सालाबादाप्रमाणे यंदाही भारतातून होणाऱ्या ‘ब्रेन-ड्रेन’वरील विचार दै. ‘लोकत्ता’मधील ‘स्थलांतर - भारत कधी कधी(च) माझा देश आहे’ (१२ मे २०२१) या लेखातून वाचावयास मिळाले. नेमिच येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे हा ऊहापोह वर्षाकाठी एकदा तरी होतच असतो! पत्रकारांचं एक बरं असतं. त्यांना ‘हाती येई हातोडा, तेव्हा सगळेच प्रश्न का असू नयेत खिळा?’ याप्रमाणे विषयाची कुठलीही बाजू वर्ज्य नसते आणि वेळप्रसंगी तर एकाच विषयाच्या दोन्ही बाजूनं मतं देण्याची पात्रता ठेवावी लागते. आदल्याच दिवशी (११ मे) महाराष्ट्रातील संत कसे काळाच्या पुढील विचार करणारे आणि वैश्विक होते, हे सांगायचं (संदर्भ : ‘लोकसत्ता’ आयोजित ‘महाराष्ट्र-गाथा’ व्याख्यानमाला), त्यात वेंकी रामकृष्णन यांनी स्वतःला कसं अ-भारतीय म्हटलं याचं कौतुक करायचं आणि दुसऱ्याच दिवशी परदेशाची ओढ असणाऱ्या तरुण पिढीस धारेवर धरायचं! म्हणजे युरोपियन रेनेसाँ जगात पसरला तर ती ‘प्रगती’, पण मराठी संतवचन ‘हे विश्वचि माझें घर’ स्मरून जर कोणी स्वकर्तृत्वावर परदेशात जाऊन राहत असेल, तर त्याच्यावर टीका करायची, याला दुटप्पीपणाच म्हणायला लागेल.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
‘स्थलांतर…’मधील सगळेच विचार पूर्णतः चुकीचे आहेत असं म्हणणं धाडसाचं ठरेल. अगदी काहीच वर्षांपर्यंत परदेशी शिकायला जाणं हे उच्चवर्गीय भारतीयांनाच शक्य असायचं. पण हल्ली ज्या प्रमाणात मध्यमवर्गीय पदरमोड करून मुलांना परदेशात शिकायला पाठवतात, ते बघता कौतुक वाटतं आणि थोडी भीतीही. ज्या वेगानं आजचा युवावर्ग शिकण्यासाठी परदेशात स्थलांतर करताना दिसतो, त्यामुळे कुठे तरी नक्कीच काहीतरी चुकतंय असं वाटत राहतं. पण आजच्या युवावर्गाला फक्त बाहेरील जगाच्या चकचकीत आयुष्याचं सुप्त आकर्षण असतं, असं म्हणून त्याला सरळसोट जबाबदार धरणं योग्य होणार नाही.
‘देश म्हणून काही तरी चुकतंय’ असं म्हणून सोडून देण्याएवढा हा काही कठीण प्रश्न नाही. माणूस चांद्यापासून बांद्यापर्यंत का येतो, यातच तो बांद्याहून पुढे परदेशात का जातो, याचंही उत्तर आहे. भारतातील बोटावर मोजता येतील एवढ्याच मानांकित शैक्षणिक संस्था, त्यातही अनेक शासकीय संस्थेत कुलगुरूंसारखी पदं रिकामी, शैक्षणिक संस्थांमधील शिक्षणाचा/प्रवेशाचा गोंधळ, प्रवेश परीक्षा व गुणक्रम यात नसलेली सुसूत्रता आणि एकूणच व्यावसायिक शिक्षणाचा खालावणारा दर्जा, ही कारणं कुठल्याही नवतरुणास पर्याय शोधण्यास उद्युक्त करतील. तसंच एखाद्यानं किती शैक्षणिक प्रयत्न केले तर काय फळं येतील, याचं साधं गणित जर आजच्या तरुणाईला भारतीय शिक्षण व्यवस्था देत नसतील, तसंच त्याला ती दृश्यमानता एखादी परदेशी शिक्षणसंस्था देत असेल आणि त्याच्या निवडीला जर कुटुंब आर्थिक पाठिंबा देत असेल, तर त्याला दोष देण्याचं काय कारण? अर्थात ही आर्थिक मदत कुटुंब स्वतःच्या मर्यादेत राहून करत आहे काय, याचा शोध घेणं जरुरीचं आहे. अन्यथा ही शैक्षणिक कर्जं ‘नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स’मध्ये रूपांतरीत होतील. पण ही झाली व्यवस्थेची जबाबदारी.
परदेशात जाणारी मुलं केवळ आपल्या आई-बापांचा पैसा उधळायला निघाली आहेत, असं मानणं, हे अन्यायकारक आहे. ही बहुतांश मुलं मेहनती असतात. परदेशी शैक्षणिक संस्था या विद्यार्थ्यांकडून रग्गड मेहनत करून घेताना दिसतात. बऱ्याचदा भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पैशाची तजवीज ही शिक्षणापुरतीच मर्यादित असते. मग ही मंडळी वाट्टेल ते काम करून जगण्याकरता लागणारा उर्वरित पैसा उभा करताना दिसतात. मग कुठे रेस्टारंटमध्ये काम करणं असो किंवा कुठल्या दुकानात ग्राहकांच्या सामानाच्या पिशव्या भरणं असो, अशी अनेक कामं करून एक वेगळाच अनुभव व पैसे कमावताना दिसतात. आजच्या घडीला असा अनुभव भारतातील व्यवस्थेत मिळणं अशक्य आहे. एवढ्या सगळ्या खडतर जीवनातून गेल्यानंतर त्यांना परदेशातच काम करावंसं वाटणं साहजिकच आहे आणि त्यांच्यावरील असणाऱ्या आर्थिक जबाबदारी पार पाडण्याकरता गरजेचंसुद्धा.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
आता दुसरा अती चर्चिला गेलेला मुद्दा. तो म्हणजे समाजानं ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ म्हणून गळा काढणं. भारतातील अगदी कुठल्याही चार व्यावसायिक नोकरदारांचं घेऊन पहा. सद्य परिस्थितीत (अगदी करोनापूर्व काळातसुद्धा) भारतातील आयटी किंवा वैद्यकीय व्यवस्थेत एखाद्या तरुणानं अगदी भारावून जाऊन परत येण्यासारखी परिस्थिती नाही, यावर सहज एकमत होऊ शकेल. आपल्या बोटांवर नाचणाऱ्या किती उत्पादनांचा शोध खऱ्या अर्थानं भारतात लागला आहे? गूगल, अॅपलपासून किती तरी छोट्या-छोट्या स्टार्ट-अपमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याचा अनुभव देऊ शकतील, अशा किती कंपन्या भारतात आढळतील? तसंच, काम करताना लागणारी निर्णय स्वतंत्रता, अपयश सहन करण्याची तयारी किती कंपन्यांत असते? एखाद्या कंपनीच्या व्यावसायिक अपयशामुळे नोकरी गमावून बसण्याला भारतीय समाजातील किती लोक सहानुभूतीच्या नजरेनं बघतील? या सगळ्यांची उत्तरं भावनेच्या भरात न जाता शोधली, तर सहज सापडणं शक्य आहे. आणि हीच उत्तरं परदेशात गेलेल्यांना परत का येता येत नाही, याच्या मुळाशी आहेत.
बरं, तरीही देशप्रेमाखातर म्हणा किंवा भारतात काम करण्याच्या उर्मीसाठी म्हणा, परत आलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. पण त्यांना सहन करावे लागणारे प्रश्न उत्तरोत्तर जटील होताना दिसत आहेत. द्वि-नागरिकत्व नावाचा शासनानं जो एक फासा करून ठेवलाय, त्यात किती मुलं शैक्षणिक कारणांनी भरडली जात असतील, याचाही अंदाज घेणं जरुरीचं आहे. एक तर द्वि-नागरिकत्वाला नीट व्याख्या नाही, असलीच तर ती सतत बदलती असणं, तसंच त्यात असलेल्या शालेय मुलांची व्यावसायिक शिक्षणात कुठे मोजदाद होईल, याचा नीट विचार नसणं, अशा परिस्थितीत एखाद्यानं स्वतःच्या करिअरचा बळी जरी देतो म्हटलं तरी, त्यानं स्वतःच्या मुलांच्या भविष्याशी तडजोड करावी, अशी अपेक्षा करणं हास्यास्पद ठरेल. ज्या प्रमाणे अमेरिकेत ‘ड्रीमर्स’ मुलांची अवस्था आहे, तीच काही वर्षांत भारतीय द्वि-नागरिकत्व असलेल्या मुला-मुलींची होणार नाही, याची शाश्वती कोण घेईल?
परदेशात राहणाऱ्या भारतीयांबद्दल भारतात राहणाऱ्यांचे काही समज-गैरसमज संकल्पना आहेत. त्यातून परदेशस्थ भारतीयांना सोयीस्कररीत्या लक्ष्य केलं जातं. म्हणजे जर परदेशस्थ भारतीयांनी आपले संस्कार, सण-वार, रीती-भाती पाळल्या, ज्या केवळ आपल्याच लोकात राहून पाळणं शक्य असतं, तर ते केवळ समूहात राहतात किंवा त्यांना परदेशी व्यवस्थेनं सामावून घेतलं नाही, असं म्हणायचं. किंवा एखादा अगदीच पर-संस्कृतीत विरघळून गेला, रोटी-बेटी व्यवहार करताना दिसला, तर तो कसा आपली संस्कृती विसरला, असंही म्हणायला मोकळं...
..................................................................................................................................................................
संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh
..................................................................................................................................................................
परदेशस्थ भारतीय घोळक्यानं राहतात असं म्हणणं अज्ञानमूलक आहे. आपला घोळका शोधणं हा त्यांचा पहिला ‘इन्स्टिंक्ट’ असू शकतो. पण अगदी सध्याच्या महामारीच्या परिस्थितीतसुद्धा वैद्यकीय क्षेत्रात दिसणाऱ्या नामवंतांपासून तर अनेक क्षेत्रांत छोट्या-मोठ्या पदांवर भारतीय वंशाचे लोक आढळतात. आयटी कंपन्यांत वरिष्ठ पदांवर असलेले किती तरी अधिकारी भारतीय वंशाचे आहेत. ही सगळी मंडळी घोळक्यात राहून उच्चपदस्थ होऊ शकत नाहीत. मराठी-मराठी किंवा तेलगू-तेलगू घोळक्यानं राहणं, हे अगदी वर-वर जरी खरं असलं तरी त्यात पिढी-दरपिढी फरक दिसतोच. कुठलीही संस्कृती अशी दहा-वीस वर्षांत विरघळणं कठीणच असतं. त्याला एक-दोन पिढ्या तरी जाऊ द्याव्या लागतात. भारतात आजसुद्धा हिंदी भाषिक व्यक्तीस दक्षिणेत स्थायिक होताना त्रास होतोच. तसंच मुंबईत गुजराती व पारशी कुटुंबं आपल्याच घोळक्यात राहताना दिसतात, जरी ते बहु-संस्कृतीचा हिस्सा असले तरी.
तरीही आज परदेशात असलेली मंडळी जातीय वा प्रांतीय भेदभावाच्या पल्याड पोचलेली आढळतात. कोणी तरी म्हटलंच आहे की,
सताती है ग़ुरबत में यादें वतन जब
गले वमल के रोता हूँ हर अजनबी से
कोणी काहीही म्हणो, हा सगळा खेळ जागतिकीकरणाचा आहे. १९९०च्या दशकानं सुरुवात करून दिलेल्या उदारीकरणाच्या नीतीनं, तेव्हापासूनच्या भारतातील सगळ्या तरुण पिढीला संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. जागतिकीकरणामुळेच भारतीय बौद्धिक संपदा पाश्चात् देशात उपलब्ध आहे आणि त्याच कारणामुळे परदेशी वस्तू आपल्या भारतीयांच्या घरांत (अगदी सिंगल माल्टसुद्धा ).
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
या सगळ्यात मात्र दुरून भारत अधिक स्पष्ट दिसतो. दृष्टीदोषाचा तो एक प्रकार असतो ना, ज्यात चष्म्यामुळे दूरचं छान दिसू शकतं, त्यातलाच हा प्रकार आहे! हा चष्मा पारदर्शक व्यवस्थेच्या सवयीचा म्हणा किंवा सुसूत्र आकडेवारीमुळे लागलेल्या सवयीचा म्हणा, पण इथून दांभिकता ही अधिक स्पष्ट दिसते. इथं कृष्णा-कावेरी, मराठी-कानडी, उडिया-बंगाली वादांवर दोन्ही बाजूची मंडळी मनसोक्त भांडतात, उणी काढतात. पण पांगतात, ती पुन्हा भेटण्याच्या वायद्यावर! भारत जेव्हा वल्गना करतो, तेव्हा त्यावर निर्भीडपणे शंका घेता येते, पण हाच भारत जेव्हा एखादं का होईना ऑलिम्पिक मेडल मिळवतो, ते शंभराच्या बरोबरीनं साजरंही होतं. भारताच्या सार्वभौमत्वाला एखादा शेजारी धक्का देण्याचा प्रयत्न करतो (किंवा भारत तसा कांगावा करतो) तेव्हा त्याकडे वस्तुनिष्ठ पद्धतीनं बघायाला शिकावं लागतं. मग तुमचा शेजारी किंवा सहकारी त्याच देशातील असले तरी त्यांच्याशी असलेल्या संबंधांवर परिणाम होऊ न देण्याची परिपक्वताही दाखवावी लागले.
या महामारीच्या इतक्या भयावह परिस्थितीतसुद्धा भारताबद्दल आपुलकी वाटणारे स्थानिक (!) भरभरून मदत करताना दिसताहेत. शेजारची कॅरोल जेव्हा दारावर नॉक करून विचारते की, ‘बाबा रे, भारताबद्दल काहीबाही ऐकतेय. तुझ्या घरचे बरे आहेत ना?’ ते ऐकताना, शेवटी शेजारधर्मा सगळीकडे सारखाच, हे पटत!
आता वेळ आली आहे की, वृत्तपत्रांनी त्याच-त्या मुद्द्यांना (बाळंतपणासाठी आई-वडिलांना बोलावणं वगैरे) उगाळत बसण्यापेक्षा या विषयावर शोध-पत्रकारिता करावी. भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणाकडे कल का असतो, परदेशी नोकरीस जाणारे केवळ पैसा मिळण्यासाठीच जातात काय? वैद्यकीय, आयटी क्षेत्रात भारतात काम करणाऱ्यांना किती व कसं मानधन मिळतं, परदेशस्थ भारतीयांना मिळणाऱ्या मानधनात ते तुलनेनं कुठे बसतं (चलन विनिमय दर वगळता), तसंच एखादं विशिष्ट काम भारतात वा परदेशात करण्यात कितपत समाधान मिळतं? त्या समाधानाचे निकष काय? परदेशातून परत आलेल्यांची घुसमट कुठल्या कारणांनी होते? ती खरंच त्यांना लागलेल्या सुखासीन जीवनाच्या अभावामुळे असते काय? भारतातील आजचं जीवन वैद्यकीय, आयटी क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांचं तरी - हे खरंच अ-सुखासीन म्हणता येईल काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याची गरज आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
कदाचित या प्रश्नांची उत्तरं तुलनात्मकदृष्ट्या पडताळताना काही धोरणात्मक बदल सुचवता येतील, जी ‘ब्रेन ड्रेन’ थांबवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील.
प्रस्तुत लेखक गेल्या २४ वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे. मध्यंतरी आठ वर्षं पुण्यात स्थायिक झाला होता. मुलांना भारतीय शालेय तसंच पारंपरिक कुटुंबाचा अनुभव देणं, या उद्देशातून हा निर्णय घेतला होता. मुलांच्या उच्चशिक्षणाकरता गेल्या पाच वर्षांपासून बोस्टन जवळील वेस्टफोर्ड या गावी राहतो आहे. स्वतः चांद्यापासून बांद्यापर्यंत व पुढेही प्रवास केलेला आहे. पण माझ्यासारखी अनेक कुटुंबं भारतात परत येऊन यशस्वीरित्या स्थायिक झालेली आहेत, तर बरीच परदेशातसुद्धा अतिशय समाधानानं जगत आहेत, याची नम्र जाणीव आहे.
.................................................................................................................................................................
लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.
salilsudhirjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment