आपल्या जीवनशैलीबद्दल पवार म्हणतात की, कमीतकमी झोप चालू शकेल असं वळण त्यांनी आपल्या प्रकृतीला लावून घेतलं आहे. एखाद्या ठिकाणी पोचायला हेलीकॉप्टरला पोचायला ३५ मिनिटं लागणार असतील तर पवार अर्ध्या तासात आपली झोप पूर्ण करू शकतात. असं हुकमी झोपेचं वरदान त्यांना लाभलेलं आहे. पवारांची या बाबतीत म. गांधींशी तुलना करता येईल. अर्थात पवारांची म. गांधीजींशी किंचितही तुलना करणं हे अनेकांना गंभीर गुन्हा वाटेल याची मला कल्पना आहे. कमीत कमी वेळामध्ये अनेकांशी संवाद साधण्याची कला आपण विकसित केली आहे असं पवार म्हणतात. त्यांचा कामाचा उरक ज्या प्रकारचा आहे ते पाहता हे अगदी खरं आहे असं दिसतं. वयाच्या पन्नाशीतले नेते पत्रकार परिषदांच्या जीवावर पक्ष चालवत असताना पंचाहत्तरीतले शरद पवार अजूनही गावोगावी फिरतात, दुष्काळी भागातील लोकांना भेटतात हे थक्क करणारं आहे. अर्थात याची दुसरी बाजू अशीही आहे की, पवारांचे संभाव्य वारसदार म्हणून जे अनेक लोक स्वतःकडे पाहतात किंवा वेळोवेळी पवार ज्यांच्याबद्दल तशा अर्थाचं सूचक बोलतात ते लोक पवारांशिवाय महाराष्ट्रात त्यांचा पक्ष जिवंत ठेवू शकतील अशी खात्री पवारांनाही वाटत नसावी. पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे साठोत्तरी महाराष्ट्रावर दीर्घकाळ प्रभाव असणारे दोन नेते. त्यापैकी बाळासाहेबांना मुलगा आणि पुतण्या यात निवड करताना पक्षात फूट पडलेली पाहावी लागली. पवारांनी राष्ट्रवादीत अशा प्रकारचा संघर्ष होऊ नये म्हणून महाराष्ट्रात अजित पवार आणि दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे अशी विभागणी केलेली दिसते. अजित पवार यांना केंद्रीय राजकारणात महत्वाकांक्षा नाही असं दिसतं. तूर्त जाहीररित्या तरी ही विभागणी बरी चालली आहे असं दिसतं. मात्र अजित पवारांनी दुखावलेला बड्या नेत्यांचा मोठा वर्ग राष्ट्रवादीत आहे. हे सगळे लोक किती काळ स्वस्त बसतील हे आज सागंता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पवारांनंतर नष्ट होईल असं अनेकांचं भाकीत आहे किंवा इच्छाही आहे. मला व्यक्तिशः तसं वाटत नाही. पवारांनंतर हा पक्ष खऱ्या अर्थानं प्रादेशिक पक्ष म्हणून राहण्याची शक्यता निर्माण होईल असं मला वाटतं. जयंत पाटील, विजयसिंह मोहिते यांच्यासारख्या पक्षातल्या मातब्बर नेत्यांना अगदी दुसरीकडे जावंसं वाटलं तरी त्यांचं यथायोग्य राजकीय पुनर्वसन होऊ शकेल अशा जागा इतर पक्षांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे उत्तर पेशवाईत ज्याप्रमाणे बारभाईचं राज्य चाललं त्याप्रमाणे राष्ट्रवादीच्या स्थानिक संस्थांनिकांचे पवारोत्तर राजकारण चालेल असं वाटतं.
संयुक्त परोगामी आघाडीच्या सरकारबद्दल पवारांनी एक प्रकरण लिहिलं आहे. या प्रकरणात बारामतीला भेट देणाऱ्या लालू प्रसादांचा उल्लेख आहे. (पान २५८) ‘अपने समाज का संघटन मजबूती से करोगे तो चुनाव जितने के लिए इतना विकास कार्य करने की आवश्यकता नही रहेगी,’ असं लालूप्रसादांनी म्हटलेलं पवारांनी सांगितलं आहे. लालूप्रसाद यांचं हे वाक्य म्हणजे बिहारच्या राजकारणाचा आरसाच आहे. पवारांनी ममता बॅनर्जींचं भावविवश होणं, संतप्त होणं याचाही उल्लेख केला आहे. बॅनर्जींनी माकपची एकहाती सत्ता उलथून टाकली याचा उल्लेख पवार करतात, पण तीच गोष्ट त्यांना महाराष्ट्रात का जमली नाही हे मात्र सांगत नाहीत. प्रतिभाताई पाटील यांची राष्ट्रपतीपदी झालेली निवड कशी अचानक घडली याचा तपशील पवार देतात. मात्र प्रतिभाताईंच्या राष्ट्रपतीपदाच्या कारकिर्दीबद्दल ते फारसं काही म्हणत नाहीत. कदाचित तसं फारसं काही म्हणण्यासारखं त्यांच्या कारकिर्दीत नसावं. प्रतिभाताईंचा पवारांना होणारा एक संभाव्य धोका म्हणजे त्यांचं मराठी असणं. स्वतः पवार याबद्दल बोलले नसले तरी त्यांना राष्ट्रपती व्हायचं असावं किंवा केलं जावं अशी चर्चा प्रसार माध्यमांमधून रंगत असते. अवघ्या काहीच वर्षांपूर्वी (कुचकामी का होईना) पण मराठी माणूस राष्ट्रपती झाला होता ही गोष्ट पवारांचे विरोधक त्यांच्या विरोधात वापरण्याची शक्यता आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील अणुकराराला डाव्या पक्षांचा विरोध होता, मात्र मनमोहन सिंग यांनी त्याबाबत तडजोड करायची नाही अशी भूमिका घेतली. डाव्यांचा पाठिंबा गेला तरीही मनमोहन सिंग आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. याबाबतीत तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीबाबतीत मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या निग्रही भूमिकेचे पवार कौतुक करताना दिसतात (पान क्र. २६१). यूपीए दोनच्या काळात टेलिकॉम घोटाळा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला घोटाळा यावरून विरोधकांनी आणि अण्णा हजारे यांच्या सोबतच्या आंदोलकांनी सरकारवर आक्रमक हल्ले करायला सुरुवात केली होती. तसाच अंतर्गत विरोध सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालच्या राष्ट्रीय सल्लागार परिषद नावाच्या सुपर कॅबिनेटचा होता, मात्र या विरोधापुढे मनमोहन सिंग यांनी जेवढ्या निग्रहाने उभं राहायला हवं होतं, तेवढा निग्रह त्यांनी दाखवला नाही असा पवारांचा आक्षेप आहे ( पान क्र. २६५). जनलोकपाल आंदोलनादरम्यान शासनाच्या वतीने मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये पवारांचा समावेश होता. मात्र अण्णा हजारेंनी त्याला विरोध केला. संपूर्ण पुस्तकात अण्णा हजारेंचा हा एकमेव उल्लेख आहे. पवार आणि अण्णा हजारे यांच्यातील मतभेद सर्वज्ञात आहेत. एका माथेफिरू माणसानं दिल्लीत पवारांच्या थोबाडीत मारली तेव्हा पत्रकारांनी अण्णा हजारेंना त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळी अण्णांनी ‘एक ही मारा?’ अशी पाचपोच नसलेली प्रतिक्रिया दिली होती. त्या तुलनेत पवारांचा संयम वाखाणण्याजोगा आहे. किंबहुना आपल्या संयमाच्या मदतीने पवार आपले शत्रू संपवत असावेत किंवा बेदखल करत असावेत.
रामदेवबाबांच्या उपोषणाला सुरुवातीला खूप महत्त्व देणं आणि नंतर मध्यरात्री पोलिसीबळाचा वापर करून उपोषण मोडून काढणं या सगळ्या प्रकारामुळे कमालीची धरसोड वृत्ती काँग्रेस पक्षाने दाखवली. कोळसा घोटाळा, दिल्लीतला सामूहिक बलात्काराचा प्रसंग या सगळ्यांमुळे यूपीए दोनने केलेलं बरं कामही झाकोळून गेलं, असं पवारांना वाटतं. या सगळ्या प्रक्रियेत पवारांच्या कृषी मंत्रालयावर झालेली बरी–वाईट टीका, महाराष्ट्रातल्या लोकशाही आघाडी सरकारची वेगाने वाढलेली अप्रियता, आघाडीअंतर्गत आणि पक्षांतर्गत कुरबुरी आणि त्यातून झालेलं सत्तांतर, याबद्दल पवार अजिबात काही लिहीत नाहीत. त्यांची एकूण कार्यपद्धती लक्षात घेता आपल्या आत्मचरित्राचा कच्चा मसुदा त्यांनी त्यांच्या अनेक क्षेत्रातल्या मित्रांना दाखवला असणार. या मंडळींनी त्यात बदलही सुचवले असतील. तरीही या आत्मचरित्रातला त्रोटकपणा, तुटकपणा आणि कोरडेपणा लपत नाही. याचा अर्थ आपल्या पंचाहत्तरीमध्ये जनमानसात आपलं कोणतं चित्र उभं राहावं, याचा पवारांनी निश्चित विचार केला असणार. जर ते चित्र खूप आत्मीयतेचं दिसत नसेल तर पवारांनी निवडीचं स्वातंत्र्य घेतल्यानंतर असं आत्मचरित्र लिहिलं आहे हे स्पष्टपणे दिसतं. असं का घडलं असावं? पवार यांचं व्यक्तिमत्त्व इतकं कोरडं आहे का? राजकारणाच्या शीणापोटी हे अपरिहार्य थकणं आणि कोरडेपण येत असावं का?
आत्मचरित्राचा पान २७१ ते ३२० हा पन्नास पानांचा भाग राजकारणापलीकडची माणसं आणि पवारांना भावलेली राजकीय व्यक्तिमत्त्वं यावर त्यांनी लिहिलं आहे. कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्याबद्दल पवारांनी आत्मीयतेनं लिहिलं आहे. मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये शेषराव वानखेडे यांच्यामुळे पवारांचा शिरकाव झाला. तिथून पुढे जात पवार बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष झाले. आयपीएल नावाची जत्रा त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाली. पवारांना क्रिकेटचे सामने बघायला वेळ आहे, पण दुष्काळग्रस्तांकडे जायला वेळ नाही, अशी टीकाही त्यांच्यावर झाली. मात्र पवारांनी आपण वेळेचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करतो, त्यामुळे क्रिकेटसाठी दिलेला वेळ हा दुसऱ्या कामातून काढलेला वेळ आहे, असं आपल्याला वाटत नाही असं स्पष्टपणे अनेकदा म्हटलं आहे. तसं असलं तरी पवारांच्या क्रिकेटमधल्या सहभागामुळे ते कमालीच्या टीकेस पात्र ठरले आहेत, हे मात्र नाकारता येणार नाही.
पवारांनी साहित्य आणि नाट्यसंमेलनात अनेकदा हजेरी लावली आहे. यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अंगाकडे जसं लक्ष दिलं तसं एरवी दिलं गेलं नाही, हे पवारांनी मान्य केलं आहे. जागतिक मराठी परिषदेद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या परिषदा आयोजित करण्यात पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी व्यक्तींना स्थान असावं की नाही यावर वाद रंगल्याचं पवारांनी सांगितलं आहे. मात्र त्या वादाबद्दलची आपली भूमिका पवारांनी अजिबात स्पष्ट केलेली नाही. गेली अनेक वर्षं पवार नियमितपणे नाटक आणि साहित्य संमेलनाला जातात. तिथं ते दीर्घ भाषण करतात. कधीकधी तर त्यांचं भाषण साहित्यसंमेलनांच्या अध्यक्षांपेक्षा माहितीपूर्ण आणि जड असतं. खरं सांगायचं तर त्याचा कंटाळा येतो. पवारांच्या अवतीभोवती साहित्यातलं कळणारी जी मंडळी आहेत, त्यांना पवारांच्या शैलीतली गद्य पण रोचक अशी अनौपचारिकता आणि मोजकेपणा यांचं महत्त्व कळलेलं दिसत नाही. त्यामुळेच ते त्यांची भाषणं लिहून देताना भरताड संदर्भ भरून देतात. त्यांना हे कळत नसलं तरी जनमानसाची नाडी अचूक कळणाऱ्या पवारांना लोक आपल्या या प्रकारच्या भाषणाने कंटाळून जात असतील हे कसं कळत नाही, असा प्रश्न पडतो. तिथं एवढं भरभरून बोलणारे पवार आत्मचरित्रात जिथं मोकळेपणाने बोललं पाहिजे तिथं मात्र हात आखडता घेतात हे अनाकलनीय आहे. ‘सामना’ आणि ‘सिंहासन’सारखे चित्रपट, ‘घाशीराम कोतवाल’सारखं नाटक यांच्यामागे पवार आग्रहाने उभे राहिले. एवढंच नव्हे तर सरकार आणि इतरांची ताकद त्यांच्यामागे राहील यासाठीही पवारांनी प्रयत्न केले. मराठवाडा आणि विदर्भातल्या उपेक्षित भागातल्या अनेकांच्या कविता आणि लेखनाने आपण अस्वस्थ झालो, असं पवार म्हणतात. ते आणि त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्यात हे साम्य आहे. त्यामुळे अनेक नव्या लेखकांना उभारी मिळाली. मात्र नंतरच्या टप्प्याला राज्यकर्ते आणि साहित्यिक यांच्यातल्या संबंधांना आश्रयदाते आणि आश्रित असं स्वरूप आलं. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांनाही वाङ्मयीन जाण आहे असं म्हटलं जाऊ लागलं. हळूहळू या जाणीवेचं विकेंद्रीकरण झालं. त्यामुळे अगदी तालुका पातळीवरसुद्धा विचारवंतांची खरेदी शक्य झाली. या सगळ्या प्रक्रियेत व्यक्तिगत आवडनिवड हाच महत्त्वाचा निकष असल्यामुळे आणि एखादं मंडळं, एखादा पुरस्कार, एखादं संमेलन यात वर्णी लागणं म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता, असं साहित्यिकांनाही वाटू लागल्यामुळे हा सगळाच व्यवहार अतिशय बीभत्स होत गेला. पवारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नव्वदीच्या दशकात साहित्यिकांना जे प्रत्येकी लाखभर रुपये वाटले त्याला अनेक पत्रकारांनी ‘रमणा’ असं म्हटलं होतं. मात्र आता सर्व राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात ही गोष्ट करत आहेत. कोणत्याही चांगल्या सामाजिक व्यवहाराला जबाबदार आणि मर्यादायुक्त संस्थात्मक रूप आलं नाही की काय होतं हे महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनात उठून दिसत आहे. अर्थात या अवनतीची जबाबदारी पवारांवर नाही. व्यवस्थेचं मूल्य कळण्याची क्षमता ज्या अपवादात्मक राजकारण्यांमध्ये आहे त्यात पवार आहेत. त्यामुळे त्यांनी या बदलात पुढाकार घ्यायला हवा होता किंवा आता तरी घेतला पाहिजे.
आत्मचरित्राच्या सातव्या प्रकरणात पवारांनी एकूण तेरा व्यक्तींवर लिहिलं आहे, त्यातली पहिली व्यक्ती अर्थातच यशवंतराव चव्हाण आहेत. यशवंतरावांना ३१ मार्च १९६९ रोजी लिहिलेल्या पत्रात पवार म्हणतात की, ‘काँग्रेस कार्यकर्ता पाहिला की चीड येणारा तरुण वर्ग ठिकठिकाणी दिसतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील ऐक्याची भावना कमी होऊ लागली आहे.’ पवारांच्या या पत्राला आता ४७ वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हा लोकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्याबद्दल जे वाटत होतं, त्याहीपेक्षा जास्त चीड आता राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पाहून येते. चारही उपविभागांमधल्या भावनिक ऐक्याच्या चिंध्या करण्याचं काम इमानेइतबारे चालू आहे. अनेकदा पक्षीय स्वार्थापोटी काठावरची भूमिका घेऊन पवारांनी त्याला बळही दिले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा यशवंतरावांचा निर्णय झाल्यावर पवारांनी त्याला विरोध केला. मात्र यशवंतरावांनी काँग्रेसबाहेर राहण्यापेक्षा उपेक्षा आणि अवहेलना सुसह्य मानली. लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर यशवंतरावांनी इंदिराजींना पंतप्रधान पदाबद्दलची त्यांची भूमिका विचारली, इंदिराजींनी संधीचा फायदा घेऊन आपलं घोडं पुढे दामटलं. या अतिरेकी सौजन्यामुळे यशवंतराव पंतप्रधान पद गमावून बसले, असं पवारांचं मत आहे आणि ते बरोबरच आहे. दुर्दैवाने चव्हाणांसारखा भिडस्तपणा नसूनही काही वेळा अतिरेकी घाईमुळे तर काही वेळा गांधी घराण्याला त्यांच्याविषयी वाटणाऱ्या संशयामुळे पवारांचीही पंतप्रधानपदाची संधी हुकली. त्यामुळे भिडस्तपणा किंवा आक्रमकता यांपैकी कोणतं मूल्य पंतप्रधान पदासाठी आवश्यक आहे याचा अंदाज येत नाही.
गांधी घराण्याबद्दल पवारांनी लिहिणं स्वाभाविकच आहे. नेहरू ते सोनिया गांधी या स्थित्यंतराबद्दल पवारांनी अवघ्या तीन पानांत लिहिलं आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना पवारांचा काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश झाला. त्यावेळच्या भाषणात राजीव गांधींनी पवारांचं नावही घेतलं नाही. ही गोष्ट स्वाभाविकच होती असं पवारांनी म्हटलं आहे. मात्र त्यामुळे आपला अपमान झाला अशी पवारांची भावना झाली असेल तर त्याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही. सोनिया गांधी फारशा संवाद करणाऱ्या नाहीत, हे त्यांचं निरीक्षणही महत्त्वाचं आहे. राजीव आणि इंदिरा गांधी हे दोघेही हलक्या कानाचे होते, असा निष्कर्ष पवारांनी नोंदवला आहे (पान क्र. ३०६). पवारांबद्दल याबाबतीत लोकांचं निरीक्षण काय आहे ते अद्याप प्रसिद्ध झालेलं नाही. दुर्दैवाने यशवंतराव आणि पवार यांची जी चरित्रं किंवा अर्धचरित्रं प्रसिद्ध झाली आहेत, ती अत्यंत सामान्य दर्जाची आहेत. सैद्धांतिक बैठकीचा अभाव, साधनं शोधण्यातला गलथानपणा आणि दरवेळी साहेब मला कुठे, कसे आणि कधी भेटले असं आत्मपरकथन करण्यापलीकडे त्यांच्या चरित्रकारांची झेप जात नाही. त्यामुळे पवारांबद्दल कोणीतरी आत्यंतिक शिस्तीनं आणि अभ्यासकांनी जो बौद्धिक धोका पत्करणं अपेक्षित असतं तो पत्करून लिहिलं पाहिजे. अर्थात स्मरणिका म्हणजे लेखन असं समजलं जाण्याच्या आजच्या काळात हे कठीण आहे, याची कल्पना आहे.
वाजपेयींच्या समन्वयवादी शैलीचं उदाहरण देताना पवारांनी दक्षता आयोगाच्या प्रमुखांच्या निवडीचा प्रसंग सांगितला आहे. पवार वाजपेयींसोबत किमान दोन दशकं संपर्कात असतील. तरीसुद्धा अवघ्या सव्वा पानात त्यांनी वाजपेयी उरकून टाकले आहेत. बिजू पटनायक यांच्याशी वयाचं अंतर ओलांडून झालेल्या मैत्रीचा, विमान चालवण्याच्या धाडसाचा त्यांनी उल्लेख केला आहे. बिजू पटनायक यांना झालेला तुरुंगवास आणि त्यांच्या सुटकेसाठी पवारांनी केलेली रदबदली ही माहिती नवीन आहे. जॉर्ज फर्नांडिस यांना पवारांनी ‘फायरब्रँड’ म्हटलं आहे. सुरुवातीला पवारांना फर्नांडिस आक्रस्ताळे वाटायचे, मात्र जसजसा परिचय होत गेला तसतसं आपलं मत बदलत गेलं, असं पवारांनी नोंदवलं आहे. फर्नांडिस यांचं वाचन अफाट असल्याचं निरीक्षण पवारांनी नोंदवलं आहे. कोकण रेल्वेच्या विकासातली फर्नांडिस यांची भूमिका पवारांनी कृतज्ञतेनं मांडली आहे. भाजपबरोबर गेलेल्या फर्नांडिस यांनी संघातले कट्टरतावादी, फारतर जोरजोरात गर्जना करतील, पण त्यांना काहीही अनुचित कृती करता येणार नाही, असे आत्मविश्वासाने सांगितल्याचं पवार सांगतात. आज फर्नांडिस हयात असले तरी राजकारणात सहभागी होण्याच्या शारीरिक स्थितीत नाहीत. मात्र आजही त्यांना तेच विधान तितक्या आत्मविश्वासानं करता आलं असतं का, याबद्दल शंका वाटते.
बाळासाहेब ठाकरे यांना पवारांना दिलखुलास मित्र आणि उमदा विरोधक म्हटलं आहे. पवारांना कर्करोग झाल्यावर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा आदेश मी तुम्हाला देत आहे, असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. सुप्रिया सुळे राज्यसभेसाठी पहिल्यांदा उभ्या राहिल्या तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेचा उमेदवार तर उभा केला नाहीच, पण कमळाबाईंला कसं पटवायचं ती माझी जबाबदारी, असं म्हणून भाजपला समजावायची जबाबदारीही आपल्या अंगावर घेतली. सुळे यांच्या पहिल्या निवडणुकीचा उल्लेख करताना पवार असं म्हणतात की, माझ्या पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांनी सुप्रियाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ हा निर्णय पवारांचा नव्हता का? पवारांना विचारल्याशिवाय किंवा त्यांची इच्छा काय हे कळल्याशिवाय निर्णय घेतील इतक्या स्वतंत्र प्रज्ञेचे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत का? इथं सुळेंची निवड योग्य की योग्य हा प्रश्न नाही. ती योग्यच आहे हे नंतरच्या काळात सिद्ध झालं आहे. मात्र सुळे यांनी राजकारणात यावं अशी आपली इच्छा होती आणि त्यानुसार आपण पावलं उचलली असं पवार थेटपणे का म्हणत नाहीत? तसं त्यांनी म्हणणं अधिक प्रामाणिकपणाचं ठरलं असतं?
पवारांनी फारुक अब्दुल्ला यांच्याबद्दल लिहिताना चोवीस तास राजकारण त्यांच्या स्वभावात नाही असं म्हटलं आहे. पवारांचं हे निरीक्षण बरोबर असल्याचं इतर अनेकांच्या लेखनावरूनही दिसतं. काश्मीरचे राज्यपाल असलेले बी. के. नेहरू, रॉचे प्रमुख असलेले अमरजीत सिंग दुलत यांनीही त्यांच्या आत्मचरित्रपर लेखनामध्ये फारुक अब्दुल्ला यांना राजकारणात कमी रस होता आणि म्हणून शेख अब्दुल्ला राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकायला शेवटपर्यंत उत्सुक नव्हते असं म्हटलं आहे. ओमर अब्दुल्ला शिक्षणासाठी मुंबईत असताना पवारांच्याच घरी राहायला होता. त्या अर्थाने पवारांचे अब्दुल्लाशी घनिष्ठ कौटुंबिक नातं आहे.
आबासाहेब कुलकर्णी, बापूसाहेब काळदाते, अण्णासाहेब शिंदे, राहुल बजाज आणि पवारांच्या गाडीचा गेली त्रेचाळीस वर्षं चालक असलेले गामा यांच्याबद्दल पवारांनी मोजकंच लिहिलं आहे. त्यापैकी गामा यांच्याबद्दलची माहिती नवी आहे. पवारांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या आणि एरवी ज्याच्याबद्दल काहीच कळण्याची शक्यता नाही, अशा व्यक्तीबद्दल लिहिणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. मात्र या सर्व व्यक्तिचित्रणांना ती आत्मचरित्राचा अपरिहार्य भाग म्हणून आली असती तर अधिक महत्त्व आलं असतं. इथं मात्र त्याला पानपूरकाचं रूप आलं आहे. म्हणजे भरपूर भूक लागलेल्या एखाद्या माणसानं ताटावर बसावं आणि त्याला लोणचं हेच जेवण म्हणून वाढलं जावं असं झालं आहे.
आत्मचरित्राचा आठवा भाग (पान ३२३ ते ३४०) पवारांनी बारामतीच्या यशोगाथेला वाहिला आहे. बारामतीमधल्या संगणक लॅब, पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातील बांधलेले तीनेकशे तलाव, दुग्धव्यवसाय आणि साखर कारखाने यातून ‘बारामती पॅटर्न’ उभा राहिला आहे. आश्चर्य म्हणजे बारामतीच्या शाळा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या अंतर्गत आहेत, याचाच अर्थ या सगळ्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. मुलांना चांगलं इंग्रजी शिकता येईल यावर भर आहे असं पवार म्हणतात. इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमातनं शिकणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे यशपाल समितीचं म्हणणं सर्वसामान्य पालकांना कळत नाही हे समजण्यासारखं आहे, पण पवारांसारख्या विचारी राजकारण्यालाही हे कळत नाही हे दुःखद आहे. पवारांनी पवार पब्लिक स्कूल काढल्यानंतर त्यापासून प्रेरणा घेऊन गावोगावच्या राजकारण्यांनी इंग्रजी शाळांची दुकानं टाकली आहेत. पवारांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांची लाट थोपवण्याचा किमान प्रयत्न करता आला असता, पण तो त्यांनी केला नाही असं खेदानं म्हणावं लागतं.
पवारांनी बारामतीबद्दल खूप मनःपूर्वक लिहिलं आहे, पण त्यांच्यासारख्या ताकदीच्या राजकारण्यानं सगळा महाराष्ट्र हाच आपला मतदारसंघ समजायला नको होता का? बारामतीत त्यांना जे यशस्वीपणे करता आलं, त्याची पुनरावृत्ती राज्यातल्या इतर भागांमध्ये का करता आली नाही? याचं एक कारण पवार बारामतीच्या पलीकडे फार पाहू शकले नाहीत हे आहे का? म्हणजे इतर लोक तो विचार करतातच. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धात पवारांनीही तो करण्याची नितांत गरज आहे.
आत्मचरित्राच्या शेवटच्या प्रकरणात पवारांनी येत्या काळाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्षामधली सर्व समावेशकता संपवून हा पक्ष दुबळा झाल्याचं निरीक्षण पवार नोंदवतात. २०१४ च्या निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने सत्तेत येणं ही महत्त्वाची घटना असल्याचं पवारांनी नोंदवलं आहे. मात्र त्याचवेळी भाजपच्या यशाचा आलेख वेगाने घसरतो आहे, नरेंद्र मोदी यांची कार्यशैली काळजी करायला लावणारी आहे असंही पवार म्हणतात. मात्र असं असताना केंद्रातल्या सरकारचं कौतुक आणि महाराष्ट्रातल्या सरकारविरुद्ध शेरेबाजी अशा दुहेरी नीतीचा पवारांच्या आधीच खालावलेल्या विश्वासार्हतेवर आणखी वाईट परिणाम होत नसेल का? पंधरा वर्षं सत्तेत राहिल्यानंतर त्यांचा पक्ष आता विरोधात आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाप्रमाणेच त्यांच्या पक्षाचीही आंदोलनं करण्याची सवय आणि इच्छा दोन्ही मोडली आहे. अशा वेळी पवारांच्या पक्षांचं पवार असताना आणि पवारांच्या नंतर भवितव्य काय असेल, हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. देशातल्या राजकीय प्रक्रियेबद्दल व तिच्या भवितव्याबद्दल पवार स्पष्टपणे बोलतात. पण आपल्या पक्षाच्या भवितव्याबद्दल मात्र ते काही बोलताना दिसत नाहीत.
या शेवटच्या प्रकरणात पवारांनी हमीद दलवाईंबद्दल पानभर लिहिलं आहे. मुस्लिम समाजाच्या प्रगतीबद्दलची दलवाई यांची भूमिका, त्याला मुस्लीम समाजातून होणारा विरोध, आपल्या मृत्यूनंतर आपलं दहन व्हावं या इच्छेमुळे बिथरलेले त्यांचे नातेवाईक या गोष्टींबद्दल पवारांनी लिहिलं आहे. ते अगदी योग्य असलं तरी त्याचा शेवटच्या प्रकरणाशी सांधा जुळत नाही.
आपल्या आत्मचरित्राचा शेवट पवारांनी ‘या देशातील जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्षे लाभला. यापेक्षा अधिक काय असू शकतं’ या वाक्यानं केला आहे. या वाक्यामागची भावना चांगली असली तरी देशभरातल्या जनतेनं पवारांकडे विश्वासानं पाहिलं आहे, असं म्हणता येणार नाही. तसं गेल्या काही दशकांमध्ये ते कोणत्याच नेत्याविषयी म्हणता येईल अशी परिस्थिती नाही.
पवारांचं आत्मचरित्र राजहंससारख्या मोठ्या प्रकाशन संस्थेनं प्रसिद्ध केलं आहे. पवारांच्या पक्षातले कार्यकर्ते, नेते आणि त्यांचा महाराष्ट्रातला एकूण चाहता वर्ग यांच्या मोठ्या संख्येमुळे हे पुस्तक मोठ्या प्रमाणात खपलं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. पुस्तकात अनेक महत्त्वाची छायाचित्रं आहेत. रामभाऊ महाळगी प्रबोधिनीच्या संवाद सभेत अंबरीश मिश्र यांनी शरद पवारांच्या आत्मचरित्राचं नाव ठरवण्याची प्रक्रिया सांगितली. स्वतः अंबरीश यांनी ‘... आणिक पायतळी अंगार’ हे नाव सुचवलं होतं. सध्या असलेले ‘लोक माझे सांगाती’ हे नाव दत्ता बाळसराफ यांनी सुचवलेलं आहे. ते पवारांच्या व्यक्तिमत्त्वाच्या बरंच जवळ जाणारं असलं तरी आणखी थोड्या वेगळ्या नावाचा विचार करायला हवा होता असं वाटतं. सदर पुस्तक ही पवारांची राजकीय आत्मकथा आहे. त्यामुळे पवारांच्या वैयक्तिक जीवनातले तपशील यात अजिबातच येत नाहीत. म्हणजे पवारांच्या धकाधकीच्या राजकारणाचा पत्नी, मुलगी यांच्यावर होणार परिणाम इत्यादी गोष्टी यायला हव्या होत्या, पण पवारांच्या एकूणच हातचं राखून सांगण्याच्या धोरणाचा तो भाग आहे असं दिसतं. त्यामुळे हे आत्मचरित्र कोरडं झालं आहे.
पवारांसारख्या दिग्गज नेत्याच्या आत्मचरित्राचे उभे-आडवे छेद घेण्याचा फायदा काय असा प्रश्न पडू शकेल. राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला त्यातून दिसणारी राजकीय प्रक्रिया, मानवी व्यवहारातली गुंतागुत यांचं आकर्षण वाटतं. मात्र त्याहीपलीकडे नव्या पिढीपुढे आणि राजकीय कार्यकर्त्यांपुढे मागच्या काळाचा एक दस्तावेज येण्याची आणि त्याचं विच्छेदन होण्याची प्रक्रिया महत्त्वाची वाटते. पवारांनी या आत्मचरित्राचा दुसरा भाग लिहावा आणि त्यावेळेस या पुस्तकाच्या संकलन – संपादन प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या मंडळींनी पवार लोकांना कसे दिसावेत असं त्यांना वाटतं, याहीपेक्षा पवार जसे आहेत तसे लोकांपुढे आणावेत, मग त्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातलं आणि राजकारणातलं गद्यपण आहे तसंच स्वीकारलं पाहिजे. तसं झालं तर पवारांच्या राजकारणाप्रमाणे त्यांच्या आत्मचरित्राला लागलेला अपूर्णतेचा शाप दूर होऊ शकेल.
लोक माझे सांगाती... – शरद पवार, राजहंस प्रकाशन, पुणे, पाने – ३७०, मूल्य – ३८० रुपये.
हे पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
लेखक मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.
santhadeep@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment