अजूनकाही
विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या व्यथा मांडणारं ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ हे किरण चव्हाण यांनी संपादित केलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. शिक्षणक्षेत्रातील एका विदारक सत्याचा पंचनामा करणारं हे पुस्तक इचलकरंजीच्या पद्मरत्न प्रकाशनानंं प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं लेखकानं लिहिलेलं हे मनोगत...
..................................................................................................................................................................
आजच्या शिक्षणक्षेत्रातील विदारक सत्य असलेल्या, ‘विनाअनुदानित’ या ज्वलंत विषयावर आणि २० वर्षांपासून हक्काच्या अनुदानासाठी लढणाऱ्या, झगडणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षावर आधारित ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २१ ऑक्टोबर २०२१ रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुणे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पार पडला. या पुस्तकाच्या अनुषंगानं हा शब्दप्रपंच…
मी जरी एक विनाअनुदानित शिक्षक असलो तरी, जेव्हा एक माणूस म्हणून या प्रश्नाकडे पाहतो, त्या वेळी मला प्रकर्षानं जाणवतं की, ‘विनाअनुदानितचा संघर्ष हा केवळ विनाअनुदानित शिक्षकांचा संघर्ष नसून व्यवस्थेकडे माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणाऱ्या माणसांचा संघर्ष आहे.’ नेमका काय आहे हा संघर्ष? काय आहे ही वेदना? जाणून घेतलं तर, इथल्या व्यवस्थेनं या घटकावर कशा प्रकारे अन्याय केला आहे, त्यांच्या जगण्याचा प्रश्न कसा अनुत्तरित आणि बळकट केला आहे, हे कळून येतं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
२० वर्षांपासूनचा संघर्ष, १७०पेक्षा अधिक आंदोलनं, शेकडो विनाअनुदानित शिक्षकांच्या आत्महत्या, विनावेतन निवृत्त झालेले आणि उद्याच्या आशेवर अजूनही उपाशीपोटी अविरतपणे ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक… प्रदीर्घ संघर्ष करूनही आज पदरात काय पडलं, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. वर्तमानात कसं जगायचं आणि आपल्या कुटुंबाला कसं जगवायचं, या दोन प्रश्नांशी लढत-झगडत उद्याचं भविष्य आशेवर सोपवून दिलेलं आहे.
जळगावचे किशोर पाटील विनाअनुदानित शिक्षक. गेली १३ वर्षं विनापगार आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. जिथं हातातोंडाची गाठ पडायची मुश्किल, तिथं उपचाराचा १०-१२ लाख रुपये खर्च कसा करणार? त्यांच्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः हातात झोळी घेऊन भीक मागून आपल्या गुरूसाठी निधी जमा केला.
एक शिक्षक भगिनी आहेत. विनाअनुदानितच्या प्रश्नानं त्यांचा भरला संसार उदध्वस्त होण्याची वेळ आली आहे. पती-पत्नीत घटस्फोट होऊन आज ते विभक्त राहतात. विनापगार काम करताना मुलाबा-बाळांना दुकानातून साधा बिस्किटचा पुडा घेतानाही आम्हाला विचार करावा लागतो, असं त्या म्हणतात.
स्वातंत्र्यदिनी एक विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करतो, तर कुठे बापानं बिनपगारी शिक्षक लेकाचे हाल बघवेनात म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणं आहेत. प्राध्यापक असलेल्या अहमदनगरच्या राम सोनवणे सरांचे आई-वडील लेकाचा पगार कधी सुरू होईल, या आशेवर जगत अखेर झुरून मरून गेले. आजही १८ वर्षं झाली हा शिक्षक मुलगा बिनपगारी काम करतो आहे.
करोनाकाळात तर विनाअनुदानित शिक्षकांची झालेली दयनीय अवस्था शब्दांत व्यक्त करणंही कठीण आहे. करोनानं क्षणात कसं होत्याचं नव्हतं केलं, हे एका विनाअनुदानित शिक्षकाची पत्नी हुंदके देऊन सांग होती. १४ दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेर करोनानं त्यांचा नवरा गेला. १७ वर्षं विनावेतन काम करून आता कुठे ४० टक्के पगार खात्यावर जमा झाला होता. तोही या करोनानं त्या शिक्षकाला बघू दिला नाही. आता कुठे संसाराला चांगली सुरुवात झाली असताना करोनानं या परिवाराला दृष्ट लावली.
विनाअनुदानित शिक्षक सुनील शेंडे सरांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला पगारासाठी २० वर्षं संघर्ष करावा लागतो. अशा कित्येक ज्ञानवंताची आजपर्यंत परवड व उपेक्षाच होत आली आहे.
प्रमोद पाटलांसारखा विनाअनुदानित शिक्षक म्हणतो, ‘‘मी भाग्यवान आहे, कारण मी विनाअनुदानित शिक्षक आहे.’’ किती वेडा माणूस असेल हा! पण याचं खरं कारण काय? तर आज असंख्य विनाअनुदानित शिक्षकांच्या अडीअडचणींसाठी धावून जाणं, आपल्याकडून जे होईल ती मदत करणं, त्यांना शाब्दिक, मानसिक आधार देणं, या संघर्षाच्या वादळात विझू पाहणारी एखादी जरी प्राणज्योत आपल्या शब्दांच्या आडोशानं वाचली तरी धन्य झालो… या आंतरिक तळमळीतून हा शिक्षक असं म्हणतो.
अशा परिस्थितीत विनाअनुदानित शिक्षकांची मानसिकता कशी असेल? नैराश्य, उदासीनता, उद्विग्नता... आणि एवढं असूनही त्याचं कर्तव्य हे ‘राष्ट्रीय कर्तव्य’ असल्यानं ते वैयक्तिक पातळीवरच्या अडीअडचणी या कर्तव्यात कुठेही आड येऊ देत नाहीत. भलेही त्याला कुपोषित जगावं लागत असलं तरी देशाची भावी पिढी सकस, पोषक आणि सदृढ बनवायची आहे, ही जाणीव त्याला पदोपदी ठेवावी लागते.
विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न सोडवण्याची भूमिका शासनव्यवस्थेतल्या आजपर्यंतच्या कारभाऱ्यांनी घेतली नाही, हे एक खूपच मोठं दुर्दैव. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी बांधीलकी जपणारी नेतेमंडळी आता राहिलेली नाहीत. ज्याकरता आपण राजकारण्यांना निवडून देतो, ते जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा ‘जोडोनिया धन गैर व्यवहारे’ यामागे लागलेले दिसतात. आपलं दुकान बंद होऊ नये म्हणून प्रश्नांची सोडवणूक न करता तो प्रलंबित, खोळंबित, विलंबित ठेवून आपला राजकीय स्वार्थ साधायचा, ही राजकीय नेत्या-पुढाऱ्यांची सर्वसाधारण मानसिकताच झालेली आहे. पण आमचे विनाअनुदानित शिक्षक बंधू-भगिनी आपली जिद्द न हरता चिकाटीनं आपल्या हक्काच्या आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. निर्ढावलेल्या व्यवस्थेला लोकशाही मार्गानं जाग आणण्याचं काम करत आहेत.
विनाअनुदानितच्या या भळभळत्या जखमेला शब्दरूपात मांडताना त्यातील वेदनेचा तळ गाठणं किती कठीण आहे, याची मला वेळोवेळी जाणीव होत गेली. कारण या वेदनेची खोलीच इतकी आहे की, त्याचा अंतच लागत नाही. त्यामुळे त्याचा काही अंशच मला या पुस्तकात मांडता आला आहे. बरंच काही मांडायचं राहून गेलं, याची नम्र जाणीव आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ही विनाअनुदानितची संघर्षगाथा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी; या वेदनेला समाजाच्या संवेदनेची जोड मिळावी. दुभंगलेल्या, खचलेल्या मनाला समाजनाचा आधार मिळावा; त्यांचा आकांत, आर्जव समाजानेही ऐकून घेऊन या नकारात्मकतेवर विविध घटकांतून, क्षेत्रांतून एक सकारात्मक संवाद घडावा; अशी अपेक्षा आहे. आजही आपल्या जगण्यासोबत इतरांचं जगणं समृद्ध, अधिकाधिक सुंदर व्हावं, यासाठी धडपडणारी, दुःखावर फुंकर घालून मोडलेल्या माणसांना उभं करणारी माणसं आहेत, असा माझा विश्वास आहे.
त्यांच्यापर्यंत ही वेदना पोहोचली तर नक्कीच विनाअनुदानित शिक्षकांच्या संघर्षाला समाजाची सहानुभूती मिळेल आणि त्यांचा संघर्ष अधिक धारदार बनेल. म्हणून मी आशा ठेवून आहे की, व्यवस्थेतल्या निर्ढावलेल्या, स्वार्थी आणि असंवेदनशील माणसांच्या मनात जरब आणि धाक निर्माण झाल्याशिवाय हे परिवर्तन शक्य नाही.
विनाअनुदानितचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि व्यवस्थेतील माणसांची सकारात्मकता, या दोन्हींची गरज आहे.
..................................................................................................................................................................
‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ : किरण चव्हाण
पद्मरत्न प्रकाशन, इचलकरंजी
पाने : १६०
मूल्य : २७० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Narendra Apte
Fri , 07 January 2022
विनाअनुदानित शाळांची मुळात गरज का निर्माण झाली? अनुदानित शाळेतील शिक्षक किती काम करतात? या शिक्षकांच्या भरतीत काय काय घडते? या प्रश्नांना सामोरे जाण्याचे धाडस कोणाकडे आहे?