डिसेंबरचा उत्तरार्ध हा केवळ ख्रिस्ती मंडळींचा वा युरपिय मंडळींचा नव्हे, तर जगभरात अनेक देश, धर्म नि वंशांच्या सणांचा काळ आहे (पूर्वार्ध)
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मंदार काळे
  • ‘दॅट टाइम ऑफ इयर’ या गाण्यातील एक प्रसंग
  • Sat , 25 December 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र दॅट टाइम ऑफ इयर That Time Of The Year ओलाफ्स फ्रोझन अडवेंचर Olaf's Frozen Adventure सेंट ल्युसिआ डे Saint Lucy's Day सॅटर्नेलिआ Saturnalia यूल Yule होनेका Hanukkah डॉंग-झी Dongzhi शब-ए-याल्दा Yaldā Night टोजी Toji डोंगजी Dongji

बॉलिवुड चित्रपटांच्या बहुसंख्य प्रेमींना चित्रपट म्हटले की ‘कुणाचा चित्रपट?’ असा प्रश्न विचारण्याची सवय आहे. कारण चित्रपट हे हीरो अथवा हीरोईन म्हणून निवडलेल्या नट अथवा नटीच्या चाहत्यांच्या अंधप्रेमावरच अधिक चालतात. चित्रपटाचा हीरो शाहरुख खान आहे, संजय दत्त आहे किंवा कतरिना कैफ हीरोईन आहे म्हणून अधिक काही न विचार करता डोळे मिटून तिकीट काढणारे चाहते, या चित्रपटसृष्टीचे आधार आहेत. टॉलिवुड म्हणून ओळखल्या जाणार्‍या तमिळ चित्रपटसृष्टीत तर या अभिनेत्यांची देवळे, फॅन-क्लब वगैरेपर्यंत प्रगती (?) झालेली आहे. हॉलिवुडची स्थितीही फार वेगळी आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे चित्रपटाबद्दल बोलताना तो अभिनेता वा अभिनेत्री आणि त्याची/तिची भूमिका/पात्र हेच केंद्रस्थानी राहते. पण अनेकदा असे होते की, चित्रपटाच्या पटकथेमध्ये दुय्यम असलेले पात्र साकारणारा एखादा तारकांकित नसलेला अभिनेता वा अभिनेत्री त्यात असा रंग भरते की, मुख्य पात्र नि ते साकारणार्‍या तारकांपेक्षा प्रेक्षकांच्या मनात तेच अधिक रुजते. मग यातून कुणी नवाजुद्दिन सिद्दिकी, कुणी संजय मिश्रा उदयाला येतो. त्याची स्वत:ची अशी ओळख निर्माण करतो.

या ‘हॉली-बॉली’ परंपरेमध्ये गाजलेल्या चित्रपटांचे पुढचे भाग (Sequel) म्हणून नवा चित्रपट निर्माण करण्याला मोठी परंपरा आहे. त्याचप्रमाणे जुन्या गाजलेल्या चित्रपटांचा नवा अवतार (Redux) समोर आणण्यालाही. पण एखाद्या गाजलेल्या दुय्यम पात्राची कथा वेगळी काढून नवा चित्रपट - ज्याला spin-off म्हटले जाते - निर्माण करण्याची परंपरा नाही. परंतु चलच्चित्रांच्या (Animation) क्षेत्रात हे अनेकदा घडलेले आहे. इथे अभिनेते नसल्याने प्रभावशाली दुय्यम पात्रालाच स्वतंत्र ओळख देऊन नवा चित्रपट, नवी मालिका निर्माण केली जाताना दिसते. वॉर्नर ब्रदर्सनी ससा-कासवाच्या पारंपरिक गोष्टींच्या आधारे दोन-तीन चलच्चित्र लघुपट सादर केले. त्यात सीसल नावाचे एक कासव बग्स नावाच्या सशाला कशा प्रकारे मात देते, याच्या कथा रंगवल्या होत्या. पण प्रेक्षकांना सीसलपेक्षा बग्स नावाचा तो ससाच अधिक पसंत पडला. मग वॉर्नर ब्रदर्सनी सीसलसाठी योजलेला सारा धूर्तपणा नि चलाखपणा बग्सलाच देऊन टाकला आणि सीसलला बाद करून टाकले. १९३८मध्ये जन्मलेला हा ससा आज ८० वर्षांहून अधिक काळ चलच्चित्रप्रेमींचे मनोरंजन करतो आहे. पुढे बग्सच्या मालिकेत छाप पाडून गेलेल्या डॅफी या चिडक्या बदकालाही स्वतंत्र लघुपट आणि चित्रपट देण्यात आले. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गने स्थापन केलेल्या ‘ड्रीमवर्क्स अ‍ॅनिमेशन’च्या ‘मादागास्कर’ (२००५) या चित्रपटाची कथा अलेक्स हा प्राणिसंग्रहालयातील सिंह आणि त्याचे मित्र असलेले प्राणी यांच्याभोवती फिरते. पण गंमत अशी झाली की, यातील किंग ज्युलियन हा लेमर (Lemur) आणि चार पेंग्विन ही कथेमधील दुय्यम पात्रेच प्रेक्षकांना अधिक भावली. यांना केंद्रस्थानी ठेवून पुढे ‘पेंग्विन्स ऑफ मादागास्कर’ (Penguins of Madagascar) आणि ‘ऑल हेल किंग ज्युलियन’ (All Hail King Julien) अशा चलच्चित्रमालिका तयार झाल्या नि लोकप्रिय झाल्या. किंग ज्युलियनबाबत तर असे सांगितले जाते की, चित्रपटात जेमतेम दोन वाक्ये असलेले हे अति-दुय्यम पात्र होते. परंतु त्याला आवाज देण्यासाठी बोलावलेल्या साचा बॅरन कोह्न याने मुलाखतीदरम्यान त्या आपल्या मनाने काही भर घातली. निर्मात्यांना हा बदल आवडला आणि त्यांनी पटकथेमध्ये बदल करून ज्युलियनला अधिक वाव दिला. पुढे ज्युलियनने आणखी धुमाकूळ घातला नि पाच-सहा सीझन्सची एक सीरीजच पदरी पाडून घेतली. मूळ चित्रपटात अधिक वाव असलेल्या अलेक्स सिंह, मार्टी झेब्रा, मेलमन जिराफ यांना हे भाग्य लाभले नाही.

२०१३मध्ये आलेल्या डिस्ने स्टुडिओज्च्या ‘फ्रोझन’ (Frozen) या चित्रपटामधील ओलाफ हा हिमबुटकादेखील त्यातील एल्सा आणि अ‍ॅना या दोघी बहिणींपेक्षा जास्त भाव खाऊन गेला. त्याला केंद्रस्थानी ठेवून ‘वन्स अपॉन अ स्नो-मॅन’ (Once Upon a Snowman) आणि ‘ओलाफ्स फ्रोझन अडवेंचर’ (Olaf's Frozen Adventure) हे लघुपटही करण्यात आले आहेत. मागील वर्षी ‘ओलाफ फ्रॉम होम’ (At Home with Olaf) नावाची अतिलघुपटांची मालिका यू-ट्यूबवर सादर करण्यात आली. करोना निर्बंधांमुळे घरीच राहावे लागलेले तंत्रज्ञ आपापल्या वाट्याचे काम घरूनच पुरे करून ते संकलित करून हे अतिलघुपट सादर करत. 

‘ओलाफ्स फ्रोझन अड्वेंचर’ या लघुपटातील हे एक गाणे. त्याचे शीर्षक आहे- ‘दॅट टाइम ऑफ इयर’.

सुरुवातीला हे एक ख्रिसमसचे गाणे (carol) आहे असे वाटले होते. पण दुसर्‍यांदा पाहिले/ऐकले, तेव्हा हे प्रकरण फारच वेगळं आहे असं लक्षात आलं. ‘अ‍ॅलिस इन वंडरलॅंड’मधील अ‍ॅलिस जशी सशाच्या बिळात डोकावण्याच्या प्रयत्नात खोल खोल भिरभिरत जाते तसे झाले. एका सशाचा पाठलाग करता-करता एक सर्वस्वी नवे जगच तिच्यासमोर येते. परंपरांच्या शोधात ओलाफच्या मागे-मागे हिंडताना अगदी त्याच प्रकारचा एक अनुभव माझ्याही पदरी जमा झाला.

या गाण्यातल्या ओलाफला आरंडेल राज्यातील दोन राजकन्यांसाठी नवी परंपरा हवी आहे. ती शोधण्यासाठी- खरं तर जुन्यांतून वेचण्यासाठी, तो घरोघरी जातो आहे. प्रत्येकाला त्यांच्या परंपरेबाबत विचारतो आहे. तो स्वत: ‘अजन्मा’ असल्याने कुठल्याही परंपरेचा वारसा त्याला मिळालेला नाही. त्याला स्वत:ला अशी एखादी वारस-परंपरा मिळाली असती, तर तीच कशी श्रेष्ठ आहे, हे त्याने त्या दोघींना लगेचच पटवून दिले असते, अशी शक्यता बरीच आहे. पण असे म्हणताना माणसाच्या वृत्तीचा आरोप मी एका सरळमार्गी हिमबुटक्यावर करतो आहे. हा कदाचित त्याच्यावर अन्यायही असेल. पण ते असो, मुद्दा आहे तो परंपरांचा.

आता हिवाळा म्हणजे ख्रिसमस आणि ख्रिसमस म्हणजे हिवाळा हे समीकरण इतके सार्वत्रिक आहे, की ‘चार घरी जाऊन तुमची परंपरा कोणती याची विचारपूस करत बसण्याची गरज काय?’ असा प्रश्न पडेल. ख्रिसमस म्हणजे चर्चमधील प्रार्थना, दारावरचे हिरवे चक्र, ख्रिस्तजन्माची गाणी आणि नाटुकली, सांता-क्लॉजने (?) आणलेल्या भेटवस्तू आणि कुटुंबासोबत चविष्ट जेवण... झाले की! पण खरंच असे असते का, सगळीकडे ख्रिसमसही नेमका असाच साजरा करतात का, करू शकतात का?

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

सण एकच असला तरी तो साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये भौगोलिक, सामाजिक, कौटुंबिक पातळीवर फरक पडू शकतो का? उदाहरणच द्यायचे झाले तर बव्हंशी हिम आणि हिवाळ्याशी निगडित असलेला ख्रिसमस, ज्या भूभागावर डिसेंबरमध्ये चक्क उन्हाळा असतो, निदान हिमवर्षाव होतच नसतो, अशा ठिकाणी कसा साजरा करतात? ज्या देशांत ख्रिसमस ट्री रुजवताच येत नाही, अशा देशांतील ख्रिश्चन त्याऐवजी काय करतात? आणि त्यांनी निवडलेला पर्याय हीच त्यांची परंपरा होऊन जाते का? आणि या पर्यायांची निवड नक्की कशी होते? ...असे प्रश्न चौकस मनाला पडायला हवेत, मलाही पडले होते. ओलाफच्या पाठोपाठ फिरताना या प्रश्नांची उत्तरे सापडत गेली...

मुळात हिवाळा म्हणजे २५ डिसेंबर किंवा डिसेंबरचा (वर्षाचा शेवटचा) महिना म्हणजे ख्रिसमस हे अनन्य समीकरण चुकीचे आहे. ख्रिश्चनधर्मीय आणि त्यातही अमेरिकन मंडळींच्या प्रभावाखाली असलेल्या माध्यमांनी तसा आभास निर्माण केला आहे इतकेच. ख्रिसमस हा डिसेंबरचा एकमेव सण तर नाहीच, पण तो पहिलाही नाही. सेंट ल्युसीच्या स्मरणार्थ स्कॅंडिनेविअन म्हणजे उत्तर गोलार्धातील अत्युत्तरी भागातील देशांत साजरा केला जाणारा सेंट ल्युसिआ डे, रोमन परंपरांमधील सॅटर्नेलिआ, बहुदेवतापूजक (Pagan) धर्मांतील यूल, ज्यू धर्मियांचा होनेका, या पाश्चात्य जगातील सणांसोबतच चीन आणि जपानमधील डॉंग-झी, इराणमधील शब-ए-याल्दा, जपानमधील टोजी, द.कोरियामध्ये बावीस-तेवीस डिसेंबरला साजरा होणारा ‘धाकटा नव-वर्षदिन’ म्हणजे डोंगजी (ही चिनी ‘डॉंग-झी’चीच आवृत्ती) हे आशियाई, बिगर-ख्रिस्ती अथवा बिगर-बिब्लिकल४ सण याच सुमारास साजरे केले जातात.

त्याचबरोबर चित्रपटांतून वा अमेरिकाधार्जिण्या माध्यमांतून दिसणार्‍या ख्रिसमसहून वेगळ्या अशा काही परंपराही विविध ठिकाणी दिसतात. विशिष्ट ऐतिहासिक स्थानांशी निगडित असलेले इंग्लंडमधील स्टोनहेन्ज गॅदरिंग, आयर्लंडमधील न्यूग्रन्ज गॅदरिंग, इंग्लंडमधील ब्रायटन शहरातील ‘बर्न द क्लॉक फेस्टिवल’, कॅनडामधील व्हॅंकुव्हर इथे भरणारा ‘लॅंटर्न फेस्टिवल’, ग्वाटेमालामधील कॅथलिक सेंट थॉमसच्या स्मरणार्थ भरणारा ‘सांतो तोमास फेस्टिवल’ ही अशी काही उदाहरणे.

थोडक्यात डिसेंबरचा उत्तरार्ध हा केवळ ख्रिस्ती मंडळींचा वा युरपिय मंडळींचा नव्हे, तर जगभरात अनेक देश, धर्म नि वंशांच्या सणाचा काळ आहे. कदाचित म्हणूनच ओलाफने गाण्याची सुरुवात मेरी ख्रिसमस म्हणून न करता हॅपी हॉलि(डेज) आणि सीझन्स ग्रीटिंग्सने केली आहे. 

एकाच महिन्यात- खरे तर पंधरवड्यात जगभरात सगळीकडेच हे महत्त्वाचे उत्सव साजरे होण्यामागचे कारण काय असावे? अतिप्राचीन काळात माणसाने सुरू केलेल्या उत्सवांच्या, चालीरीतींच्या वाटा पुढे वेगळ्या झाल्या असाव्यात का? बिब्लिकल म्हटल्या जाणार्‍या धर्मांच्या काही चालीरीतींमध्ये साम्य असते हे समजण्याजोगे आहे. त्यांच्या समान वारशामधून आलेले सण वा उत्सव हे थोड्या फार फरकाने सारखेच असणार. पण जगाच्या कानाकोपर्‍यात, विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये, विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीवर, साधारण एकाच काळात इतके उत्सव साजरे होणे हा योगायोग नसावा. 

थोडा मागोवा घेताच असे लक्षात आले की, मूळ शिशिर-संपात (winter solstice) भोवती हे सारे उत्सव बांधले गेले आहेत. कर्कवृत्ताच्या उत्तरेस जसेजसे वर जावे तसातसा हिवाळा अधिक तीव्र होत जातो. त्यामुळे त्या भागातील देशांमध्ये सर्वांत मोठी रात्र संपून नव्या दिवसाची सुरुवात ही सूर्याच्या आगमनाची सुरुवात (advent) म्हणून साजरी केली जाते. इथून दिवस मोठा होत जातो नि रात्र लहान. आणि म्हणून या भूभागातील लोकांच्या दृष्टीने पुढील सहा महिने मागील सहामाहीपेक्षा अधिक सुखकारक असतात.

परंतु जगभरात ग्रेगोरियन दिनदर्शिका (Calendar) आधारभूत म्हणून स्वीकारण्यापूर्वी विविध दिनदर्शिका प्रचलित होत्या. त्या अर्थातच त्या-त्या देशाच्या भूगोलावरून दिसणार्‍या तारामंडळ स्थितीच्या आधारे आखलेल्या होत्या. आणि म्हणून शिशिर-संपाताचा दिवस प्रत्येक दिनदर्शिकेनुसार वेगळा होता. उदाहरणार्थ १३ डिसेंबरला अतिउत्तरेकडील स्कॅंडिनेविअन देश नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंड या देशातील स्वीडिश लोक साजरा करत असलेला साजरा करत असलेला ‘सेंट ल्युसिआ डे’ हा पूर्वीच्या दिनदर्शिकेनुसार येणारा शिशिर-संपाताचा दिवस आहे. ख्रिसमस-उत्सव पूर्वी पहिला रोमन सम्राट जुलिअस सीझरने प्रसारित केलेल्या जुलिअन दिनदर्शिकेनुसार साजरा होत असे, नि त्यानुसार शिशिर-संपात २५ डिसेंबरला येत असे. आज जगभरात ग्रेगोरियन दिनदर्शिका आधारभूत म्हणून स्वीकारल्यावर हा दिवस २१ डिसेंबरला येतो. परंतु ख्रिसमस नि २५ डिसेंबर हे नाते न तोडता नव्या दिनदर्शिकेनुसारही तो २५ तारखेलाच साजरा केला जातो. ग्रेगोरियन कॅलेंडरच्या स्वीकारानंतर आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रसारानंतर बहुतेक ठिकाणी शिशिर-संपाताशी निगडित उत्सव ख्रिस्तजन्माच्या म्हणजे ख्रिसमसच्या सोबत साजरा जाऊ लागला आणि ख्रिसमस-उत्सवाचे शिशिर-संपाताशी नाते तुटले.

काही ठिकाणी हा नवा उत्सव जुन्या उत्सवदिनांपासून सुरु होऊन २५ डिसेंबरपर्यंत चालतो, तर काही ठिकाणी २५ डिसेंबरला सुरु होऊन जुन्या उत्सवदिनांपर्यंत चालतो. इंग्लंडमधील कॉर्नवॉल येथे २००७ पासून साजरा होणारा मॉटोल फेस्टिवल ही शिशिर-संपात उत्सवांच्या यादीतील सर्वांत अर्वाचीन भर आहे. स्थानिक कॉर्निश भाषेत मॉंटोल याचा अर्थच शिशिर-संपात असा आहे. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

स्वीडननॉर्वे आणि फिनलंडच्या स्विसभाषिक भागात १३ डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा सेंट ल्यूसिआ डे हा सेंट ल्युसी/ल्युसिआ हिच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्म त्यागून रोमन श्रद्धामूल्यांचा स्वीकार करण्यास नकार दिल्याबद्दल रोमन शासकांनी तिला जिवंत जाळले होते. असं म्हटलं जातं की प्रथम तिला वेश्यालयात विकण्याची शिक्षा फर्मावली होती. पण अनेक माणसे नि गाड्या तिला तसूभरही सरकवू शकल्या नाहीत. मग तिथेच तिच्याभोवती लाकडे पेटवून तिला जाळण्यात आले. आणि त्या घटनेच्या स्मरणार्थ १३ डिसेंबरला सार्वजनिक ठिकाणी मोठी शेकोटी पेटवून तिला मानवंदना दिली जाते.

पण सेंट ल्युसी ही स्कॅंडिनेवियन नव्हे. ती सिसिली, म्हणजे इटलीमधील होती. ही तिथून स्कॅंडिनेवियामध्ये कशी पोहोचली असावी असा प्रश्न पडेल. तिच्या नावाचा, म्हणजे ल्युसिआ (Lux, Lucis) याचा अर्थ नॉर्स भाषेतील अर्थ आहे ‘प्रकाश’. मूळ नॉर्स अथवा नॉर्डिक वंशीयांमध्ये शिशिर-संपाताचा (winter solstice) सण साजरा केला जात असे. त्या दरम्यान दुष्ट आत्म्यांना पळवून लावण्यासाठी आणि सूर्याला आपली दिशा बदलण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी मोठ्या शेकोट्या (bonfire) पेटवण्याची परंपरा होती. हा तपशील लक्षात घेतला मूळ नॉर्डिक सणालाच ख्रिस्ती कपडे चढवले आहेत हे लक्षात येते. मूळ बॉनफायरचा संदर्भ जोडण्यासाठी ही प्रकाशकन्या थेट इटलीतून आयात केली असावी. मूळ दिवसाचे महत्त्व कमी होऊ नये म्हणून १३ डिसेंबर ते २५ डिसेंबर, असा १३ दिवस ख्रिसमस-उत्सव (Christmastide) साजरा करत दोन्हींची सांगड घातली आहे. आणि या दरम्यान मूळ उत्सवातील अनेक परंपराही कायम राखल्या आहेत.

या उत्सवादरम्यान प्रत्येक गावात एक मुलगी सेंट ल्युसी म्हणून निवडली जाते. सेंट ल्युसिआला मानवंदना देण्यासाठी तिच्या नेतृत्वाखाली पांढर्‍या पायघोळ वस्त्रातील मुलींची मिरवणूक काढली केली आहे. या मिरवणुकीत या मुली पानाफुलांचे हिरवे चक्र शिरोभूषण म्हणून धारण करतात नि त्यात मेणबत्त्या खोवून सर्वत्र प्रकाशाची रुजवणूक करत जातात. (काही ठिकाणी व्हर्जिन मेरी अथवा मारियाच्या सन्मानार्थ काढल्या जाणार्‍या मिरवणुकीसाठी अशाच तर्हेने तरुण मुलीची निवड केली जाते.) प्रत्येक घरातीलही (शक्यतो) मोठ्या मुलीला ल्युसिआच्या रूपात सजवले जाते. या उत्सवा-दरम्यान कॉफी, जिंजर-बिस्किट्स आणि Lussekatter नावाचा बन अथवा पाव देऊन पाहुण्यांची, मित्रमंडळींची, आप्तांची सरबराई केली जाते. या सार्‍याच परंपरा मूळ नॉर्डिक उत्सवातील आहेत.

कॅलिफोर्नियातील स्पॅनिश मिशनर्‍यांनी बांधलेली चर्चेस भौमितिक कौशल्याचा वापर करुन अशा तर्हेने बांधली आहेत की शिशिर-संपाताच्या- म्हणजे २१ डिसेंबरच्या दिवशी सूर्यकिरणे नेमकी चर्चमधील अल्टारवर पडून त्याला आणि त्यावरील पवित्र वस्तू उजळून टाकतील. यातून ख्रिस्त हा सूर्यपुत्र असल्याचे स्थानिक सूर्यपूजक इंडियन जमातींच्या मनावर ठठसवून त्यांना ख्रिस्ती धर्माकडे वळवणे सोपे झाले. स्थानिक इंडियन आणि ख्रिस्ती अशा दोनही परंपरांचा वारसा सांगणारा हा प्रकाशोत्सव (Illuminations) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून साजरा होतो आहे.

ग्वाटेमालामधील ‘चिची’ या शहरात २१ डिसेंबरलाच साजरा होणारा सांतो तोमास फेस्टिवलही असाच ख्रिस्ती आणि स्थानिक मायन संस्कृतींचा मिलाफ घडवणारा असतो. एरवी कॅथलिक चर्चेस सेंट थॉमस डे ३ जुलै रोजी साजरा करतात. परंतु इथे मात्र तो शिशिर-संपाताच्या दिवशी साजरा होतो. याचे कारण स्थानिक मायन संस्कृतीमध्ये त्या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे. दक्षिण गोलार्धातील पेरू देशामध्ये जूनमध्ये शिशिर-संपाताच्या दिवशी इन्ती उत्सव (Inti Raymi) साजरा केला जातो. इन्का लोकांच्या प्राचीन केचवा (Quechua) भाषेत इन्ती म्हणजे सूर्य. यूल अथवा यूलटाईड हा प्राचीन उत्तर-युरोपियन जर्मंनिक (Germanic) जमाती शिशिर-संपाताच्या वेळी त्यांच्या ओडिन (Odin) या देवाच्या सन्मानार्थ साजरा करत असत. ओंडक्याची शेकोटी (स्कॅंडिनेविअन bonfireचा अवतार), रानडुकराची शिकार (Asterix या प्रसिद्ध फ्रेंच चित्रकथामालिकेतील एक प्रमुख पात्र असलेला दांडगोबा Obelix हा रानडुकराची शिकार करण्यात निष्णात असतो. त्याचा संदर्भ हा असावा.), बोकडाच्या मांसाचे सेवन, नाच-गाणे असा हा कार्यक्रम बारा दिवस चाले. स्कॅंडिनेविअन देशातील ‘सेंट ल्युसिआ डे’पूर्व पेगन उत्सव हाच असावा, वा यापासून प्रेरणा घेतलेला असावा.

इराणी उत्सव शब-ए-याल्दा याचे मूळ नाव शब-ए-चेल्ले. चेल्ले याचा अर्थ चाळीस. ज्याप्रमाणे बहुतेक ठिकाणी तीस दिवसांना महिना मोजला जातो, त्याप्रमाणे पर्शियामध्ये हिवाळा हा तीन चालीसांचा काळ मानला जातो. पहिला चालीसा चाळीस दिवसांचा, म्हणून मोठा चेल्ले आणि दुसरा ‘छोटा चेल्ले’ हा वीस दिवसांचा (त्याचे वीस दिवस नि वीस रात्री मिळून चाळीस!) तिसरा उन्हाळ्याला जोडलेला असतो. यातील मोठ्या चेल्लेचा पहिला दिवस, खरेतर रात्र (शब) म्हणजे शब-ए-चेल्ले. डिसेंबरचा २०-२१ तारखेला हा उत्सव साजरा होतो. पुढे सीरियन ख्रिश्चन निर्वासितांना पर्शियाने आश्रय दिल्यानंतर त्यांनी आपला ख्रिसमस तिथे साजरा करायला सुरुवात केली. सीरियन भाषेत याल्दा म्हणजे जन्म. अगदी सुरुवातीच्या काळात ख्रिसमसदेखील ’Birth of the Invincible Sun’ किंवा अजेय सूर्याचा जन्मदिन म्हणून साजरा होत असे. ख्रिस्ती मंडळींनी दिलेला हा शब्द स्थानिक बिगर-ख्रिस्ती उत्सवात स्वीकारला गेला आणि शब-ए-चेल्ले हा शब-ए-याल्दा म्हणूनही ओळखला जाऊ लागला.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

रोमन भाषेत Dies Natalis Solis Invicti (’Birth of the Invincible Sun’) किंवा Sol Invictus हा रोमन साम्राज्याच्या उत्तरकाळात साजरा होणारा महोत्सव. सॉल (Sol) म्हणजे सूर्याचा हा उत्सव नंतर ख्रिस्ती परंपरेमध्येही स्वीकारला गेला. काही अभ्यासकांच्या मते हाच पुढे ख्रिसमसमध्ये रूपांतरित झाला. हा रोमन उत्सव तेथील मित्राईझम (Mithraism) या पंथाच्या मित्र या देवाच्या उत्सवाचा अवतार आहे, असाही एक दावा केला जातो. मित्राईझममध्ये मित्र म्हणजे सूर्य नव्हे तर सूर्याचा एक साहाय्यक, असा उल्लेख आहे. आता मित्र म्हणजे सूर्य हा पारसिकांचाही देव. त्यामुळे त्याचा संबंध कदाचित पुन्हा शब-ए-चेल्लेशी असू शकतो. पारसिकांकडून बरेच शब्द संस्कृतमध्ये आले त्यात मित्र म्हणजे सूर्य हा ही एक. (अलीकडे सगळे इकडूनच तिकडे गेले असे समजण्याचा प्रघात आहे. ही सांस्कृतिक एक्स्प्रेस ‘अप’ आहे की ‘डाऊन’ हा मूल्यमापनाचा भाग सोडून देऊन आपण फक्त साम्य नोंदवून थांबू.) तेव्हा आता याचा संबंध भारतापर्यंतही येऊन पोहोचतो. 

वर म्हटल्याप्रमाणे जुलिअस सीझरने प्रचलित केलेल्या जुलिअन कॅलेंडरनुसार हा शिशिर-संपाताचा दिवस २५ डिसेंबरला येत असे. त्यामुळे सॉल इन्व्हिक्टस त्या दिवशी साजरा केला जात असे. रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर आणि ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर याच उत्सवाला ख्रिसमसचे रूप दिले गेले. त्याचा संबंध ख्रिस्तजन्माशी नंतर जोडला गेला. कारण सुरुवातीच्या काळात जन्मदिवस साजरा करणे ही पेगन (Pagan) म्हणजे जुन्या बहुदेवतापूजक धर्मीयांची परंपरा ख्रिश्चन धर्मीय पाळत नसत. त्यामुळे ख्रिस्तजन्माचा दिवस ही संकल्पना बरीच नंतर, म्हणजे पोप जुलियसच्या काळात समाविष्ट झाली.

वर उल्लेख केलेले  बहुतेक सारे उत्सव- विशेषत: ख्रिसमसपूर्व उत्सव, सूर्यभ्रमणाखेरीज कृषी हंगामाशीही जोडलेले आहेत. हंगामाच्या अखेरीस धनधान्याची रेलचेल असणार्‍या काळात हे साजरे केले जातात. आपल्याकडे दीपावलीचा उत्सव हा ही खरीपाच्या कापणीनंतर साजरा केला जातो. विशेष म्हणजे तो ही पुन्हा प्रकाशाचाच उत्सव आहे. वर उल्लेखलेल्या इतर उत्सवांमध्ये आणि दिवाळीचा काळ यांच्यात साधारण सहा ते आठ आठवड्यांचा फरक पडतो. इतर सर्व देशांच्या तुलनेत भारत बराच दक्षिणेकडे आहे, हे लक्षात घेता भारतामध्ये हा उत्सवही अलिकडे येत असावा. पूर्वी कदाचित या उत्सवालाही सूर्यभ्रमणाचा संदर्भ असेलही. कालांतराने ख्रिश्चन राष्ट्रात ज्याप्रमाणे त्याला धार्मिक संदर्भ चिकटवले गेले, तसेच भारतात त्याला पौराणिक, धार्मिक संदर्भ दिले गेले असावेत.

प्राचीन काळी रोमन दिनदर्शिकेनुसार १७ डिसेंबरला सॅटर्नेलिआ (Saturnalia) हा सण साजरा केला जात असे. निर्मितीचा, संपत्तीचा, शेतीचा, पुनरुत्थानाचा आणि स्वातंत्र्याचा रोमन देव सॅटर्न याच्या सन्मानार्थ त्या दिवशी उत्सव साजरा होई. याचा संबंधही शिशिर-संपाताशी जोडलेला आहे. हा साधारण आपल्या दिवाळीसारखा शेती हंगामाच्या शेवटी साजरा केला जात असे. या दिवशी नाच, गाणे, खाणे-पिणे यांची रेलचेल असे. आप्तांना भेटवस्तू (presents) दिल्या जात. या काळात सर्व कामांना संपूर्ण सुटी दिलेली असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी गुलाम हे ‘तात्पुरते स्वतंत्र’ होऊन या उत्सवात मालकांच्या बरोबरीने सहभागी होऊ शकत असत. हा सण निर्मितीशी संबंधित असल्याने लोक मेणापासून मेणबत्त्या, अनेक- विशेषत: फळांच्या, प्रतिकृतीही तयार करत आणि एकमेकांना भेट देत. पुढे ख्रिश्चन धर्माच्या आणि ख्रिसमसच्या आगमनानंतर हा उत्सव प्रथम तीन दिवस आणि नंतर सात दिवसांपर्यंत वाढवून ख्रिसमसला जोडून देण्यात आला. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

Saturn या ग्रहाचा आपल्याकडे उल्लेख शनि म्हणून केला जात असला, तरी हा रोमन देव सॅटर्न हा आपल्याकडील शनिप्रमाणे उपद्रवी नाही. उलट तो अनेकगुणी देव मानला जातो. (ज्युपिटर, नेपच्यून, प्लुटो ही त्याची मुले. यांनाही सूर्याच्या ग्रहमंडळात स्थान मिळाले आहे.) हा निर्मितीचा, संपत्तीचा, शेतीचा, पुनरुत्थानाचा आणि स्वातंत्र्याचा देव मानला जातो. इ.स. पूर्व तिसर्‍या शतकात कार्थेज (सध्या ट्युनिशियामधील एक शहर) राज्यातील ग्रीक शासकांकडून रोमन लोकांना मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सॅटर्नेलिआमध्ये ग्रीक पद्धतीची काही कर्मकांडे समाविष्ट केली गेली. देवतांना बळी देणे, सामूहिक भोजनादी गोष्टी तेव्हा सुरू झाल्या. याशिवाय परस्परांना भेटल्यावर Io Saturnalia (आयो सॅटर्नेलिया) म्हणून अभिष्टचिंतन करणे हा नवा प्रघात सुरू झाला. Merry Christmas म्हणत ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्याची कल्पना इथूनच आलेली आहे. अर्वाचीन ख्रिसमसवर सर्वाधिक प्रभाव असलेला हा प्राचीन सण मानला जातो. Saturn हा रोमन देव हा पुन्हा मूळचा ग्रीक देव क्रोनस याची आवृत्ती आहे. क्रोनसचे स्थानिक पौराणिक व्यवस्थेतले स्थान आणि बरीचशी वैशिष्ट्ये सॅटर्नलाही देण्यात आली आहेत. जुलैमध्ये साधारणपणे वसंत-संपाताच्या सुमारास साजरा केला जाणार्‍या क्रोनिया या उत्सवाचेच सॅटर्नेलिया हे प्रतिरूप आहे. म्हणजे क्रोनियाचा प्रभाव सॅटर्नेलिआवर आणि त्याचा पुन्हा ख्रिसमसवर अशी ही साखळी आहे. 

..................................................................................................................................................................

टीपा

१. उत्तर युरपमधील जर्मंनिक (Germanic) जमाती साजरा करत असलेला शिशिर-संपातोत्सव. युरपमधील बर्‍याच ख्रिसमस परंपरा या सणाकडून वारशाने आल्या आहेत असे मानले जाते.

२. ग्रीक, रोमन अधिपत्याखालील प्रदेशातील बहुदेवतापूजक (पेगन) धर्मियांचा संपातोत्सव. मूळ दिनदर्शिकेनुसार हा २५ डिसेंबरला साजरा होत असे. नव्या ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार शिशिर-संपात २१ डिसेंबरला येत असला तरी उत्सवाचा दिवस २५ डिसेंबर हाच राखला आहे. थोडक्यात आता हा उत्सव संपात-दिनानंतर चार दिवस उशीराने साजरा होतो.
३. म्यूल-टाईड या शब्दाचे एकाहुन अधिक अर्थ दिसतात. यात बॅरल्सचा उल्लेख येत असल्याने याचा संबंध मद्याशी, निदान पेयसाठवणुकीच्या पिंपांशी येतो. काही ठिकाणी म्यूल-टाईड नावाच्या ‘कॉकटेल’ म्हणजे मिश्र-पेयाचा उल्लेख दिसतो. परंतु असे पेय प्रत्यक्ष सेवनाच्या वेळीच तयार केले जाते, साठवून ठेवले जात नाही. कदाचित त्यासाठी आवश्यक असणारे द्रव्य असा या म्यूल-टाईडचा अर्थ असावा. या कॉकटेलची कृती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असली त्यात लाईम म्हणजे लिंबू आणि जिंजर म्हणजे आले यांचे रस हा सामायिक भाग दिसतो. 

४. बिब्लिकल धर्म = बायबलचा जुना करार श्रद्धेय मानणारे धर्म: ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्युडाइझम.

५. केलन्ड (kalend) म्हणजे प्रत्येक रोमन महिन्याचा पहिला दिवस. त्यावरून वार्षिक दिनदर्शिकेला कॅलेन्डर म्हटले जाऊ लागले.

..................................................................................................................................................................

लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख