देवेंद्र फडणवीसांनी ‘खोदा पहाड, (मगर) निकला जिनी’!
पडघम - राज्यकारण
राजा कांदळकर
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • Mon , 27 February 2017
  • राज्यकारण State Politics देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP शिवसेना Shivsena उद्धव ठाकरे Udhhav Thackeray राज ठाकरे Raj Thackeray शरद पवार Sharad Pawar पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan अशोक चव्हाण Ashok Chavan

मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी राज्यात मिळवलेल्या यशानं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार-अजित पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण-पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला असेल. त्यांची झोप उडाली असेल. २३ फेब्रुवारी हा दिवस होताच तसा ऐतिहासिक. या दिवशी लागलेले महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा यांच्या निवडणुकांचे निकाल साधेसुधे नाहीत. या निकालांनी पुढच्या २५-२५ वर्षांत महाराष्ट्राचं चित्र वेगळं ठरण्याची शक्यता निर्माण केली आहे.

२३ फेब्रुवारीच्या निकालाने ‘मुंबई म्हणजे शिवसेना’ हे समीकरण मोडीत काढलं. मुंबई महानगरपालिकेत सेनेला ८४ तर भाजपला ८२ असे या पक्षांचे नगरसेवक निवडून आले आहेत. सेना म्हणते ‘आम्हीच मुंबईत एक नंबर’, पण सेनेच्या या दाव्यात आता काही अर्थ उरलेला नाही हे स्पष्ट आहे. मुंबईच्या निवडणुकीत आतापर्यंत जे बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना जमलं नव्हतं, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आहे. मुंबईत भाजपची ही आश्चर्यकारक वाढ, यापुढे सेनेला सर्वांत मोठा धोका ठरेल. सेनेनं यापुढे भाजपबरोबर सत्तेत भागीदारी केली, युतीच्या तडजोडी केल्या तरी भाजप हाच सेनेचा खरा, शत्रू नंबर एक आहे, हे आता जगजाहीर झालं आहे. तेव्हा सेनेला आता भाजपबद्दल नि‌र्वाणीचा विचार\निर्णय करावा लागेल. सेना आता खूप काळ भाजपबरोबर फरफटत राहिली, तरी त्यात तिचाच तोटा जास्त होण्याची शक्यता आहे.

भाजपने पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावतीसह दहा महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपने राष्ट्रवादीकडून हिसकावून घेतलं आहे. नाशिकमध्ये मनसेचं पानिपत करून भाजपने यश मिळवलं आहे. या यशाकडे वरवर पाहून चालणार नाही. नाशिक आणि राज ठाकरे यांचं नातंचं भाजपने मोडीत काढत हा विजय मिळवला आहे. राज ठाकरेंनी विद्यार्थिदशेपासून नाशिकमध्ये काम केलं होतं, कार्यकर्ते घडवले होते. ते सर्व या निवडणुकीत भाजपने उदध्वस्त करून टाकलं आहे.

वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देताना राज ठाकरे म्हणायचे की, ‘मला या निवडणुकीत बघायचंय की, लोक कामाला मत देतात की पैशाला? काम जिंकतं की, पैसा हे २३ तारखेला कळले. मी लोकांच्या निर्णयाची वाट पाहतोय.’ नाशिकमध्ये वाताहतीवर राज ठाकरे अजून तरी बोललेले नाहीत. मुंबईत लोकांनी मनसेला केवळ सात नगरसेवक देऊन साथ दिली  आहे. या साथीसंदर्भात त्यांच्या निवडणुकीतल्या ‘साथ द्या’ या गाण्याबद्दल सोशल मीडियावर खूप टिंगलटवाळी सुरू आहे. पण राज ठाकरे त्याबद्दलही काही बोललेले नाहीत. असो.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने राष्ट्रवादीला हटवून मिळवलेल्या यशाने पवार काका-पुतणे हादरले असतील. कारण निवडणुका जिंकण्यात साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरण्यात पवार पॉवरफुल होते. आता ते कमी पडत आहेत आणि त्यांच्यापेक्षाही पॉवरफुल इलेक्शन मॅनेज करणारे लोक तयार झाले आहेत, याची प्रचिती त्यांना आली असेल. या दोन्ही शहरांचा सामाजिक चेहरा बहुजन आहे. पुण्याला लोक ब्राह्मणी चेहऱ्याचं शहर म्हणत असले तरी तो चेहरा तीन-साडेतीन पेठांच्या पलीकडे जात नाही. ब्राह्मणेतर चळवळीच्या या शहराला मोठी परंपरा आहे. या शहरात डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकरी चळवळीचं मोठं पॉकेट उभं केलेलं आहे. समाजवादी चळवळीची पॉकेटस या शहरात आहेत. कम्युनिस्टांच्या कामगार संघटना पुणे, पिंपरी-चिंचवड उद्योग पट्ट्यात आहेत. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी चळवळीचे गट या दोन शहरात आहेत. मराठा क्रांती मोर्चा या शहरात सर्वांत मोठ्या संख्येनं निघाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने मिळवलेलं यश विशेष आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात भाजपने फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनाच हरवलं असं नव्हे, तर त्यांनी सेना, मनसेचीही पॉकेटस विस्कळीत केली आहेत. म्हणजे मुंबई, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड या चारही शहरांत भाजपने मनसे हा पक्ष टार्गेट करून संपवल्याचं दिसतं.

सोलापूर या शहराचा तोंडवळा आणि अंतरंग हे बहुजातीय, बहुधार्मिक आणि बहुभाषिक आहे. या शहरात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. त्यांची मुलगी प्रणिती शिंदे आमदार आहेत. असं असूनही या शहरावर भाजपने पकड मिळवली आहे, ही काँग्रेसला मोठी चपराक आहे.

दहा महानगरपालिकांमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाचे आणखीही अनेक अर्थ लावता येतील. महाराष्ट्र हे शहरीकरण झालेलं देशातलं नंबर एकच राज्य आहे. या राज्यात जवळपास ५५ टक्के म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लोक शहरात राहतात. ही शहरं इतर राज्यावर प्रभाव गाजवतात. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर ही शहरं राज्याच्या विकासाची इंजिन आहेत. त्यांची स्टेअरिंग भाजपने बळकावली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही भाजपचं बीड जिल्हा वगळता बाकी जिल्ह्यातलं यश लक्षणीय आहे. लातूर जिल्हा परिषद हा काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपने कबजात घेतला आहे. विलासराव देशमुखांचे पुत्र अमित देशमुख यांना लातूरकरांनी नाकारलं आहे. लातुरसारखाच सांगली हा जिल्हा वसंतदादा पाटलांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पतंगराव कदम आणि वसंतदादांचे नातू यांना नाकारत लोकांनी भाजपच्या ताब्यात ही जिल्हा परिषद दिली आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातली भाजप रोवून उभा राहिला आहे. शहरी आणि भटजी-शेटजी यांचा पक्ष, या प्रतिमेतून भाजप या निवडणुकीत पूर्णपणे बाहेर पडला आहे. आता तो महाराष्ट्राचा पक्ष झाला आहे. आणि ते ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घडतं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ‘भाजपची राजवट म्हणजे नवी पेशवाई आहे’, अशी टीका केली आहे. आता साऱ्या महाराष्ट्रात सर्व स्तरांत भाजप विस्तारतोय. त्याची ही अफाट ताकद बघून आंबेडकर काय विश्लेषण करतात, हे ऐकण्याची उत्सूकता निर्माण झाली आहे.

राज्यात जे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, एस.एम.जोशी, रामभाऊ म्हाळगी, शरद पवार यांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी तरुण वयात, पन्नाशीच्या आत, करून दाखवलं आहे. अर्थात हे यश भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सततच्या तयारीचा भाग आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी निवडणूक मॅनेजमेंट, मीडिया मॅनेजमेंटचं नवीन तंत्र आणलं. एक चेहरा बेस्ड (ब्रँड इमेज) निवडणुका लढवत एका एका ब्रँडचं जसं आक्रमक मार्केटिंग करतात, तसं ग्राहकांना गुंगवून, भ्रमित करून, मोहवून शेवटी गिऱ्हाईक बनवतात. त्या तंत्राचा वापर भाजप प्रत्येक निवडणुकीत करतो आहे. विशेषत: नवा मतदार या मार्केटिंगच्या तंत्राला साथ देतोय. भाजपने मतदाराला गिऱ्हाईक बनवलं आहे, हेही या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. इतर पक्षांपेक्षा विचारी कार्यकर्त्यांचं केडर भाजपकडे मोठं आहे. हे केडर निवडणूक मॅनेजमेंटमध्ये उपयोगी येतं.

आता देवेंद्र फडणवीस हे ‘महाराष्ट्राचे मोदी’ बनले आहेत. त्यांच्या नेतृत्वाला कुणी आव्हान करण्याचं धाडस करणार नाही. ‘जनतेच्या मनातला मी मुख्यमंत्री’ अशी अपरिपक्व विधानं करणाऱ्या पंकजा मुंडे यांना लोकांना नाकारलं आहे. महाराष्ट्रात आता भाजप हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष दुबळे झाले आहेत. मनसे तर संपल्यात जमा आहे. त्यामुळे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये जसं भाजपचं राजकारण ‘वन लीडर, वन पार्टी’ भोवती फिरतं, तसं महाराष्ट्रात होणार असं चित्र दिसू लागलं आहे.

या निवडणुकीत मनी, मसल्स आणि पॉवरचा बेसुमार वापर झाला, याची चर्चा मुद्रितमाध्यमं, इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि सोशल मीडिया यांवर सुरू आहे. पण हे आरोप पूर्वी काँग्रेस, शरद पवारांवर लोक करत, आता भाजपवर करत आहेत. या आरोपांमध्ये काही प्रमाणात सत्यांश जरूर आहे, पण निवडणूक मॅनेजमेंट एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यपद्धतीने भाजपने केलं. त्याचा या यशात मोठा वाटा आहे.

भाजपचं काँग्रेसीकरण होत आहे, हा आरोप करणारे लोक भाबडे आहेत. भाजपचं रूपांतर कार्पोरेट इलेक्शन मॅनेजमेंट कंपनीमध्ये होत आहे. राजकीय पक्षाचं असं रूप अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचं आहे. युरोप-अमेरिकेत राजकीय पक्ष पोलिटिकल कार्पोरेशन म्हणून काम करतात. भाजप त्या वाटेनं प्रवास करत आहे. म्हणून या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी प्रोफेशनल पद्धतीने मुंबई राज्याचा पहाड खोदला… त्यातून त्यांच्या हाती जिनी लागला. हा जिनी त्यांची हवी ती इच्छा पूर्ण करू शकेल. हा जिनी जोपर्यंत फडणवीस यांच्या हातात आहे, तोपर्यंत राज्यात ‘देवेंद्रपर्व’ सुरू राहील.

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......