अजूनकाही
विदर्भवीर, माजी खासदार भाऊ जांबुवंतराव धोटे यांचं शनिवारी (१८ फेब्रुवारी २०१७) पहाटे साडेतीनच्या सुमारास यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ही बातमी जीवाला चटका देऊन गेली. भाऊंनी अगदी निखळ मनानं, गांभीर्यानं देशसेवा, जनसेवा केली. आपलं उभं आयुष्य त्यांनी लोकांसाठी अर्पित केलं. ते एक उत्तम समाजसेवक, क्रांतिकारी, धाडसी व्यक्तिमत्त्व होतं. महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेचे ते आमदार होते.
अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात धोटे यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला, पण पदवीचं शिक्षण अर्धवट सोडलं. पुढे यवतमाळच्या नगर परिषदेच्या शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली. त्याही नोकरीला भाऊंनी अल्पावधीतच रामराम ठोकला. नंतर त्यांनी जवाहरलाल दर्डा यांच्याविरुद्ध यवतमाळच्या नगर परिषद वॉर्ड क्रमांक १२ मधून निवडणूक लढवली. दर्डांचा पराभव करून राजकीय मैदानात काँग्रेसचा विरोधक म्हणून उडी घेतली. भाऊ अत्यंत धाडसी होते. ते कोणालाही घाबरत नसत. तितकेच ते स्पष्टवक्तेही होते.
माझी आणि भाऊची ओळख मुंबईत झाली होती. आम्ही पुण्यावरून आलो होतो. मंत्रालयात जायचं होतं. व्हीटी स्टेशनजवळ भाऊ एका गाडीत होते. त्यांनी गाडीची काच खाली केली आणि मला म्हणाले, “ए पोरा, हं हं तूच. त्या दाडीवाल्याला कुठे घेऊन चालला आहेस? त्यांना घेऊन ये.” मी डॉ.कुमार सप्तर्षी यांच्यासोबत होतो. मी डॉक्टरांना सांगितलं की, ‘कुणीतरी आपल्याला बोललवत आहे.’ डॉक्टर एरवी आम्हाला भाऊंचे अनेक किस्से रंगवून सांगायचे. जणू भाऊ आमच्यासमोर आहेत आणि त्यांच्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहतोय असं वाटायचं. मी ते आठवून डॉक्टरांना म्हणालो, ‘ते बहुतेक भाऊ धोटे आहेत.’ आम्ही त्यांच्या गाडी जवळ गेलो. भाऊंनी आम्हाला विचारलं की, ‘तुम्ही कुठे जात आहात?’ डॉक्टर म्हणाले, ‘मंत्रालय. त्याअगोदर आमदार भवन.” भाऊ लगेच म्हणाले, “बसा गाडीत.” डॉक्टर म्हणाले, ‘तुम्हाला त्रास कशाला! तुम्ही आमदार निवासला जात आहात का? नाहीतर आम्ही टॅक्सीने जाऊ!” भाऊ त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले, “आमच्या गाडीत जागा नाही का? बसा गाडीत आणि आम्ही आमदार निवासला येत नसतो. तुम्ही जा तिथं, आम्ही सोडू तुम्हाला.” आम्ही गाडीत बसलो. मी भाऊंच्या आणि डॉक्टरांच्या मध्ये बसलो. भाऊंनी माझी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. ते मला म्हणाले, ‘तुझं नाव काय? तू काय करतोयस? तू या दाडीवाल्याच्या नादी कसा लागला?” मी उत्तरं दिली. नंतर वेळोवेळी प्रत्यक्ष भेटण्याची संधी येत गेली आणि भाऊंच्या शेवटच्या काही वर्षांत तर त्यांची माझी जवळीक वाढत गेली. भाऊ पुण्यात आले की, त्यांचा सारथी\सोबती म्हणून मी त्यांच्या सोबत राहायचो. त्यांच्यासोबत तासनतास गप्पा व्हायच्या. अनेक गोष्टी, अनुभव, किस्से भाऊ मला सांगायचे. भाऊंचं व्यक्तिमत्त्व अत्यंत संवेदनशील व गोड होतं. त्यांचा सहवास मी कधीही विसरू शकत नाही.
क्रांतिकारी नेता
क्रांतिकारी नेता म्हणून भाऊंकडे पाहिलं पाहिजे. सातत्याने गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पोटतिडकीनं भांडणारा त्यांच्यासारखा दुसरा नेता नव्हता, नाही. त्यांनी कधीही डावपेचांचं राजकारण केलं नाही. वास्तविक त्यांना डावपेच जमलेच नाहीत, कारण त्यांचा सरळ आणि निर्मळ स्वभाव. त्यांनी कधीही स्वतः चा विचार केला नाही. त्यांनी स्वतःची कोणतीही संस्था काढली नाही. आजही यवतमाळ शहरात त्यांची मूळ घर जशास तसं आहे. ते केवळ १० बाय १५ चं कौलारू घर आहे. भाऊ आमदार झाले, खासदार झाले, पण त्यांचं घर तेच, साधं कौलारूचं राहिलं. लग्नानंतर त्यांनी बायकोसह बराच काळ गेस्ट हाऊसमध्ये काढला. त्यांची अर्धांगिनी म्हणजे रामराव अधिकांची मुलगी, विजयाताई. त्या भाऊंच्या आयुष्यात आल्या आणि त्यांच्या साथीदार झाल्या, घराच्या आणि चळवळीच्याही.
स्वतः निर्धन राहायचं आणि जे काही करायचं ते लोकांसाठीच असं भाऊ मानत. स्वत:ला कम्युनिष्ट म्हणवणाऱ्या विदर्भातील नक्षली लोकांबाबत भाऊ हळहळ व्यक्त करत. नक्षली लोकांकडे मारणं आणि मरणं या पलीकडे काम राहिलं नाही. का निर्माण होतात हे नक्षली, याचा विचार व्हायला पाहिजे, असं ते नेहमी सांगत. स्वतंत्र भारतात आजही लोकांना स्वातंत्र्य नाही, त्यांना स्वतःच्या हक्कासाठी झगडावं लागतं, हे दुर्दैव आहे, असं म्हणत ते सतत अस्वस्थ असायचे.
धाडसाचं दुसरं नाव जांबुवंतराव
आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात राजकारणात असताना भाऊंनी जो संघर्ष केला, त्याला तोड नाही. आयुष्यातील उमेदीची अनेक वर्षं त्यांनी त्याग केला. जनआंदोलनं उभारली, तुरुंगाची हवा, पोलिसांच्या लाठ्या खाल्या. विदर्भाच्या इतिहासात त्यांच्या नेतृत्वाला तोड नाही. जनतेनंही या बेडर सिंहाला डोक्यावर घेतलं होतं. ते जिथं उभे राहत तेथून लाखभर मतं घेत, एवढी लोकप्रियता त्यांनी मिळवली होती. शंभर वर्षांत विदर्भात कुणा नेत्याच्या वाट्याला येणार नाही, एवढं प्रेम त्यांना मिळालं.
त्यांच्या धाडसी वृत्तीची अनेक उदाहरणं सांगता येतील. त्यांनी नेहमी लोकांची, गोरगरीब जनतेची बाजू मांडली. अनेक वेळा उपोषणं, आंदोलनं केली. त्यांच्या आंदोलनात लोकसहभाग फार मोठा असे, जणू जनसागर वाहतोय. चळवळीतील लोकांनी भाऊंकडून हे शिकलं पाहिजे की, आंदोलनात लोकसहभाग कसा वाढवावा. त्यांचं आंदोलन म्हटलं की सरकारच्या आणि प्रशासनाच्या उरात धडकीच भरायची!
भाऊंच्या निवडणुका बिनपैशाच्या
भाऊंची निवडणूक ही अभ्यासण्यासारखी आहे. भाऊंचा प्रचार बिन पैशाचा असायचा. साधा चुना आणि काव मिळाला की, भिंती रंगवायच्या. तेही नसेल तर साध्या कोळशाने भिंतीवर लिहिलं जायचं. आज निवडणुकीचा बाजार पाहिला की वाईट वाटतं. भाऊंना पराभूत करण्यासाठी अख्खं काँग्रेस मंत्रिमंडळ यायचं तरी भाऊ बहुमतांनी निवडून यायचे. त्यांनी कोणत्याच राजकीय पक्षाला शत्रू मानलं नाही. पक्ष हे माध्यम आहे, त्याचा लोकांनी वापर केला पाहिजे असे ते सांगायचे. त्यांनी पक्षांतर केलं, परंतु लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता. सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. एखाद्याला मित्र म्हटलं की, त्याच्यासोबत मैत्री निभावणं हे भाऊंचं सूत्र होते. इंदिरा गांधी आणि भाऊंचे अतिशय चांगले संबंध होते, हे सर्वांना माहीत होते. अलीकडे त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, कारण ते आजचं पैशाचं राजकारण पाहून अस्वस्थ होते. मला फोन करायचे आणि म्हणायचे- लोकांच्या पक्षात राहून उर्वरित आयुष्य लोकसेवेसाठी घालू. मी माझ्या जुन्या पक्षात प्रवेश करतो आणि त्यातच काम करतो.
विदर्भाबाबत भाऊंचं स्वप्न
विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर प्रश्नही भाऊंनी आक्रमकपणे मांडले. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी उचलून धरणाऱ्या भाऊंना ‘विदर्भवीर’ असं संबोधलं जातं. त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी अनेक पदयात्रा काढल्या, अमोरण उपोषणं केली. त्याचं कारण कृषी विद्यापीठ मागणीसाठी आंदोलन करावं लागलं आणि त्यात विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या. अनेक वर्षांपासून वेगळा विदर्भ हा प्रलंबित राहिलेला विषय आहे. त्याबाबत काही करारही झाले आहेत. मुळात विदर्भाला प्राधान्य देण्याचं ठरवूनसुद्धा दुय्यम स्थान दिलं. ‘सर्व मागावं लागतं आणि त्यात जीवही गमवावा लागतो. मग आम्ही वेगळा विदर्भ का मागू नये?’, असे ते म्हणत. मी तसा संयुक्त महाराष्ट्र राहायला पाहिजे, या मताचा आहे, परंतु भाऊंची ही भावनाही समजावून घेण्यासारखी आहे. विदर्भाचं भलं व्हावं, लोकांना न्याय मिळावा, असं भाऊ आयुष्यभर तळमळीने सांगत राहिले, त्यासाठी लढत राहिले.
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन
भाऊंनी पूर्वी संन्यस्थ जीवन जगण्याचं ठरवलं होतं. जनसेवा हीच ईश्वर सेवा, असं ते मानत. तसंच ते जीवनाकडेही पाहत. त्यांचं म्हणणं असायचं की, ‘माणसाचं आयुष्य हे ‘बंच ऑफ काँन्ट्रोडिक्शन’ आहे. प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असू शकतात, असतातच. म्हणून सर्वांनी कसं वागावं हा विषय गुंतागुंतीचा आहे . परंतु सर्वांना न्याय हवा असतो. तो मिळवून घेणं-देणं याबाबत हेतू चांगला असायला पाहिजे. हेतूमध्ये दोष नसावा.’ म्हणून ते आयुष्यभर चांगला हेतू घेऊन लोकांसोबत, लोकांचे प्रश्न सोडवत राहिले. भले न्याय कसा मिळवून द्यावा वा कसा मिळवावा, याबाबत अनेक मतभेद असू शकतात. त्यांनी त्यांना जो योग्य वाटेल तो मार्ग निवडला.
भाऊंना व्यसन करणं मान्य नव्हतं. जे कोणी तंबाखू खात असेल त्याला भाऊ चक्क मारायचे आणि व्यसनमुक्तीचे धडे द्यायचे. कोणी दारू प्यायला असेल तर त्याची भाऊंपुढे खैर नसायची. म्हणून व्यसनी माणसं भाऊंसमोर यायला खूप घाबरायची. परंतु लोकांना बरंही वाटायचं की, ते काही वाईट सांगत नाहीत, ते आपल्या भल्याचंच सांगतात. म्हणून लोक त्यांचा मारही आनंदानं खायचे आणि व्यसन सोडून द्यायचे. भाऊ महात्मा गांधींना मानायचे. त्यांचे आदर्श सुभाषचंद्र बोस होते, ज्यांनी महात्मा गांधीजींना ‘फादर ऑफ नेशन’ असं म्हटलं होतं. तेच भाऊंचं महात्मा गांधींबाबत मत होतं.
भाऊ विदर्भाची शान होते
एकदा भाऊंसोबत पुण्यात गेस्ट हाऊसवर गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात एका न्यायाधीशांनी भेटण्यासाठी येत आहे असा निरोप पाठवला. भाऊंनी त्यांना सांगितलं की, ‘तुम्ही न्यायाधीश आहात. आम्हीच येतो तुम्हाला भेटायला.’ मी भाऊंसोबत त्या न्यायाधीशांना भेटायला गेलो. न्यायाधीशसाहेबांनी भाऊंना बघून वाकून नमस्कार केला. त्यांनी सांगितलं की, ‘माझे वडील यांचे कार्यकर्ते होते आणि मी यांना (भाऊंना) लहानपणापासून पाहत आलो आहे. अशी माणसं फार दुर्मीळ आहेत, जी सामान्य लोकांच्या न्यायासाठी अहोरात्र झटतात. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार होतात. आम्ही न्याय देण्यासाठी पगार घेतो, परंतु हे संपूर्ण आयुष्य विना मोबदला आणि नि:स्वार्थ भावनेनं काम करतात. भाऊंचे मोर्चे अति भव्य असायचे. त्यांना पाहायला लोकांची गर्दी व्हायची. आमच्या विदर्भाची शान आहेत भाऊ!’
भाऊंच्या डोक्यात गोरगरिबांचाच विचार
एकदा भाऊंच्या पाठीचा त्रास खूप वाढला होता. त्यांचं ऑपरेशन करायचं होतं. ते पुण्यात डॉ.संचेती यांच्याकडे करायचं होतं. त्यावेळी भाऊंना भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं. एका विशिष्ट प्रमाणात भूल दिली की, पेशंट बडबड करतो आणि खरं बोलायला लागतो. पण भाऊंना भूल दिली तर ते ढसढसा रडायला लागले. म्हणत होते- ‘माझ्या गोरगरीब जनतेचं काय होईल? त्यांना कोण वाली आहे? त्यांचं कसं होईल?” डॉ. संचेतींना हे ऐकल्यावर फार आश्चर्य वाटलं. भूल दिली जात असताना, ऑपरेशन चालू असताना त्यांच्या डोक्यात गरिबांचाच विचार होता.
अनेक दंतकथा
भाऊंविषयी लोकांनी अनेक दंतकथा तयार केल्या. जसं त्यांची सभा झाली की, पाऊस होणार. योगायोगानं भाऊंची सभा व्हायची आणि पाऊस पडायचा. हा किस्सा भाऊंनी स्वतः मला अनेक वेळा सांगितला होता. भाऊंच्या नावानं काही वस्तूही विकल्या जायच्या. त्यातली एक वस्तू म्हणजे स्पीकर (करणा- भोंगा). भाऊ बिनधास्त बोलत आणि सरकारवर तोफ डागत. स्पीकर हा जबरदस्त, बुलंद आवाज म्हणून त्या भोंग्याचं नाव ‘जांबू’ ठेवलं गेलं. कोणाकडे कार्यक्रम असला की, लोक म्हणत, ‘अरे, आवाज एकदम भारी आहे. दोन जांबू लावलेत.’
त्यांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी होती. त्यात एक अपंग भिक्षुक होता. त्याच्या हातात दोन-तीन फुलं होती. तो आपल्या आवडत्या नेत्याला श्रद्धांजली वाहायला व्याकूळ झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याचं भाऊंवर किती प्रेम होतं, किती विश्वास होता, ते स्पष्ट दिसत होतं. आजच्या काळात गरिबांच्या मनात जागा मिळवणं सोपं नाही. त्याला फार मेहनत, स्वच्छ मन आणि चारित्र्य लागतं.
‘भागो मत, दुनिया बदलो’ असं भाऊ ठामपणे सांगत. भाऊ विदर्भाचे सिंह होते. शेवटपर्यंत ते सिंहासारखे जगले. त्यांना सलाम!
लेखक पुण्यात वकील म्हणून प्रॅक्टिस करतात.
g3gopalkrishna@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment