अजूनकाही
कॅरोल्स म्हटलं की, ख्रिसमसला मध्यरात्रीच्या ‘मिस्साविधी’ला किंवा ‘मिडनाईट मास’ला हजर असलेल्या कुणाही व्यक्तीला हमखास आठवणारे एक गीत म्हणजे ‘ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ’. मूळ लॅटिनमधल्या या गाण्याचं हे धृपद संपूर्ण जगात अनेक ठिकाणी ख्रिसमसच्या काळात गायलं जातं. त्या नंतरची कवनं मात्र स्थानिक भाषांत गायली जातात. ‘देवाचा गौरव असो’ हा या लॅटिन शब्दांचा मराठी अनुवाद.
ख्रिसमस ‘मिडनाईट मास’च्या वेळी म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चमध्ये होणाऱ्या मिस्साविधीदरम्यान ख्रिस्तजन्माचं शुभवर्तमान वाचून झाल्यावर धर्मगुरू अल्तारापाशी असलेली बाळ येशूची प्रतिमा समारंभपूर्वक सजवलेल्या गव्हाणीकडे - ख्रिस्तजन्माच्या देखाव्याकडे - घेऊन जातात. या वेळी चर्चच्या बेलचा घंटानाद सुरू होतो आणि चर्चचा गायकवृंद वाद्यसंगीताच्या सुरात ‘ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ’ हे गीत गातो. तेव्हा भाविकांच्या अंगावर रोमांच उभे राहतात.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
गेली अनेक दशकं मराठी भाषेतसुद्धा हे लॅटिन धृपद गायलं जातं. त्यानंतरच्या मराठी गायनाची पुढील कवनं अशी आहेत-
मेंढपाळ आवारात
कळपास राखिती
इतक्यात आकाशात
दूत गीत म्हणती
आज रात्री बेथलेमात
तारणारा जल्मला
शांति होवो माणसात
स्तोत्र स्तवा देवाला
‘कॅथॉलिक सदगीते’ या पुस्तकात नाताळ सणाच्या गायनांचा स्वतंत्र विभाग होता. ख्रिस्ती गायनांच्या कुठल्याही पुस्तकांत असे वेगवेगळे विभाग असतातच. या विभागात कितीतरी गायनं असतात. नंतर काही वर्षांनंतर समजलं की, यापैकी अनेक गायनं चक्क भाषांतरित होती आणि त्यांच्या चालीसुद्धा लॅटिन धर्तीच्या होत्या. वरच्या नाताळगीताची चाल पूर्णतः लॅटिन धर्तीचीच आहे. मराठीत अशी पाश्चात्य चालीवरची कितीतरी गायनं आहेत.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
माझी आई पूर्णतः निरक्षर, तिला ‘आमच्या बापा’, ‘नमो मारिया’, ‘प्रेषितांचा विश्वासांगिकार - देवदूताचा निरोप’, ‘रोझरीची माळ’ वगैरे चर्चमध्ये आणि घरी दररोज म्हटल्या जाणाऱ्या सर्व प्रार्थना आणि गायनं तोंडपाठ होती. तिलाही ‘ग्लोरिया इन एक्सेलसिस देओ’ हे धृपद येत होतं. श्रीरामपूरच्या चर्चमधल्या इतर निरक्षर स्त्री-पुरुषांचीही हीच स्थिती होती.
अर्थात यात नवल काही नव्हतं. कारण सत्तरच्या दशकापूर्वी भारतातच नव्हे, तर सर्व जगभर कॅथॉलिक चर्चमध्ये संपूर्ण मिस्साविधी चक्क लॅटिन भाषेत व्हायचा. मराठी भाषासाक्षर असलेल्या माझ्यासारख्या लोकांसाठी या लॅटिन प्रार्थना आणि गायनं देवनागरी लिपीत पुस्तकांत छापलेली असायची. ती वाचून, गाऊन आमचा या मिस्साविधीत सहभाग व्हायचा. उदाहरणार्थ, ‘दोमिनस व्होबिस्कम’ (प्रभू तुमच्यासह असो!) अशी काही त्यातील वाक्यं मला आजही आठवतात. साठच्या दशकात पोप जॉन तेविसावे आणि पोप पॉल सहावे यांच्या काळात भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलनंतर जगभर चर्चमध्ये मिस्साविधी स्थानिक भाषांत होऊ लागला.
डिसेंबर महिना सुरू झाला की, लहानपणापासून सतत कानावर पडलेली अशी कितीतरी नाताळाची मराठी गीतं कानांत गुंजू लागतात. त्यापैकी एक तर चक्क येशूबाळाचा पाळणा आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व ख्रिस्ती लोकांनी तो कधी ना कधी ऐकलेला असतोच. ख्रिस्तजन्माचा तो पाळणा असा-
घेई घेई घेई जन्म माझ्या मनी
तुझ्या जन्मदिनी ख्रिस्तबाळा
आवडला तुज जन्म गव्हाणीत
तसा मन्मनात आवडावा
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
येशूजन्माची अशी कितीतरी पाळणागीतं मराठीत गेल्या शतकाच्या काळात रचली गेली आहेत. ही पाळणागीतं महाराष्ट्रातील विविध कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट चर्चमध्ये नाताळ सणाच्या काळात भक्तिभावानं गायली जातात. यापैकी पुढील ‘प्रभुचा पाळणा’ या नावानं खुद्द ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिला आहे-
हलवी मना प्रभुपाळणा हा
त्यजुनी सुखातें वरी यातनांना ||धृ||
पराकारणें जो झिजवी तनूला
यशोगान त्याचें मुदें गात गाना
हलवी मना, प्रभुपाळणा ||१||
हलवी मनातें हलवी जनातें
प्रभुपायिं लावी इत्तर जनांना
हलवी मना, प्रभुपाळणा ||२||
जगाच्या हिताचा प्रभूसेवनाचा
असे पाळणा जो पटवी मनांना
हलवी मना, प्रभुपाळणा ||३||
बॉम्बे ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी, मुंबईने प्रकाशित केलेल्या ‘उपासना संगीत’ या पुस्तकात हा पाळणा समाविष्ट आहे. त्यात अशी अनेक नाताळगीतं आणि शेकडो भक्तीगीतं आहेत. गेल्या शतकातील रेव्हरंड नारायण वामन टिळक आणि कृष्णा रत्नाजी सांगळे प्रभुतींचं यात फार मोठं योगदान आहे. मराठी ख्रिस्ती समाजात भक्तिगीतांची, गायनाची आणि कीर्तनाचीसुद्धा फार जुनी परंपरा आहे. ‘उपासना संगीत’ या ४०४ पानांच्या जाडजूड गायनसंग्रहावर नुसती नजर फिरवली तर या विधानातील तथ्य लक्षात येईल.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
१९०३पासून प्रसिद्ध होणाऱ्या ‘निरोप्या’ या मासिकाचे खूप जुने अंक चाळताना एकदा पन्नासच्या दशकातील अंकात एक नाताळगीत मला दिसलं. लहानपणापासून नाताळाच्या दिवसांत चर्चमध्ये हे सुंदर चाल असलेलं नाताळगीत मी ऐकत आलो आहे-
चंद्रमा समवेत पातली
मंगल मध्यम रात
अधीर झाली बघण्या बाळा
विश्वपतीच्या त्या लडिवाळा
घेउनि हाती चांदणी माळा
विराजली गगनात
हे गायन लिहिणारा कवी कोण म्हणून आतुरतेनं कवीचं नाव पाहू लागलो, तर खाली ते दिलेलंच नव्हतं.
ख्रिसमसच्या साधारणतः १०-१५ दिवस आधी कॅरोल सिंगर्सच्या तुकड्या ख्रिस्तमसची गाणी घरोघरी आणि इतर ठिकाणी म्हणण्यासाठी बाहेर पडतात. नाताळ सणापूर्वी एक-दोन दिवस आधी त्यांना त्यांच्या परिसरातील किंवा त्यांच्या चर्चमधल्या सगळ्या सभासदांच्या घरी भेटी द्यायच्या असतात. हे कॅरोल सिंगर्स गायनासाठी येतात, तेव्हा शेजारच्या घरांतील मुलंबाळं आणि मोठी मंडळीसुद्धा नाताळगीतं ऐकण्यासाठी जमत असतात. सांता क्लॉजसुद्धा कॅरोल सिंगिंगमध्ये रंगत आणतो.
कॉलेज विद्यार्थी असताना गोव्यात मिरामार समुद्रकिनाऱ्यापाशी असलेल्या विविध घरांना कॅरोल सिंगर्स म्हणून आम्ही प्री-नॉव्हिस मुलं भेटी देत असू. गिटार वाजवणारा बेनेडिक्त उर्फ बेनी फरिया आमचा म्होरका असायचा. ‘ड्रमर बॉय’, ‘सायलेंट नाईट, होली नाईट’, ‘ओ कम ऑल यी फेथफुल’, ‘जॉय टू द वर्ल्ड’ वगैरे अभिजात कॅरोल्स गायली जायची आणि लोकांना फेस्टिव्ह मूडमध्ये नेलं जायचं.
नाताळाच्या आधी आमच्या घरी आठ-दहा दिवस दररोज संध्याकाळी करंज्या, लाडू, चकल्या, अनारशी वगैरे फराळ बनवण्याचं काम सुरू व्हायचं, ते मध्यरात्रीपर्यंत चालायचं. आमचं मोठं, खटल्याचं घर असल्यानं आणि नाताळाच्या या फराळाची ताटं शेजारच्या माळी-मराठा आणि मुसलमान घरांतही जाणार असल्यानं पितळाचे मोठमोठे डबे गच्च भरून हे पदार्थ व्हायचे.
या फराळाशिवाय नाताळ सणाची गोडी आणखी एका कारणानं वाढायची, ती म्हणजे नाताळाची गाणी. येशूबाळाच्या आगमनाच्या म्हणजे अॅडव्हेंटच्या या काळात नाताळाची गाणी गायली जायची. ती ऐकून या सणाच्या आनंदी वातावरणाचा अनुभव यायचा.
फराळ बनवून उशिरा रात्री दमूनभागून घरातले सर्व झोपले असताना ऐन मध्यरात्री किंवा अगदी भल्या पहाटे घराच्या पुढच्या दारावर मोठ्यानं थाप पडायची, दारावरची कडी वाजायची आणि त्यापाठोपाठ कानावर येणाऱ्या पेटी-तबल्याचे सूर आणि गायनाचे आवाज ऐकून सगळ्यांची झोप उडायची. नाताळाची उडत्या तालीची, तसंच रागदारीतली गायनं गाण्यासाठी चर्चमधली भजनी मंडळी अंगणात आलेली असायची.
अंगणात मोठ्या भावांनी बनवलेला ख्रिसमसचा स्टार लावलेला असायचा. येशूबाळाला भेटण्यासाठी आलेल्या त्या तीन मागी, ज्ञानी राजांना आकाशातील एका चमचमत्या ताऱ्यानं थेट बेथलेमच्या गाईगुरांच्या गोठ्यापर्यंत वाट दाखवली, तसेच उंच खांबावर लावलेले हे लुकलुकते ख्रिसमस स्टार त्या भजनी मंडळींना ख्रिस्ती कुटुंबांच्या घराची वाट दाखवायचे. थंडीच्या दिवसांत अंगावर उबदार पांघरुणं घेऊन, जमिनीवर मांडी घालून नाताळची गाणी ऐकली जायची, स्वयंपाकघरात आईनं चहाचं आधण ठेवलेलं असायचं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आजही ख्रिसमस ट्री सजवताना आणि सणाची तयारी करताना ख्रिसमस कॅरोल्सचं पार्श्वसंगीत वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. प्रत्येकाच्या या सणाविषयीच्या कितीतरी सुखद आठवणी असतात.
आजकाल ख्रिसमस हा केवळ ख्रिस्ती समाजाचाच उत्सव राहिला नाही. हल्ली विविध शाळांत, उद्योगकंपन्यांत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेलांत ख्रिसमस अगदी उत्साहानं साजरा होतो. या सोहळ्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात आणि एकमेकांना आनंदी करतात. तसं पाहिलं तर विशिष्ट धार्मिक विधीचा अपवाद वगळता कुठल्याही सणाचं वा उत्सवाचं स्वरूप आणि उद्दिष्ट असंच सर्वसमावेशक असायला हवं.
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment