अजूनकाही
बेव्हर्ली हिल्सचं चकाचक, आलिशान, उच्चभ्रू वातावरण. डिक्सन स्टील (हम्फ्री बोगार्ट) हॉलिवुडचा एक बऱ्यापैकी यशस्वी लेखक, पण सध्या त्याच्याकडे काही काम नाही. याला त्याचा स्वभावच जबाबदार आहे. अफाट दारू पिणं, मारामाऱ्या करणं, कोणाचीही तमा न बाळगणं, रागानं बेभान झाल्यानंतर प्रसंगी बाईलादेखील मारहाण करणं... हॉलिवुडसारखं ठिकाण जिथं अफवांचं पीक जोमानं घेतलं जातं, तिथं स्टीलच्या अशा वागण्याची चर्चा झाली नाही तरच नवल. एकदा तर पटकथेवरून भांडण झालं तर याने निर्मात्याचंच थोबाड फोडलं. स्वाभाविकपणे त्याला काम मिळणं बंद झालं. त्याचा एजंट त्याला काम मिळवून देण्यासाठी धडपडतोय, पण याचा तोरा कायम आहे. याला कोणी मित्र नाही, कोणी आप्त नाही, स्वतःचं असं कोणीच नाही. अशात समोरच्याच घरात राहणारी एक सुंदर, आकर्षक, हॉलिवुडमध्ये मोठी संधी मिळावी, म्हणून धडपडणारी अभिनेत्री लॉरेल ग्रे (ग्लोरिया ग्रॅहम) त्याच्या जवळ येते. दोघांमध्ये उत्कट रोमान्स फुलतो. स्टीलला ज्या एका भक्कम आधाराची गरज असते, तो ग्रेच्या रूपाने त्याला मिळतो. त्याच्यातला लेखक पुन्हा फुलायला लागतो आणि सर्व काही आलबेल झालंय, असं वाटत असतानाच दुधात मिठाचा खडा पडतो.
आहे ना एखाद्या टिपिकल रोमँटिक चित्रपटाची गोष्ट? हजारो प्रेमकथांवर पोसलेल्या आपल्यासारख्या हिंदी चित्रपटांच्या प्रेक्षकाला तर अर्ध्या रात्री झोपेतून उठवून विचारलं की, सांग आता पुढे काय होणार, तरी तो सहज सांगू शकेल. पण इथंच नेमका चकवा आहे. प्रतिभावान दिग्दर्शक निकोलस रे याच्या ‘इन अ लोनली प्लेस’ची बातच काही और आहे. ही साधीसरळ प्रेमकथा नाही. यात एक खून आहे, पण ही मर्डर मिस्ट्री नाही. यात आवेग आहे, उत्कंठा आहे, पण हा नुसताच थ्रिलर नाही. यात हॉलिवुडचं अंतरंग आहे, पण हा बिली वाइल्डरच्या ‘सनसेट बुलेवार्ड’सारखा चित्रपटसृष्टीची अंधारी, करुण बाजू दाखवणारा चित्रपट नाही. या सर्वांच्या पलिकडे जाणारा, हे सर्व ज्यॉनर आत्मसात करून वर दशांगुळं उरणारा हा भलताच थोर चित्रपट आहे.
‘इन अ लोनली प्लेस’ अव्वल दर्जाचा, रसरशीत न्वार आहे. पतंगाने दिव्याकडे झेप घ्यावी, तसा पुन्हा पुन्हा आत्मनाशाकडे झेपावणारा नायक, आपण चुकतोय, हे दिसत असूनही स्वेच्छेनं त्या चुकीच्या वाटेवर चालत अटळ विनाश ओढवून घेणारी नायिका, नायकाची संदिग्ध वर्तणूक, नैतिक अधःपतन, खून, पोलिस तपास आणि ब्लॅक अँड व्हाइटचा अद्भुत खेळ असा न्वारचा सर्व जामानिमा घेऊन ‘इन अ लोनली प्लेस’ आपल्यासमोर येतो. पण या सर्वांना व्यापून राहते ती अतिभव्य, करुण आणि मनाला हुरहूर लावणारी प्रेमकहाणी.
ओबडधोबड चेहऱ्याच्या, तिखट वाणीच्या, लोकांशी फटकून वागणाऱ्या हम्फ्री बोगार्टच्या चेहऱ्यावर एक प्रकारची व्हल्नरेबिलिटी आहे. त्याचा सर्व अॅरोगन्स, त्याचा फटकळपणा सहन करूनही या माणसावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. त्याच्या या क्वालिटीचा पुरेपूर वापर दिग्दर्शक निकोलस रे याने ‘इन अ लोनली प्लेस’मध्ये करून घेतलाय. बोगार्ट स्वतः या चित्रपटाचा निर्माता होता. यातल्या डिक्सन स्टीलचं वास्तवातल्या बोगार्टशी बरंचसं साधर्म्य होतं. डिक्सन स्टील हा सतत धुमसणारा, फटकळ, हिंसक. बोगार्टही बराचसा तसाच. त्यामुळे बोगार्टने पडद्यावर ज्या काही व्यक्तिरेखा साकारल्या, त्यात डिक्सन स्टील ही व्यक्तिरेखा त्याच्या सर्वाधिक जवळ जाणारी होती आणि अनेक समीक्षकांच्या मते बोगार्टची यातली कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे.
चित्रपटाच्या पहिल्याच प्रसंगात डिक्सन स्टील नेमकी काय चीज आहे, ते दिसून येतं. बेव्हर्ली हिल्सच्या निर्मनुष्य रस्त्यांवर गाड्यांची किरकोळ वर्दळ आहे. सिग्नलला स्टीलची गाडी येऊन थांबते. शेजारच्या गाडीत एक मध्यमवयीन जोडपं आहे. गाडीतली बाई स्टीलला ओळखते. स्टील तिला अर्थातच ओळखत नाही. ‘मी तुम्ही लिहिलेल्या अमक्या अमक्या चित्रपटात काम केलं होतं,’ ती त्याला सांगते. तो बेमुर्वतपणे तिला ‘मी स्वतः लिहिलेले चित्रपट कधीच बघत नाही,’ असं सांगतो. तेवढ्यात तिचा नवरा त्याला हटकून माझ्या बायकोला त्रास देणं थांबव, असं सांगतो. स्टीलचा पारा चढतो. तो त्याला मारायला गाडीतून खाली उतरणार तेवढ्यात सिग्नल मिळून ती गाडी निघून जाते. पुढच्याच प्रसंगात क्लबमध्ये एका स्टुडिओ मालकाच्या मुलाशी स्टीलची मारामारी होते.
या दोन्ही प्रसंगांमध्ये डिक्सन स्टील ही स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू न शकणारी आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून थेट हाणामारी करायलाही मागेपुढे न बघणारी व्यक्ती म्हणून समोर येते. पण ही व्यक्तिरेखा अतिशय गुंतागुंतीची, क्लिष्ट आहे. स्टील मुळात असा का आहे, याचं कुठलंही स्पष्टीकरण नाही, पण त्याची आवश्यकताही नाही. एरवी नॉर्मल असताना त्याच्या मनात कोणाविषयी अजिबात राग, कटुता नसते. मी बरा आणि माझं काम बरं, असा त्याचा खाक्या असतो. प्रसंगी तो खेळकरही आहे. वर उल्लेखलेया प्रसंगाच्या शेवटी तो क्लबमध्ये येतो. क्लबच्या दरवाजापाशीच एक मुलगा त्याच्याकडे ऑटोग्राफ मागतो. स्वाभाविकपणे तिकडे हॉलिवुडची अनेक मंडळी येतात. त्यामुळे हा देखील त्यापैकीच एक कोणीतरी असला पाहिजे, या भावनेनं तो मुलगा ऑटोग्राफ मागतो. ‘मी कोण आहे तुला माहितीये?,’ स्टील त्याला विचारतो. ‘नाही,’ मुलगा प्रांजळपणे उत्तरतो. तरीही स्टील त्याला ऑटोग्राफ देत असताना शेजारची लहान मुलगी त्या मुलाला म्हणते, ‘कशाला त्रास घेतोस? तो फार काही कोणी महत्त्वाचा नाही!’ यावर एरवी स्टील चिडला असता, कदाचित त्याने मारामारीही केली असती. पण तो त्या मुलाला हसून म्हणतो, ‘ती बरोबर बोलतेय’. पण त्याच्या मनात कुठेतरी असुरक्षिततेची भावना आहे. ही भावना तो ज्या हॉलिवुडमध्ये लेखक आहे, त्या हॉलिवुडचंच एक प्रकारे प्रतीक आहे. या असुरक्षिततेच्या भावनेपोटीच त्याच्यावर प्रेयसीला गमावण्याची वेळ येते.
क्लबमधल्या त्या प्रसंगात स्टीलचा एजंट त्याला एक कादंबरी वाचायला देतो. त्या कादंबरीवरून त्याने चित्रपटासाठी पटकथा लिहावी, अशी त्याची इच्छा असते. ‘तू बऱ्याच काळात काही लिहिलं नाहीयेस. तुझ्या करिअरसाठी हे चांगलं नाही,’ एजंट त्याला सांगतो. मला आवडेल, पटेल, असंच काम करायचंय, स्टील त्याला स्पष्ट शब्दांत सुनावतो. पण तरीही ती कादंबरी वाचायला तो तयार होतो. स्टील क्लबमध्ये येण्यापूर्वी ती कादंबरी वाचत बसलेल्या, तिथल्या ग्राहकांच्या हॅट्स सांभाळण्याचं काम करणाऱ्या मुलीला तो आपल्यासोबत घरी यायची विनंती करतो. मी खूप दमलोय आणि मला ही कादंबरी वाचायचीय, पण मला इच्छा नाही. तू ती वाचली आहेस, तर मला गोष्ट ऐकव, असं तो तिला सांगतो. ती तयार होते आणि त्याच्यासोबत घरी येते. गोष्ट ऐकवून निघून जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता डिटेक्टिव सार्जंट ब्रब निकोलाय स्टीलचं दार ठोठावतो. जी मुलगी रात्री स्टीलच्या घरी आली होती तिचा खून झालाय, तिला धावत्या गाडीतून कोणीतरी फेकून दिलंय, निकोलाय त्याला सांगतो आणि स्टीलला पोलिस स्टेशनला घेऊन जातो. अनेकांनी या मुलीला शेवटचं स्टीलबरोबर पाहिलेलं असतं, त्यामुळे स्वाभाविकच प्रमुख संशयित म्हणून स्टीलचं नाव समोर येतं. त्यातच स्टीलला त्या मुलीच्या हत्येची बातमी ऐकून धक्काबिक्का काही बसत नाही. जणू काही दाराबाहेर ठेवलेली दुधाची पिशवी चोरीला गेली असावी, इतक्या तटस्थपणे तो त्या बातमीवर प्रतिक्रिया देतो. पोलिस प्रमुख त्याला विचारतो देखील- ‘अवघ्या काही तासांपूर्वी तू ज्या मुलीसोबत होतास, तिचा अत्यंत निर्दयपणे खून झाल्याचं मी तुला सांगतोय, आणि तुझी प्रतिक्रिया काय आहे? तुला धक्का बसलाय? तुला वाईट वाटलंय? नाही, तर एवढ्या पहाटे तुझी झोपमोड करून तुझी चौकशी सुरू आहे, म्हणून तुझी चीडचीड होतेय. काही फालतू जोक्सही तू मारलेस.’ त्यावर स्टील बेदरकारपणे उत्तरतो, ‘जोक्सचा दर्जा चांगला असू शकला असता, हे मला अगदीच मान्य आहे. पण मी कुठल्याही प्रकारच्या भावना व्यक्त केल्या नाहीत, म्हणून तुम्ही मला अटक करणार आहात का?’
ती मुलगी स्टीलच्या घरातून सुखरूप बाहेर पडली, असं सांगणारं कोणी मिळालं नाही तर पोलिस स्टीलला अटक करण्याच्या तयारीत असतात. पण तेवढ्यात स्टीलला आपल्या शेजारणीची आठवण होते. तिला पाचारण केलं जातं आणि ती स्टीलच्या बाजूनं साक्ष देते. पोलिस स्टीलला सोडतात खरं, पण त्यांचा त्याच्यावरचा संशय कमी होत नाही. याचं कारण स्टीलचा पूर्वेतिहास, त्याने अनेकदा केलेल्या मारामाऱ्या, त्याच्याविरोधात पोलिसात वेळोवेळी झालेल्या तक्रारी. इकडे स्टील आणि त्याची ती शेजारीण लॉरेल ग्रे एकमेकांच्या प्रेमात पडतात. स्टील तिच्याशिवाय राहू शकत नाही. लॉरेलसुद्धा एखाद्या लहान मुलासारखी त्याची काळजी घेऊ लागते, त्याच्यातल्या लेखकाला जपू लागते. पण सर्व काही सुखात, आनंदात सुरू असतानाच स्टीलचा रागीट, हिंसक स्वभाव पुन्हा पुन्हा उफाळून वर येत राहतो. स्टीलचं हे रूप वारंवार जवळून बघितल्यावर लॉरेलच्याही मनात स्टीलनेच तर त्या मुलीचा खून केला नसेल ना, अशी शंका भेडसावायला लागते. पण आता परतीचे दोर कापले गेलेले असतात. आता स्टीलला नकार दिला तर आपलाही जीव धोक्यात येऊ शकतो, याची तिला जाणीव होते. मनाच्या खोल, अंधाऱ्या तळाशी भीतीदायक सावल्या पुन्हा पुन्हा फेर धरून नाचत राहतात.
यात आणखी एक अफलातून प्रसंग आहे. स्टीलकडे पहाटे पाच वाजता त्याला पोलिस स्टेशनला घेऊन जायला आलेला सार्जंट निकोलाय हा दुसऱ्या महायुद्धातला स्टीलचा कनिष्ठ सहकारी आहे. लॉरेलने स्टीलच्या बाजूने साक्ष दिल्यानंतरही पोलिसांचा त्याच्यावरचा संशय पुरता फिटलेला नसतो. म्हणून निकोलाय त्याला एके रात्री आपल्या घरी जेवायला बोलावतो. निकोलायची बायको मानसशास्त्राची अभ्यासक आहे. स्टीलचं वागणं, त्याचे हावभाव बघून ती त्याचा अंदाज घेणार, असं दोघांमध्ये ठरलेलं असतं. अर्थात स्टीलला याची काहीच कल्पना नाही. जेवणाच्या टेबलवर विषय अर्थातच त्या मुलीच्या खुनाभोवतीच फिरतो. स्टील निकोलायला ही मिस्ट्री सोडवण्यासाठी मी काही मदत करू का असं विचारतो आणि मग स्वतःची थिअरी सांगतो. तो निकोलाय आणि त्याच्या बायकोला एकमेकांच्या शेजारी बसवतो आणि स्वतः त्यांच्या समोर बसतो. तो निकोलायला म्हणतो, असं समज की तू गाडी चालवतोयस आणि ती मुलगी शेजारच्या सीटवर बसली आहे. आता तू तुझ्या बायकोच्या मानेभोवती तुझा हात घाल, आता हळूहळू दाब, दाब, हळूहळू, आता पकड घट्ट कर, अजून घट्ट कर... निकोलाय खरंच आपल्या बायकोचा गळा दाबतो, ती अस्वस्थ होते आणि निकोलायला भानावर आणते. या संपूर्ण प्रसंगात जवळपास ९० टक्के वेळ कॅमेरा बोगार्टचे खुनशी हावभाव टिपतो आणि ज्या क्षणी निकोलायची बायको आपल्या नवऱ्याला भानावर आणते, त्याक्षणी बोगार्टचा चेहरा पुन्हा नॉर्मल होतो.
संस्मरणीय संवाद हे ‘इन अ लोनली प्लेस’चं आणखी एक वैशिष्ट्य. स्टील निकोलायच्या बायकोला म्हणतो, ‘मी त्या मुलीला इतक्या ओबडधोबड पद्धतीनं मारलं नसतं. मी कलावंत आहे आणि तिची हत्याच करायची असती तर कलात्मक पद्धतीनंच केली असती.’ स्टील ज्या पटकथेवर काम करत असतो, त्यासाठी त्याला एक छान वाक्य सुचतं. ‘I was born when she kissed me, I died when she left me. I lived a few weeks while she loved me.’ पण पटकथेत ते नेमकं कुठे वापरायचं, हे त्याला सुचत नाही. पण या प्रेमकथेची शोकांतिका ही आहे की, अखेरीस हे वाक्य स्टीलला उद्देशून म्हणण्याची वेळ लॉरेलवरच येते. किंबहुना या एका संवादात डिक्सन स्टीलची अवघी शोकांतिका सामावली आहे.
‘इन अ लोनली प्लेस’ बघताना हिचकॉकच्या ‘शॅडो ऑफ अ डाउट’ची आठवण येते. एखाद्याविषयी खात्री नाही, पण नुसताच पराकोटीचा संशय आहे. आणि या संशयानंच त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं. बरं ज्याच्याविषयी संशय आहे त्याला सगळं कळूनसवरूनही तो पुन्हा पुन्हा आत्मनाशाकडे झेपावत राहतो. त्याच्यातला हिंस्त्र पशू पुन्हा पुन्हा डोकं वर काढत राहतो. त्यामुळे त्याचं यश आणि त्याचं व्यक्तिगत आयुष्य दोन्ही झाकोळून जातं. पण तो स्वभावापुढे हतबल आहे आणि नायिका परिस्थितीपुढे. दोघांचीही नियतीच्या क्रूर खेळात दमछाक होत राहते.
निकोलस रे हा ५०च्या दशकातला एक अत्यंत महत्त्वाचा दिग्दर्शक. त्याच्या चित्रपटांनी तिकीटबारीवर हंगामा केला अशातला भाग नाही. पण फ्रेंच न्यू वेव्ह सिनेमांवर निकोलस रे चा गहिरा प्रभाव होता. गोदार्द, त्रुफाँ हे रे चे फॅन होते. ‘सिनेमा इज निकोलस रे’ हे गोदार्दचं प्रसिद्ध वाक्य आहे. ‘रेबेल विदाइट अ कॉज’ हा त्याचा सर्वाधिक चर्चित चित्रपट. ‘दे लिव्ह बाय नाइट’ हा त्याचा पहिला चित्रपट. याही चित्रपटात त्याने एका असफल प्रेमाची कथा न्वार शैलीत मांडली होती. पुढल्याच वर्षी बोगार्टने त्याला आपल्या निर्मिती संस्थेचा ‘नॉक ऑन एनी डोअर’ हा चित्रपट दिग्दर्शित करायला दिला. चित्रपटाला मर्यादित यश मिळालं. चित्रपटाच्या पांडित्यपूर्ण आविर्भावाला समीक्षकांनीही चांगलंच झोडपलं, पण बोगार्टला रेच्या क्राफ्टने प्रभावित केलं होतं. त्याने पुन्हा लगोलग रे सोबत ‘इन अ लोनली प्लेस’ करण्याचा निर्णय घेतला. डोरोथी ह्यूज या लेखिकेची कादंबरी बोगार्टला भावली होती, पण या कादंबरीत बरेच बदल करत रे आणि बोगार्टने ती रुपेरी पडद्यावर उतरवली. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी त्याला फारसं यश मिळालं नाही, पण आज ‘इन अ लोनली प्लेस’ हा रे-बोगार्ट जोडीचा मास्टरपीस मानला जातो आणि डिक्सन स्टील ही बोगार्टची सर्वोत्कृष्ट अदाकारी!
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment