रवींद्र केळेकर यांच्यानंतर दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे कोकणी भाषा इतर भारतीय भाषांप्रमाणेच सशक्त आणि समृद्ध आहे, हे वास्तव अधोरेखित झाले आहे!
पडघम - साहित्यिक
माधव बोरकार
  • दामोदर मावजो आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 07 January 2022
  • पडघम साहित्यिक दामोदर मावजो Damodar Mauzo कोकणी Konkani ज्ञानपीठ पुरस्कार Jnanpith Award

माजोर्डा हे प्रामुख्याने ख्रिश्चन लोकवस्तीचे प्राबल्य असलेले गाव. देशाच्या पर्यटन नकाशावर ते ठळकपणे दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे या गावाला लाभलेला समुद्र किनारा व तिथे उभी राहिलेली पंचतारांकीत रिसोर्टची संस्कृती. आशिया खंडात पावाची निर्मिती याच गावात झाली, असा दावा केला जातो आणि तो खरा असेलही. आज पुन्हा एकदा हा माजोर्डा गाव दामोदर मावजो यांना २०२१ सालचे भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे देशाच्या साहित्यिक नकाशावर झळकला आहे.

१ ऑगस्ट १९४४ रोजी जन्म घेतलेल्या दामोदर मावजो यांना कसलीच साहित्यिक पार्श्वभूमी नव्हती. मात्र त्यांचे एक थोडे लांबचे कुटुंबीय रामनाथ नारायण मावजो हे नावाजलेले छायाचित्रकार होते. या रामनाथबाबांचे भाचे नामवंत चित्रकार लक्ष्मण पै होत. सिनेमॅटोग्राफर के. वैकुंठ हे मावजो यांचे एक नावाजलेले शिष्य. असा हा दामोदर मावजो यांना लाभलेला कलेचा वारसा. गावांत त्यांच्या कुटुंबाचे भुसारी दुकान होते. हा व्यवसाय पुढे मावजो यांनी चालवला. अलीकडे आपले दुकान बंद करून ते पूर्णवेळ लिखाण करतात. लेखनासाठी लागणारी सगळी कच्ची सामग्री आपल्याला या व्यवसायाने दिली असे ते सांगतात. इथेच त्यांना बहुचर्चित ‘तेरेझालो घोव’ या कथेतला पिटर व तेरेझा किंवा ‘कार्मेलीन’ या कादंबरीची नायिका कार्मेलीन भेटली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

शालांत परीक्षा झाल्यानंतर मावजो यांनी मुंबईच्या पोदार महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. या महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकात रस घेतला. इथेच त्यांना त्यांची भावी पत्नी शैला आपटे भेटल्या. पदवी घेऊन आपल्या गावी परतल्यावर वडिलांचा व्यवसाय त्यांनी पत्करला. ‘पसरकार’ (दुकानदार) हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे अंग असे ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या या पसऱ्याने त्यांचे कथाविश्व समृद्ध केले. अवतीभवती असलेल्या माणसांचे सामाजिक, आर्थिक व भावनिक प्रश्न जवळून जाणून घेण्याची संधी त्यांना या व्यवसायाने दिली.

मावजोना वाचनाची आवड त्यांच्या बालपणापासून होती. आईकडून ऐकलेल्या गोष्टी त्यांच्या भावविश्वात मोलाची भर घालणाऱ्या ठरल्या. वडीलही त्यांना गोष्टीची पुस्तके आणून द्यायचे. शाळेच्याही वाचनालयाचा त्यांनी लाभ घेतला. वाचनाला उद्युक्त करणारे चंद्रकांत केरकरसारखे शिक्षक त्यांना लाभले. या शिक्षकांनी त्यांच्यामध्ये असलेले लेखनाचे गुण हेरले व त्यांना लेखनाला प्रवृत्त केले.

मावजोनी कॉलेज जीवनात फारसे काही लिहिले नाही. पुन्हा आपल्या सृजनशील अभिव्यक्तीसाठी मराठीऐवजी कोकणी भाषा का निवडली, याचा विचार फार महत्त्वाचा वाटतो. ज्या काळात स्वकीयांकडून कोकणी भाषेला हिणवले जायचे, त्या काळाचा विचार केला असता त्यांची ही निवड महत्त्वाची वाटते. कोकणी ही आपली स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा आहे, याचा साक्षात्कार त्यांना महाविद्यालयीन काळात झाला.

साहित्याच्या वृद्धीसाठी सामाजिक व सांस्कृतिक वातावरण अनुकूल असावे लागते. मावजोनी लेखनास प्रारंभ केला, तेव्हा या वातावरणाचा अभाव होता. गोव्याच्या मुक्तीनंतर ‘नवें गोंय’ हे वाङमयीन नियतकालिक प्रसिद्ध व्हायला लागले. या नियतकालिकातून अनेक लेखक लिहू लागले. मावजोच्या सुरुवातीच्या कथा ‘नवें गोंय’मधून प्रसिद्ध झाल्या. त्यात त्यांची ‘मरण येना म्हूण’ या बहुचर्चित कथेचा समावेश होतो. लांबीने छोटी तथापि अत्यंत आशयघन अशी ही कथा अनेक देशी व परदेशी भाषांतून अनुवादित झाली आहे. या लेखकाने दीर्घ पल्ल्याच्या कथा फारशा लिहिलेल्या नाहीत. कथावस्तूचा अचूक वेध घेणे ते पसंत करतात. अनावश्यक तपशीलामुळे कथावस्तू हरवून जाते, ही त्यांची धारणा.

लेखक म्हणून त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांनी काही महत्त्वाचे मराठी कथाकार वाचले. मात्र कोणत्याही मराठी कथाकाराचा प्रभाव त्यांच्या कथेवर दिसून येत नाही. पुढे त्यांनी काफ्फा, काम्यु, हेमिंग्वे यांचे साहित्य वाचले. ‘गांथन’ या संग्रहातील कथांवर थोडाफार हेमिंग्वेचा प्रभाव दिसून येतो. साधी, सोपी, ओघवती भाषा हे त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य त्यांनी सतत जपलेले आहे. त्यांची ‘खंयचे कडेन कांय ना’सारखी कथा ॲब्सर्ड आशयाची वाटते. हा प्रवाह अ. ना. म्हांब्रो यांनी कोकणी कथेत रूढ केला. या काळात त्यांनी ‘सदानंद’ या कथेत परपीडेत आनंद घेणारे पात्र रंगवले. ‘जागरणां’ हा त्यांचा दुसरा कथासंग्रह. कोकणी कथेला पुढे नेणाऱ्या या संग्रहात ‘कोयसांवालीं गोरवां’सारखी अप्रतिम कथा वाचायला मिळते. जिवापाड प्रेम असलेल्या आपल्या गायींना विकायचा प्रसंग कोयसांव आणि इनास यांच्यावर येतो. पण फेस्ताच्या गुरांच्या बाजाराला त्यांची गुरे विकली जात नाहीत. जिथे आपलंच पोट भरणं कठीण होत चाललेलं आहे, तिथे या पाळीव प्राण्यांचे पोट कसे भरावे असे मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या पुढे उभे राहते. ‘तो हांव न्हय’ ही कथा जीवनातील नैतिक प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करते. नवरा जहाजावर नोकरी करण्यासाठी गेल्यामुळे ऐन तारूण्यातली लुसी नवऱ्याच्या डॉक्टर मित्राला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. मावजोच्या अनेक कथांत या शारीरिक तणावातून त्यांची पात्रे जातात. ‘नवी केस’ या कथेतील कुंतल हे अविवाहीत राहिल्यामुळे मानसिक व शारीरिक ताणातून जाताना दिसते. हाच ताण ‘जीव दिवं काय च्या मारूं’ या कादंबरीतल्या पात्रांचा अनुभव आहे.

‘कार्मेलीन’ ही मावजो यांची बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीचे बीज त्यांना आपल्या पसऱ्यावर गवसले. कार्मेलीन आया म्हणून आखाती देशात जाते, ती केवळ आपद्‌धर्म म्हणून. तिला दिनार मिळतात, पण त्याच बरोबर तिला लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागते. हा अनुभव आपल्या मुलीला येऊ नये, याची ती काळजी घेत असते. आखाती देशांच्या आकर्षणामुळे गोव्यातल्या गावांचा चेहरामोहरा बदलून गेला. ‘भुरगीं म्हगेलीं तीं’ व ‘मिंगेलेलीं घरचीं’ या दोन कथा माणसाच्या जीवनातल्या एकटेपणाचा वेध घेणाऱ्या आहेत.

त्यांच्या काही कथा विक्षिप्त माणसांच्या आहेत. उदा. ‘सिनीक’ या कथेतले पात्र जगाकडे तुच्छतेने पाहते. प्रत्येक गोष्टीकडे तो सिनिकल नजेरेने पाहतो. त्यामुळे त्याच्या कुटुंबाची परवड होते. पण त्याची त्याला अजिबात फिकीर नसते. त्याच्या छोट्या नातवाच्या अंत्यसंस्कारावेळी त्याला अनाहूतपणे हुंदका फुटतो. माणसाच्या मनात खोल कुठेतरी मायेचा ओलावा असतो. वरपांगी तो कितीही कठोर वाटला तरी, हेच लेखक सुचवतो. ‘तिष्ठावणी’ या कथासंग्रहाला अरुण खोपकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. मावजोंच्या कथेच्या तंत्रासबंधी लिहिताना ते म्हणतात- ‘‘मावजोंच्या कथांत निवेदकाच्या निवडीतही अनेक प्रकार दिसून येतात. कधी सर्वज्ञ निवेदक कथा सांगतो. कधी उदा. ‘म्हाका कित्याक पडलां’सारख्या कथेत ते निवेदकाचे नावही देत नाहीत. पण त्याला ज्याचा अभिमान आहे, अशा जानव्यासारखा एखादा तपशील ते देतात.’’ त्यांच्या कथेवर खोपकर यांनी केलेले हे मार्मिक भाष्य.

कथेच्या तंत्रावर त्यांची जबरदस्त हुकुमत. ‘तिष्ठावणी’, ‘यासीन, ऑस्टीन, यतीन’, ‘बर्गर’सारख्या कथा अनपेक्षित कलाटणीने संपतात. तेव्हा कथेचा वाचक बसलेल्या धक्क्यातून स्वतःला सावरायच्या प्रयत्नात असतो. अशा कथा सांकेतिक वाटल्या तरी ‘जंटलमन चोर’, ‘पिशेपणा’ किंवा अलीकडे प्रसिद्ध झालेली ‘हें मडें कोणाचें?’सारख्या कथा आशय व तंत्राच्या दृष्टीने वेगळ्या आहेत.

मावजोनी कथेबरोबर कादंबऱ्याही लिहिल्या. ‘कार्मेलीन’ या कादंबरीला उदंड यश मिळाले. तिचे अनुवाद जवळपास १२ भारतीय भाषांतून झाले आहेत. विद्या पै यांनी केलेला इंग्रजी अनुवाद वाचकांना उपलब्ध आहे. सुनामीची पार्श्वभूमी असलेली ‘सुनामी सायमन’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झालेला असून तिला विचक्षण वाचक व समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे.

‘जीव दिवं काय च्या मारूं’ ही त्यांची अलीकडे प्रसिद्ध झालेली नवीन कादंबरी. या कादंबरीला अस्तित्ववादाची बैठक आहे. एका स्वार्थी, विचित्र आणि दुराचारी घराण्यात जन्माला आलेल्या बिपीन या मुलाची ही कथा आहे. असामान्य बुद्धी लाभलेला बिपीन विपरीत परिस्थितीशी संघर्ष करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सभोवतालच्या जगाकडे तिरकस दृष्टीने पाहणारा बिपीन तारुण्याच्या उंबरठ्यावर दोन मुलींच्या प्रेमात पडतो. एक हिंदू व दुसरी मुस्लीम. चित्रा ही उत्तम चित्रकार असते, तर फातिमाला शेरोशायरी यांची आवड असते. चित्रा ही समलिंगी असल्याचे कळल्यावर बिपीन हादरतो. सामाजिक बंधनामुळे बिपीन फातिमाशी आंतरधर्मीय लग्न करू शकत नाही. एक विलक्षण अनुभव कथन करणारी ही कादंबरी. मानसशास्त्र, समाजशास्त्र या दोन परिप्रेक्ष्यातून वाचली पाहिजे. ही कादंबरी वाचताना मार्खेज, जुझे सारामागो व क्लॅरीस लिस्पेक्टोर या लेखकांची आठवण होते. या कादंबरीचा कन्नड भाषेत झालेला अनुभव कन्नड वाचकांचे लक्ष वेधणारा ठरला आहे. त्याचप्रमाणे मराठी व इंग्रजी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

दामोदर मावजो पूर्णपणे नास्तिक, निधर्मी व प्रागतिक विचारांचे आहेत. दक्षिणायन गोवाचे ते अध्यक्ष आहेत. मावजोंच्या ‘Ink of Dissent’ या पुस्तकात त्यांच्या प्रागतिक विचारांचे प्रतिबिंब पडले आहे. गोव्यातील एका सनातनी संस्थेवर प्रखर टीका केल्यावर त्यांना धमक्या येऊ लागल्या. त्यानंतर गोवा सरकारने त्यांना पोलीस संरक्षण दिले आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मावजो यांनी कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर मात केली आहे.

रवींद्र केळेकर यांच्यानंतर दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यामुळे कोकणी भाषा इतर भारतीय भाषांप्रमाणेच सशक्त आणि समृद्ध आहे, हे वास्तव अधोरेखित झाले आहे.

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १ जानेवारी २०२२च्या अंकातून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......