‘साधना’ साप्ताहिकाचे माजी संपादक आणि ज्येष्ठ लेखक यदुनाथ थत्ते यांच्या ‘मुस्लिम समाजातील वाहते वारे’ आणि ‘मुस्लिम मनाचा कानोसा’ या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या नुकत्या साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाल्या आहेत. त्यानिमित्ताने ‘साधना’चे विद्यमान संपादक विनोद शिरसाठ यांनी सांगितलेली या पुस्तकांमागची पार्श्वभूमी...
..................................................................................................................................................................
५ ऑक्टोबर १९२२ ते १० मे १९९८ असे पंचाहत्तर वर्षांचे आयुष्य लाभलेल्या यदुनाथ थत्ते यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. १९४२च्या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, सेवादलाचे कार्यकर्ते-नेते, ‘आंतरभारती’चे नेते-प्रणेते, ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक आणि शंभरांहून अधिक लहान-मोठ्या पुस्तकांचे लेखक, अशी त्यांची पंचरंगी ओळख सांगता येईल. मात्र १९४९ ते ८२ अशी तब्बल ३४ वर्षे त्यांनी साधना साप्ताहिकाच्या संपादनाचे जे काम केले, ते विशेष उल्लेखनीय आहे. त्यातील अखेरची पंचवीस वर्षे ते मुख्य संपादक होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी ‘साधना’ने त्यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक दाखवणारा एक विशेषांक प्रकाशित केला आहे. आणि आगामी वर्षभरात त्यांची विशेष महत्त्वाची व अलक्षित अशी काही पुस्तके नव्या आवृत्तीच्या रूपात आणणार आहोत. त्याचा प्रारंभ म्हणून ‘मुस्लीम मनाचा कानोसा’ आणि ‘मुस्लीम समाजातील वाहते वारे’ ही दोन पुस्तके आहेत.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
यदुनाथजींनी १९७५ ते ८५ या अकरा-बारा वर्षांच्या काळात दैनिक सकाळमध्ये ‘मुस्लीम मनाचा कानोसा’ हे पाक्षिक सदर मुल्कपरस्त (म्हणजे ‘देशभक्त’) या टोपणनावाने लिहिले. त्या सदरात जवळपास अडीचशे लेख प्रकाशित झाले. त्यानंतरची तीन वर्षे म्हणजे १९८६ ते ८८ या काळात ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात त्यांनी ‘मुस्लीम समाजातील वाहते वारे’ हे पाक्षिक सदर ‘कलमनवीस’ (म्हणजे लेखणी बहाद्दर) या टोपणनावाने लिहिले. त्या सदरात ७५ लेख प्रसिद्ध झाले.
ही दोन्ही सदरे टोपणनावाने लिहिली गेली असल्याने त्यातील लेख सर्वदूर पोहोचले, पण लेखकाचे खरे नाव मात्र त्या वेळी खूपच कमी लोकांना माहीत झाले असणार. कारण मुळात टोपणनावाने केले जाते, त्या लेखकाचे खरे नाव त्या दैनिकाचे संपादक व त्यांचे काही सहकारी यांनाच माहीत असते. त्यांच्याकडून त्या नावाची थोडीबहुत वाच्यता झालीच आणि अन्य काही लोकांनीही लेखन-शैलीवरून अंदाज बांधला तरी, मूळ लेखकाचे नाव खूपच कमी वाचकांना माहीत झालेले असते. परिणामी ‘यदुनाथ थत्ते हेच त्या सदरांचे लेखक आहेत’ ही वस्तुस्थिती त्या सदरांच्या एक-शतांश वाचकांनाही माहीत नसणार हे उघड आहे. त्यांनी तसे का केले याचे कारणही स्पष्ट आहे.
मुस्लीम समाजजीवनाशी संबंधित असलेले ते लेखन यदुनाथ करताहेत असे त्या वेळीच लोकांना माहीत झाले असते तर ‘एका हिंदू व्यक्तीने मुस्लीम समाजाविषयी केलेले लेखन’ या दृष्टीने त्याकडे पाहिले गेले असते. परिणामी वाचकांच्या मनात ग्रह-पूर्वग्रह आणि समज-गैरसमज निर्माण होत राहिले असते. त्यातून जास्तीचे वादविवाद उत्पन्न झाले असते. आणि कदाचित, दोन्ही समाजांकडून कमी वाचले गेले असते. टोपणनावाने ती सदरे लिहिली गेल्यामुळे नेमका उलटा परिणाम झाला असणार. ‘खरा लेखक कोण आणि हिंदू की मुस्लीम,’ हे दोन प्रश्न त्या सदरांच्या नियमित वाचकांच्या मनात सतत राहिल्याने एक प्रकारचे कुतूहल व उत्सुकता कायम राहून, लेखातील आशय व विषय यांच्याकडे अधिक लक्ष वेधले गेले असणार. यदुनाथ यांना तरी वेगळे काय अपेक्षित होते?
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
अशा या दोन्ही सदरांची पुस्तके नंतर प्रकाशित झाली, तेव्हा जाणकार वाचकांना लेखकाचे खरे नाव कळले, पण त्यातही यदुनाथ यांनी थोडी गोपनीयता राखलीच. ती अशी की, त्या दोन्ही सदरांच्या पुस्तक संग्रहांना त्यांनी स्वत:चे नाव ‘लेखक’ म्हणून नाही तर ‘संपादक’ म्हणून लावले. म्हणजे, मुल्कपरस्त व कलमनवीस यांचे पूर्वप्रसिद्ध लेखन निवडून वा संपादित करून तुमच्यासमोर सादर करत आहोत, असा तो आविर्भाव होता. (त्यातील कलमनवीसचे लेख निवडून पुस्तक करताना त्यांनी संपादक म्हणून स्वत:बरोबर हुसेन जमादार यांचेही नाव लावले आहे.)
‘मुस्लीम मनाचा कानोसा’ या ‘सकाळ’मधील सदरातील १९७७ ते ७९ या काळातील निवडक ७७ लेखांचा संग्रह ‘तवारीख’ या नावाने १९८२मध्ये आला, तो अमळनेर (जिल्हा धुळे) येथील चेतश्री प्रकाशनाने प्रकाशित केला. ती आवृत्ती संपल्यावर त्यातील निवडक २७ लेखांचे पुस्तक ‘निवडक तवारीख’ (म्हणजे इतिहास) या नावाने १९८६मध्ये काढले. ते पुणे येथील मंजुळ प्रकाशनाकडून आले. त्यानंतर त्याच सदरातील उर्वरित लेखांमधून निवडक ३९ लेखांचे पुस्तक ‘मुस्लीम मनाचा कानोसा’ याच नावाने, पुणे येथील मानसन्मान प्रकाशनाकडून १९८६मध्ये आले. म्हणजे ‘तवारीख’, ‘निवडक तवारीख’ आणि ‘मुस्लीम मनाचा कानोसा’ ही तिन्ही पुस्तके ‘सकाळ’मधील सदराचीच आहेत. त्या तिन्हींत मिळून साधारणतः सव्वाशे लेख आले आहेत, उर्वरित सव्वाशे लेख ‘सकाळ’च्या त्या अंकांमध्येच अद्यापही पडून आहेत. आणि १९८६ ते ८८ या काळात ‘नागपूर पत्रिका’ दैनिकातून ‘मुस्लीम समाजातील वाहते वारे’ या सदरात जे ७५ लेख यदुनाथ यांनी लिहिले. त्यातील निवडक ४० लेखांचे पुस्तक त्याच नावाने १९९१मध्ये मानसन्मान प्रकाशनाकडून आले.
वरील चारही पुस्तके मागील दोन दशके तरी ‘आऊट ऑफ प्रिंट’ आहेत आणि त्या पुस्तकांची व त्या दोन सदरांची आणि यदुनाथ यांचीही आठवण सांगणारे आता फार कमी लोक हयात आहेत. मात्र त्या दोन्ही सदरांमध्ये हाताळलेले विषय व त्यातील आशय आज-उद्याच्या पिढ्यांसमोर आणणे आवश्यक आहे, विशेषतः राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील अभ्यासक, कार्यकर्ते आणि साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रांतील लेखक, कार्यकर्ते यांच्यासाठी तरी! आणि म्हणून आम्ही ‘सकाळ’मधील सदरांचे एक (‘निवडक तवारीख’ व मूळ ‘तवारीख’मधील बारा लेख आणि ‘मुस्लीम मनाचा कानोसा’ हे सर्व एकत्रित करून) आणि ‘नागपूर पत्रिका’मधील सदराचे एक अशी दोन पुस्तके नव्या आवृत्त्यांच्या रूपात साधना प्रकाशनाकडून एकाच वेळी आणत आहोत. सोयीसाठी व गोंधळ टाळण्यासाठी त्या सदरांचीच नावे या पुस्तकांना देत आहोत. अर्थातच, सामाजिक जीवनाबद्दल जागरूक असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वाचकांना या पुस्तकांमध्ये कमी-अधिक रुची निश्चित वाटेल. ‘आज’ समजून घेण्यासाठी आणि ‘उद्या’ची पावले टाकण्यासाठी, ‘काल’ कसा होता याचे आकलन आवश्यक असते. त्यासाठी ही पुस्तके थोडी का होईना उपयुक्त ठरतील, अशी आम्हाला आशा आहे… तेच या नव्या आवृत्त्यांचे प्रयोजन आहे.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
मात्र ही पुस्तके वाचताना सर्व प्रकारच्या वाचकांना दोन नम्र सूचना कराव्याशा वाटतात.
एक - हे सर्व लेख आजपासून कमीत कमी ३५ आणि जास्तीत जास्त ४५ वर्षांपूर्वीचे आहेत, याचे भान ठेवायला हवे. म्हणजे त्या वेळी सभोवताली जे काही घडत होते, त्याचे वृत्तांकन आणि त्यावरील माफक भाष्य व विश्लेषण या लेखांमध्ये आलेले आहे. म्हणून त्या काळाचा पट समोर ठेवूनच हे लेख वाचायला हवेत. त्यानंतर कालप्रवाहात खूप बदल झाले आहेत, होत आहेत. त्यातील काही बदल इष्ट आहेत, काही अनिष्ट आहेत. आणि अर्थातच काही बदलांची अद्याप प्रतीक्षा आहे.
दुसरी सूचना अशी की, केवळ या लेखनावरून यदुनाथ थत्ते यांच्याविषयी मत बनवणे वाचकांनी टाळावे. ते हिंदूंचे किंवा मुस्लिमांचे कैवारी वा पक्षपाती होते अशा प्रकारचे निष्कर्ष काढून कोणी मोकळे होणार असेल तर त्यांची मोठीच फसगत झाली एवढाच त्याचा अर्थ होईल.
यदुनाथ यांनी या दोन्ही सदरांमधील सर्व लेखांमध्ये मुस्लीम समाजातील मूलतत्त्ववादी प्रवृत्ती व रूढी-परंपरा यांच्याविषयीच लिहिले आहे. त्यामुळे हिंदू समाजातील मूलतत्त्ववाद आणि रूढी परंपरा यांच्यावर ते येथे काहीच का बोलत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्याचा मोह काही वाचकांना होईल. त्यांना विनंती एवढीच की, कृपया तो मोह टाळा. यदुनाथ थत्ते यांची लहान-मोठी अशी शंभराहून अधिक पुस्तके ग्रंथालयांत सापडतील आणि त्यांनी लिहिलेले शेकडो लेख व अग्रलेख ‘साधना’ साप्ताहिकाच्या आर्काइव्हमध्ये आहेत. यदुनाथ नेमके कोण आहेत, हे त्यावरून लक्षात येईल.
एवढेच नाही तर, आज ते हयात असते आणि तसा प्रश्न कोणी विचारलाच असता तर म्हणाले असते, ‘मी कोण आहे आणि माझ्या भूमिका काय आहेत हे जगजाहीर आहे. त्यामुळे मुस्लीम समाजजीवनातील मूलतत्त्ववाद व रूढी परंपरा यांच्यावर टीका-टिप्पणी करताना, संदर्भ नसताना किंवा गरज नसताना हिंदू मूलतत्त्ववाद व रूढी-परंपरा यांच्यावर टीका-टिप्पणी करून आपले पुरोगामित्व पुन्हा पुन्हा दाखवण्याची मला गरज नाही.’
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
या दोन सदरांचा एकत्रित विचार केला तर सर्वप्रथम लक्षात येते ते हेच की, १९७५ ते ८८ हे या दीड दशकांत दर पंधरा दिवसांनी एक याप्रमाणे यदुनाथांनी सव्वातीनशे लेख लिहिले. मुस्लीम समाजजीवनाशी संबंधित इतके सातत्याने व इतके विपुल लेखन मराठीत तरी अन्य कोणत्याही मुस्लिमेतर लेखकाने केलेले नसावे. त्यातील सव्वाशे लेख या दोन पुस्तकांत आले आहेत. ही दोन्ही पुस्तके म्हणजे जुळी भावंडे आहेत, असे म्हणायला हरकत नाही. मात्र त्यात दोन-तीन सूक्ष्म फरक आहेत. ‘सकाळ’मधील सदर आठशे शब्दांच्या दरम्यान आहे, तर ‘नागपूर पत्रिका’मधील सदर हजार शब्दांच्या दरम्यान आहे. ‘सकाळ’मधील सदरात प्रामुख्याने सभोवतालच्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यासंदर्भात लेखन केले आहे; त्यात माहिती देत देत माफक भाष्य करणे, असा प्रकार आहे. ‘नागपूर पत्रिके’तील सदरात मात्र प्रामुख्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील घटना घडामोडींच्या निमित्ताने माहिती देत देत थोडे विश्लेषण केले गेले आहे. पहिल्या सदराला प्रत्यक्ष भेटीगाठी व पाहिलेले, अनुभवलेले असे स्वरूप जास्त आहे. दुसऱ्या सदरात मात्र वाचलेले, अभ्यासलेले, चिंतनातून आलेले असे स्वरूप जास्त आहे.
असे घडण्याची तीन कारणे असावीत. एक म्हणजे पहिले सदर लिहिले तेव्हा यदुनाथजी वयाने पन्नास ते साठ वर्षे यादरम्यान होते आणि त्या काळात ‘साधना’चे संपादक असल्याने त्यांचे आदान-प्रदान व भ्रमंती जास्त होती. दुसऱ्या सदराच्या काळात ते साठीच्या पुढे सरकले होते, भ्रमंती व विविध क्षेत्रीय आदान-प्रदान काही प्रमाणात तरी कमी झाले असावे. दुसरे कारण, पाहिले सदर लिहिले गेले त्या काळात हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर, अ.भि. शहा हे सर्व जण यदुनाथ यांच्या सभोवताली होते आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा झंझावात चालू होता. दुसरे सदर लिहिले गेले, तेव्हा वरील त्रिकुट काळाच्या पडद्याआड गेले होते आणि शहाबानो प्रकरणामुळे मुस्लीम समाज-सुधारणेच्या विचाराला ब्रेक लागले होते, हिंदुत्ववादी विचाराला उधाण येऊ लागले होते. तिसरे कारण, पाहिल्या सदरात मुस्लीम समाजजीवनाशी संबंधित लेखन करताना नकारात्मक भाग जास्त आला अशा प्रतिक्रिया या आल्या असाव्यात. आणि यदुनाथ यांनाही ते जाणवले असावे. म्हणून कदाचित दुसऱ्या सदरात त्यांनी मुस्लीम समाजात होत असलेल्या योग्य बदलांची नोंद अधिक प्रमाणात घेतली आहे. शिवाय, शहाबानो प्रकरणानंतरच्या वातावरणात मुस्लीम समाजातील चांगल्या गोष्टी पुढे आणण्याची गरज अधिक जाणवली असावी, तेवढा द्रष्टेपणा यदुनाथजींकडे होताच होता.
‘मुस्लिम समाजातील वाहते वारे’ - यदुनाथ थत्ते, साधना प्रकाशन, मूल्य - १५० रुपये
‘मुस्लिम मनाचा कानोसा’ - यदुनाथ थत्ते, साधना प्रकाशन, मूल्य - ३०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment