इसवी सन २०२०च्या मध्यात नरेंद्र मोदी सरकारने तीन कृषी कायदे केले. असे म्हणता येईल की, हे कायदे आवश्यकच होते. कारण त्या कायद्यात एकंदर शेतीक्षेत्रामधली सुधारणा अपेक्षित होती.
या कायद्यांविरुद्ध पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात मोठे शेतकरी आंदोलन झाले.
शेवटी २०२१च्या नोव्हेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांना हे तिन्ही कायदे मागे घ्यावे लागले. मोदीजींनी देशाची माफी मागितली. आपण शेतकऱ्यांना शेतकी कायद्यांचे फायदे समजावून सांगू शकलो नाही यासाठी. बऱ्याच लोकांना वाटले की, मोदीजींनी शेतकऱ्यांचीच माफी मागितली.
मोदीभक्तांना या प्रकरणाचा मोठा धक्का बसला. नरेंद्र मोदी या अवताराला माफी मागावी लागावी? आणि त्यानेही ती मागावी? भारताला आर्थिक महासत्ता या पदाकडे घेऊन जाण्यासाठी जन्म झालेल्या अवताराला आपल्या सुधारणा मागे घ्याव्या लागाव्यात?
फेब्रुवारी २०२२च्या आसपास उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत्या. पश्चिम उत्तर प्रदेशातून भाजपच्या दृष्टीने अत्यंत वाईट रिपोर्ट्स यायला लागले. त्यात २०२१च्या शेवटच्या महिन्यात भारतातील अनेक विधानसभांमधील जागांसाठी पोट-निवडणुका झाल्या. त्यात भाजपला स्वतःच्या अशा ३० पैकी फक्त सात जागा मिळाल्या.
या दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचे भाव भडकले. दोन्ही भावांनी शंभरी गाठली. काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा पेट्रोल ६५ रुपये होते. हे भाव आम्ही ३५ रुपयांवर आणू असे आश्वासन मोदीजींनी दिले होते.
पेट्रोल आणि डिझेलमधल्या वाढीचा परिणाम एकूण महागाईवर झाला. मोदी सरकारने ‘उज्ज्वला’ योजनेखाली गरीब महिलांना एलपीजी कनेक्शनस् दिली होती, पण आता एलपीजीचा एक सिलिंडर १००० रुपयापर्यंत पोहोचला. २०१४च्या आसपास हा सिलिंडर ३५०-४०० रुपायला होता. खाद्य तेलांचे भाव २०० रुपयांच्या पुढे गेले. डाळींचे भाव दुप्पट झाले. ‘अच्छे दिन’ आणू असे मोदीजी म्हणत होते, त्यातले काहीच झाले नव्हते. झाले असेल तर उलटेच झाले होते.
त्यात हे आंदोलन. पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपच्या आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांना लोक घराबाहेर पडू देत नव्हते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
मोदीजींच्या २०२४च्या लोकसभा विजयाचा मार्ग उत्तर प्रदेशातूनच जात होता. कारण, लोकसभेच्या ५४४ जागांपैकी ८३ जागा एकट्या उत्तर प्रदेशात होत्या. दक्षिण भारतात भाजपला कधीच जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे उत्तरेत उत्तर प्रदेश गेला, तर लोकसभेच्या निवडणुकात काही खरे नव्हते.
पश्चिम उत्तर प्रदेशात एकही जागा मिळणार नाही, अशी अवस्था आली, तर उत्तर प्रदेश विधानसभा जिंकता येणार नव्हती. आणि उत्तर प्रदेश विधानसभा जिंकल्याशिवाय लोकसभा जिंकता येणार नव्हती.
या पार्श्वभूमीवर मोदीजींपुढे शेतकी सुधारणा की, निवडणुकीतील विजय, हा प्रश्न उभा राहिला असणार.
मोदीजींना जे काही करायचे होते, ते पंतप्रधानपदावर राहूनच करायचे होते. पदच गेले तर भारत महान कसा बनणार, हा विचार त्यांच्या मनात आला असणार. पद न घेता देशासाठी काम करत राहायला ते काही गांधीजी नव्हते.
त्यांनी सरळ कायदे मागे घेऊन टाकले. एके दिवशी सकाळी त्यांनी राष्ट्राला उद्देशून एक भाषण केले. त्यात त्यांनी, छोट्या शेतकऱ्यांना आम्ही कायद्यांचे फायदे समजावून सांगू शकलो नाही आणि त्यामुळे हे कायदे रद्द करत असल्याचे घोषित केले.
हे शेतकऱ्यांचे आंदोलन होते, असा त्याचा अर्थ झाला. भाजपचा आयटी सेल या सगळ्या आंदोलनकर्त्यांना गेले संपूर्ण वर्ष ‘देशद्रोही’, ‘खलिस्तानी’ म्हणत होता. हे शेतकऱ्यांचे नसून ‘दलाल आणि अडत्यांचे आंदोलन’ आहे असे म्हणत होता. सगळे भक्त लोक या मेसेजेसवर विश्वास ठेवून ते मेसेजेस एकमेकांना पाठवत होते.
मोदीजींनी स्वतः या आंदोलन करणाऱ्या लोकांचे ‘आंदोलनजीवी’ असे वर्णन केले होते. म्हणजे आंदोलने करून उपजीविका करणारे, म्हणजे भाडोत्री!
आणि आज अचानक मोदीजी या सगळ्यांना ‘छोटे शेतकरी’ म्हणाले.
भक्तांमधल्या अनेकांना हा प्रकार काही झेपला नाही.
मोदीजी ‘आंदोलनजीवी’ लोकांनाच आता शेतकरी म्हणत आहेत की, मोदीजी पूर्वी शेतकऱ्यांनाच ‘आंदोलनजीवी’ म्हणत होते, हे अनेक भक्तांना कळेना. अनेक भक्त डिप्रेशनमध्ये गेले.
शिरोजी सजग होता. तो हा सगळा प्रकार बघत होता. आपली टिपणे काढत होता. आपल्या नोंदी करत होता. त्यातूनच हे प्रकरण त्याने लिहिले. या प्रकरणात मौज तर आहेच, पण शेवटी छोट्या शेतकऱ्याला त्या काळी कोणीही वाली नव्हता, हे या प्रकरणाच्या शेवटी अधोरेखित झालेले बघून वाचकाचे मन विषण्ण होते.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
येथे आम्हाला एक नोंद करायची आहे. ३० जानेवारी २०२० रोजी ‘अक्षरनामा’मध्ये श्रीनिवास जोशी या नावाने एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात या जोशी महाशयांनी सरकारला सांगितले होते की, खोटेनाटे आरोप करून गप्प बसवायला शेतकरी म्हणजे काही विचारवंत नाहीत.
मोदी सरकारला एक वर्षाने हे कायदे मागे घ्यावे लागले. हे बघता या जोश्यांनी शेतकरी आंदोलन सरकारला दडपता येणार नाही, हे आधीच ओळखले होते, हे मान्य करावे लागेल.
या लेखात या जोश्यांनी अजून एक मुद्दा मांडला होता की, या तीन कायद्यांबरोबरच शेतमालाच्या आधारभूत किमतीचा मुद्दासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आंदोलन संपले तरी- एमएसपीला कायद्याचे कुंकू लावा - अशी मागणी पुढे येत राहिली. या बाबतही हे जोशी तंतोतंत बरोबर आल्याचे आपल्याला दिसते.
शिरोजीची बखरी कागदावर उतरवणारे श्रीनिवास जोशी आणि हा लेख लिहिणारे श्रीनिवास जोशी एकच आहेत का, याविषयी आम्ही संशोधन करत आहोत. श्रीनिवास जोशी हे नाव अत्यंत कॉमन असल्याने संशोधन अतिशय जटिल होऊन बसले आहे. पुण्याच्या एकट्या सदाशिव पेठेतच ३७७७ श्रीनिवास जोशी त्या काळात होते. त्यातले २१७२ लेखक होते. या आकडेवारीवरूनच हे संशोधन किती जटिल आहे, याचा अंदाज वाचकाला येईल. तरीही हा नावाचा गुंता आपण नेटाने संशोधन करत राहिलो तर नक्की सुटेल, अशी आम्हाला आशा आहे.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
शिरोजीची बखर - प्रकरण सातवे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकी कायदे मागे घेतले त्याच्या दुसऱ्या दिवशी अच्युत, अविनाश आणि नाना चहा प्यायला नेहमीच्या हॉटेलात गेले.
अच्युत फार निराश झाला होता. अविनाश शांत होता. नाना आज मुद्दाम अच्युतशी बोलायला आले होते. नाना गोरेपान होते. त्यांचे नाक आणि कान लाल होते. नाना गोल गोल होते. गोल टक्कल, गोल गाल, गोल ढेरी, इतकेच काय पण त्यांच्या पायांचाही कंस झाला होता. त्यामुळे नानांच्या गोलाईला भारी मौज आली होती. नाना चहा पीत नसल्यामुळे साखर घातलेले दूध पीत होते. दुधात केशर घालून मिळेल का, असे नानांनी टपरीवाल्याला विचारले. त्यावर ‘ये केशर क्या होता हैं?’ - असे टपरीवाल्याने विचारले. नाना गप्प बसले. समोर आलेले दूध पिऊ लागले. नाना शरीराने तर गोल गोल होतेच, पण ते बोलतसुद्धा गोलगोल होते.
अच्युत - (अत्यंत भडकून) मोदीजींनी हे काय केले? खलिस्तानी लोकांसमोर हार मानली? अडत्यांसमोर हार मानली? हे लोक खरे आंदोलक असते, तर एक वेळ चालून गेलं असतं. पण या देशद्रोही लोकांसमोर त्यांनी हार मानली?
अविनाश - शांत हो अच्युत. मोदीजींनी हा निर्णय घेतला आहे, म्हणजे त्यात देशाचे हित अधोरेखित असणारच.
अच्युत - या ‘आंदोलनजीवी’ लोकांना ‘शेतकरी’ म्हणाले मोदीजी? शेतकरी?
अविनाश - देशातल्या जनतेला माहीत आहे, हे लोक हरामखोर आहेत ते.
अच्युत - मग कशाला नमायचं त्यांच्यासमोर?
अविनाश – अरे, उत्तराखंडमध्ये मध्यावधी निवडणुकांचे निकाल विरोधात गेले आपल्याविरुद्ध.
अच्युत – अरे, गेले तर गेले. उत्तर प्रदेशसुद्धा गेला तरी चालेल. लोकसभासुद्धा गेली तरी चालेल. मोदीजी ठाम राहिले असते आणि काहीही झालं असतं तरी आम्ही सगळे भक्त ठाम उभे राहिलो असतो त्यांच्या पाठीशी. मोदीजींनी हार मानायला नको होती या हरामखोरांसमोर.
अविनाश – अरे, असं करून कसं चालेल?
अच्युत - सत्ता गेली तर गेली आपण तत्त्वं विसरायला नको होती.
अविनाश - (हतबल होत) बघा ना नाना, हा कसं बोलतोय!
नाना - (त्यांच्या झुबकेदार पांढऱ्या मिशांना लागलेले दूध पुसत) अरे, असं बोलून कसं चालेल अच्युत? मोदीजी तत्त्वं कशी विसरतील?
अच्युत - पाकिस्तान आणि चीनकडून पैसा घेऊन आंदोलन करणाऱ्या लोकांपुढे तुम्ही हार मानलीत, म्हणजे सगळ्या तत्त्वांना तुम्ही तिलांजली दिलीत, असाच अर्थ होत नाही का त्याचा? आणि मग कसली तुमची ५६ इंचांची छाती?
नाना – अरे, काय बोलतो आहेस? राजकारण ही खूप सखोल गोष्ट आहे. त्यात खूप मुद्दे विचारात घ्यावे लागतात. तुझं वय वाढलं की, कळेल तुला.
अच्युत – अहो, आता ४० वर्षांचा झालो आहे मी.
नाना - तुला अजून खूप पुढं जायचंय. खूप शिकायचंय. तोपर्यंत कार्यकर्ता वृत्तीनं राहा. मोदीजींवर विश्वास ठेव.
अच्युत - अंधविश्वास ठेवू? नाना, मला मनापासून वाटतंय की, मोदीजींनी हे आंदोलन ठेचून काढायला हवं होतं.
नाना – हो, अगदी निःशंक मनाने मोदीजींवर विश्वास ठेव. अगदी अंधविश्वास ठेव. कारण तुला अजून खूप गोष्टी कळायच्या आहेत. त्या अर्थाने तू अंधच आहेस.
(नाना यावर गालातल्या गालात हसले. म्हणून अविनाश मोठ्याने हसला. त्यामुळे अच्युत अजून चिडला)
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
अच्युत - मला मोदीजी आवडतात. प्राणापेक्षा आवडतात. पण, इथं मोदीजी चुकले असं मला वाटतंय. गेल्या तर गेल्या इलेक्शन. लोकांपुढे एक आदर्श तर उभा राहिला असता. मोदीजी असं वागायला लागले, तर त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये फरकच काय राहिला? ते लोक कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळून इलेक्शन जिंकायचा प्रयत्न करतात, तुम्हीही तेच करताय.
अविनाश - काय बोलतोयस काय तू, आदरणीय नाना इथं असताना?
नाना - (गालातल्या गालात हसत आणि अविनाशला थांबवत) त्याला बोलू दे अविनाश. चुणचुणीत मुलगा आहे तो.
अच्युत - थँक्यू नाना.
(या बखरीची आधीची प्रकरणं वाचली असलेल्या वाचकांना अच्युतसारख्या मोदीभक्तामधला बदल बघून धक्का बसला असेल. पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, नरेंद्र मोदींच्या या निर्णयाने अनेक भक्तांचा संताप संताप झाला होता. - संपादक.)
तेवढ्यात समर आणि भास्कर तिथं आले.
समर – (समर स्कूटर वरून उतरत असताना) हरले मोदीजी शेतकऱ्यांपुढे.
भास्कर - (स्कूटर लावत) का खलिस्तान्यांपुढे हरले?
अविनाश - हरायला ते मोदीजी म्हणजे काही राहुल गांधी नाहीत.
भास्कर - मग खलिस्तानी लोकांच्या मागण्या मान्य करून मोदीजी जिंकले म्हणायचे का?
अविनाश - राजकारण हे खूप सखोल क्षेत्र आहे. तुला कळायला वेळ आहे अजून.
समर - तू माझ्याच वयाचा आहेस. तुला कसं कळतं आहे राजकारण?
अविनाश - मलाही कळत नाहीये फारसं.
समर - मग मला कळत नाहीये हे कसं कळतंय तुला?
अविनाश - नाना म्हणाले म्हणून.
भास्कर - नाना, तुम्ही सांगा आम्हाला मोदीजी शेतकऱ्यांपुढे हरले का चीन आणि पाकिस्तानकडून पैसे घेणाऱ्या खलिस्तानी लोकांकडून आणि अडत्यांकडून हरले?
नाना - मोदीजी हरलेलेच नाहीयेत. एकतर आंदोलनात काही शेतकरी होते हे खरं आहे, पण त्या खलिस्तानी लोकांनी त्यांची डोकी फिरवली होती, ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
भास्कर - मग असल्या लोकांच्या आंदोलनाला यशस्वी का होऊ द्यायचे? ती हार नाहीये का?
नाना - नाही. सिंह त्याला जेव्हा हल्ला करायचा असतो, तेव्हा दोन पावलं मागे जातो.
अविनाश - बघ, याला म्हणतात राजकारण कळणं.
भास्कर - नाना माफ करा, दोन पावलं मागे घेऊन पुढे पळायला सिंह म्हणजे काय क्रिकेटमधला बोलर आहे का? खरा सिंह उठतो आणि एका क्षणात हल्ला करतो.
अविनाश - काय बोलतो काय आहेस तू? कुणाला बोलतो आहेस?
अच्युत - बरोबर बोलतो आहे भास्कर. सिंह अजिबात मागे जात नाही हल्ला करताना. मी ‘डिस्कव्हरी चॅनेल’वर पाहिले आहे.
अविनाश - काय बोलतो आहेस तू? कुणाला बोलतो आहेस?
नानांच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या होत्या. पण, तरीही ते हसून म्हणाले -
नाना – अरे, लाक्षणिक अर्थाने घे.
समर - (जोरात हसत) व्यंगार्थाने घ्यायला पाहिजे हे वाक्य.
भास्कर - (जोरात हसतो)
नाना - आणि असं आहे, मोदीजींच्या मनात शेतकऱ्यांविषयी खूप प्रेम आहे. त्यांच्यासमोर हार मानण्याएवढं मोठं काळीजसुद्धा आहे त्यांच्याकडे. आई नाही का पोरासमोर हार मानत तिचं बरोबर असलं तरी?
समर - नाना आम्हाला तुमच्याविषयी आदर आहे, पण तुम्ही गोल गोल बोलू नका प्लीज. मोदीजी आई आहेत शेतकऱ्यांचे की, त्यांच्यावर हल्ला करणारे सिंह आहेत?
नाना - तीच तर राजकारणाची कला आहे. एकाच वेळी आई आणि सिंह होता आलं पाहिजे.
अविनाश - बघ, तुला राजकारण कळत नाही असं म्हणत नव्हतो मी?
समर - (हसत) नक्की काय म्हणायचं आहे नाना तुम्हाला?
नाना - (सावरत) म्हणजे शेतकऱ्यांची डोकी फिरवणाऱ्या खलिस्तानी लोकांसाठी मोदीजी सिंह होणार आणि शेतकऱ्यांची आई होणार.
भास्कर - आंदोलन करणाऱ्या लोकांमध्ये शेतकरी आहेत हे माहीत होतं, तर आंदोलनाकडं दुर्लक्ष का केलं एक वर्ष?
नाना - चुकीच्या लोकांच्या नादी लागल्यावर काय होतं, ते कळलं पाहिजे शेतकऱ्यांना.
भास्कर - या प्रकारात ७०० शेतकरी मृत्यूमुखी पडले की, दिल्ली बॉर्डर वरच्या थंडीत.
समर - असलं कसलं तुमचं मातृत्व?
नाना - ते खलिस्तानी लोकांमुळे गेले, मोदीजींमुळे नाही.
भास्कर - मग आता खलिस्तानी लोकांवर मोदीजींमधला सिंह नक्की कधी हल्ला करणार आहे?
अविनाश - करतील वेळ आली की.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
भास्कर - परदेशी गेलेला काळा पैसा कधी येणार भारतात?
समर - मोदीजी आणतील वेळ आली की.
भास्कर - मोदीजी पाकिस्तान आणि चीनला धडा कधी शिकवणार?
समर - शिकवतील वेळ आली की.
अविनाश - (थरथर कापत) मोदीजींनी धडा शिकवला आहे पाकिस्तान आणि चीनला जिथल्या तिथं.
नाना - थरथर कापतात पाकिस्तान आणि चीन मोदीजींचं नाव घेतलं की!
समर - पाकिस्तान आणि चीनला धडा शिकवला जिथल्या तिथं, तर खलिस्तानी लोकांना धडा शिकवायला वेळ का लागतो आहे?
अच्युत - (हसत) त्यांची वेळ यायची आहे.
समर आणि भास्कर हसतात.
अविनाश - (चिडत) तू कुणाच्या बाजूने बोलतो आहेस?
समर - तो मोदीजींच्या बाजूने बोलतो आहे.
भास्कर - मला एक सांगा, पाकिस्तान आणि चीन थरथर कापतात मोदीजींचं नाव घेतलं की, तर ते खलिस्तानी लोकांना पैसे देण्यासाठी धीर कुठून गोळा करतात?
समर - का खलिस्तानी आंदोलन वगैरे सगळा प्रचार होता? आंदोलन खऱ्या खऱ्या शेतकऱ्यांचंच होतं?
नाना - तुला कळणार नाही बाळ, राजकारण फार गुंतागुंतीचं असतं. सगळंच एकत्र असतं. चीन, पाकिस्तान, खलिस्तान आणि शेतकरी सगळं एकत्र असतं. मोदीजींवर विश्वास ठेवा, सगळं छान होईल.
अविनाश - अगदी बरोबर बोललात नाना. बघ समर, याला ‘राजकारण कळणं’ असं म्हणतात.
नाना - पाकिस्तानला धडा शिकवला जाईल, चीन हरेल, खलिस्तानी खलास होतील. शेतकरी सुखी होईल. आणि अखंड भारतसुद्धा होईल!
भास्कर - तुम्ही फक्त मोदीजींना मतं देत राहा, डोळे झाकून, इलेक्शन मागून इलेक्शन मागून इलेक्शन.
अच्युत - (जोरात हसतो) मोदीजी सगळं करतील फक्त वेळ यायला हवी.
अविनाश – अरे, तू कोणाच्या बाजूचा आहेस?
समर - (नानांसारखा गालातल्या गालात हसत) तो मोदीजींच्या बाजूचा आहे.
भास्कर - मला आठवतंय की, मोदीजींनी नोटबंदी केली होती, तेव्हा नाना म्हणाले होते की, खलिस्तानी टाईप लोकांचं फंडिंग आता कायमचं बंद होणार आहे.
अविनाश - तू गप्प बस.
भास्कर - का? तुम्हीच म्हणत होता टेररिस्ट लोकांचं फंडिंग बंद केलं मोदीजींनी. आणि आता तुम्ही म्हणत आहात की, खलिस्तानी लोकांनी फंडिंग दिलं होतं शेतकरी आंदोलनाला. तुम्ही परस्परविरोधी गोष्टी बोलायला लागला, तर आम्ही विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर?
अच्युत - बरोबर आहे. या दोन्ही पैकी एक तरी गोष्ट खोटी असणारच.
समर - खरं आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
भास्कर - मोदीजींनी काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना विचारलं होतं की, तुमच्याकडं सीबीआय आहे, ईडी आहे, सेना आहे, रॉ आहे, आयबी आहे. इतकं सगळं असताना तुम्ही टेररिस्ट आणि सेपरेटिस्ट लोकांचं फंडिंग बंद कसं पाडू शकत नाही?
समर - आता मोदीजींकडं याच सगळ्या संस्था आहेत, मग मोदीजींनी खलिस्तानी लोकांचं फंडिंग बंद का नाही पाडलं? म्हणजे आता आंदोलन सुरू राहिलं आणि ७०० शेतकरी गेले, याची जबाबदारी कोणाची?
अविनाश - अर्थात खलिस्तानी लोकांची.
भास्कर - का?
अविनाश - कारण त्यांचा हेतू वाईट आहे.
भास्कर - मग मनमोहनसिंग यांना टेररिस्ट लोकांच फंडिंग बंद पडता आलं नाही आणि त्यामुळे सैनिक गेले याची जबाबदारी मनमोहनसिंग यांची असं तुम्ही लोक का म्हणत होतात?
समर - तेव्हा टेररिस्ट लोकांचा हेतू चांगला होता का?
नाना – बाळ, तुला राजकारण कळायला वेळ आहे.
समर - हो वेळ आहे मान्य. तुम्हाला राजकारण कळतं आहे, तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या ना. मनमोहनसिंग सैनिकांच्या मृत्यूला जबाबदार आणि मोदीजी शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार नाहीत, असं का?
अविनाश - मोदीजी अवतार आहेत, मनमोहनसिंग हे साधा माणूस आहेत.
भास्कर – ‘अवतार थेअरी’ आत्ता वापरली नसती तर हे प्रकरण सुटलंच नसतं. (जोरात हसतो)
समर - (हसत) का आंदोलनाचं फंडिंग विविध समाजसेवी संस्था आणि गुरूद्वारे करत होते, म्हणून मोदीजींना शेतकरी आंदोलनाचं फंडिंग बंद नाही करता आलं?
नानांच्या गोऱ्यापान कानांच्या पाळ्या परत एकदा लाल झाल्या. पण ते पुन्हा एकदा गालातल्या गालात हसले. राग आला, एखाद्या प्रश्नाला उत्तर देता आलं नाही तर गालातल्या गालात हसणं, ही नानांची प्रतिक्षिप्त क्रिया होती.
नाना - असं आहे, हे युद्ध फार मोठं आहे. कॅपिटॅलिझम आणि कम्युनिझम एकत्र होऊन मोदीजींविरुद्ध उभे आहेत. समाजसेवी संस्थांकडे कोठून पैसा येतो, हा मोठा विषय आहे. हे काम फार साकल्यानं करावं लागणार आहे.
भास्कर - चीन थरथर कापत असेल तर कशाला कुणाला पैसा देईल?
नाना – अरे, बाबा देश थरथर कापत कापत पैसा देतात. काय करणार माणूस त्याला?
भास्कर - मग चीन मोदीजींना बघून थरथर कापतो आहे, असं म्हणण्याला काय अर्थ राहिला?
अच्युत - खरं सांगू का नाना? हे सगळं ऐकल्यावर माझी खात्री पटली आहे की, शेतकऱ्यांचं आंदोलन मोदीजींच्या हाताबाहेर गेलं, हे आपण स्वतःशी तरी कबूल करायला पाहिजे आता.
अविनाश - (चिडत) मोदीजींच्या हाताबाहेर काहीच जात नाही.
समर - पेट्रोलच्या किमती गेल्या आहेत.
नाना - मला वाईट वाटतं आहे, एक अवतारी पुरुष भारताला पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला इतक्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागत आहेत.
भास्कर - अहो नाना, आपण बोलतोय इथं. मोदीजी आलेले नाहीत चर्चा करायला इथं. आम्ही प्रश्न तुम्हाला विचारतोय.
अविनाश - मोदीजी चिडणार आहेत आता आणि या सगळ्या प्रश्न विचारणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकाणार आहेत एक दिवस.
भास्कर - आम्ही तुला आणि नानांना प्रश्न विचारले म्हणून मोदीजी आम्हाला कशाला तुरुंगात टाकतील?
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
अविनाश - एक साधी गोष्ट, शेतकऱ्याला चांगली किंमत मिळावी म्हणून मोदीजींचा जीव तिळतिळ तुटतो आहे.
समर - मग सगळ्या पिकांना एमएसपी जाहीर करा. या या किमतीच्या खाली शेतमाल जायला लागला, तर सरकार ते पैसे देईल असं जाहीर करा. साधी गोष्ट आहे.
नाना – अरे, आत्ता २३ पिकांना एमएसपी आहे, ती कम्पल्सरी करायची तर १७ लाख कोटी लागणार आहेत. कुठून आणायचे एवढे पैसे? भारताचं वर्षाचं सगळं बजेटच पस्तीस लाख रुपयांचं आहे. पैसे काही झाडाला लागत नाहीत.
समर - मागे २०१२ साली मनमोहनसिंग म्हणाले होते की, पैसे झाडाला लागत नाहीत, तेव्हा तुम्ही हसला होतात. देशाच्या प्रगतीसाठी पैसा कमी पडू न देणं, ही पंतप्रधाननांची जबाबदारी आहे, असं म्हणाला होतात.
अविनाश - मनमोहनसिंग साधे माणूस होते, मोदीजी अवतार आहेत. तुम्हाला मोदीजी जे करतील ते मान्य करावेच लागणार आहे.
भास्कर - आम्ही मोदीजींचा चेकमेट केला की, तुम्ही म्हणताय की, हा राजा या बुद्धिबळाच्या पटावरचा नाहीच आहे, त्यामुळे हा चेकमेट व्हॅलिडच नाहिये.
अविनाश - अरे सोड, तू मोदीजींचाच काय नानांचासुद्धा चेकमेट करू शकत नाहीस.
नाना गोड हसतात.
नाना - बोलू दे त्यांना अविनाश. लोकशाही आहे. बोलायची परवानगी आहे. सगळ्याच प्रश्नांना समर्पक उत्तरं द्यायची नसतात आपण. आपल्या हातातले हुकुमाचे एक्के दाखवायचे नसतात लोकांना.
अविनाश - (हसतो) याला म्हणतात राजकारण! कळलं का भास्कर, नाना तुमच्या प्रश्नांना उत्तरं का देत नव्हते ते?
नाना गालातल्या गालात गोड हसतात.
अविनाश - पण असं वाटतं ना नाना, आपल्या लोकांनी संयम सोडला पाहिजे आता. हा देश नाठाळ आहे. या देशाची गचांडी पकडून या देशाला पुढे नेले पाहिजे.
नाना - मोदीजी करतील बरोबर.
भास्कर - (मोठ्याने हसत) शेतकरी आंदोलनात मोदीजी तेच करायला गेले आणि शेतकरी बसला मांडी घालून दिल्ली बॉर्डरवर. शेतकऱ्याची गचांडी सोडून द्यावी लागली आणि माफी मागावी लागली.
अविनाश - (चिडत) मोदीजींनी देशाची माफी मागितली आहे, शेतकऱ्यांची नाही.
नाना - फार मोठे मन असावे लागते माफी मागण्यासाठी.
अविनाश - मनमोहनसिंगांनी मागितली होती का कधी माफी देशाची?
यावर भास्कर हसत खाली बसतो. समर आणि अच्युत हसत राहातात.
अविनाश - हसाताय काय? एक पुण्यात्मा माफी मागतो आहे देशाची मनापासून आणि तुम्ही हसताय? निर्लज्ज!
भास्कर – अरे, आम्हाला येतं आहे हसू तर आम्ही काय करू?
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
समर - एक काम करा, शेतकऱ्याला मालाची किंमत मिळावी म्हणून शेतमालाची आयात करायची नाही, अशी शपथ तरी घ्या. कांदा ५०० रुपये झाला तरी कांदा आयात नाही करायचा पाकिस्तान आणि इराणकडून. शेतमालाच्या वाढलेल्या किमतींमुळे एक-दोन निवडणुका गेल्या तरी चालतील अशी शपथ घेऊन शेतमाल आयात नाही करायचा.
भास्कर - कांदा २ रुपये किलो झाला तरी हस्तक्षेप नाही करायचा. आणि कांदा ५०० रुपये किलो झाला तरी हस्तक्षेप नाही करायचा. हीच गोष्ट गव्हा-तांदळाची. गहू दोन रुपये किलो झाला तरी सरकारने गप्प बसायचे आणि ५०० रुपये किलो झाला तरी सरकारने गप्प बसायचे.
नाना – अरे, असं कसं करून चालेल?
समर - का नाही चालणार?
नाना - लोक उपाशी मरतील.
समर - मग कांदा २ रुपये किलो होतो, तेव्हा शेतकरी नाही का मरत?
भास्कर - गेल्या २५ वर्षांत ५ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
समर - कांदा सत्तर रुपये किलो झाला की, तुम्ही जनता चिडेल म्हणून पाकिस्तान आणि इराण वरून कांदा आणून भाव पाडता. आणि कांदा २ रुपये किलो झाला की, सरकार गप्प बसते. का?
भास्कर - १७ लाख कोटी रुपये एमएसपीसाठी नाहीत म्हणून. पैसे काही झाडाला लागत नाहीत म्हणून.
समर - मग कांदा २ रुपये किलो होतो, टोमॅटो ५० पैसे किलो होतो, तेव्हा शेतकऱ्याने झाडाला लागलेला पैसा लावणीसाठी वापरलेला असतो का?
अच्युत - नाना, मला हे पटते आहे. मोदीजींना सांगा, आपण निवडणुका हरलो तरी चालेल, पण आपण शेतमालाची आयात बंद केली पाहिजे.
भास्कर - नाना, तुमचा स्वदेशीवर विश्वास आहे ना?
नाना - तुला काय म्हणायचे आहे? आहेच माझा विश्वास.
भास्कर - मोदीजींना सांगा, निदान शेतमालाच्या बाबतीत आपण स्वदेशी मालच घ्यायचा.
नाना – अरे, असं कसं करून चालेल?
समर - का? निवडणुका शेतकऱ्यापेक्षा महत्त्वाच्या असतात का?
नाना - तुम्ही तर एकदम जहाल बोलायला लागलात.
भास्कर - आपण स्वदेशी शेतमालच खायचा. यात काय जहाल आहे?
नाना - तुम्ही म्हणताय मालाच्या किमती नाही म्हणजे नाही कमी करायच्या? हा जहाल कॅपिटॅलिझम आहे.
भास्कर - शेतकी कायदे कॅपिटॅलिस्ट तत्त्वज्ञानावर आधारलेले होते ना?
नाना - शेतमालाच्या किंमती कंट्रोल कराव्या लागणारच!
भास्कर - म्हणजे शेतकऱ्याचं अकल्याण झालं तरी चालेल, पण तुम्हाला निवडणुका हरायच्या नाहियेत.
समर - शेतकरी आणि जनता असा चॉइस आला की, शेतकरी मेला तरी चालेल म्हणून तुम्ही शेतमालाचे भाव शेतमाल आयात करून पाडणार.
भास्कर - मतं मिळावीत म्हणून.
अच्युत - शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करतो असं म्हणाले होते मोदीजी. शेतकरी असा आयातीमुळे मरत राहिला, तर कसं होणार डबल उत्पन्न?
नाना - मोदीजी करतील सगळं. आणि तुम्हाला मान्य नसेल तर ते कधीही झोला घेऊन हिमालयात जायला तयार आहेत. कारण ते अवतार आहेत.
समर - सहा महिने सगळं सोडून हिमालयात जाऊन या म्हणावे.
नाना - काम अर्धवट सोडून असं कसं जाता येईल?
भास्कर - का सत्ता अर्धवट सोडून कसं जाता येईल?
समर - ठीक आहे, आता पुढे काय? आता पुढच्या निवडणुका कशा जिंकायच्या? शेतकरी तर चिडला आहे. आपले उत्पन्न मोदीजी डबल करू शकणार नाहीत, हे त्याला कळले आहे. आता निवडणुका कशा जिंकायच्या?
समर - ओबीसी आरक्षण आहे की!
अच्युत - नाही! मोदीजी कधीही आरक्षण वाढवणार नाहीत. मोदीजी मेरिटचे महत्त्व जाणतात.
भास्कर - मोदीजींना ओबीसी आरक्षण वाढवायला लागणार. सामाजिक न्याय मेरिटपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, असं म्हणणार मोदीजी त्या वेळी.
अच्युत - मोदीजी मेरिटचे महत्त्व जाणतात! मोदीजींनी ओबीसी आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव आणला तर मी स्वतः आंदोलन करणार आहे.
अविनाश - तुला खलिस्तानी लोकांनी पैसे दिले आहेत का? खलिस्तानी कुठला.
समर - (हसत) आणि कम्युनिस्ट!
भास्कर - आपले तत्त्ववादी मोदीजी मेरिटचं महत्त्व जाणतात, तसंच मतांचंसुद्धा महत्त्व जाणतात अच्युत! काही शेतकऱ्यांची मतं गेली आहेत ती भरून काढावी लागणार. सत्ता नसेल तर भारताची प्रगती कशी होणार? भारत महासत्ता आणि विश्वगुरू कसा बनणार?
भास्कर - आता एकच चॉइस आहे - ओबीसी आरक्षण वाढवायचं की, समान नागरी कायदा आणायचा?
(त्या काळात हिंदू-मुस्लीम आणि इतर धर्मीयांसाठी वेगवेगळे नागरी कायदे होते. मुसलमानांसाठीच्या विवाहासंदर्भातील कायद्यात एका पुरुषाला चार बायका करण्याचा अधिकार होता. त्यामुळे मुसलमान लोकांची संख्या हिंदूंपेक्षा अधिक होईल, अशी भीती मोदीभक्तांना दाखवण्यात येत होती. ही भीती कशी खोटी आहे, यावर शिरोजीने एक प्रकरण लिहिले आहे. ते आम्ही लवकरच प्रकाशित करणार आहोत. - संपादक.)
अच्युत - मोदीजींनी समान नागरी कायदा आणला नाही तर लोकसभेला माझे मत मोदीजींना नाही.
भास्कर - आणि मोदीजींनी ओबीसी आरक्षण वाढवले आणि समान नागरी कायदासुद्धा आणला तर काय करशील?
अच्युत - तर मग आंदोलन! मेरिट म्हणजे मेरिट!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नाना – अरे, आपण मोदीजींच्या पाठीमागे कुठल्याही परिस्थितीत उभं राहिलं पाहिजे. राजकारण फार गहन असतं.
अच्युत - नाना राजकारण गहन असेल, पण आम्ही फार सोप्या पद्धतीनं मतं देतो. शेतकऱ्यांना खलिस्तानीही म्हणायचं, निवडणुका आल्या की, सगळी तत्त्व सोडून त्यांची माफीही मागायची, आणि परत वर मोदीजींनी देशहितासाठी काय मास्टरस्ट्रोक मारलाय असं म्हणून आमच्याकडून टाळ्याही वाजवून घ्यायच्या - असला प्रकार आता चालणार नाही.
यावर नाना फार अस्वस्थ झाले. अविनाशने त्यांच्यासाठी अजून एक दूध सांगितले. समोरचे वाण्याचे दुकान उघडले होते. नानांच्या दुधात टाकायला केशर हवेच म्हणून केशराची डबी आणायला अविनाश घाईघाईने गेला. नाना आपल्या टकलावरचा घाम स्वच्छ पांढऱ्या रुमालाने पुसत राहिले.
..................................................................................................................................................................
शिरोजीने आपल्या बखरीच्या सातव्या प्रकरणाचा शेवट असा अमेझिंग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सत्ता कब्जात ठेवण्याचे मॉडेल महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्याच्या भाजपच्या आय टी सेलच्या क्षमतेवर अवलंबून होते. कुठलाही प्रश्न विचारला गेला की, भाजपचा आय टी सेल विलक्षण कसबाने त्या प्रश्नाबाबत गोंधळ माजवून त्या प्रश्नाला तडीपार करण्यात यशस्वी होत असे. शेतकरी आंदोलन हे पहिलेच असे प्रकरण होते की, ज्यात प्रश्नाला बगल देण्यात मोदी सरकार यशस्वी झाले नाही. एवढेच नव्हे तर या प्रकरणामुळे अनेक भक्त प्रश्न विचारू लागले.
थोडक्यात सांगायचे तर हे लोक आता खोट्या आदर्शांच्या गुंगीतून बाहेर येऊ लागले होते. त्यांच्या पायाला सत्याची खडबडीत जमीन लागू लागली होती. ही डेव्हलपमेंट मोदीजींना महागात पडणार होती. ही डेव्हलपमेंट पुढे मोदीजींना कधी आणि कशी महागात पडली, हे आम्हाला या क्षणी सांगता येत असले, तरी वाचकाचे कुतुहल टिकून राहावे म्हणून आम्ही ती सांगू इच्छित नाही. -
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment