‘जय भीम’ : अर्धवट आंबेडकरवादी आणि अर्धवट कम्युनिस्ट यांना सणसणीत चपराक लगावणारा सिनेमा
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सचिन गोडांबे
  • ‘जय भीम’ या सिनेमाचं एक पोस्टर
  • Tue , 21 December 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar कार्ल मार्क्स Karl Marx पेरियार रामसामी Periyar Ramasamy बॉलिवुड Bollywood जय भीम Jai Bhim टी. जे. ज्ञानवेल T. J. Gnanavel सूर्या Suriya प्रकाश राज Prakash Raj

‘जय भीम’ हा तमीळ सिनेमा जबरदस्त आहे. इतर अनेक भाषांत तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. कायदेशीर मार्गांचा अवलंब करून आपण अन्यायग्रस्तांना कसा न्याय मिळवून देऊ शकतो, याचे हा सिनेमा उत्कृष्ट उदाहरण आहे. तसेच तो सामाजिक भान असलेल्या वकिलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. सुरुवातीलाच जेलमधून सुटलेल्यांना त्यांची जात विचारून त्यातील अनुसूचित जाती-जमातींच्या कैद्यांना जेलर वेगळे उभे करतो व इतरांना घरी सोडतो. त्याच वेळी त्यांना घेण्यासाठी विविध पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आलेले असतात, जे प्रलंबित खटल्यांमध्ये अडकवण्यासाठी त्यांना पुन्हा घेऊन जातात.

हा सिनेमा अतिशय वेगवान आहे, सुरुवातीपासूनच पकड घेतो. यात कोणतेही गाणे वा नृत्य नाही. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे शीर्षक ‘जयभीम’ असूनही यात एकदाही या नावाचा उल्लेख नाही. बाबासाहेबांचा उल्लेखही एक-दोनदाच आहे. परंतु नायक वकील चंद्रूच्या घरातली कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पेरियार रामसामी यांची छायाचित्रं खूप मोठा संदेश (जयभीम + लाल सलाम) देऊन जातात. नावाच्या जयघोषापेक्षा विचारांचा व कृतीचा जागर जास्त महत्त्वाचा आहे, तसेच आंबेडकरवाद पसरवण्यात अतिरेकी आंबेडकरवाद्यांचा व फक्त आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करून प्रत्यक्षात विसंगत कृती करणाऱ्यांचा मोठा अडथळा आहे, हा मोलाचा संदेश हा सिनेमा देतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आदिवासी राजकन्नु सरपंचाच्या घरातला साप पकडून देतो. पण नंतर चोरीच्या खोट्या आरोपाखाली त्याच्यावरच संशय घेऊन त्याला व इतर दोघांना न केलेला गुन्हा कबूल करण्यासाठी पोलीस कोठडीत अमानुष मारहाण केली जाते.

अत्याचाराने रक्तबंबाळ झालेला राजकन्नु उदगारतो – “जो गुन्हा नहीं किया, उसकी कबुली कैसी देगें सर?” हे भावनिक उदगार प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतात.

पोलीस कस्टडीत खून करून राजकन्नुच्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते आणि ते तिघे पोलीस स्टेशनमधून पळून गेल्याचे अनेक खोटे पुरावे उभे केले जातात. त्या प्रत्येक पुराव्याला खोडून काढताना वकील चंद्रू यांनी घेतलेली मेहनत प्रत्यक्ष पाहण्यासारखी आहे. उच्चभ्रू सरपंचाच्या घरी चोरी करणारा खरा चोर सापडूनही पोलीस त्याचा आरोप आदिवासी राजकन्नूवर थोपतात. त्याच्यावर अमानवी अत्याचार केला जातो. हा अत्याचार बघताना संताप येतो.

रक्ताळलेल्या जखमांवर हिरव्या मिरचीचा ठेचा चोळणे, मृत आहे की जिवंत हे पाहण्यासाठी डोळ्यात मिरची पूड टाकणे, राजकीय आणि कार्यालयीन वरिष्ठांचा दबाव, खालच्या जातीबद्दलचा द्वेष हे सारे क्रूर वास्तव ‘जयभीम’मध्ये आहे. पोलीस गरोदर संगिनीच्या पोटावरही लाथा मारतात.

बहुतांश पोलिसांना अत्याचारी म्हणणारा हा नायक वकील चंद्रू पोलीस खात्यात आयजीपी पेरुमलस्वामीसारखे चांगले अधिकारीसुद्धा आहेत, हेही जाणून असतो. त्यामुळे जेव्हा हा खटला सीबीआयकडे देण्याची तो मागणी करतो, तेव्हा न्यायाधीश स्वतःच सीबीआयचे वाभाडे काढत पूर्वीच्या खटल्यांमध्ये त्यांनी काय दिवे लावले, हे सांगत राज्यातील कोणी पोलीस अधिकारी या तपासात मदतीला हवा आहे का, हे वकील चंद्रूला विचारतात. तेव्हा तो ताबडतोब पेरुमलसामी यांचे नाव लिहून देतो. प्रकाश राज यांनी पेरुमलस्वामीची भूमिका अतिशय उत्कृष्ट साकारली आहे.

तपास सुरू करण्यापूर्वी चंद्रू त्यांना एका मिटिंगला यायला सांगतो, तिथे पोलिसी अत्याचाराचे बळी ठरलेल्या महिला, वृद्ध, लहान मुले असे अनेक जण छळछावणीचे, अत्याचाराचे वर्णन करतात, तेव्हा संवेदनशील मनाच्या पेरुमलस्वामीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

पुढे तपास सुरू झाल्यावर कायदेशीर न्यायालयीन लढाई, हेबियस कॉर्पस याचिकेचा अत्यंत प्रभावी वापर, पुरावे व तांत्रिक तपशील गोळा करण्यासाठी घेतलेली मेहनत, निष्पक्ष न्यायाधीश, पेरुमलस्वामीचा चांगला तपास, याद्वारे हा सिनेमा अतिशय उत्कृष्ट व वेगवान झाला आहे. सरकारी वकील निष्प्रभ ठरत असल्याचे दिसल्यावर खुद्द राज्याचे अ‍ॅटर्नी जनरल या खटल्यात उतरतात व हेबियस कॉर्पसच्या याचिकेला वकील चंद्रूने खुबीने ‘मर्डर ट्रायल’मध्ये बदलल्याचा न्यायालयात आरोप करतात, परंतु हा आरोप खोडून काढताना चंद्रू केरळ उच्च न्यायालयातील अशाच खटल्याचे उदाहरण युक्तिवाद जिंकतो.

हेबियस कॉर्पस (Habeous Corpus - Produce before the Court) ही भारतीय संविधानातील अतिशय पॉवरफुल तरतूद आहे. पोलीस वा इतर यंत्रणेने बेकायदेशीरपणे कोणाला पकडून न्यायालयासमोर २४ तासांत हजर केले नसेल, तर ही याचिका उच्च न्यायालया किंवा सर्वोच्च न्यायालयात दाखल करता येते आणि मग पोलिसांना न्यायालयासमोर त्या व्यक्तीला सादर करावेच लागते. हेबियस कॉर्पसची व्याप्ती वाढवून जिल्हा न्यायालयांतही त्या दाखल करता यायला हव्यात, असा बदल केला, तर पोलिसी अत्याचारांवर अजून वचक बसेल.

दक्षिणेतील सुपरस्टार सूर्या वकील चंद्रूच्या भूमिकेत सशक्त अभिनयाद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. त्याच्या घरात पेरियर, आंबेडकर, मार्क्स यांची छायाचित्रं दिसतात, जी या तिन्ही विचारधारा एकच आहेत, हा संदेश देण्याचं काम करतात. मानवाधिकाराचे खटले मोफत लढवणारा वकील चंद्रू  न्याय, समता, संविधान, कायद्यांची भाषा करतो. ‘कानून ही मेरा हथियार हैं’ म्हणत कायद्याची लढाई लढताना व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो. ‘कानून अंधा हैं, वो गुंगा भी हो गया तो मुश्कील हो जायेगी’ या उदगारातून तो न्यायव्यवस्थेलाही आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतो.

या सिनेमात आदिवासी कोणाला सर्पदंश झाला तर त्याला औषधोपचार करून बरे करणे, साप पकडणे, ग्रामस्थांचे अनेक श्वापदांपासून रक्षण करणारे आणि मांसाहार करणारे लोकही गुणवान, सुसंस्कृत असतात, हेही स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. आदिवासींचे अनेक हक्क-अधिकार हिरावून घेतले गेलेले आहेत. त्यांना हक्काचे घर, जमीन, शिक्षण नाही; त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही; जातप्रमाणपत्र मिळत नाही. त्यांनी सरंजामदाराच्या मर्जीवरती जगायचे, अशी एकूण विदारक परिस्थिती या चित्रपटात मांडलेली आहे. अशा अनेक जाती आहेत, त्यांच्यावर आजही ‘चोर’ असा शिक्का मारला जातो. चोरी नाही केली, तरी त्यांना समाजव्यवस्थेचे चटके सहन करावे लागतातच. या आदिवासींची बाजू मांडणारे वकील चंद्रू म्हणतो, “चोरी कोणत्या जातीचे लोक करत नाहीत? तुमच्या-माझ्या सर्वच जातींत मोठे चोर आहेत.” हा त्याचा युक्तिवाद वास्तवाला भिडणारा आहे. कोणाचाही प्रत्यक्ष खिसा न कापता किंवा घर न फोडतासुद्धा कोट्यवधी-अब्जावधी रुपयांची चोरी कॉर्पोरेट कर्जमाफीद्वारे केली जाते. वर हे चोर राजरोसपणे समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून वावरत असतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एखाद्या संवेदनशील प्रकरणात पोलीस व सरकारी यंत्रणा कसे काम करते, हे या सिनेमात प्रकर्षाने दिसते. चंद्रूसारखा प्रामाणिक, निर्भीड, कणखर, हिंमतवान, अभ्यासू, नि:स्वार्थी, संवेदनशील वकील कसा न्याय मिळवून देऊ शकतो, हे हा सिनेमा आपल्याला सांगतो. त्याचबरोबर आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाई किती महत्त्वपूर्ण आहे, हेही.

दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल यांनी ‘जयभीम’च्या रूपाने प्रचंड मोठे काम केले आहे. अभिनेता सूर्या, नायिका लिजोमोल जोसने (संगिनी), रजिशा विजयन, प्रकाशराज सिनेमा संपल्यावरदेखील लक्षात राहतात. आपल्या देशात आर्थिक विषमता भयानक आहे. उदरनिर्वाहाची साधने मुबलक असली तरी चोरी रोखता येणार नाही, इतकी विदारक परिस्थिती आहे. ‘सुजाता’, ‘अछूत कन्या’, ‘चक्रव्यूह’, ‘आरक्षण’, ‘काला’, ‘कर्णन’सारखे अपवाद वगळता इथल्या भीषण जातवास्तवाबाबत बॉलिवुडने मूक राहण्यातच धन्यता मानली आहे. ‘चक्रव्यूह’ सिनेमात तर पोलीस हेर बनून आदिवासींमध्ये गेलेला अभय देओल त्यांच्यावरील पोलिसी अत्याचार पाहून त्यांचाच रक्षणकर्ता कसा बनतो, हे दाखवले आहे. नागराज मंजुळेच्या ‘फॅन्ड्री’ व ‘सैराट’ने जातव्यवस्थेवर उत्तम प्रकारे प्रकाश टाकला आहे.

अलीकडच्या काळात पुरुषसत्ता, वर्ण-वर्ग जातीच्या प्रभुत्वास व वर्चस्वास आव्हान देणारे चित्रण प्रामुख्याने तमिळ सिनेमांमधून दिसत आहे. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही देशातील आदिवासी, दलित, पीडितांना काय मिळाले? या लोकांच्या डोक्यावर हक्काचं छत नाही. आजही त्यातील अनेकांना कायमस्वरूपी पत्ता नाही, रेशनकार्ड नाही. जंगलात राहणाऱ्या या लोकांना मत देण्याचा अधिकार नाही. ‘आदिवासींना शिक्षण आणि मत टाकण्याचा अधिकार कशासाठी हवा? या लोकांना मतदानाचा अधिकार दिला तर यांच्या झोपडीत जाऊन मतांसाठी भीक मागावी लागेल’, हा ‘जय भीम’मधील संवाद एका भीषण वास्तवाची जळजळीत जाणीव करून देणारा आहे. ‘तुम्ही गुन्हेगार आहात, गुन्हेगार म्हणूनच रहा. सुधारण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करू नका’ असाच त्याचा अर्थ.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

‘उचल्या’कार लक्ष्मण माने यांनी एकदा मोर्चा काढून पारधी समाजासाठी ‘चोरी’चे परमिट पोलिसांकडून मागितलं होतं. कारण पोलीस पारधी, उचल्यांसह अनेक जमातींवरील गुन्हेगारीचा शिक्का पुसायला तयार नाहीत. त्यांना माणूस म्हणून जगू देत नाहीत. कुठेही चोरी झाली, खून झाला तर याच समाजाच्या पोरांना उचलून आणतात व न केलेला गुन्हा कबूल करायला लावतात. या सगळ्या अन्यायाविरुद्ध वकील चंद्रू लढा देतो. खोटी प्रकरणे, खोट्या केसेसमध्ये अडकवून जंगलातील आदिवासींना एकतर तुरुंगात सडवले जाते किंवा पोलीस चकमकीत ठार मारले जाते. हा अत्याचार आणि कायद्याची बेबंदशाही यांविरोधात चंद्रूसारखे वकील उभे राहतात, तेव्हा त्यांना ‘देशद्रोही’, राज्य उलथवण्याचा कट रचणारे ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो.

दक्षिणेतील अनेक सिनेमांत पुरोगामी तसेच जातीचे विषय हाताळले जात आहेत, परंतु अजूनही बॉलिवुडची जातीय मानसिकता बदलत नाहीये. ‘काला’, ‘कबाली’, ‘कर्नन’ व आता ‘जयभीम’ने या सर्वांवर मात करत उत्कृष्ट संदेश दिला आहे. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील एकदा म्हणाले होते, ‘नक्षलवादाच्या समस्येचे मूळ मंत्रालयाच्या (खरे तर सचिवालयाच्या) सहाव्या मजल्यावर आहे.’ आपण पाहतो की, दहशतवादाच्या नावाखाली निरपराध मुस्लिमांच्या व नक्षलवादाच्या नावाखाली निरपराध दलित, आदिवासींच्या हत्या केल्या जात आहेत. पोलीस थिअरीवर शोध-पत्रकार व गोदी मीडिया प्रश्न उपस्थित करत नाही, न्यायिक चौकशीची मागणी करत नाही, पोलिसांनी तयार केलेले खोटे पुरावे, साक्षीदार यावर संशय घेत नाही. नेमके यावरच या सिनेमाचा नायक वकील चंद्रूने प्रभावीपणे बोट ठेवले आहे.

राजकन्नुची पत्नी संगिनीची जिद्द, लढाई, हार न मानता संघर्ष करणे, याचे उत्कृष्ट चित्रण या सिनेमात आहे. तिला मदत करणारी शिक्षिका, वकील चंद्रू, राजकन्नुसाठी मोर्चा काढणारे व संघर्ष करणारे राजकीय पक्ष, हे सर्व डाव्या कम्युनिष्ट विचारांचे दाखवले आहेत. त्यातून अर्धवट आंबेडकरवाद्यांना सणसणीत चपराक लगावली गेली आहे. तसेच भारतीय व्यवस्थेत जातीअंताच्या मुद्द्याला दुर्लक्ष करून डावी चळवळ पुढे जाऊ शकत नाही, हेही अधोरेखित करून या सिनेमाने अर्धवट कम्युनिस्टांच्याही कानाखाली लगावली आहे.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा 

‘जय भीम’ हा ‘समांतर सिनेमा’ प्रवाहाला मजबूत करणारा आणि ‘समांतर सिनेमा’ चळवळीतला ‘माईलस्टोन सिनेमा’ म्हणून ओळखला जाईल…

या सिनेमाचं ‘जय भीम’ हे शीर्षक अनेक क्रांतिकारक विचारांचं सिन्थेसिस म्हणून वापरलं आहे!

‘जय भीम’चा घोष न करताही ‘जय भीम’ म्हणता येतं, जो सिनेमाचा नायक सूर्यानं सगळ्या व्यवस्थेला केला आहे

‘जय भीम’ हा तुमचा आवाज आहे, तुमचा उच्चार आहे, हा विश्वास हा चित्रपट आपल्या मनात आणि दलित, पीडित वर्गाच्या अंतकरणात निर्माण करतो

‘जय श्रीराम’ची जागा घेण्यासाठी ‘जय भीम’ आला आहे…

‘जय भीम’ : भारतीय समाजामध्ये व्यक्तीच्या आणि समाजसमूहांच्या सामाजिक व न्यायिक प्रतिष्ठेकरता लढले जाणारे विविधांगी विचारांचे लढे अंतिमतः आंबेडकरांच्या विचारमार्गानेच परिपूर्ण होऊ शकतात, हा विधायक मूल्यसंदेश या चित्रपटाने भारतीय समाजापुढे ठेवला आहे

..................................................................................................................................................................

लेखक सचिन गोडांबे सामाजिक कार्यकर्ते आहेत.

yuvasachin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख