‘रंगली रंगलिओट’ : ही आज्ञा परमेश्वर देऊ शकतो, साधू संत देऊ शकतात, आणि वैयक्तिक पातळीवर तुम्ही आम्हीही देऊ शकतो!
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • गॉडनच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि Tontyn Hopman या चित्रकाराच्या नजरेतून तीस्ता नदीला आदेश देताना लामा. त्याखाली ‘रंगली रंगलिओट’ चहा आणि चहाचे मळे
  • Thu , 30 December 2021
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध रंगली रंगलिओट Rungli Rungliot

शब्दांचे वेध : पुष्प बावन्नावे

भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळी मध्यरात्री प्रचंड पाऊस पडत होता. यमुना नदी दुथडी भरून वाहत होती. काळ्याकुट्ट अंधाराचं राज्य होतं. लगेच देवकीनं आपल्या या नवजात बालकाला एका टोपलीत ठेवलं. वसुदेवांनी ती टोपली मस्तकावर घेतली आणि ते कारागृहाबाहेर पडले. भगवंतांच्या मायेमुळे त्या वेळी सर्व दरवाजे उघडे झाले होते, पहारेकरी घोरत पडले होते. वसुदेवांच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या होत्या. अंधारात वाट काढत काढत वसुदेव नदीकिनारी पोहचले. नदीच्या रौद्र रूपानं जराही विचलित न होता ते पाण्यात उतरले आणि लवकरात लवकर ती पार करायची या निर्धारानं चालू लागले. त्यामुळे जणू काही यमुनेला चेव चढला आणि ती अधिकच वेगानं फुगू लागली. काही क्षणातच पाणी वाढू लागलं. वसुदेवांच्या अगदी गळ्यापर्यंत पाणी आलं. तरीही ते थबकले नाहीत. आता डोक्यावरूनही पाणी गेलं तर काय, ही चिंता न करता त्यांनी पुढचं पाऊल उचललं. पण त्याच क्षणी एक चमत्कार झाला. टोपलीत गाढ झोपलेल्या त्या इवल्याश्या बालकानं आपला एक पाय टोपलीबाहेर काढला आणि आपला अंगठा नदीच्या पाण्यात बुडवला. तो स्पर्श होताच यमुनेला प्रत्यक्ष परमेश्वराचाच आशीर्वाद मिळाल्याचं समाधान झालं आणि जणू काही याच क्षणाची वाट बघत असल्यासारखी ती फुगायची थांबली. तृप्त मनानं आणि पुलकित गात्रांनी ती माघारी फिरू लागली. क्षणार्धात तिचा महापूर ओसरला आणि वसुदेवांना समोर जायचा मार्ग मोकळा मिळाला. अचानक हे असं कसं झालं हे त्यांना कळलंही नसेल. पण बाकी कुठलाही विचार न करता ते पैलतीरवरच्या गोकुळ गावात जायला झपझप पुढे चालू लागले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

माझ्या लहानपणी माझी आजी कीर्तन, प्रवचन ऐकायला जाताना मला कधीकधी सोबत म्हणून घेऊन जायची. देवभक्तीचे चार शब्द या व्रात्य कार्ट्याच्या कानांवर पडले तर तो सुधारेल, अशी भाबडी आशा तेव्हा तिला वाटत असावी, असं मला आता वाटतंय. ते असो. अशाच एक कीर्तनाच्या वेळी पुराणिकबुवांनी रंगवून रंगवून सांगितलेली ही कृष्णजन्माची कहाणी मला आजही त्यांच्याच शब्दात आठवते.

खूप पुढे ‘गीतगोपाल’मधलं माडगूळकरांनी लिहिलेलं ‘निजवंश दीपका धरूनी शिरी, वसुदेव निघाले नंदघरी’ हे गाणं सी. रामचंद्र यांच्या आवाजात ऐकलं. याच प्रसंगाचं वर्णन करताना कवी म्हणतात, ‘चढता चढता चढली यमुना, चढून भिडली श्रीहरी चरणा, एकच घेऊनी तृप्त चुंबना, झराझरा परत ती जाय दुरी’.

वसुदेवसुताच्या चरणांचं भक्तीपूर्ण चुंबन घ्यायच्या ओढीनं यमुना वर वर चढत होती तर. पण मला एक प्रश्न नेहमी पडतो, यमुनेला पदस्पर्श करताना श्रीकृष्णांनी तिला काय सांगितलं असेल? ‘यमुने, आता पुरे, आवर आता, आणि इथून जा. या सीमेपलीकडे आता तुला येता येणार नाही’, असं ते कोणत्या शब्दांत म्हणाले असतील? मला वाटतं तो निःशब्द संवाद असेल भगवंत आणि भक्तामधला. पायाचा स्पर्श होताच यमुनेला त्यांची आज्ञा कळली आणि तिनं तत्काल तशी कृती केली.

‘आता पुरे, आवर आता, आणि इथून जा. या सीमेपलीकडे आता तुला येता येणार नाही’, असं समोरच्याला सांगण्याचे आणखी दोन प्रसंग कृष्णचरित्रात आहेत.

‘याचे शंभर अपराध मी पोटात घालेन, पण नंतर मात्र मी त्याला दंड देईन’, असं वचन कृष्णानं शिशुपालाच्या आईला दिलं होतं. त्याचं स्मरण ठेऊन कृष्णानं त्याचे शंभर गुन्हे माफ केले. तरीही तो उद्दाम माणूस बधला नाही. ऐन शिशुपालवधाच्या दिवशीही कृष्णानं त्याला समजावलं; सीमा ओलांडू नकोस, असं वारंवार सांगितलं. पण ते न मानता जेव्हा शिशुपालानं १०१वा अपराध केला, तेव्हा अत्यंत नाइलाजानं कृष्णानं सुदर्शन चक्राद्वारे त्या पातक्याचा वध केला.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

दुसरा असा प्रसंग म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणाचा. भर सभेत, शेकडो उपस्थितांसमोर निर्लज्ज दुश्शासन आपल्या असहाय्य वहिनीचे कपडे फेडत होता. भीष्मांसह सारे लाचार ज्येष्ठ हे दृष्य मान खाली घालून बघत होते. कोणीच तिच्या मदतीला आलं नाही. शेवटी तिला आपल्या भावाची म्हणजे कृष्णाची आठवण

आली. तिनं त्याचा धावा करताच अंतर्यामी कृष्णानं तिचं मनोगत जाणून तिला वस्त्रपुरवठा केला आणि तिचं लज्जारक्षण केलं. दुश्शासन तिची एका नंतर एक वस्त्रं उतरवत होता, पण द्रौपदी तरीही विवस्त्र होतच नव्हती. तो थकून गेला पण थांबला नाही. मात्र काही क्षणांनी एक वेळ अशी आली की, द्रौपदीच्या अंगाभोवती कृष्णानं आपलं महावस्त्र लपेटलं. अत्यंत झळाळी असलेलं ते दैवी वस्त्र बघताच सारेच चकित झाले. वेडा दुश्शासन त्यालाही हात घालायला गेला तेव्हा मात्र भीष्म ओरडले, ‘थांब, मूढमती माणसा, त्या वस्त्राला शिवू नकोस. ते पवित्र वस्त्र आहे. त्याला हात लावशील तर जळून भस्म होशील. ही

सीमा आहे. इथेच थांब. या पलीकडे आता तुला जाता येणार नाही.’ अत्यंत भयभीत झालेल्या दुश्शासनानं मग तिथून पळ काढला.

अशा या दोन कथा आहेत.

‘आता पुरे, आवर आता, आणि इथून जा. या सीमेपलीकडे आता तुला येता येणार नाही’ याचाच अर्थ Thus far and no further किंवा ‘रंगली रंगलिओट’.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

या शब्दाची माझी नुकतीच पुनर्भेट झाली. त्यामुळे या लेखाचा विषय सुचला. ही पुनर्भेट होण्याचं कारण म्हणजे ‘प्रिय जी. ए.’ हे सुनीताबाई देशपांडे यांचं पुस्तक. बरेच वर्षांपासून मला ते वाचायचं होतं. तो योग गेल्या आठवड्यात आला. या पुस्तकात उद्धृत केलेल्या सुनीताबाईंच्या एका पत्रात ‘रंगली रंगलिओट’चा उल्लेख झाला आहे. बाईंच्या एका पत्राला उत्तर देताना स्वतः जीएंनी ‘रंगली रंगलिओट’ असं लिहिलं. त्यानंतरच्या आपल्या पत्रात बाई विचारतात की, ‘रंगली रंगलिओट म्हणजे काय?’ (याचं उत्तर जीएंनी दिलं की नाही, हे कळलं नाही.)

हे वाचल्यावर मला एकदम आठवलं की, ‘रमर गॉडन’च्या ज्या पुस्तकाच्या शीर्षकामुळे जीएंना हे शब्द कळले (असावेत), ते तर माझ्याकडे आहे. सुमारे तीसएक वर्षांपूर्वी मी ते वाचलं होतं. त्यानंतर पुन्हा कधी ते वाचायचा मौका आला नाही. दुसरी शक्यता ही पण असू शकते की, दार्जिलिंगच्या जवळ असणाऱ्या ज्या चहामळ्यांत अत्युत्तम प्रतीचा चहा तयार केला जातो, त्यातल्या एका मळ्यातल्या चहाला ‘रंगली रंगलिओट’ असं नाव आहे, आणि बहुधा जीए हे या चहाचे चाहते असावेत. रंगली रंगलिओट या नावाच्या गावातच हा चहामळा आहे, म्हणून त्यावरून त्या चहाला हे नाव देण्यात आलं. जे काय असेल ते, पण हे शब्द वाचल्यावर आता माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं.

रमर गॉडनवरून मी एकदम महाभारत काळात गेलो आणि मग मला श्रीकृष्ण चरित्रातले वर वर्णन केलेले तीन प्रसंग आठवले.

मग मला आठवलं की, ‘बायबल’मध्येही अशाच अर्थाचं एक वचन आहे. (And said,) Hitherto shalt thou come, but no further(: and here shall thy proud waves be stayed?) (किंग जेम्स आवृत्ती, जॉब ३८.११)

देवानं समुद्राला आज्ञा दिली- Hitherto shalt thou come, but no further.

याचा मराठी तर्जुमा असा आहे- (८- समुद्र उफाळून गर्भाशयातून पडावा असा बाहेर पडला, तेव्हा त्याला कवाडे लावून तो कोणी अडवला? ९ - त्या समयी मी त्याला मेघवस्त्राचे पांघरूण घातले, दाट अभ्रांचे त्याला बाळंते केले;) १० - मी त्याची मर्यादा फोडून काढली आणि त्याला अडसर व दरवाजे लावले; ११ - आणि मी म्हणालो, ‘तू येथवरच ये; ह्यापलीकडे तू येता कामा नये; येथे तुझ्या उन्मत्त लहरी थांबल्या पाहिजेत.’ (ईयोब ३८)

https://www.bible.com/bible/1686/JOB.38.MARVBSI

मूळ बायबल ग्रीक भाषेतून लॅटिनमध्ये भाषांतरित झालं तेव्हा ‘तू येथवरच ये; ह्यापलीकडे तू येता कामा नये’ या वचनाचा अनुवाद असा झाला- Usque huc venies, et non procedes amplius. एक उक्ती म्हणून हा लॅटिन वाक्प्रचार वापरात आणला जातो.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

महाभारत काय, कृष्णचरित्र काय, किंवा बायबल काय, कुठेही या शब्दांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. जणू काही ही आज्ञा म्हणजे एक प्रकारची लक्ष्मणरेखा आहे. प्रत्येकाची (लिखित वा अलिखित स्वरूपाची) एक सीमा असते. तिचं उल्लंघन केल्यास विनाश होतो, संकटं येतात, त्रास सहन करावा लागतो.

अशी ही आज्ञा परमेश्वर देऊ शकतो, साधू संत देऊ शकतात, आणि वैयक्तिक पातळीवर तुम्ही आम्हीही देऊ शकतो. घरच्या मुलांना शिस्त लावताना पालक असंच सांगतात. हट्टी रुग्णाला त्याचा डॉक्टर असं सांगू शकतो. प्रियाराधनाच्या वेळी भलताच हट्ट करणाऱ्या प्रियकराला त्याची प्रेयसी असं सांगू शकते. शत्रूच्या सततच्या कुरापतींना कंटाळून त्याला या शब्दांत इशारा दिला जाऊ शकतो. देशादेशांमधल्या भौगोलिक सीमा याच न्यायानं तयार झाल्या. कायद्याच्या क्षेत्रातही हे पदोपदी दिसून येतं. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे म्हणून कोणी नंगानाच करू शकत नाही. एका मर्यादेनंतर त्यावर उचित अशी बंधनं घालण्याचा अधिकार घटनेनं सरकारला दिला आहे. (मात्र अनेक वेळा या अधिकाराचा गैरवापर झाला असल्याचीही उदाहरणं आहेत, पण त्यावर लिहिण्याची ही जागा नाही.) मर्यादेचं पालन करणं किंवा करायला भाग पाडणं हे तत्त्वतः योग्यच आहे.

साधूसंतदेखील ‘stop, cease, desist, go back, thus far and no further’ किंवा ‘रंगली रंगलिओट’ अशी आज्ञा देऊ शकतात असं मी लिहिलं, याचं कारण आहे. या शब्दांचं मूळ एका पहाडी लोककथेत आहे आणि या कथेत एक साधूबाबा आहेत. आता आपण तिकडे वळू या.

मार्गरेट रमर गॉडन (Margaret Rumer Godden) आणि जोन गॉडन (Jon Godden) या दोन बहिणी होत्या. या इंग्रज बहिणींचे वडील स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात नोकरीला होते. आता बांगला देशमध्ये असलेल्या नारायणगंज या गावात त्यांचं बालपण गेलं. इंग्लंडमध्ये शिक्षण घेऊन त्या पुन्हा नारायणगंजला परतल्या. मोठेपणी त्यांचे मार्ग बदलले, त्या विलायतेत परत गेल्या, पण तरीही १९४७पर्यंत त्या वारंवार भारताला भेट देत असत. जोननं तर १९४७ नंतरही सुमारे १० वर्षं भारतातच वास्तव्य केलं. या दोघीही बहिणी इंग्रजीतल्या फार मोठ्या लेखिका म्हणून नावारूपाला आल्या. त्यातही रमरला जास्त प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळाला. या दोघींनी मिळून लिहिलेलं ‘Two Under the Indian Sun’ हे १९६६ सालचं त्यांच्या भारतातील आयुष्याच्या आठवणींचं पुस्तक फार गाजलं. रमरनं एकूण साठ पुस्तकं लिहिली. त्यापैकी नऊ पुस्तकांवर चित्रपट निघाले आहेत. त्यातले ‘Black Narcissus’ (१९४७)  आणि ‘The River’ (१९५१) हे दोन सिनेमे त्या काळी लोकप्रिय झाले होते.

रमर गॉडननं १९४३ साली ‘Rungli-Rungliot’ या नावाचं वास्तवावर आधारित (non-fiction) पुस्तक लिहिलं. १९६१मध्ये त्याची नवीन आवृत्ती ‘Thus Far and No Further’ या नावानं प्रकाशित झाली. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात १९४०मध्ये रमर आणि तिच्या दोन लहान मुली बंगालमधल्या रंगली रंगलिओट या मनुष्यवस्तीपासून दूर असलेल्या चिमुकल्या गावात रहायला गेल्या. या गावापासून दार्जिलिंग तीन हजार फुट उंचीवर आहे. तिथले चहाचे मळे जगप्रसिद्ध आहेत. अत्यंत उच्च दर्जाचा चहा तिथे उगवला जातो. जवळपास एक वर्षभर ती तिथे होती. या काळात तिचा तिथल्या स्थानिक लोकांशी जवळचा संबंध आला. तिचं तिथलं एकाकी आयुष्य, सभोवतालच्या विशाल हिमपर्वतांमध्ये तिनं वेळोवेळी केलेली भटकंती, तिथला विलक्षण निसर्ग, आसपासची माणसं -- यासारख्या अनेक विषयांवर तिनं आपल्या या पुस्तकात मोठ्या प्रेमानं, आत्मीयतेनं लिहिलं आहे.

‘रंगली रंगलिओट’ या अनोख्या नावाच्या रहस्याचा उलगडा तिनं अगदी सुरुवातीलाच केला आहे. तिच्याच अप्रतिम शब्दांत आपण ते वाचू. ती म्हणते-

“Once upon a time when Noah lived and perhaps this was Noah’s flood too, in another time when the earth was filled with violence, the waters of the Teesta river in North Bengal …began to rise in the valleys of the Himalayas, whose ranges are higher and more terrible than the Andes…. Down below them the consternation continued…. In a temple at the top of one of these ridges, a Lama was saying his prayers....

When told of the people’s plight, the Lama said, ‘Tell it to go down.’

‘Tell it?’

‘Yes. Give it a positive order.’

‘But — it won’t pay any attention.’

“ ‘Won’t it?’ said the Lama. ‘Then I must tell it myself.’

And he came out from his prayers and put out his hand and said,

‘Rungli Rungliot. Thus far and no further’. The flood immediately

stopped; the water went down and the Lama went back to his prayers.”

तीस्ता नदीच्या महापुरानं कोणे एके काळी आसपासच्या खेड्यांमधलं जीवन उदध्वस्त व्हायला आलं होतं. नदीचा पूर ओसरतच नव्हता. शेवटी तिथले लोक एका उंच डोंगरावर तप करत बसलेल्या एका लामाला (तिबेटचे बुद्ध भिक्षू) शरण आले. त्यांचं दुःख त्याला बघवलं नाही. तो नदीपाशी आला आणि म्हणाला, ‘Rungli Rungliot. Thus far and no further’. (बस, इतना ही काफी है, अब इस के आगे नहीं आना.) त्याची आज्ञा तीस्तेनं पाळली आणि लगेच तिचा पूर ओसरला, ती शांत झाली. तेव्हापासून ‘Rungli Rungliot’ हे शब्द त्या भागात अमरत्व पावले. दार्जिलिंगजवळच्या काही भूभागात बोलल्या जाणाऱ्या ‘पहाडिया’ या भाषेतले हे शब्द आहेत. त्या लामानं ज्या जागेवर उभं राहून हा आदेश नदीला दिला, तिथे पुढे एक नवीन गाव वसलं आणि लामाच्या चमत्काराच्या स्मरणार्थ त्याचं ‘रंगली रंगलिओट’ असं नामकरण करण्यात आलं. आता तर ते एक तालुक्याचं ठिकाणही झालं आहे. ‘Rungli Rungliot’ हे इंग्रजी प्रथेप्रमाणे केलेलं स्पेलिंग आहे, तुम्ही ‘Rangli Rangliot’ असंही लिहू शकता. इंग्रज मळेकऱ्यांनी पुढे तिथे चहाचे बाग तयार केले. आज डंकन Duncan Industries Limited या कंपनीकडे त्यांची मालकी आहे. बघा- https://en.wikipedia.org/wiki/Rangli_Rangliot

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

रंगली रंगलिओटचा DARJEELING ORGANIC BLACK TEA सुमारे साडेपाच हजार रुपये किलो या भावानं विकला जातो. इंग्लंडच्या राणीपासून तर वुडहाऊसच्या बर्टी वुस्टरपर्यत अनेक श्रीमंत आणि घरंदाज इंग्रज लोक फक्त दार्जिलिंग चहाच रोज पितात. त्यांना सगळ्यात जास्त आवडतो तो Oolong या प्रकारचा अतिशय महागडा चहा. तो नाहीच कधी मिळाला तर ते रंगली रंगलिओट पसंत करतात, असं मी ऐकलं आहे. खरं-खोटं कोणास ठाऊक?

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......