ्या ‘तेजवीराची सावली’ होता आलं, यातच कृतार्थतेची भावना दाटून येते.

(‘प्रा. एन. डी. पाटील - चळवळीचा महामेरु, बहुत जनासी आधारू’ या विजया पाटील संकलित पुस्तकातून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......