‘साधना’ साप्ताहिकाचे माजी संपादक आणि ज्येष्ठ लेखक यदुनाथ थत्ते यांच्या ‘मुस्लिम समाजातील वाहते वारे’ आणि ‘मुस्लिम मनाचा कानोसा’ या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या नुकत्या साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाल्या आहेत.
‘मुस्लिम मनाचा कानोसा’ या पुस्तकात थत्ते यांनी ‘मुल्कपरस्त’ या टोपणनावाने १९७५ ते ८५ या काळात केलेल्या लेखनाचा समावेश आहे. यातील निवडक लेखांचा पहिला संग्रह ‘तवारीख’ या नावाने १९८१मध्ये चेतश्री प्रकाशन, अमळनेर यांच्याकडून प्रकाशित झाला होता. त्याला प्रा. नरहर कुरुंदकर यांनी ही प्रस्तावना लिहिली होती. त्यानंतर १९८६मध्ये ‘निवडक तवारीख’ हे पुस्तक मानसन्मान प्रकाशन, पुणे यांच्याकडून प्रकाशित झाले, त्यातही या प्रस्तावनेचा समावेश करण्यात आला होता. ( दरम्यान १९८२ मध्ये नरहर कुरुंदकर यांचे निधन झाले.) ‘मुस्लिम मनाचा कानोसा’ या पुस्तकात ‘तवारीख’ व ‘निवडक तवारीख’ या दोन्ही पुस्तकांतील लेखांचा समावेश करण्यात आला आहे. आणि कुरुंदकरांच्या प्रस्तावनेचाही. ती ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी…
..................................................................................................................................................................
‘सकाळ’ या नियतकालिकातून मुस्लीम समाजाशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांवर ‘मुस्लीम मनाचा कानोसा’ या सदरात ‘मुल्कपरस्त’ सतत छोटी छोटी टिपणे लिहीत आहेत. या टिपणांपैकी जानेवारी १९७७ ते डिसेंबर १९७९ या कालखंडातील (निवडक) टिपणे या पुस्तकात संग्रहित करण्यात आलेली आहेत. या टिपणांच्या संग्रहाला ‘तवारीख’ हे मोठे अन्वर्थक नाव दिले गेलेले आहे.
जून १९७५ला आणीबाणी पुकारली गेल्यानंतर काही काळ सगळे राजकीय वातावरणच सुन्न झाल्यासारखे झाले होते. सत्त्याहत्तर सालच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे असे वाटते की, या निवडणुकांपासून भारतीय राजकारणाचा एक नवा कालखंड आरंभ होत आहे. जून १९७७ ते डिसेंबर १९७९ हा कालखंड आम्हा मंडळींच्या दृष्टीने एक लक्षणीय कालखंड आहे. १९७७ सालच्या उत्तरार्धात आम्ही उत्साहाने आणि उल्हासाने फुलून निघालेले होतो. १९७७च्या उत्तरार्धात आम्ही तितकेच दु:खाने पीडित होतो! ऐंशी सालचा जानेवारी महिना आला. हा महिना संपण्याच्या आतच भारतीय राजकारण पुन्हा एकदा आपल्या परिचित ठिकाणावर जाऊन पोचलेले आहे, याचे भान आम्हाला आले. या मधल्या कालखंडात लिहिली गेलेली ही टिपणे आहेत. एका दृष्टीने पाहिले तर ही टिपणे इतिहासजमा झालेली आहेत, कारण ती तवारीखाच आहेत, पण दुसऱ्या बाजूने पाहिले तर या टिपणांमधील प्रत्येक प्रश्न आजही जसाच्या तसा जिवंत आहे, असे आढळून येईल. प्रश्न जिवंत आहेत आणि ते सुटणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्यांच्याबाबत विचार करावा लागतो. टिपणे काढावी लागतात. ती संग्रहित करावी लागतात.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
सर्वसामान्यपणे मुस्लीम समाजाबाबत हिंदू माणूस उदासीन असतो. मुस्लीम समाज हा निरनिराळ्या प्रश्नांचा कोणत्या पद्धतीने विचार करत आहे, याबाबत आस्थेवाईक जिज्ञासा लोकशाहीच्याही हिताची ठरेल आणि देशाच्याही हिताची ठरेल, हे बौद्धिकदृष्ट्या पटत असूनही हिंदू माणूस मुस्लीम समाजाच्या मानसिक आंदोलनांबाबत उदासीनच राहतो. हा उदासीन असणारा माणूस प्रश्नांचा कोणताही अभ्यास न करता मुस्लीमविरोधी असतो, अगर प्रश्नांचा कोणताही अभ्यास न करता उदारमतवादी आणि तथाकथित सेक्युलरही असतो. मुस्लीम समाजाचीसुद्धा हीच पद्धत आहे. हिंदू समाजात काय चालू आहे, याबाबत आस्थेवाईक चौकशी मुस्लीम समाज फारशी करतच नाही, पण मुस्लीत समाजात एक सुसंगती आहे. ती सुसंगती ही की हा समाज इतर समाजाची फारशी चौकशी करत नाही! तो हिंदू समाज असो, ख्रिश्चन समाज असो अगर इतर कोणताही समाज असो. इतर धर्माविषयी तर सोडाच, पण स्वतःच्या धर्माविषयीसुद्धा फारसा तपशीलाने विचार करायचा नाही, असे जणू मुस्लीम समाजाने ठरवले आहे! भारतीय मुस्लीमांमध्ये कोणत्याच क्षेत्रातील अध्ययन आणि जिज्ञासा यांच्या परंपरा पुष्ट झालेल्या नाहीत. मुस्लीम समाज शतकानुशतके भ्रमावरच जगत आलेला आहे!
भ्रमावर जगणारा हा समाज सत्याच्या प्रकाशात जागा कसा होईल, हा एक प्रश्न आहे आणि हिंदू समाजात असणारी मुस्लीम समाजाबाबतची उदासीनता कमी कशी होईल, हा दुसरा प्रश्न आहे. मुल्कपरस्त आणि त्यांचे मित्र यांची धडपड चाललेली असेल तर ती यासाठी चाललेली आहे. आम्हाला असे वाटते की, मुस्लीम समाजात प्रगतिशील विचारांचे प्रवाह बलवान केल्याशिवाय आणि हिंदू व मुस्लीम समाज प्रत्येक प्रश्नावर कोणता विचार करत आहेत, याबाबत उपभपक्षी जागरूकता निर्माण झाल्याशिवाय आपल्या देशातील लोकशाही परिपक्व होऊ शकणार नाही. या दृष्टीने उर्दू आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमधून जे मुस्लीम मनोगत व्यक्त होत असते, ते काळजीपूर्वक पहाण्याची, समजून घेण्याची, तपासण्याची गरज टाळता येणार नाही.
भारतीय मुस्लीम समाजाच्या दृष्टीने हमीद दलवाईंचा उदय ही एक महत्त्वाची घटना होती. मौलाना आझाद किंवा रफी अहमद किडवाई, हारीस किंवा छागला ही माणसे राष्ट्रवादी नव्हती, असे मी म्हणणार नाही. बॅरिस्टर छागला त्यांच्या प्रखर राष्ट्रवादी भूमिकेविषयी हिंदू समाजातसुद्धा अत्यंत आदराची व प्रेमाची भावना आहे. पण मुस्लीम समाजातील कोणताही नेता आपल्या समाजाच्या व धर्माच्या चिकित्सेकडे वळलेला नव्हता. प्रामाणिक राष्ट्रवादी मुस्लीम नेत्यांचे सर्व सामर्थ्य राष्ट्रवादी प्रवाहाशी सुसंगत भूमिका घेणे, यापुरते मर्यादित होते. इंग्रजांचे राज्य जाणे, भारत स्वतंत्र होणे, हे भारतीय राष्ट्र अखंड असावे, पाकिस्तान मागण्याची आवश्यकता नाही, हिंदु-मुसलमानांनी भाऊ-भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने एकत्र नांदावे असल्या प्रकारचे विचार असणे, हे प्रामाणिक राष्ट्रवादी मुस्लीम नेत्यांचे वैशिष्ट्य राहिले. पण यापलीकडे जाऊन आपला धर्म आणि समाज यांच्या चिकित्सक अभ्यासाकडे हे राष्ट्रवादी मुस्लीम नेते वळू शकले नाहीत. अशा प्रकारच्या चिकित्सेकडे वळण्याचे मूलभूत महत्त्वाचे काम हमीद दलवाईंपासून सुरू होते. दलवाईंच्या इतके निकोप चिकित्सक मन एकाही ज्येष्ठ मुस्लीम राजकीय नेत्यांत नसावे, याचाही मला खेद आहे आणि दलवाईंचा जाहीर रीतीने पुरस्कार योग्य त्या वेळी एकही ज्येष्ठ समाजवादी नेता करू शकला नाही, याचाही मला खेद आहे. हिंदू समाजाच्या दृष्टीने महात्मा फुल्यांचे जे स्थान आहे, त्याला सदृश्य असे स्थान मुस्लीम समाजात हमीद दलवाईंचे आहे.
आणीबाणी संपली, इंदिरा गांधींची राजवटही संपली आणि जनता पक्षाच्या राजवटीला आरंभ झाला. या वेळी दलवाईंच्या जीवनाचा अगदी शेवटचा काळ सुरू झालेला होता. लोकशाही पुन्हा एकदा भारतात स्थापन झाली आहे, पण ती स्थापन होत असताना देशातील सेक्युलर व पुरोगामी विचारांची बरीच पडझड झाली आहे, हे सर्व पाहिल्यानंतर हमीद दलवाई वारले. त्यांचे मन समोर घडत असलेल्या घटनांमुळे पुरेसे साशंक झालेले होते. हमीद दलवाईंविषयी मुस्लीम समाजात फारशी आस्था नव्हती, फारसे प्रेम नव्हते. धर्मश्रद्ध मुस्लीम समाज दलवाईंबाबत पुष्कळसा रागावलेला आणि संतप्त असाच असे. अंधश्रद्धेच्या वातावरणातच शतकानुशतके वावरणाऱ्या समूहाची ही प्रतिक्रिया स्वाभाविक आहे राजा राममोहन राय यांनी ज्या वेळेला सतीच्या प्रश्नात शासनाने लक्ष घालावे असा प्रयत्न केला, त्या वेळी त्यांच्या अर्जावर सही करणाऱ्यांची संख्या अशीच किरकोळ होती आणि सती जाणे हा आमच्या धर्माचा अविभाज्य भाग आहे, अशी घोषणा करणाऱ्या मंडळींची संख्या प्रचंडच होती. महात्मा फुले यांनासुद्धा मतदान घेतले असते, तर लोकमताच्या आधारे निवडून येता आले असते असे वाटत नाही! समाज परंपरावादी असतो, याचा अर्थच हा की, समाजातील बहुसंख्याक लोक परंपरेचे पूजक आणि सुधारणांचे विरोधक असतात. एकेक सुधारणा मोठ्या कष्टाने समाजाच्या अंगवळणी पडत असते. हमीद दलवाईंचे जीवन याला अपवाद नव्हते.
‘तवारीख’मध्ये दलवाईंच्या जीवनावर फारसे तपशीलवार लिखाण नाही. दलवाईंच्या बाबतीत तपशील नसल्याची दोन कारणे उघड आहेत. आम्ही मंडळी दलवाईंचे चाहते आणि समर्थक होतोच. वेळ प्रसंग जसा येईल, त्याप्रमाणे आम्ही दलवाईंवर लिहीतही होतो. यामुळे अमूक एका मालिकेत दलवाईंवर फार त्रोटक लिहिले गेले आहे, याची पृथक जाणीव आम्हालाच लवकर होत नाही. ‘तवारीख’मध्ये दलवाईंचा उल्लेख फार तुरळकपणे आला आहे. ही बाब संग्रह सिद्ध होत असतानाच माझ्या लक्षात आली. त्याआधी म्हणजे लिखाण प्रसिद्ध होत असताना लक्षात आली नाही. पण वातावरणाच्या दृष्टीने दलवाईंना त्रोटक स्थान मिळणे हेच सत्याच्या जवळ जाणारे चित्र आहे, याचीही नोंद केली पाहिजे.
ज्या कालखंडातील हे लिखाण आहे, त्या कालखंडात बहुचर्चित प्रश्न दाउदी बोहरा समाजाचा आहे. दलवाई वारलले होते. मुस्लीम समाज, जितक्या लवकर दलवाईंची आठवण विसरता येईल तितके बरे, असे समजून चाललेला होता आणि निवडणुकीच्या राजकारणाच्या भोवऱ्यात अडकलेले आमचे पुरोगामी नेते मुस्लीम परंपरावाद चुचकारण्यात अग्रेसर होते. त्यांना हमीद दलवाई गैरसोयीचेच होते!
हमीद दलवाई जी मते मांडत होते, त्यांची तपासणी करणे, दलवाईंच्या मतांचे खंडन करणे, या मुस्लीम राजकीय लेखकांना किंवा मुस्लीम धार्मिक नेत्यांना अशक्यच होते. हमीद दलवाई असे म्हणणार की, ‘काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे असे भारतीय मुसलमानांना वाटत नाही, त्यांना मनातून काश्मीर पाकिस्तानचे आहे, असे वाटते. म्हणून भारतातील मुस्लीम नेते व संघटना काश्मीरवर बोलणे टाळतात.’ आता दलवाईंच्या या विधानाचा प्रतिवाद कसा करणार? ‘आम्ही काश्मीर भारताचे आहे असे मानतो. प्रायः भारतीय मुस्लीम हेच मानतात. मुस्लीम संघटनांनी तसे ठराव केले आहेत. दलवाई उगीचच मुसलमानांना बदनाम करीत आहेत’, या पद्धतीने दलवाईंचे खंडन करता येते, पण या पद्धतीने खंडण करणे अडचणीचे आहे. एक तर मुस्लीम समाजात वजन असणाऱ्या एकाही अखिल भारतीय संघटनेने काश्मीरबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. दुसरे म्हणजे ‘आम्ही काश्मीर भारताचा अविभाज्य भाग मानतो’ असे म्हणण्याची मुस्लीम लेखकांची इच्छा नसते. दलवाईंच्या मुद्द्याला उत्तरे नाहीत, पण हमीद दलवाईंचे खंडण मात्र केलेच पाहिजे, अशी वेळ आली म्हणजे दोन पद्धतीने दलवाईंवर टीका सुरू होते.
पहिली पद्धत म्हणजे दलवाई नास्तिक होते, पाखंडी होते, म्हणून ते मुसलमानच नव्हते आणि जर ते मुसलमान नसतील तर मग त्यांना मुस्लीम समाजाचे सुधारक तरी कसे म्हणता येईल? दलवाईंचा आणि मुसलमानांचा संबंधच काय? या पद्धतीने दलवाईंविषयी टीका करून आपले समाधान शोधण्याचा प्रयत्न काही जण करतात. तर दलवाई हे परदेशाचे एजंट आहेत, ते भाडोत्री प्रचारक आहेत, त्यांना जनसंघाचा पैसा मिळतो, या मार्गाने त्यांचे चारित्र्यहनन करणे, हा टीकेचा दुसरा मार्ग आहे!
दलवाई जिवंत असताना त्यांना कृत्रिम किडनी बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भरीव मदत केली. दलवाईंसारख्या ‘मुस्लीम-द्रोही’ माणसाला जिवंत राहण्यासाठी शासनाने मदत करणे हा इस्लाम धर्मात हस्तक्षेप असून शासनाच्या पोटातील छुप्या जातीयवादाचा तो पुरावा आहे, असे मत त्या वेळी पत्रक काढून व्यक्त करण्यात आले होते! दलवाईंच्या निधनानंतर काही परंपरावाद्यांनी पेढे वाटून आपला आनंद जाहीर केला! दलवाईंच्या निधनानंतर झालेल्या शोक प्रस्तावाचाही निषेध करून काही मुस्लीम नेत्यांनी आपल्या सांस्कृतिक पातळीचे प्रदर्शन केले! समाजात मूलभूत परिवर्तन करू इच्छिणाऱ्या सुधारकांचा नेहमीच जसा छळ होतो, तसा दलवाईंचा छळ झाला.
तक्रार या छळाविषयी नाही. हजार वर्षांच्या आंधळ्या परंपरेविरुद्ध जो प्रगतीचा आवाज उभा राहिल, त्याला ही किंमत मोजणे अपरिहार्य असते. तक्रार असेल तर ती मुस्लीम परंपरावाद दलवाईंच्या विरोधात उभा राहिला याविषयी नाही. या देशातील जातिधर्मातीत प्रवाहाचा भाग असणारे पुरोगामी नेते खंबीरपणे दलवाईंच्या बाजूने उभे राहू शकले नाहीत, याबाबत तक्रार आहे. दलवाई वारले, पण ते एक ज्योत पेटवून वारलेले आहेत. दलवाईंचा विचार धर्मवेड्या मंडळींच्या आतताईपणामुळे व आक्रस्ताळेपणामुळे मरून जाईल, अशी जर कुणाची समजूत असेल तर ती खुळीच म्हटली पाहिजे! समाजाची प्रगती थोपवून धरणाऱ्या अंधश्रद्धेविरुद्ध जो हुंकार व्यक्त होतो, तो वरवर पाहता काही वर्षेपर्यंत बहुमतासमोर पराभूत झाल्यासारखा दिसला तरी हे दिसणे खरे नसते. दहा-वीस वर्षांनी पाहावे तो सर्व बाजूंनी परंपरेविरुद्धच्या विद्रोहाचा आवाज उसळून प्रबलपणे वर येत आहे, असे चित्र दिसू लागते. समूहांच्या प्रगतीचा इतिहास असा चढ-उतारांनी भरलेला, पण प्रगतीकडे जाणारा असा आहे. क्रमाने मुस्लीम समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि गोषा न पाळणाऱ्या मुस्लीम स्त्रियांची संख्या वाढत आहे. मुस्लीम समाजात नमाज न पढणाऱ्या मंडळींची संख्या वाढत आहे. मुस्लीम स्त्रियांनी घटस्फोटाच्या प्रश्नावर हळूहळू जागृतपणे परंपराविरोध व्यक्त करण्यास आरंभ केला आहे. या टिपणांमध्ये एका टिपणात याची नोंद आहे की, मुस्लीम तरुणींना आपले जोडीदार निवडण्याबाबत जेव्हा संधी देण्यात आली, त्या वेळी या मुस्लीम मुलींनी मुस्लीम समाजाबाहेरचे पती पत्करणे पसंत केले!
ही घटना मुस्लीम परंपरावादाचे केंद्र असणाऱ्या उत्तर प्रदेशातली लखनौमधली आहे. लखनौच्या स्त्री-सुधार गृहातील सर्वच मुस्लीम मुलींनी बिगरमुस्लीम पती निवडले आणि याचे कारण अगदी साधे आहे. सुधार गृहातील निराधार स्त्रिया नव्याने असुरक्षितता काय म्हणून निवडतील? जिथे विवाह-विच्छेद कठीण आहे आणि सवत आणण्याला कायद्याने बंदी आहे, असे ठिकाण या मुलींनी स्वाभाविकच निवडले. घटना मुस्लीम परंपरवाद्यांना कितीही हादरा देणारी वाटली आणि कितीही अप्रिय वाटली तरी यापुढे अशा घटना वाढत जाणार आहेत, हे समजून घ्यायला आपण तयार असले पाहिजे.
अलीगड हे मुस्लीम जातीयवाद आणि परंपरावाद यांचे केंद्रच आहे. या केंद्रात काय चालू आहे ? अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या आवारातील दीडशे स्त्रियांचा एक पाहणी-अहवाल डॉ. फातेमा या मुस्लीम सुशिक्षित तरुणीनेच सादर केलेला आहे. तिला असे आढळून आले की, १५० पैकी ६९ स्त्रिया फक्त सणांच्या दिवशी नमाज पढतात आणि ५२ स्त्रिया मधून मधून नमाज पढतात. कमीत कमी दोन वेळा नमाज पढणाऱ्या स्त्रियांची संख्या फक्त २९ निघाली! १५० स्त्रियांपैकी ६२ स्त्रियांना कुटुंब नियोजनाची कल्पना मान्य होती, ४६ स्त्रियांचा कुटुंब नियोजनाला विरोध होता. अधिक शोध घेता त्यापैकी ४० स्त्रियांयांनी असे सांगितले की, आमच्या नवऱ्याचा कुटुंब नियोजनाला विरोध आहे म्हणून आमचा नाइलाज आहे! प्रत्यक्ष अलीगडमध्ये मुस्लीम समाजातील स्त्रियांनी अशा पद्धतीने विचार मांडावा, ही गोष्ट परंपरावाद्यांना कितीही आश्चर्यकारक वाटली तरी इतरांना ती स्वाभाविकच वाटणार. क्रमाने या सगळ्या बाबी परंपरेच्या चिरेबंदी तटबंदीचे चिरे निखळत चालले आहेत, या गोष्टीकडे लक्ष वेधणाऱ्या आहेत. दाउदी बोहरा समाजात जे चालू आहे, तोही परंपरेच्या विरोधी असणारा असाच एक उठाव आहे. दलवाईंची विद्रोहाची प्रेरणा अनेक मार्गांनी व्यक्त होते आहे. अंधश्रद्धांचे बळ हे कोसळत चाललेल्या भीतीचे बळ असते. ते दरक्षणी दुबळे होत असते.
दाउदी बोहरा समाजात एक वादळच वादळ सध्या चालू आहे. बोहरा हा मुस्लीम समाजातील एक उपपंथ आहे. धर्मगुरूंनी आपल्या गुलामगिरीखाली दडपून टाकलेला असा हा समूह आहे. या समूहात गेली काही वर्षे सतत वादळे चालू आहेत. पाकिस्तानच्या नागरिकांना आणि भारताच्या नागरिकांना आपापल्या देशांशी एकनिष्ठा राहा असे न सांगता नीतिमत्ता आणि देश या दोहोंची पर्वा न करता माझ्याशी एकनिष्ठ रहा असे सांगणारा हा निर्दय धर्मगुरू भारताचा सन्माननीय नागरिक आहे! ज्या मंडळींनी या धर्मगुरूच्या धामिर्क छळाबद्दल बंड पुकारले त्या बंडखोरांची संख्याही दहा-बारा हजारांच्या आसपास आहे. असगर अली इंजिनियर हे या सुधारणावादी बोहरांचे एक तरुण नेते आहेत. त्यांच्यावर अनेकदा प्राणघातक हल्ले करण्यात आले. दहशतींच्या मार्गाने विरोधकांची शरीरे नष्ट करून आपल्या लाखो अनुयायांच्या शरीरांवर व मनांवर धामिर्क गुलामगिरीची पकड चालू राहावी, या कर्मठ दंडेलीला सुसह्य मानण्याकडे भारतातील शासनकर्त्यांचा कल आहे. राज्यकर्ते कोण आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत हा मुद्दाच किरकोळ आहे. मुख्य मुद्दा असा आहे की, शासनकर्त्यांचा पक्ष कोणताही असो, अंधश्रद्धेला सांभाळून घेण्याकडेच नेत्यांचा कल असतो. अंधश्रद्धांची मते जशी हुकमीपणे आपल्या पेटीत पडतात, त्याप्रमाणे विचार जागृत झालेल्यांची मते गठ्ठा होऊन येत नाहीत. म्हणूनच आपली गैरसोय होत नसेल तर मानवी स्वातंत्र्यासाठी जनतेची गैरसोय करायला ते तयार असतात! दाउदी बोहरा समाजात चालू असणाऱ्या या विद्रोहाची पाहणी करण्यासाठी नथवाणीच्या अध्यक्षतेखाली लोकनायक जयप्रकाशांनी एक समिती नेमली होती. या समितीला दडपणामुळे काम करणेही कठीण झाले. अनेक अडचणींना तोंड देऊन ही समिती काम करीत होती. समितीने प्रसिद्ध केलेला अहवाल उदबोधक आहे.
नथावाणी कमिशनचे काम बंद पाडण्याच्या प्रयत्नामुळे किंवा राज्यकर्त्यांनी त्यांची दखल न घेतल्यामुळे धर्मगुरूविरुद्ध जे दहा-पंधरा हजार लोक उभे राहिलेले आहेत, त्यांचा उठाव संपणार नाही. वाढते विज्ञान, वाढते शिक्षण, वाढते सामाजिक तणाव, जुन्या परंपरावादाच्या चिरफळ्या सतत उडवीत राहतातच. हे घडणे अपरिहार्य आहे, हे समजून घेतले पाहिजे.
मुस्लीम मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ‘तवारीख’मध्ये काही छोट्या छोट्या पण गमतीदार घटनांचे उल्लेख आलेले आहेत. त्यांच्याविषयी माझ्याही छोट्या छोट्या प्रतिक्रिया नोंदवीत एका मोठ्या प्रश्नाकडे मला वळायचे आहे. एक प्रश्न हजरत महमद पैगंबर यांच्या जीवनावरील चित्रपटाचा आहे. ज्यांनी हा चित्रपट निर्माण केला ते सिरियात जन्माला आलेले एक मुस्लीम गृहस्थ आहेत. या चित्रपटाला एक कोटी सतरा लक्ष डॉलर्स म्हणजे दहा कोटींहून अधिक रुपये इतका खर्च आला. हा खर्च ज्या सरकारांनी दिला, ती मुस्लीम सरकारे आहेत. आणि इस्लामी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी हा चित्रपट पाहून मान्य केलेला आहे. तरीही जगातल्या मुस्लीम मंडळींनी या चित्रपटाच्या विरुद्ध पुष्कळच गदारोळ माजवला! मुस्लीम देशांत आक्षेप घेणारे आणि आक्षेपाला उत्तरे देणारे मुसलमानच असतात. तरीही तिथे हा प्रश्न विवाद्य होतो. आपल्याकडे तर आक्षेप घेणाऱ्यांचा आक्रस्ताळेपणा आणि अल्पसंख्यांच्या परंपरावादासमोर शरणागती देणाऱ्या बहुसंख्येच्या जातिधर्मातीत राजकारणाची गाठ पडली! यामुळे सदर चित्रपट भारतात कधी दाखवला जाईल याची शक्यताच नाही!
महंमद पैगंबरांच्या जीवनावर चित्रपट काढण्यास मुसलमानांचा विरोध तरी का, हे एकदा नेमकेपणाने समजून घेतले पाहिजे. इस्लाम धर्मात मूर्तीपूजा अमान्य आहे. देव आणि देवतुल्य व्यक्ती यांची मूर्ती करू नये, पुतळा करू नये, त्यांची चित्रेही काढू नयत ही इस्लामाची भूमिका आहे. आता जर महंमद पैगंबरांवर चित्र काढले, तर या चित्रपटात प्रेषित महंमद हे पात्र असणार, हा मुद्दा मुसलमानांना आक्षेपाचा वाटतो. म्हणून या सिरियन दिग्दर्शकाने संबंध चित्रपटच या बेताने काढलेला आहे की, त्यात कोण्याही ठिकाणी महंमद पैगंबर व्यक्तीशः येत नाहीत! त्यांचा आवाजही येत नाही! उरलेली मंडळीच महंमदाचा उपदेश व शिकवणूक याविषयी बोलत राहतात. आता मुस्लीम मंडळींना या चित्रावर आक्षेप घेण्याचे कारण काय? सत्य असे आहे की, महंमद पैगंबराची भूमिका कोणी करो वा न करो, महंमदावर चित्रपट ही कल्पनाच मुसलमानांना आवडत नाही! जे मुसलमान आहेत त्यांनी महंमदाचे चित्र पाहूच नये ही प्राथमिक श्रद्धावाद्यांची भूमिका मी समजू शकतो, पण मुसलमानांची इतकीच भूमिका नाही. जे मुसलमान नाहीत त्यांनीसुद्धा आमच्या प्रेषिताचे चित्र काढू नये अगर पाहू नये, असे या मुसलमानांना वाटते! उद्या जर कोणी असे म्हटले की, ‘माझ्या धर्मात गाय पूज्य आहे तुम्ही ती मारू नका’ तर मुसलमान असे म्हणणार, ‘तुम्हाला गाय पूज्य वाटत असेल तर तुम्ही मारू नका. खाऊ नका. मला ती पूज्य वाटत नाही. माझ्यावर तुमची सक्ती का?’ आणि हे म्हणण्याचा अधिकार आपण समर्थनीय मानतो. उद्या जर एखादा माणूस म्हणाला, ‘मी मूर्तीपूजा मानतो. मला महंमदांचा पुतळा बनवायचा आहे’ तर ते मात्र मुसलमानांना मान्य नाही! ‘माझ्या धर्माप्रमाणे मी वागेन. त्यात हस्तक्षेप नको’ ही भूमिका श्रद्धाळू असली तरी समजण्याजोगी आहे, पण ममाझ्या धर्माला जे मान्य नाही ते प्रतिपादन करताना तुमच्या भावना दुखवणे हा माझा हक्क आहे. मात्र माझी धर्मभावना दुखवण्याचा तुम्हाला हक्क नाही’ असे म्हणणे हा शुद्ध हट्टीपणा आहे! हा हटवाद हेच इस्लामाचे मुख्य सूत्र आहे. कारण परंपरावादी मुसलमान फक्त आपलाच धर्म खरा मानतात. इतर कुणाला धर्म आहे हे त्यांना मान्य नाही! अडचणींना या ठिकाणाहून आरंभ होतो.
भारतीय मुसलमानांना भारतात राहण्याची भीती वाटत होती. लोकशाहीत बहुसंख्येचे राज्य असणार आणि भारतात बहुसंख्या हिंदूंची असणार. मग या हिंदू राज्यात आपले काय, हा एक प्रश्न त्यांच्यासमोर नेहमीच होता. आम्ही मुसलमान एक स्वयंभू स्वतंत्र राष्ट्र आहोत ही प्रमुख भूमिका आम्ही मुसलमान मुस्लीम राष्ट्रातच सन्मानाने जगू शकतो, ही दुसरी भूमिका. या भूमिका पत्करूनच मुसलमानांनी पाकिस्तान मागितले व मिळवले. गेल्या तेहेतीस वर्षांचा इतिहास जर वास्तववादी पद्धतीने पाहिला तर ही आपली भूमिका आपल्याला फारशी हिताची ठरली नाही, हे मुसलमानांच्या लक्षात यायला हरकत नसावी. पहिली गोष्ट म्हणजे एक प्रचंड लोकसंख्या धर्माने मुसलमान असूनही भारतातच राहिली. ती भारतात समरस होण्यासही तयार नाही आणि पाकिस्तानात जाण्यासही तयार नाही!
दुसरी गोष्ट म्हणजे जे भारतीय मुसलमान पाकिस्तानात गेले ते पाकिस्तानात नेहमीच परके, निर्वासित म्हणूनच राहिले. त्या ठिकाणी ते मिळूनमिसळून जाऊ शकले नाहीत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुसलमानांनी मुसलमानांवर केलेल्या अन्यायाचा वीट येऊन ‘बांगला देश’ फुटून वेगळा निघाला आणि स्वतंत्र झाला! धर्म राष्ट्रवादाचा आधार होऊ शकत नाही. कोणी तसा प्रयत्न केला तर तो फार दुबळा आधार ठरतो. ही गोष्ट उलगडण्यासाठी या घटना पुरेशा आहेत. पण मुस्लीम परंपरावादी मन या घटना ध्यानात घ्यायला तयार नाही.
दोन मुस्लीम राष्ट्रांमध्ये सतत झगडे चालूच राहिलेले दिसतात. मलाया आणि इंडोनेशिया यांचे जुळत नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचे जुळत नाही. इराक-इराणची लढाई चालूच आहे. लिबिया आणि सूदान यांचे जुळत नाही. अरब राष्ट्रांचे आपापसात झगडे आहेत. त्याप्रमाणे मुस्लीम अरब राष्ट्रे बिगर मुस्लीम राष्ट्रांच्या इतकेच अरब नसणाऱ्या मुस्लीम राष्ट्रांना परके मानतात, ही एक वस्तुस्थिती आहे. ज्या ज्या वेळेला भारत आणि पाकिस्तानची लढाई झाली, त्या त्या वेळेला शब्दव्यवहार सोडला तर अरब जग तटस्थ राहिले, त्यांनी पाकिस्तानला सक्रिय पाठिंबा दिला नाही, हे असेच एक उघडे सत्य आहे. पाकिस्तानला पाठिंबा देण्यापेक्षा भारत-अरब मैत्री अरबांनी अधिक महत्त्वाची मानली असा इतिहास आहे. पण याही इतिहासाचा मुस्लीम मनांवर फारसा प्रभाव पडला नाही!
पाकिस्तानचे निर्माते महंमद अल्ली जीना अखेरच्या दिवसांत एकाकी होते! आपण जे राष्ट्र निर्माण केले त्या राष्ट्रातच आपण एकाकी झालो आहोत, आपण वेगळे तर झालो, पण मुसलमानांचे नवराष्ट्र मात्र निर्माण करणे आपल्याला शक्य नाही, याची जसजशी जाणीव होत गेली तसतसे जीना एकाकी होत गेले! जीनांचा हा एकाकीपणा म्हणजे धार्मिक राष्ट्रवादाला आलेले अपयशच आहे! आज इराणमध्ये धामिर्क राष्ट्रवादाचा एक प्रयोग चालू आहे. या उद्योगातून इराणच्या वाट्याला आथिर्क नुकसान, राष्ट्रीय नाचक्की आणि अस्थैर्य यांखेरीज काही येणार नाही. पाकिस्तानातही प्रत्येक वेळी नवा लष्करी हुकूमशहा काही तरी नवा प्रयोग करीत असतो. सध्या जनरल झिया पाकिस्तानात इस्लामचे धार्मिक कायदे अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहेत! पाकिस्तानात इस्लामचे धर्मराज्य आणणे हे तर अशक्य आहेच, पण हे धर्मराज्य आणण्याच्या प्रयत्नात सिंध आणि पाकिस्तानातील अन्य अलगतावादी शक्ती बलवान होऊन पाकिस्तानचे अस्तित्व समाप्त करतील की काय, अशीच एक चिंताजनक अवस्था तिथे निर्माण झालेली आहे! धर्मराज्याच्या प्रयत्नात राष्ट्राचे अस्तित्व धोक्यात आले, तरीही मुस्लीम मन अजून धार्मिक अंधश्रद्धेच्या बाहेर पडून विचार करण्याच्या अवस्थेत आलेले नाही. मुस्लीम समाजातील ही चमत्कारिक आणि बळकट श्रद्धा ज्या कारणांमुळे उदयाला आली आहे, ती कारणे आपण नीटपणे समजून घेतली पाहिजेत. निदान हिंदू समाजाच्या परिघात जी मंडळी वावरतात, त्यांनी तरी ही कारणे नीट समजून घेतली पाहिजेत.
हिंदू धर्म एका प्रेषिताकडून एखादी लाट प्रवर्तित व्हावी असा उदयाला आला नाही. हिंदू धर्माला ‘हिंदू’ म्हणून जयाचा इतिहास नाही. हिंदूंनी आपल्या वाढत्या पराक्रमाच्या जोरावर ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून स्वतःला घडवले, असा इतिहास नाही. मुस्लीम समाजाची परिस्थिती यापेक्षा निराळी आहे. प्रेषिताने हातांत शस्त्र धारण केल्यापासून एका दशकात स्वतःचे राष्ट्र आणि पहिल्या शतकातच त्या वेळच्या ज्ञात जगाचा एकतृतीयांश अधिपत्याखाली येणे, हा त्यांचा इतिहास. ज्या धर्माने आपले राष्ट्र विजयी केले नाही, त्या धर्माला धर्मजयाचा इतिहास नाही त्या धर्माविषयीसुद्धा श्रद्धेच्या पातळीवर एवढी मोठी उत्कट ओढ हिंदूंना वाटत असेल तर ज्यांना धर्मंजयाचा इतिहास आहे, त्यांचे अभिमान अधिक उग्र व उत्कट असणारच असणार, हे आपण समजून घेतले पाहिजे. जर राज्यसत्ता आणि धर्म एकच असेल तर मग हजार वर्षांत काही वेगळा विचार करण्याची परंपराच नसते. नाना मते, नाना देव, नाना ग्रंथ, चालीरीती यांमुळे विस्कळीतपणा हेच लोकविलक्षण वैशिष्ट्य असणाऱ्या धर्माविषयी जर एवढी ओढ असली तर दीड हजार वर्षांचे अंधश्रद्धेचे सातत्य किती कर्मठपणा निर्माण करील, याचेही भान आपण ठेवायला हवे.
..................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा
..................................................................................................................................................................
मुस्लीम समाजातील परंपरावाद मी मुळीच समर्थनीय समजत नाही. मुसलमानांच्याच प्रगतीसाठी हा परंपरावाद उदध्वस्त करणे आवश्यक आहे, असे मी मानतो. पण हे मानत असताना या घटनेचे कारणही आपण समजून घेतले पाहिजे.
हाच प्रश्न समजून घेण्याची दुसरी एक पातळी आहे. मुसलमानांना आपला पराभव जाणवावा, त्यांना बदलण्याची गरज वाटावी अशी भोवतालच्या राजकारणात परिस्थिती तरी केव्हा निर्माण झाली? अखंड भारताच्या मोहापोटी सर्व स्वातंत्र्य-चळवळीच्या कालखंडात आमचे राष्ट्रीय राजकारण मुस्लीम परंपरावादाशी तडजोडीच करीत आले आणि स्वातंत्र्योत्तर काळात ठोक मनदान करणारा एक प्रमुख समूह म्हणून मुस्लीम समाज उभा राहिला. त्याच्या प्रत्येक हटवादीपणाला कुरवाळीत बसणे ही लोकशाही राजकारणाची एक आवश्यकता ठरली. भोवतालच्या वातावरणात बदलाच्या दिशेने ढकलणारे ताण नाहीत, उलट स्थितीवादाला संरक्षण आहे, मागच्या इतिहासात अहंतेला फुंकर घालून कर्मठपणा वाढवणारा पसाराच आहे, अशा या वातावरणात एखाद्या समाजाचा परंपरावाद कितीसा बदलेल?
मुस्लीम समाजाचे मन अजून परंपरावादी आणि कर्मठ आहे, याचे दुःख वाटले तरी मला आश्चर्य वाटत नाही. हिंदू समाजातील सर्व विस्कळीतपणा, हिंदू समाजाचा मागचा सर्व इतिहास आणि सुमारे शंभर वर्षे परंपरावादाविरुद्ध झगडणारी आंदोलने जर पाहिली तर ज्या प्रमाणात हिंदू समाजातील परंपरावाद कोसळायला हवा होता त्या प्रमाणात तो कोसळलेला नाही. पराभवात आणि प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपली अंधश्रद्धा टिकवून ठेवण्याची हिंदू समाजाची क्षमता फार चिवट आहे, असा निर्णय घ्यावा लागतो. याउलट धर्मचिकित्सेची, सुधारणेच्या आंदोलनांची कोणतीही परंपरा नसणाऱ्या मुस्लीम समाजात राजकारणात फार ताण नसतानासुद्धा ज्या सततच्या फळ्या पडत आहेत, त्या पाहिल्या तर प्रतिकूल परिस्थितीत आणि पराभवात टिकून राहण्याची क्षमता मुस्लीम समाजात कमी आहे, असा निर्णय द्यावा लागतो. जे कर्मठ ‘विजय’ नावाच्या भ्रमावर जगतात त्यांची पराजयात टिकण्याची क्षमता कमीच असणार, पण ज्यांनी विजय होणे अशक्य आहे आणि पराजय होणे क्रमप्राप्त आहे, हे समजून घेऊन जय-पराजयात टिकून राहण्याचेच तत्त्वज्ञान बनवले त्यांची प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता अधिक असणार हे उघड आहे!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
मुल्कपरस्त यांच्या या टिपणांचे स्वरूप मुळी एखाद्या प्रश्नाची तपशीलवार चर्चा असे नाहीच. मुसलमानांना आवडणारी अगर न आवडणारी, पण मुस्लीम समाजात चालू असणारी जी सामाजिक आंदोलने आहेत, त्या आंदोलनांच्याकडे व मुस्लीमांच्या मनांत घोळत असणाऱ्या प्रश्नांकडे मराठी वाचकांचे लक्ष वेधावे एवढाच या टिपणाचा हेतू आहे. मुस्लीम समाजाचे मनोगत मराठी वाचकांच्या समोर आणण्याचे प्रयत्न फारसे होतच नाहीत. गेल्या पाच वर्षांत या दृष्टीने जो प्रयत्न झाला, या प्रयत्नात सातत्य होते आणि वैविध्यही होते असा एकटा हाच एक प्रयत्न होता म्हणून या उपक्रमाला महत्त्व आहे. परंपरावादापासून आपले मन मुक्त ठेवून असले प्रयत्न होतील तितके करायला हवेत. हा एक कर्तव्याचा भाग आहे. प्रसंगी अप्रियता पत्करून या कर्तव्यभावनेला मुल्कपरस्त जागले, याबद्दलचे ऋण व्यक्त करणे एवढाच प्रस्तावनेचा हेतू आहे.
‘मुस्लिम मनाचा कानोसा’ - यदुनाथ थत्ते, साधना प्रकाशन, मूल्य - ३०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment