अजूनकाही
प्रा. सुभाष पाटील यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली तीन पुस्तकं वाचून मला ‘Tres faciunt collegium’ (‘तिघांचा समूह बनतो’) या लॅटिन वचनाची आठवण आली. यापूर्वी त्यांची बारा पुस्तकं निघाली आहेत, पण या वेळी त्यांनी एकदम तीन रन काढले. २२ डिसेंबर हा पाटलांचा जन्मदिवस असतो आणि २५ तारखेला येशू ख्रिस्ताचा. पण येशूचे निस्सीम अनुयायी असलेल्या पाटलांना निव्वळ ‘ख्रिस्ती लेखक’ म्हणून एका विशिष्ट कप्प्यात बसवून चालणार नाही.
त्यांच्या आजवरच्या सर्वच लेखनातून त्यांची व्यापक दृष्टी, त्यांचा समतोल आणि सर्वसमावेशक बाणा, तसंच कुठलाही अभिनिवेश नसलेली त्यांची साधी, सरळ, पण थेट हृदयाला भिडणारी भाषा प्रकर्षानं जाणवते. ते विद्वान आहेत, पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात आणि लेखनात कुठेही अहंकार डोकावत नाही. कठीण शब्द वापरून आणि अलंकारिक शैलीत ते एखाद्या समीक्षकाच्या भूमिकेतून सहज लिहू शकले असते. पण त्यांच्या लेखणीतून उतरतात ते रसाळ आणि प्रासादिक, वाचकांशी हसतखेळत संवाद साधणारे शब्द. त्यांच्या लेखनात थोडासा पसारा असेल, पण त्यांची पुस्तकं वाचताना कंटाळा कधीच येत नाही. नुकतीच प्रसिद्ध झालेली त्यांची ही तीन पुस्तकं याची साक्ष देतात. त्यामुळे हे ग्रांथिक collegium निव्वळ ख्रिस्तीच नव्हे, तर अन्य मराठी वाचकांनीही अवश्य वाचायला पाहिजे. त्याची जागा फक्त चर्चच्या चार भिंतींच्या आत नसून मराठी साहित्याच्या मुख्य धारेचाही तो एक भाग आहे, हे आवर्जून सांगावंसं वाटतं.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
सुभाष पाटलांची ही तीन पुस्तकं आहेत- ‘माझी स्मरणचित्रे’ नावाचं त्यांचं आत्मवृत्त, ‘चर्च भोवतालच्या कथा’ हा लघुकथा संग्रह, आणि ‘ख्रिस्ती कीर्तन मार्गदर्शिका’ हा एक माहितीपर संग्रह. त्यापैकी ‘माझी स्मरणचित्रे’ या पुस्तकाचा हा अल्पपरिचय.
हे आठवणींच्या अंगानं जाणारं आत्मचरित्र आहे. त्याला ‘मेमॉयर्स’ (memoirs) म्हणणं अधिक उचित ठरेल. त्यातून त्यांनी त्यांचा आजवरचा जीवनप्रवास मोठ्या खुबीनं आणि प्रामाणिकपणे वाचकांसमोर ठेवला आहे. उपेक्षित अशा एका समाजातल्या एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि काहीशा गरीब परिस्थितीतच वाढलेल्या या माणसानं केवळ स्वकष्टानं आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर कशी भरारी मारली आणि प्रगती केली, याचा हा छोटेखानी आलेख आहे.
ते लहानाचे मोठे होतानाचे ग्रामिण भागातले दिवस, शैक्षणिक प्रगती करताना त्यांना आलेल्या अडचणी त्यांनी बखुबी रंगवल्या आहेत. त्यांचा मूळ विषय गणित असूनही नंतर ते मराठी अध्यापनाकडे वळले. पीएच.डी. ही डिग्री मिळवली, एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झाले. याचसोबत त्यांनी मराठीत विपुल लेखन केलं. ते ज्या ख्रिस्ती पंथाचे उपासक आहेत, त्यांच्या चर्चसाठीही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं भरपूर कार्य केलं. अनेक प्रकारच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या अंगावर असतानासुद्धा त्या नीट पार पाडून त्यांनी स्वतःचा संसारही नेटकेपणानं केला. ख्रिस्ती समाजातले एक ज्येष्ठ, प्रतिष्ठित नागरिक म्हणून आज त्यांना ओळखलं जातं. त्यांना आर्थिक आणि अन्य प्रकारच्या समस्यांनाही सामोरं जावं लागलं. यातून मार्ग काढत आज ते वयाच्या सत्तरीनंतरचं सुखी जीवन जगत आहेत. ही झाली या आत्मवृत्ताची बाह्य चौकट.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
या आत्मकथनातली रंजकता यात नाही. ती आहे त्यांनी हे सारं लेखन कमालीच्या तटस्थतेनं आणि मनमोकळ्या पद्धतीनं केलं आहे, यात. हे सारं लिहिताना त्यांनी काहीही लपवलेलं नाही, बढाया मारलेल्या नाहीत, जे लिहिलं ते स्पष्ट आणि सौम्य शब्दांत लिहिलं आहे, याची जाणीव हे पुस्तक वाचताना प्रकर्षानं होते. त्यांना जे काही कटू अनुभव आले, ज्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागलं, त्याविषयी लिहिताना ते कुठेही मनाचा समतोल ढळू देत नाहीत.
या लिखाणात ना कुठे कटुता आहे, ना विखार. जे मिळालं त्याला देवाचा प्रसाद म्हणून ते स्वीकारतात. जे नाही मिळालं, जे हुकलं, किंवा जे खूप काळानं मिळालं, त्यालाही ते ईश्वराची मर्जी म्हणून ग्राह्य मानतात. त्यामुळे हे साधं, सरळ, पण तरीही एक वेगळी गोडी असलेलं लिखाण वाचायला छान वाटतं.
लक्ष्मीबाई टिळकांसह अनेक मान्यवर ख्रिस्ती लेखकांनी आजवर आपापली आत्मवृत्तं लिहिली आहेत. यातली बहुतेक सारी मंडळी पश्चिम महाराष्ट्रातली आहेत. पण सुभाष पाटील हे हाडाचे वऱ्हाडी आहेत. नाशिक, अहमदनगर, मुंबई, पुणे यांच्या तुलनेत विदर्भात ख्रिस्ती समाज काहीसा कमी प्रमाणात आढळतो. त्यामुळे एका अस्सल वऱ्हाडी ख्रिस्ती माणसाची ही स्मरणयात्रा जरा वेगळी म्हणून नक्कीच उल्लेखनीय ठरते.
सुभाष पाटलांचे आई-वडील हे दोघेही हिंदू धर्मात जन्मले. वडील यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव जवळच्या मिटनापूर या खेड्यातले. पुढे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या संपर्कात आल्यानं वडिलांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. फ्री मेथडिस्ट हा त्यांचा पंथ. त्यानंतर त्यांनी आसपासच्या परिसरात ख्रिस्ती धर्मप्रचार केला. त्यासाठी त्यांना जिल्ह्यातल्या गावोगावी जावं लागायचं. आमदनी बेताचीच. या ठिकाणी त्यांना ‘बाटलेला’ म्हणून सापत्न वागणूक मिळत असे. त्यांच्या अपत्यांनाही अशीच सामाजिक दुर्भावना सहन करावी लागली. हे टक्केटोणपे खात खात सुभाष पाटील मोठे झाले. त्यानंतर त्यांनी स्वकर्तृत्वावर शिक्षण घेतलं आणि गणित शिक्षक म्हणून ते नोकरीसाठी नागपुरला आले.
पुढे कधी तरी त्यांनी हा रस्ता बदलून मराठीत एम.ए. केलं आणि नंतर डॉक्टरेटदेखील. पुढे ते नागपूरच्या सुप्रसिद्ध हिस्लप महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक (पुढे विभागप्रमुख) म्हणून रुजू झाले. विवाह झाला, तीन मुलींना जन्म दिला. निवृत्तीनंतर दुसऱ्या एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. वेगवेगळ्या नियतकालिकांतून (विशेषतः ख्रिस्ती) त्यांचं लेखन याच काळात प्रकाशित होऊ लागलं होतं. काही ख्रिस्ती नियतकालिकांचं त्यांनी संपादनही केलं. ग्रंथ लिहिले. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. २००७ मध्ये जालना येथे झालेल्या २१व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘History Of Free Methodist Church In India’, ‘संत तुकाराम आणि रेव्ह. टिळकः एक भावानुबंध’ आणि ‘मराठी ख्रिस्ती साहित्य : उगम आणि विकास’ ही त्यांची पुस्तकं बरीच गाजली. त्यांना परदेश दौरा करण्याचीही प्राप्त झाली.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
तसं पाहिलं तर यात काही फार अद्भुत असं काही नाही. मग या आत्मकथनाचं वैशिष्ट्य काय? माझ्या मते, हे वैशिष्ट्य त्यांच्या प्रामाणिकपणात आहे. जे घडलं, जसं घडलं ते सांगताना ते कचरत नाहीत. पण या प्रांजल कथनात कुठेही कडवटपणा नाही. ‘बाडग्याचा पोर’ म्हणून लहानपणी त्यांना जे काही वाईट अनुभव आले, त्याबद्दल ते अगदी सहजतेनं लिहितात. त्यात कुठलाही अभिनिवेश नाही.
दुसरं म्हणजे, (मराठी) ख्रिस्ती व्यक्ती ही एका विशिष्ट मानसिकतेच्या कुंपणाच्या आत राहणारी असते, अशी जी एक (चुकीची) प्रतिमा बहुसंख्य लोकांच्या मनात असते, तिला हे लिखाण तडा देतं. पाटील open minded आहेत. ख्रिस्ती असण्याचा त्यांना अभिमान आहेच, पण त्याच वेळी ते इतर कोणाचाही, कशाचाही अवमान करत नाहीत. जुन्या जखमा कुरवाळत बसत नाहीत. उलट खुल्या मनानं आणि खुल्या दिलानं ते बाहेरच्या जगाचा आत्मीयतेनं स्वीकार करतात, उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघतात. ते खऱ्या अर्थानं ख्रिस्ताची शिकवण जगतात.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
या पुस्तकाची तिसरी जमेची बाजू म्हणजे हा एक ऐतिहासिक दस्तवेज आहे. साधारणपणे १९२० ते १९५० या काळातल्या वऱ्हाडातल्या सवर्ण नसलेल्या ग्रामीण लोकांचं जीवन कसं होतं, याचा एक पट त्यांनी उलगडवून दाखवला आहे. आपल्या वडिलांचं चित्रण तर त्यांनी फार मनोहारी शैलीत केलं आहे. स्वतःतल्या उणिवा दाखवायला ते मागेपुढे बघत नाहीत. रेव्ह. टिळकांचे नातू आणि प्रसिद्ध लेखक अशोक टिळक, बहुप्रसवा लेखणीचे धनी असलेले ख्यातनाम ख्रिस्ती लेखक आणि कीर्तनकार आचार्य स. ना. सूर्यवंशी, तसंच त्यांची पत्नी चंदन यांनी त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांना दिलेल्या बहुमूल्य साथीचा ते कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. पाटलांची शैली काहीशी मिस्कील आहे. त्यामुळे हे आत्मकथन अधिकच वाचनीय झालं आहे. पुस्तकाला जोडलेली परिशिष्टं देखील उपयुक्त आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आपल्या नेहमीच्या, परिचित विश्वातच आपल्याला माहीत नसलेलं आणखी एक जग असतं. याही जगाची ओळख करून घ्यायची इच्छा असलेल्या सुजाण आणि सर्वसमन्वयक दृष्टीकोन असलेल्या वाचकांनी हे आत्मनिवेदनपर पुस्तक आवर्जून वाचायला पाहिजे.
‘माझी स्मरणचित्रे’ – प्रा. सुभाष पाटील
चेतक बुक्स, पुणे
मूल्य - ५०० पाचशे रुपये
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment