अजूनकाही
जयप्रकाश सावंतांचं हे पहिलंच स्वतंत्र पुस्तक. वयाच्या पन्नाशीपर्यंत त्यांचा पुस्तकांशी फक्त वाचनापुरताच संबंध आलेला. त्यामुळे हे पहिलं लेखन पुस्तकांवरचं, पुस्तकांच्या स्मृती-आठवणी जागवणारं, पुस्तकांशी संबंध असणारं असेल हे साहजिकच. तरी ‘पुस्तकनाद’ त्यापुरता उरत नाही, तो व्यापक पुस्तक-वाचनसंस्कृतीविषयी बोलतो. मुंबईतल्या कामगार कल्याण केंद्राच्या छोटेखानी वाचनालयापासून सुरू झालेला हा नाद पुस्तकांचा संग्रह, संपादन, अनुवाद ते लेखन असा कसा विस्तारत गेला, याबाबतचं मनोगत त्यांनी सुरुवातीला लिहिलंय, ते वाचनीय आहे.
पुस्तकं वाचणं ही विशेष बाब नाही. आपल्या आवडीची, कल असलेली पुस्तकं मिळवणं, ती स्वामित्वभावनेनिशी सांभाळणं हेही फार नवलाईचं नाही. पण वाचन वाढत-विकसत-रूंदावत जाणं, त्याबरोबरीनं आपल्यातलं विस्तारत जाणारं माणूसपण जाणतेपणी अनुभवणं ही विशेष बाब असते, आपल्यापुरतीतरी. त्या अर्थानं हा ‘पुस्तकनाद’ ही जयप्रकाश सावंत यांनी अप्रत्यक्षपणे पण कृतज्ञतेनं सांगितलेली आपल्या विस्तारत गेलेल्या माणूसपणाची गोष्ट आहे, असं वाटतं.
पुस्तकं आणि त्यांचं वाचन हे आपल्याकडच्या मुख्य सामाजिक प्रवाहात ‘स्वतंत्र संस्कृती’ म्हणावं इतकं विस्तारलेलं आहे, असं म्हणवत नाही. म्हणूनच पाश्चात्य देशातल्या ज्या हकिकती सावंत सांगतात, त्या वाचताना मन काहीसं स्वप्नाळू होतं. ‘ललित’चा मंगेश पाडगांवकर स्मृती अंक वाचताना त्यांना गेल्या शतकातल्या अमेरिकेतल्या ‘पोएट्री’ या निव्वळ कवितेला वाहिलेल्या मासिकाची आठवण होते. १९१२ साली म्हणजे १०० वर्षांपूर्वी त्याच्या पहिल्या अंकाच्या प्रती दोन आठवड्यातच संपल्यानं पुन्हा छापाव्या लागल्या. पुढे अनेक आर्थिक अडचणींशी झगडत हे मासिक शतकाभरापेक्षा जास्त काळ झाला तरी अजून चालू आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या कवितांचा आकडा रोज ५०पासून आता ९० हजारांवर गेला आहे.
कवितेला मोबदला देणं ही आपल्याकडे १०० वर्षांपेक्षा मोठी परंपरा असलेल्या दिवाळी अंकांसाठी आजही कष्टसाध्य, नवलाईची बाब राहिली आहे. मासिकांची तर गोष्टच सोडा. शिवाय तो किती हा मुद्दा तर अजून चर्चेतही नाही. पण ‘पोएट्री’ च्या संपादक हॅरिएट मन्रो यांनी पहिल्या अंकापासून मोबदला, तोही क्वचित आगाऊही दिला. ‘पोएट्री’ची वार्षिक वर्गणी दीड डॉलर्स असताना त्यांचा कवितेचा मोबदला होता पानाला १० डॉलर्स. शिवाय वर्षभरात प्रकाशित कवितांमधून सर्वोत्कृष्ट कवितेला तब्बल २५० डॉलरचं बक्षीस... सतत आर्थिक टंचाईशी झगडत असतानाही यात तडजोड झाली नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अगदी सुरुवातीच्या काळात एझरा पाउंड यांनी संपादकांना पाठवलेल्या एका पत्रात म्हटलंय, ‘माझी अशी इच्छा आहे की, या मासिकाच्या फाइल्स १९९९मध्येही मौल्यवान ठरून विकल्या जाव्यात…’ २००२मध्ये नऊ दशकं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ‘पोएट्री’च्या या प्रदीर्घ काळातल्या कामगिरीचा आढावा घेणारं ९०० पृष्ठांचे दोन ग्रंथ प्रकाशित झाले. त्यासाठी त्याच्या संपादकांनी या काळातल्या मासिकाचं शिकागो आणि इंडियाना विद्यापीठात सांभाळलेलं दफ्तर अभ्यासलं. त्यात आठ लाख कागद होतं. कितीही नाही म्हटलं तरी मनात आपल्याकडच्या परिस्थितीची तुलना होते. आर्थिक स्थिती, लोकाश्रय वगैरे बाजूला ठेवू, पण दीर्घकाळ चाललेल्या किती वाङमयीन नियतकालिकांचं दफ्तर असं निगुतीनं सांभाळलं गेलंय? शंकाच वाटते.
या पुस्तकातले बहुतांश लेख ‘ललित’मध्ये ‘पुस्तकगजाली’ या सदरात प्रकाशित झाले आहेत. गजाली म्हणजे गप्पा, पारावरच्या गप्पा. या लेखांचं स्वरूपही गप्पांचंच आहे. ग्रंथव्यवहारातल्या अनेक चित्तचक्षुचमत्कारिक गोष्टी सावंत साध्या तरी संवादी शैलीत सांगतात, पण त्यात काही सनसनाटी वा वेगळ्या गोष्टी सांगत आपल्या बहुश्रुतपणानं भारावून टाकण्याचा आव अजिबात नाही, तर पुस्तकं-वाचन आणि एकुणच ग्रंथसंस्कृतीबाबतची व्यापक आस्था आहे.
फुटपाथवरच्या जुन्या बाजारातली समृद्ध करणारी मुशाफिरी, इंग्लंडमधले वाईट-हिंसक भाषेतले समीक्षालेख (रॉटन रिव्ह्यूज) आणि प्रकाशकांनी हस्तलिखितं नाकारताना केलेल्या शेलक्या नोंदी (रॉटन रिजेक्शन्स) यांची पुस्तकं, वॉल्टर बेंजामिनसारख्या नामवंत ग्रंथसंग्राहकांच्या आठवणी (या लेखातल्या ग्रंथसंग्राहकांनी केलेल्या इच्छापत्रांच्या नोंदी आवर्जून वाचाव्यात अशा. पुन्हा आपल्याकडच्या या आघाडीवरील शोचनीय परिस्थितीच्या आठवणींनी उदास व्हायला होते) लेखकांच्या चांगुलपणाबरोबरच त्यांचे मातीचे पाय दाखवणारे हेवेदावे (अँडरसन, फॉकनर आणि हेमिंग्वे), हयातीतच दंतकथा झालेल्या मार्खेज, बोर्हेस, अल्बर्टो मॅंग्युएल अशा अनेक लेखकांचं चरित्र-आत्मचरित्र-व्यक्तिचित्र यातून घडलेलं समीपदर्शन, संपादक-प्रकाशकांनी लेखन मिळवणं-छापणं याकरता घेतलेले अपार कष्ट, आपल्या एवढ्या दिवसांत वाढत-विस्तारत गेलेल्या संग्रहातल्या पुस्तकांच्या - त्यानिमित्तानं येणाऱ्या त्या वेळच्याही - आठवणी असं बरंच काही या पुस्तकात सामावलं आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तरी आवर्जून उल्लेख करावा असा या पुस्तकातला शेवटचा, पुस्तकाच्या काहीसा पठडीबाहेरचा मोठा लेख आहे- औंधचे भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या द्विखंडात्मक आत्मचरित्रावरचा. आपल्या संस्थानिक घराण्यातली शतकभराच्या काळातली असंख्य चढउतारांनी भरलेली, शोकात्म, शरम वाटावी, अशा गोष्टींनी भरलेली रोलरकोस्टर राईड आप्पासाहेब आयुष्याच्या संध्याकाळी ज्या निर्लेप वृत्तीनं सांगतात, त्यानं चकित व्हायला होतं. दुर्गाबाईंनी कराड संमेलनातील अध्यक्षीय भाषणात केलेला या पुस्तकाचा उल्लेख सावंतांनी उद्धृत केला आहे. तो असा- ‘लोकांच्या मनाला उबग आणील, हादरा देईल व स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा उणावेल असं लेखन…’ आधी बंदी आणि मग मराठी साहित्यव्यवहाराच्या एकूण स्मृतीतूनच निसटलेला हा वेगळाच ऐवज मुळातून वाचायला हवा खरं तर. पण फार जुनं नसूनही चर्चेतूनही अनुपलब्ध. सावंत त्याचा दीर्घ तपशीलवार परिचय करून देताना त्याची उपेक्षा संपावी आणि ते सर्वदूर वाचलं जावं अशी इच्छा व्यक्त करतात.
या पुस्तकातला आणखी एक छोटासा, पण लोभस भाग लेखांच्या शेवटी आलेल्या टिपांतला आहे. लेखातल्या ओघात समाविष्ट न होऊ न शकलेली काही नंतरची, पूरक माहिती देतानाच अगदी छोट्याशा मदतीचंही ‘श्रेय ज्याचं त्यास द्यावं’ या वृत्तीनं सावंत आवर्जून श्रेयोल्लेख करतात, तेही आजच्या दिवसांत महत्त्वाचं वाटतं.
एकूण एखादा ‘नाद’ किती सृजनशील असू शकतो, तुमच्यातलं माणूसपण विस्तारत आयुष्याकडे पाहण्याचं सहानुभवी भान देतो, याचं उदाहरण म्हणून जयप्रकाश सावंत यांच्या या पुस्तकाकडे नक्की पाहता येईल.
‘पुस्तकनाद’ : जयप्रकाश सावंत,
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, मूल्य – ३०० रुपये.
............................................................................................................................................
लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ravi Go
Sat , 18 February 2023
Very nice article, thanks.