या पुस्तकाचा विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा मांडणारा विभाग वाचवत नाही. एखाद्या प्रश्नाचे परिणाम किती भीषण असतात, हे ते प्रकरण वाचताना जाणवत राहते, अस्वस्थता येते. हे पुस्तक वेदनेची सनद आहे. दुःखाचा हुंकार आहे
ग्रंथनामा - झलक
हेरंब कुलकर्णी
  • ​​​​​​​‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 05 January 2022
  • ग्रंथनामा झलक ​​​​​​​विनाअनुदानितची संघर्षगाथा VinaAnudanitchi Sangharshgatha किरण चव्हाण Kiran Chavan विनाअनुदानित शाळा Un-Granted School's अनुदानित शाळा Granted School's हेरंब कुलकर्णी Heramb Kulkarni

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या व्यथा मांडणारं ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ हे किरण चव्हाण यांनी संपादित केलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. शिक्षणक्षेत्रातील एका विदारक सत्याचा पंचनामा करणारं हे पुस्तक इचलकरंजीच्या पद्मरत्न प्रकाशनानंं प्रकाशित केलं आहे. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी या पुस्तकाला लिहिलेली ही प्रस्तावना...

..................................................................................................................................................................

महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची भळभळती जखम म्हणजे विनाअनुदानित शाळांचा प्रश्न. संयमाचे एखादे नोबेल पारितोषिक असेल तर ते विनाअनुदानित शिक्षकांना द्यावे लागेल, इतकी त्यांनी वाट बघितली आहे. लोकशाहीतील उपलब्ध असलेली सर्व आयुधे त्यांनी पूर्ण क्षमतेने वापरली आहेत. उपोषणात स्वतःला पणाला लावले. एकाच प्रश्नासाठी झालेली सर्वांत जास्त आंदोलने म्हणून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होईल. मोर्चे काढले, संप केले, बंद केले आणि सारेच असह्य झाल्यामुळे यातील बांधवांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली.

लोकशाहीचा फायदा काय? तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नावर ओरडता येते. आणि लोकशाहीचा तोटा कोणता? तर त्या ओरडल्याचा काहीच उपयोग होत नाही, हे कटू सत्य ‘विनाअनुदानित’ या प्रश्नाने महाराष्ट्राला दाखवले. अनुदानित शिक्षकांसाठी जे ‘सरकार’ होते, ते विनाअनुदानितसाठी ‘शासन’ झाले आहे. सरकार आणि शासन हा फरक स्पष्ट आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

विनाअनुदानितचा विषय काढला की, असंवेदनशील लोक हमखास एक प्रश्न विचारतात, ‘यांनीच लिहून दिले होते ना की, आम्हाला अनुदान नको म्हणून?’ ज्या गोष्टीवर चर्चा होऊन गेल्या, ‘कायम’ शब्द काढूनही अनेक वर्षे झाली, तरी इतक्या वर्षांनंतर अजून काहीच होत नसताना पुन्हा पुन्हा चर्चा त्याच मुद्द्यावर नेली जाते. दिलेला शब्द पाळण्याची परंपरा नसलेल्या राजकीय पक्षांनी नंतरच्या काळात विचारधारा सोडून अनेक तडजोडी केल्या, अनेक आश्वासने मोडली आणि तरीसुद्धा शब्दाला जागण्याची अपेक्षा मात्र शिक्षकांकडून, हे अनाकलनीय असते.

दुसरी बदनामी अशी करतात की, हे शिक्षणसम्राटांनी उभे केलेले आंदोलन आहे. असे म्हणणाऱ्यांनी एकदा आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या कुटुंबात किंवा जिवंतपणी मरण अनुभवणाऱ्या खेड्यापाड्यातील शिक्षकांच्या घरी एकदा जाऊन यावे, म्हणजे वास्तव त्यांना दिसेल.

सर्वांत क्लेशदायक गोष्ट ही आजपर्यंतच्या एकाही सरकारने ‘आम्ही अनुदान देणार नाही’ असे म्हटले नाही व अनुदान दिलेही नाही. हे स्वप्न दाखवत झुलवत राहण्याचा जो क्रूरपणा आहे, तो अधिक अस्वस्थ करणारा आहे. आयुष्य पणाला लागले, अनेक जण सेवानिवृत्त झाले. तरीसुद्धा आज आशा दाखवली जात आहे.

सरकारकडे पैसे नाहीत, हे कारणसुद्धा अत्यंत फसवे आहे. पैसे नसल्याचे कारण कोणाला सांगायचे व कोणाला नाही, हे सरकार नावाच्या यंत्रणेला समोरचे उपद्रवमूल्य बघून कळत असते. आमदारांचा आमदारनिधी एक कोटीने वाढवायला त्यांच्याकडे पैसे असतात. उद्योजकांना सवलती देण्यासाठीही पैसे असतात. सर्व वेतन आयोग कर्ज काढून कर्मचाऱ्यांना देण्यासाठीही कोणतीच अडचण नसते. कर्मचाऱ्यांचे करोनात कापलेले पगार लगेच परत करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे असतात. फक्त पैसे नसतात असंघटित वर्गासाठी, निराधारांच्या पेन्शनसाठी, कंत्राटी कामगारांचे मानधन वाढवण्यासाठी आणि विनाअनुदानित शिक्षकांसाठी.

शिक्षक बांधवांनी हे सारे कसे सहन केले असेल, हा प्रश्न पडतो. अनुदानित शाळांवर काम करणारे शिक्षक आणि विनाअनुदानित शाळांवर काम करणारे शिक्षक, या दोघांच्या कामात काडीचाही फरक नाही. किंबहुना विनाअनुदानित शिक्षकांना तर अधिकच अडचणी आहेत आणि काम मात्र त्याच दर्जाचे करायचे आहे. तरीसुद्धा पूर्ण क्षमतेने ही शिक्षक मंडळी काम करत राहतात. मध्यंतरी जालन्यातील एका विनाअनुदानित शाळेत गेलो होतो. तेथील एका शिक्षकाने लाकडाचा मोबाईल स्टॅन्ड बनवला व रबर बांधून त्यावर मोबाईल ठेवून ऑनलाईन क्लासेस घेत होता. ते बघितल्यानंतर गलबलून आले. एकीकडे पगार असलेला शिक्षक लॅपटॉपच्या आधारे शिकवणार आणि दुसरीकडे लाकडी स्टॅण्ड.

सरकारला काम मात्र हवे आहे, परंतु त्या कामाची किंमत मात्र द्यायची नाही. जितके दिवस प्रश्न पुढे जाईल, तितका पुढे ढकलायचा आहे.

या पुस्तकात किरण चव्हाण यांनी संकलित केलेल्या आत्महत्या केलेल्या शिक्षकांची यादी वाचली. ती संख्या आणखीही मोठी आहे, पण ती यादी वाचताना, वेदना होताना आश्चर्यही वाटत होते. याचे कारण या आत्महत्यांनी महाराष्ट्राच्या समाजजीवनावर ओरखडासुद्धा उमटवला नाही. कोणत्या तरी मंत्र्याला, राजकीय नेत्यांना अडकवण्याची उपद्रवक्षमता या आत्महत्यांत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता फक्त संख्येत मोजल्या जातात, तशीच स्थिती आज शिक्षकांच्या आत्महत्यांची झाली आहे. समाज घडवणारे शिक्षक आत्महत्या करताना, जर अपराधीभाव वाटत नसेल तर तो समाज असंवेदनशील आहे, कृतज्ञ नाही.

जोपर्यंत उभे राहता येत आहे, तोपर्यंत शिकवायचे, जोपर्यंत रडता येत आहे, तोपर्यंत आंदोलने करायची आणि सारी उमेद संपली की, स्वतःला संपवून टाकायचे. इतक्या वेदनादायक रितीने ही माणसे निघून गेली; पण शिक्षण क्षेत्रावर, सुसंस्कृत महाराष्ट्रावर त्याचा ओरखडाही उमटला नाही. ‘शिक्षक दिना’ला शिक्षक किती महत्त्वाचा घटक आहे, राष्ट्राचा शिल्पकार आहे, हेच या आत्महत्यांना अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या राजकीय व्यवस्थेकडून ऐकावे लागते. विरोधी पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा व ते सत्तेत गेले की, पुन्हा जी.आर.चा किस करत पैसे वाचवण्यासाठी अनुदान प्रश्न पुढे पुढे ढकलत ठेवायचा, अशीच सर्व पक्षीय राजकीय मानसिकता आहे. त्यामुळे आता कोणता मार्ग वापरावा, हेच कळेनासे झाले आहे.                                    

या पार्श्वभूमीवर किरण चव्हाण यांनी संपादित केलेले ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे. विनाअनुदानित शिक्षकांच्या भावना एका व्यासपीठावर आणून सर्व घटकांचा एकमेकांशी संवाद घडवला आहे. विनाअनुदानित शिक्षक मित्रांना सांत्वन देण्याचे काम हे पुस्तक करेल. आपले प्रश्न सुटत नसतात; पण आपल्या प्रेमाच्या माणसांजवळ मन मोकळं करण्यासाठी या पुस्तकाने एक व्यासपीठ निर्माण केले आहे. ‘मी एकटा नाही तर माझ्यासारख्या हजारो बांधवांच्या व्यथा एकच आहेत’ हा धीर देऊन लढण्याचे बळ हे पुस्तक नक्कीच देणार आहे.

या पुस्तकाचा विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा मांडणारा विभाग वाचवत नाही. एखाद्या प्रश्नाचे परिणाम किती भीषण असतात, हे ते प्रकरण वाचताना जाणवत राहते, अस्वस्थता येते. हे पुस्तक इतिहासाचे किंवा बखरीचे काम करणार आहे. इतिहासात किंवा बखरीत केवळ विजयाच्या नोंदी नसतात, वेगवेगळ्या काळात जनतेला काय भोगावे लागले, याचे तपशील आपल्याला मिळत असतात. नवीन शैक्षणिक धोरणाचे ढोल वाजवताना आणि सरकारची शिक्षणाप्रती बांधीलकी किती तीव्र आहे, याचे कोडकौतुक करत असताना, या देशात शिक्षक आत्महत्या करत होते, हेही वास्तव या पुस्तकामुळे इतिहासात जाईल.

शाईने नव्हे तर अश्रूने लिहिलेले असे या पुस्तकाचे वर्णन केले तर चुकीचे ठरणार नाही. हे पुस्तक वेदनेची सनद आहे. दुःखाचा हुंकार आहे. याच दुखऱ्या वेदनेला एक संघटित स्वरूपात किरण चव्हाण यांनी समाजमनाच्या चावडीवर आणून महत्त्वाचे काम केले आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पुस्तक लिहिण्याचा एक फायदाही असतो की, बोलक्या आणि विचारी वर्गापर्यंत ते प्रश्न एकत्रित स्वरूपात जातात. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती क्षेत्रात व इतर माध्यमांत काम करणाऱ्यांना अनुदान मिळत नाही अशा काही शाळा आहेत, इतकीच त्रोटक माहिती असते. त्याचे परिणाम किती भीषण असतात, किती जणांचे जीव गमावले जातात. त्या शिक्षकांचे संसार कसे होत आहेत? सरकार कशी फसवणूक करते आहे? हे तपशील बोलक्या विचारी वर्गासाठी या पुस्तकामध्ये दिले आहेत व तो वर्ग वेगवेगळ्या माध्यमातून विनाअनुदानित प्रश्नाशी जोडला जाईल.

या पुस्तकात प्रत्यक्ष कायदेशीर भाग, आंदोलनाचा घटनाक्रम व मागण्या, सरकार करत असलेली फसवणूक हा वैचारिक तपशीलही आहे व प्रत्यक्ष जगणेही तितक्याच ताकदीने आले आहे. एकाच वेळी बुद्धीने आणि भावनेने लिहिलेली ही वेदनेची बखर आहे, असेच म्हणावे लागेल.

‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ : किरण चव्हाण

पद्मरत्न प्रकाशन, इचलकरंजी

पाने : १६०

मूल्य : २७० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आहेत.

herambkulkarni1971@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......