बांगला देश मुक्तिसंग्राम संपला, त्या घटनेला कालच्या १६ डिसेंबर २०२१ रोजी ५० वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्तानं साधना प्रकाशनाकडून अलीकडेच प्रकाशित झालेल्या माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले लिखित ‘विप्लवी बांगला सोनार बांगला’ या पुस्तकाला निवृत्त निवृत्त केंद्रीय गृह व न्याय सचिव माधव गोडबोले यांची ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचा हा लेखसंग्रह वैशिष्ट्यपूर्ण म्हणावा लागेल, कारण त्यात त्यांनी बांगला देशच्या निर्मितीच्या काळातील व त्यानंतरच्या ५० वर्षांच्या कालावधीत झालेली स्थित्यंतरे अत्यंत मार्मिकपणे समोर ठेवली आहेत. कायद्याचे विद्यार्थी असताना १९७१ साली त्यांनी, युवक क्रांती दलातील हुसेन दलवाई व त्यांच्या इतर काही मित्रांसमवेत निर्वासितांच्या छावण्यांत जाऊन प्रत्यक्ष काम केले होते. त्यातूनच त्यांची सामाजिक विषयांबाबतची वैचारिक बांधिलकी, तळमळ व सहृदयता दिसून येते. एका सर्वसाधारण दिवसाचा कार्यभाग वर्णन करताना त्यांनी लिहिले आहे, ‘सकाळी झाडू-टोपल्या घेऊन सफाईसाठी छावणीवर गेलो. गटा-गटांनी विभाग वाटून घेतले होते. बाहेर केलेले परसाकडणे, ओकणे, टाकलेला कचरा हे सारेच काढायचे होते. निर्वासित मंडळी आमचे काम कुतूहलाने पाहत होती. लांबलांबची ही ‘सफेदपोश’ मुले-मुली असली कामे करताहेत, याचे कौतुक त्यांच्या डोळ्यांतून ओसंडत होते.’
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
गोखले यांच्या लेखांत त्यांना दिसून आलेल्या सामाजिक अन्यायाबाबतचे उल्लेख लक्षणीय आहेत. उदाहरणार्थ, ‘चहाच्या मळ्यातील मजुरांची दयनीय परिस्थिती, इंग्रजाळलेल्या जमीनदारसाहेबांनी ब्रिटिशांच्या बाह्य अनुकरणात तसूभरसुद्धा कमतरता येऊ दिलेली दिसत नव्हती, रणबहादूरच्या उघड्या-नागड्या पोराला मी बशीतून चहा पाजला आणि रणबहादुरच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.’
आमबाडी इस्टेटवरील चहाच्या मळ्यातील परिस्थितीबाबत त्यांनी लिहिले आहे की, ‘मळेवाल्यांचा को-ऑपरेटिव्ह क्लब होता. तिथे खुल्या मैदानात, निळ्या आकाशाखाली देशी आणि विदेशी साहेबांचे घोड्यावर बसून खेळ चालले होते. कलकत्त्याच्या हजार मैल उत्तरेला असला तरी त्या बनारहाटच्या क्लबमध्ये रात्रीच्या वेळी विदेशी मद्याच्या बाटल्या फुटतात. धुंद संगीतात नृत्याची पावले पडतात आणि मग चोहोबाजूंनी पसरलेल्या हजारो शोषितांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत.’
नक्षलवाद्यांनी भीषण हत्या केलेल्या एका नामवंत पुढाऱ्याच्या पत्नीबाबत लिहिताना त्यांनी म्हटले आहे की, ‘डोळ्यांत अश्रूचा एकही थेंब नव्हता! दुःखच एवढे, त्याला अश्रू तरी कसे पुरणार? या खुनानंतर तिच्या घरी यायची भीती वाटते म्हणून तिच्या मैत्रीणीही येईनाशा झाल्या! दुःख सांगणार तरी कोणाला? डोक्यात आग भडकत चालली होती, टाहो फोडून ओरडावेसे वाटले. काय पाप केलं होतं नानीदांनी?’
त्या काळातील नक्षलवादी व माओवादी बंगालचे विदारक चित्रण त्यांच्या लेखांत दिसून येते.
पश्चिम पाकिस्तानमधील मोठ्या वर्चस्व गाजवणाऱ्या २०-२२ कुटुंबांबद्दल वाचण्यात आले होते. पण पूर्व बंगालमध्येही अशी २२ कुटुंबे होती असे दिसते. अब्दुल रौफ यांनी रोखठोकपणे म्हटले होते की, या २२ कुटुंबांची भांडवलशाही आता चालू देणार नाही. आम्ही लढत आहोत शोषणाविरुद्ध; मग ते देशाच्या बाहेरून येणारे असो व अंतर्गत.
आसामच्या भौगोलिक परिस्थितीमुळे तो प्रांत ब्रिटिश राजवटीपासून चर्चेत राहिला होता. मोठा भूप्रदेश आणि कमी लोकसंख्या यामुळे शेजारच्या प्रांतांतून येणाऱ्या लोकांचा कल केवळ शेतमजुरीकडेच नव्हता, तर आसाममधील जमीन घेण्याकडेही होता. अशा तत्कालीन स्थलांतरितांमध्ये तत्कालीन पूर्व बंगालचा मोठा वाटा होता. हिंदुस्थानची दोन शकले होण्याची वेळ आली, तेव्हा पाकिस्तानने आसामवरही हक्क सांगितला होता.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
या पार्श्वभूमीवर पूर्व पाकिस्तानमधून येणाऱ्या स्थलांतरितांच्या लोंढ्याचा प्रश्न प्रथमपासूनच भारताला भेडसावत होता. या बाबतीतील ध्येयधोरणांशी माझा अनेक वर्षे जवळून संबंध आल्याने या प्रश्नाचे उग्र स्वरूप मला जाणवत गेले होते. कारगिल युद्धानंतर भारताच्या संरक्षणविषयक बाबींचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने चार अभ्यासगट स्थापन केले होते. त्यातील आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापनाच्या अभ्यासगटाचा मी अध्यक्ष होतो. या व इतर तीनही अभ्यासगटांनी त्यांचे अहवाल केंद्र शासनाला २००० साली सादर केले. त्यातील आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापनाच्या गटाने बांगलादेशमधून अविरत येणाऱ्या स्थलांतरितांच्या लोंढ्याबाबत चिंता व्यक्त केली होती आणि याबाबतीत धोरणात्मक सुधारणा सुचवल्या होत्या.
त्या काळात बांगला देश व भारताच्या विकासदरात इतका मोठा फरक होता की, रोजगाराच्या संधी भारतातच उपलब्ध होत असल्याने बांगलादेशातून येणाऱ्या स्थलांतरितांचा प्रश्न कसा मार्गी लागेल हा गहन विषय होता. त्यातच बांगला देशातील काही विचारवंतांनी ‘लेबेन्स-राउम’ (Lebensraum) हा विचार मांडला होता. त्यानुसार एखाद्या देशातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी संलग्न देशातील जमिनीवरही हक्क सांगणे योग्यच असावे, असे प्रतिपादन केले होते. त्यानुसार बंगाला देशातील स्थलांतरितांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आसाम राज्यातील जमिनी, सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, ही विचारप्रणाली भारतासाठी चिंतेची होती.
त्यातच या स्थलांतरितांमध्ये मुसलमानांचे प्रमाण खूप अधिक असल्याने या प्रश्नाला जातीय स्वरूप आले होते. त्या काळात आसाममध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाने मतांच्या राजकारणासाठी या प्रश्नाला कधी हात घातलाच नव्हता. या सर्वांतून उभ्या राहिलेल्या तीव्र आंदोलनाला शेवटी, १९८४ साली, आसाम कराराद्वारे पूर्णविराम देण्यात आला. पण त्यातून निर्माण झालेले प्रश्न उदाहरणार्थ, नवा नागरिकत्वाचा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूचीचे गठण यांसारखे गहन प्रश्न निर्माण झाले. या दोन्ही बाबतीत भारतात अजूनही राष्ट्रीय सहमती होऊ शकलेली नाही.
अशा तऱ्हेने अनेक वर्षे बांगला देशमधून भारतात अविरत येणाऱ्या स्थलांतरितांमुळे निर्माण झालेली त्या देशाची प्रतिमा बदलण्यास कारणीभूत झालेल्या ज्या काही मोजक्या पुस्तकांचा उल्लेख करता येईल, त्यात न्यायमूर्ती गोखले यांचे हे पुस्तक अग्रक्रमाचे असेल. गेल्या काही वर्षांतील बांगलादेशच्या प्रगतीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची वाखाणणी केली जात आहे. पण केवळ आकडेवारीवरून कोणत्याही देशाचे खरे सामाजिक व वैचारिक परिवर्तन होत आहे किंवा नाही हे कळणे कठीण असते. न्यायमूर्ती गोखले यांच्या या लेखांनी ती उणीव भरून येते.
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
बांगला देशच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात झाली, तेव्हा भारतातील काही लोकांना असे वाटत होते की, भारताने बांगला देशच्या स्वातंत्र्यासाठी मदत करू नये, कारण त्यामुळे देशाच्या दोन्ही बाजूंना दोन स्वतंत्र पाकिस्तान तयार होतील. बहुसंख्य बिहारी मुसलमानांचाही या स्वातंत्र्यलढ्याला विरोध होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानचे विभाजन होऊ देण्यास सर्वच राष्ट्रांचा विरोध होता. गोखले यांनी या परिस्थितीचे वर्णन चपखलपणे केले आहे. ‘मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची’, हा प्रश्न भारतासारख्या देशासमोर, तर ‘हे मांजर आपल्या तटाखाली कसे ओढायचे’ हा प्रश्न बड्या राष्ट्रांसमोर होता. देशांतर्गत व देशाबाहेरून अशा तऱ्हेने विरोध असतानाही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अतिशय कौशल्याने मार्ग काढून बांगलादेशच्या निर्मितीला मोठा हातभार लावला. गोखल्यांच्या लेखांतही इंदिरा गांधींच्या या धोरणावर बांगला देशमधील लोकांनी, तसेच भारतातही टीका केली होती, याचा उल्लेख केला आहे.
या बाबतीत धर्मावर आधारित पाकिस्तानच्या निर्मितीचा संबंधही महत्त्वाचा होता. केवळ धर्माच्या आधारावर पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जीनांनी लावून धरली होती. पूर्व व पश्चिम पाकिस्तान यात १००० मैलाहूनही अधिक अंतर होते. या दोन भागांना जोडण्यासाठी एक मार्गिका निर्माण करण्यासाठी हिंदुस्तानने मान्यता द्यावी, असाही प्रयत्न झाला. हे मान्य करणे हिंदुस्तानला शक्यच नव्हते, पण बांगला देशाच्या निर्मितीने हे दाखवून दिले की, एकसंधतेसाठी देशाचे दोन भाग केवळ एकाच धर्माचे असणे पुरेसे नसते. त्यांची मने जुळावी लागतात, परस्परांच्या संस्कृतीबद्दल, भाषेबद्दल आदराची भावना असावी लागते. त्याऐवजी १९५२मध्ये पूर्व पाकिस्तानात उर्दू भाषेची सक्ती करण्यात आली व १९६०च्या दशकात रवींद्र संगीतावरही बंदी आणण्यात आली. केवळ धर्मावर आधारित असलेले पाकिस्तानचे संघराज्य टिकू शकले नाही.
भारतासारखी, दर पाच वर्षांनी राज्ये व केंद्र यांच्यातील महसुलाच्या वाटपाचा आढावा घेण्याची तरतूद पाकिस्तानच्या राज्यघटनेत नसल्याने पूर्व व पश्चिम पाकिस्तानमधील संघर्ष कमी होऊ शकला नाही. जीनांना स्वातंत्र्यापूर्वी हिंदूंच्या बहुमताचे भय वाटत होते. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पश्चिम पाकिस्तानला पूर्व पाकिस्तानच्या (एकाच धर्माचे असूनही) बहुसंख्येचा भयगंड होता. आणि म्हणूनच राष्ट्रीय निवडणुकीत पूर्व पाकिस्तानला बहुमत असतानाही शेख मुजिबुर रहेमान यांना पाकिस्तानचे नेतृत्व करण्याची संधी नाकारण्यात आली.
या पार्श्वभूमीवर बांगला देशची निर्मिती झाली, तेव्हा या नवीन देशाची ध्येयप्रणाली काही वेगळी असेल, असे अपेक्षित होते आणि शेख मुजिबुर रहेमान सत्तेवर असताना त्याची सुरुवातही झाली होती. पण लष्करी उठावाने त्यांची व त्यांच्या जवळजवळ सर्व कुटुंबियांची निर्घृण हत्या झाल्यानंतर सत्तेत आलेल्या सरकारने इस्लाम हा राजधर्म म्हणून घोषित केला आणि धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात परत अल्पसंख्याक हिंदूंवर व ख्रिस्ती लोकांवर अनन्वित अत्याचार सुरू झाले. आणि परत एकदा या अल्पसंख्याकांचा लोंढा भारतात येणे सुरू झाले.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
शेख मुजिबुर यांच्या कन्या शेख हसीना अधिकारावर आल्यावर हे चित्र बदलू लागले आणि एका नव्या बांगलादेशच्या निर्मितीची सुरुवात झाली, असेच म्हणावे लागेल. इस्लाम हा राजधर्म राहिला, पण त्याबरोबरच राज्यघटनेच्या पुनर्लेखनात इतर धर्मीयांना त्यांचे धर्माचरण करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला, तसेच इतर धर्मीयांच्या हक्कांचे रक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली.
या परिवर्तनाचा पुरावा न्यायमूर्ती गोखल्यांच्या या पुस्तकात दिसून येतो. एका विद्यार्थ्याने त्याच्या प्राध्यापिकेला केलेला प्रश्न न्या. गोखल्यांनी नमूद केला आहे त्याची दखल घेणे आवश्यक आहे. त्याने विचारले होते की, एवढे सर्व बदल केले ही चांगलीच गोष्ट झाली, पण मग ‘स्टेट रिलिजन’ ही संकल्पना का राखली? त्यावर त्या म्हणाल्या, ‘अरेबियन कथांप्रमाणे जिनी एकदा बाटलीमधून बाहेर काढली की, पुन्हा आत टाकता येत नाही.’
बांगला देशातही हिंदू धर्मीयांची मंदिरे तोडण्याचे प्रकार परत घडू लागले आहेत. भारताच्या बाबतीतही हिंदुत्ववादाचा वाढता प्रभाव पाहता हेच दिसून येते. दुर्दैवाने, मूलतत्त्ववादी विचारसरणीचा प्रभाव केवळ बांगलादेशातच नव्हे, तर भारतातही वाढताना दिसून येतो. एकूणच सर्वधर्मसमभावाबद्दल बोलण्याचा व आग्रह धरण्याचा भारताचा नैतिक अधिकार कमी झाला आहे, हे मान्य करावेच लागेल.
इस्लाम मूलतत्त्ववादी पार्श्वभूमी असलेल्या या देशात झालेला बदल न्यायमूर्ती गोखले यांनी चपखलपणे मांडला आहे. उदाहरणार्थ, महाविद्यालयात व विद्यापीठात शिकणाऱ्या मुलांचे चित्र अगदी भारतातल्यासारखेच दिसून येते, त्यांचे रंगीबेरंगी कपडे आणि ‘मुली जीन्स व टॉप्स किंवा ड्रेस घातलेल्या बुरखा वगैरे तर जाऊ दे, पण डोक्यावरून ओढणीसुद्धा न घेतलेल्या.’ त्यांच्यामध्ये काही हिंदू मुले-मुलीही होती, म्हणजे केवळ त्यांच्या नावावरूनच ते लक्षात आले, पण इतरांमध्ये मिळून मिसळून गेलेली... हॉस्टेल्सना फुलांची नावे दिलेली... योग्य त्या संस्कृतप्रचुर बंगाली शब्दांचा वापर. अनेक मुलामुलींना भारतात आणि परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे होते. गोखले यांनी हे नमूद केले आहे की, तामिळनाडूतीलही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी बांगलादेशात गेले आहेत. म्हणजे भारत व बांगलादेश यातील शैक्षणिक आदान-प्रदान हे आता एकतर्फी राहिलेले नाही.
न्या. गोखले यांनी आणखी एका मोठ्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे आणि तो आहे- बांगला देशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या बाबतीतील जुन्या हिंदू कायद्यात बदल करण्याची अत्यावश्यकता. या कायद्यांतील अनेक तरतुदी भारतात आमूलाग्र बदलण्यात आल्या. परंतु हे बदल करताना भारतातही मोठा विरोध झाला हे विसरून चालणार नाही. यासंबंधात नेमलेल्या सर बी.एन.राव यांच्या अध्यक्षतेखालील हिंदू कायदा समितीसमोर करण्यात आलेल्या काही मागण्या थक्क करणाऱ्या होत्या.
उदाहरणार्थ, एकपत्नीत्वाबाबतच्या तरतुदीना विरोध करताना असे आग्रहाने प्रतिपादन करण्यात आले होते की, गेली ३००० वर्षे पुरुषांना अनेक विवाह करण्याचा असलेला अधिकार हिरावून घेणे अन्यायकारक आहे. असाच विरोध इतर अनेक दुरुस्त्यांनाही झाला. भारतातही मुसलमानांच्या वैयक्तिक कायद्यात बदल करण्यासही असाच विरोध होता. उदाहरणार्थ, घटस्फोटासंबंधीच्या तरतुदी. अशा विरोधाला तोंड देऊनही भारताने याबाबत जरूर ते बदल घडवून आणले आहेत. परंतु अद्यापही इतर काही तरतुदींत बदल करण्यास विरोध करण्यात येत आहे. पण असे पुरोगामी बदल करणे केवळ ते मुसलमान देशातील अल्पसंख्याक आहेत म्हणून लांबणीवर टाकणे योग्य म्हणता येणार नाही. बांगला देशातही असे बदल व्हावेत, ही मागणी पुढे येत आहे आणि त्याला भारतानेही पाठिंबा दिला पाहिजे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
न्या.गोखले यांच्या या लेखसंग्रहात काही अतिशय बोलकी व्यक्तिचित्रेही आहेत. फाळणीवेळी गांधीजींनी नौखालीत केलेल्या कामाचा, तसेच विनोबांनी त्यांच्या भूदान चळवळीत १९६२ साली पूर्व पाकिस्तानात केलेल्या कामाचा ते आवर्जून उल्लेख करतात. त्यांच्या बांगलादेशच्या भेटीत वेळ कमी असतानाही ते रवींद्रनाथ टागोरांच्या निवासस्थानाला भेट देतात, इतकेच नव्हे तर सुप्रसिद्ध चित्रपट नायिका सुचित्रा सेन यांच्या पबना येथील घरालाही आत्मीयतेने भेट देतात. एकूणच हा लेखसंग्रह अतिशय वाचनीय व विचारप्रवर्तक आहे यात शंका नाही.
न्या. गोखले यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे हे लिखाण म्हटले तर आठवणींचे आहे, म्हटले तर हे प्रवासवर्णन आहे, आणि यात काही मुलाखतीही आहेत. पण माझ्या दृष्टीने ही लेखमाला म्हणजे बांगला देशच्या निर्मितीच्या काळातील व त्यानंतरच्या मोठ्या स्थित्यंतरांचा आलेख आहे. कोणत्याही देशाच्या बाबतीत म्हणता येईल तेच बांगला देशबाबतही म्हणता येईल, ते असे की- त्या देशाचा आजवरचा प्रवास अडी-अडचणींचा, चुका, अगदी घोडचुकाही करण्याचा होता; पण त्यातून तो देश नव्या उमेदीने, देशाच्या सर्व जातीजमातीना एकत्र घेऊन, नवी स्वप्ने साकारताना दिसत आहे. भारताच्या दृष्टीने हे अत्यंत आश्वासक म्हणावे लागेल.
‘विप्लवी बांगला सोनार बांगला’ – हेमंत गोखले
साधना प्रकाशन, पुणे
मूल्य – १५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment