अजूनकाही
‘इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यु’ हा विल मॅककोरमॅक आणि मायकेल गोविएर यांनी दिग्दर्शित केलेला अवघ्या १२ मिनिटांचा अॅनिमेटेड लघुपट. एप्रिल २०२१मध्ये झालेल्या ९३व्या अॅकेडमी अवार्ड्स सोहळ्यात या लघुपटाला ‘बेस्ट अनिमेटेड शॉर्ट फिल्म’चे पारितोषक मिळाले आहे.
या लघुपटात कोणतेही संवाद नाहीत आणि सब-टायटलल्ससुद्धा नाहीत. या दोन्हींचीही गरज नाही, इतका तो जिवंत, सजीव आणि रसरशीत झालेला आहे. याचं श्रेय आहे दोन्ही दिग्दर्शक आणि अॅनिमेटर डायरेक्टर योनग्रान न्हो यांचं.
कथा अमेरिकेत घडते. एका मध्यमवर्गीय घरात नवरा-बायको डायनिंग टेबलवर जेवत असतात. पण दोघांमध्ये विचित्र तणाव असतो. एका निराशेनं त्यांना ग्रासलेलं दिसतं. खरं तर दोघांना एकमेकांशी बोलून, भांडून मन मोकळं करायचं आहे. त्यांच्या मनात परस्परांविषयी रोष आहे. त्यामुळे ते दोघं तणावात आहेत. संपूर्ण लघुपटात मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी दिग्दर्शकांनी काळ्या प्रतिमांचा वापर समर्पकपणे केला आहे. सुरुवातीच्या दृशात नवरा-बायकोच्या मनात असणारा तणाव व्यक्त करताना दोन काळ्या प्रतिमा एकमेकांशी बोलतात, वाद घालतात, पण प्रत्यक्षात नवरा-बायको टेबलावर जेवत असतात.
नवरा थोड्या वेळानं बाहेर पडतो. तेव्हा घराच्या भिंतीचा उडालेला एक टवका दिसतो. तो पाहून नवरा अस्वस्थ होतो. गतस्मृती त्याच्या मनात दाटून येतात. तो भावूक होतो. एक प्रतिमा भिंतीवर उडालेल्या त्या टवक्याजवळ येते आणि पुन्हा अदृश्य होते. ही काळी प्रतिमा कुणाची, असा आपल्या मनात प्रश्न येतो. या नंतरचं प्रत्येक दृश्य आपल्याला भावूक करत जातं.
बागेमधील सुंदर फुलं बघत असताना बायको गहिवरते. मनातले विचार तसेच तटस्थ ठेवून हळूच एक फूल तोडते आणि दूर निघून जाते. पुन्हा तीच प्रतिमा आपल्याला दिसते आणि आपलं कुतूहल वाढत जातं.
हे कुटुंब मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे सर्व प्रसंग घरगुती स्वरूपाचे आहेत. पण असं असलं तरी प्रत्येक प्रसंग भावूक पद्धतीनं साकारला आहे. वॉशिंग मशीनमधील शर्ट बघून बायकोचं रडणं, तिचं गहिवरणं बघून त्या काळ्या प्रतिमेनं तिला मिठी मारून सांत्वन करणं, नवऱ्यानं विचारांच्या तंद्रीत टीव्ही बघणं, हे सर्व प्रसंग पाहताना आपल्या लक्षात येतं की, हा आठवणीचा प्रवास त्यांच्या मुलीच्या संदर्भातला आहे.
अॅनिमेशन म्हणजे केवळ चित्रप्रवाह वा ध्वनिप्रवाह नाही. या दोन्ही बरोबर त्याला संगीताची साथ मिळाली की, प्रसंगातील भावना अधिक प्रभावी होतात. या लघुपटात याचाच अनुभव येतो. या नवरा-बायकोच्या आठवणी शिगेला पोचतात, तेव्हा ‘I hate dudes try to chase me. But I love it when you try to save me’ या गाण्यामुळे सर्व प्रसंग अजून भावोत्कट होतो. आणि आपल्यालाही एक अनामिक हुरहूर वाटू लागते.
या लघुपटातल्या दोन्ही पात्राच्या चेहऱ्यांवरचे भाव दिग्दर्शकानं अतिशय उत्तमरित्या साकारले आहेत. केवळ चेहऱ्यावरच्या भावना आणि मनातल्या भावना, यांच्या जोरावर कुठल्याही शब्दांचा आधार न घेता, हा लघुपट थेट आपल्या काळजाला हात घालतो… हलवून टाकतो… मनात, छातीत, श्वासात रुतून बसतो.
‘नेटफ्लिक्स’वर हा उत्तम लघुपट उपलब्ध आहे. शक्य तेवढ्या लवकर पाहावा. विकेंड मजेत जाईल.
.................................................................................................................................................................
सतीश कुलकर्णी
satishkulkarni2807@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment