अजूनकाही
‘जगणं कळतं तेव्हा’ या विद्या पोळ - जगताप यांच्या कादंबरीची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर यांनी त्यांना लिहिलेलं हे पत्र...
..................................................................................................................................................................
२६ डिसेंबर २०२१
विद्या
सप्रेम
खूप खूप जुनी गोष्ट आहे. मी असेन बावीस-तेवीस वर्षांचा. तरुण होतो. (हो, विश्वास ठेव. मी एके काळी तरुण होतो. जन्मत: ओमप्रकाश किंवा ए. के. हनगल नव्हतो!) नुकतंच ‘माणूस’चं काम बघायला लागलो होतो आणि ‘किर्लोस्कर’च्या कुठल्याशा अंकात दत्तप्रसाद दाभोळकरचा (बंड्या) त्या वेळच्या एन.सी.एल.चे डायरेक्टर असलेल्या डॉ. बी. डी. टिळक यांच्यावरचा लेख वाचनात आला. इतका आवडला की, तडक मुंबईला जाऊन-फोन मिळवून फोर्टमधल्या एम्पायर हॉटेलमध्ये त्याला भेटलो. पहिल्या भेटीत छत्तीस गुण जमले आणि सुरू झाला ‘माणूस’मधला त्याचा ‘आधुनिक विज्ञानेश्वरी’ हा कॉलम. पुढे तो लिहीत गेला... लिहीत गेला...
अशीच एक आठवण रवीन्द्र गुर्जरची. दुपारी बाराच्या सुमारास पोरसवदा दिसणारा कॉलेजचा तास चुकवून आल्यासारखा तो - हातात दहा-वीस पानं ठेवून गेला. तो अनुवाद होता ‘पॅपिलॉन’ या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचा. ‘सवडीनं वाचतो’ असं म्हणालो, पण लगेच वाचला आणि विषय, आशय आणि भाषा इतकी वेगळी वाटली की, तासाभरात सायकलवर टांग मारून त्याचं घर शोधून त्याला भेटलो. तो लिहिता झाला… आज त्याच्या नावावर ३०-३२ पुस्तकांचे अनुवाद आहेत.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
पाच वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत ‘हंस’ दिवाळी अंक चाळत असताना सरिता आव्हाड यांचा आई-वडिलांवरचा लेख वाचला. रात्री अकरा-साडेअकराची वेळ होती; पण काळ-वेळ न बघता विद्या बाळ, अरुणा अंतरकरांपर्यंत साऱ्यांना फोन करून त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आकाराला आलं – ‘हमरस्ता नाकारताना’.
हे नमनाचे तेल कशासाठी?
तर तुझी गोष्टही याच रूळांवरून धावणारी आहे म्हणून.
तुझी कादंबरी वाचली. एक साधी-सरळ कुटुंबकथा. एका रेषेत जाणारी. वाटलं, हिला तातडीनं भेटायला हवं. फोन-पत्ता काही नव्हता. मोठ्या पदावरचे सरकारी ऑफिसरही असे घोळ करतात! मग विश्वास पाटलांपासून अनेकांना कामाला लावलं. त्यात तू धांदरटपणाची अजून एक खूण सोडली होती, ती तुझा मोबाईल ऑफिसला विसरून जाण्याची. त्यामुळे मी आणि वैशालीनं तुझा चेहरा पाहिला होता. नंतर नेटवरून महाराष्ट्रातील सर्व विद्या पोळ-जगताप यांचे चेहरे पाहिले आणि त्यातला एकही चेहरा तुझ्या चंद्रकोरी चेहऱ्याशी जुळत नव्हता. शेवटी शोध थांबवला आणि हातात कळसा... झाला. सातारच्या आमच्याच लेखक-प्रतिनिधीकडे तुझा ठाव-ठिकाणा मिळाला. आणि पुढे रीतीप्रमाणे सर्व सोपस्कार होऊन ‘जगणं कळतं तेव्हा’ प्रकाशित झालं.
आता सांगतो.
पूर्वी मी एक-दोन प्रसंगी जाहीर मुलाखतीत हे बोललो आहे. (कदाचित लिहिलंही असेन.) मला अनेकदा माझा लेखक हा लेखनात सापडण्याआधी त्याच्या बोलण्यातून किंवा त्याच्या पत्रातून सापडतो.
“मला वर्षभर जंगलात राहून निसर्गातले चार ऋतू चक्क भोगायचे होते. त्या अनुभवाने माझं संपूर्ण आयुष्य बदलू टाकलं, दिशा बदलली. हा अनुभव वाचकांना वाचायला आज मिळाला काय किंवा चार वर्षांनी मिळाला काय, माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे?” एखाद्या तत्त्वचिंतकानं बोलावं असं हे पहिल्याच भेटीत कृष्णमेघ कुंटे बोलला आणि मनातून तो माझा लेखक झाला. नंतर मी त्याचं हस्तलिखित वाचलं.
“माझी कादंबरी तुम्ही आधी वाचा. तुम्हाला आवडली नाही, तर परत करा. नंतर मी ती कोणालाही दाखवणार नाही, प्रकाशितही करणार नाही, पण माझा विश्वास आहे, तुम्हाला ती निश्चित आवडणार.” हे पहिल्याच भेटीत ज्या आत्मविश्वासानं तू म्हणालीस- त्या वेळचा तुझा चेहरा कृष्णमेघशी साम्य सांगून गेला आणि त्याच रात्री तुझी कादंबरी वाचून पूर्ण केली.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
मला अनेक वर्षं प्रश्न पडायचा की, अशा साहित्यबाह्य गोष्टीवर आपण आपले काही लेखक आणि त्याचं साहित्य निवडतो, हे योग्य करतो का- हा माझ्या मनातला गोंधळ तीन समीक्षकांनी दूर केला. तीनही समीक्षक मोठे मानले जातात. डॉ. केशवराव शिरवाडकर, डॉ.म.वा. धोंड आणि गो.म. कुलकर्णी. तिघांशी या विषयावर माझ्या अनेकदा चर्चा झाल्या. माझ्या विषयनिवडीमागचे निकष, माझी वैचारिक प्रक्रिया याविषयी आम्ही विस्तारानं बोललो. पु.लं.च्या साहित्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा समग्र शोध घेणारा ‘अमृतसिद्धी’ हा हजार पानांचा ग्रंथ- ‘पु.ल. त्यांच्या जाहीर भाषणात सत्तर-ऐंशी शब्दांच्या वाक्यांची फेक अत्यंत प्रभावीपणे करताना त्यातलं व्याकरण फार काटेकोर सांभाळतात, आपण त्याकडे लक्षच देत नाही,’ या स. ह. देशपांडे यांच्या एका वाक्यावर उभा आहे, हे ज्या वेळी मी त्या तिघांना सांगितलं, त्या वेळी ‘तुम्ही हे लिहायला हवं, मराठी समीक्षेच्या दृष्टीनं ते अतिशय महत्त्वाचं आहे. अशा साहित्यबाह्य गोष्टी साहित्यकृतीबद्दल काही वेळा बरंच काही सांगून जात असतात. त्यामुळे समीक्षेची चौकट रुंदावेल’, असं या तिघांचं मत पडलं.
अर्थात ही वाट मी शोधली असं नाही. ह.वि. मोटे यांनी शोधलेली ही वाट आहे. मला ती पटली आणि माझ्या प्रकृतीला ती मानवली इतकंच.
मला वाटतं, आलापी पुरेशी झालेली आहे. आता मी रागाकडे येतो.
काय वाटलं तुझी कादंबरी वाचून?
‘जगणं कळतं तेव्हा’मध्ये आयुष्यातील चढउतारांविषयी लिहिताना तू नदीच्या प्रवाहाची उपमा वापरली आहेस. ‘एखाद्या शांतपणे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात अचानक खोल दरड आली, तर नदीचा सुंदर धबधबा तयार होतो.’ ही उपमा तू पुढं आयुष्याच्या संदर्भात खुलवली आहेस. असाच प्रवास तुझ्या कादंबरीचा आहे, असं मला वाटतं. शांतपणे वाहणाऱ्या नदीसारखी तुझ्या कादंबरीची सुरुवात होते. निमशहरी गावात राहणाऱ्या, पण गावाकडे मूळं रुजलेल्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा.
तुझ्याच शब्दात सांगायचं तर- ‘कुटुंबकथा’. पण त्यातलं मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं की, गावातल्या परिसराच्या वर्णनांतून, त्यातल्या साध्यासुध्या माणसांतून, त्यांच्या स्वभावांमधून, त्यांच्या जगण्यांतून तू संपूर्ण गाव वाचकांसमोर उभं करतेस आणि इथूनच वाचक तुझ्या कुटुंबात गुंतून जातो.
या गावातल्या लोकांचं जगणं साधं आहे, त्यांचं म्हणून जगण्याचं तत्त्वज्ञान आहे, त्यांच्याकडे अनुभवांमधून आलेली शहाणीव आहे. भाऊंच्या मद्यपानामुळे, त्यातून बदलत गेलेल्या त्यांच्या वागणुकीमुळे, तुला धक्का बसला आहे. जेव्हा काकू म्हणजे आजी तुला समजावून सांगते, ‘आईबापांना सगळंच कळतं का?’ ती ज्ञानोबा माउलीचं उदाहरण देते. स्वयम् अध्ययनाचा, चांगलं-वाईट ओळखायला शिकण्याचा धडा देणाऱ्या स्त्रिया तुझ्या कादंबरीत सतत भेटतात. हे मला विशेष वाटतं.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
संतपरंपरेला मानणारं, साधेपणानं जगणारं तुमचं कुटुंब. शांतपणे प्रवाह वाहतो आहे, असं तुला वाटत असतं, पण भाऊंच्या व्यसनामुळे तुमच्या कुटुंबाची बोट हेलकावायला लागते. तशा तुम्ही दोघी बहिणी सुरुवातीला सैरभैर होता, पण हळूहळू परिस्थितीला सामोरं जायला शिकता. मोर न होता गरुड होण्याचं, आभाळाला गवसणी घालण्याचं ध्येय ठेवता. ही कथा त्यानंतर फक्त तुझी किंवा तुझ्या कुटुंबाची राहत नाही, तर ती प्रातिनिधिक होते.
ती जशी पती-पत्नीतल्या नात्यातल्या उसवलेल्या विणीची आहे, तशीच त्यामुळे मुलांवर होणाऱ्या परिणामाची आहे.
भाऊ हे तुझे आदर्श आहेत, त्यांनी त्यांची मूल्यं जपलीत, याचा तुला अभिमान आहे. तुझं नाव त्यांनी ‘मुक्ती’ ठेवलं, याचं तुला कौतुक आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडे जाण्याचं वास्तव स्वीकारणं तुला कठीण झालं असेल, हे मी समजू शकतो. एक प्रसंग तू लिहिला आहेस. भाऊ रात्रीच्या वेळी पिऊन येतात आणि तशाच अवस्थेत पुन्हा बाहेर पडतात. तुझा भाऊंवर जीव आहे. तू त्यांना एकटीच काळोखात शोधायला निघतेस. भाऊ हॉटेलच्या पायरीवर बसलेले असतात. तू त्यांच्याजवळ जाऊन बसतेस. कादंबरीतला हा एक हृद्य प्रसंग. आता तुझे भाऊ या समंजस मुलीपुढे मनाची दारं खुली करतील, असं वाटत असतानाच ती दारं बंद होतात. इथं खरं तर तुझी कसोटी होती. पण असं वाटलं की, कादंबरीकार म्हणून ती दारं तू जाणीवपूर्वक बंद केलीस का? ते अपरिहार्य होतं का? तुझ्यावर निश्चित बंधनं असणार. ती दारं उघडून त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत शिरायला तुला धीर झाला नाही का? तसा झाला असता, तर कादंबरी एका वेगळ्या उंचीवर गेली असती असं मला वाटून गेलं. तसं करण्यामुळे कदाचित भाऊ कादंबरीच्या केंद्रस्थानी जाऊन बसले असते. - जे कदाचित तुला अभिप्रेत नसावं - तुला ‘भाऊं’ची कादंबरी करायची नसावी. पण तसं न करण्यामुळे ती कोणाचीच होत नाही. कादंबरी सतत केंद्र बदलत जाते.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
यात एक गोष्ट तू उत्तम साधलीस म्हणजे भाऊंच्या व्यसनामुळे कुटुंबाची होणारी ससेहोलपटीची सरधोपट कहाणी तू होऊ दिली नाहीस. त्यामुळेच कादंबरी इतर कादंबऱ्यांहून वेगळी झाली. तीच गोष्ट दोन बहिणींच्या एकूण आयुष्यासंबंधींच्या भाष्याची थोडीफार झाली. ती येतात योग्य त्या प्रसंगांत, पण ती पुरेशी खोल न जाता पृष्ठभागावर राहतात. त्यात स्वतंत्र विचाराच्या खुणा जरूर दिसतात, पण शक्य असूनही ‘विद्या’ पुरेशी खोल का जात नाही, असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. असो.
या सगळ्या लेखनात दोन गोष्टी मात्र प्रकर्षानं जाणवल्या. पहिल्याच प्रयत्नात तू कादंबरीचा एरवी भल्याभल्यांना न जमणारा फॉर्म फार लीलया पकडलास आणि अखेरपर्यंत घट्ट पकडून ठेवलास. तो कुठेही ढिला पडू नाही दिलास. दुसरी गोष्ट, तुझी भाषा ती कुठेही पातळ, हलकी होत नाही. जड आणि बोजडही होत नाही. या दोन्हीच्या मध्यावर ती राहते, प्रवाही राहते आणि वाचकाला धरून ठेवते.
आज तुझ्या कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होतंय. करोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असतानाच्या काळात वाचकांनी तुझ्या कादंबरीचं केलेलं स्वागत तुला आणि आम्हा सगळ्यांना सुखावणारं आहे. कार्यक्रम सुरेख होईल, सर्व ‘विद्ये’च्या कौतुकासाठी टाळ्या वाजवतील, त्या वेळी कोपऱ्यातून दीर्घ काळ वाजणारी टाळी माझी असेल.
- दिलीप माजगावकर
..................................................................................................................................................................
‘जगणं कळतं तेव्हा’ : विद्या पोळ - जगताप
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने - २५५
मूल्य - २०० रुपये.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment