अजूनकाही
मध्यंतरी भारतातील एका प्रख्यात(!) दूरचित्रवाणी निवेदकाला त्याच्या विमान प्रवासात एका विनोदवीरानं डिवचतानाचा प्रसंग इंटरनेटवर बराच गाजला होता. त्याच विनोदवीरानं काही दिवसांनी परत याच निवेदकाच्या घरी जाऊन त्याला चपलांचा आहेर करण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही प्रसंग विनोदी होते. त्या निवेदकाच्या एकूणच कार्यप्रणालीवर भाष्य करणारे होते, यात शंकाच नाही. पण तरीही कुठे तरी ते बालिश होते व अपूर्ण होते. त्याचा पुढे पाठपुरावा झाल्याचं मात्र काही दिसलं नाही.
भारतात हल्ली इंटरनेटवर एकपात्री ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’चे कार्यक्रम बघायला मिळतात. त्यात बहुतांशी वेळा सातत्य नसतं, म्हणजे ते आठवडी, मासिक किंवा दररोज केले जात नाहीत. एक तर ते फार गंभीरपणे बघितले जात नसावेत किंवा त्यांची पोच एका विशिष्ट वर्गापर्यंत किंवा वयोगटापर्यंत असावी. तसंच हे कार्यक्रम बहुतांशी सत्ताधारी नेत्यांवर किंवा अतिशय प्रख्यात व्यक्तींवर गमतीत टीका करणारे असल्यानं त्याला फारसा भाव मिळत नसावा.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
त्यात इंटरनेटवर नसणाऱ्या सेन्सॉरशिपमुळे अशा कार्यक्रमातून वापरलेली भाषा ही असभ्यतेकडे झुकणारी अशी असल्यानं त्याला तरुण वर्गाशिवाय प्रेक्षक मिळत नसावा. किंबहुना थोडी असभ्य भाषा वापरली नाही, तर विनोदचं करता येत नाहीत, असाही समज या ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’वाल्या मंडळींचा झाला असावा. कारण कोणतंही असो, पण हा विनोदाचा प्रकार व त्यातून होणारं बातमीचं वा माहितीचं सत्य-दर्शन याला भारतात भरपूर वाव आहे.
पुलंनी कुठल्या तरी लेखात समर्थांच्या ‘टवाळा आवडे विनोद’ याचा अर्थ सांगितला होता. विनोद हा फक्त टवाळखोर लोकांनाच आवडतो किंवा सतत विनोद करणारे टवाळखोरच असतात, असा त्यांनी लिहिलं होतं. प्रत्येत विनोदात कोणाचा तरी बळी जातोच. गमतीनं लिहिलेल्या पुलंच्या या वाक्यातही विनोदाला किंवा विनोदी कलाकाराला थोडा कमी लेखण्याच्या समाजाच्या पद्धतीवर टोमणा असावा.
अमेरिकी दूरचित्रवाणी तसंच केबल चॅनेलला अशा कित्येक ‘टवाळां’नी समृद्ध केलं आहे. येथील दूरचित्रवाणी चॅनेल्सवर ‘Late Night shows’ची फार जुनी परंपरा लाभली आहे. या कार्यक्रमात कुठल्या तरी प्रख्यात नेते, अभिनेते, खेळाडू किंवा व्यावसायिकाची मुलाखत घेण्याचा कार्यक्रम असतो. पण त्याआधी या कार्यक्रमाचे सूत्रधार आपल्या खुमासदार शैलीत सद्यस्थितीवर - मग ती राजकीय असो व सामाजिक - एक व्यंगात्मक टिप्पणी करतात.
अशा कार्यक्रमांचे जनक म्हणून जॉनी कार्सन (१९२५-२००५) यांना ओळखले जातात. त्यांची मुलाखत घेण्याची शैली, त्यांचा नर्मविनोदी स्वभाव, त्यांचं लाघवी हास्य, तसंच विशेष अतिथींप्रती दाखवलेलं स्त्रीदाक्षिण्य, ही त्यांच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्यं असायची असं म्हणतात. त्यांनी घेतलेल्या अनेक मुलाखती यू-ट्यूबवर आजही बघावयास मिळतात. त्यांचा शो-मध्ये बोलावलं जाणं हासुद्धा सन्मानाचा भाग मानला जात असे. NBC या चॅनेलवर चालेल्या या कार्यक्रमाची धुरा त्यांच्यानंतर ज्ये लेनो या धुरंधरानं पुढे चालू ठेवली. अमेरिकी भांडवलशाहीच्या नियमाला अनुसरून इतरही चॅनेल्सनी ‘Late Night shows’ सुरू करून ही परंपरा सुरू ठेवली. याच परंपरेतलं CBS चॅनेलवरील डेविड लेटरमन हेसुद्धा एक अग्रगण्य नाव आहे.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
पण ही सगळी मंडळी आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जे ५-१० मिनिटाचं स्वगत सादर करतात, ते या कार्यक्रमाच्या आनंदाची परिसीमा असतं. मात्र त्याकडे कोणी फार गंभीरपणे बघत असेल असं वाटत नाही. चार घटका करमणूक, तसंच मूळ मुलाखत सुरू होण्याआधीची एक धमाल, याव्यतिरिक्त त्याचा फारसा गंभीर अर्थ कोणी घेत नव्हतं. ही सगळी मंडळी राजकीय विचारसरणीनं प्रेरित वगैरे कधीच वाटली नाहीत. एक तर राजकीय विचार चार लोकांना आवडणार, तर दहा लोकांना नाही. दुसरं म्हणजे प्रेक्षकांना दुखावणं चॅनेल्सना परवडण्यासारखं नसायचं.
पण नव्वदीच्या दशकाच्या मध्यंतरात अमेरिकी पत्रकारितेला ‘केबल न्यूज’ नावाचा रोग लागायला सुरुवात झाली. त्यामुळे चॅनेल्सनी एका विशिष्ट विचारधारेच्या बातम्या देण्यापासून सुरू होऊन त्याची परिणती त्या विचारधारेच्या जवळील राजकीय पक्षाशी संलग्न होण्यात व्हायला लागली. साहजिकच त्याचा परिणाम वृत्तनिवेदनात होऊ लागला आणि बातमी काय आहे, यापेक्षा ती कशाची करायची, याची चढाओढ सुरू झाली. मग बातम्या देणाऱ्या चॅनेल्सची आणि ती बघणाऱ्या प्रेक्षकांची उदारमतवादी व पुराणमतवादी, अशी विभागली झाली.
त्याच सुमारास ‘दि कॉमेडी सेंट्रल’ या २४ तास विनोदाला वाहिलेल्या चॅनेलवरील ‘दि डेली शो’ या फारशा प्रचलित नसलेल्या शोचं सूत्रसंचालन जॉन स्टेव्हर्ट नावाच्या व्यक्तीनं करायला घेतलं. हे चॅनेल व हा कार्यक्रम याआधी उथळ पाण्याच्या खळखळाटाप्रमाणेच अतिउत्साही होता, तसंच फारसा प्रचलित नव्हता. पण जॉन स्टेव्हर्ट यांनी काही वर्षांतच या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल करायला सुरुवात केली. त्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे त्यांनी सुरुवातीला राजकीय भाष्यं करायला सुरुवात केली. परिणामी फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या त्याचा कार्यक्रमानं काही वर्षांत चांगलाच जोर धरला.
बिल क्लिंटन यांच्याविरुद्धचा महाभियोग, तसंच २०००मधील बुश वि. गोर यांची गाजलेली निवडणूक, अशा अनेक घटना जॉन स्टेव्हर्टने आपल्या कार्यक्रमात बातमी सदृश दाखवायला आणि त्यावर भाष्य करायला सुरुवात केली. हे करत असताना त्याने कधीच एका पक्षाची किंवा एका विचारसरणीची बाजू घेतली नाही. हळूहळू इतर चॅनेल्सवरील एकतर्फा बातम्यांपेक्षा या विनोदाची पेरणी केलेल्या बातम्या लोकांना आवडू लागल्या.
२०००पासून जॉर्ज बुश यांची कारकिर्द अशा कार्यक्रमांसाठी पर्वणीच ठरली आणि अल्पावधीतच त्याचा कार्यक्रम बातम्यांसाठी ओळखला जाऊ लागला. रोज सरकार किंवा सरकारी धोरणांवर घणाघाणी टीका करायची, तीही विनोदाच्या माध्यमातून म्हणजे खायचं काम नव्हे! दररोजच्या घडामोडींवर सातत्यानं मजेशीर टीका करत, त्या घटनेची उकल करायची, तीही कुणाच्या भावना फार न दुखावता, याला फार मोठं बळ लागत असावं!
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
९\११च्या हल्ल्यानंतर झालेले कार्यक्रम हे अजरामर असेच म्हणावे लागतील. ते करावे की नाहीत, अशा भीषण घटनेनंतर जनता विनोदासाठी तयार आहे काय, अशा किती तरी चर्वितचर्वणानंतर या मंडळींनी हे कार्यक्रम एक जबाबदारी समजून केले. शोकांतिकेत थोडा काळ मुरला की, विनोदनिर्मिती होऊ शकते, असं म्हणतात. ९\११नंतरच्या शोजना दुःखाची एक किनार होती, पण स्टेव्हर्ट आणि इतरांनी साश्रू नयनांनी सादर केलेलं स्वगत आणि हळुवार विनोदनिर्मिती यांमुळे या कार्यक्रमांची उंची वाढली आणि या कार्यक्रमांना एक प्रकारची मान्यताही मिळाली.
खऱ्या व्यावसायिक कलाकाराचं यश हे त्याच्या प्रसिद्धी किंवा कमाईसोबत त्याने आपली कला किती लोकांत वाटली किंवा आपल्यासारखे किती कलाकार तयार केले, यावरून करावयास हवी. कार्सन, लेनो, लेटरमन वा स्टेव्हर्ट ही मंडळी आता पडद्याआड गेली आहेत. (कार्सन तर काळाच्यासुद्धा). पण त्यांचे कार्यक्रम ते नसतानाही अगदी जोमात सुरू आहेत. अर्थात याचं श्रेय त्यामागील लेखकांच्या टोळीचं आणि हे कार्यक्रम करणाऱ्या चॅनेल्सचंसुद्धा आहे. पण स्टेव्हर्टच्या कार्यक्रमात सहकलाकार असलेली त्याचे सहकारी स्टिफन कोलबेर्ट, हसन मिन्हाज, जॉन ऑलिव्हर, ट्रेव्हर नोआ ही ‘टवाळांची’ टोळी आपापल्या स्वतंत्र शोज् ना घेऊन रोज मनोरंजनातून बातम्या देत असतात. आणि मुख्य म्हणजे खूप धुमाकूळ घालतात.
सद्यपरिस्थितीत अमेरिकन लोकशाहीला चुकीच्या माहितीच्या धोक्यापासून हे विनोदवीर वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. करोना महामारीत ही मंडळी त्यांचे शोज् स्वतःच्या घरातून, कमीत कमी साधनांनिशी करत होते, पण त्यांनी गुणवत्तेशी कुठेही तडजोड केली नाही. हे कार्यक्रम सुरू असताना स्टेव्हर्ट खुद्द यांनी एक संघटना स्थापन केली आणि ९\११मधील हल्ल्यानंतर त्या जागेची सफाई करणाऱ्या लोकांच्या हक्कासाठी थेट संसदेपर्यंत गेला, हे कौतुकास्पद म्हणावं असं आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या कार्यक्रमांना बातमीचा स्रोत समजायचं की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एखाद्या बातमीचा छडा जर लावायचा झाला, एखाद्या घटनेचा अर्थच लावायचा ठरवलं, तर या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
भारतात कितीही उच्च दर्जाचं विनोदी साहित्य लिहिलं गेलेलं असलं तरी आपली विनोदबुद्धी - त्यातही राजकीय विनोदबुद्धी - ही अतिशय अल्पस्वल्प आहे. थोड्या-थोड्या कारणांसाठी ‘भावना दुखावल्या जाणं’ आणि राजकीय नेत्यांचं मूल्यमापन करण्याऐवजी त्यांना देवघरातच बसवण्याकडे एकंदर कल असतो. पण नवी पिढी कदाचित हा बदल घडवून आणू शकेल. कुणाल कामरा, वरुण ग्रोव्हर, ध्रुव राठी या मंडळींना परिस्थितीची चांगली जाणीव आहे. त्यांनी विनोदाला गंभीरपणे घेतल्यास भारतातसुद्धा ‘टवाळ’ आणि प्रेक्षक तयार होऊ शकतील.
.................................................................................................................................................................
लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.
salilsudhirjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment