अजूनकाही
किरण गुरव हे समकालीन लेखकांतलं एक आश्वासक नाव आहे, हा ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ आणि ‘जुगाड’ वाचल्यावर झालेला समज ‘क्षुधाशांती भवन’ वाचल्यावर अधिक दृढ झाला. खरं तर यातल्या कथांचा प्रथम प्रकाशन तपशील पाहिल्यावर या आधीच्या काळातल्या कथा आहेत, हे लक्षात येतं. यातलं व्यवस्थेनं ‘कायम निर्वासित’ असा दर्जा दिलेल्यांचं केंद्रस्थानी असणं, आज अशा उदंड झालेल्या पण निष्कर्षात्मक शेरेबाजीतच अडकून पडलेल्या लेखनापेक्षा मुळातच गंभीर आणि वेगळं आहे.
‘क्षुधाशांती भुवन’ या तब्बल ९४ पृष्ठांच्या दीर्घ शीर्षककथेत ‘गागर में सागर’ म्हणावं असं एका छोट्याशा प्रातिनिधिक खेड्यातलं राज-समाजकारण दिसतं, त्याला विश्वरूपदर्शन म्हणता येईल. सामान्यांच्या रोजच्या जगण्यात घुसलेलं आणि दिवसेंदिवस अधिकाधिक हिडिस होत चाललेलं स्थानिक राजकारण आणि त्यात कसलंच स्थान नसलेल्या, सिद्धप्पासारख्या तळातल्या माणसाची होणारी परवड, हा तसा ढोबळ म्हणावा असा, तरी रांगड्या भाषेतल्या तपशिलाचं तरल नाजूक जरीकाम असलेल्या हाताळणीनं दीर्घकाळ अस्वस्थ करणारा ऐवज होतो.
कुठल्याच वैचारिक, राजकीय व्यवस्थेला सिद्धप्पाचं भरडणं टाळता आलेलं नाही. अस्तित्वाच्या किमान शाश्वतीच्या शोधात पळत राहणं हेच वाट्याला येतं, पडाव बदलतात, व्यवस्था दरम्यान एखादा टप्पा खालीच घसरलेली असते. दंगलीत जळालेल्या आपल्या चहाटपरीचे राहिलेले अवशेष घेऊन, चार-दोन एसटी थांबतात दिवसभरात, तेवढेच चढतात-उतरतात लोक म्हणून फाटा म्हणायचं अशा, माळरानावर सिद्धप्पा आश्रय घेतो. थोडा जम बसतो, तसे जगण्याचे अंकूर पुन्हा फुटतात मनात. त्याला प्रत्यक्षातला बहर येईतो माळरानाचा विकासवाडी फाटा होतो. वाहतूक, वर्दळ वाढत जाते, तसं कुणा पुढाऱ्याला तिथं होऊ शकणारा पेट्रोलपंप आणि त्याआधारानं उभे राहू शकणारं साम्राज्य दिसू लागतं. व्यवस्थेच्या दोऱ्या हातात असणाऱ्यांना अशक्य नसतंच काही. सिद्धप्पा आणि अशीच काही चिलटं चिरडायची फक्त. त्याच्या पदरी पुन्हा दिवसाचा उजेड सर्वदूर व्हायच्याआत चंबुगबाळं आवरून नजरेआड होणं येतं.
शेवटची सकाळ उमलते, त्या पाकळीपाकळीचं अप्रतिम वर्णन हा मराठीतला अलीकडचा संस्मरणीय मजकूर व्हावा. त्यातला एक छोटा तुकडा तरी इथं देण्याचा मोह आवरत नाही-
‘...आभाळाचं गच्च काळोखं पांघरूण डोंगराच्या उशीवरनं किंचित मागं सरलं आणि त्याच्या किलकिल्या सांदीतून उजेडाची हलकीशी फुंकर दाट अंधारावर पडली. काळोखाच्या आडमाप फुग्यात रूपेरी टाचणी खुपसल्यागत झालं. गार हवेच्या चुळा भरत अंधार कणाकणानं विरघळू लागला आणि आभाळाला ताजी तरतरीत निळाई चढत गेली. रात्रपहाऱ्याच्या दोन-चार चांदण्यांची त्यावरची खडीही थोडी टवटवीत दिसू लागली. मोतिया उजेडाचा वाढता टेकू घेत दिवसाचा शिंपला हळूहळू डोंगरावर उघडू लागला. भुईलगतच्या दाट हवेच्या प्रस्तरातून ताजी हवा मोकळेपणानं खेळू लागली... फाट्याच्या पूर्वेला असलेल्या रातथाऱ्याच्या झाडाझुडपांना पहिल्यांदा आवाजाची पालवी फुटली... कंठ फुटलेल्या छोट्या दुनियेची झुडपातून हळूहळू हालचाल सुरू झाली. रानकर्दळीतून छोटा दयाळ भुर्रकन उडाला आणि ताजी हवा कापत समोरच्या फुलारलेल्या काटेसावरीवर गेला. तिथे उसाच्या तुऱ्यांसारखे शेपटांचे गोंडे फुलवलेल्या खारूचांदण्यांची पळापळ कधीच सुरू झाली आहे. भोर सकाळी गाईच्या कासंत शिरणाऱ्या वासरागत तीन-चार फुलचोख्यांनी आपल्या लांब चोची सावरीवरल्या फुलात खुपसून जिथल्या तिथं हवेत पंख मारायला सुरुवात केली आहे. एक नाचरा न्हावी आपला तळहाताएवढा पिसारा फुलवून एका फांदीवर जागच्या जागीच मोहरा बदलत उड्या मारण्यात दंग, तर त्याला खुन्नस म्हणून की काय तुरेवाल्या बुलबुलाच्या एका संशोधक जोडीनं बसल्या बसल्या आपापल्या शेपट्यांचे वायपर उभे करून हलवायला सुरुवात केली...’
‘...विकासवाडी फाट्यावर एकदासं चांगलं फटफटलं..’ या वाक्यानं संपणारं तब्बल दोन पानांतलं हे वर्णन ही निखळ दृश्यकविता आहे.
खरं तर या वेळी रात्रीच खोपटातल्या मिणमिणत्या लाल उजेडात आपलं उरलंसुरलं चंबुगबाळं बांधत अव्वा आणि सिद्धप्पानं आपल्या दुसऱ्या निर्वसनाची तयारी आटपत आणली आहे. फार कुणाच्या नजरेला न पडताच भल्या सकाळी अनिश्चित भविष्याच्या दिशेनं पुन्हा निघायचं आहे. मग ही सकाळ एवढी काव्यमय तपशीलानं का उमलते आहे? हजारो वर्षांत अनेक संस्कृती आल्या, विकसल्या, त्यातून माणसानं आपण जंगलचा कायदा असं सहज म्हणतो, त्यापेक्षाही कितीतरी हिडिस असा आपला कायदा रूढ केला तरी, माणसांनी दिलेल्या जखमांचे ओरखडे वागवत उरलासुरला निसर्ग अजूनही निर्मम तरी सगळ्यांसाठी सारखाच उमलतो आहे. कथा शेवटाच्या उतारावर असताना या आश्वासनाची सम गाठायची आहे? माहीत नाही. की, आपल्या बौद्धिक-अर्थिक-सामाजिक-शारिरीक अशा सर्वार्थानं तोळामासा असलेल्या क्षमतेतून विकसलेली उपजत शहाणीव, सांदिकोपऱ्यात अजून शिल्लक असलेला सद्सद्विवेक आणि टिकून राहण्याची सनातन अदम्य असोशी, यांची गाठोडी बांधून सिद्धप्पा पुन्हा निघाला आहे. कदाचित तुम्हा-आम्हाला आणखी एक संधी देण्यासाठी, तो याच भरोशावर, हे सांगायचं आहे? न कळणंही चांगलंच असतं केव्हा केव्हा..
‘शोध’ ही ७२ पानांची दीर्घकथा आहे. त्यातल्या शेवटपर्यंत शोध न लागलेल्या बाबू सुतार वाचनानंतरही दीर्घकाळ पाठ सोडत नाही. चांदोबातल्या गोष्टीतला वेताळ विक्रमाच्या मानगुटीवर परत परत प्रश्नांची नवी नवी भेंडोळी घेऊन बसतच राहतो, तसा हा आपल्या नगण्य अस्तित्वासाठी झगडणारा बाबू सुतार मानगुटीवर बसून राहतो. खरं तर तो गाव सोडून जातो, तेवढा एकच क्षण हे स्वत्व वगैरे, पुढे सगळी निव्वळ अस्तित्वासाठीची फरपट. प्रत्यक्षात समोर न येताही एखाद्या पात्रानं भवताल व्यापून राहावा याचं हे अलीकडचं मोठं उदाहरण.
‘सामना’त समोर न आलेल्या मारुती कांबळेचं काय झालं, हा प्रश्न व्यापून राहतो तसं बाबू सुताराचं काय झालं असावं, हा प्रश्न कथा वाचून संपल्यावरही पोखरत राहतो संवेदनेला. खरं तर प्रत्यक्षातला भवताल पाहून आपल्या मनात त्याचं काय झालं असेल, याचे आडाखे सहजच तयार होतात. म्हणूनही कदाचित त्यापासून सुटका शोधू लागतो आपण. हे काहीबाही लिहिणं कदाचित तोच केविलवाणा प्रयत्न म्हणा हवं तर. बाबू सुताराचा न लागलेला शोध हा व्यवस्थेत तळातल्या माणसाच्या दखलपात्र न राहिलेल्या अस्तित्वाचा आहे. कसलीच पोज न घेता, कुठल्याही पूर्वग्रहांच्या आहारी न जाता - पण कदाचित त्यामुळेच - व्यवस्थेचा, लोकजीवनाचाही असा एक्स-रे गुरव दाखवतात तो विलक्षण आहे.
‘श्रीलिपी’, ‘राखीव सावल्यांचा खेळ’ हे गुरव यांचे पहिले दोन कथासंग्रह वाचनात आले नाहीत, पण ‘बाळुच्या अवस्थांतराची डायरी’ आणि ‘क्षुधाशांति भुवन’ या दोन संग्रहातल्या सहा दीर्घकथा आणि दरम्यान आलेली ‘जुगाड’ ही कादंबरी वाचल्यावर किरण गुरव हा समकालीन मराठी साहित्यातला अत्यंत मौलिक, टाळता येणार नाही, असा ‘थांबा’ आहे, एवढं निश्चितपणे वाटतं. अभिप्रायात्मक शेरेबाजी अपवादानंही न येता घटितांमधूनच बदलत, सडत चाललेल्या लोकजीवनातलं गांभीर्य अधोरेखित व्हावं, हे नेहमी प्रत्ययाला येत नाही. भवतालासंदर्भात कमालीची सजग असलेली संवेदनशीलता आणि आपले जीवनसंदर्भ मुक्तद्वार करण्यातलं धाडस यांच्या मिलाफातून समकालाचा दीर्घकाळ अस्वस्थ करणारा हा दस्तावेज निर्माण झाला असावा, असं वाटून जातं.
ही गोष्ट खरं तर बाबू सुताराइतकीच हुजरे गुरुजींची पण आहे. कथा उतारावर अर्ध्या रस्त्यावर येईतो गुरुजी हुजरेगिरीतूनच झालेला आपला मध्यमवर्गीय सुखवस्तूपणाकडचा प्रवास उपरोधिक शैलीत सांगत राहतात, त्यात आपण नको तिथं जरुरीपेक्षाही जास्त वाकलो, याची आंतरिक जाणीवही दिसते. म्हणून तर बाबू सुताराच्या काहीशा अंगावर पडलेल्या शोधात गुरुजी जरा जास्तच गुरफटतात. बाबू हा शाळेतला त्यांचा सवंगडी. विशिष्ट वेळेला आधी बापानं न् मग आपण हे केलं नसतं, तर कदाचित बाबूच्या जागी आपणही असू शकलो असतो, असं वाटणंही आहे त्यात. म्हणून आपल्या किमान स्वत्वासाठी अस्तित्व पणाला लावणारा बाबू आणि हुजरेगिरीतूनच अस्तित्व मिळवणारे गुरुजी यांच्यातला विरोधाभासात्मक ताण कथा शेवटाकडे सरकते तसा अंगावर येत राहतो.
कथेचे तपशील सांगण्यात अर्थ नाही, ते मुळातूनच वाचायला हवेत. हळूहळू अंमल होणाऱ्या नशेसारखी कथा चढत जाते. शहराजवळचेच पण मोटरसायकल असणंही अजून नवलाचं वाटावं इतकं छोटं गाव. राजकारण आणि गट तट आहेतच. दिलीपअण्णा पुढारी, बहुतेक गाव त्यांच्या वळचणीखाली. पंचायत समितीच्या एका निवडणुकीत बाबूचं त्यांच्याशी बिनसतं. खरं तर बाबू त्यांच्यासाठी राबणाऱ्या अनेकांतला एक, पण एका किरकोळ प्रसंगात त्यांनी आपल्याला ‘जागा’ दाखवून दिली असं वाटून बाबू आपलं चंबुगबाळं आवरून कोल्हापुरात येतो. त्यानंतर हळुहळू तो आधी गावाच्या आणि मग भावकीच्याही ‘कव्हरेज एरिया’तून बाहेर जातो.
आता पुन्हा काही वर्षांनतर निवडणूक लागली आहे, बाबूच्या घरची दोन मतं महत्त्वाची असल्यानं अण्णांच्या सांगण्यावरून हुजरे गुरुजी त्याच्या शोधमोहिमेवर निघतातत. डोक्यात राख घालून पण जगण्यासाठी शहरात गेलेल्या बाबूची तिथली होरपळ एखाद्या रहस्यकथेप्रमाणे टप्प्याटप्प्यानं उलगडत जाते, तसे हुजरे गुरुजी अस्वस्थ होत जातात. एका टप्प्यावर बाबू जणू रहस्य उलगडण्याची सगळी सूत्रं हाती घेऊन कृष्णविवरात गडप झाला आहे. परतीच्या वाटेवर शहरातल्या संध्याकाळच्या गर्दीत गुरूजींची नजर न भेटलेल्या बाबूला पाहू लागते. अंगावर कपड्यांच्या चिंध्या, केसांच्या जटा, जीर्ण खंगलेली शरीरं आणि शून्य बर्फाळ नजर असं वर्णन गुरव करतात, ते वाचताना या काळात मागील वर्षी रस्त्यावरून घराकडे निघालेले लोंढे आठवत राहिले. त्यांचं जगणं नगण्य होतंच, पण मरणं वा हरवून जाणंही इतकं बेदखल असावं, या विचारानं एक अस्वस्थपण घेरून राहतं.
‘क्षुधाशांती भुवन’ - किरण गुरव
शब्द पब्लिकेशन, मुंबई
मूल्य – ३०० रुपये.
............................................................................................................................................
लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment