लोकशाही मूल्ये, सेक्युलॅरिझम, समता, बंधुता, वैज्ञानिक विचार ही मूल्ये सेवादलाने स्वतःसाठी जाणीवपूर्वक स्वीकारलेली मूल्ये आहेत
ग्रंथनामा - झलक
गणेश देवी
  • ‘आपले स्वप्न : परिवर्तन आजचे आणि उद्याचे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 04 January 2022
  • ग्रंथनामा झलक आपले स्वप्न : परिवर्तन आजचे आणि उद्याचे Aaple Swapna - Parivartan Aajche aani Udyache राष्ट्र सेवा दल Rashtra Seva Dal गणेश देवी Ganesh Devi संदेश भंडारे Sandesh Bhandare राजा कांदळकर Raja Kandalkar

‘आपले स्वप्न : परिवर्तन आजचे आणि उद्याचे’ हे पुस्तक नुकतेच राष्ट्र सेवा दल, पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकाचे संकलन-संपादन संदेश भंडारे व राजा कांदळकर यांनी केले आहे. या पुस्तकात झोया हसन, रवीश कुमार, संजय संघवी, डी. एल. कराड, विश्वास उटगी, पूर्णिमा चिकरमाने, वाहरू सोनवणे, धनाजी गुरव, सुरेश दळवी, भालचंद्र कानगो, अशोक ढवळे, संजीव चांदोरकर, राजू शेट्टी, सुखदेव थोरात, मनस्विनी लता रवींद्र, प्रज्ञा दया पवार, नीरजा, राहुल कोसंबी, रवींद्र आंबेकर, कपिल पाटील, बाबा आढाव, गणेश देवी अशा विविध मान्यवरांच्या लेखांचा समावेश आहे. त्यातील ‘राष्ट्र सेवा दला’चे अध्यक्ष गणेश देवी यांचा हा एक लेख…

.................................................................................................................................................................

१.

‘समाजवाद’ या शब्दाचा नेमका अर्थ समजायचा असेल तर गेल्या दोन शतकांतील युरोपमधील अनेक विचार-प्रवाह, विचारवंतांचे गहन ग्रंथ, अनेक आंदोलने, जगभरातील वेगवेगळ्या बदलत गेलेल्या शासन-व्यवस्था, उत्पादन व्यवस्था, त्याचबरोबर आपल्या देशातील स्वातंत्र्याचे आंदोलन, स्वातंत्र्योत्तर काळातील काही महत्त्वाची आंदोलने आणि आपल्याकडील अर्थव्यवस्था व सामाजिक ताणेबाणे यांचे अत्यंत गुंतागुंतीचे परस्परसंबंध, या साऱ्यांचा एक सम्यक विचार करावा लागेल. तो काही-अंशी तरी समजल्याखेरीज समाजवादाविषयीची केलेली विधाने केवळ ‘हेटरीक’ (अर्थहीन वाच्यता) बनतील. एवढेच नव्हे, तर तशी विधाने समाजवादाच्या मूळ हेतूस घातक ठरतील.

२.

सर्वांत प्रथम लक्षात घेण्याची बाब म्हणजे कोणत्याही डिक्शनरीमध्ये ‘समाजवाद’ शब्दाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर त्याचे स्पष्ट असे दोन अर्थ मिळतात, एक, ‘समाजवाद ही विचारप्रणाली आहे’ (thought-tradition), समाजवाद ही सामाजिक-कार्यप्रणाली आहे’ (practice). याहून थोडासा भिन्न वाटावा, पण काळजीपूर्वक पाहिल्यास या दोन्हीही अर्थांशी जवळून निगडित असा ‘समाजवाद’ शब्दाचा तिसरा अर्थ म्हणजे समाजवाद हा भांडवलशाही आणि कम्युनिझमचे अंतिम साध्य या दोनमधला ‘संक्रमणाचा टप्पा’ आहे. (Socialism-in Marxist theory-a transitional phase between the overthrow of Capitalism and the realisation of communism). हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा राजकीय तत्त्वज्ञान-कोष बनला, तेव्हा त्यातील समाजवादावरील नोंदीत अँजेलो रॅपोपोर्ट यांच्या ‘डिक्शनरी ऑफ सोशलिझम’चा आधार घेऊन, सोशलिझमचे विविधाविध अर्थ-धागेदोरे-दर्शवण्यात आले. (Rappoport, -ngelo, 1924, Dictionary of Socialism, London: T. Fischer Unwin). ते सारे अर्थ पाहिल्यास, ‘सोशलिझम’ या शब्दाचा नक्की कोणताच अविचल अर्थ नाही, एवढे एकच तर्कसंगत विधान करता येईल.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

३.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस उदयास येत असलेली युरोपमधली सोशॅलिझमची परंपरा किंबहुना तेथील सोशलिझमची विविध ‘घराणी’ अनेक मार्गांनी विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंत पोहचली होती. रशियातील ऑक्टोबर-क्रांती आणि आपल्याकडील स्वातंत्र्य-लढा या दोन्हीच्या राजकीय पार्श्वभूमीवर भारतातील राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांना समाजवादाने प्रभावी रीतीने आकर्षित केले. एक शतकापूर्वी ज्या रीतीने युरोपमधले सोशालिस्ट-विचार आपल्याकडे येत होते, त्याचप्रमाणे आजही गेल्या काही दशकांत अन्य देशात निर्माण झालेले समाजवादी विचार आपल्याकडे येत राहिले आहेत. अर्थात त्यांचा भारतीय समाजात आणि राजकारणातला प्रभाव पूर्वीपेक्षा तुलनेने कमी होत राहिला आहे. एकेकाळी फेबियन सोसायटीचे किंवा कार्ल मार्क्सचे विचार आपल्याकडे येत होते, तसेच यापूर्वीच्या दोन-तीन न्यू इकॉनॉमिस्ट आणि लेफ्ट-फेमिनिस्ट साहित्यातून ते येत आहेत. तथापि, आपल्या येथे सोशॅलिझम प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणारे, त्या संकल्पनांचा सामाजिक कार्यांत आणि राजकीय जीवनात प्रयोग करणारे, यांची जडणघडण ज्या वैचारिक मुशीत झाली आहे, त्या मुशीची मोठ्या हिश्शाची ऊर्जा एत्तद्देशीय आंदोलने, संकल्पना, व्यक्ती व त्याचा सकारात्मक प्रभाव आणि एत्तद्देशीय विचार आहेत, हे स्वीकारावे लागते. ज्याप्रमाणे आफ्रिकन सोशॅलिझमचा विचार करताना लुई सेंघोर किंवा क्वामी एंक्रुमा विचारात घ्यावे लागतात, त्याचप्रमाणे भारतीय सोशॅलिझम समजून घेताना गांधी, लोहिया, विनोबा, जयप्रकाश विचारात घेणे महत्त्वाचे ठरते.

४.

‘सोशॅलिझम’ या शब्दाच्या अर्थाची निश्चिती करण्यात असणाऱ्या अडचणी, समाजवादाचे वेगवेगळ्या देशात झालेले विविध प्रगटीकरण, त्याचा वेगवेगळ्या छटांचा प्रत्यक्ष अनुभव, आणि समाजवादाचा इतिहास रचणारे वेगवेगळ्या देशातील आणि वेगवेगळ्या प्रतिभेचे विचारवंत आणि सामाजिक नेते व त्यांच्यात असलेले आपसातील सूक्ष्म विचार-भेद, या साऱ्याच्या परिणामस्वरूपे आपल्या काही शाब्दिक-अन-वैचारिक सवयी बनल्या आहेत. उदाहरणार्थ, आपण बुद्ध, बसवेश्वर, तुकाराम, कबीर, मीरा यांना एकाच वाक्यात जितक्या सहजपणे गुंफत असतो तितक्याच सहजपणे गांधी, विनोबा, लोहिया, जयप्रकाश यांनाही एकमेकांबरोबर मांडत असतो. इतकेच नव्हे तर आपल्या बोलण्यात अगदी लीलया बुद्ध, गांधी, आंबेडकर ही नावे येऊ शकतात; आणि ती तशी आली तर आपल्यातल्या तसे बोलणाऱ्याला आणि ते ऐकणाऱ्यालाही त्यात काही अतंर्गत विसंगती असू शकते असे वाटत नाही. अँजेलो रॅपोपोर्ट यांच्या हेअर-स्प्लिटिंग तर्क-पद्धतीने पाहिल्यास, बुद्धाचा ‘ईश्वर’ तत्त्वासंबधीचा विचार आणि गांधींचा ‘ईश्वर’ यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. विनोबांचा सर्वोदयातील ‘सर्व’ आणि लोहियांचा किंवा नेहरूंचा ‘सर्व’ आयडेंटिकल नाही. अर्थात, हे सांगत असताना मला असे जराही अभिप्रेत नाही की, आपण सारे कोणत्या तरी वैचारिक गोंधळात सापडलेले आहोत. कदाचित, याविरुद्ध, मला असे दाखवायचे आहे की, आपल्या विचार करण्याच्या सवयीत विशिष्ट काही असे तत्त्व आहे, जे युरोपच्या विचारकांत सामान्यपणे दिसून येत नाही. त्या विशिष्ट भारतीय विचारतत्त्वाला समजून घेणे आपल्याला आपल्या विचार-स्पष्टतेसाठी गरजेचे आहे.

५.

हे विचार-तत्त्व भारतीय समाजजीवनात खोलवर रुजलेल्या विविधतेच्या-सहिष्णुतेत जन्मलेले आहे. विविधता म्हणजे विषमता नव्हे, हे येथे मुद्दाम अधोरेखित करतो. जेव्हा ‘विविधता’ विकृत स्वरूपात मांडली जाते, तेव्हा सर्व समाज जातीव्यवस्थेसारखी विषमता बिनदिक्कत स्वीकारायला पुढे सरसावतो; पण जेव्हा ‘विविधता’ तत्त्व त्याच्या मूळ स्वरूपात मांडण्यात येते, तेव्हा ते ‘सहानुभूती’, ‘अनुकंपा’ (सिम्पथी, कंपॅशन) या स्वरूपात पाहायला मिळते. भारतीय समाजवादी आंदोलनात असणाऱ्या व्यक्तींचे प्रत्यक्ष जीवन जवळून पाहिल्यास त्यांच्यात ईश्वर अगदीच न मानणारे-संपूर्ण निरीश्वरवादी (अथिस्ट), अंशतः ईश्वरवादी-अंशतः निरीश्वरवादी (ऍग्नोस्टिक), भक्ती-संप्रदायांना स्वीकारणारे, संतपरंपरा मौल्यवान मानणारे (डिव्होशनल सेक्टेरियनस), आणि दृढ-विश्वासू (फर्म बिलिव्हर्स) असा एक मोठा पटल दिसतो. आपल्यापैकी प्रत्येक जण या ईश्वर संकल्पनेच्या विस्तृत पटलावर कोठेतरी ‘लोकेटेड’ असतो. पण, आपल्यात असलेल्या या वेगवेगळ्या भूमिकांमुळे कोणतेही नवे नोंद्पात्र डिस्कोर्ड्स निर्माण झालेले माझ्या माहितीत नाहीत. युरोपमध्ये वैचारिक इतिहासात हा मुद्दा तुलनेने फार महत्त्वाचा मानला गेला. तेथे गांधींचे विचार गुरू जॉन रस्किन आणि कम्युनिस्टांचे विचारगुरू कार्ल मार्क्स, ईश्वराविषयीची त्यांची वेगवेगळी धारणा या मुद्द्यावर दोघेही अतिरिक्त संपत्ती संचयाच्या विरुद्ध असूनही वेगळ्या पठडीतले मानले जातात. येथे ईश्वरविषयक धारणा ही मी फक्त उदाहरण म्हणून वापरतो आहे. तो, माझा मुख्य मुद्दा नाही. मुख्य मुद्दा आहे तो विविधतेचा. तो भारतीय समाजवादाचे अंतरंग समजण्यासाठी अत्यंत गुंतागुंतीचा (क्रुशियल)/महत्त्वाचा आहे.

६.

समाजवादाची अगदी सगळ्यात कमी विवादास्पद व्याख्या केली जाते ती अशी आहे - Socialism is a range of economic and social systems characterised by social ownership of the means of production and workers' self-management as well as the political theories and movements associated with them. उत्पादनाची साधने, त्यावरची उत्पादकांची पकड, त्यांचे नियमन याविषयीचे विविध दृष्टीकोन, ती पकड निर्माण करण्यासाठीची सामाजिक पुनर्रचना या विषयीचे विचार आणि प्रत्यक्ष सामाजिक आणि आर्थिक प्रयोग हे सारे. या प्रकारच्या आर्थिक-सत्ता बदलासाठी आणि समाज-परिवर्तनासाठी, समाजवादाची जी प्रमुख-तत्त्वे विचारात घेतली जातात, त्याचे वर्णन/वर्गीकरण काहीसे पुढीलप्रमाणे केले जाते : १) समता (समानतासुद्धा), २) लोकशाही, ३) स्वातंत्र्य, ४) सामाजिकता/सामुदायिकता.

७.

२१व्या शतकातील भारतीय समाजवादी विचारासाठी हे वर्गीकरण पूर्णतः उपयोगी नसले तरी आपल्या विचारास चालना देण्यासाठी उपयुक्त आहे, यात शंका नाही. युरोपमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात ‘कम्युनिझम’चा प्रतिशब्द म्हणून ‘सोशॅलिझम’ हा शब्द वापरला गेला होता. किंबहुना, थोड्याशा ‘वरच्या सामाजिक दर्जाचा’ कम्युनिस्ट विचार म्हणजे सोशॅलिझम असा उल्लेख व्हायचा. विसाव्या शतकात तो अर्थ बदलत जाऊन, सोशॅलिझम/समाजवाद हा निखळ कम्युनिझमपासून वेगळा पाहण्यास सुरुवात झाली. आपल्याकडे हे दोन्ही, कम्युनिझम आणि सोशॅलिझम जवळजवळ एकाच वेळेस येऊन पोहचले. अर्थात त्या दोन्हीमधला अगदी स्पष्ट फरक काय आहे/असावा याची क्रिस्टल-क्लियर कल्पना तेव्हाही नव्हती आणि मला वाटते आजही नाही. भारतात, खासकरून स्वातंत्र्योत्तर काळात, कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट यातला फरक बहुतांशी त्या नावाच्या राजकीय पक्षांच्या आधारेच होऊ लागला.

८.

भारतीय समाजवाद एका बाजूला समता/समानता मानणारा, दुसऱ्या बाजूला लोकशाही मानणारा, आणि त्याच बरोबर वैज्ञानिक विचार/विचारपद्धती स्वीकारणारा, भारतीय राज्यघटनेवर संपूर्ण विश्वास आणि त्या- प्रतीची निष्ठा बाळगणारा असा होत राहिला. आपल्या राज्यघटनेत आपला देश सेक्युलर कल्पिला गेला आहे. भारतीय समाजवाद त्यामुळे सेक्युलॅरिझम हे नॉन-निगोशिएबल मूल्य म्हणून स्वीकारतो. युरोपिअन सोशॅलिझमपेक्षा कालक्रमाने भारतीय समाजवाद बराचसा वेगळे स्वरूप स्वीकारत आला आहे. भारतीय समाज-रचनेची गुंतागुंत, भारतातील अति-व्याप्तीची इन्फॉर्मल इकॉनॉमी आणि आपला प्रदीर्घ इतिहास, व त्या दरम्यान आपल्याला लाभलेली सांस्कृतिक चिन्ह-व्यवस्था (द कॉम्प्लेक्स ऑफ कल्चरल सिम्बोलिझम) या साऱ्यांच्या विशिष्टतेमुळे हे होणे स्वाभाविकही होते. ते झाले. लोकशाही मूल्ये, सेक्युलॅरिझम, समता, बंधुता, वैज्ञानिक विचार ही मूल्ये सेवादलाने स्वतःसाठी जाणीवपूर्वक स्वीकारलेली मूल्ये आहेत. आत्ताच्या काळात, ही मूल्ये जपणे अधिकाधिक कठीण बनत असले तरीही ही मूल्ये जतन करणे, त्यांची वृद्धी होईल, त्यातून समताधिष्ठित समाज निर्माण होईल, ही आशा स्वतः बाळगणे आणि इतरांच्या मनात जिवंत ठेवणे, हे सेवा दलाचे मुख्य काम आहे. पण ते करत असताना किमान वैचारिक स्पष्टता असणे उचित ठरेल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आपल्यातल्या प्रत्येकाला महाविद्यालयीन शिक्षणाची संधी मिळाली असेलच असे नाही, प्रत्येकास मराठी भाषेबाहेरचे साहित्य वाचायला मिळेलच असे नाही. तशी अपेक्षा करणे हाही अप्रत्यक्षपणे एक अन्याय होईल. पण ज्यांना इंग्रजी भाषा वाचण्याची संधी मिळाली, त्या सेवादल-सैनिकांनी स्वतः किंवा कोणाच्या तरी साहाय्याने, खालील दिलेल्या यादीतील किमान काही ग्रंथ मराठीत आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा उपयोग इतरांना समाजवादाचे स्वरूप जास्त स्पष्टपणे समजण्यासाठी होऊ शकेल. सेवादलात प्रकाशन विभागाने हे काम हाती घेतले, तर सेवादलासाठी विचाराचा नवा साठा उपलब्ध होईल. आपल्याला जमेल तेव्हा गांधी आणि लोहिया वाचणे, समजून घेणेही उपयोगाचे आहे. ते व्हावे, हे अपेक्षित.

.................................................................................................................................................................

‘आपले स्वप्न : परिवर्तन आजचे आणि उद्याचे’ - संकलन-संपादन - संदेश भंडारे व राजा कांदळकर

राष्ट्र सेवा दल प्रकाशन, पुणे

पाने - २५६

मूल्य – ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

हे पुस्तक ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी विशेष सवलतीमध्ये (३५० रुपयांचे पुस्तक २५० रुपयांत घरपोच)

खरेदीसाठी लिंक - https://rashtrasevadal.org/seva-dal-publications/

संपर्क - 8530375539

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Narendra Apte

Tue , 04 January 2022

समाजवादी विचारसरणी, समाजवाद आणि लोकशाही यांच्याबद्दल राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी ( ज्यांची संख्या घटत आहे)  अधिक गांभीर्याने विचार करणे  असे हा लेख वाचल्यावर जाणवते.  वस्तुस्थिती अशी आहे की लोकशाही समाजवाद बहुसंख्यांना एक ओझे वाटण्या इतका परका झाला आहे. याबद्दल एक निरीक्षण नोंदवून पुढे जातो. समाजवाद हा बहुसंख्य मतदारांना परका  झाला आहे ही वस्तुस्थिती स्वीकारणे प्रा मधू दंडवते यांच्या सारख्या विद्वान व्यक्तींना पण कठीण गेले. प्रा दंडवते यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव एका परीने काळाचा महिमा होता आणि एका परीने तो पराभव लोकशाही समाजवादाचा पण पराभव होता.  या संदर्भात मला महत्वाचा मूद्दा नमूद करावयाचाआहे. बहुसंख्य जनतेचे जे आर्थिक- सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी लोकशाही समाजवादी रचना उपयुक्त आहे अशी समाजवादी मंडळी आणि डाव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते असणाऱ्यांची धारणा असते.  माझ्या मते या संबंधी विचार करताना (अ)   लोकशाही समाजवादी सरणी आणि (ब) समाजवादी अर्थरचना विचार कुठे  कमी पडले याबद्दलची चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे.   या चर्चेत उपयुक्त ठरू शकणार श्री वसंत पळशीकरयांच्या मराठी विश्वकोशातील 'लोकशाही समाजवादा" वरील टीपणातील काही भाग मलासमर्पक करतो तो भाग येथे मी उर्धृत करत आहे:   “लोकशाही समाजवादाच्या आर्थिक फेरमांडणीविषयी लोहियांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या मांडल्या. भारतातील मनुष्यबळाची उपलब्धता व भांडवलाची कमतरता ध्यानात घेता, तसेच संपत्ती व सत्तेचे केंद्रीकरण रोखण्याच्या दृष्टीने, येथे  श्रमसधन अल्पप्रमाण यंत्रांचा वापर अधिकात अधिक करणे श्रेयस्कर ठरेल, असे त्यांनी प्रतिपादले. आज हेच तत्त्व समुचित तंत्रविज्ञान या शब्दप्रयोगाने  मांडले व ओळखले जाते. प्रत्येकास अर्थपूर्ण रोजगार मिळावा व त्याआधारे किमान जीवन वेतनाची हमी मिळावी. ही बाब सर्वाधिक अग्रक्रमाची मानून या  देशात आर्थिक विकासाची व्याख्या तसेच नियोजन केले जावे, या गांधीजींच्या आग्रहाचे प्रतिबिंब लोहियांच्या विचारात पडलेले दिसते. रोजगार, समता व न्याय प्रस्थापनेचा मुद्दा वा व्यक्तिस्वातंत्र्य असो, विकासाच्या मार्गक्रमणात त्या गोष्टी आपल्या पदरात थोड्याथोड्या का होईना पडत आहेत वा अनुभवाला  येत आहेत, अशी प्रचीती शोषित-पीडित व दरिद्री-बेकार व्यक्तींना आली पाहिजे.-‘तत्काळ पडताळ्याचे तत्त्व’ (प्रिन्सिपल ऑफ इमीडीअसी). लोहियांनी मांडले मात्र दुर्दैवाने, ‘समुचित तंत्रविज्ञाना’ विषयी, विकेंद्रित अर्थ आणि उद्योग–व्यापार संरचनेविषयी वा पर्यायी विकासनीतीविषयी अधिक सखोल वा  तपशीलवार मांडणी नंतरच्या काळात लोकशाही समाजवादी चळवळीमध्ये केली गेली नाही.”    श्री वसंत पळशीकरांचे हे विचार समाजवादी विचारांचे समर्थन करणाऱ्या सगळ्यासाठी आणखी विचार-विनिमय करण्यासाठी उपयुक्त वाटतील असे वाटले म्हणून हे कंमेंट लिहीत आहे. तसदीबद्दल माफी मागतो. 


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......