अजूनकाही
कमाल खान यांनी केवळ पत्रकारितेचं, पत्रकारितेमधल्या संवेदनेचं आणि भाषेचं प्रतिनिधित्व केलं नाही, तर बातम्यांच्या माध्यमातून आपलं शहर, लखनौ आणि आपला देश, भारत यांचंही प्रतिनिधित्व केलं. कमाल खान म्हणजे जुनं लखनौ शहर. ज्या शहराला धर्माच्या नावावरून चालवल्या गेलेल्या द्वेषाच्या लाटेनं बदलवून टाकलंय. तिथल्या राज्यकर्त्यांची भाषा बदलून टाकलीय. घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्ती कुणाला तरी ‘ठोंक देंगे’ किंवा ‘गोली से परलोक पहुंचा’ देण्याची भाषा करू लागले आहेत. अशा काळातदेखील कमाल खान लखनौ शहराची ओळख ज्या शिवाय अपूर्ण राहते, अशा एखाद्या पवित्र स्थळासारखे टिकून राहिले. कमाल खान यांना लखनौ शहरापासून वेगळं काढताच येत नाही.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
पत्रकार म्हणून त्यांची ओळख त्यांच्या नावावरूनच होती, पण अलीकडच्या लखनौमध्ये ती त्यांच्या धर्माशी जोडली गेली. सरकारमध्ये असलेल्या संकुचित दृष्टीच्या नेत्यांनी त्यांच्यापासून लांब राहणंच पसंत केलं. याचं दु:ख कमाल खान यांनी लखनौच्या अदबीसारखं सांभाळलं. ते त्यांनी फारसं दाखवलंही नाही अन व्यक्तही केलं नाही. शंभरात एखाद वेळा त्याविषयी बोलत. तुम्हाला माहीत असेलच म्हणा! मी विचारलं तर म्हणायचे, मुसलमान आहे. एका पत्रकाराला त्याच्या धर्मावरून ओळखण्याच्या प्रयत्नांत ते मात्र पत्रकार म्हणून स्वत:ला जनतेच्या दिशेनं ढकलत राहायचे. त्यांची प्रत्येक बातमी त्याचं उदाहरण आहे.
हीच कमाल खान यांची ओळख आहे की, आज त्यांच्या आठवणी सांगताना सामान्य प्रेक्षकही त्यात सहभागी आहेत. अशा वेळी आठवणींना उजाळा देणं हा उपचार असतो. पण लोक ज्या प्रकारे कमाल खान यांच्या आठवणी जागवत आहेत, त्यांचे वेगवेगळे ‘पीस टू कॅमेरा’ (पीटूसी) आणि बातम्या यांची उदाहरणं देत आहेत, त्यावरून लक्षात येतं की, त्यांनी आपल्या प्रेक्षकांनाही किती काय काय दिलं आहे! त्यांच्या कितीतरी बातम्यांचे भाग शेअर होताना, मी ट्विटरवर पाहत होतो. कमाल खान म्हणजे काय तर, हेच! हीच त्यांना वाहिलेली खरीखुरी श्रद्धांजली आहे… जी लोक त्यांच्या कामाची प्रशंसा करताना देत आहेत.
ते काम करताना मी त्यांना पाहिलंय आणि ऐकलंयसुद्धा. ते जाणून घेणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे हे समजू शकतं की, अहमद फराज़ आणि हबीब जालिब यांचे शेर ऐकवून कमाल खान होता येत नाही. दोन मिनिटांची बातमी लिहिण्यासाठी ते दिवसभर विचार करायचे, वाचायचे आणि लिहायचे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना हे माहीत होतं की, हीच त्यांच्या कामाची पद्धत होती. ही किती चांगली गोष्ट आहे की, एखादी व्यक्ती आपलं काम आदर आणि मन लावून करते.
अयोध्येविषयीच्या त्यांच्या शेकडो बातम्या जर एकत्र ठेवून पाहिल्या तर कळेल की, संपूर्ण उत्तर प्रदेशात कमाल खान यांच्या नजरेतून एक वेगळी अयोध्या पाहायला मिळायची. गर्वाच्या नावाखाली तिरस्काराच्या आगीत वेड्या झालेल्या देशाशी ते अयोध्येसंदर्भात सहजपणे बोलू शकायचे! उकळणाऱ्या द्वेषाच्या आगीला शांत करायचे. कमाल खान ‘तुलसी’ रामायण मन लावून वाचायचे आणि ‘गीता’ही. कुठून तरी दोन-चार वाक्यं चोरून आपल्या बातमीत पेरणारे ते पत्रकार नव्हते. त्यांना माहीत होतं की, उत्तर प्रदेशातला समाज धर्मात बुडालेला आहे. त्याच्या या भोळेपणाला राज्यकर्ते घोंघावत्या वादळाचं रूप देतात. या समाजाशी बोलण्यासाठी कमाल खान यांनी किती तरी धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता! त्यामुळे जेव्हा कमाल खान बोलत, तेव्हा ऐकणारा थांबत असे, त्यांचं ऐकत असे.
कमाल खान त्यांच्या नजरेतून प्रेक्षकांच्या मनात उतरत आणि त्याच्या आत्म्याला हलक्या हातांनी जागं करत आठवण करू देत की, या सगळ्याचा अर्थ प्रेम आणि बंधुत्व नाही, तर मग काय आहे? आणि हेच तर धर्मानं आणि उत्तर प्रदेशच्या बुजुर्गांनी सांगून ठेवलंय. कमाल खान ज्या अधिकारवाणीनं राम-कृष्णांशी संबंधित विवादीत घटनांची बातमीदारी करायचे, तेवढ्या शालीनतेनं क्वचित कुणी करू शकायचं. कारण त्यांच्याकडे माहिती असायची. त्यासाठी ते खूप वाचायचे. बनारसला जात, तेव्हा खूप पुस्तकं विकत घेऊन येत. गुगल येण्याच्या आधीच्या काळात कमाल खान जेव्हा बातमीदारी करण्यासाठी निघत, तेव्हा संबंधित विषयांसंदर्भातली पुस्तकं सोबत घेत.
ते कठोर स्वभावाचे होते, कारण शिस्तप्रिय होते. त्यामुळे नकार देत. ते प्रत्येक गोष्टीला होकार देणारे पत्रकार नव्हते. त्यांनी होकार देणं याचा अर्थ असा असायचा की, न्यूजरूममध्ये कुणीतरी सुटकेचा श्वास टाकलाय. ते विनाकारण किंवा हट्टीपणातून नकार द्यायचे नाही, तर एखाद्या बातमीला नकार देताना त्याचं सविस्तर कारणही सांगायचे. ते करताना ते आपल्या जवळपासच्या लोकांना त्या नीतीमूल्यांची आठवण करून द्यायचे, जी प्रत्येक पत्रकाराने लक्षात ठेवली पाहिजेत. मग तो संपादक असो वा नवा बातमीदार. बातमीदार आपल्या तर्कावरून जितक्यांदा नकार देतो, तेवढे आपल्या संस्थेचे भलेच करतो. कारण त्यामुळे तो आपल्या माध्यमसंस्थेलाही चुकीच्या आणि अर्धवट बातमीदारीपासून वाचवत असतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आता दुसरा कमाल खान होणार नाही. कारण ज्या प्रक्रियांमधून गेल्यानंतर कमाल खान होता यायचं, त्या प्रक्रियांची पुनरावृत्ती करण्याची नैतिक ताकद या देशानं गमावली आहे. आता या देशाच्या मातीत असे कमकुवत लोक आहेत, ज्यांच्या पाठीच्या कण्यात दम नाही. त्यामुळे ते आपापल्या संस्थांमध्ये कमाल खान तयार करू शकत नाहीत. अन्यथा ज्या कमाल खानच्या भाषेबाबत इतर वृत्तवाहिन्यांवर प्रशंसा केली गेलीय, त्या वृत्तवाहिन्यांमध्ये एखादा कमाल खान नक्की असला असता.
कमाल खान एनडीटीव्हीचे चंद्र होते. त्यांच्या बोलण्यात ताऱ्यांचा चमचमाट होता, चांदण्यांची शांतता होती.
मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा
.................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख https://ndtv.in या पोर्टलवर १४ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
https://ndtv.in/blogs/ravish-kumars-blog-on-ndtv-reporter-kamal-khan-2708217
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment