लिहिणे ही मला तशी चटका देण्याची गोष्ट वाटते...
पडघम - साहित्यिक
आसाराम लोमटे
  • आसाराम लोमटे साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारताना
  • Sun , 26 February 2017
  • पडघम साहित्यिक आसाराम लोमटे Aasaram Lomte आलोक Aalok इडा पिडा टळो Ida Pida talo साहित्य अकादमी Sahitya Acedemy

“बाजारात भलेही ‘स्वास्थ्यकारक’ जगण्याची उत्पादने भरमसाठ असतील, पण लेखकाने मात्र ‘स्वास्थ्यहारक’च लिहावे. वाचून प्रश्न पडावा, झोप उडावी, अगणित भुंग्यांचे मोहोळ उठावे आणि त्याने वाचणारालाही दंश करावा असे लिहिण्यासाठी मी धडपडतो आहे. पायात काटा टोचल्यानंतर ठणकणाऱ्या वेदनेची कळ मरावी म्हणून त्या ठिकाणी मेण लाऊन त्याला आगीचा चटका दिला जायचा असे मी पाहिले आहे. लिहिणे ही मला तशी चटका देण्याची गोष्ट वाटते.” साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारल्यानंतर कथाकार आसाराम लोमटे यांनी व्यक्त केलेलं मनोगत....

.............................................................................................................................................

‘आलोक’ या कथासंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकपणेच माझ्या मनात आनंदाची भावना निर्माण झाली. हा आनंद मात्र केवळ पुरस्कार मिळाल्याचा नव्हता. ज्या जगण्याबद्दल आपण लिहितो, ज्या माणसांच्या सुख-दुःखाबद्दल लिहितो आणि आपले शब्दही जिथे सत्यापर्यंत पोहचण्यासाठी कायम झगडत राहातात, तळपातळीवरच्या माणसाच्या हातात हात घेण्यासाठी धडपडतात, त्या माणसांचेही जगणे, या निमित्ताने अधोरेखित झाले, चर्चेच्या केंद्रस्थानी आले याचाही हा आनंद आहेच.

आपण सध्या अशा काळात वावरतो आहोत, जिथे आजूबाजूचे पर्यावरणच जणू एका गोंगाट आणि कोलाहलाने भारून गेले आहे. एका कायम गजबजलेल्या बाजारातच जणू आपण उभे आहोत असे वाटू लागते. सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रस्त्याला लागले की, जाहिरातींचे मोठमोठे फलक दिसतात. छोट्या छोट्या गावातही आता असे फलक प्रचंड उजेडाच्या झगमगाटात दिसतात. एक वेळ वस्ती अंधारात राहील, पण अशा फलकांवरचा उजेडाचा झोत कमी होत नाही. संध्याकाळी घरी आल्यानंतरही टीव्हीच्या माध्यमातून असंख्य उत्पादने आपल्याला आवाहन करत असतात. आपण माणूस आहोत यापेक्षा आपण ग्राहक आहोत हीच जणू आपली ओळख ठसठशीतपणे पुढे येऊ लागली आहे. दररोज नवनवीन उत्पादनांच्या जाहिराती आदळत आहेत. व्याधी घालवण्यासाठी कोणत्या गादीवर झोपावे येथपासून ते वजन घटवण्यासाठी आणि वाढवण्यासाठीही कोणती उत्पादने वापरायची हे सांगणाऱ्या जाहिराती आपण वाचतो-पाहतो आहोत. ‘स्वास्थ्यकारक’ जगण्यासाठी काय करावे हे सांगणारेही बुवा-बाबा नित्यनेमाने दिसू लागले आहेत.

अशा काळात लिहिणारांवरची जबाबदारी वाढली आहे असे वाटू लागते. अस्वस्थ करणारे, बेचैनी वाढवणारे आणि आत्ममग्न स्निग्धतेला वितळून टाकणारे लिहिणे, ही आजच्या काळाची गरज आहे असे मला वाटते. बाजारात भलेही ‘स्वास्थ्यकारक’ जगण्याची उत्पादने भरमसाठ असतील, पण लेखकाने मात्र ‘स्वास्थ्यहारक’च लिहावे. वाचून प्रश्न पडावा, झोप उडावी, अगणित भुंग्यांचे मोहोळ उठावे आणि त्याने वाचणारालाही दंश करावा असे लिहिण्यासाठी मी धडपडतो आहे. पायात काटा टोचल्यानंतर ठणकणाऱ्या वेदनेची कळ मरावी म्हणून त्या ठिकाणी मेण लाऊन त्याला आगीचा चटका दिला जायचा असे मी पाहिले आहे. लिहिणे ही मला तशी चटका देण्याची गोष्ट वाटते.

मी जी गोष्ट लिहितो त्या गोष्टीत वाऱ्यावर डोलणारी हिरवीगार शेते नाहीत. दांडातून खळाळत वाहणारे पाणी नाही. फुलांची नक्षी असलेल्या पिकातून धावणाऱ्या अल्लड, अवखळ पोरी नाहीत, ज्यांना ‘गाँव की गोरी’ म्हणून आपल्याकडे कविता आणि चित्रपटांनीही दाखवले आहे. असा गाव कुठे असतो हे मला माहीत नाही. मी जो गाव पाहतो तो रम्य नाही. या गावातली माणसे मला जगताना कमालीची ठेचकाळत असल्याची दिसतात. विशेषतः जो तळपातळीवरचा माणूस आहे त्याला वाचाच नाही. जे दुबळे आहेत त्यांचे जगणेच कडेलोटाच्या मार्गावर आहे. मी जो गाव पाहतोय तो भेगाळलेला आहे, चिंध्या झालेला आहे. त्यामुळे गाव आठवण्यातला आनंद मानणारे स्मरणरमणीय लेखन मला कधीच जवळचे वाटत नाही. आज जो शोषित आहे, वंचित आहे त्याचे जगण्याचे प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालले आहेत. जगण्यासाठी त्याला फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे. पोटापाण्यासाठी विस्थापित होणारे मजूर, धड जगताही येत नाही अशा दुःस्थितीत असलेला कोरडवाहू शेतकरी, आजही सामाजिक विषमतेत जगणे हीच जोखीम वाटावी असा अनुभव घेणारे दलित, ढोरकष्टात पिचून निघणाऱ्या स्त्रिया असे सगळे घटक आज खडतर स्थितीत आहेत. अशा साऱ्या शोषितांचे जगणे बऱ्याचदा माझ्या कथेतून येते, कारण या माणसांच्या दडपून टाकल्या जाणाऱ्या आशा-आकांक्षा, त्यांची विझून जाणारी स्वप्ने, त्यांच्या रोजच्या संघर्षातले ताण-तणाव मला अस्वस्थ करतात. ही सर्व माणसे ठेचाळतात, पण चिवटपणे टिकून राहण्याची धडपड करतात. अस्तित्वासाठी निकराची झुंज देत राहतात. त्यांचे अशा प्रसंगातही कसोटीला उतरणे आणि स्वतःचे सत्व राखून नेटाने ऊभे राहणेही मला तितकेच महत्त्वाचे वाटते.

अनागर जगण्यातल्या पडझडीकडे आज केवळ निर्विकारपणे पाहून चालत नाही. या उद्ध्वस्तीकरणाला कुठली तरी अनाम शक्ती कारणीभूत आहे असे नाही. तसे मान्य केले तर शोषितांच्या वाट्याला आलेले जिणे म्हणजे जणू त्यांचे भागधेयच आहे, प्राक्तनच आहे असे मान्य केल्यासारखे आहे. दृष्य-अदृष्य पातळ्यांवर असणाऱ्या शोषणाचा वेध घेणे, त्याचे स्तर बारकाईने न्याहाळणे मला गरजेचे वाटते. माझ्या कथेतील पात्रांच्या वाट्याला आलेले दुःख आणि वेदना त्यांना नियतीने बहाल केलेली आहे असे मी मानत नाही. दुबळ्यांना टाचेखाली रगडणारी जी शोषणाची रीत आहे तिच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखनाच्या माध्यमातून करतो आहे. माझ्या बहुतेक कथांमधून असे शोषणव्यवस्थेचे पापुद्रे उकलण्याचा प्रयत्न मी केला आहे. जीवनाच्या क्षेत्रात जिथे जिथे अशी शोषणाची साखळी कार्यरत आहे, ती अदृष्य असली तरीही मला तिची खळखळ जाणवते.

ग्रामीण भागाच्या उद्ध्वस्तीकरणाची सगळी मुळे जणू आधुनिकीकरणातच आहेत हा पूर्वग्रहही मला मान्य नाही. खेड्यापाड्यात आधी सगळे गुण्या-गोविंदाने नांदत होते. आधुनिकीकरण आले आणि खेड्यांचा चेहरा विद्रूप झाला. आधुनिकीकरणाच्या लाटेत गावाचे गोकुळच हरवले. आधुनिकीकरणाने खेड्यांची समृद्धी ओरबाडली असा हा पूर्वग्रह आहे. प्रत्यक्षात तथाकथित आधुनिकीकरण येण्याआधीही खेड्यात आर्थिक-सामाजिक विषमता होतीच, शोषणही होतेच. दुबळ्यांच्या शोषणाची साखळी होतीच. प्रत्यक्षात कुठेतरी आधुनिकीकरण नावाच्या गोष्टीकडे डोळे लाऊन बसायचे आणि ग्रामीण जीवनातल्या आतल्या खदखद आणि खळबळीकडे दुर्लक्ष करायचे ही बाब मला वास्तवाशीच प्रतारणा केल्यासारखी वाटते. एकदा ‘इंडिया’ विरूद्ध ‘भारत’ अशी सरळ विभागणी केली आणि शहरी आक्रमणांनी खेडी गिळंकृत केली असे मानले की, मग खेड्यातला वर्गसंघर्ष आणि शोषणव्यवस्था याकडे साफ डोळेझाक होते.

विख्यात हिंदी लेखक गजानन माधव मुक्तिबोध यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. विवेकाला साक्षी ठेवून लिहिणाऱ्या प्रत्येकच सर्जनशील लेखकाच्या दृष्टीने कोणताही काळ हा कसोटी पाहणाराच असतो.

मुझे कदम कदमपर चौराहे मिलते है

बाहे फैलाए

एक पैर रखता हूँ तो की सौ राहे फुटती

असा काळाचा दुभंग मुक्तिबोध यांनी मांडला. तो आजही कायम आहे.

अब अभिव्यक्ती के सारे खतरे उठानेही होंगे

तोडने होंगेही मठ और गढ सब

हा त्यांचा निर्धार आजच्या काळात लिहिणाऱ्या प्रत्येकानेच अधोरेखित करावा असा आहे.

आजचे वास्तव स्थितीशील नाही. ते निर्विकारपणे पाहावे इतके थंडही नाही. या वास्तवाचा चेहरा निर्दयी, भेसूर आणि भक्ष्याला गिळंकृत करण्यासाठी वासलेल्या कराल जबड्याप्रमाणे आहे. यात भक्ष्यस्थानी कोण? तर जबड्यात येण्याआधी एखाद्या श्वापदाने पायाखाली किंवा पंजाखाली घेताना ज्यांचा आवाजही उमटणार नाही असे सगळेच आहेत. आसमंत घोंगावणाऱ्या आवाजात बारीकसारीक जिवांचे चित्कार ऐकूच येऊ नयेत अशी परिस्थिती आहे. लेखक म्हणून मला असे वाटते की, मी ज्या वास्तवाच्या तुकड्यावर उभा आहे ते वास्तव संभ्रमित करणारे आहे. वरकरणी ते लोभस, हिंदकळणारे, मायावी आणि फेसाळल्याप्रमाणे वाटत असले तरीही त्याच्या बुडाशी असलेला गाळ अस्वस्थ करणारा आहे. आजचा गाव स्थितीशील नाही. बदलांनी विलक्षण वेग घेतलेला आहे. जी प्रचंड गती जगण्याला लाभलेली आहे ती उतारावरून सुसाट घरंगळणाऱ्या एखाद्या दगडी शिळेप्रमाणे आहे.

अर्थात हे वास्तव जसेच्या तसे ‘कार्बन कॉपी’सारखे मांडले म्हणजे ते साहित्य होत नाही. वास्तवाला कलात्म रूप देताना असंख्य प्रतिमा, प्रतीके, लोककथेतून झिरपत झिरपत आलेले संदर्भ असे सारे काही गोळा होत जाते. अनुभवाचा ‘कलावस्तु’पर्यंतचा प्रवास हा असा अनेक गोष्टींचा स्वीकार करीतच होतो. जेव्हा लोक गोष्टी सांगायचे तेव्हाही कल्पनाशक्तीची अफाट ताकद होतीच. त्याआधारेच वास्तवाला कथनमूल्य प्राप्त झालेले होते. ही एकच गोष्ट अशी होती की जिथे जगण्यातले अभाव भरून निघतील आणि व्यक्ती म्हणून असलेल्या दुबळेपणावर मात करून कल्पनेने काही काळ का होईना पण एक मनोराज्य उभे करता येईल. आज आपण जादुई वास्तववादाबद्दल बोलत असलो तरीही आपले कथनपरंपरेतले भाषिक पूर्वसंचित पाहिले तर वास्तव सरधोपटपणे सांगण्याची रीत आपल्याकडे कधीही नव्हती, हेच आपल्या ध्यानी येईल. वैशिष्टयपूर्ण अशा गोष्टी सांगणारी काही माणसे मी पाहिली आहेत. एकाच रात्रीत पूर्ण होणार नाही आणि सलग काही दिवस ऐकवल्या जातील अशा गोष्टी सांगणारीही काही माणसे मी पाहिली आहेत. चमत्कृतीपूर्ण, अदभुत नवलाईने या कष्टप्रद आणि दुःसह जगण्यातली पोकळी भरून काढणे या गोष्टीला आपल्याकडे मोठी परंपरा आहे. या जगण्यातले सगळेच उसासे आणि हुंकार लिपीबद्ध झालेले नाहीत. लाखो जिभांच्या माध्यमातून ते आजही उमटतात. अशा जगण्याच्या अनाम कहाण्या वाळूवर मारलेल्या रेघांप्रमाणे नष्ट होऊ नयेत. जोवर या माणसांच्या जगण्याचा संघर्ष चाललेला आहे तोवर ‘गोष्ट’ जिवंत राहणारच आहे. ती काळासोबत पुरून उरेल. कारण ती स्थळकाळाला बांधून ठेवणारी कला आहे. माझ्या कथेचे नाते या ‘गोष्टी’शी आहे असे मला मनोमन वाटते.

.............................................................................................................................................

लेखक आसाराम लोमटे मराठीतील प्रसिद्ध कथाकार आहेत.

aasaramlomte@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......