अजूनकाही
‘देशातील शोध पत्रकारिता नाहीशी होत आहे; सगळीकडे गोडीगुलाबीचे धोरण दिसत आहे’, अशी देशाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी भारतीय पत्रकारितेबद्दल व्यक्त केलेली भावना या देशातील संवेदनशील आणि लोकशाहीवादी माणसाच्या मनाची व्यथा आहे. रक्तचंदनाच्या झाडाबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुधाकर रेड्डी उदूमुला यांनी लिहिलेल्या ‘ब्लड सँडर्स : दि ग्रेट फॉरेस्ट हाईस्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना न्यायमूर्ती रमणा यांनी म्हटलं आहे, “आर्थिक घोटाळे, गैरवर्तन आदींच्या संदर्भात वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांचा मोठा परिणाम होत असे, हे आम्ही अनुभवले आहे. आता मात्र तसा परिणाम साधणाऱ्या एक-दोन बातम्या वगळता गेल्या काही वर्षांत प्रखरपणे सत्य उजेडात आणणाऱ्या बातम्या पाहण्यात नाहीत. किमान भारतापुरते तरी बोलायचे तर सध्या शोध पत्रकारिता नाहीशी होत चाललेली आहे.”
रमणा देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती आहेतच, शिवाय त्यांनी विधी आणि न्याय क्षेत्रात येण्याआधी देशातल्या एका महत्त्वाच्या असलेल्या ‘इनाडू’ या वृत्तपत्रासाठी पत्रकारिता केलेली आहे. न्यायमूर्ती रमणा यांनी हे मतप्रदर्शन अर्थातच पूर्ण विचारांती केलेले आहे. कारण वरपांगी किंवा प्रसिद्धीसाठी काहीबाही बोलण्यासाठी ते ओळखले जात नाहीत. देशातील माध्यमांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेतला तर न्यायमूर्ती रमणा यांनी व्यक्त केलेली भावना अजिबात चुकीची आहे, असं म्हणता येणार नाही. कारण बहुसंख्य भारतीय पत्रकारितेचं नेतृत्व सध्या सुमारांच्या हातात आहे आणि सुमारांची चलती असते, तेव्हा विवेकानं बोलण्यासारखं फार काही शिल्लक राहिलेलं नसतं; सत्य कोपऱ्यात अंग चोरून दीनवाणं उभं असतं...
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
फार लांब जाण्याऐवजी महाराष्ट्रातीलच ताजं उदाहरण घेऊयात. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर नागपूर आणि अकोला मतदारसंघातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि या निवडणुकांत राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीची मतं फोडून दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा एकजात सूर सर्व माध्यमांनी आळवला आहे. म्हणजे मतं विकली गेली, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे, परंतु याबद्दल माध्यमांनी सत्य वाचकांपर्यंत पोहोचवलं आहे का, या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे नाही असं मिळतं.
याचं एक कारण म्हणजे वर्तमानाचा अचूक वेध घेताना पत्रकाराला भूतकाळाच्या खांद्यावरून मागे वळून पाहावं लागतं. नेमक्या याच अभ्यासू आणि विवेकी वृत्तीचा पत्रकारांमध्ये या घोडेबाजाराच्या बातम्या देताना किंवा त्यावर भाष्य करताना अभाव जाणवला आहे. राजकीय इतिहासाचा वेध म्हणजे काही हजार-पाचशे वर्षं मागे जाण्याची आवश्यकता नसते. अलीकडच्या दहा-वीस वर्षांच्या घटनांवर नजर टाकली तरी वस्तुस्थिती सहज लक्षात येते. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या कोणत्याही निवडणुकीत मतांचा सर्वपक्षीय बाजार कसा उठतो, हे आता उघड आणि विद्रूप सत्य आहे, पण ते स्पष्टपणे सांगण्याचं धाडस पत्रकारिता दाखवत नाहीये.
शिवसेनेच्या ज्या उमेदवाराला हरवून भाजपचा उमेदवार (वसंत खंडेलवाल) विजयी झाले, त्या अकोल्याच्या शिवसेनेचे पराभूत गोपीकिशन बाजोरिया हे काही थोर समाजसेवक नव्हते की, साधू-संत; शिवसेनेकडे केवळ ५७ मतं असताना ही निवडणूक जिंकण्याची ‘किमया’ त्यांनी साधली होती! शिवसेनेच्या वतीनं ज्या विधानपरिषद निवडणुका त्यांनी जिंकल्या, त्याचा आधारच मुळात घोडेबाजार होता. इतकंच कशाला अकोला शेजारच्या परभणी स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विप्लव या आपल्या चिरंजीवांना निवडून आणतानाही याच बाजोरिया यांनी खुलेआम घोडबाजार भरवला होता. कोंबडे बाजार नाही, पण त्याचा उल्लेख पत्रकार/संपादक करत नाहीत. याचा अर्थ बाजोरिया यांनी या आधीच्या विधानपरिषद निवडणुका जिंकताना घोडे कोणत्या भावानं खरेदी केले होते, हे पत्रकारांना खरंच माहिती नसावं किंवा ते सत्य लपवण्यामागे त्यांचा वेगळा काही हेतू आहे.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
सुमारे एका दशकापूर्वी जळगावच्या मनीष जैन या तरण्याबांड उमेदवारानं विधानपरिषदेची निवडणूक जिंकताना ‘सर्वपक्षीय’ घोड्यांची किंमत किती अवाढव्य वाढवली होती, हे काय पत्रकारांना ठाऊक नाही? ते ठाऊक नाही, असं जर पत्रकार म्हणत असतील तर तेव्हा त्यांच्याच वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या या संदर्भातल्या बातम्या खोट्या होत्या, हे त्या वृत्तपत्रांच्या संपादकांनी एकदाचं जाहीर करून टाकावं, म्हणजे सत्य लपवण्याचं किटाळ त्यांच्यावर टाकता येणार नाही!
या संदर्भातली एक बाब आवर्जून नमूद करायला हवी आणि ती म्हणजे कोणतीही निवडणूक ही शेवटी त्या दोन उमेदवारातली लढाई नसते किंवा कायमचं शत्रूत्व नसतं, तर निवडणूक लढवताना एकमेकांचा अर्थव्यवहार नीट सांभाळला जातो; हाही भारतीय निवडणुकांत रूढ झालेला रिवाज पत्रकारांना माहिती नाही, असं समजणं हा तर शुद्ध भबडेपणा ठरावा.
एक आठवण सांगतो. औरंगाबादच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात सुमारे अडीच दशकापूर्वी विधान परिषदेच्या एका जागेसाठी निवडणूक झाली. तेव्हाच्या शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेसचा उमेदवार अशी ती निवडणूक रंगली. त्यातही घोडेबाजार अर्थातच तेजीत होता. उल्लेखनीय बाब म्हणजे बहुमत असूनही सेना-भाजप युतीचा उमेदवार पराभूत आणि अल्पमतातला काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. कारण स्पष्ट होतं, काँग्रेस उमेदवाराचा भाव जास्त फुटला होता. निकाल लागल्यावर ‘क्रॉस वोटिंग’ करणाऱ्या म्हणजे दोन्ही उमेदवारांकडून मताचा मोबदला घेणाऱ्याकडून काँग्रेसचा तो विजयी उमेदवार मैत्रीधर्माला जागून सेना-भाजपच्या पराभूत उमेदवारासोबत कसा गावोगाव फिरला, हे पत्रकारांनी अनुभवलं आहे. (मी तर ‘उमेदवारांची अशीही मिलीभगत’ अशी बातमी लिहिल्याचंही आठवतं, पण ते असो.)
मुख्य मुद्दा सत्य सांगण्याचा आहे आणि अकोला तसंच अमरावती विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालातून घोडेबाजार हे निवडणुका जिंकण्यामागचं सत्य कसं आहे, हे सांगण्यात पत्रकारिता यशस्वी ठरलेली नाही. आणखी एक म्हणजे काँग्रेस तसं राष्ट्रवादीची मतं शिवसेनेकडे वळत नाहीत, हे श्रीकांत देशपांडे आणि आता बाजोरिया यांच्या निमित्तानं सिद्ध झालं आहे, पण हे खरं सांगायचं धाडस महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी का दाखवलं नाही, याचं उत्तर त्यांचं अज्ञान आहे की, काही लपवाछपवी हे त्यांनाच ठाऊक!
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
न्यायमूर्ती रमणा यांनी भारतीय पत्रकारितेची दुखरी नसच या निमित्तानं पुन्हा एकदा दाबली आहे, पण त्यामुळे भानावर येण्याऐवजी ती वेदना सहन करण्याचा निगरगट्टपणा भारतीय पत्रकारितेत बहुसंख्येनं आलेला आहे, हीच वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक आहेत आणि त्यासाठी व्यवस्थापन व संपादन अशा दोन्ही पातळ्यांवरचे लोक जबाबदार आहेत. मात्र जास्त जबाबदारी संपादकांची आहे, कारण त्यांनी त्यांचा स्वाभिमान लेखणीसोबत म्यान केलेला आहे. समाजात काय घडतं आहे, ते सांगण्यापेक्षा किंवा सरकारला जाब विचारण्यापेक्षा व्यवस्थापनाला काय हवं आहे किंवा प्रत्येक बातमीची ‘मार्केट व्हॅल्यू’ काय आहे, याचा विचार संपादकांनी जेव्हा सुरू केला, तेव्हापासून भारतीय पत्रकारितेचं ‘सत्य’ सांगण्याचं ब्रीद हळूहळू काळवंडू लागलं आणि आता तर ते जवळजवळ नाहीसंच झालं आहे.
भारतीय पत्रकारिता सध्या एका विलक्षण अशा आव्हानात्मक काटेरी परिस्थितीतून जात आहे. मोदी अनुकूल आणि प्रतिकूल अशी सरळसरळ विभागणी भारतीय पत्रकारितेची झालेली आहे. त्यामुळे विवेकाचा आवाज अतिशय क्षीण झालेला आहे. मोदी अनुकूल आणि प्रतिकूल हे दोन्ही रंग इतके दाट आणि त्याचा आवाज इतका कर्कश्श आहे की, त्यात सत्य दबून गेलेलं आहे. ‘मोदींविरुद्ध बोलणं म्हणजे पाप आणि मोदी समर्थन करणं म्हणजे पुण्य’ अशी व्यक्तीस्तोमाची संस्कृती रुजत चालली आहे. सरकार असंवेदनशील किंवा/आणि जनहितांच्या विरोधात वागत आहे, हे सांगण्याचं धाडस पत्रकारितेत अभावानंच दिसतं.
अमेरिका, ब्रिटन किंवा जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांच्या चहाच्या कपात माशी पडली की, मुंगी हे बहुसंख्य भारतीय पत्रकार/संपादकांना दिसतं, पण संसदेच्या कामकाजाच्या संकलनावर केंद्र सरकारनं टाकलेली बंधनं किंवा देशोधडीला लागणारा महाराष्ट्रातला एसटी कामगार दिसत नाही, हा संप हाताळण्यात राज्याच्या परिवहन मंत्र्याला साफ अपयश आल्याचा जाब संपादक/पत्रकारानं सरकारला विचारला नाही किंवा त्या मंत्र्याला सळो की पळो करून सोडलं नाही. आत्महत्या केलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी तुम्ही किती अश्रू ढाळले, हाही जाब पत्रकार सरकारला सातत्यानं खडसावून विचारत नाही. अशी किती तरी उदाहरणं सांगता येतील.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
कुणाची तरी तळी उचलली आणि त्याच गडद रंगाचे चष्मे घातले की, पत्रकारितेची अवस्था कशी भीषण होते, हे सध्याचं जाणवणारं चित्र विषण्ण करणारं आहे. यावर उपाय म्हणजे विवेकी पत्रकारितेचा आवाज अधिकाधिक बुलंद झाला पाहिजे. पण इतका सारासार विचार करण्याची शक्तीच पत्रकारिता आणि समाज दोघंही हरवून बसलेले आहेत, हे कटू असलं तरी अर्थातच सत्य आहे. या संदर्भात ज्या दिवशी आपल्याला वैषम्य वाटायला सुरुवात होईल, त्या दिवसापासून भारतीय पत्रकारिता पुन्हा एकदा ‘सत्य’ निर्भीडपणे सांगू लागेल. तूर्तास तरी त्या दिवसाची वाट पाहणं एवढंच आपल्या हातात आहे.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment