अजूनकाही
ज्येष्ठ लेखक डॉ. अरुण गद्रे यांचं ‘उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ हे नवीन पुस्तक नुकतंच सुनिधी पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. मानवी उत्क्रांतीबद्दलचे आपले अपसमज दूर करणारे, आपली समजूत व्यापक करणारे हे पुस्तक आहे. बौद्धिक खाद्य पुरवणारे आणि बौद्धिक आव्हान देणारे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेले हे मनोगत...
..................................................................................................................................................................
‘उत्क्रांती’ हा विषय डोळ्यांसमोर येताच हे पुस्तक बंद करून कपाटात ठेवणं, ही सामान्य माणसाची पहिली प्रतिक्रिया असेल तर, मला अजिबात धक्का बसणार नाही. आपण शाळेत उत्क्रांती शिकलो, तेव्हा निर्माण झालेल्या काही प्रतिमा डोळ्यांसमोरून झरझर जाणं अत्यंत स्वाभाविक आहे. या प्रतिमा म्हणजे काय? तर काही माकडं आणि आपल्यातला दुवा म्हणून आपल्याला दाखवण्यात आलेले दाढीवाले पुरुष आणि स्त्रिया! त्यांच्या हातात काही जुनी अवजारं! जवळ गुहा! क्वचित शेकोटी आणि ते परीक्षेसाठी पाठ करायला अवघड असं लांबलचक निओएथेन्ड्रेल असं काहीसं नाव! बापरे! असेल काहीतरी उत्क्रांती वगैरे! त्याची माहिती असो-नसो, आज काय फरक पडतो?
एका दृष्टीनं हे म्हणणं खरंच आहे! जगण्याची लढाई इतकी दमवणारी झाली आहे, आयुष्य इतकं सुपरफास्ट झालंय, रोजचं जगणंच मुळी कठीण झालं आहे. अशात हे असे विषय वाचायचे कशाला, असा प्रश्न ज्यांना पडतो, असे अनेक लोक हे पुस्तक हातात घेणार नाहीत, हेही खरं आहे. पण प्रश्न वेगळाच आहे. मुळात माणसं अशी पुस्तकं का वाचतात? कुतूहल हे त्यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण असतं. मी कोण आहे? आणि मी कुठून आलो? हा सनातन प्रश्न माणसाच्या जिव्हाळ्याचा आहे, होता आणि राहील यात शंका नाही.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
या सनातन प्रश्नाचा एक विलक्षण नवीन उलगडा प्रस्तुत पुस्तक करतं, याची मी खात्री देतो. १० वर्षांपूर्वी गुगल नावाच्या अल्लाउद्दीननं मला काही वेगळंच भन्नाट जग दाखवलं. गेल्या ३० वर्षांत सूक्ष्मजीवशास्त्र, जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी यात जी थक्क करणारी प्रगती झाली आहे, विज्ञानानं आजवर अदृश्य असं जे विस्मयजनक विश्व आपल्यासमोर आणलं आहे, ते मी प्रस्तुत पुस्तकात तुमच्या समोर आणत आहे. तो या पुस्तकाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.
आता या नव्या शास्त्रीय ज्ञानानं अज्ञानाची बरीच जळमटं उडून गेली, यात उत्क्रांतीचा डार्विनला अपेक्षित असलेल्या सिद्धान्ताचा समावेश होतो, जो या पुस्तकाचा अपरिहार्य भाग आहे. डार्विनसारख्या अत्यंत प्रतिभावान शास्त्रज्ञाला खोटं ठरवणं, ही प्रस्तुत पुस्तकाची मूळ प्रेरणा नाही. म्हणून तर प्रस्तुत पुस्तकात तिसरं प्रकरण आहे ‘डार्विनचा विजय’ आणि पाठोपाठचं प्रकरण आहे ‘विजयातला पराभव’.
प्रस्तुत पुस्तक तुम्हाला जीवपेशीची एक भन्नाट सफर घडवेल. खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवरसायनशास्त्राला स्पर्श करेल. अजिबात दचकू नका. या सर्व शास्त्रांबाबत मीही तुमच्याइतकाच अनभिज्ञ आहे आणि होतो. हेही खरं आहे की, थोडेच वाचक विज्ञानाचे विद्यार्थी आहेत आणि अगदी जीवशास्त्राच्या विद्यार्थ्यांनादेखील थोडं कठीण वाटेल, एवढं हे शास्त्र विकसित झालं आहे.
आपण इथं खूप विस्तारानं न पाहता विषयाला फक्त स्पर्श करणार आहोत. ज्यांना रस असेल त्या वाचकांनी संदर्भसूचीचा वापर करावा. मूळ शास्त्रीय पुस्तकं वाचावीत. त्यांची सूचीसुद्धा दिली आहे. आणि हो! यात एकही वाक्य माझं पदरचं नाही. प्रत्येक दाव्याला, प्रतिपादनाला पुरावा आहे. शास्त्रीय पुरावा आहे. दिगंत शास्त्रज्ञांची अवतरणं संदर्भासह आहेत (शंभरपेक्षा अधिक संदर्भ आहेत!)
या पुस्तकासाठी फक्त एक गोष्ट हवी. वाचकाकडे फक्त कुतूहल हवं! बस! खात्रीनं सांगतो की, पुस्तक खाली ठेवताना तुमचं एकूणच आपल्या अवकाशाचं, जगण्याच्या रहस्याचं भान आमूलाग्र बदललेलं असेल. माझं बदललं. माझा प्रयत्न आहे की, ज्यांचा विज्ञान हा विषय नाही आणि असेच बहुसंख्य वाचक आहेत; त्यांना विषय कळावा. त्यामुळे मी जणू तुमच्याशी गप्पा मारत आहे, अशी शैली या पुस्तकात जाणीवपूर्वक वापरली आहे. मजा म्हणजे यामुळे प्रस्तुत पुस्तकाचं बाड वाचून ‘या पुस्तकाची शैली ही शास्त्रीय मांडणीसारखी नाही!’ असा अभिप्राय आला. हे यशच म्हणायचं.
काहींना आणखी काही गंभीर आणि महत्त्वाचे प्रश्न पण पडले असतील. प्रस्तुत पुस्तकाचं शीर्षक जरा ज्यादाच वाटू शकेल, उर्मट वाटू शकेल. उत्क्रांतीविरुद्ध हे पुस्तक म्हणजे छद्मविज्ञान असणार, वाचण्यात काही अर्थ नाही, असा समज होऊ शकेल. सध्या सोशल मीडियामुळे छद्मविज्ञानाला बहर आला आहे. त्यामुळे ही शंका चुकीची नाही.
इथे मी दोन मुद्दे समोर ठेवीन.
एक, गुरुत्वाकर्षण आणि उत्क्रांतीचा सिद्धान्त हे दोन्ही वैज्ञानिक सिद्धान्त असले तरी दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक आहे. गुरुत्वाकर्षण हे ‘ऑपरेशन सायन्स’ आहे आणि उत्क्रांती हे ‘ओरिजीन सायन्स’ आहे. न्यूटननं केलेले प्रयोग आपण आजही प्रत्यक्ष करू शकतो. उत्क्रांती ही जशी घडून गेलेल्या खुनाचा आरोपी शोधून काढते, तसं प्रयोगानं नव्हे तर अनुमानानं सिद्ध होतं किंवा फेटाळलं जातं. त्यामुळे गुरुत्वाकर्षण आणि उत्क्रांतीची तुलना होऊ शकत नाही. ओरिजीन सायन्सला ऑपरेशन सायन्सचे नियम लागू पडत नाहीत.
डार्विननं ज्या पद्धतीनं उत्क्रांतीचा निष्कर्ष काढला होता, त्याच पद्धतीनं आज विज्ञानात बुद्धिमान अभिकल्प हा निष्कर्ष काढला जात आहे. डार्विनसमोर फिंच पक्ष्याच्या चोचीचा पुरावा होता. आज उपलब्ध पुरावा आहे ‘जनुकीय रेग्युलेटरचा.’ डार्विनने फिंच पक्ष्याच्या बदलत्या लांबीच्या चोचीचा कार्यकारणभाव अनुमानानं ठरवला ‘जगण्यासाठी बाह्य दबावाला प्रतिसाद’.
आज रेग्युलेटर जनुकाचा पुरावा समोर आला आहे आणि त्याचा कार्यकारणभाव ठरवला मात्र अनुमानानं जात आहे - ‘बुद्धिमान अभिकल्प’. अगदी अशाच प्रकारची कॉम्युटरची चीप आणि कॉम्युटरचे कोडसुद्धा आपल्यासमोर आज आहे आणि हे निर्विवाद आहे की, कॉम्पुटर चीप किंवा कोडमागे आहे- ‘बुद्धिमान प्रतिभा’ (इंटेलिजंट माईंड).
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
लक्षावधी वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेचं स्पष्टीकरण देण्यासाठी डार्विन त्याला त्याच्या काळात पुराव्यानं आढळलेला कार्यकारणभाव वापरतो आणि अनुमानरूपानं उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडतो. आज पुराव्यानं आढळलेला कार्यकारणभाव वापरून बुद्धिमान अभिकल्प सिद्धान्त समोर ठेवला जातो आहे. दोन्ही पद्धती सारख्याच आहेत. डार्विनचं प्रतिपादन हे विज्ञान असेल, तर बुद्धिमान अभिकल्पसुद्धा विज्ञानच आहे. आणि जर बुद्धिमान अभिकल्प हे छद्मविज्ञान असेल, तर डार्विनसुद्धा छद्मविज्ञान ठरतो.
या आक्षेपाला आणखी एक उत्तर याच पुस्तकात ‘विज्ञान म्हणजे काय रे भाऊ?’ या प्रकरणात दीर्घ स्वरूपात दिलं आहे. इथं एवढंच नमूद करतो की, हे एक चक्र आहे. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तामुळे निर्मिक आणि बुद्धिमान अभिकल्प (इंटेलिजंट डिझाईन) अमान्य! समजा, ज्यामुळे बुद्धिमान अभिकल्प (इंटेलिजंट डिझाईन) सूचित होत आहे, असे शास्त्रीय पुरावे आणि तार्किक मांडणी पुढे येऊ लागली तर, ते वैज्ञानिक पुरावे आणि तार्किक मांडणी हे छद्मविज्ञान (स्यूडोसायन्स)!
मला खात्री आहे, हे पुस्तक पूर्ण वाचणारा वाचक, माझ्या निष्कर्षाशी सहमत असो वा नसो, पण तो या पुस्तकाला ‘छद्मविज्ञान’ मात्र नक्कीच म्हणणार नाही.
तेव्हा मित्रमैत्रिणींनो खुल्या मनाने आणि अपार कुतुहलाने चला तर या विस्मयकारक आणि धक्कादायक वैज्ञानिक सफरीवर!
उत्क्रांती : एक वैज्ञानिक अंधश्रद्धा – अरुण गद्रे,
सुनिधी पब्लिशर्स, पुणे
पाने – २६०
मूल्य – ४०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment