‘ ‘डी’कपल्ड’ : एका विवेकी ‘कपल’च्या डी’कपल होण्याची कथामालिका
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुरेंद्रनाथ बाबर
  • ‘ ‘डी’कपल्ड’ वेबसिरीजची काही पोस्टर्स
  • Thu , 23 December 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र डी’कपल्ड Decoupled आर. माधवन R Madhavan सुरवीन चावला Surveen Chawla

नुकतीच ‘नेटफ्लिक्स’वर ‘ ‘डी’कपल्ड’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. तिचं दिग्दर्शन हार्दिक मेहता यांनी आणि लेखन मनू जोसेफ यांनी केलं आहे. यातील मुख्य भूमिका आर. माधवन आणि सूरवीन चावला यांच्या.

डी’कपल्ड म्हणजे एक प्रकारे डिव्होर्स असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं, पण ही संकल्पना टोकाचं किंवा विकृत वर्तन म्हणून समाजात रुळलेली आहे. ‘डिव्होर्स’चं मराठीत भाषांतरदेखील फार भयंकर आहे- ‘घटस्फोट’. म्हणजे बॉम्ब फुटावा वा फोडला जावा असं काहीतरी. मात्र डी’कपल्ड हा घटस्फोटाचा एक सौम्य प्रकार समजला जातो. त्याचा अर्थ होतो, केवळ पती-पत्नी या नात्यातून फारकत घेऊन कोणताही द्वेष, घृणा न बाळगता मैत्रीपूर्वक राहणं आणि आपल्या मुलाबाळांवर होणाऱ्या मानसिक आघातांपासून त्यांचं रक्षण करणं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

तर या वेबसिरीजची कथा थोडक्यात अशी आहे. आर्या (माधवन) आणि श्रुती (सुरवीन) हे गुडगावमध्ये राहणारं एक जोडपं. आर्या चेतन भगतनंतरचा इंग्रजीतला नावाजलेला लेखक असतो, तर सुरवीन असते इन्व्हेस्टमेंट बँकर. आर्याचं लिखाण आणि त्याचं वर्तन एकदम सुसंगत असतं. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणं, प्रश्न विचारणं या एकंदर वृत्तीमुळे आणि ‘ओसीडी’ (Obsessive compulsive disorder) या मानसिक आजारामुळे त्याच्या सामाजिक आयुष्यावर विघातक परिणाम झालेले असतात. त्याचं हे वर्तन समाजाच्या चालीरीतींच्या विरोधात असतं. म्हणजे नैतिकतेच्या गप्पा करणाऱ्या ढोंगी समाजाच्या चालीरीतींना तो येता-जाता आव्हान देतो.

समाजाचा ढोंगीपणा समोर आणता आणता माणूस एकाकी पडतो, पण समाज किंवा त्यातल्या चालीरीती काही बदलत नाहीत. त्यामुळे कधी कधी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती (उदा. पती/पत्नी) तुमच्या भूमिकेची पाठराखण करता करता थकून जाते. त्यातून नातं एका कडेलोटाच्या टोकावर येऊन उभं राहतं. हेच आर्याच्या बाबतीतही घडतं. पण दोघांकडे असलेल्या विवेकामुळे, समजूतदारपणामुळे ते घटस्फोट न घेता डी’कपल होण्याचा निर्णय घेतात. अगदी लग्नाप्रमाणे वेगळं होण्याचीही पार्टी करतात. आम्ही वेगळं होतोय, पण मित्र म्हणून राहणार... एकाच घरात राहून मुलीची काळजी घेणार, अशी ही कथा आहे.

या वेबसिरीजची मांडणी विनोदी, उपहासात्मक आहे. आजच्या आधुनिक जगाचं विखंडन करून उत्तराधुनिक समाजाकडे जायचं असेल तर अशा प्रकारे उपहासात्मक पद्धतीनं केलेली मांडणी प्रभावी ठरताना दिसते. सिक्युरिटी गार्ड, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, ड्रायव्हर अशा व्यक्तींच्या कामाला सन्मान दिला म्हणजे तुम्ही विवेकी ठरत नाही, तर त्यांना सन्मानजनक कामं देणं, हे तुम्हाला विवेकी ठरवतं. आधुनिक जगाचं चित्र हे कामाला सन्मान देणारं आहे, पण सन्मानजनक काम मिळताना दिसत नाही. म्हणून अशा दुनियेत आपण कामाला सन्मान देऊन मोकळे होतो आणि मोठेपणा मिरवतो. पण त्या व्यक्तीला ते काम योग्य आहे का नाही, हे पाहत नाही. त्याची एकूण सुरक्षा, सन्मान त्या कामातून जपला जाईल की नाही, हे पाहत नाही. त्यामुळे व्यवस्थेचं विखंडन करून नवीन उत्तराधुनिक मांडणी करणं गरजेचं आहे, असं वाटायला लागतं.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

म्हणूनच या वेबसिरीजमध्ये ‘पॅरासाईट’ या कोरियन चित्रपटाचा उल्लेख वारंवार येतो. उच्चभ्रू लोकांची मानसिकता आणि शोषणाच्या (गैरवर्तनाच्या) नव्या पद्धती या वेबसिरीजमधून आपल्याला दिसतात. काहीच महिन्यांपूर्वी आलेल्या ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटाचाही हाच आशय होता, पण त्याची दिशा गुन्हेगारी सदृश्य होती. त्यामुळे तो तितका प्रभावी ठरला नाही. त्यामुळे समाजातील रूढी, चालीरीतींच्या आडून चालणारं ढोंग उघडं पाडण्याचं कौशल्य व्यंगातून, उपहासातून शक्य आहे, हे ही वेबसिरीज पाहिल्यावर लक्षात येतं.

ही वेबसिरीज केवळ ढोंग करणाऱ्या लोकांवर बोट ठेवत नाही, तर आपल्या व्यक्तिगत आयुष्यातदेखील आपण किती ढोंगी म्हणून वागत असतो, हेदेखील निदर्शनास आणून देते. आपल्या कुटुंबातील समस्या, लैंगिक विषयांना नजरेआड करून त्याबाबत मौन बाळगणं हेदेखील यात खुलेपणानं मांडलं आहे. आपल्या खासगी आयुष्यातील समस्या या तशा छोट्या असतात, पण केवळ संवाद न ठेवल्यामुळे त्या बिघडतात. पती-पत्नीचं नातं तुटलं तरी खिलाडूवृत्तीनं संवाद केल्यानं शेवट समाधानकारक होऊ शकतो. नात्यात असताना होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आपण ते नातं तोडतो. त्यातून पुढे आणखी जास्ती मानसिक त्रासाकडे वाटचाल होते किंवा होऊ शकते. त्यामुळे नातं तोडणं शक्य तोवर सकारात्मक पद्धतीनं कसं होईल, यावर विचार करायला लावणारी ही वेबसिरीज आहे. विद्यमान किंवा भविष्यात घटस्फोटापेक्षा डी’कपल होणं, हा एक मानसिक आरोग्य जपण्याचा मंत्र होऊ शकतो किंवा मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं चांगला पर्याय ठरू शकतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

असा आशय घेऊन फार कमी वेबसिरीज आपल्या भारतात बनत आहेत. हा तसा आपल्यासाठी काहीसा नवखा प्रकार आहे. कारण ओसीडीसारख्या किंवा कम्पलसीव्ह वर्तनावर मानसशास्त्रीय आधार असलेले चित्रपट आपल्याकडे फारसे बनवले जात नाहीत. त्यामुळे आजचा चित्रपट व मालिकांचा काळ हा सामाजिक वास्तव दाखवणारा राहिलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर या वेबसिरीज महत्त्व विशेष ठरतं.

ही वेबसिरीज खूप साधी, सरळ आणि स्पष्ट आहे. आर. माधवन आणि सुरवीन चावला ही जोडी आपल्याला खिळवून ठेवते. इतर पात्रं त्यांना केवळ पूरक असल्यासारखी वाटतात. अर्थात कथा ‘कपल’च्या डी’कपल होण्याची असल्यानं इतर पात्रांना जास्त वाव मिळत नाही, हेही तसं समजण्यासारखंच. दिग्दर्शनापेक्षा लेखनाचा दर्जा मात्र जास्त प्रभावी वाटतो. एकदा पाहायला हवी अशी ही वेबसिरीज आहे.

..................................................................................................................................................................

लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.

advbaabar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख