अजूनकाही
हिंसा, मानवी भावनांचे अतिरंजित सादरीकरण आणि सेक्स या तीन सूत्रांना डोळ्यांसमोर ठेवून जे चित्रपट बनवले जातात, त्यांचा उद्देश गल्लाभरू चित्रपट बनवणे, हाच असतो. तीन तासांच्या मनोरंजनासाठी जनता सिनेमा बघते, म्हणून त्या तीन तासांत या तीनही गोष्टी ठासून भरायच्या इतका साधा हिशेब असतो. पण असं असले तरी हा हिशेब स्वस्तात नक्कीच नसतो. डोळे दिपवणारे सेट्स, स्पेशल इफेक्ट्स, श्वास रोखायला लावणारे लोकेशन्स, मोठे कलावंत, मोठे संगीतकार, हॉलिवुडचे छायाचित्रकार यांचा मेळ घालून जी भेळ बनवली जाते, ती लोकांना नक्कीच आवडणार, असा हा हिशेब!
अशीच एक भेळ ‘पुष्पा’ या तेलगू चित्रपटानं प्रेक्षकांना सादर केली आहे. ही भेळ सामान्यांना आवडली आहे, हे त्यानं केलेल्या तीनशे कोटींच्या व्यवसायामुळे सिद्ध झालं आहे. ‘बाहुबली’ने एक ब्लॉकबस्टर फॅंटसी अशाच स्तरावर भारतभरातल्या प्रेक्षकांना सादर केली. दाक्षिणात्य सिनेमा अनेक बाबतीत हिंदी सिनेमांच्या तुलनेत सरस आहे, भव्य आहे, याची जाणीव ‘बाहुबली’ने बळकट केली. आता ‘पुष्पा’च्या यशामुळे पुन्हा एकदा दाक्षिणात्य सिनेमाची भव्यता चर्चेत आली आहे.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
भारतीय सिनेसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमाला एक वेगळं स्थान आहे. दाक्षिणात्य सिनेमा म्हटलं की कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलगू या भाषांमधील सिनेमा असं ढोबळ म्हटलं तरी, पुन्हा या भाषांमधील सिनेमाची स्वतःची अशी वेगळी वैशिष्ट्यं आहेत. तिथं जसे तरल चित्रपट बनतात, तसंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात भडक चित्रपटही बनतात. पुराणकथांवर आधारित, हॉरर, फॅमिलीपट, विनोदी या सगळ्या प्रकारात प्रेक्षकांच्या भावनांना आव्हान देत, हे चित्रपट बनतात. आपल्या आवडत्या नायकांना देवदेवतांचं स्थान देणारा प्रेक्षकही दक्षिणेकडेच आहे. त्यामुळे चित्रपटाच्या नायकाला जास्तीत जास्त अमानवीय किंवा अचाट गोष्टी करणारा बनवण्याचा प्रयत्न, हे चित्रपट करतात.
अल्लू अर्जुन हा असाच एक अभिनेता. अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा अर्जुन प्रत्यक्षात अब्जाधीश आहे. ही भूमिका आधी महेश बाबू करणार होता असं म्हणतात, पण नंतर अर्जुनला मिळाली. ‘पुष्पा’ बनण्याच्या आधीच तो किती भव्य असणार, याची तयारी झाली होती. आणि त्याच पद्धतीनं अर्जुनच्या पात्राला अपराजित आणि सर्वश्रेष्ठ दाखवताना अतिशय रासवट पद्धतीनं डिझाईन करण्यात आलं आहे. गचाळ कपडे, वाढलेली दाढी, नजरेतला बेदरकारपणा, सगळं काही अगदी एका स्मगलरला परफेक्ट. त्याच्या वागण्यात ना आईला किंमत, ना प्रेयसीला, पण त्या अडचणीत आल्या की, हाच तरणोहार बनणार. एका झटक्यात तस्करीतले सगळे बारकावे शिकणारा आणि इतरांना शिकवणारा पुष्पा एका वेळी कितीही माणसांना मारू शकणार! हिरॉईनबरोबर प्रणय करताना पिटातल्या प्रेक्षकांना गुदगुल्या होतील, याची काळजी घेणार; आई जखमी झाली की, तिला उचलून दवाखान्याकडे धाव घेणार, अशा अनेक गोष्टी ठरवून पुष्पाच्या पात्रात आहेत.
भव्य आहे म्हणून ‘पुष्पा’ उत्तम चित्रपट आहे, असं म्हणता येणार नाही. चांगल्या कथाबीजाला सरधोपटपणे हाताळणं, पात्रांची बुद्धिहीन मांडणी, निरुद्देश हिंसा, प्रेक्षकांना चेतवण्यासाठी केलेले हास्यास्पद प्रसंग, यामुळे हा चित्रपट अनेक पातळ्यांवर अयशस्वी ठरतो. या चित्रपटाची सगळ्यात भावणारी गोष्ट म्हणजे तिरूमला परिसरातल्या पर्वतराजी आणि डोंगरमाथ्यांचं केलेलं अप्रतिम चित्रण.
एका छोट्या गावात राहणारा गरीब, पण मानी हमाल पुष्पा (अल्लू अर्जुन) चंदन स्मगलर कसा बनतो, याची ही गोष्ट आहे. चित्रपटाची सुरुवात अतिशय आकर्षक रितीनं होते. तिरूमलाच्या जंगलात रक्तचंदनाची तस्करी सुरू असते आणि या परिसराच्या आजूबाजूच्या गावात अतिशय गरिबी असते. पुष्पा अशाच एका गरीब घरातला मुलगा. गरीब पण बेदरकार. आपल्या गरिबीतून वाट काढून पैसे कमावण्याची धडपड करणारा आणि स्वतःचं अनौरस असण्याचं दुःख मनात दडपणारा सुरुवातीचा पुष्पा काय करेल, याची उत्सुकता प्रेक्षकांत निर्माण होते.
नायकाला अजिंक्यतारा बनवण्याच्या नादात पुढे चित्रपटाच्या कथेचा सत्यानाश होतो. तस्करीच्या दुनियेतला बादशहा बनवण्यासाठी पुष्पाला एकाच वेळी चतुर, उद्धट, शूर, धाडसी, विनोदी, रोमँटिक, अशा अनेक रूपांत दाखवण्याच्या अट्टहासात बहुतेक वेळ अल्लू अर्जुनच पडद्यावर दिसतो. त्यातही बहुतेक वेळ तो थलैवा इष्टाईल मारामाऱ्या करतो. आधी पुष्पाचे विरोधक किती हिंसक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी ते दिसेल त्याला कापताना दाखवलं आहे. आणि नंतर पुष्पा नावासारखं फूल नाही तर, आगीचा गोळा आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुष्पा दिसेल त्याला कापत सुटतो. हिंसा हा अनेक चित्रपटांचा केंद्रबिंदू असतो, कारण ती मानवी समाजाच्या केंद्रस्थानी असते. पण त्याला तितक्याच उत्कट कथानकाची जोड नसेल तर, ती ‘व्हिडिओ गेम’मधल्या कापाकापीसारखी भासते. पुष्पातली हिंसा अशीच आहे. हातात आला कोयता की काप!
पुष्पाची प्रेयसी आहे श्रीवल्ली (रश्मिका मंदाना). सुरुवातीला पुष्पाच्या अस्तित्वाची दखलही नसणारी श्रीवल्ली त्याच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ला चांगला विरोधाभास निर्माण करते. श्रीवल्ली चित्रपटातल्या अनेक खलनायकांपैकी एकानं, जाली रेड्डीने तिच्या वडलांच्या जीवदानाच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केल्यावर पुष्पाकडे येते आणि ‘मला त्याच्याबरोबर झोपायच्या आधी तुझ्याबरोबर झोपायचं आहे’, असं म्हणते तेव्हा आपली जिवणी जमिनीवर पडते. आता तिने हे सगळं पुष्पाचे मन वळवण्यासाठी बोललं असावं, असं जरी गृहीत धरलं तरी अशा प्रसंगाचा उद्देश काय हा प्रश्न उगाच पडतो. जालीरेड्डी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्यानंतर तिला ‘लक्स साबणानं आंघोळ करून माझ्याकडे ये’ असं सांगतो आणि पुढच्या सीनमध्ये श्रीवल्ली लक्स साबणानं आंघोळ करताना दिसतं. हास्यास्पद वाटू शकणाऱ्या या प्रसंगाचा प्रेक्षकांवर काय परिणाम होतो, हे जाणून घेणं गमतीशीर ठरेल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मुख्य धारेतल्या दाक्षिणात्य चित्रपटांची हाताळणी एका वेगळ्या मनोवृत्तीनं होते. रासवट लैंगिकता, भावनांचे अतिरंजित चित्रण हा त्याचा वेगळेपणा आहे. असं असलं तरी इथं पुष्पा आणि इतर कोणत्याही पात्राच्या मानसिक जडणघडणीवर मेहनतच घेतलेली नाही. त्यामुळे ती पात्रं कशी आहेत, कोण आहेत, परिस्थितीनुसार त्यांच्यात काय बदल होतात, याचा काहीही थांगपत्ता लागत नाही. तिरूमलाच्या डोंगररांगांत चालणारी चंदन तस्करी नेमकी कशी चालते? पुष्पाला आयुष्याकडून नेमकं काय हवं आहे? श्रीवल्ली पुष्पाच्या प्रेमात का पडते?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायच्या प्रयत्नात पुष्पाच्या उगवत्या कारकिर्दीवर आधारित पहिला भाग संपतो. अतिशय गुणी तमिळ अभिनेता फहाद फासिल यात फारच कमी वेळ वावरल्यानं त्याच्याबद्दल सांगण्यासारखं काही नाही. ‘पुष्पा २’मध्ये अर्जुन आणि फहादमधला सामना रंगेल.
..................................................................................................................................................................
लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.
bhalwankarb@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment