‘घाचर घोचर’ : आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत! (भाग ३)
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
भाग्यश्री भागवत
  • ‘घाचर-घोचर’ या कादंबरीच्या कन्नड, इंग्रजी, हिंदी आणि मराठी आवृत्तीची मुखपृष्ठं आणि कादंबरीकार विवेक शानभाग
  • Thu , 13 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस घाचर घोचर Ghachar Ghochar विवेक शानभाग Vivek Shanbhag

९.

यानंतर शानभाग नव्या घरातल्या प्रवेशाबद्दल आणि जुन्या, रिकाम्या होणार्‍या घराबद्दल सांगतात. या सगळ्या, म्हणजे जुनं घर, त्यातलं सामान, त्याचं कळकटलेपण, वापरलेपण यांच्याबद्दल सांगताना नेमाडेंच्या ‘जगण्याची समृद्ध अडगळ’ या ओळीचा पुन्हापुन्हा प्रत्यय येतो. कारण नव्या घराच्या दृष्टीनं हे सामान कमी असलं, तरी त्याने हर प्रकारे या कुटुंबाचं जगणं समृद्ध केलं आहे. समृद्ध कुठल्या अर्थी? तर कठीण काळात आयुष्यात येणाऱ्या वस्तू या फक्त भौतिक गरजेपलीकडे अनेक गोष्टी देत असतात.

अशा काळात मुबलकतेवर बंधनं असल्यानं प्रत्येक लहान वस्तूला मूल्य प्राप्त होतं. काहीशा अपरिहार्यतेतून असेल, पण अशा वेळी तुम्ही त्या वस्तूशी जोडले जाता. जोडलं जाण्याचा हा कालावधी मोठा असेल, तर बहुतांश वेळा त्या वस्तूशी तुमचे भावनिक बंधही तयार होतात. यातून वस्तूची केवळ ‘भौतिक अस्तित्व’ म्हणून असलेली मनातली ओळख तर नष्ट होतेच, पण मानवी मनाला उन्नत करणारी ठहराव, तुच्छताविरहित आपुलकी, गुंतवणूक ही तत्त्वं केवळ माणसापुरती मर्यादित न राहता, ती भवताल कवेत घ्यायला लागल्याने व्यापक होतात. त्यामुळे वस्तूंची वस्तुगतता नष्ट होऊन त्या सगळ्या आंतरसंबंधांच्या वाहक होतात. बेसुमार पर्याय, ‘वापरा आणि फेका’ ही सोय वस्तूंना वस्तुगतता तर देतेच, पण माणसाची भवतालाशी सूक्ष्म पातळीवर बसू शकणारी आंतरसंबंधांची वीणही तकलादू करते. वस्तूंची नष्ट होत जाणारी वस्तुगतता आणि बसत जाणारी आंतरसंबंधांची वीण हा काय प्रवास आहे?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

उपयोगिता मूल्य, आकर्षकता, चकचकीतपणा, आजच्या काळात बोलायचं तर ‘प्रेझेंटेबल’ असण्यापलीकडचा तर हा प्रवास आहेच, पण एका अर्थी तो वस्तूंपासून माणसापर्यंत प्रत्येकाला विशिष्ट चौकटीपलीकडे जाऊन पाहता येण्याचा प्रवास आहे; चौकटी उदार करण्याचा प्रवास आहे. उदार चौकटी काय देतात? बहुतांश वेळा त्या सौंदर्याची व्याख्या बदलतात; अनजजमेंटल असण्याला भावनिकतेची जोड देतात आणि गरज आणि प्रेम यांत अभेद तयार करतात. थोडक्यात, साध्य-साधन भाव एक होऊन जातो. अर्थात, हे भारतीय, पारंपरिक, अधिआत्मिक (धार्मिक नव्हे) तत्त्वज्ञान आहे.

आजच्या जगण्याच्या पार्श्‍वभूमीवर विचार करता, हे तत्त्वज्ञान दैनंदिन संसारिक जगण्यात व्यवहारात आणणं शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र जागतिकीकरणापूर्वी पारंपरिक मूल्यं बऱ्यापैकी प्रचलित असताना, त्या काळातल्या समाजातले अनेक दोष-जाच- अन्यायकारक चालीरीती हे सगळं जमेस धरूनही ही मूल्यं समाजाच्या सर्व थरांमध्ये बऱ्यापैकी कार्यरत असलेली दिसतात. जागतिकीकरणानं ‘माणूस’ प्राण्याला सर्व अर्थ केंद्रस्थानी आणलं, पण त्याच वेळी ‘माणूसपणाला’ मात्र क्रयवस्तू बनवलं. किंबहुना जागतिकीकरणापेक्षाही त्याची गती या मूल्यांच्या पडझडीसाठी अधिक मारक ठरली. जुन्या घरातून नव्या घरात जाण्यात या अधिआत्मिक आणि भौतिक सीमारेषांमधला ताण लेखकाने एकाच वेळी अत्यंत तरलपणे, पण तितक्याच क्रूरपणे वाचकांसमोर ठेवला आहे. हा अनुभव वाचताना ट्रांझिशन फेजमधल्या आजच्या वाचकाची निश्चित ओढाताण होते. तिचे बिंदू असे –

घरातलं सामान गेलं आणि घरातले कोपरेसुद्धा अगदी रिकामे, उघडेवाघडे दिसू लागले. आज घर अगदी पूर्ण रिकामं असल्यामुळे एरवी सामानाच्या मागे झाकला जाणारा केरकचरा आज डोळ्यांना स्पष्ट दिसत होता.

घरात सगळीकडे उजेड होता, पण तिथला जिवंतपणा निघून गेला होता. त्यामुळे घराच्या खोल्या लहान वाटू लागल्या होत्या.

मी पहिल्यांदाच घरात सगळीकडे चपला घालून हिंडत होतो.

कागदाचे छोटे छोटे कपटे, खिडक्यांवरली धूळ, कॅलेंडरची जागा सोडून बाकी कळकट झालेल्या भिंती, रिकाम्या खुंट्या, लोखंडी खुर्च्यांची मागची कड लागल्यानं भिंतीवर उठलेल्या खुणा, वर्तमानपत्राचे जुने, तेलकट कागद, स्वयंपाकघरातला तो विशिष्ट असा वास...‘या घरात आपण काय काय मागे ठेवून चाललो आहोत’ या विचारानं एकदम बेचैन झालो. या सगळ्या खुणांमध्ये आमच्या रोजच्या जगण्यातले क्षण विखुरले होते. बहुतेक आईच्या भावनाही अशाच असाव्यात. घर सोडण्यापूर्वी, तिने ते एकदा स्वच्छ झाडून घेतलं.

घरी जाऊन शेजाऱ्यांचा निरोप घेतला...आम्हाला मात्र तिथून निघताना वाईट वाटत होतं. ‘दिवस उजाडण्यापूर्वी आलेलं वैभव किती काळ टिकेल’ या विषयी सूक्ष्म अशी भीती वाटत होती.

प्रत्येक घरी निरोप घेण्यासाठी गेल्यावर तिथले लोक ‘येत जा अधूनमधून. आम्हाला विसरू नका’ असं सांगत होते. ‘हे सगळे कुठे आपल्या लक्षात राहणार आहेत! काही दिवसांत सगळं विसरायला होईल’ असं त्या वेळी मला वाटलं होतं. पण आता मागे वळून पाहता, त्यांचं बोलणं, त्यातला अर्थ नीट लक्षात येतोय.

हे (नवं) घर खूपच मोठं होतं...इथे प्रत्येकाला वेगळी खोली होती...इथं जागाच जागा होती. पण आमच्याकडे दोन खुर्च्या व एक वाघ एवढंच सामान होतं व ते कळकट व जुनं सामान या नव्या घरात काहीसं अनोळखी वाटू लागलं.

हे घर विकत घेण्याआधी आम्ही दोनदोनदा येऊन पाहून गेलो होतो. पण आता सामानासकट इथे प्रत्यक्ष राहायला आल्यावर ते वेगळंच वाटत होतं. जुन्या घरातलं सामान पटकन नजरेस पडणार नाही अशा प्रकारे, प्रयत्नपूर्वक इथे तिथे सामावून ठेवलं गेलं.

चिकप्पानं बाहेरून जेवण आणलं. पहिल्यांदाच आम्ही सगळे डायनिंग टेबलाभोवती बसून एकत्र जेवलो. “हॉटेलमध्ये बसून जेवतोय असंच वाटतंय ना!’’ अप्पांनी जोक करण्याचा प्रयत्न केला, पण कोणी हसलं नाही. “सगळ्याची सवय होईल’’ चिकप्पा म्हणाला.

“घरातल्या फर्निचरसाठी पैसे ठेवून दिले आहेत. वहिनी, तुम्ही मालतीला घेऊन जा व एकेक गोष्ट खरेदी करायला सुरुवात करा...भाव काय, किती पैसे ते विचारत बसू नका. ते मी पाहीन” असं चिकप्पानं सांगताच मालतीनं या कामात खूपच उत्साह दाखवला.

शेवटच्या बिंदूतलं शेवटचं वाक्य – “भाव काय...उत्साह दाखवला” हे उंबरठा, एक वळण सूचित करतं. या वाक्यावर प्रकरण संपवताना पैसा आणि आनंद एकाच वेळी स्वस्त होऊ घातला असल्याचं, कुटुंबातलं विकेंद्रीकरण संपूर्ण उतरंड निर्माण झाल्याचं आणि प्रतिष्ठा नावाची झूल अंगावर चढू पाहत असल्याचं डंखकारक सूचन करून वाचकाला गारद करत लेखकानं हे प्रकरण संपवलं आहे.

१०.

पाचवं प्रकरण हा जणू आसूड आहे. प्रत्येक स्वर अगदी परफेक्ट लागावा, तसा लावत लेखक छप्पर फाडून आलेल्या सुबत्तेच्या मानसिक दुभंगाच्या सगळ्या जागा खणखणीत आणि स्पष्ट करतो. हे सगळं प्रकरण वाचत असताना कादंबरीतल्या दोन जागा आणि नेमाडे यांच्या कवितेतली एक जागा अशा ओळी बॅकग्राउंडला सतत वाजत राहतात – संपत्ती आणि वृक्षाच्या वाढीचं आप्पांचं समीकरण, व्यावसायिक आणि नोकरदार यांच्या घरसंसारात नीतिमत्तेच्या असलेल्या फरकाचा निवेदकाचा शेरा आणि ‘दुःखाचा अंकुश असो सदा मनावर’ ही नेमाडे यांची ओळ.

..................................................................................................................................................................

चिकप्पाच्या षंढपणाचं स्वरूप भयावह आहे. कारण एकीकडे तो क्रौर्याचा आणि लालसेचा बळी असला, तरी दुसरीकडे त्याने स्वीकारलेला थंडपणा हा हा बाय चॉईस स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्याच्या षंढपणाचं स्वरूप पाताळयंत्री आक्रमक, बीभत्स क्रूर आणि थंड भयावह आहे. म्हणून चिकप्पाच्या बोलण्यापेक्षाही त्याची थंड देहबोली आणि आक्रमक वर्तन, त्याच्या शांततेत वसणारी क्रूर तुच्छता आणि विषवृक्ष वाढवण्यासाठी राबवली जाणारी बुद्धिमत्ता, मेहनत आणि या सगळ्यातून उभं राहणारं त्याचं कर्तृत्व हे सगळंच अंगावर येणारं, भयसूचक आणि प्रसंगी शिसारी आणणारं आहे.

..................................................................................................................................................................

या प्रकरणात मुख्यत्वानं आलेला मालतीच्या वर्तनातला आणि इतरांच्याही वर्तनातला फरक हे कादंबरीतल्या वर उल्लेख केलेल्या जागांचे ठळक परिणाम आहेत, पण या प्रकरणाच्या शेवटाकडे जाता जाता सगळा दोष सुबत्तेवरच ढकलण्यावर जेव्हा लेखक प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, तेव्हा कादंबरी तत्त्वज्ञानात्मक पातळी गाठते आणि नेमाडे यांच्या ओळी प्रकर्षानं वाजत राहतात – ‘दुःखाचा अंकुश असो सदा मनावर’ या ओळींचा एरवी अर्थ काय निघेल? तर परिस्थितीजन्य दुःख, म्हणजे कुठलातरी अभाव, कमतरता आयुष्यात कायम असावी, जेणेकरून सुखाची किंमत राहील. पण कादंबरीच्या शेवटच्या भागात या ओळींचा अर्थ वेगळाच भासू लागतो. या भागाच्या संदर्भानं या ओळी आठवतात व आठवताना असं भासतं की, ‘दुःख’ नावाच्या धारणेला किंवा मनाच्या अवस्थेला माणसाने कधीही मुकू नये. या अवस्थेला मुकणं किंवा तिचा सामना न करणं तुमच्यात जणू एक प्रकारचं निरंकुश वर्तन पेरतं. आणि एका मर्यादेपलीकडे तुम्हालाही न जुमानता ही निरंकुशता तुमचा ताबा घेते आणि तुम्हाला तिच्या पद्धतीनं नाचवते.

वास्तविक प्रकरणाच्या शेवटात लेखकाकडून हा तत्त्वज्ञानात्मक बिंदू उजागर होतो, पण या बिंदूच्या प्रकाशात जेव्हा आपण नव्याने, पहिल्यापासून हे प्रकरण पाहतो, तेव्हा दुःखाला चकवू पाहणारी आणि अनिर्बंध झालेली ही माणसं अधिकच केविलवाणी, व्हलनरेबल, बळी गेलेली आणि गरजू भासतात.

आमच्या घरात असा एक सुरुंग होता, की तो नेहमी स्फोट होण्याची वाट पाहत असायचा. हा सुरुंग म्हणजे मालती. आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर या सुरुंगाला पैशांची धुंदी चढू लागली.

आता खर्च करणं ही वैयक्तिक बाब झाली.

आता पूर्वीसारखं एकमेकांवर अवलंबून असणं कमी झालं.

आमच्या मनाच्या संभ्रमित अवस्थेला कधी कधी मालती प्रत्यक्ष रूप देत असे. तिच्या एकेका कृतीतून ते व्यक्त होत असे. तिचा आरडाओरडा, भांडखोरपणा, तिच्या वागण्यातला दिमाख या सगळ्यातून आमच्या नवीन जीवनशैलीचा प्रत्यय कोणत्या ना कोणत्या रूपात समोर येऊ लागला होता.

पैसा माणसाला खेळवतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. पैशाचं स्वतःचं असं अस्तित्व असतं. स्वतःची एक शक्ती असते. पैसे कमी असतील, तर परिस्थिती आपल्या आवाक्यात असते. अतिरिक्त पैसे मिळू लागले की, पैशाची ताकद आपल्यावर आक्रमण करायला लागते.

मालतीच्या लग्नात आम्ही अगदी मोकळेपणाने पैसे खर्च केले...वादळात गेल्यावर आपण स्वतःला भिजण्यापासून थांबवू शकत नाही, तद्व तो खर्च थांबवणं आम्हाला शक्य झालं नाही.

लग्नाच्या दिवशी सगळे धार्मिक विधी उरकल्यावर शेवटच्या पंक्तीला, अगदी शेवटच्या पानावर आप्पा खाली मान घालून जेवायला बसले होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘सगळं किती व्यर्थ आहे’ अशी जाणीव मनाला टोचू लागली. नानाविध पदार्थांनी भरलेल्या पानावर बसून आप्पा खिन्न मनःस्थिती जेवत होते.

मालतीच्या लग्नात झालेल्या खर्चाबद्दल मी असा वाकड्यात बोलतोय, असं समजू नका; पण आप्पा जर त्या वेळी सेल्समनच असते, तर मालती आता आलेली आहे तशी सहा महिन्यांतच संसार मोडून माहेरी परत आली नसती, हे नक्की. पैशांच्या दिमाखामुळे साध्या साध्या पण अपरिहार्य अशा गोष्टी सहन करण्याची तिची शक्ती कमी झाली होती.

विक्रम घरचं साड्यांचं दुकान सांभाळत होता. त्याला फक्त रविवार मोकळा असे. ‘माझ्यासाठी मला हवा तेव्हा त्यानं वेळ काढला पाहिजे’ हा मालतीचा हट्ट...तिच्या आदर्श संसाराच्या कल्पनेत कष्टाळू नवरा बसत नव्हता.

यानंतर समेटासाठी मालती, आई-आप्पा आणि निवेदक तिच्या सासरी जातात, तेव्हा मालती तमासखोरपणा करते. किरकोळ कारणावरून कपबशा फोडते आणि संबंध तुटतात. त्या वेळी मालतीची सासू म्हणते, “संस्कार पैशांनी विकत घेता येत नाहीत; ते पहिल्यापासूनच असावे लागतात...”...घडलेल्या या सगळ्या फार्समध्ये अप्पा एक अवाक्षरही बोलले नव्हते.

..................................................................................................................................................................

‘सुबत्ता विरुद्ध नैतिकता’ असा नसून ‘सुबत्ता विरुद्ध सत्य’ असा आहे, असं जाणवतं. कारण अत्यंत खालावलेल्या आर्थिक परिस्थितीतही नैतिकता शिल्लक राहत नाही. पण अशा अनैतिकतेला सुबत्तेचं शस्त्र वापरून सभ्यतेचा मुलामा दिला जात नाही. त्यामुळे जे घडतं ते नैतिक-अनैतिकतेच्या चौकटीपलीकडे जात ‘सत्य’ म्हणून उघडंवाघडं समोर येतं. ते झाकलं न गेल्यानं किंवा आधुनिक सभ्यतेची मूल्यं हाताशी धरून त्याला रंगरंगोटी न केल्यानं आपोआपच अधिक विकृत होण्यापासून, विषारी आणि विखारी होण्यापासून या सत्याचा बचाव होतो आणि प्रकाशात आल्याने त्याच्या फैलावाला आळा बसतो; ते माजत नाही. त्याच्यात स्खलनशीलतेला मर्यादा पडतात. मात्र सुबत्तेच्या बळजोरीवर सभ्यतेचा बुरखा पांघरून येणारं सत्य माणसाला हिंस्र तर करतंच, पण त्या हिंस्रतेबाबत षंढही बनवतं.

..................................................................................................................................................................

त्यानंतर संबंध तुटल्याने मालती आठवडाभराने तिचे दागिने आणायला सासरी जाते. त्या वेळी कारणाशिवाय चिकप्पाच्या सभ्य भाषेतले ‘वसुली एजंट’, पण मुळात पैशांसाठी धाकदपटशाही करणारे भाडोत्री गुंड घेऊन जाते. या सगळ्या प्रकारानं घाबरलेल्या, गाळण उडालेल्या सासरच्या लोकांची अवस्था चिकप्पा, आई आणि निवेदक यांना ती रंगवून, दिमाखानं सांगते. चिकप्पादेखील अशा वसुलीची भलावण करतो. मात्र झालेली गोष्ट योग्य नसल्याचा दाखला सगळ्यांच्या हालचालींमधून, देहबोलीतून मिळत असल्याचं निवेदनातून जाणवतं.

(त्यानंतर) आपल्या खोलीत जाऊन मालतीनं दरवाजा लावून घेतला. त्या दारासमोरून मी जात असता, आत ती ओक्साबोक्शी रडत आहे, हे मला जाणवत होतं. घडलेलं सगळं तिच्या हाताबाहेरचं होतं, असं मला वाटलं. एखादी अदृश्य शक्ती अहंकार ठासून भरलेल्या मालतीला, तिची जायची इच्छा नसलेल्या मार्गावर ढकलत आहे, असं मला वाटू लागलं.

त्यानंतर मालती एकदाही सासरी गेली नाही... प्रत्येक गोष्टीत नाक खुपसल्याशिवाय तिला राहवत नसे. त्यातच अनिता (निवेदकाची बायको) आली. ती आल्यानंतर आपल्या अधिकाराला कुठे धक्का तर लागत नाहीये ना, या भीतीमुळे मालती प्रत्येक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक लक्ष घालू लागली. उद्योग नसेल तेव्हा मोबाईलवरून सतत मेसेज पाठवत राहायची. कधीकधी तर मध्यरात्री तिच्या खोलीतून फोनवर बोलण्याचा आवाज यायचा... तिच्या (मैत्रिणीच्या) नावाखाली ती दुसऱ्या कोणाबरोबर गाव भटकत रात्रीपर्यंत वेळ काढत असावी, असा माझा अंदाज होता. अर्थात हे जरी खरं निघालं असतं, तरी मी काय करणार होतो? तिचं चित्त सैरभैर झालेलं होतंच, पण आमचीही स्थिती तशीच झाली होती की काय, असं कधीकधी मला वाटत असे.

जुन्या घरात असताना आम्ही दोघं मधल्या खोलीत झोपायचो...कधीकधी झोप येत नसेल तेव्हा आम्ही गप्पा मारायचो...अगदी क्वचितच ती तिचं मन मोकळं करत असे, असं मला आठवतंय...अशी (तिच्या मित्र-मैत्रिणींची) अनेक गुपितं ती मला सांगत असे. नवीन घरात आल्यावर प्रत्येकाला स्वतंत्र खोली मिळाली व अशा गप्पा अशक्य झाल्या.

या प्रकरणात चूक कोणाचीही असेल, मालतीबद्दल आम्हा सगळ्यांनाच सहानुभूती होती. घरी येणारे नातलग, लग्नकार्याला गेल्यावर तिथे भेटणारी परिचित माणसं, आमच्या स्वाभिमानाच्या फुग्याला टाचणी लावण्यासाठी आतुर असलेले आमचे हितचिंतक, कार्यात आलेल्या मुली अशा कितीतरी मंडळींच्या कुतूहलाची ती सावज बनत असे.

मला माहीत आहे, तिलाही हे असं घडायला नको होतं. कुणाच्याही बोलण्याला भीक न घालणारी, भांडखोर बाई म्हणून न वावरता सुखानं संसार करण्याची तिचीही इच्छा होती. पण कुठे तरी तोल ढळला. कुठे ते नाही कळलं. मात्र सगळं ओझं, अपराधीपणा याची जबाबदारी ‘सोना मसाले’वर ढकलणं कितपत योग्य आहे, हे मला माहीत नाही.

या शेवटच्या वाक्यानं प्रकरणाचा शेवट होतो. या ठिकाणी हे प्रकरण जी तत्त्वज्ञानात्मक उंची गाठतं, तिथं काय जाणवतं? स्वातंत्र्य, समता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वावलंबन, लिंगभेद विरहितता ही सगळी उदार, दुःखमुक्तीकडे नेणारी आधुनिक मूल्यं अर्थवत्तेच्या बळावर राबवता येऊ शकतात, पण या बळावर ती ‘सगुण साकार’ होऊ शकत नाहीत. ती ‘सगुण साकार’ होण्यासाठी सहनशीलता, सामंजस्य, स्वीकार, करुणा अशा पारंपरिक मानवी मूल्यांचं तोंड उघड करत करत आधुनिक मूल्यांना पोटात घ्यावं लागेल. तरच घडणाऱ्या सगळ्या बदलांना व्यक्तिमत्त्व प्राप्त होऊ शकेल. अन्यथा पारंपरिक-आधुनिकतेच्या एकमेकांशी झालेल्या प्रक्रियेशिवाय स्वीकारलेली मूल्यं दुभंगलेली पिढीच तयार करतील.

११.

सहाव्या प्रकरणात उच्चभ्रूपणाच्या स्थित्यंतरातून आलेल्या आणि कुटुंबात शिरकाव केलेल्या षंढपणाचं स्त्री-पुरुषांमधलं दर्शन लेखकानं घडवलं आहे. हे नैतिकतेच्या ऱ्हासाचं शेवटचं टोक भासतं. किंबहुना हे संपूर्ण प्रकरण वाचताना हा सगळा संघर्ष म्हणजे ‘सुबत्ता विरुद्ध नैतिकता’ असा नसून ‘सुबत्ता विरुद्ध सत्य’ असा आहे, असं जाणवतं. कारण अत्यंत खालावलेल्या आर्थिक परिस्थितीतही नैतिकता शिल्लक राहत नाही. पण अशा अनैतिकतेला सुबत्तेचं शस्त्र वापरून सभ्यतेचा मुलामा दिला जात नाही. त्यामुळे जे घडतं ते नैतिक-अनैतिकतेच्या चौकटीपलीकडे जात ‘सत्य’ म्हणून उघडंवाघडं समोर येतं. ते झाकलं न गेल्यानं किंवा आधुनिक सभ्यतेची मूल्यं हाताशी धरून त्याला रंगरंगोटी न केल्यानं आपोआपच अधिक विकृत होण्यापासून, विषारी आणि विखारी होण्यापासून या सत्याचा बचाव होतो आणि प्रकाशात आल्याने त्याच्या फैलावाला आळा बसतो; ते माजत नाही. त्याच्यात स्खलनशीलतेला मर्यादा पडतात. मात्र सुबत्तेच्या बळजोरीवर सभ्यतेचा बुरखा पांघरून येणारं सत्य माणसाला हिंस्र तर करतंच, पण त्या हिंस्रतेबाबत षंढही बनवतं.

स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर असलेल्या या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या षंढपणाचा स्तर, त्याची पातळी आणि त्याचं रूपही वेगवेगळं आहे; पण हा षंढपणा हर एक अर्थाने विदारक, करुण आणि प्रसंगी भयावहदेखील आहे. नायक-निवेदकाच्या बाबतीत हा षंढपणा अत्यंत करुण भासतो. कारण कुटुंबाची सर्वार्थानं होणारी पडझड त्याला अत्यंत सूक्ष्म पातळीवर आणि संपूर्ण संवेदन क्षमतेसह आकळते. मात्र सुबत्ता आणि सुविधा यांचं एका अर्थी व्यसन जडल्यानं तो निष्क्रीय झाला आहे. आप्पांच्या बाबतीतला षंढपणा अधिक विकल भासतो. कारण वयोपरत्वे आलेल्या अवलंबित्वामुळे सगळं कळूनही एका हतबलतेनं त्यांना व्यापलं आहे. तसंच आप्पांची नोकरी गेल्यानंतरही चिकप्पाच्या ‘कर्तृत्वा’मुळे कुटुंबाला तारलं असल्यानं त्यांच्या मूल्यांचा संबंध कर्तृत्वपेक्षा नाकर्तेपणाशी अधिक जोडला गेल्यामुळे आप्पांची हतबलता अधिक विकल भासते.

आईचा थंडपणा हा पूर्णपणे मानसिक अवलंबित्वातून आलेला आहे. कुटुंबाच्या दैनंदिन गरजांचं व्यवस्थापन आणि कुटुंबाची काळजी ही आईची मुख्य भूमिका आहे. तीच तिची ओळखदेखील आहे. कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात आईच्या या भूमिकेला अर्थ असलेला दिसतो. मात्र मुबलक पैसा खेळायला लागल्यावर आईची भूमिका किंबहुना चिकप्पा सोडून इतर सर्वांच्या भूमिका पोकळ झालेल्या दिसतात. मात्र हा पोकळपणा किंवा स्वतःच्या भूमिकेला आलेलं रिकामपण भरून काढण्याच्या ज्या वाटा किंवा ज्या जागा इतरांना उपलब्ध आहेत, तशा त्या आईला उपलब्ध नाहीत. कारण तिचं कुटुंबातलं स्थान तेच असलं, तरी आलेल्या पैशामुळे तिची भूमिका अचानक बदलली आहे. मात्र तिची ठेवण या भूमिकेशी विसंगत आहे आणि अचानक आलेल्या बदलानुसार अचानक ठेवण बदलण्याचं ओझं आघातासारखं काम करतं. अशा वेळी माणसाची गत विदूषकासारखी होते. त्याची कुठलीही हालचाल, वागणं-बोलणं हे सगळं एकाच वेळी हास्यास्पद आणि त्याच वेळी करुणही भासतं. बदललेल्या व्यवस्थेत आईची भूमिका अशीच भासते. त्यामुळे आईच्या षंढपणाला एक केविलवाणेपण आणि हास्यास्पदता यांचा रंग आहे.

मालतीच्या षंढपणाचं स्वरूप पूर्णपणे दिशाहीन आहे. मालती उपभोक्तावादाचा आदर्श नमुना ठरते. सारासार विचाराच्या कुंपणावर असलेली माणसं हे उपभोक्तावादाचे अंधबळी असतात. त्यांचं बळी जाणंही त्यांना कळत नाही. चैन ही गरज बनणं, ही ‘सुविधा’ नामक व्यसनाची अत्युच्च पातळी असते. वस्तूंपासून नातेसंबंधांपर्यंत प्रत्येक रचना स्वतःला अनुकूल राबवली जाण्याच्या भावनेनं पछाडल्यानं ‘विचार’ नावाची गोष्ट आणि ‘सुख-दुःख’ या दोन्ही कल्पना मालतीच्या आयुष्यात हद्दपार झाल्यागत बसतात आणि ‘बेधुंद’ नावाच्या न्यू नॉर्मलच्या दिशेनं ती सुसाट असलेली दिसते.

..................................................................................................................................................................

स्वातंत्र्य, समता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वावलंबन, लिंगभेद विरहितता ही सगळी उदार, दुःखमुक्तीकडे नेणारी आधुनिक मूल्यं अर्थवत्तेच्या बळावर राबवता येऊ शकतात, पण या बळावर ती ‘सगुण साकार’ होऊ शकत नाहीत. ती ‘सगुण साकार’ होण्यासाठी सहनशीलता, सामंजस्य, स्वीकार, करुणा अशा पारंपरिक मानवी मूल्यांचं तोंड उघड करत करत आधुनिक मूल्यांना पोटात घ्यावं लागेल. तरच घडणाऱ्या सगळ्या बदलांना व्यक्तिमत्त्व प्राप्त होऊ शकेल. अन्यथा पारंपरिक-आधुनिकतेच्या एकमेकांशी झालेल्या प्रक्रियेशिवाय स्वीकारलेली मूल्यं दुभंगलेली पिढीच तयार करतील.

..................................................................................................................................................................

चिकप्पाच्या षंढपणाचं स्वरूप भयावह आहे. कारण एकीकडे तो क्रौर्याचा आणि लालसेचा बळी असला, तरी दुसरीकडे त्याने स्वीकारलेला थंडपणा हा हा बाय चॉईस स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्याच्या षंढपणाचं स्वरूप पाताळयंत्री आक्रमक, बीभत्स क्रूर आणि थंड भयावह आहे. म्हणून चिकप्पाच्या बोलण्यापेक्षाही त्याची थंड देहबोली आणि आक्रमक वर्तन, त्याच्या शांततेत वसणारी क्रूर तुच्छता आणि विषवृक्ष वाढवण्यासाठी राबवली जाणारी बुद्धिमत्ता, मेहनत आणि या सगळ्यातून उभं राहणारं त्याचं कर्तृत्व हे सगळंच अंगावर येणारं, भयसूचक आणि प्रसंगी शिसारी आणणारं आहे.

या सर्व प्रकारच्या षंढपणाला नकोसं झालेलं एकच सत्य कुटुंबात वावरत असतं; जिवंत असतं आणि त्याची चिकप्पासकट सर्वांना भीती असते. ते सत्य म्हणजे, अनिता. वास्तविक, अनिताच्या प्रश्नांमधली, पेचप्रसंगांमधली, वक्तव्यांमधली कुठली गोष्ट अतिरंजित नाही. मात्र ती थेट, आडपडदा न राखणारी आहे. त्यामुळेच अतिरंजित वास्तवाच्या पातळीवर ती उठून दिसते. विवेकाचा धाक नसेल त्या वेळी वर्तन जसं डोळे मिटून दूध पिणार होतं, तशीच अवस्था अनिताच्या अनुपस्थितीत सर्व कुटुंबीयांची झालेली दिसते आणि ती घरी असताना मात्र ‘तू मला झाक, मी तुला झाकतो’ नामक दंभमग्न आटापिटा दिसतो.

१२.

शेवटच्या सातव्या प्रकरणाचा सगळा नीचोड ‘ब्लड इज थिकर दॅन वॉटर’ या विन्सेंटच्या विधानात आहे. हे विधान मोकळेपणाची भ्रामक भलावण करणार्‍या सगळ्या गोटांमधल्या दबा धरून बसलेल्या, पण सहजमान्य असलेल्या हिंसक तटबंद्यांवर अचानक प्रकाश टाकतं. इतका काळ पात्रांना पात्रं समजणाऱ्या, त्यांच्याशी कमी-अधिक फरकानं साधर्म्य वाटणाऱ्या वाचकांना स्वतःमधल्याच भेसूर प्रवृत्तीचं दर्शन घडावं, तसं हे विधान पृष्ठभागावर येतं. नात्यांच्या ढकोसल्याखाली माणसाचं स्वस्त होत चाललेलं माणूसपण आणि पर्यायानं स्वस्त होत चाललेलं मरण हे विधान अधोरेखित करतं.

सूक्ष्मात विचार करताना हेच कादंबरीचंही विधान असल्याचं भासतं. कारण हे विधान कादंबरीच्या कथानकाचा धागा आणखी मोठ्या परिप्रेक्ष्याशी जोडतं. त्यामुळे ‘भावना’ नामक तरल, पण व्हल्नरेबल जाणिवेच्या विकृत वापरातून कुटुंबातल्या छुप्या, हिंसक प्रवृत्तींना अधिमान्यता मिळवून देणारं हे परवलीचं विधान ठरतंच, पण धर्मवाक्य, वंशवाक्य, जातवाक्य आणि व्यापारवाक्य याही विरुपिकांची लक्तरं ते वेशीवर टांगतं.

परिणामी, षंढ नायक, त्याची भयव्याकूळ जाणीव आणि त्याच्या हातांना लागलेलं रक्त हे फक्त कादंबरीचं कथन राहत नाही, तर ते वाचकावर झडप घालणारं वास्तव होऊन जातं. त्यामुळे नायक आपला प्रतिनिधी वाटण्याऐवजी आपणच त्या नायकाचे क्लोन असल्याची घट्ट विळखा घातलेली जाणीव आपल्याला होत राहते आणि ‘घाचर घोचर’ हा नाद सगुण-साकार होतो.

घाचर घोचर या अक्षरांच्या उच्चारणातून निर्माण होणाऱ्या नादात जी घालमेल आहे, जो गुंता आहे आणि तरीही जी निरर्थकता आहे, तो सगळा दाब, सगळा ताण आणि त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर कोसळते आणि आपण या सगळ्याखाली दबले जात असल्याची भावना आपल्याला पछाडून टाकते. वास्तविक ‘घाचर घोचर’ एक शब्द आणि शीर्षक म्हणून त्याचं केलेलं उपयोजन लेखकाच्या प्रतिभेची झेप दाखवण्यासाठी पुरेसा आहे. कारण या एकाच शब्दाच्या ढांगेत वराह अवतारातल्या विष्णूप्रमाणे लेखकानं माणसाच्या मनोविश्वासकट सगळं विश्व कवेत घेतलेलं आहे.

..................................................................................................................................................................

पाचवं प्रकरण हा जणू आसूड आहे. प्रत्येक स्वर अगदी परफेक्ट लागावा, तसा लावत लेखक छप्पर फाडून आलेल्या सुबत्तेच्या मानसिक दुभंगाच्या सगळ्या जागा खणखणीत आणि स्पष्ट करतो. हे सगळं प्रकरण वाचत असताना कादंबरीतल्या दोन जागा आणि नेमाडे यांच्या कवितेतली एक जागा अशा ओळी बॅकग्राउंडला सतत वाजत राहतात – संपत्ती आणि वृक्षाच्या वाढीचं आप्पांचं समीकरण, व्यावसायिक आणि नोकरदार यांच्या घरसंसारात नीतिमत्तेच्या असलेल्या फरकाचा निवेदकाचा शेरा आणि ‘दुःखाचा अंकुश असो सदा मनावर’ ही नेमाडे यांची ओळ.

..................................................................................................................................................................

कादंबरीतलं विन्सेंट नावाचं पात्र एखाद्या आय ओपनरप्रमाणे काम करतं. ते इनसाइटफुल तर आहेच, पण माणसाची शहाणीव, उमज सतत जागी ठेवणाऱ्या जुन्याजाणत्या माणसाप्रमाणे काम करतं. लेखकानं ज्या प्रकारे कादंबरीभर हे पात्र विणलं आहे, ती वीण नेमके धागे आवळणारी आहे. कादंबरीतला या पात्राचा वावर कमी आहे, पण प्रत्येक घटनेला ते दृष्टीकोन आणि भूमी देण्याचं काम करतं.

या पात्राचं ठेवलेलं विन्सेंट हे नावही विचक्षणपणे ठेवल्यागत वाटतं. कारण विन्सेंट म्हटल्यावर प्रथमश्रवणी मनात विन्सेंट व्हॅन गॉगची जगणं चिमटीत पकडणारी चित्रं आणि त्याचे नेमके, विधानात्मक वन लायनर्स आठवतात. त्यामुळे व्हॅन गॉगचं कनेक्शन या पात्राशी लावल्यावर या पात्रकडे आणि त्याच्या नजरेतून कादंबरीकडे बघण्याची संपूर्ण दृष्टीच बदलून जाते आणि त्याच्या विधानांमधल्या तत्त्वज्ञानात्मकतेचा आपण आणखी सूक्ष्मपणे विचार करायला लागतो.

१३.

रचना, आशय आणि कादंबरीच्या एकूण अवकाशाचा विचार केला, तर कादंबरी अतिशय गोळीबंद आणि सडेतोड आहे. वावगेपणाला, लक्ष विचलित होण्याला किंवा अनर्थाला तिच्यात किंचितही जागा नाही. जगण्याचा सूक्ष्मपणे, तपशिलात आणि चिकित्सक विचार करण्याची अपरिहार्य परिणती म्हणजे नवी भाषा असते. अशा वेळी ती ‘शैली’च्या नावाखाली वेगळ्यानं घडवावी लागत नाही, याचा खणखणीत आणि दिपवून टाकणारा प्रत्यय या कादंबरीतली भाषा देते.

मी मूळ कादंबरी वाचली नसली, तरी मराठी अनुवाद भाषेचं हे वाण नक्कीच पेलतो आणि मूळ कादंबरीच्या प्रत्ययकारितेचा अनुभव देतो, असं म्हणावं लागेल. कारण या कादंबरीबद्दल विवेक शानभागांशी आणि इतरांशीही झालेल्या चर्चा आपण ऐकल्या, तर अनुवाद सशक्तपणे पेलला गेला असल्याची खात्री पटते.

अपर्णा नायगांवकर यांचा कन्नड भाषेशी असलेला दीर्घ परिचय, भाषेवर बारकाईने काम करण्याची निगुती आणि तरीही मूळ आशयाशी बांधीलकी राखणारी सहजता आणि अनेकार्थता कादंबरीभर स्पष्टपणे जाणवते. व्याकरणाच्या किरकोळ दुरुस्त्या आणि जास्तीच्या पडलेल्या डोळ्यात येणाऱ्या स्पेसेस यांशिवाय कुठल्याही मोठ्या चुका कादंबरीत आढळत नाहीत.

मात्र जगभरातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून, नियतकालिकांमधून आलेली या कादंबरीसंदर्भातली पुस्तकाच्या सुरुवातीला छापलेली महत्त्वपूर्ण विधानं काही प्रमाणात कादंबरीला गालबोट लावतात. कारण एक तर फक्त सुरुवातीच्याच काही विधानांचा अनुवाद केला आहे आणि या विधानांचा अनुवाद अगदी गचाळ झाला आहे. त्यामुळे जगभरात कादंबरीबद्दल काय बोललं जातं आहे, हे उत्सुकतेनं पाहू गेल्यास वाचकाचा विरस होतो. पुन्हा पहिल्या जेमतेम दोन-अडीच पानांवरच्याच विधानांचा अनुवाद केला आहे. पुढची सगळी विधानं जशाच तशी इंग्रजीतच ठेवली आहेत. हा जरा धेडगुजरेपणाचा प्रकार वाटतो.

पण तरी मेहता पब्लिशिंग हाऊसने नेहमीप्रमाणे कादंबरीची निर्मिती आणि मांडणी उत्तम केली आहे. मलपृष्ठावरील मजकूर मात्र कादंबरी वाचण्याची उत्सुकता निर्माण करण्यासाठी अगदी फिका आणि रटाळ ठरतो. कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी सतीश भावसार यांनी केलेलं मुखपृष्ठ चांगलं आहे. ‘घाचर घोचर’ या शीर्षकाच्या अर्थात अपेक्षित गुंता, कादंबरीच्या आशयाला अनुरूप विकटपणा, स्लो पॉयझनिंग आक्रमकता, विसविशीतपणा आणि निरर्थकता यांचं उत्तम फिलिंग हे एकूण मुखपृष्ठ आणि त्याचे रंग निर्माण करतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मात्र इंग्रजीतल्या या पुस्तकाचं हार्ड कव्हर आणखी टोकदार आहे, असं म्हणावं लागेल. स्वच्छ, पांढऱ्या बशीवर उमटलेला ज्योतीसारखा चहाचा डाग आणि त्याभोवती लांबवरून येत केंद्रित होणाऱ्या मुंग्या असं हे मुखपृष्ठ आहे. जणू पांढरपेशेपणाला, सभ्यतेला या मुंग्या भुसभुशीत करून टाकताहेत. पण तरीही याही चित्रामधल्या मुंग्या काळ्या आहेत. वास्तवात, कादंबरीत लेखकाचा असलेला विशेष रोख मात्र लाल मुंग्या आणि त्यांच्या उपद्रवकारकतेवर आहे.

१४.

सगळ्या जगण्याची भगदाडं, खिंडारं, कीड यांचा जळता निखारा पोटात ठेवून आतडी सोलून काढणारी ही कादंबरी आहे. जगभर या कादंबरीची चर्चा सुरू असताना मराठी साहित्यविश्वानं मात्र नगण्य अपवाद वगळता तिची दखल घेतलेली दिसत नाही. अर्थात, यातून जगण्यातल्या जागरूकतेबाबतचं आपलंच करंटेपण सिद्ध होतं.

या कादंबरीच्या अनुषंगानं झालेल्या एका चर्चेत शानभागांनी स्वतःच्या लिखाणाबद्दलची एक अत्यंत इंटरेस्टिंग आणि इनसाइटफुल गोष्ट सांगितली आहे. तिचा साधारण गोषवारा असा – ते म्हणतात की, पूर्वी त्यांची अशी कल्पना होती की, हातून काहीतरी चांगलं लिहिलं जाण्यासाठी भरपूर प्रवास करण्याची आणि जगाचा अनुभव घेण्याची गरज असते. पण एका कानडी लेखकाचं लिखाण वाचताना त्यांना जाणवलं की, बाहेरचं विश्व हे हिमनगाचं टोक असतं; माणसाच्या मनोविश्वात जे घडतं, त्या अंतरंगात खोल सूर मारता आला, तर अधिक चांगलं, सूक्ष्मातलं काही हाती लागण्याची शक्यता असते.

थोडक्यात, ‘आपले बाहेरचे रस्ते अंतर्मुख कधी होणार?’ एवढाच खरा प्रश्न असतो; आहे.

(समाप्त)

.............................................................................................................................................

‘घाचर घोचर’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4468/Ghachar-Ghochar

..................................................................................................................................................................

लेखिका भाग्यश्री भागवत ग्रंथसंपादक आहेत.

bhagyashree84@gmail.com 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......